मी केलेली शाडू मातीची गणेश मुर्ती...

Submitted by विमुक्त on 17 September, 2012 - 04:10

मागच्या वर्षी मी पहिल्यांदा गणेश मुर्ती घडवली होती... देवाच्या कृपेने मुर्ती छान झाली होती, मग ह्या वर्षीपण मुर्ती बनवायची असं ठरवलं होतं... आज नको उद्या करु असं करता-करता शेवटी गणेश चतुर्थीला एकच आठवडा उरला असताना शाडू माती कालवायला घेतली... मागच्या वर्षी माझा मित्र, यशदीप ह्याने माती कालवून दिली होती... ह्या वर्षी मीच कालवत होतो... मी सुरुवातीलाच खूप पाणी घातलं आणि माती कालवून एकजीव करु लागलो... खूप पाण्यामुळे कालवायला सोपं गेलं, पण माती खूपच ओली झाली आणि मातीला आकार देणं अवघड होवून बसलं... मग परत त्यात थोडी-थोडी सुकी शाडू माती मिसळली आणि पाणी न टाकता पुन्हा कालवली... मुर्ती घडवण्यासाठी योग्य माती कालवायला निदान २ तास तरी लागले...

हात जाम दमले होते, मग दुपारच्या जेवणासाठी ब्रेक घेतला आणि जेवण उरकल्यावर मुर्ती घडवायला लागलो...

जमेल का? मागच्या वर्षी इतकीच मुर्ती छान घडेल का? असे प्रश्न मनात न आणता मी काम सुरु केलं... आधी बैठक, मग पाय, मग पोट अश्या प्रकारे मुर्तीला आकार येऊ लागला... पोटाला नीट आकार दिल्यावरच मग चेहरा करायला घ्यावा, पण मी तसं न करता पोटाला अर्धवट आकार दिल्यावर चेहरा करायला घेतला आणि पोटावर ठेवला... मुर्ती लहान असल्यामुळे मला नंतर पोटाला हवा तसा आकार द्यायला खूपच कष्ठ करावे लागले... आता मुर्तीचे हात आणि पाय करायला घेतले... एक हात लहान, तर एक मोठा असं होत होतं... सगळे हात समान आकारचे करायला एक तास तरी लागलाच असेल... मग पावलं पायांना जोडली आणि ढोबळ मानाने मुर्तीला आकार देवून झाला, आता निवांतपणे मुर्तीच फिनीशींग करायला लागलो...

फिनीशींग करताना जाणवलं की मुर्तीची सोंड जरा पातळ झालीय, मग ती सोंड काढली आणि जरा जाड सोंड बसवली... आता मुर्ती प्रपोर्शनेट वाटत होती... मला गणपतीचे कान छान जमत असल्यामुळे मुर्तीचे कान पटकन झाले...

आता सगळ्यात अवघड काम म्हणजे डोळ्यांच काम हाती घेतलं... डोळे करताना जरा भीती वाटते, म्हणून मुर्ती नीट घडल्यावर जरा आत्मविश्वास वाढला, की मग मी डोळ्यांच काम हाती घेतलं... नुसत्या दोन भुवया करायला मला २ तास लागले... मग मातीचं जानवं पण मुर्तीवर चढवलं आणि मुर्ती वाळायला ठेवली... कधी उन्हात, तर कधी टंगस्टनचा बल्ब पेटवून मुर्ती वाळवत होतो... अधून-मधून अजून थोडं-थोडं फिनीशींग चालूच होतं... २ दिवसांनी मुर्ती पुर्णपणे वाळल्यावर पांढरा रंग दिला...

व्हाईट-वॉश नंतर साधारण १२ तासानंतर रंगकाम सुरु केलं... अंगाला स्लेट कलर द्यायचं ठरवलं होतं... खूप वेळ प्रयत्न करुन पण मनासारखा रंग बनत नव्हता, मग त्यातल्या त्यात जो योग्य वाटत होता तो रंग अंगाला दिला... पितांबर पिवळ्या रंगाने रंगवलं, पण अंगाच्या स्लेट कलरवर पिवळा पितांबर उठून दिसेना, मग पिवळा आणि लाल रंग मिसळून पितांबर भगव्या रंगाच केलं...

अलंकार सोनेरी रंगवायचे होते म्हणून "गोल्डन पोस्टर कलर" आणला... हा रंग ब्रशने पसरवला तर सोनेरी वाटतच नव्हता, म्हणून लिटरली ब्रशने तो मी मुर्तीवर चिकटवला... सगळ्यात शेवटी डोळे पुर्ण केले आणि गणपती बाप्पाची मुर्ती पुर्णे झाली...

३-४ दिवसांपुर्वी जेव्हा मी मुर्ती करायला घेतली, तेव्हा मुर्ती इतकी सुरेख घडेल असं मला सुध्दा वाटलं नव्हतं...

विमुक्त
http://www.murkhanand.blogspot.in/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगला प्रयत्न !
गणपती गंध थोडे मोठे लांब सोंडेवरुन घेतले असते तर छान वाटले असते.
शिवाय मुर्तीला चोपडेपणा येण्यासाठी अगदोर ब्रशने नुसते पाणी लावायचे होते.

सुरेख मुर्ती आहे Happy

बाकी विमुक्ता कुठे गायबलास रे?
तुझे बर्‍याच दिवसात एकही भटकंती वर्णन आले नाहिये. तो सायकल प्रवासही अर्धवट.

सुरेख!
खरंतर गणपती डोळे उघडायच्या आधी इतके गोड दिसत नाहीत पण तुमचा मात्र न रंगवलेला डोळे न उघडलेलाही खूपच गोड दिसतोय.

Pages