विषय क्र. १: इजाजत

Submitted by माधव on 22 August, 2012 - 06:44

"चल पिक्चरला!" माझ्या डोळ्यावर चढणारी सुस्ती भंग करत मित्राने फर्मावले. विचारणे वगैरे प्रकार हॉस्टेलवर चालत नाहीत, तिथे थेट आज्ञाच असते.

मी त्याच्याकडे एक नि:शब्द कटाक्ष फेकला.

"अरे एकच शो आहे" माझ्या नजरेतले भाव ओळखत तो थोडासा ओशाळत म्हणाला. हॉस्टेलवर रहाताना सिनेमाला जायची एकच राजमान्य वेळ असते - रात्री ९ ते १२. आणि आत्ता सकाळचे फक्त १०:३० वाजत होते.

माझी त्याच्यावरची नजर तशीच, पण आता भाव दुसरे. मित्रच तो, त्याने ते पण बरोबर वाचले.

"डेक्कनला, इजाजत, ११ चा शो आहे." रेखा आणि आरडी यांच्यापुढे मला सुस्ती गौण आहे हे त्याचे गणित बरोबर होते.

एक कप अमृत रिचवून आमच्या सायकली कर्वे रोडच्या उताराला लागल्या. सगळे सोपस्कार पूर्ण करून जेंव्हा आत पोहचलो तेंव्हा अंमळ उशीरच झाला होता. म्हणजे जाहिराती, त्यावरची आमची बडबड असे काही करायलाच मिळाले नाही. चित्रपटाची नामावली सुरुच झाली आम्ही गेल्यागेल्या. आणि पुढचे अडीच तास बडबड करायला सुचलेच नाही. एक उत्कट अनुभव उलगडत गेला आमच्या समोर आणि अगदी रोमारोमात भिनत गेला - कधीही न विसरण्यासाठी.

इजाजत - काय नाहीये या सिनेमात? कथेतील ठसठशीत व्यक्तीरेखा आणि त्या सादर करायला रेखा, नसिरुद्दीन, अनुराधा पटेल अशी तगडी स्टारकास्ट, गुलज़ारची सुंदर गाणी आणि छोटे बर्मन खाँ साहेबांचे अप्रतीम संगीत आणि गुलज़ारचीच पटकथा व संवाद. असा मणीकांचन योग हिंदी चित्रपटात फार कमी वेळा येतो. पण सर्वात महत्वाचे म्हणजे या सगळ्यांना एकत्रीत करून दिग्दर्शकाने (हा पण गुलज़ारच) जो अनुभव दिलाय या चित्रपटातून तो कधीच विसरता येत नाही, आणि तेच त्याचे सगळ्यात मोठे यश.

चित्रपट सुरू होतो तो पावसातून जाणार्‍या एका ट्रेनपासून. पावसाने नटलेल्या हिरव्या निसर्गाच्या पार्श्वभूमीवर नावे येऊ लागतात आणि तो फील अचूक पकडत झुळूझुळू वाहणार्‍या झर्‍याच्या अवखळ चालीत आशा गाऊ लागते -

छोटीसी कहानी से
बारीशों के पानी से
सारी वादी भर गयी
लाला लाला लालाला

कडव्यात चौथी ओळच देत नाही, बांध चाल - गुलज़ार पहिला गुगली टाकतो. छोटे नवाब बर्मन तो चेंडू असा काही टोलवतात की बॉलर बरोबर आपणही अवाक् होतो. त्या चौथ्या ओळीच्या जागी आरडी चक्क लाला लाला असा फिलर वापरतो पण तो फिलर न वाटता गाण्याची ओळच बनून जातो. गाणे चालूच असते अणि आपण ऐकतच असतो, डोळे टक्क उघडे ठेऊन. हो, अशोक मेहताचा कॅमेरा तो हिरवा निसर्ग असा काही टिपत असतो की पापणी मिटणेही जीवावर येते. सगळ्या चित्रपटभर त्याचा कॅमेरा सुंदर फ्रेम्स दाखवतच रहातो - एकदाही प्रसंगापेक्षा भारी न होण्याची खबरदारी घेत.

गाडी थांबते आणि नायक, नायीकेची प्रतिक्षालयात भेट होते. मग सगळा चित्रपट फ्लॅशबॅकने उलगडत जातो. आजोबांनी महेंद्रचे लग्न सुधाशी ठरवलेले असते. तो नोकरीचा बहाणा करून ते पुढे ढकलत असतो पण खरे तर त्याचे मायावर प्रेम असते. मनाने आणि शरीराने ते एकमेकांचे झालेले असतात. पडद्यावर काहीही अती न दाखवता गुलज़ार हे शारीरीक प्रेम नुसत्या शब्दांतून रंगवतो, त्याची परीसिमा गाठतो - एक सौ सोला चाँद की राते एक तुम्हारे कांधे का तील या ओळीत. आपण फक्त तोंडात बोटे घालून बघतच रहातो ही अजब कारीगिरी.

तर आजोबा आता कसलीही सबब ऐकायला तयार नसतात. महेंद्र सुधाला मायाबद्दल सगळे सांगून टाकतो. ती तरीही त्याला स्विकारते; एका छोट्याशा अपेक्षेच्या बदल्यात - त्याने यापुढे आपल्याशी एकनीष्ठ रहावे. लग्न होते आणि त्या दोघांचे आयुष्य सुखा-समाधानात चालू होते. निदान वरवर तरी तसे वाटत असते. पण नियतीला ते मान्य नसते. ती म्हणते -

कतरा कतरा मिलती है
कतरा कतरा जिने दो
जिंदगी है बेहने दो
प्यासी हू मैं प्यासी रेहने दो
(मला इथे अभिमान मधला ’बिरहा ही जीवन का सच्चा सूर है’ ह संवाद नेहमी आठवतो. ती प्यास, ती तनहाइ पाठ सोडत नाही माणसाचा)

लग्न करून घरी आल्यावर सुधाला एक वही मिळते मायाच्या कवितांची. आणि सुरू होते तिची घुसमट. त्या उत्कट कवितांमधून माया आणि महेंद्रचे गहिरे प्रेम तिच्या पुढे उलगडत जाते आणि आपण त्यांच्या प्रेमाच्या आड आलो आहोत अशी तिची भावना होऊ लागते. तिचीच का आपलीही घुसमट व्हायला लागते इतके ते प्रेम अथांग असते. ते अथांगता दाखवताना गुलज़ार लिहितो -

मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है, सावन के कुछ भिगे भिगे दिन रखे है, और मेरे खत मे लिपटी रात पडी है, वो रात बुझा दो, मेरा वो सामान लौटा दो

हे ऐकत असताना डोळ्यापुढे ना रेखा असते ना अनुराधा. असतो तो फक्त पाण्याबाहेर काढलेला एक मासा आणि त्याची तडफड. घुसमट नाही होणार तर काय?

गुलज़ारने जेंव्हा ह्या ओळी पहिल्यांदा आरडीला ऐकवल्या होत्या तेंव्हा त्याने त्यांना संगीत द्यायला साफ़ नकार दिला होता. सहाजीकच होते ते. शब्द सुंदरच आहेत पण चालीत बांधण्यासारखे अजिबात नाहीत. आरडीची चिडचिड झाली तो गुलज़ारला म्हणाला "तू उद्या मला टाइम्स ऑफ इंडियातली बातमी देशील आणि म्हणाशील याला चाल लाव" पण गुलज़ार शब्द बदलायला तयार झाला नाही. शेवटी आरडीने विडा उचलला आणि एक सुंदर गाणे आपल्याला मिळाले. गुलज़ारच्या या शब्दांनी त्याला गीतकाराचे राष्ट्रीय पारितोषीक मिळवून दिले आणि ते गाणार्‍या आशाला गयिकेचे. पण एवढे अशक्यप्राय काम करुनही आरडीला त्या गाण्याबद्दल कसलेच पारितोषीक नाही मिळाले.

सुधाची घुसमट वाढतच जाते आणि घडणार्‍या काही घटनांमुळे महेंद्र मायात परत गुंतत चालला आहे अशा गैरसमजात ती घर सोडून जाते. फ्लॅशबॅक संपतो आणि आपण दी एंड पाशी येऊन पोहचतो (हिंदी चित्रपटाचा कधी शेवट होत नाही, त्याचा दी एंडच होतो). महेंद्र सुधाचा गैरसमज दूर करतो आणि ते दोघे आता परत एकत्र येणार असे वाटत असतानाच ’तो’ शेवट होतो. इतका अटळ पण पटलेला शेवट दुसर्‍या कुठल्याही चित्रपटात मला आढळला नाहीये अजून पर्यंत. चित्रपट संपतो आणि आपण शेवटच्या अनपेक्षीत वळणाने सुन्न झालेले डोके घेऊन बाहेर पडतो.

यातल्या अभिनेत्यांविषयी काय बोलावे? कुठे कुणी अभिनय केलाय असे वाटतच नाही सगळे आपल्या अवतीभवती घडतय इतके खरे वाटत रहाते. अनुराधाचा हा रेखाबरोबरचा उत्सव नंतरचा दुसराच चित्रपट. पण ती रेखापेक्षा कुठेही कमी पडलेली नाही - ना सौंदर्यात ना अभिनयात. रेखा आणि नसिरुद्दीन तर महानच आहेत. शेवटच्या प्रसंगात शशी कपूरही छाप पाडून जातो.

माझ्या मनात संपूर्ण चित्रपटाइतकेच जागा अडवून बसले आहे ते चित्रपटातले चौथे गाणे -

खाली हाथ शाम आयी है
खाली हाथ जायेगी
आज भी ना आया कोइ
खाली लौट जायेगी

कुणी मला विचारले संध्याकाळची कातरता कशी असते तर क्षणाचाही विलंब न करता मी हे गाणे ऐकवेन. हे ऐकल्यावर जे वाटते तीच संध्याकाळची कातरता.

नेहमी संध्याकाळी येणारी ही कातरता त्या दिवशी सिनेमाहून परत येताना मात्र टळटळीत दुपारी माझ्या सायकलवर डबलसीट बसून आली होती.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लिहीलंय.

माझा खूप आवडता सिनेमा. कधी कधी फक्त इजाजतची गाणी पुन्हा पुन्हा ऐकत बसावंसं वाटतं..

सारी वादी भर गयी तर अफलातूनच

एकसो सोला चांद सी राते

कसली लाईन आहे..

संपूर्ण सिनेमा हा एका गाण्यासारखा चालत राहतो. प्रेक्षक त्या लयीत झुलत राहतो. रेल्वे स्टेशनवर नायक नायिका भेटण्याचा ही कल्पना सुंदर. पाऊस तर एक कॅरेक्टर होऊन येतो सिनेमात. कोरा कागज मधेही विजय आनंदने रेल्वे स्टेशनचा वापर केलाय,

लेख सुंदर झालाय.

नेहमी संध्याकाळी येणारी ही कातरता त्या दिवशी सिनेमाहून परत येताना मात्र टळटळीत दुपारी माझ्या सायकलवर डबलसीट बसून आली होती.>>>> केवळ कातिल....... सगळा लेखही....

मस्त लेख. माझा पण आवड्ता सिनेमा. रेखेचे पात्र मेन. अशी लोके खरीच होती ७० च्या द्शकात.
त्या माया सारख्या वेड्या मैत्रिणी. माया जीव द्यायचा प्रयत्न करते आणि म्हणते माझा आत्मा तुमच्या विमानाच्या जवळून गेला असता. आणि एका रात्री पुरते ते त्या वेटिंग रूमचे घर बनवितात ते तर ग्रेट. त्या नसीरुद्दीन च्या देहबोलीचे कितीतरी लोक अगदी पाहण्यातले होते तेव्हा. गाणी व पिक्चरायझेशन तर अप्रतिम. माया जाते तो सीन तर मी फार वेळा पाहिला आहे. असा पोएटिक जस्टिस मिळावा असे इतक्यांदा वाटलेय, पूछो मत. रेखाच आपल्याला सांगेल काय करायचे ते असे नसीर म्हणतो ते किती खरे वाट्ते.

खाली हाथ शाम आयी है
खाली हाथ जायेगी
आज भी ना आया कोइ
खाली लौट जायेगी

सन्ध्याकालि तर ह्या ओळी डोळयात पाणी आणतात.. आणि आपल्याला का रडू येतेय हे पण उमजत नाही...
गुलजार च्या प्रत्येक शब्दाला स्वताचे एक रंग - रुप तर आहेच, शिवाय भावना पण..
सुरेख लेख !!

मस्त लेख! Happy
माझाही खूप आवडता चित्रपट हा! गुलजा़रजींचे भक्त होण्यापलिकडे काहीही उरत नाही माझ्या हातात यानंतर.
मायासारखं प्रत्यक्षात कोणी असू शकेल का.. इतकं मोकळं आणि तरीही तितकंच गुंतलेलं.. तिचं कॅरॅक्टर कसलं युनिक तरीही अगदी आतपर्यन्त पोहोचणारं.. पटणारं! आणि मेरा कुछ सामान म्हणजे तर हॅट्स ऑफ!! या लेखासाठी तुम्हाला खूप धन्यवाद! Happy

अप्रतिम सुंदर!!

'ना कम ना ज्यादा' लिहिलंय तुम्ही, माधव! माझ्यामते बक्षीसपात्र Happy खूप खूप शुभेच्छा!

आणि, लिहित रहा!

मस्त ! इजाजत अतिशय आवडता चित्रपट. (पण नासिर ची व्यक्तिरेखा निर्दोष वाटत नाही जशी मासूम मधे पण वाटत नाही.) अनुराधा पटेलचं काम मात्र अप्रतिम झालं आहे. गाणी अफाट सुंदर आहेत.

माधव,
खुप खुप धन्यवाद माझ्या आवडत्या चित्रपटाविषयी लिहिल्याबद्दल.
त्यातल्या गाण्यांइतकंच सुंदर लिहिलत.

>>कुणी मला विचारले संध्याकाळची कातरता कशी असते तर क्षणाचाही विलंब न करता मी हे गाणे ऐकवेन. हे ऐकल्यावर जे वाटते तीच संध्याकाळची कातरता.

क्या बात है!
छान लिहीलय..

छानच लेख.
हा माझा आवडता अत्यंत चित्रपट... पण मला परत कधीही बघावासा वाटला नाही.. त्रास होईल बघताना, म्हणून.

सगळी गाणी अशक्य सुंदर आहेत.
>>
अगदी अगदी.

"मेरा कुछ सामान" तर खासच. पण त्यातला "एकसो सोला चांद" चा उल्लेख समजला नाही. सिनेमा पाहिला नाहीये मी. त्यात काही संदर्भ आहे का?

माधव,छान लिहिलेत,बरे झाले या सिनेमावर लिहिलेत. माझ्या मते हा गुलझारांचा सिनेमा. अशक्य कविता व कविवृत्तीची अशक्य माणसे.

का कोण जाणे मला त्याचा शोकात्म शेवट आवडत नाही. इतक्या समजूतदार रेखाने अजून थोडा दम काढला असता तर असे वाटते. अर्थात नियती/लेखक (की एकच दोघेही ) हेच उत्तर देऊ शकतात. शुभेच्छा.

अप्रतिम उतरलंय तुझ्या मनातलं Happy

नेहमी संध्याकाळी येणारी ही कातरता त्या दिवशी सिनेमाहून परत येताना मात्र टळटळीत दुपारी माझ्या सायकलवर डबलसीट बसून आली होती.>>>> क्या बात है!

ना कम ना ज्यादा' लिहिलंय तुम्ही, माधव! माझ्यामते बक्षीसपात्र >>> +१

तुझा हा लेख वाचल्यावर 'इजाजत' परत पहावासा वाटतोय.

निंबुडा,, या गाण्याचा अर्थ तो चित्रपट बघितल्या शिवाय नाही लागणार, नुसते गाणे नव्हे, तो पूर्ण चित्रपटच !

लौटा दो, म्हणजे काय.. ते पण तेव्हाच कळेल.

छान लेख आहे.
मी अजूनही 'इजाजत' पाहिला नाहीये Sad
लेट 'शिव्यांचा पाऊस' बिगिन Happy
(रच्याकने -- तुम्ही 'गरवारे' कॉलेजमधे होतात का?)

प्रचंड आवडता सिनेमा!! खरं म्हणजे मी फक्त गाणीच ऐकली होती आधी. माझी आई या सिनेमाची, गाण्यांची, रेखाच्या साड्यांची फॅन.. कायम ऐकत आले होते तिच्याकडून. Happy पण मी इजाजत पाहीला ५ वर्षांपुर्वी. प्रेमात पडले.. Happy
गाणी काय आहेत!? वॉव!

तुम्ही खरंच मस्त लिहीले आहे..

लेख मस्त .. आवडला ..

>> पण नासिर ची व्यक्तिरेखा निर्दोष वाटत नाही जशी मासूम मधे पण वाटत नाही

+१

केव्वळ अप्रतिम!!!!

खुप आवडता चित्रपट... कथानक, गाणी, दिग्दर्शन, रेखा, अनुराधा... सगळचं... जबरदस्त!!!

>>कुणी मला विचारले संध्याकाळची कातरता कशी असते तर क्षणाचाही विलंब न करता मी हे गाणे ऐकवेन. हे ऐकल्यावर जे वाटते तीच संध्याकाळची कातरता<<<< सुपर्ब!!!

ना कम ना ज्यादा' लिहिलंय तुम्ही, माधव! माझ्यामते बक्षीसपात्र >>> ++१

स्पर्धेसाठी खुप शुभेच्छा!! Happy

सुंदर लिहिलंय Happy

(दुर्दैवाने) इजाजत मोठ्या पडद्यावर पहायला मिळाला नाही मला (आणि आता मॅटिनी शोची पध्दतही मागे पडत चालली आहे.)
'मेरा कुछ सामान' हे गाणं, त्यातल्या शब्दयोजनेमुळेच बहुधा, मला सुरूवातीला मुळीच आवडल नव्हतं. तसंच अनुराधा पटेलची व्यक्तीरेखाही जरा अतीच स्वप्नाळू वाटली होती. अशी माणसंही असू शकतात, ते आता जरासं पटतं, पण तेव्हा मुळीच पटलं नव्हतं.
रेखा मात्र नेहमीप्रमाणेच एक नंबर !!

(अवांतर - 'कर्वे रोडचा उतार' या शब्दप्रयोगानंतर गरवारे कॉलेजचा विचार माझ्याही मनात आला Lol )

पण नासिर ची व्यक्तिरेखा निर्दोष वाटत नाही जशी मासूम मधे पण वाटत नाही >> कोणी लिहीले हे?
+ १००. आणि ती निर्दोष वाटायलाही नकोय हे मला आवडते.

मस्तच माधव.

करेक्ट, रैना... मासूम किंवा इजाजत - दोन्हीत नासिरच्या व्यक्तीरेखेचा प्रेक्षकांना जरासा राग येणंच अपेक्षित आहे. नायक कायम निर्दोषच असला पाहिजे, ही तद्दन बॉलिवूडी सवय वाटते मला.

Pages