म्हातारा

Submitted by रसप on 8 September, 2012 - 23:52

नाक्यावरच्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरचे घर
तिथे राहतो म्हातारा वय त्याचे अंदाजे सत्तर
सारी गल्ली त्याला म्हणते खडूस अन माणुसघाणा
खुरटी दाढी वाढवून तो दिसतोही ओंगळवाणा

रोज सकाळी लौकर उठतो विविधभारती वाजवतो
खोकुन-खोकुन मोठ्याने तो शेजाऱ्यांना जागवतो
चहा ठेवताना हातातुन रोज निसटते पातेली
'ठठम् ठठम्' ऐकून वाहते कुणी तरी मग लाखोली !

मंद पावले टाकत टाकत पहाट जेव्हा ओसरते..
उजेड झाल्यावर मग स्वारी फिरून येण्याला निघते
नित्यक्रमाने चार वेगळ्या कोड्यांचे पेपर घेई
लाल-पांढऱ्या फुलांस वेचुन परतुन म्हातारा येई

शुचिर्भूत झाल्यावर होई देवपुजा, घंटा खणखण
खिडकीपाशी खुर्ची नेउन डोळा लागे क्षणैक पण
मग सोडवतो पेपरातली एक-एक सारी कोडी
करता करता सकाळमागुन दुपारही सरते थोडी

असेच सरले जीवनसुद्धा संध्याकाळच उरलेली
अशीच सुटली सारी कोडी सुटूनही ना कळलेली
लौकर उगवे दिवस रोजचा सरून जाई, सांज उरे
एकांकी मरण्याची भीती म्हाताऱ्याला पिसे करे

खिडकीपाशी बसल्या बसल्या म्हातारा बडबड करतो
नाक्यावरचा कुणी टपोरी हसून वेड्याला बघतो
असाच म्हाताऱ्याचा मुलगा त्याच्यावर हसला होता
जेव्हा परदेशातुन त्याला परतुन बोलवला होता

म्हातारी तर मरून गेली मुलास त्या हाका मारुन
म्हाताऱ्याच्या डोळ्यामधले पाणीही गेले वाळुन
दिसायला दिसतो म्हातारा खडूस अन माणुसघाणा
पण त्याच्या चर्येवरती का भाव दिसे केविलवाणा ?

....रसप....
८ सप्टेंबर २०१२
http://www.ranjeetparadkar.com/2012/09/blog-post_9.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे कविता.

>>>असेच सरले जीवनसुद्धा संध्याकाळच उरलेली<<< इथून एक वेगळी कविताही आरंभत आहे.

चिठ्ठी आयी है ची आठवण आली. (तसेच, इश्य, श्रीनिवास पेंढारकरची पण, माझी पण अशीच एक 'एक बाप' नावाची कविता आहे)

एकुण काव्यकथानक छान आहे

असेच सरले जीवनसुद्धा संध्याकाळच उरलेली
अशीच सुटली सारी कोडी सुटूनही ना कळलेली