सहज अचानक

Submitted by सुनीता करमरकर on 8 September, 2012 - 02:13

त्या दिवशी अचानक काही तरी घडले आणि मी अंतर्मुख झाले.

गोष्ट साधीच होती.

संध्याकाळी भरपूर ट्राफिकमध्ये मी माझी दुचाकी गाडी चालवत ऑफिसकडून घराकडे निघाले होते. चेहेऱ्यावर स्कार्फ बांधला होता त्या मुळे फक्त डोळे उघडे होते.

सिग्नलला थांबले होते तेव्हा समोर पहिले, कि समोरच्या दुचाकीच्या मागल्या सीटवर एक सुंदर बाई बसली होती आणि तिच्या मांडीवर तशीच सुरेख डोळे असलेली ४ - ५ वर्षांची मुलगी बसली होती.

थंडीमुळे आईने मुलीला शालीत गुंडाळले होते आणि त्या मुलीचे फक्त बोलके डोळेच दिसत होते.

मधेच शाल घसरली कि तिचा निरागस, सुंदर चेहेरा दिसायचा. मग ती परत शाल सारखी करायची. आणि परत तिचे फक्त डोळे दिसायचे.

मी तिचे निरीक्षण करते आहे हे लक्षात येताच ती हसली. तिचे ते निरागस हसू तिच्या डोळ्यात मला दिसले आणि मी पण चेहेरा झाकला होता तरी पण फक्त डोळ्याच्या हालचाली करून हसले. मग डोळे वटारून बघितले आणि अचानक डोळे मिचकावले.

ती मुलगी क्षणांत माझ्याशी डोळ्यांच्या भाषेत खेळायला, बोलायला लागली.

१ मिनिट पण चालला नसेल हा खेळ.

सिग्नल हिरवा झाला आणि ती पुढे जाऊ लागली. जाता जाता प्रसन्नपणे शाल खाली करून आणि हात हलवत "टाटा" करून गेली. तिची आई पण आमचा हा २ क्षणांचा खेळ पाहून प्रसन्नपणे हसली.

मला खूप बरे वाटले. ट्राफिकचा ताण कुठल्याकुठे पळून गेला.

आणि अचानक...

अचानक मला त्या दिवशीची सकाळ आठवली.

थंडीमुले अलार्म कधी वाजला हे कळले नाही आणि कळले तेव्हा दुसरा अलार्म वाजत होता - मुलाला उठवण्याचा.

मी धडपडत उठले. २० मिनिटे उशीर झाला होता. मी भराभर आवरत होते. मुलाचा डबा भरून ठेवला आणि शेवटली पोळी तव्यावर होती.

मुलगा हॉलमध्ये दूध पीत बसला होता. मी सैपाकघरातून हाक मारून त्याला डबा घेऊन जायला सांगितले.

दुधाचा ग्लास हातात घेऊन तो उठला. एखादा घोट दूध उरले असेल. आणि खुर्चीला मीच अडकवलेल्या पर्सला अडखळून त्याच्या हातातला दुधाचा ग्लास खाली पडला. घोटभर दूध सांडले.

त्या आवाजाने मी दचकले आणि गरम पोळीच्या वाफेनी हात भाजला.

हे एवढे निमित्त झाले आणि किती दूध सांडले हे न बघताच मी जोरात मुलाच्या अंगावर ओरडले.

"सांडलेस ना दूध? एक तर घाई आहे आणि तू माझी कामे वाढव. हजार वेळा सांगितले आहे कि आधी दूध संपवत जा. कपडे खराब केले आहेत का? आणि हे दूध गरम आहे. गार करायला आता वेळ लागेल. बाकी सगळे आवरून तयार राहा. मी गार करते आहे हे दूध."

नवऱ्याला पण ओरडूनच सांगितले " आरे आता तू बघ हे. मला उशीर झाला आहे. बस गेली तर त्या भयानक ट्राफिक मध्ये मला गाडी घेऊन जावे लागेल."

एवढे ओरडून झाले आणि मग माझ्या लक्षात आले कि दूध पिऊन झाले होते आणि फक्त घोटभर दूध सांडले होते. मुलाने फडके आणून दिले होते आणि त्याचा बाबा साफ करत होता.

सकाळी सकाळी चूक नसताना मी ओरडले म्हणून मुलगा हिरमुसला होता आणि नवरा चिडला होता.

घड्याळ बघितले आणि लक्षात आले कि आता कितीही आरडा ओरडा केला तरी बस मिळणार नव्हती. मी गाडीची किल्ली घेऊन निमूट बाहेर पडले.

नवरा आजून रागावलेलाच होता आणि मुलगा शाळेत निघून गेला होता.

संध्याकाळच्या गर्दीत मला हि घटना आठवली आणि मला त्या हसऱ्या मुलीच्या जागी माझ्या मुलाचा हिरमुसलेला चेहेरा दिसू लागला. आणि मग विचारांचे चक्र सुरु झाले.

असे का होते कि कधीकधी आपण परक्यांना सहज आनंद देऊन जातो. २ क्षण का होईना पण स्वतः पण तो आनंद अनुभवतो. त्याचा गर्व वाटतो कि दुसऱ्याला मी असा आनंद दिला. पण आपल्या रोजच्या आयुष्यात आपण अनेकवेळा आपल्या अगदी जवळच्या माणसांचा अपमान करून बसतो, त्यांना दुखावून बसतो.

आपल्या चुकीचा राग दुसऱ्यावर काढतो आणि आपल्याच माणसांना गृहीत धरतो.

समोर ७५ सेकंदांचा सिग्नल लागला होता आणि ना राहवून मी गाडी बाजूला घेतली आणि मोबाईल काढला.

घरी मुलानेच फोन उचलला. मी सांगितले कि ट्राफिक जास्त आहे म्हणून थोडा उशीर होतो आहे पण १५ मिनिटात पोचेन घरी. पटकन तो म्हणाला " आई तू घरी आली कि मला माझा प्रोजेक्ट करायला मदत करशील का? खूप मस्त प्रोजेक्ट आहे."

तो उत्साहाने बोलत होता. सकाळच्या रागावण्याचा राग कुठेच नव्हता.

आणि मी विचार करू लागले कि आपण मोठी माणसे कशी वागतो? कधी कधी किती वाईट वागतो?

एखाद्यानी - एखाद्यानी कशाला - आपल्या जवळच्या माणसांनी जरी काही अपमान केला, आपल्या मना विरुध्ध वागले, तरी आपला "इगो" किती दुखावतो? आपण तो राग किती तरी दिवस मनात धरून ठेवतो. किती तरी दिवस , किती तरी वर्ष आणि कधी कधी संबंध तोडून टाकायला पण मागेपुढे पाहत नाही.

आणि लहान मुलांना - आपल्याच लहान मुलांना मात्र ती लहान असल्याचा फायदा घेऊन अपमानित करतो तेव्हा असा विचार तरी करतो का कि लहान मुलांना पण मान असतो आणि तो आपणच जपायला हवा?

मुले निरागसपणे सगळे विसरून आपल्याला माफ करून टाकतात पण आपण तो सहजपणा, ती माफ करण्याची वृत्ती मात्र लहानपणा बरोबर मागे टाकून देतो.

त्या दिवशी मी ठरवले कि मुलाने ज्या प्रमाणे मला माफ करून टाकले तसे मनात "इगो" ना ठेवता समोरचा चुकतो आहे असे स्वतःला वाटले तरी त्याला माफ करून टाकायचे. आणि स्वतःची चूक आहे असे वाटले तर सरळ माफी मागून मन मोकळे करून घ्यायचे.

ट्राफिक मधून वाट काढत घरी आले.

हॉल मध्ये बाबा आणि मुलगा प्रोजेक्टचा पसारा करून बसले होते.

मला बघताच मुलगा प्रोजेक्टविषयी काहीतरी खूप उत्साहाने बोलायला लागला.

नवरा आजून रागावलेला दिसत होता. तो पण "मोठा" माणूस आहे ना! लहान मुल नाही.

हळूच मी दोघांना "सॉरी" म्हटले आणि आणि आत जाता जाता मागे वळून पहिले तर नवऱ्याचे डोळे सांगत होते कि त्यांनी पण मला माफ केले आहे.

माझ्या मनावरचा ताण नाहीसा झाला.

आयुष्य पुन्हा सुंदर वाटायला लागले.

आयुष्य सुंदर आहे आणि थोडे आहे. आपण थोडेसे बदलून त्याला आणखीन सुंदर करायला हवे.

नाही का?

ता.क. - नाही का? चे अपेक्षित उत्तर, हो ना असे असते Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुले जितक्या पटकन हिरमुसतात, तितक्याच पटकन, सगळे निरागसपणे विसरुनही जातात.
पण अनेकदा त्यांची तशी चूक नसताना, आपण रागावतग, हेही खरेच. टाळायलाच पाहिजे हे.

छानै सुनितामावशी हे लिहिलेल. छान शिकवण मिळाली, लिटल जिमी, मी पण सॉरी रे कधी रागावले असले तर. पण एक सांगू का सुनीतामावशी? बाईमाणसाच्या असे चिडचिड करत कामे उरकून पळण्याच्या कृतीनेच तर घराला घरपण येते हो! तुम्ही एक अक्षर न बोलता ते सांडलेल दूध पुसून घेतल असतत तर संध्याकाळी प्रोजेक्टमधे मदत करशील का हा प्रश्न मुलानेपण विचारला नसता. अंतर्मुख व्हाच तुम्ही सुनितामावशी, पण तुमच्या चिडचिडीमुळे संध्याकाळी नवर्‍याच्या डोळ्यात दिसणारी माफी त्याच्या डोळ्यात दिसते यामुळे अंतर्मुख व्हा. अश्याच बोलक्या, चिडक्या राहा. लिटल जिमी? मावशीला बाय कर.

छान लिहिलय सुनीताजी (हे जुनी ताजी असं वाचू नये.) अगदी प्रत्येकाच्या आयुष्यात सहज घडणार्‍या गोष्टी, त्यामु़ळे रीलेट होणं सोप्प जातं. पण हे जाणवण्यासाठी लागतं ते संवेदनाशील मन. ते कुठून आणणार प्रत्येकवेळी ? Sad

बादवे मोहिनीजी तुमचा लिटिल जिमी कुत्रा आहे की माकड ? नाही बर्‍याच गोष्टी माणसासारख्याच आहेत त्याच्या..... Wink

लिटल जिमी एक चिडका बुटका आहे आणि त्याला अदृष्य पंख आहेत. तसेच अवतारकार्य फोकसमधे ठेवण्यासाठी तो सहसा मानवी रुपात वावरतो.

होप, तुम्हाला त्याच्याबरोबर झाडूवरुन फिराव लागत नसेल....

लिटल जिमीला सिनेमात काम करायला आवडेल का ? हिमगौरीची भूमिका कोण करणार हे ठरताच कामाला सुरुवात होईल...

बागुलबुवा हा एक सहज अचानक आय डी आहे बर का जिम्या, तो असतो आपला इथे

त्याने हिमगौरीच आमीष दाखवल तरी फसू नको, त्याची हिमगौरी कोळसा प्रकरणातून उगवल्यासारखी काळी ठिक्कर असेल आणि बागुलबुवाच्या प्रचंड आठवणीत मध्यरात्री चांदण्यांकडे एकटक बघून बाल्कनीत नाचत असेल

मग डोळे वटारून बघितले आणि अचानक डोळे मिचकावले.
>>>>
हे असे करायला मलाही आवडते... जे मूल सहजासहजी हसत नाही त्याला आधी नजरेने घाबरवायचे.. आणि मग अचानक चेहर्‍यावरचे भाव बदलायचे आणि आपण त्याचे मित्रच आहोत असे दाखवायचे.. मूल खुदकन हसतेच.. Happy

असो, छान लिहिलेय.. रीलेट झाले बरेच काही.. Happy

हा हा हा... नाही.. उलट लहान मूल म्हणजे ज्याला रांगता-चालता येत नाही त्याला मला कडेवरही घ्यायला जमत नाही.. बायकोशी डीलच केलेय मी.. पहिली दोन-अडीच वर्षे मूल तू सांभाळायचे.. एकदा चालू बोलू लागले, मस्ती करायला शिकले मग ती माझी जिम्मेदारी.. बाकी मला या दोन वर्षांखालील मुलांशी लांबूनच नजरेचे खेळ करायला आवडतात.. लेखात ते वाचले आणि पटकन रीलेट झाले.. Happy

तुमचा वैयक्तिक अनुभव प्रसंग आमचेही मन खळखळवून गेला.
असेच खूपवेळा झाले आहे माझ्याबाबतीत, आणि मग माझ्याच वडिलांची मी बोलणी खाल्ली आणि मग त्यान्चा उपदेश ऐकून बदल करण्याचा प्रयत्न चालु आहे.

असेच खूपवेळा झाले आहे माझ्याहीबाबतीत, आणि मग आपल्याच आईवडीलांची
बोलणी खावी लागतात आणि .....
बदल करण्याचा प्रयत्न चालु आहे.

हळूहळू जमेल Happy