नशिबाने केला माझ्या हृदयाचा चोळामोळा!

Submitted by सतीश देवपूरकर on 17 September, 2012 - 08:38

गझल
नशिबाने केला माझ्या हृदयाचा चोळामोळा!
संपली वादळे सारी, राहिला फक्त पाचोळा!!

स्वप्नांच्या शैय्येवरती मन लोळत पडले माझे;
पाहता पाहता झाला, जगण्याचा लोळागोळा!

मी डोकेफोडच केली, आटवले रक्तच माझे......
हे ज्यांच्यासाठी केले, त्यांनीच फिरवला बोळा!

जमतात मायबोलीवर प्रतिसादक काही ऎसे;
बोक्यांची गर्दी व्हावी, बघता लोण्याचा गोळा!

मी आहे किंवा नाही, पडणार फरक कोणाला?
अत्तर उडून गेलेला, मी मंद सुगंधी बोळा!

मी गुंज गुंज टिपलेला, आनंद जीवनामधला;
वाटताच वाढत आहे, तो आता तोळा तोळा!

झोपेतच सारे सरले, तारुण्य शेवटी माझे......
पण, आता लागत नाही डोळ्याला माझ्या डोळा!

खेचतो कधीचे ओझे मी अस्तित्वाचे माझ्या!
आठवते थोडे थोडे......वय असेल तेव्हा सोळा!!

अद्याप श्वास उरलेले, मी घेतच होतो तेव्हा.......
न्यायला स्मशानी मजला, ते लोक जाहले गोळा!

शिक्षकदिन आता गाजे! बघ, धूमधडाक्यामध्ये!
वाटेल कुणाला येथे, चालला असावा पोळा!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नशिबाने केला माझ्या हृदयाचा चोळामोळा!
संपली वादळे सारी, राहिला फक्त पाचोळा!! << वा

स्वप्नांच्या शैय्येवरती मन लोळत पडले माझे;
पाहता पाहता झाला, जगण्याचा लोळागोळा! << छान शेर

मी आहे किंवा नाही, पडणार फरक कोणाला?
अत्तर उडून गेलेला, मी मंद सुगंधी बोळा! << अधिक आवडला

खेचतो कधीचे ओझे मी अस्तित्वाचे माझ्या!
आठवते थोडे थोडे......वय असेल तेव्हा सोळा!! << पहिली ओळ फार आवडली, शेरही छान

धन्यवाद

-'बेफिकीर'!

अब जईके सही फूटें हैं..!

बऱ्याच कालावधीनंतर तुमची एक गझल जराशी आवडली..!

मी डोकेफोडच केली, आटवले रक्तच माझे......
हे ज्यांच्यासाठी केले, त्यांनीच फिरवला बोळा!

जमतात मायबोलीवर प्रतिसादक काही ऎसे;
बोक्यांची गर्दी व्हावी, बघता लोण्याचा गोळा!

मी आहे किंवा नाही, पडणार फरक कोणाला?
अत्तर उडून गेलेला, मी मंद सुगंधी बोळा!

मी गुंज गुंज टिपलेला, आनंद जीवनामधला;
वाटताच वाढत आहे, तो आता तोळा तोळा!

करतात साजरा शिक्षकदिन धूमधडाक्यामध्ये!
वाटेल कुणाला येथे, चालला असावा पोळा!!

हे शेर आवडले. 'मायबोली'वाला शेर संदर्भ माहित असल्यास समजतो. अर्थात, त्याची व्याप्ती मर्यादित आहे. 'पर्यायी' देऊ शकतो... पण देणार नाही !

"मी डोकेफोडच केली, आटवले रक्तच माझे......" इथे 'च' वर जरा जास्तच जोर आला, असं वाटलं मात्र.

अद्याप श्वास उरलेले, मी घेतच होतो तेव्हा.......
न्यायला स्मशानी मजला, ते लोक जाहले गोळा!

हा शेर कुठे तरी अनुभवलेला वाटतो.

बाकी सर्व ठीक!
कळावे..
लोभ असावा.

....रसप....

एक माझीही अ‍ॅडिशनः

माझ्यामध्ये स्थिर आहे हा द्वाड बाळ कुठलासा
गावाकडच्या झाडावर घेतो अजुनी हिंदोळा

बाकी शिक्षकदिनात यती पाळला गेला नाही, त्यामुळे पोळा वाटल्यास बाराखडी जबाबदार नाही (कृपया हलके घ्यावेत)

प्रतिसादातुन घालावा अवघा गोंधळ सारा
ठोकावे भाषण भलते समजून वाचका भोळा

Proud

गझलांच्या बाजारीही भलतेच बैल हे शिरले
डोक्याचा होतो चुथडा मग बाम झंडुचा चोळा

हॅट्स ऑफ टु मी ..... देव सरानी गझल करुनही नवीन कवाफी शोधल्याबद्दल आणि लगेच एकटायपी ( एका दमात टाइप केलेले ) शेर रचल्याबद्दल.

Biggrin

शेळी ताई...

गझलांच्या बाजारीही भलतेच बैल हे शिरले
डोक्याचा होतो चुथडा मग बाम झंडुचा चोळा

साठी -

,,====[]==O> (साष्टांग दंडवत..!)

करा की हे त्याना उत्तेजन देण्याच्या हेतूने म्हणालो .... सहा महिन्यापूर्वी मला मुक्तछंद सुद्धा करता येत नव्हतं ... आता सोळा गझला पाडून झाल्यात

कवाफी कशा शोधाव्यात?

हा प्रश्न सर्वानाच विचारलेला आहे. सर्वानी मते मांडावीत.

विशेषतः देव सराना, इतक्या कवाफी कशा शोधता?

कवाफी कशा शोधाव्यात मराठीची बाराखडी (वर्णमाला) पाठ असावी लागते >>>>>>>>>

आपण देवसराना विचारत आहात हे माहीत आहे तरी मी सान्गतो......फार सोपे आहे ते .

हे पहा असे ......

एकदाका अलामत समजली की त्या अलामतीच्या अक्षराला (व्यन्जनाला) बदलून क ,ख, ग, घ, लावत सुटावेत मग नवीन काफिये सुचतात(आता अलामत म्हणजे काय हे विचारू नका .मलाही नीट समजले नाहीय आजवर !!असो.....)

मराठी या शब्दात अ ही अलामत ग्राह्य धरल्यास पहा कवाफी अशी तयार होते <<<<<<<कराठी ,खराठी, गराठी, घराठी चराठी ......ज्ञराठी इत्यादी !!

आता तयार झालेल्या काफियाला काही प्रचलीत अर्थ आहे डिक्क्षनरीत तपासून पहावे मगच तो शब्द काफिया म्हणून वापरावा

टीपः ही पद्धत मला विठ्ठलाने दृष्टान्त देवून सान्गीतली आहे त्यामुळे मी तीच पाळतो व खरी मानतो ...या उपर आपली मर्जी व अपली जबाबदारी !!

Biggrin Biggrin Biggrin

भूषणराव, प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
शिक्षकदिनाच्या शेरावर आपण हाणलेला शालजोडीतला हळूवारपणे पोचला!
आवेगाच्या नादात, व वेळेच्या तोकडेपणामुळे, यतिभंग झाला आहे समजूनही तो काढण्याचा कंटाळा माझ्या हातून केला गेला. असो. निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद!
यतीभंग काढला आहे. पहाल का?
टीप: यंदाचा आमचा शिक्षकपोळा हा आमचा ३५वा पोळा होता. अजून पुढील ४ पोळे पहायचे आहेत. म्हणजेच एकूण ३९ पोळे पाहून झाल्यावर, आमची या घाण्यातून औपचारीक मोकळीक व्हावी बहुधा! मग काय, गझल, गझल आणि फक्त गझल!
.............प्रा.सतीश देवपूरकर
.................................................................................................

गझल आवडलीच
पाहता पाहता झाला, जगण्याचा लोळागोळा
येथे जगण्याचा ऐवजी देहाचा पाहीजे होते असे मला वाटते

मुक्तेश्वर!
>‘पाहता पाहता झाला, जगण्याचा लोळागोळा’
या ओळीत जगण्याचा लोळागोळा झाला असे म्हटले आहे.
जगण्यात म्हणजेच जीवनात सर्व आले.....आयुष्य, देह, मन, आत्मा वगैरे.
देहाचा लोळागोळा झाला म्हटले तर फार मर्यादीत वाटते. शेराची उंची कमी झाल्यागत वाटते. इथे स्वप्नांच्या शैय्येवरती मन लोळत पडले असे उला मिस-यात म्हटले आहे. म्हणजेच आमचे मन नुसतेच स्वप्ने पहात बसले.

इथे स्वप्नांची शैय्या, मनाचे लोळत पडणे या प्रतिमा शेराची उंची वाढवतात!
लोळत पडणे या शब्दामधे आळस, अनुरूप कृतीचा अभाव वगैरे सूचीत होतात.
म्हणून पुढील ओळीत जगण्याचे/जीवनाचे लोळागोळा होणे अशी प्रतिमांची भाषा येते. इथे नुसता शरिराचा लोळागोळा होणे इतका मर्यादीत अर्थ अपेक्षित नाही!
प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद!
..........प्रा.सतीश देवपूरकर

टीप: यंदाचा आमचा शिक्षकपोळा हा आमचा ३५वा पोळा होता. अजून पुढील ४ पोळे पहायचे आहेत. म्हणजेच एकूण ३९ पोळे पाहून झाल्यावर, आमची या घाण्यातून औपचारीक मोकळीक व्हावी बहुधा! मग काय, गझल, गझल आणि फक्त गझल!<<<

आपल्या व्यवसायाच्या आगामी चार वर्षांसाठी व त्यानंतरच्या गझलप्रवासाच्या खास वर्षांसाठी आपल्याला मनःपूर्वक शुभेच्छा प्रोफेसर साहेब.

धन्यवाद बेफिकीरजी!
आपल्यासारख्या निगर्वी, निरागस, व्यासंगी गझलकाराच्या शुभेच्छांमुळे आम्ही अधिक जोमाने अध्यापन व गझल लेखन करू असा आपणास शब्द देतो!
........प्रा.सतीश देवपूरकर