@हल्ली@

Submitted by राजीव मासरूळकर on 11 September, 2012 - 14:13

**हल्ली**

घडू जे नये ते घडे रोज हल्ली
खरे कोपऱ्‍याला दडे रोज हल्ली !

फितूरी चहाडी मुजोरी लबाडी
शिकाया मिळे हे धडे रोज हल्ली !

सुखाचे कुठे येथ गर्भार होणे ?
तुटे मायचे आतडे रोज हल्ली !

कधी ना कुणाला कटू बोलला तो
स्वतःला शिवी हासडे रोज हल्ली !

तुझ्या लाजण्याला कुठे अर्थ आता ?
तुला पाहतो नागडे रोज हल्ली !

कशाला हवे ईश्वरी पावसाळे ?
सरी आसवांच्या पडे रोज हल्ली !

"विकासातुनी जा लयाला मनूजा"
थरारे धरा , ओरडे रोज हल्ली !

- राजीव मासरूळकर
मासरूळ , ता जि बुलडाणा
दि . ११.०९.२०१२
रात्री ९.३० वाजता

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मतला आवडला.

'धडे' आणि 'पडे' ह्या ओळी व्याकरणदृष्ट्या गडबड वाटतात.

तुझ्या लाजण्याला कुठे अर्थ आता ?
तुला पाहतो नागडे रोज हल्ली !

हा शेर हझलयोग्य वाटला.

'रोज' आणि 'हल्ली' एकत्र येणेही जरा अनावश्यक वाट्लं.

रणजीतशी सहमत

अनेक शेरातील खयाल छान आहेत

नेहमीप्रमाणे माझा एक शेर आठवला.............

काहीबाही घडते हल्ली
मन माझे विस्कट्ते हल्ली

पुनःप्रत्ययाचा आनन्द दिल्याबद्दल धन्यवाद !

रणजित पराडकर सर ,
वैभव कुलकर्णी जी , सुधाकरजी ,
प्रतिसादाबद्दल हार्दिक आभार !
आपल्या प्रतिक्रीयांतून नेहमीच शिकायला मिळते .
इथे रोज हा शब्द दररोज अशा अर्थाने वापरला आहे .

हल्ली आणि रोज हे शब्द समानार्थी आहेत काय ?

हल्ली असं घडतंय
आणि
हल्ली असं दररोज घडतंय
या दोन्ही वाक्यांत काहीच फरक नाही काय ?

कृपया थोडं स्पष्ट करून सांगावं .

रणजित पराडकर सर ,
वैभव कुलकर्णी जी , सुधाकरजी ,
प्रतिसादाबद्दल हार्दिक आभार !
आपल्या प्रतिक्रीयांतून नेहमीच शिकायला मिळते .
इथे रोज हा शब्द दररोज अशा अर्थाने वापरला आहे .

हल्ली आणि रोज हे शब्द समानार्थी आहेत काय ?

हल्ली असं घडतंय
आणि
हल्ली असं दररोज घडतंय
या दोन्ही वाक्यांत काहीच फरक नाही काय ?

कृपया थोडं स्पष्ट करून सांगावं .

>>हल्ली असं घडतंय
आणि
हल्ली असं दररोज घडतंय
या दोन्ही वाक्यांत काहीच फरक नाही काय ?<<

ह्म्म्म्म्म..

बरोबर आहे तुमचं. किंचित वेगवेगळ्या संदर्भानेही हे दोन्ही शब्द वापरले जातात,,जसे इथे वापरले आहेत.

क्षमस्व आणि धन्यवाद !!

टीप - मनःपूर्वक विनंती आहे मला 'सर' म्हणू नका प्लीज !

रणजित जी ,
हार्दिक धन्यवाद !

मी प्राथमिक शिक्षक आहे . त्यामुळे सर या शब्दाची सवय झाली आहे . इंग्रजी भाषेतही वयाने किँवा मानाने मोठ्या माणसाला सरच म्हणतात . पण जेव्हा कुणीही "कृपया सर म्हणू नका" असं म्हणतं तेव्हा 'सर' ही आजकालची शिवी आहे की काय असा प्रश्न मनात धुडगूस घालतो आणि अंगावर काटा येतो !

कृपया गैरसमज नसावा .

पण जेव्हा कुणीही "कृपया सर म्हणू नका" असं म्हणतं तेव्हा 'सर' ही आजकालची शिवी आहे की काय असा प्रश्न मनात धुडगूस घालतो आणि अंगावर काटा येतो !<<<<<< Lol

प्रोफेसर साहेब, येथे तुम्हाला शिवी देण्याचा एक अप्रत्यक्ष प्रकार घडला आहे Light 1 (सर्वांनाच दिवा) (म्हणजे सर्व संबंधितांना).

तुझ्या लाजण्याला कुठे अर्थ आता ?
तुला पाहतो नागडे रोज हल्ली !<<< द्विपदी तीव्र व अतीस्पष्ट आहे. गझलेच्या प्रवृत्तीनुसार भावली नाही.

सफाईदार शेर लिहिण्यासाठी शुभेच्छा

Happy

-'बेफिकीर'!

बेफिकीरजी ,
द्विपदी तीव्र आणि अतिस्पष्ट आहे . गझलेच्या प्रवृत्तीनुसार भावली नाही .

कृपया हे आपलं मत थोडं अधिक स्पष्ट करून सांगा ना .
म्हणजे थोडं कन्फ्युजन आहे . असं लिहावं कि लिहू नये ?
त्यामागचं कारण काय ?