सुभाषित आस्वाद [२]:(अ)न हि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगा: (ब)संदिप्ते भवने तु कूपखननं

Submitted by मी-भास्कर on 5 September, 2012 - 13:39

सुभाषित आस्वाद [२] : (अ)न हि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगा:

उद्यमेन हि सिध्यन्ति कार्याणि, न मनोरथै: |
न हि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगा: ||

कोठलेही काम [ त्यासाठी आवश्यक असलेल्या परिश्रम म्हणजेच ] उद्योग केल्यानेच होत असते.
(केवळ मनात त्याबद्दल कल्पना रचून म्हणजेच ) स्वप्ने रंगवून नव्हे.
(वनराज एवढा जंगलाचा राजा पण म्हणुन कांही) स्वस्थ बसून राहिलेल्या सिंहाच्या तोंडात हरणे
आपणहुन शिरत नाहीत.

याचे एम कर्णिक यांनी अतिशय समर्पक मराठी-सुभाषित केले आहे.

उद्योगानेच यश मिळते, स्वप्नरंजन ठरे फुका |
सिंह झोपेमधे असतां वदनी मृग शिरेल का? ||

आळशी आणि निव्वळ कल्पनेतील विश्वात वावरणार्‍यांना आणि संस्कारक्षम मुलांना
काम करण्यास उद्युक्त करण्यासाठी आणि प्रत्यक्ष परिश्रमाशिवाय कांहीही साध्य होत नसते
हे ठसविण्यासाठी लिहिलेले हे सुभाषित.

आता तर या सुभाषिताचा उद्देश मुलांच्या मनावर ठसविणे फारच सोपे झाले आहे.

डिस्कव्हरीसारख्या वाहिन्यांवर सिंहावर खूप कांही दाखवले जाते.
वनराज एवढा जंगलाचा राजा पण म्हणुन कांही स्वस्थ बसून राहिलेल्या सिंहाच्या/सिंहिणीच्या तोंडात हरणे आपणहुन शिरत नाहीत याचा खरा प्रत्यय त्यामध्ये दिसतो. एका हरणाला मारण्यासाठी त्यांना
किति परिश्रम घ्यावे लागतात ते तेथे प्रत्यक्ष पाहायला मिळते. किति दमछाक होईपर्यंत पाठलाग
करावा लागतो आणि एवढे करूनही अनेकदा हरीण निसटूनही जाते आणि सर्व कष्टांवर पाणी पडते.
कित्येकदा तर मारलेल्या हरणावर ताव मारण्याआधीच तरसांची टोळी येऊन सिंहालाच पळवून
लावते. यातून सुभाषिताच्या उत्तरार्धाचा खरा अर्थ चांगलाच उमगतो.
एवढेच नव्हे तर परिश्रम करूनही अपयश येऊ शकते आणि
पदरात पडलेले यश हिरावूनही नेले जाऊ शकते याही सुभाषितात न सांगितलेल्या गोष्टींची जाणीव होऊ शकते.
संस्कारक्षम वयात या सुभाषिताचा परिचय करून देणे मुलांवर चांगला परिणाम साधण्याची शक्यता आहे.
मायबोलीवर http://www.maayboli.com/node/37600 या लिंकवर शालेय मुलांच्या बेधुंद पार्ट्यांवर चर्चा चालू आहे.
त्यात अनेकांनी संस्कारांना महत्व असल्याचे सांगितले आहे.
या केवळ मौजमजा करायला चटावलेल्या मुलांना त्यांच्या मौजमजा कोणाना कोणाच्या कष्टांचे फळ आहे आणि आज ना उद्या त्यांच्या वाट्याला ते कष्ट आल्याशिवाय राहाणार नाहीत एवढे जरी त्यांना या सुभाषिताने समजले तरी खूप झाले.

(ब)संदिप्ते भवने तु कूपखननं
पहिल्या सुभाषिताला पूरक म्हणता येईल असा उपदेश भर्तृहरीच्या वैराग्यशतकात आहे. तो असा:
यावत् स्वस्थं इदं शरिरं अरुजं,
यावत् जरा दूरतो, यावत् च इन्द्रियशक्ति अप्रतिहता,
यावत् क्षयो न आयुष: ।
आत्मश्रेयसि तावत् एव
विदुषा कार्य: प्रयत्नो महान् ,
संदिप्ते भवने तु कूपखननं
प्रिति उद्यम: किदृश:॥

[वैराग्यशतक- भर्तृहरी]
अर्थ : जोवर हे शरीर निरोगी आहे,
म्हातारपण दूर आहे, इन्द्रियांची शक्ति अबाधित आहे, आणि
आयुष्य कमी झालेले नाही तोवरच शहाण्या माणसाने
आपल्या कल्याणासाठी मोठा प्रयत्न करावा
;
(नाहीतर) घराला आग लागल्यावर विहीर खणायचा उद्योग
केल्यासारखे होइल. तरूण वयात फक्त मौजमजा करण्यात वेळ घालविणारे कर्तृत्व गाजविण्याचे वय वाया घालवीत आहेत.

सुभाषित आस्वाद [१] : वक्ता श्रोताच दुर्लभः: http://www.maayboli.com/node/37451
सुभाषित आस्वाद [३] : http://www.maayboli.com/node/40828

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शिकार सिंहीण करते. सिंह घरी पोरे सांभाळत बसतो.. ( देवा! सिंहाचा जन्म का नाही दिलास मला??? Proud ) संस्कृतात सिंहीणीला काय म्हणतात? का, मिस्टर अँड मिसेस सिंह .. एकच शब्द दोघाना चालतो? सुभाषित शिकवायच्या नादात जीवशास्त्र चुकायला नको.

The lioness is the one who does the hunting for the pride, since the lioness is more aggressive by nature. The male lion usually stays and watches its young while waiting for the lionesses to return from the hunt. http://en.wikipedia.org/wiki/Lion

'संस्कार' हा एक थोतांड प्रकार आहे. आजपर्यंत दिड लाख जनुके आयडेंटीफाय झाली आहेत व प्रत्येक जनुकाचे काम ठरलेले आहे. एखाद्याचे ब्रेन मेकअप ठरवणारी जनुके फॉल्टी असतील, तर तो व्यक्ती दररोज संस्कारवर्गात गेला तरी त्याचा काही फायदा होणार नाही.

सिंह घरी पोरे सांभाळत बसतो..

नाही. तो पोरेही सांभाळत नाही. "वॉचेस' म्हणजे नुस्ता पहातो. च्याय्ला कोन्त्या बापाच्याने बाळाचं लंगोट बदलून झालंय आजवर नाक वाकडे न करता? अहो, सिंह आधीच्या नराची मुले मारून टाकतो अशीही फॅक्ट आहे. सिंह हा लै लोकांच्या दॄष्टिने 'आयडियल' 'पुरुष' आहे असे माझे मत आहे. पण आयडियल असणे बरेच कठिण असते हे ही खरेच. (पुरुष असणेही तितकेच कठीण..) बरेच चिंतन यावर करता येइल.
असो.

दासूजी,
आपण सुटे सुटे लेखन केलेत तर मजा येइल. मला सोन्स्क्रूत फार येत नाही. पण वाचायला आवडते. तुम्ही एक धागा काढला की त्याची तंगडी तुमच्या जुन्या धाग्यासोबत गुंफायची गरज नसते. अन प्रत्येक धाग्यात भातात खडे लागावेत तसे बोल्ड करायचीही गरज नसते हो..

दोन्ही शे'र / श्लोक आवडले.

(गुलाम अली ऐकणारा) इब्लिस

बाबाहो,
माझी कमालच आहे अन असते. तो फक्त 'ऐश' करतो Wink वरचा पर्तीसाद एडिटतो होतो तंवर २ उत्तरं आलीत.

@ नेहमीच्या स्नेह्यांनो
मतप्रदर्शनाबद्दल व सल्ल्यांबद्दल सर्वांनाच धन्यवाद.
आज सिंहाविषयी जेवढी माहिती संशोधकांनी मिळविली आहे तेवढी त्याकाळात कवींना माहीत नसणे शक्य आहे.
सर्वसाधारणपणे सिंहीणीच शिकार करतात पण मोठ्या प्राण्याच्या शिकारीत सिंह भाग घेतांना दिसतात आणि त्यांची ताकद निर्विवादपणे दिसते. पण जनरली ते ऐतखाऊ दिसतात. लहान बच्च्यांना तर ते मारूनच टाकतात त्यामुळे सिहिणीला कांही दिवस तरि लपुन छपून त्यांना वाढवावे लागते. कळपावर प्रभाव ठेवण्यासाठी त्याला सततच्या आव्हानाला तोंड द्यावे लागते आणि यश मिळाले तरच आयते खायला मिळते. हारल्यावर आणि म्हातारपणि त्यालाही शिकार करन्याशिवाय गत्यम्तर नसते. हे सर्व चॅनेल्सवर पाहायला मिलते.
त्यामुले सुभाषितात सांगितलेला मुद्दा आजही बरोबरच आहे याबद्दल दुमत नसावे.

पाहिलं होतं एनजीओ वर काही वर्षापूर्वी. एका सिंहीणीने तिची दोन पिल्ले गुहेत ठेवली होती, ती शिकार करण्यासाठी बाहेर जाणार तेवढ्यात एका दुसर्‍या सिंहाला त्याचा वास लागला. तो त्या गुहेकडे चालत आला, त्या सिंहीणीने त्याचा प्रतीकार करण्याचा प्रयत्न केला, पण उपयोग झाला नाही. तो सिंह गुहेत गेला, ती हताश होऊन बघत होती. नंतर तो बाहेर आला तर त्याचे तोंड लांबुनच लालसर दिसल्याने ( आणी ते पाहुन माझे डोके संतापाने फिरल्याने ) मी टिव्ही बंद केला. असे वाटले की त्या सिंहाच्या टाळक्यात एका धोंडा हाणावा. काय अपराध त्या निर्दोष छाव्यांचा? इवलीशी पिल्ले ती. पण काय करणार जंगल कायदा ना.

आणी म्हणे राजा. नुसते दिसायला रुबाबदार असुन काय उपयोग? आळशी कुठला !

कळपावर प्रभाव ठेवण्यासाठी त्याला सततच्या आव्हानाला तोंड द्यावे लागते आणि यश मिळाले तरच आयते खायला मिळते.

हे करणे आणि पुढची पिढी मारत फिरणे हीच पराक्रमाची व्याख्या का ? ( मग असे म्ह्टले तर मोघल राजे आणि अश्वत्थामा हेही पराक्रमी आणि वंदनीय ठरतील . )

मग असे म्ह्टले तर मोघल राजे आणि अश्वत्थामा हेही पराक्रमी आणि वंदनीय ठरतील

मग ते नव्हते असा तुमचा मुद्दा आहे काय?

@आशुचँप | 11 September, 2012 - 15:56
मग असे म्ह्टले तर मोघल राजे आणि अश्वत्थामा हेही पराक्रमी आणि वंदनीय ठरतील

>>मग ते नव्हते असा तुमचा मुद्दा आहे काय?<<
ही चर्चा घसरते आहे इतिहासावर . त्याकरिता आहे की वेगळा लेख खालील लिंकवर.
http://www.maayboli.com/node/37700

सुभाषितकाराला सुभाषितातून जे सांगायचे आहे ते पहाता सिंह ऐतखाऊ आहे कि तो नुसति पोरे सांभाळतो कि नुसति पहात बसतो हि चर्चा अप्रस्तुत वाटते. आणि सुभाषितामधिल सिंह म्हणजे नर की मादि यावर काथ्याकूट करण्यापेक्षा जे पटतं ते घ्या पण सुभाषितामध्ये जे सांगितले आहे त्याप्रमाणे क्रुति करा म्हणजे अधिक लाभ होइल.

@mukundsapre | 7 February, 2013 - 13:50 नवीन
.............यावर काथ्याकूट करण्यापेक्षा जे पटतं ते घ्या पण सुभाषितामध्ये जे सांगितले आहे त्याप्रमाणे क्रुति करा म्हणजे अधिक लाभ होइल.
<<
खरं आहे.
धन्यवाद!