दु:ख कशाचे ?

Submitted by निशिकांत on 28 August, 2012 - 01:42

दु:ख कशाला? घडून गेले प्रक्तनात जे घडावयाचे
जीवनात का ठरवुन जमते कधी कुणाला हसावयाचे?

हातावरचे पोट भराया वर्तमान मी जगतो आहे
खुशीत असतो मला न आहे स्वप्न उद्याचे बघावयाचे

जिवापाड मी जपले होते पंखाखाली सर्व पिलांना
ठीक म्हणाले ! जरी ठरवले दूर तयांनी उडावयाचे

आचमनाला अजून भ्यावा समुद का? हे मला न कळले
आज अगस्ती विसरुन गेला केशव माधव म्हणावयाचे

अर्थ धोरणे चुकली नव्हती खास आखली होती त्यांनी
श्रीमंतांना मलिदा आणी आम जनांना लुटावयाचे

शेतकर्‍यांचा निधी हरवला शोध घ्यावया लवाद बसले
अहवालाला विलंब तोवर फाशी घेवुन मरावयाचे

सावित्रीचा पत्ता नाही सत्त्यवानही कुठे दिसेना
कर्मकाण्ड का करती सारे वटवृक्षाला पुजावयाचे?

काळी करनी, काळी पात्रे, काळी शाई मला कळेना
इतिहासाच्या पानावरती शुभ्र कसे मी लिहावयाचे?

सर्व मुलांनी "निशिकांता"ची अंत्यक्रियाही झटपट केली
संपत्तीचे वाटे त्यांना लगेच होते करावयाचे.

निशिकांत देशपांडे मो. क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail:- nishides1944@yahoo.com

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शेतकर्‍यांचा निधी हरवला शोध घ्यावया लवाद बसले
अहवालाला विलंब तोवर फाशी घेवुन मरावयाचे

काळी करनी, काळी पात्रे, काळी शाई मला कळेना
इतिहासाच्या पानावरती शुभ्र कसे मी लिहावयाचे?

<<<

व्वा

सुंदरच गझल आहे

निशिकांतजी!
गझल सुंदर आहे. आवडली. शेवटचा शेर अप्रतिम.
पण मतल्यातील दोन ओळीतील नाते अस्पष्ट वाटले. एकजीवपणा कमी वाटला. दुसरी ओळ पहिल्या ओळीला न्याय देत नाही असे वाटले. म्हणून मी
आपला मतला असा वाचला........

जरी म्हणालो...घडून गेले, प्राक्तनात जे घडावयाचे!
हसतानाही रडूच आले, खूप ठरवले हसावयाचे!!

काही ठिकाणी –हस्वदीर्घाच्या चुका टाळता आल्या असत्या असे वाटून गेले.
ठरवुन.....ठरवून हवे.
विसरुन....विसरून हवे.
आणी....आणि हवे.
घेवुन..........घेवून हवे.
अशा सवलती गीतात चालतात. गझलेत त्या बोच-या वाटतात.
.........प्रा.सतीश देवपूरकर