विषय क्रमांक १ - काकस्पर्श : एक अंतर्मुख तरीही समृद्ध करणारा अनुभव!

Submitted by मिली२०१२ on 30 August, 2012 - 12:45

काकस्पर्श : एक अंतर्मुख तरीही समृद्ध करणारा अनुभव!

सभोवतालच्या बदलत्या परिस्थितीप्रमाणे आजचा मराठी चित्रपटही सुजाण आणि प्रगल्भ झालेला आहे. त्यात काळाची पावलं ओळखण्याची समयसूचकता आहे आणि एखादा गहन विषय कलात्मकरीत्या मांडण्याची अजब हातोटीही आहे! नुकताच येऊन गेलेला महेश मांजरेकरांचा काकस्पर्श हा चित्रपट म्हणजे याचं चालतं बोलतं उदाहरण आहे.
एखादा चित्रपट बोलतो, आपल्याला हसवतो, रडवतो पण त्याही पुढे जाऊन हा चित्रपट आपल्याशी हितगुज करतो , काळजाला घरं पाडतो आणि सुन्न करून सोडतो. संपता संपता आपल्यापुढे एक भलंमोठं प्रश्नचिन्ह उभं करून जातो,
‘हे असंही होऊ शकतं?’
एक लक्षणीय गोष्ट म्हणजे हा चित्रपट आपल्याला थेट स्वातंत्र्यपूर्व काळात नेऊन सोडतो. सेपिया रंग, एकूण नेपथ्य आणि समर्पक पण सहज भाषा ह्यांच्या सहाय्याने अतिशय परिणामकारकरीत्या वातावरणनिर्मिती साधली आहे.
आतापर्यंत अनेक सामाजिक विषय लीलया हाताळलेल्या मांजरेकरांनी या विलक्षण प्रेमकथेचे वेगवेगळे आयाम दाखवले आहेत.
अनेक साहित्य प्रकारांतून विधवांवर होणारे अत्याचारांबद्दल सांगितलं गेलं आहे, पण काकस्पर्श मध्ये ज्या प्रकारे, एका विधवेच्या मनात उमटणाऱ्या पडसादांचं चित्रण केलंय, ते अतिशय मार्मिक आहे.
अशाच एका प्रसंगात जेव्हा उमा, कुशीला फलशोधनाच्या रात्रीबद्दल विचारते तेव्हा ते विचित्र वाटतं, कारण पंचविशी ओलांडलेल्या स्त्रीला हे माहीत नसावं हे जाणवतच नाही .
पण मग तिचा, ‘नवरा गेल्यावर खूप काहीतरी गमावलंय हे कळलं पण नक्की काय गमावलंय ते तरी कळू दे .’ हा टाहो मात्र मन हेलावून जातो .
एक साधासा प्रश्न, ‘अंगावर थंड पाणी तरी कितीदा वेळा घ्यायचं गं दिवसातून ?’ मात्र त्या अश्राप जिवाची तगमग कळल्यावर अंगावर सर्रकन काटा उभा राहतो.
नियतीने किती क्रूर थट्टा करावी कोणाची?
वाटतं, ज्या सहज सुंदर नैसर्गिक भावनांनी मनाला धुमारे फुटावेत, त्या अशा मुर्दाडपणे दडपून टाकाव्या लागतात यात दोष कुणाचा ?
समाजाचा, नियतीचा की तिच्या आप्तांचा ?
दोष कुणाचाही असो तिच्या नशिबात मात्र येतो तो, काळाकभिन्न अंधार!
नवपरिणीत वधूला मिलनाच्या रात्री पतीच्या कलेवराची सोबत करावी लागावी, यापेक्षा मोठी शोकांतिका ती
कोणती ?
आयुष्याच्या सोनेरी सुरुवातीलाच काळाचा असा घाला पडल्यावर सारीच सुखं अबोल होऊन हिरमुसून जातात. पदरी येते, ती घोर निराशा,वैफल्य, अगणित शंकाकुशंका आणि अनामिक भीती. सुख कधी कळलंच नाही आणि दुःख कधी संपलंच नाही अशी केविलवाणी अवस्था होऊन जाते.
त्याही अवस्थेत ती तोल ढळू न देता आला दिवस पुढे ढकलण्याचा प्रयत्न करत असते. निसर्ग मात्र शांतपणे आपलं काम करत असतो.
नवऱ्याचा सहवास कधी न अनुभवलेल्या उमाच्या मनात त्याच्याच मोठ्या भावाबद्दल, हरीबद्दल, काही नाजूक भावना आकार घेत असतात .
त्या दोघांच्या या अप्रकट प्रेमाची कुणकुण लागताच तिला बिचारीला जाऊच्या मत्सरालाही सामोरे जावे लागते.पुढे मग त्याच जाऊच्या उभ्या संसाराची जबाबदारी समर्थपणे पेलून ती स्वतः मात्र रितीच राहते. संस्कार, रिवाज आणि बंधनं यांच्या कचाट्यात पार कोमेजून जाते.
ज्याच्या संसारासाठी हे सगळं केलं तो दीरही तिच्याशी अबोला धरतो,तिला आपल्यापासून कायमचा दूर करण्यासाठी.शेवटी ती कंटाळून अन्नपाणी सोडून देते.तिला असा गलितगात्र बघून मात्र त्याला दयेचा पाझर फुटतो आणि तो प्रथमच आपल्या अन्तःकरणातली सल तिला सांगतो, आपल्या अव्यक्त भावनांना वाट करून देतो.
त्याने आपल्या मृत भावाच्या, महादेवाच्या, आत्म्याला तिला संभाळण्याचं, सगळ्यांपासून, वचन दिलं असतं, त्याच्या पिंडाला काकस्पर्श व्हावा म्हणून. हा अर्थबोध झाल्यानंतर मग आपल्याला एकेका गोष्टीचे संदर्भ लागायला लागतात.
हे वचन पुरं करणं त्याच्या स्वतःच्याही दृष्टीनं एक आव्हान असतं. त्याला पहिल्याप्रथम तिला वाचवायचं असतं ते स्वतःपासून. त्याच्या या संयमाची कसोटी बघणारे अनेक क्षण येतात. त्याच्याबद्दल अनेक गैरसमजुतीही होतात. काही नाती दुरावतात.पण निश्चयाच्या जोरावर तो यातून तावून सुलाखून बाहेर पडतो.फक्त करपून जातं ते त्याचं निस्सीम पण अबोल प्रेम. आपल्या प्रेमाची पुसटशी कल्पनाही न येऊ देणं यातच त्याचं सच्चेपण असतं.
उमाला गमावण्याच्या कल्पनेने मात्र हरी आपलं मौन आणि पण दोन्ही सोडतो .
आपल्या भावनांचा कबुलीजवाब देतो आणि आयुष्यभर अव्हेरल्याबद्दल तिची क्षमायाचना करतो.
पण या प्रेमाचा उदात्तपणा इथेच संपत नाही . रथाचं एक चाक कोलमडल्यावर दुसऱ्याने संपूर्ण भार पेलावा , त्याप्रमाणे यावेळेस ती त्याला सावरते .
त्याचा वचनभंग होऊ नये,शब्द खाली पडू नये म्हणून आपली अधीर नजर कायमची मिटून घेते.
एका जिवाने दुसऱ्याला साद घालावी आणि दुसऱ्या जिवाने मूकपणे हुंकार द्यावा, त्याप्रमाणे दोघं मिळून ते वचन पाळतात.आणि सोबतच आपल्या प्रेमाला क्षुद्र भौतिकतेच्या पातळीवरून उचलून पारलौकिकतेकडे नेतात.
एकरूप होता आलं नाही तरी समरूप होऊन आपल्या उत्तुंग प्रेमाची ग्वाही देतात.

अशी ही अवघड कहाणी पडद्यावर समर्थपणे साकारलीय सर्व कलाकारांच्या पण मुख्यतः सचिन खेडेकर, प्रिया बापट आणि केतकी माटेगांवकर यांच्या सशक्त व संयत अभिनयाने. आणि जोडीला आहे उत्कृष्ट पटकथा आणि अत्युत्कृष्ट दिग्दर्शन.किशोरी आमोणकरांचे मर्मभेदी सूर हीपण एक जमेची बाजू.
अंतर्मुख करणारा पण तरीही आपल्या आशयगर्भाने समृद्ध करून सोडणारा चित्रपट, म्हणूनच या कलाकृतीकडे बघायला हवं!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१००% सहमत.

प्रेमाची अतिउच्च पातळी गाठणारी कथा, केवळ भौतिक सुख म्हणजेच प्रेम नसुन त्याग अन कर्तव्यपालन यांचा सुरेख मिलाप म्हणजे प्रेम असा काहीसा मतितार्थ घेवून आलेली सुंदर कलाकृती.

-सुप्रिया.

सुंदर लेख.

<<<<<<<<जेव्हा उमा, कुशीला गर्भदानाच्या रात्रीबद्दल विचारते तेव्हा ते विचित्र वाटतं>>>>>>>>>
ते गर्भदान नसुन फलशोधन आहे. खात्री करुन घ्यावी.
शुभेच्छा.

खुप छान लिहिलय...सिनेमा पाहताना जसे डोळे भरुन आले होते तसेच परत वाचताना झालं.

लेख छान च आहे!!!

फक्त सिनेमा नाही आवडला. बर्‍याच त्रुटी होत्या. गोष्ट चांगली आहे, अभिनय ही उजवा आहे. पण काहीतरी कमी आहे असं वाटलं. मुख्य म्हणजे फ्लॅश बॅक चा फार वापर झाला आहे. आणि त्या मुळे कथा विस्कळीत होते. इफेक्ट जातो.

तसच कला दिग्दर्शन अगदी बोंब आहे. कारण त्या काळातल्या स्त्रीया सतत नथ, खोप्यातले फुल घालुन मिरवत नसत. खुपच स्टायलाइज्ड बायका दाखवल्या आहेत. त्या मुळे तिचं एकटे पण खंत अंगावर येत नाही. साड्या पण अगदी पांढर्‍या शुभ्र आणि व्यवस्थीत इस्त्री केलेल्या !!! ( उंच माझा झोका स्टाइल)

मला तरी एक चांगला विषय फुकट गेल्या सारखं वाटलं.

त्या पेक्षा तार्‍यांचे बेट मधलं कला दिग्दर्शन चित्रपटाचाच एक भाग बनुन आलं होतं. धुरकट मळकट गाव. काक्स्पर्श मधे सगळे अगदी चकाचक!!!

महेष मांजरेकरां सारख्या दिग्दर्शका कडुन अपेक्षा नाही करायच्या तर मग कोणा कडुन!!!!!

मोहन कि मीरा

यांच्याशी सहमत...खर सांगायचं तर चित्रपटापेक्षा हा लेख जास्त चांगला लिहिलाय, बरेच प्रसंग तुटक वाटत होते. सचिन खेडेकर नेहमीप्रमाणे उत्तम, एका प्रसंगात माजघरात बसून उमा तांब्याची भांडी घासताना दाखवली आहे, जावेचा संसार उमा पुरा करते हे देखील ठळकपणे जाणवत नाही., उपाध्यायाचा विरोध, गावकीचे प्रसंग तुटक वाटल, ज्या काळात विधवांची हि स्थिती होती, त्या काळात नवरा बायकोच उघड बोलण ( उमा आणि तिच्या नवर्याचे वागणे) हे सगळ होत का?? जुन्या नव्या काळाची सरमिसळ झाली असावी कि लिखाणात कच्चा म्हणावा का चित्रपट?