विपश्यना -एक आनंददायी अनुभूती !

Submitted by सन्तोश भास्कर पातिल on 31 August, 2012 - 12:51

एक आनंददायी अनुभूती !
विपश्यना साधना अत्यंत कठीण असते असं माझी मित्रमंडळी म्हणत असत. १०दिवस मौन धारण करणे ही काही सोपी गोष्ट नाहीये ओ ! मला वाटायचं नुस्तं मौन धरायला काय त्रास पडतोय ? आपण हे शिवधनुष्य पेलण्याचा प्रयत्न करायचाच. सरकारी कार्यालयात नेहमीच्या शिरस्त्यानुसार एक परिपत्रक आले. ”विपश्यनेला जाऊ इच्छिणार्‍यानी आपली नावे नोंदवावीत”. कोणीच पुढे यायला तयार नव्हते. हे !! काम सोडून कोण जाणार? असा थोडासा नकारात्मक सूर. मी आपला होकार लगेच कळवून ही टाकलेला असतो. एक अनामिक हुरहुर मनात असते.आपल्याला हे जमेल का? १० दिवस मौन हे एक वेळ ठीक आहे हो .पण अर्ज भरताना त्यातल्या अटी वाचल्यावर एका अटीने मनांत थोडे धाकधुक वाटत असते . ती अट म्हणजे रोज दुपारी १२ वाजण्याच्या आत एकदाच जेवणे , मात्र नविन साधकांना सायंकाळी ५-१५ वाजता थोडेसे चुरमुरे आणि एक कप चहा किंवा दूध घेण्याची सवलत. हे जरा मला कठीण वाटत असते. तसं एकादशी, गुरुवार, शनिवार असल्या उपासाची मला संवय असते. पण या एकभुक्तपणाची शरीराला कधीच माहिती नसते. साधने बद्दल बाकी काहिच माहिती नाही, अर्ज तर दिलेला आहे. अनेक लोक ही साधना करतात. मग मी पण ही साधना करणारच अशा आत्मविश्वासाने धम्मानंद -मरकळ-पुणे येथे पहिल्या शिबीराला हजर राहतॊ. त्याच आत्मविश्वासाने दुसरं शिबीरही पार पाडतो. इतरानीही याचा लाभ घ्यावा म्हणून हा लेखन प्रपंच !
नावनोंदणी झाल्यावर सायंकाळी ७वाजता १०दिवसाच्या शिबीराची एकूण रुपरेषा विशद केल्यावर मौनास सुरुवात होते. करपल्लवी,नेत्रपल्लवी किंवा इतर कुठल्याही माध्यमाद्वारे बोलण्यास संपुर्ण मनाई असते. आवारात फिरत असाल तर आपल्या पायाकडे नजर ठेवावी अशी सूचना मिळालेली असते.सुरुवातीला पहिल्या दिवशी काही फारसं वाटत नाही पण दुसर्‍या पासून हे सांभाळणं किती कठीण आहे याची जाणिव होऊ लागते. अनाहूतपणे आपल्याकडून हातवारे,हावभाव,नेत्रकटाक्ष इ.चा अवलंब होतो तेंव्हा सेवक-साधक हे टाळण्याची मुकपणे विनंती करत असतो. मनात अनेक विचाराचे तांडव चालू असते आणि आपल्याला त्यावर कटाक्षाने ताबा मिळवायचा आहे याची जाणिव सतत होत राहते. मौन,ब्रह्मचर्य,अहिंसा या शीलांचे पालन याची ही सुरुवात असते. आपले पुर्वसंस्कार त्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत असतात. रोज संध्याकाळी ७ ते ८-३० या वेळात प.पू मुख्य आचार्य गोयंका महोदय यांच्या व्हिडीओ- प्रवचनामध्ये आज आपल्याला झालेल्या त्रासाचा उल्लेख ऐकून आणि त्यावर करावयाची उपाय योजना ऐकून हळुहळु मनाचा निर्धार वाढत जातो.
पहिल्याच दिवशी दुपारी, रात्रीचे जेवण मिळणार नसते या कल्पनेने ,भरपेट जेवण घेतलेले असते. साधकाला त्यामुळे काय त्रास हॊणार याची सुतराम कल्पना नसते. या पहिल्या जेवणानंतर दुपारी १ते ५ असे चार तासाचे ध्यान करावयाचे असते हे साधकाच्या गावीही नसते. त्यामुळे ध्यानाला बसल्यावर बहुतेक नविन सर्व साधकांना दर २-५ मिनिटांनी सारखे ढेकर येऊ लागतात,अनेकांना गुबार्‍याचा पण खूप त्रास होत असतो आणि याचा उल्लेख सायंकाळच्या पहिल्या प्रवचनात झालेला ऐकल्यावर आपल्याला आपली चूक उमगते. त्यामुळे मी दुसर्‍या दिवसापासून हळुहळु आहारात काटछाट करण्यास सुरुवात करतॊ.बरे संपुर्ण उपास पण करायचा नाही, आणि अति आहार पण टाळायचा ,दोन्हीचा सुवर्णमध्य साधायचा असा प्रेमळ सल्ला प्रवचनात दिलेला असतो, त्यानुसार ३र्‍या दिवसापासून फक्त एक मूद भात त्यावर पुरेसे साधं वरण आणि दोन वाट्या ताक असा माझा आहार मी निश्चित करतो. त्यामुळे दिवसभर ताजेतवाने राहून साधना विनासायास पार पडण्यास मदत होते असा माझा अनुभव आहे.
पहाटे ४ वा. उठून ४-३०ला ध्यानास सुरुवात व्हायची. २ तास ध्यान झाल्यावर दीड तास विश्रांती,याच वेळात चहापान, स्नान उरकून परत ३तास ध्यान आणि नंतर २तास विश्रांती, यावेळात जेवण उरकून परत ४तास ध्यान झाल्यावर १तास विश्रांती ,यावेळेत नविन साधकांना सायंकाळचा अल्पोपहार तर जुन्या साधकांना एक ग्लास सरबत, यानंतर परत ३तास प्रवचन व ध्यान.रात्री ९ ते पहाटे ४ निद्रासन. रोज बारा तास ध्यान ! ! हा रोजचा परिपाठ ध्यानी येतो ते दुसर्‍या दिवशी.
दोन दिवस आनापान ध्यानाविषयी माहिती सांगितली जाते. त्यातील अनुभूती येत असते. सगळं अंग आता ठणकू लागलेलं असतं. कुठून या फंदात पडलो असा विचार मनात डोकावत असतो आणि सायंकाळच्या प्रवचनात नेमकं ह्याच बाबीचा उल्लेख ऐकून आपल्याला हायसं वाटतं. साधने विषयी आपली काहीतरी प्रगती होत आहे हे ही जाणवत राहतं. आता उद्यापासून “विपश्यना ध्यान” करावयाचे आहे हे साधकांच्या मनावर अलगदपणे ठसवलं जातं. आता साधकांची मानसिक तयारी बरीच झालेली असते. पण आज अशी अवस्था असते की प्रत्येक साधक जो प्रामाणिकणे साधना करत असतो तो जमिनीवर दोन हात ठेवून सावकाश उठण्याचा प्रयत्न करत असतो. दोन दिवस सांगितलेले असते- “आते जाते सांसपर करे निरंतर ध्यान , कर्म के बंधन टुटे होये परम कल्याण ! हे गुरूजींचे शब्द सतत कानांत रूंजी घालत असतात. त्याच तंद्रीत रात्री ९ वाजता अंथरूणावर पडल्यावर कधी डोळा लागतो ते कळत नाही. पण ही अर्धवट तंद्री असते. गाढ झोप आपल्याला येतच नसते. अनेक विचार मनात येत असतात. लहानपणापासून ते आज पर्यंत आपल्या जीवनात घडलेल्या अनेक घटनांची, नातेवाईकांची सतत कसली ना कसली आठवण आणि त्याविषयीचे विचार मनात सतत घोळत असतात. मन तळमळत असते. त्याकडे साक्षी भावाने पहायचे असे प्रवचनात सांगितलेले असते. एक वेगळीच अनुभूती यावेळी आपण घेत असतो.
पोटात काही नसते, अर्धपोटीच असतो आपण. त्यामुळे पहाटे अडीच-पावणेतीनलाच खडखडीत जाग येते. वास्तविकता साधकाने रात्रभर झोपेपेक्षा एकांतवासाचा अनुभव घ्यावा असं प्रवचनात उपदेश केलेला असतो. सतत आनापान ध्यान ! होय आनापाना ध्याना बाबत आपण हळुह्ळु सजग होऊ लगतो. पण मला वाटते याविषयीची जाणिव मला दुसर्‍या वेळी शिबीरास गेलो तेव्हा जास्त झाली,इतरांनाही म्हणजे जे गंभिरपणे ही साधना करत असतील त्यांना असाच अनुभव येत असावा.
आता तिसर्‍या दिवसापासून दहव्या दिवसाप्रर्यंत विपश्यना ध्यान करायचे. ध्यानास सुरुवात करत असताना आपल्याला सुचना मिळत असतात. आपण आपले मन त्या सूचनेनुसार वरच्या ओठावर नासिकाग्राखाली एकाग्र केलेले असते. सुखद किंवा दुःखद संवेदनेची अनुभूती येत असते,अगर येत नसते, अगर काहीही संवेदना होत नसते, त्याकडे समत्व बुद्धिने पहाण्याची सूचना सतत मिळत असते. त्याच वेळी आता मन आणखीन सूक्ष्म करावे अशी सूचना मिळते. आपण ध्यानमग्न अवस्थेत गेलेलो असतो. आता हे सूक्ष्म मन ब्रह्मरंध्राकडे नेण्याची सूचना मिळते, तेथील संवेदना निरिक्षण करण्याची सूचना मिळते. रोज यामध्ये आपली हळूहळु प्रगती होत असते. ब्रह्मरंध्रा कडून हळुहळु सूक्ष्म मनाचा प्रवास संपूर्ण चेहरा, डोक्याचा भाग, कान,गळा, खांदे,दोन्ही हात,हाताची बोटे, छाती, पोट, पाठ, कमर, दोन्ही मांड्या, पाय ,घोटे ,पायाची बोटे असं संपूर्ण शरीरभर मनाचा प्रवास संवेदनेची अनुभूती घेतघेत होत राहतो, परत पायापासून ब्रह्मरंध्रापर्यंत हेच चक्र पुनःपुन्हा करत रहातो आपण ! याची प्रत्यक्ष अनुभूती घेणे हेच जास्त महत्वाचे असते. शब्दातीत अशी ही अनुभूती येथे मांडता येणे कठीण. अवर्णनीय, आनंदमयी अशी ही अनुभूती परत परत मिळावी यासाठी शरीर आसुलेले असते पण तेव्हढ्यात त्याचीही आस न ठेवता समत्व बुद्धिने याचे निरिक्षण करत राहण्याचे अवधान येते. अवघे विकार शांत ———–शां–त —–शां—————-त झालेले असता

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक शंका. तिथे काय घडले हे सांगण्याची सक्त मनाई -नव्हे वचन दिले आहे ना तुम्ही?
असे मौन पाळावे लागते असे तिथे गेलेल्या अनेक लोकांनी सांगितले आहे.

हा भाग कोप्य पस्ते करायचा राहिला होता. >>>

I think total sablimation of VIKARA !!
मला आलेली एक अनुभूती —— विपश्यना कशी करावी याच्या सूचना मिळत असतानाच वरच्या ओठावरील सूक्ष संवेदना मनास जाणवते, तत्क्षणी ही संवेदना सूक्ष्म मनाच्या सहय्याने ब्रह्मरंध्रा कडे नेण्याची सूचना मिळते.तेथे त्या संवेदनेचे निरीक्षण सूक्ष्ममन करत असते तोच त्या संवेदनेचे धारदार पाते करुन देहाचे आडवे छोटेछोटे काप करून संवेदनेचे निरिक्षण सूक्ष्म मनाने करण्याची सूचना मिळते.आता संवेदना डोक्यावरील ब्रह्मरंध्रावरून निघून कपाळ ते डोक्याची मागची बाजू याक्रमाने संपूर्ण शरीराचे पायाच्या अंगठ्यापर्यंत आडवे काप करत संवेदनेच्या संपूर्ण प्रवासाचे अवलोकन, त्रयस्थपणे- समत्व ठेवत, म्हणजे सुखद-संवेदना असो वा नसो,दुःखद-संवेदना असो वा नसो, कुठलीही प्रतिक्रिया न देता, सूक्ष्ममन निरिक्षण करत राहते. ही क्रिया नखशिखांत वरून खाली-खालून वर पर्यंत संपूर्ण एक ध्यानसत्र (तीनतास) चालू असते.जसे आडवे काप करत असतो तसेच उभे काप करतकरत पण एक वेगळी अनुभूती मिळत राहते. जे सुखासन घातलेले असते ते तसेच असते. ध्यान समाप्ती ची सूचना आता मिलते, आपण हळूहळु परत आपल्या मूळ अवस्थेत येत राहतो तेव्हा भवतु सब्ब मंगलम –! भवतु—- सब्ब—- मंगलम –!! भवतु————- सब्ब———– मंगलम –!!! असा मुख्य आचार्यांच्या आवाजात ला उद घोष कानावर पडत असतो . साधू !साधू—!साधू !!! म्हणून आपण प्रतिसाद देत असतो !!!
दुसर्‍या ध्यानसत्रात यापेक्षा वेगळी अनुभूती आली .प्रत्येकाला विविध अनुभव येत असतात. पिंडे पिंडे ——भिन्ना!!! हेच खरं !
प्रत्येक ध्यानसत्रात टेपवरून हिंदी आणि इंग्रजीतून सूचना आपल्याला मिळत असतात, सत्राची सांगता तेरा मंगल… ! तेरा मंगल…….! ते…रा…मंगल होय रे…….!!! भवतु सब्ब मंगलम… ! भवतु सब्ब मंगलम… ! भवतु ——-सब्ब —–मंगलम… !!! सबका भला हो ! सबका—- भला—– हो !
सबका ——–भला———- हो !!!!! अशा घोषणांनी होत असतो ! आपलं मन अत्यंत आनंदमय अवस्थेत असते, एका अननुभूत अशा शांतीचा आपण अखंड आस्वाद घेत असतो.
दहाव्या दिवशी सकाळी ८ते ११ च्या ध्यान सत्रात व्हिडिओद्वारा प.पू गोयंका ”मित्त ध्यान” याविषयीची माहिती देतात, आणि त्यानंतर आपलं दहा दिवसाच्या मौनाची समाप्ती होते. सगळ्यांना खूप बोलावसं वाटत असतं पण ध्यानकक्षात मौनच पाळायचे असते. तसेच पुरुष साधकांनी पुरुषसाधकाशी व स्त्रीसाधकांनी स्त्रीसाधकाशीच हलक्या आवाजात वार्तालाप करण्यास हरकत नसते.
स्वतःला बोधी प्राप्त झाल्यावर बुद्धाने आपल्याबरोबरच्या साधकांना आवाहन केले ” उठा जागे व्हा ! ” इतिवुत्तकम २.१० मधील हे आवाहन असे आहे –“जागरन्ता सुणाथेतम्ये सुत्ता ते पबुज्झथ । सुत्ता जागरितं सेय्यो नात्थि जागरतो भयं ॥ “ जे जागे आहेत त्यांनी हा संदेश ऐकावा. जे झोपलेले असतील त्यांनी जागे व्हावे. झोपण्यापेक्षा जागे असणे जास्त लाभदायक आहे. जागृत अवस्थेत कोठलेही भय नाही.
या शिबीराच्या समाप्तीनंतर ’शील,समाधी,प्रज्ञा’ यापैकी आपण कुठे पोचलो आहोत याचा ज्याचा त्यानेच शोध घ्यावा. शिबीर आवारातून १२व्या दिवशी सकाळी दोन तासाचे ध्यान झाल्यावर नाश्ता करून आपल्या घराकडे प्रयाण करतो, तेव्हा आपल्या मनात गुंजन चालू असते भवतु सब्ब मंगलम… ! भवतु ——-सब्ब —–मंगलम… !!! सबका भला हो ! सबका—- भला—– हो ! सबका ——–भला———- हो !!!!!