कॉलेजची पोरं,विद्यार्थी नव्हे....गुरुच!!!

Submitted by आदित्य डोंगरे on 7 September, 2012 - 13:05

कॉलेजची पोरं,विद्यार्थी नव्हे....गुरुच!!!

कॉलेजातून बाहेर पडलेल्या प्रत्येकाला एक प्रश्न विचारावासा वाटतो, म्हणजे अगदी नुकत्याच passout होवून नोकरीला लागलेल्या माणसापासून ते अगदी senior citizen पर्यंत, की बुवा, कॉलेजातील मुला-मुलींकडे पाहून काय वाटतं हो तुम्हाला?म्हणजे अनेकांना तश्या अनेक गोष्टी वाटत असतील....पण अगदी प्रत्येकाच्या अगदी चट्कन लक्षात येणारी गोष्ट म्हणजे.....ही मुलं कशी सतत हसत खिदळत असतात ना, आपल्यापेक्षा कितितरी पटीने आनंदी असतात कायम!
कुणितरी खडूस असं म्हणेल की त्यांच्यावर काय कसलीच जबाबदारी नसते, मग दात काढायला जातंय काय त्यांच्या बापाचं? पण जबाबदारी नसणे एवढंच त्यांच्या आनंदी असण्याचं कारण आहे असं नाही वाटत मला.आपल्यापेक्षा वेगळं असं ते काय जगतात, किंवा हवं तर असं म्हणूया की कॉलेजात असताना आपण अत्तापेक्षा काय वेगळं जगत होतो, याचा बारीक विचार केला तर काही गोष्टी निश्चितच लक्षात येतात.
कॉलेजातील मुले-मुली खूप खूप active असतात.
खरंच किती नाचत असतात ही मुलं सारखी! गप्पांच्या ओघात मैलभर चालत काय सुटतात. कॉलेजात जिन्यावरून सतत वर खाली करतात. कॉलेजचं काम, प्रोजेक्ट पूर्ण करणं,फ़ेस्टिवल आयोजित करणं किंवा त्यात भाग घेणं. शिवाय त्यांच्या मजेच्या कल्पनाही फ़ार active असतात. pub मध्ये dance करणं, खेळ खेळणं, fashion म्हणून का होईना पण जिम ला जाणं. आणि व्यायामाचा कंटाळा असणाऱ्या आम्हा प्रौढांना विशेष लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे या activities, बहुतांश वेळा तरी व्यायाम म्हणून केल्या जात नाहीत, तर त्या आपोआप होतात किंवा गम्मत म्हणून केल्या जातात.
आपल्यालाही आपल्या जीवनात अश्या activities बसवता आल्या, तर कंटाळत कंटाळत वेगळा व्यायाम नको करायला!
कॉलेजातील मुले-मुली मित्रांच्या सतत संपर्कात असतात.
कॉलेजातील मुले-मुली, ज्यांना यापुढे आपण कॉ.मु. म्हणूया, अतिशय सामाजिक आयुष्य जगत असतात. हे कॉमु कसे सतत एकमेकांबरोबर असतात. म्हणजे फक्त मजा करण्यापुरते नाहीत,तर अभ्यास, प्रोजेक्ट इत्यादी सुद्धा एकत्र करतात. ग्रुप मध्ये राहून केल्यामुळे अभ्यासासारख्या कंटाळवाण्या गोष्टी तेवढ्या बोअर राहात नाहीत :). Project submissions, वगैरेंचं tension कुठल्या कुठे पळून जातं. आणि याव्यतिरिक्त उरलेला वेळ तर काय, कट्ट्यावर गप्पांचा अड्डा टाक, जरा सुट्टी मिळाली की पिकनिक plan कर, घोळक्याने सिनेमाला जा.... “वाटल्याने आनंद वाढतो आणि दु:ख कमी होतं.” हा मंत्र शब्दश: जगत असतात. पुढे नोकरी वगैरे सुरू झाल्यावर असं सारखं सारखं मित्र मंडळीबरोबर वेळ घालवणं शक्य होत नाही हे अगदी खरं आहे. पण बहुतेक करून पुढाकार घेण्याचा आळस, जडत्व ही कारणं अधिक खरी असतात. कारण जुन्या मित्रांपैकी एखाद्याने पुढाकार घेण्याचा अवकाश, की त्याच्या हाकेला ओ द्यायची तयारी बऱ्याच जणांची असते हा अनुभव आपल्याला बरेचदा येतो, नाही का? गरज आहे थोडासा आळस झटकून तो फोन उचलण्याची, हल्ली तर नंबर पण लक्षात ठेवावे नाही लागत!!!

कॉमु स्वत:चे लाड करतात.
होय, खरंच आपण विसरून जातो स्वत:चे लाड करणं कॉलेजातून बाहेर पडल्यावर. नोकरीत स्थिरस्थावर झाल्यावर थोड्याच दिवसात आपल्या लक्षात येतं की आता पोट सुटायला लागलंय आपलं. आणि पहिला घाला पडतो तो खाण्यापिण्यातल्या स्वच्छंदीपणावर.यात किती साखर असेल, त्यात किती calories असतील.....सगळी मजाच निघून जाते. या लेखातला जो पहिला मुद्दा, म्हणजे physical activities जीवनात जास्तीत जास्त अंतर्भूत करण्याचा आहे, तो आपण पाळला, तर खाण्यापिण्याचे लाड आपण सहज सुरु ठेवू शकू ;). म्हणजे एका teenager सारखं वाट्टेल तेवढं जंकफूड नाही पचवू शकणार आपण, परंतु अगदीच तिलांजली नाही द्यावी लागणार त्या बर्गर किंवा वडापावाला. खाण्यापिण्याव्यतिरिक्त, कॉमु स्वत:च्या दिसण्याकडे, कपड्यांकडेही किती लक्ष पुरवतात. पौगंडावस्थेतील हार्मोन्स चा परिणाम म्हणून जरा अतीच करतात हे मान्य आहे. पण आपलाही हा अनुभव आहेच की जेव्हा जेव्हा आपण आपल्या दिसण्याकडे नीट लक्ष देतो, तेव्हा तेव्हा आपला मूड खूप छान राहतो. मग कॉमुं इतकं अती नं करता, रोजच्या रोज खूप छान दिसण्याचा प्रयत्न करायला, मोजके का होईना, पण अगदी नियमितपणे नवे कपडे घ्यायला खरंच काय हरकत आहे? स्वत:चे लाड करण्याची कॉमुंची अजुन एक पद्धत म्हणजे, सतत संगीतात बुडून राहणे! आपल्या बिझी असण्यामुळे आपण मुद्दाम गाणी ऐकणं हे जवळजवळ विसरूनच गेलेलो आहोत. पण कॉमु पहा....सकाळी उठल्याबरोबर ब्रश करणंच मुळी सुरू होतं रेडीओच्या साथीने. कॉलेजला जाता जाता कानात earplugs असतातच. दोन कॉमु एकमेकांना भेटले की सर्वप्रथम, तुझ्या मोबाईल मध्ये कुठली गाणी? माझ्या ipod मध्ये कोणती गाणी? चल exchange करूया! हे सोपस्कार पार पडतात . कुठे पिकनिक ला गेले की अंताक्षरी, गिटारवर गाणी म्हणणे......एकंदरीत एकदम संगीतमय जगत असतात पठ्ठे! संगीत ऐकता ऐकता कामे केली की मूड छान राहतो हे माहीत तर असतं आपल्याला, पण सतत संगीत कानावर पडत राहील अशी व्यवस्था करायला नाही बुवा जमत आपल्याला त्यांच्यासारखं! पण प्रयत्न करून पाहूया का? कॉमु असताना जे सहज जमत होतं ते आता जाणीवपूर्वक सुद्धा जमणार नाही? का बरं? हळूहळू जमेल नक्की.
कॉमु दर वर्षी एक एक इयत्ता पुढे पुढे जातात.
कॉमुंचं आयुष्य शैक्षणिक वर्षांमध्ये विभागलेलं असतं. प्रत्येक वर्षी ते एका इयत्तेतून पास होवून पुढील इयत्तेत जात असतात.(सन्माननीय अपवाद वगळून!) त्यामुळे वर्षभर मेहेनत करून काहीतरी achieve करून स्वत:ची प्रगती झाल्याचं समाधान आपसूकच त्यांच्या पदरी पडतं. तशी प्रौढांचीही प्रगती होतंच असते. प्रमोशन, लग्नं,मुलं होणं,मोठं घर किंवा गाडी घेणे इत्यादी. पण शैक्षणिक वर्षात होणाऱ्या प्रगतीचा सुनिश्चितपणा त्याला नसतो. बरेचदा ही प्रगती बाह्य गोष्टींवरही अवलंबून असते, अगदी देशाच्या अर्थव्यवस्थेपासून ते आपल्या बॉसच्या स्वभावापर्यंत! परंतु आपण आपल्यासमोर जर असं उद्दिष्ट ठेवलं की जे पूर्ण करणं सर्वस्वी आपल्याच हातात असेल, एखादा व्यवसाय सुरु करण्यापासून ते एखादं वाद्य शिकण्यापर्यंत काहीही, पण ते समोर ठेवून वर्षभर प्रयत्न करून ते साध्य केलं, तर शैक्षणिक वर्षाच्या शेवटी परीक्षेत यशस्वी झाल्यावर जे सुनिश्चित समाधान कॉमुंना मिळतं, तसं आपल्यालाही मिळेल. ध्येय निश्चित करून ते साध्य केल्यामुळे स्वत:च्या जीवनावर स्वत:चं नियंत्रण असल्याची भावना निर्माण होते, जी सध्याच्या काळात फार दुर्मिळ झालेली आहे. कॉमुंना ती आपसूकच मिळते, आपल्याला प्रयत्नपूर्वक मिळवावी लागेल, एवढाच काय तो फरक!

कॉमु वर्षातून एकदा मोठ्ठी सुट्टी घेतात!!! 
शैक्षणिक वर्षानंतर साहजिकच आठवणारी गोष्ट म्हणजे उन्हाळी सुट्टी! कॉमुंना वर्षातून एकदा(तरी!) महिना दोन महिन्याची संपूर्ण सुट्टी मिळते. स्वत:ला पूर्णपणे recharge करण्यासाठी. प्रौढांपैकी किती जणांना मिळते बरं? बहुसंख्यांना तरी अगदी डोक्यावरून पाणी म्हणजे आठवडाभर! पण या सुट्टीचं महत्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळे प्रौढांना अगदी कॉमुंसारखं महिनाभर शक्य नसलं, तरी जेवढी शक्य तेवढी, आणि मुख्य म्हणजे सलग सुट्टी, वर्षातून एकदातरी घ्यायला हवी. त्या मानसिक विश्रांतीनंतर आपल्या कामाचं नुकसान न होता प्रचंड फायदाच होतो. बऱ्याच यशस्वी उद्योजकांचा अनुभव आहे की मोठ्या सुट्टीनंतरच त्यांना व्यवसाय विषयक उत्तम कल्पना सुचल्या.
तेव्हा प्रौढ मित्र-मैत्रिणिंनो, कॉमु हे स्वत: विद्यार्थी असले, तरी त्यांना गुरूच्या जागी ठेवून आपण बरंच काही, किंबहुना जीवन कसं जगावं हेच शिकू शकतो!
तेव्हा.......येत्या गुरुपौर्णिमेला तुमच्या ओळखीच्या एखाद्या कॉमुला एखादं छानसं गिफ्ट द्या, आणि त्याच्या चेहेऱ्यावर आधीपासून ओसंडून वाहणारया आनंदात थोडी भर घाला!!! 

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रौढांसाठी समुपदेशन! छान आहे.
पार्ट्यांना जाऊन धींगाणा घालणार्‍या प्रौढाने [फक्त तरूण पोरेच तसे करतात असे नाही ]यदाकदाचित शुद्धीवर असतांना लेख वाचलाच तर पैसा आणि वेळ अधिक चांगल्या प्रकारे सत्कारणी कसा लावायचा याचे चांगले मार्गदर्शन होईल त्यांना.

छान लिहिलेय.. आवडले.. पटलेही.. हे सारे पाळायचा प्रयत्न असतोच.. वाचताना किती सोपे आहे हे सारे असे वाटते.. पण दुर्दैवाने या लेखाला दुसरी बाजूही आहेच.. Sad