मुलांची क्षेत्रनिवड - जनातली आणि मनातली - तुमच्या आणि त्यांच्या

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

(हे लेखन धोनी नाही, कदाचीत गंभीरही नाही. रीड अॅट युअर ओन रिस्क).

बाराव्या शतकात बर्नार्ड अॉफ चार्टर्स ने म्हंटले होते की राक्षसी माणसाच्या खांद्यांवर बसलेल्या बुटक्याला जास्त जग दिसते. त्याचप्रमाणे इमारती जशजशा उंच होताहेत, आंतरजालाची वीण घट्ट होते आहे, तसतशी प्रत्येक नवी पिढी आधीच्या पिढीपेक्षा जास्त नवलपूर्ण व वेगळ्या गोष्टी करु शकते. जन्म दिल्यानंतर मुलांना चौफेरपणे उधळू देण्यापेक्षा त्यांना झापड बांधणे हेच त्यांचे परमकर्तव्य आहे असे अनेक पालकांना असाहजिकपणे वाटते. अनेक नवी क्षितिजे उदयाला आली आहेत. पण ती जनात. (पालकांच्या) मनात मात्र अनेकदा तीच बाबा आदमी घिसिपिटी क्षितिजे ही स्थायी असतात. लहान वयात का करावा कुणी स्थैर्याचा विचार? वारा नेईल तिथे जावे वारुने.

तुम्ही फेसबूक (किंवा g+, खरेतर दोन्ही) वर नसाल तर मागासलेले आहात. संगणक चालवता येऊ शकणाऱ्या (थोडक्यात, वयात आलेल्या) मुलांना या सामाजीक जाळ्यांमधे प्रवेश करण्यापासुन परावृत्त करत असाल तर बुरसटलेल्या विचारांचे आहात. बाय द वे, मायबोली डझण्ट काऊंट कारण इथे प्रवेशाला किमान वयाची अट नाही. (काण्ट बी व्हेरी एक्सायटींग, यु नो? आणि इथल्या लोकांच्या IQ बद्दलही इथल्याच लोकांना शंका आहेत). तर, या सोशल जाळ्यांमुळेच त्यांना कळेल की खरे जग (म्हणजे तुमच्या -पालकांच्या - आठवणींमधे न गोठलेले) कसे आहे. वाटल्यास त्यांचे फ्रेंड बनून त्यांना यात सुरुवातीला मार्गदर्शन करा, जगाबद्दल तुम्हालाही थोडे शिकायला मिळेल.

आम्ही यों करायचो, त्यों केले आहे असे म्हणत अल्पवयीन मुलांसमोर स्वत:ला मॉडेलसारखे उघडे करतांना याचे भान ठेवावे की मुलांनी जास्त जग पाहिले आहे, जगाच्या जास्त मिती पाहिल्या आहेत. आणि तुम्हाला खरेच तुम्ही केलेत ते आवडते का? उगाच तुम्ही न करु शकलेल्या गोष्टीपण त्यांच्यावर लादू नका. अ-सज्ञान मुलांना लाचलुचपत देऊन किंवा ब्रेनवॉशींग करुन किंवा बळजबरीने वेगवेगळ्या वर्गांना पाठवु नये. एकप्रकारे ती बालमजुरीच नाही का? गिजुभाई म्हणत कि मुले 'आपली' नसुन आपल्याबरोबर असतात असे समजावे. हा विचार जनमानसात फारसा रुजलेला दिसत नाही.

म्हातारपणीचा स्वत:च्या आधाराचा विचार त्यांच्यामार्गे करण्याऐवजी स्वक्षम व्हायला शिका व त्यांनाही त्यांच्यापरीने बदलते जग चाचपडु द्या. त्यांच्या आयुष्याची फळे त्यांनाच भोगु द्या. चांगले कॅपिटॅलीस्ट होऊन पैसे कमावले तर त्याचा उपभोग घेतील, नाहीतर हिंदु धर्मातील भोगणे हा शब्दप्रयोग त्यांच्या कर्माच्या फळांना लागू होईल. आणि हो, धर्माचे नाव निघालेच आहे तर - ज्याप्रमाणे तुम्ही देवा-धर्माबद्दल इतरांशी बोलण्याआधी त्यांची वैचारीक क्षमता चाचपडता, संस्कारांमुळे त्यांच्यात आलेल्या प्रगल्भतेचा ठाव घेता व मगच तुम्ही विकत घेतलेले शिवलिलामृत त्यांच्या नजरेस पडु देता (नाहीतर उगाच वाद व्हायचे) त्याचप्रमाणे स्वत:च्या मुलांशी बोलतांना करावे. ती तुमचीच अपत्ये आहेत म्हणुन जात्याच सधर्म आहेत असे समजु नये. ते लहान असतांना मधमाशा आणि फुलांबद्दल सांगावे, नंतर पशुपक्षांबद्दल व थोडे सज्ञान झाल्यावरच देवाच्या करणीचे सांगावे.

देवाचाही विषय निघालाच आहे तर - सिडने कसोटीच्या दुसऱ्या डावात सचिन द्वितीय फळीच्या फिरकी गोलंदाजाचा चेंडु तटवण्याच्या नादात झेलबाद झाला. सचिनचा धर्म फटकेबाजीचा. त्याने चेंडु तटविणे म्हणजे चक्क हुसेनप्रमाणे दुसर्या धर्माच्या (ते ही, हाय तोबा, हिंदु) देवांचे चित्र काढण्यासारखे आहे (ते ही नैसर्गिक). त्याने आधी ८० धावा केल्या असल्या तर काय झाले? त्यामुळे का हे पाप धुतले जाणार? पण प्रश्न येतो तो स्वत: देव असल्यामुळे, आणि त्याही पेक्षा महत्वाचे म्हणजे इतरांची पापे अजुनच महा असल्याने. दोन्ही कसोटींमधील दोन्ही डावातील घसरगुंडीला काही अंशी कारणीभूत २०-२० आहेच. दुसरी कसोटी हारल्याच्या एका तासानंतर BCCI ने IPL च्या पन्नासपेक्षा अधिक दिवस चालणाऱ्या सोहळ्याची घोषणा केली. त्यांना व खेळाडुंना पैसा मिळतच राहणार. मुलांच्या क्षेत्ररक्षणाचा, आय मीन क्षेत्रनिवडीचा, विचार करतांना अशा क्षेत्रांकडे कानाडोळा करु नका.

थोडक्यात काय तर ज्या प्रमाणे तुम्ही तुमच्या पाल्याच्या जीवन साथीदाराच्या निवडीत ढवळाढवळ न करता त्यात त्यांना हवी असल्यास मदत कराल तसेच त्यांच्या नोकरी-व्यवसायाच्याही बाबत करावे.

प्रकार: 
शब्दखुणा: 

थोडक्यात काय तर ज्या प्रमाणे तुम्ही तुमच्या पाल्याच्या जीवन साथीदाराच्या निवडीत ढवळाढवळ न करता त्यात त्यांना हवी असल्यास मदत कराल .... >>> wrong example coz even today about 50-75% parents do have a say in who one can marry.

rest all +1

wrong example coz even today about 50-75% parents do have a say in who one can marry. >> भारतीय पेरेंट्स. बाकी लोक्स जरा रिलॅक्स्ड वाट्तात. Happy

Pages