घाट आणि कोकण यांच्यावर लक्ष ठेवणारा कोकणदिवा...!!!

Submitted by भटक्या अनुराग on 14 September, 2012 - 12:59

घाट आणि कोकण यांच्यावर लक्ष ठेवणारा कोकणदिवा...!!!

‘ कोकणदिवा ’ हे नाव कधी ऐकले आहे का तुम्ही...यातील बरचसे जण म्हणतील कोकण दिवा नावाचे काही अस्तित्वात तरी आहे का किंवा आम्ही फक्त शिवाजी महाराजांचे किल्ले करतो असल्या नावाचा किल्ला कधीच महाराष्ट्रात नाही किंवा त्याचे नाव इतिहासाला माहिती नाही.

अशी बरीच उत्तरे मला मिळाली वर असे पण ऐकविण्यात आले की तू काही पण सांगतोस उगाच असल्या कोणत्याही किल्याचे नाव नाहीये आम्हाला त्याबद्दल काही सांगू नकोस. त्यादिवशी पासून ठरवले की कोकणदिवा किल्ला करायचाच म्हणून त्याची माहिती जमवायला सुरुवात केली.

मी या किल्याचे नाव ऐकून होतो मनात दृढ इच्छा असेल तर सगळे काही जमते. या विश्वासाने माहिती जमवायला लागलो ज्यांनी हा किल्ला आधी केला आहे त्यांच्याकडून हि माहिती जमवायला लागलो. त्याचदरम्यान माझा मित्र चैतन्य पाठक हा देखील माझ्या मागे लागला होता आणि सारखे म्हणायचा ‘ भाई कोकणदिव्याचा प्लान तयार करा...’ त्याला माझे उत्तर असायचे करू मला किल्ला माहिती आहे पण जायचे कसे हा मार्ग मी शोधत आहे.

मला कोकणदिव्याची पहिली माहिती मिळाली प्रा. प्र. के. घाणेकर यांच्या पुस्तकात ज्या दिवशी मला माहिती मिळाली त्या दिवशी मला खूप आनंद झाला पण त्याच्यात जो रस्ता सांगितला होता तो जरा अवघड होता. तो मार्ग दुर्गम वासोट्याला जसे जातात तसा होता पण त्या महितीचा आम्हाला खूप उपयोग झाला.

त्याचदरम्यान मला आठवले की माझा एक मित्र केदार बर्वे हा कोकणदिव्याला जाऊन आला आहे. मग मी त्याला लगेच फोन केला आणि त्याच्याकडून सविस्तर माहिती घेतली. त्याची हि माहिती आम्हाला खूप महत्वपूर्ण ठरली. मग ठरले की आता कोकणदिवा किल्यावर जायचे आणि जे म्हणतात की हा किल्ला नाही त्यांना दाखवायचे की हा किल्ला किती महत्वाचा आहे ते.

ज्या दिवसाची मी वाट बघत होतो की माझी परीक्षा कधी संपती आहे तो दिवस उजाडलाच अखेरीस माझी परीक्षा संपली मग मी चैतन्य ला फोन केला आणि सांगितले आता आपण कोकणदिव्याला जायचे. मग आपली नेहमी प्रमाणे टीम तयार करणे आणि त्यांना सर्व सविस्तर सांगणे की कसे जायचे कुठे थांबायचे यापद्धतीमध्ये काम सुरु झाले. त्याच्यात मला मध्येच असे समजले की कोकणदिव्याला पोहोचण्यासाठी तिकडे थांबावे लागते म्हणजे एक दिवस मुक्काम करावा लागतो. मग परत मी सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी केदार बर्वे ला फोन केला तो म्हणाला एक दिवसात कोकणदिवा करून तू पुण्यात येऊ शकतोस.

मग काय विचारता आमची तयारी अजून जोरदार सुरु झाली. किती जण हो नाही हो नाही करता करता गळाले. चैतन्य पाठक म्हणाला जाऊन तर बघू काय होते ते. आदल्या दिवशी मी गौरव जोशी ला फोन करून विचारले येतोस का म्हणून तर तो म्हणाला एक तासात सांगतो. पण पंधरा मिनटात मला गौरव चा फोन आला मी येतो आहे.

अखेरीस या ट्रेकला आम्ही फक्त ४ जण तयार झालो. मग आमचे ठरले १९ मे २०११ रोजी आम्ही भल्या पहाटे म्हणजे सकाळी ७.१५ ला राजाराम पुलावर भेटलो. तेव्हा चैतन्य चा मित्र केतन मावळे याच्याशी माझी ओळख झाली. त्याच्याआधी चैतन्य केतन मावळे हे एकत्र ट्रेक करायचे. मग गौरव जोशी ची ओळख केतन आणि चैतन्य बरोबर करून दिली.

मग काय विचारता बजाज सी.टी १०० आणि दुसरी बजाज पल्सर गाड्या घेऊन निघालो सिंहगड रोडवरच्या एका हॉटेल मध्ये थांबून मस्त पैकी चहा प्यायलो त्याच्यात देखील आमचे हेच बोलणे चालू की तू कोणते ट्रेक केलेस आणि कोणते नाही केलेस पुढच्या वेळेस हा ट्रेक करू तो ट्रेक करू. आणि मग कोकणदिव्याच्या मुद्द्यावर आलो.

केतन पण तेच म्हणाला हा कोणता असं किल्ला आहे की आपण जात आहोत कधी या किल्याचे नाव ऐकले नाही. आता जायचे कसे...?? मार्ग कोणता...?? असे बरेच प्रश्न सतावत होते. मग आम्ही ठरवले पानशेत ला जाऊन घोळ गावाचा रस्ता विचारायचा.
मग काय गाड्या काढल्या टपरी वरून आणि पुण्याची शान असलेल्या खडकवासला धरणाजवळ जाऊन थोडेसे फोटो काढले...नुकतीच सकाळ होत होती आणि दूरवरून धुक्यामध्ये कोंढाणा उर्फ सिंहगड डोके काढून आम्हाला खुणावून नरवीर तानाजी मालुसरे यांच्या शौर्य कथेच्या इतिहासाची आठवण करून देत होता.

खडकवासल्यावरून निघालो आणि रस्त्यात आम्हाला एक अत्यंत सुंदर दृश्य दिसले सिंहगड किल्याच्या पायथ्याला जी मोकळी जागा आहे तिथे मुले क्रिकेट चा आस्वाद घेत होती आणि सिंहगड त्यांच्यावर मागून लक्ष ठेवत होता. त्या दृश्याने आमचा उत्साह वाढला. सिंहगड पायथ्यावरून जिथून पानशेतला गाडी रस्ता वळतो तिकडून आम्ही पानशेतच्या मार्गाला लागलो. आता सगळ्यांच्या मनाला ओढ होती ती कोकणदिव्याची. त्या ओढीने आम्ही पानशेत पर्यंत येऊन पोहोचलो मागून सिंहगड वरील धुके निघून जाऊन सिंहगड स्पष्ट दिसत होता.

वरसगाव आणि पानशेत च्या मध्ये गाडी थांबवून केतन ला मी बोललो घोळला जायचा रस्ता विचार कारण त्याची पल्सर होती त्यामुळे तो आमच्या बजाज सी.टी १०० च्या कायम पुढे असायचा...!!! अखेरीस तिथे एक माणूस केतन आणि चैतन्य ला भेटला त्यांनी त्याला विचारल्यावर त्यांनी सांगितले की “ तुम्ही पानशेत धरणाच्या बोटिंग क्लब च्या उजवीकडून वरच्या अंगाला जा आणि सरळ जात राहा घोळ येईल लगेच...अजून तुम्हांसी तीश मिनिटे लागतील. ”

मग काय विचारता घोळ गावाचा पत्ता मिळाल्यावर आम्ही गाड्या सुसाट पळवायला सुरुवात केली. कोणी आधी कोकणदिव्याला गेले नव्हते मग काय निघालो गेल्यावर पानशेत बोट क्लब च्या इथला नव्वद अंशातला चढ गाड्या चढवण्यात मजा यायला लागली आमची बजाज सी.टी १०० चढेना शेवटी उतरलो आणि मग गाडी वर चढवली गौरवने...!!!

तिथून आमचा घोळ गावापर्यंतचा प्रवास सुरु झाला...गाड्या सुसाट वेगाने काढल्यावर जे दृश्य बघितले त्याने आम्ही पण आश्चर्य चकित झालो पानशेत बोटिंग क्लब सोडल्यावर तेथील गावापासून सिमेंट चे रस्ते सुरु...जे शहरात पण दिसत नाहीत आणि उजवीकडे आजूबाजूला उंचच उंच सह्याद्रीच्या मुख्य रांगेचे डोंगर आणि डावीकडे पानशेत धरणाचे बॅक वॉटर...!!! आणि दुरून हळूच मागील बाजूने दर्शन देणारा सिंहगड...!!!

बऱ्याच वेळानंतर आम्हाला दापसरे गाव दिसले आणि तिथे थांबलो तिथल्या पठारावर गाई म्हशी निवांत पणे चरण्यात गुंग होत्या. हे गाव अगदी छोटेस २५ ते ३० घरांचे तेथे आम्ही काही वेळ फोटोग्राफी केली आणि गुराख्याला विचारले की घोळ गावामध्ये जायला किती वेळ लागेल तो म्हणाला “ हितून फुढे गेलात की गोंडखळ गाव लागेल आणि त्याच्यानंतर खिंड येईल ती खिंड चढून उतरल्यावर घोळ गाव लागेल अजून दहा मिनिटे लागतील...!!! ”

मग आम्ही त्या गावच्या पुढे गाड्या काढून निघालो मस्त वळणा-वळणाचे सिमेंट चे रस्ते थोडेसे ढगाळ वातावरण आजूबाजूला आंब्याची झाडे आणि त्याला लागलेल्या कैऱ्या आणि त्या कैऱ्या इतक्या खाली होत्या की त्या तोद्ण्यावाचून आम्हाला मोह आवरला नाही केतन ने कैऱ्या तोडून तिथेच कैऱ्या खायला सुरुवात केली...!!!

तिथून पुढे आम्ही खिंडीत आलो आणि असे वाटायला लागले की आता पाऊस येणार इतके ढग दाटून आले होते. अजून सुद्धा आम्हाला कोकणदिव्याचे दर्शन नव्हते झाले. मध्येच मनाला वाटत होते की आम्ही रस्ता तर चुकलो नाहीना...!!! अखेरीस आम्हाला घोळ गाव दिसले. हे गाव पुणे जिल्ह्यातील शेवटचे गाव आहे.

त्या गावात आम्ही गाड्या लावल्या आणि तेथील समोरील घरातील लोक आमच्याकडे आश्चर्याने बघायला लागले. मग गावाच्या आतमध्ये शिरल्या-शिरल्या एका आजीबाईंनी आम्हाला विचारले “ का रे पोराव्हो कुठे कोकनदिवा का...?? आम्ही म्हणालो हो कोकणदिव्याला जायचे आहे कसे जाऊ...मग त्या म्हणाल्या हिथून मागे गेलात की गवताच्या पेंढ्या रचून माचण तयार केली हाय तिथून पायवाट गारजाई वाडीकडे जाते अजून हिथून पाऊन तास लागेल तुम्हास्नी...” तोपर्यंत सकाळचे ९.४५ झाले होते.

तेवढ्यात चैतन्य आणि केतन म्हणाले आपण काहीतरी खून घेऊ भूक लागली आहे. पण गाव इतके छोटे असल्यामुळे काही खायला मिळेल की नाही याची शंका होती. मग आम्ही तेथे एक घरात चौकशी केली तेव्हा त्या घरातल्या काकांनी सांगितले इथे काही मिळणार नाही सकाळी सकाळी तुम्हाला पण एक गोष्ट देऊ शकतो तर आम्ही म्हणालो ठीक आहे जे असेल ते द्या.

त्या काकांनी आम्हाला सकाळी सकाळी फणसाच्या झाडावरून फणस तोडून आणि कापून त्याचे अत्यंत गोड आणि मधुर गरे खायला दिले या गोष्टीने आम्ही चौघेही भारावून गेलो इतकी आपुलकी त्या फणसाच्या गऱ्यांमध्ये आणि त्या गावच्या लोकांमध्ये होती. त्या काकांना आम्ही म्हणालो आम्हाला कोकणदिव्याला जायचे आहे कोणी येईल का आमच्याबरोबर तर त्यांनी त्यांच्या मुलाला सांगितले तू जा यांच्याबरोबर तर तेवढ्यात तो एका शेजारच्या घरात शिरला आणि त्याच्या एका मित्राला तो घेऊन आला.

मग काय विचारता आमची पलटन म्हणजे मी, गौरव, केतन, चैतन्य, नारायण, आणि प्रताप असे सगळे निघालो कोकणदिव्याच्या दिशेने. वाटेत आम्ही जंगलचा मेवा म्हणजेच करवंद उर्फ काळी मैना, कैऱ्या, आणि जांभळे खात खात जात गारजाई वाडीच्या इथे पोहोचत होतो तेव्हा दुरून दोन माणसे डोक्यावर पत्रे घेऊन येत होती त्यांच्या डोक्यावरचे ते लांब लचक पत्रे पायात काही नाही हे पाहून मनाला दुख वाटले की काय हलाखीत इथली हि माणसे जीवन जगत असतील...ती माणसे भेटल्यावर म्हणाले “ आम्ही हे पत्रे घोळ मधून घेऊन आलो आता पावसाळा येईल न त्याची हि तयारी... ” अखेरीस दर मजल करत गारजाई वाडी गाठली आणि आम्हाला कोकणदिव्याचे पहिले दर्शन झाले.

इथून पंधरा मिनिटांच्या अंतरावर कोकणदिवा आहे. गावाचे ठिकाण इतके सुंदर आहे मागे आणि पुढे डोंगर आणि उजवीकडे मोठी म्हणजे साधारणतः ४००० फुट खोल दरी. आणि खाली कोकण...!!! मग आम्ही गारजाई वाडी मधून पुढे निघालो तर फणसाची झाडे आणि त्यावर लटकलेली फणसेच फणसे आणि त्यांचा तो वास बऱ्याच वेळ आमच्या नाकात घोंगावत होता...!!!

मजल दर मजल करत आम्ही अखेरीस एका दरीपाशी आलो त्याच्याखाली खिंड होती आणि उजव्या बाजूला आमच्या शेजारी कोकणदिवा उभा होता ती दरी म्हणजेच ऐतिहासिक कावळ्या घाट. जेथे महाराष्ट्राच्या इतिहासातील महत्वपूर्ण लढाई झाली . ‘ वरघाटाकडून कोकणात निघालेला शहाबुद्दीनखान कावळ्या घाटातून उतरणार होता. तो खाली आला की थेट रायगडवाडी पासून छत्री निजामपूर, पाणे, दापोली पर्यंत वेढा पक्का करणार होता. हे सारं गोदाजी जगताप आणि सर्कले नाईक यांना कळाले. त्यांनी धोका ओळखला दोघे मर्द याच कावल्या-बावल्या खिंडीच्या मध्ये उभे राहिले त्यांच्या अंगात बारा रेड्यांचे बळ संचारले होते. याच चार हातानी त्यांनी शहाबुद्दीन खानाचे ३०० सैनिक कापून काढले आणि मोघल पळत सुटले... ’अश्या ऐतिहासिक खिंडीच्यावर हा कोकणदिवा आहे. त्या कावळ्या घाटातून खाली उतरण्यास गारजाई वाडी मधून रस्ता आहे. त्या कड्याच्या एका बाजूस कोकणदिवा शांतपणे उभे राहून आपले स्वागत करतो.

पाणी पिऊन आम्ही कोकणदिवा चढायला लागलो हि चढण सगळी खडी चढण आहे. नव्वद अंशामध्ये हि चढण आहे. जसे जसे आम्ही वर चढायला लागलो तशीतशी आम्हाला दरी दिसू लागली म्हणजे एखाद्याचा पाय सटकला की तो कोकणातच सापडेल अशी अवस्था आणि भयानक ‘ स्क्री ’ (म्हणजे मुरमाड घसरणारी माती) त्याच्यात चैतन्य प्रचंड दमला आणि त्याचे बूट त्याला ग्रीप देईना म्हणून मी चैतन्यच्या पुढे आणि केतन मागे अशी सर्कस बऱ्याच वेळ चालली होती अखेरीस चैतन्य ने बूट काढून टाकले आणि अनवाणी गड चढायला लागला मागे नुसती खोल दरी आणि वरती उंच कोकणदिव्याचे छोटेसे पठार.

मध्ये एक झाड आणि त्याच्याशेजारी मोठे रॉक पॅच आणि एक कसरत आमच्यापुढे उभी होती गौरव ला ते बघून जास्तच आनंद झाला आणि तो ते चढायला गेला त्याने झाडाला पकडले आणि त्याचा तोल जाऊन पाच फुट खाली पडला...नशिबाने त्याला लागले नाही. आणि मागून चैतन्य येतच होता हळू हळू हा रॉक पॅच बघून त्याला टेन्शन आले त्याला मी आणि केतन ने वर घेतले आणि अखेरीस आम्हाला कोकणदिव्याची गुहा दिसली आणि तीन पाण्याचे खोदीव टाके दिसले गुहा अत्यंत सुबक खोदली आहे त्या गुहेमध्ये साधारणत: १५ जण आरामत झोपू शकतील टाक्यातील पाणी १२ महिने असते. हा किल्ला चौकीचा किल्ला आहे हा किल्ला रायगडच्या प्रभावळीत येतो. किल्यावर असंख्य पोस्ट होल्स आहेत. पाणी अत्यंत चवदार आहे नारायण आणि प्रताप अगोदरच त्या गुहेत जाऊन पोहोचले होते. मग आम्ही आणलेले डबे खाल्ले आणि दहा मिनिटे विश्रांती घेतली...!!!

आता खरे आव्हान होते ते शिखर काबीज करण्याचे. आम्हाला किल्याच्या छोट्या पठारावर जायचे होते परंतु मध्ये आमचा मार्ग अडवायला होता रॉक पॅच साधारणता: सात फुटांचा हा रॉक पॅच आहे तो रॉक पॅच पाहून चैतन्य म्हणाला मी वर येणार नाही. त्याला आम्ही सांगितले वर चल. शेवटी मी आणि गौरवने छोटी छोटी दगडे रचली त्या रॉक पॅचच्या शेजारी आणि केतन वर चढलेला होता त्याने चैतन्यला हाताने वर खेचून घेतले. आणि अखेरीस आम्ही त्या छोट्या पठारावर पोहोचलो आणि समोर बघतो काय तर साक्षात दुर्ग-दुर्गेश्वर रायगड आमच्या समोर उभा....!!!

येथून रायगड इतका झकास दिसतो की बस्स्...!!! मला वाटतं सभासदान आपल्या बखरीत, “ राजा खासा जाऊन पहाता गड बहुत चखोट. चौतर्फा कडे तासिल्याप्रमाणे दीड गाव उंच. पर्जन्यकाळी कडीयावर गवत उगवत नाही...आणि धोंडा तासीव एकच आहे... ” हे सार वर्णन शिवाजी राजांच्या तोंडी घातल आहे. त्याने खचितच रायगडाच या बाजूकडून दर्शन घेतलं असणार...!!!

रायगड हा तेथून अवघ्या सहा की.मी अंतरावर आहे तसेच दुर्गदुर्गेश्वर रायगडचे दर्शन येथून टकमकटोकापासून ते भवानी कड्यापर्यंत होते आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे महाराजांची समाधी नुसत्या डोळ्यांनी दिसते आणि राजवाड्याचे देखील दर्शन नुसत्या डोळ्यांनी होते....!!!
अखेरीस आमची निघायची वेळ झाली आम्हाला कोणाला तिथून पाय काढायची इच्छा होत नव्हती पण नाईलाज होता अखेरीस आम्ही तिनच्या सुमारास तिथून उतरून परत गुहेपाशी आलो आणि मग गारजाई वाडी कडे उतरण्यास सुरुवात केली उतरताना पाय सटकत होते आणि खाली सरळसोट दरी दिसत होती म्हणून आम्ही याच्यावर एक उपाय काढला खाली बसून पायाने सरकायचे त्याला आम्ही ‘ डकटेल्स ’ असे नाव दिले आणि अखेरीस कावल्या-बावल्याच्या त्या ऐतिहासिक खिंडीच्या वर आलो आणि कोकणदिव्याच्या पायथ्याला आणि आमचे प्रस्थान परत पुण्याकडे सुरु झाले आणि दुर्गदुर्गेश्वर रायगडच्या आठवणी मनात ठेवून कोकणदिव्याचा शेवटचा फोटो काढून आम्ही घोळ गावात पोहोचलो जाताना आमच्या सॅक मध्ये रानमेवा म्हणजेच कैऱ्या, हातग्याची फुले, जांभळे, करवंद, आणि माझ्या हातात भला मोठा फणस अशी फळांची जत्रा घेऊन घोळ गावातून गाड्या काढून आम्ही पुण्याकडे निघालो. वाटेत पानशेत बोटिंग क्लबला थांबून चहा आणि मिसळ मागवली ते खाऊन ज्यावेळेस पानशेत सोडले त्यावेळेस आम्ही नवीन प्लान ठरवला परत कोकणदिवा ते रायगड कावल्या- बावल्या खिंडीतून परत एकदा ट्रेक करायचा...!!!

हा कोकणदिवा पाहून आल्यानंतर एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते रायगडच्या नंदादीपासमोर असणारा हा गावंढळ कोकणातल्या दिवटीसारखा. त्याच्या आकारामुळे हा डोंगर “ कोकणदिवा ” नावाचं कुंकू लावून बसला आहे. आपल्या काळ्या आईच कुंकू सावरून कधीचा ठाण मांडून राहिला आहे.

‘ रे सह्य पुत्रा थांब या स्थळी ...’

कारण हा सारा इतिहास ज्यांना सांगावा, त्याचं लक्ष भलतीकडेच आहे, माथेरान-महाबळेश्वर-प्रतापगड-पन्हाळा-गणपतीपुळे यांच्या सारखीच रायगडाची वाट लागणार की काय...?? याच चिंतेत ती सारी बुडाली आहेत. कारण इथल्या पर्यटनाचा आत्मा असायला पाहिजे शिवस्मृती...तीच आम्ही हरवून बसलो आहोत...!!!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोकणदिवा हा किल्ला नाहीये माझ्या माहितीप्रमाणे..
पुण्यापासून पायथ्यापर्यंत अंतर किती? खालून वर जायला किती वेळ लागतो?
डकटेल्स भारी.. Happy
फोटोझ हवेत की राव!

अनुराग,
मस्तच.. फोटो हवे होते...काही वर्षांपुर्वीच्या आमच्या क्रॉस कंट्री ट्रेकची आठवण करून दिलीस.. आम्ही एका दिवसात जिते - कुर्डूगड - देव घाट - धाम्हणव्हाळ - दापसरे ते घोळ असा ट्रेक केला होता...घोळ फावातल्या शाळेत रात्र काढून दुसर्‍या दिवशी गारजाई वाडीतून कोकणदिवा कावळ्या घाट करून निजामपूर मार्गे रायगड किल्ला करून परत घरी आलो होतो...त्या वेळेला दापसर पर्यंतच गाडी रस्ता होता आणी पुढे ट्रेक करूनच घोळला यायला लागायचे....

तु म्हणतोस ती कोकणदिव्याच्या शेजारची दरी म्हणजे कावळया घाट.. कावले-भावले खिंड वेगळी...त्याच खिंडीत युद्ध झाले होते आणी अजूनही खिंडीच्या माथ्यावर या योध्यांची समाधी आहे...
वरून रायगड मात्र खतरी दिसतो यात शंका नाही..

आणी एक..घोळ हे काही पुणे जिल्यातले शेवटचे गाव नाही ते गारजाईवाडी हे आहे...

फोटो टाकायचे मनावर घेच

कोकणदिवा हा किल्ला नाहीये माझ्या माहितीप्रमाणे..
पुण्यापासून पायथ्यापर्यंत अंतर किती? खालून वर जायला किती वेळ लागतो? >>> हेम..मला पण असेच वाटते...कोकणदिवा हा काही वेगळा किल्ला नसावा तर फक्त वॉच टॉवर असावा...
पुण्याहून जायचे तर - पुणे - पानशेत - टेकपावळे - माणगाव - दापसर - घोळ असा असा रस्ता आहे.. घोळच्या पुढे ट्रेक करत जावे लागते.. घोळ ते गारजाई वाडी पाऊणतास.. गारजाईवाडी ते कोकणदिवा पायथा २० मि. - पायथा ते वर पर्यंत १.५ तास... पुणे ते घोळ रस्त्याच्या अंतरासाठी माझ्या डायरीत शोधावे लागेल..

फोटो आज टाकतो...कोकणदिवा हा टेहळणी किल्ला होता याचे काही पुरावे माझ्याकडे आहेत्...त्याचे उल्लेख मी लवकर पोस्ट करेलच...आणि कावळ्या-बावळ्या ह्या खिंडीमध्ये आम्हि शोध घ्यायला गेलो होतो त्यावेळेस आम्हाला वीरगळ सापडले आहेत्...त्याची नोंद देखिल केली आहे...!!! पुणे ते घोळ (रस्ता:- पुणे-खडकवासला-पानशेत-पानशेत बोटींग क्लब वरुन डाविकडे आत-दापसर-गोंड्खळ-घोळ खिंड-घोळ्-गारजाई वाडी-कोकणदिवा) अंतर ६२ कि.मी. आहे. घोळ ते गारजाई वाडी चालत ४५ मिनिटे आणि गारजाई वाडी ते कावळ्या-बावळ्या खिंडीच्या माथ्यापर्यंत १५ मिनिटे...हा माथा म्हणजेच कोकणदिव्याचा पायथा आणि तिथुन साधारणतः १.५ ते २ तास लागतात...!!! मी परत हा ट्रेक करणार आहे कोणाला यायचे असेल तर जरुर जाऊ...कोणी येणार असेल तर जरुर कळवा आपण जाऊयात्....स्वारगेट वरुन घोळ गावाची मुक्कामी बस संध्याकाळी ६.०० वाजता असते...!!! Happy Happy Happy

‘ कोकणदिवा ’ हे नाव कधी ऐकले आहे का तुम्ही...यातील बरचसे जण म्हणतील कोकण दिवा नावाचे काही अस्तित्वात तरी आहे का किंवा आम्ही फक्त शिवाजी महाराजांचे किल्ले करतो असल्या नावाचा किल्ला कधीच महाराष्ट्रात नाही किंवा त्याचे नाव इतिहासाला माहिती नाही.
>> असे तुम्हास ट्रेकस लोकांकदुन ऐकायला मिळाले का? असेल तर त्यांना ट्रेकर का म्हणावे हा प्रश्न आहे.. असो.

कोकण दिवा हा रायगड घेरा मधील एक महत्वाचा किल्ला आहे.

सेनापती :- ‘ कोकणदिवा ’ हे नाव कधी ऐकले आहे का तुम्ही...यातील बरचसे जण म्हणतील कोकण दिवा नावाचे काही अस्तित्वात तरी आहे का किंवा आम्ही फक्त शिवाजी महाराजांचे किल्ले करतो असल्या नावाचा किल्ला कधीच महाराष्ट्रात नाही किंवा त्याचे नाव इतिहासाला माहिती नाही.
>> असे तुम्हास ट्रेकस लोकांकदुन ऐकायला मिळाले का? असेल तर त्यांना ट्रेकर का म्हणावे हा प्रश्न आहे.. असो.

उत्तरः- होय असे मला उत्तर सध्या खुप प्रसिध्दी झोतात असलेल्या व्यक्तिकडुन मिळाले आहे...आणि हि व्यक्ति ४०० किल्ले फिरली आहे आणि स्वतःच्या छायाचित्रांचे प्रदर्शन लावत तसेच किल्यांना वाचवण्यासाठी ठिकठिकाणी आंनदोलन करित फिरत असते...तुम्हाला त्या व्यक्तिचे नाव माहिती देखिल असेल्...असो त्या व्यक्तिने मला सुनावले होते हे वाक्य्...आणि मी जेव्हा कोकणदिवा ट्रेक करुन आलो तेव्हा हिच व्यक्ति मला फोटो बघीतल्यावर मला म्हणाली मी पण कोकणदिवा करुन येतो...!!!

फोटो पाहिजेतच.
चढण कशी आहे?
मी ही येइन म्हणतो फार अवघड नसेल तर.. (तुम्ही लिहिलेल्या वर्णनावरुन तर कठीण वाटत आहे)
रोप आदी सुरक्षा साधनं असतील तर मी वर येइन. नायतर पायथ्यालाच बसुन राहीन पण येइन नक्की. Happy

छान लिहिल आहे. Happy

झकासराव चढण खडी आहे...किल्ला अवघड नाहिये परंतु कोकण आणि घाटमाथ्यावर असल्याने थोडा दम लागतो परंतु एकदा का वरती पोहोचले कि दुर्ग्दुर्गेश्वर रायगडाचे दर्शन झाल्यावर सगळा थकवा पळुन जातो...!!! Happy

अप्रतिम... सुंदर वर्णन... धन्यवाद अनुराग Happy

बर्‍याच जणांकडून ऐकलं होत कोकणदिव्या बद्दल... यंदाच्या हिवाळ्यात नक्कीच प्लॅन करणार.