सत्यात स्वप्न माझे उतरेल एक दिवशी!

Submitted by सतीश देवपूरकर on 8 September, 2012 - 06:26

गझल
सत्यात स्वप्न माझे उतरेल एक दिवशी!
मातीत ह्याच सोने उगवेल एक दिवशी!!

घुमतील शब्द माझे कानामधे जगाच्या.....
हा माळही फळांनी लगडेल एक दिवशी!

लावू नये चकोरा! चंद्रास वेड इतके;
वेडामधे बिचारा निखळेल एक दिवशी!

मारून मुटकुनी का मन ऎकणार आहे?
तोडून दावणी ते, निसटेल एक दिवशी!

झळ सोसतात तेव्हा येते अशी झळाळी!
सोन्यासमान तोही.....झळकेल एक दिवशी!

कळपात मेंढरांच्या दिसतो जरी असा तो.....
राजा बनून येथे हिंडेल एक दिवशी!

पाऊस बरसला की, मातीत ओल शिरते;
हृदयात गझल माझी झिरपेल एक दिवशी!

एकेक ओळ माझी जाईल थेट हृदयी....
आत्म्यामधे अखेरी प्रकटेल एक दिवशी!

इतकी नको स्मृतींची देऊस ऊब मजला;
ही काच काळजाची तडकेल एक दिवशी!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर गझल.

लावू नये चकोरा! चंद्रास वेड इतके;
वेडामधे बिचारा निखळेल एक दिवशी!

मुटकून मारुनी का मन ऎकणार आहे?
तोडून दावणी ते, निसटेल एक दिवशी! -------------------> अप्रतिम

काही शंका ----

मुटकून मारुनी का मन ऎकणार आहे? ----- इथे--- मारुन मुटकूनी का मन ऎकणार आहे? ...असे नाही का चालणार?

तसेच ---- एकेक असे शब्द बदल चालतात का ती एक सूट असते?

देवसर - कृपया शंका निरसण करावे.( कृगैन)

शेवटचा शेर खूप आवडला..

बाकी सर्व छान !!

'एक दिवशी' की 'एके दिवशी' ? की दोन्ही सारखंच ? जाणकारांनी खुलासा करावा.

एक दिवशी की एके दिवशी की दोन्ही सारखंच ? जाणकारांनी खुलासा करावा.>>>>>>>

देवसरानी लिहिलय ना मग ते योग्यच असणार .ते एखादा शेर लिहिताना त्यावर खूप चिन्तन करतात त्यामुळे या शब्दावरही त्यानी चिन्तन केले असणारच हे उघड आहे
हेही खरेच की ते चिन्तन जसे गहन/ सखोल असणार तसेच तर्कसन्गत /शास्त्राधारित / अनुभवाधारित /अभ्यासपूर्ण इत्यादी वगैरे असणारच (ऐकीव माहिती........... तरीही माझा विश्वास बसला आहे यावर !!)

आता अपण हा शेर वाचून अर्थ लावताना आपल्याला एक वाचक म्हणून काही नडत नाही ना यावारच लक्ष केन्द्रित करूया असे मला म्हणायचे आहे

धन्यवाद !!

इतकी नको स्मृतींची देऊस ऊब मजला;
ही काच काळजाची तडकेल एक दिवशी!
>> व्वाह! अप्रतिम!!!

यावेळी संपूर्ण गझल आवडली आहे!!!

सुधाकर! प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
मुटकून मारुनी का मन ऎकणार आहे? ----- इथे--- मारुन मुटकूनी का मन ऎकणार आहे? ...असे नाही का चालणार?<<<

मारून मुटकून असेच म्हणतात, पण काव्यात शब्दांचा क्रम बदलला तरी चालतो. तो दोष वा ती सूट समजत नाहीत. वृत्ताची तशी मागणी असेल तर!
सुधाकरा! तरी तू सुचवलेला बदल मी स्वीकारत आहे. फक्त मुटकूनी असे न लिहिता मुटकुनी असे लिहित आहे. बदल केला आहे, पहाशील का?

!(गझलेत वृत्तदोष वा वृत्तसूट हा मोठा दोष समजला जातो. असे दोष कटाक्षाने टाळावेत. मी तरी हे निक्षून पाळतो.
तसेच ---- एकेक असे शब्द बदल चालतात का ती एक सूट असते?<<<<<

एकेक शब्द बरोबर आहे......एक+एक=एकेक! संधी केला आहे. एकेक बरोबर, हरेक बरोबर, प्रत्येक बरोबर! इथे कोणतीही सूट घेतलेली नाही.
मला वाटते तुझ्या शंकांवर मी उत्तर दिले आहे.
कोणतीही शंका, स्पष्टीकरण हवे असल्यास नि:संकोचपणे विचारत जा न लाजता. माझ्यापरीने मी तुझे समाधान करण्याचा अवश्य प्रयत्न करेन!
..........प्रा.सतीश देवपूरकर

रणजीत!
एकदिवशी बरोबर! व एके दिवशी हे पण बरोबर!

माफ कर, पण जाणकारांनी खुलासा करावा असे तू म्हटल्याने मला माझ्या गुरूंचे नाव घ्यावे लागत आहे. तुझी काही हरकत नसेल तर, जरा अवांतर करतो.......

इतकी नको स्मृतींची देऊस ऊब मजला;
ही काच काळजाची तडकेल एक दिवशी!

हा शेर मी साधारणपणे १९९०-९१ मधे कधीतरी लिहिल्याचे स्मरते. फक्त हा एकच शेर प्रथम लिहिला होता, गझल वगैरे करायचा कोणताही विचार नव्हता. दादांना/सुरेश भटांना ते एकदा कोर्टाच्या कामानिमित्त पुण्यात आले असताना कोर्टाच्या बाकड्यावर बसलो असताना, हा शेर मी त्यांचा मूड बघून सांगितला.

डोळे मिटून अत्यंत लक्षपूर्वक त्यांनी तो ऎकला. डोळे उघडून त्यांनी मला हाताच्या इशा-याने तो शेर परत म्हणण्यास सुचवले. परत ते डोळे बंद करून बसले. शेर संपला, पण त्यांनी डोळेही उघडले नाहीत, व काही बोललेही नाहीत. माझी छातीतली धडधड वाढत होती. आपण काही चुकीचे तर ऐकविले नाही ना असे क्षणभर वाटून गेले. साधारणपणे १-२ मिनिटांनी दादांनी डोळे उघडले अन् काय सांगू.......दादा फक्त उड्या मारायचेच राहिले होते. मला कडकडून मिठी मारून म्हणाले सुंदर शेर! सुंदर शेर! आमदका शेर! अन् मी तर अगदी भारावून गेलो.

मला म्हणाले या शेरासाठी गझल पूर्ण करताना घाई करू नकोस! खूप सुंदर शेर आहे. तुझा रदीफ एक दिवशी पेलायला अवघड व नाजुक आहे. “त्याच्या” आदेशाची वाट बघ व मग पुढे गझल लिही. एक दिवशी बरोबर आहे, एके दिवशी पण बरोबर आहे हे त्यांनी मला सांगितले होते. असो.

हे सर्व मी इथे विस्ताराने सांगत आहे ते माझ्या बोलण्याला वजन यावे म्हणून नाही. जे घडले, जसे घडले, जे आठवले, ते तसे तुला सांगितले, केवळ विषय निघाला म्हणून! मी नंतर कसेबसे ४ शेर लिहिले, व बाकीची गझल आज सकाळी पूर्ण केली. १९९० साली एकशेर लिहिला, आणि आज २०१२ साली २२ वर्षांनी ही गझल हातावेगळी झाली व ती मी इथे पोस्ट केली.

आता माझ्या वर दिलेल्या शेराबाबत.
एकदा T.Y. B.Sc. Geologyच्या मुलामुलींना गोकाकला geological mapping साठी घेवून गेलो होतो. रात्री माझे सहकारी झोपी गेले, पण मला काही झोप येत नव्हती. मग, म्हटले बायकोला पत्र लिहावे. घरची खूप आठवण येत होती. पण पत्रात बायकोला काय लिहावे? काहीच सुचेना. मी बाल्कनीत जावून आकाशातल्या चांदण्यांकडे एकटक पहात बसलो. बायकोची प्रचंड आठवण येत होती. आता पत्र लिहायचे तर पत्रात काय लिहायचे? एक पाच मिनटे माझी ऊलघाल झाली जिवाची, आणि काय आश्चर्य! माझ्या ओठांवर एक अख्खा मिसराच आला....

इतकी नको स्मृतींची देऊस ऊब मजला.....

रणजीत तुला सांगतो पहाटेचे दोन वाजले होते आणि बाल्कनीत मी हा मिसरा मोठ्याने गुणगुणलो आणि फक्त नाचायचाच राहिलो होतो. २ ते ३ मिनिटांनी दुसरा मिसरा माझ्या ओठांवर आपोआप आला..........
ही काच काळजाची तडकेल एकदिवशी!

कुठला काफिया? कुठला रदीफ? कसली गझल? काहीच फिकीर नव्हती. काहीही योजले नव्हते. जे जसे सुचले, तसे कागदावर लिहिले आणि तुला सांगतो रणजीत, बायकोला लिहायच्या पत्रात मी फक्त हाच शेर लिहिला आणि inland letter सीलबंद केले व गाढ झोपी गेलो. पुढे वर सांगितल्याप्रमाणे हा शेर मी दादांना कालांतराने ऎकवला, मग पुढे कधीतरी ३/४ शेर लिहिले व ते लिखाण का कुणास ठाऊक पण मी अगदी विसरून गेलो. आज मी माझे मागील जुने लिखाण चाळताना ते लिखाण मला वाचायला मिळाले व मूड लागला अन् उरलेले ४ शेर लिहिले व ही गझल सद्ध्यापुरती हातावेगळी झाली असे मानून ती मायबोलीवर पोस्ट केली. असो.
आठवणी जागरूक झाल्या म्हणून हा लिखाणाचा प्रपंच!
..........प्रा.सतीश देवपूरकर
................................................................................................

व्वा देवसर,.... खुपच छान. एका सुंदर गझलेमागची एक सुंदर कहाणी. जीवनानुभवातून जाताना दैव टाकत असलेले हे दान काही भाग्यवंतांनाच मिळते. हे ही खरेच.

पाऊस बरसला की, मातीत ओल शिरते;
हृदयात गझल माझी झिरपेल एक दिवशी!

इतकी नको स्मृतींची देऊस ऊब मजला;
ही काच काळजाची तडकेल एक दिवशी!

<<<<<<

सुंदरच शेर, दुसरा व्वा

इतकी नको स्मृतींची देऊस ऊब मजला;
ही काच काळजाची तडकेल एक दिवशी!<< पुन्हा पुन्हा गुणगुणण्यासारखा शेर

===========

>>>दादांना/सुरेश भटांना ते एकदा कोर्टाच्या कामानिमित्त पुण्यात आले असताना कोर्टाच्या बाकड्यावर बसलो असताना, हा शेर मी त्यांचा मूड बघून सांगितला.

डोळे मिटून अत्यंत लक्षपूर्वक त्यांनी तो ऎकला. डोळे उघडून त्यांनी मला हाताच्या इशा-याने तो शेर परत म्हणण्यास सुचवले. परत ते डोळे बंद करून बसले. शेर संपला, पण त्यांनी डोळेही उघडले नाहीत, व काही बोललेही नाहीत. माझी छातीतली धडधड वाढत होती. आपण काही चुकीचे तर ऐकविले नाही ना असे क्षणभर वाटून गेले. साधारणपणे १-२ मिनिटांनी दादांनी डोळे उघडले अन् काय सांगू.......दादा फक्त उड्या मारायचेच राहिले होते. मला कडकडून मिठी मारून म्हणाले सुंदर शेर! सुंदर शेर! आमदका शेर! अन् मी तर अगदी भारावून गेलो.<<<

छान आठवण. आम्हा लहानांना काही नशिबात योग नव्हताच त्यांच्या भेटीचा, पण अश्या प्रसंगातून तुमच्यामार्फत ते भेटतात तेवढेच.

खरंच मलाही असं 'तब्येत से' लिहावंसं कधी वाटेल ? वाटेल पेक्षा कधी जमेल.....?

२२ वर्षं !! मी तर एखादी गझल पूर्ण करण्यासाठी जास्तीत जास्त २२ दिवस धीर धरला असीन..!

बाकी शेर सुचण्यावेळेचा किस्सा तर लै भारी !

अप्रतिम गझल...... ....
आणखी कही बोलावं असा माझा अनुभव नाही, जाण नाही
पण शब्द मात्र खुप भावले.. Happy

इतकी नको स्मृतींची देऊस ऊब मजला;
ही काच काळजाची तडकेल एक दिवशी!>>>>>>>>>>.अप्रतीमच्चय हा शेर

लावू नये चकोरा! चंद्रास वेड इतके;
वेडामधे बिचारा निखळेल एक दिवशी!>>>>हाही एक हटके शेर आहे. मस्तच

मातीत ह्याच सोने उगवेल एक दिवशी!!>>> मतल्यचा समारोप अजून प्रभावी करता आला असता ..... वैयक्तिक मत !!

बालकबुद्धीने अस्मादिक आपणास काही शंका इचरू ईच्छितो.
इतकी नको स्मृतींची देऊस ऊब मजला;
ही काच काळजाची तडकेल एक दिवशी>>>>
काच ही आच लागल्यावर तडकते ऐसे आम्ही शालेय क्रमिक पुस्तकांतून पठन केल्याचे स्मरते. आणि उब ही आचेएव्ह्ढी दाहक नक्कीच नसते ऐसा बालबुद्धीहास्यनिर्मितप्रश्नसदृष्य्समज अमुचा झाला आहे. उब म्हणजे शरीराचे नियमित व आवश्यक तापमान जेव्हढे तेव्ह्ढीच ना? दुपारच्या दाहक सूर्यप्रकाशाने दाह झाला असे आम्ही श्रवण केल्याचे स्मरते..तयास उब म्हणणे न गमते. शरीराची उब, मायेची उब, पांघरूणाची उब, असे आम्ही पेशव्यांकडून कढीकारांना बक्षिसाची उब प्रमाणे ऐकून होतो. तद्वतच स्मृतींची उब जर तयास लाभते आहे; मग ती कितीही लाभो पण काच तड्कण्याइतपत दाहक नक्कीच नसावी ना? आच अथवा चटका किंवा जाळ किंवा ताप ऐसे आम्ही कबूल केले असते. पण उबेने काच तडकावी हे म्हणजे मुंगीने हत्तीची सरोगेट मदर होण्यासारखे अम्हास न रूचते. आपण अम्हास ज्ञानदानखानपान द्याल का? त्यातही स्मृतींचे आश्रयस्थान हे मेंदू आणिक तडकेल काळीज हे पण अम्हास न गमते. भेजा फ्राय ऐसे अम्ही कार्यकारणअभाव्संबंध लावून म्हणून बघितले पण ते अभक्ष्यभक्षणासम रूचले नाही. कृपया ज्ञान द्यावे. अम्ही अमुच्या
बालबुद्धीने या शेरास भ्रष्ट करून ऐसे रचिले आहे...हलके घ्यावे
उबवू नकोस इतकी, माझ्याच तू स्मृतींना
अंडे तुझ्या मनाचे, उकडेल एक दिवशी
(आमदनी का शेर)

उबवू नकोस इतकी, माझ्याच तू स्मृतींना
अंडे तुझ्या मनाचे, उकडेल एक दिवशी >>>>>>>>शेर छान !!!!!

पण हे काय ?<<<<<<<<<<<(आमदनी का शेर)>>>>>>>खुद्द दादान्ची चेष्टा करण्यासारखेच झाले की हे .......

गुरुजी काय हे विसरलात का ......<<<<<<<<<<<<<,दादा फक्त उड्या मारायचेच राहिले होते. मला कडकडून मिठी मारून म्हणाले सुंदर शेर! सुंदर शेर! आमदका शेर! अन् मी तर अगदी भारावून गेलो.>>>>>>>>>>>>>.

DesiSmileys.com

असो आवड ज्याची त्याची !!

सुंदर