विषय क्र. १ -- त्याची भीती, त्याचा करिष्मा

Submitted by संदीप चित्रे on 19 August, 2012 - 23:31

"सूअर के बच्चों!”

त्या सिनेमाच्या पडद्यावर तो पहिल्यांदा दिसतो तेव्हाच कानफटात मारल्यासारखे हे शब्दही आपल्या डोक्यात घुमतात. सिनेमा पहिल्यांदाच बघणारे एकदम खुर्चीत सावरून बसतात आणि लहान मुलं घाबरून आई-बापाचे हात घट्ट धरतात!!

तसं पाहिलं तर त्या सिनेमात तो प्रत्यक्ष पडद्यावर येतो तेच मुळात सिनेमा सुरू होऊन जवळपास दीड तासानंतर! मात्र तोपर्यंत त्याच्याबद्दलच्या नुसत्या संवांदातून त्याची दहशत जाणवायला लागलेली असते. थिएटरच्या काळ्यामिट्ट अंधारात असं वाटत राहतं की तो आपल्या आसपासच कुठेतरी वावरतोय. आपण त्याच्या नुसत्या अस्तित्वाच्या कल्पनेचंही दडपण घेतोय. सिनेमात त्याची पहिली ओळख होते ती "वो मशहूर डाकू?" ह्या साध्या प्रश्नाने. पण मग सिनेमाचं कथानक जसजसं वेग घेऊ लागतं तसतसं त्याचे क्रौर्य दिसू लागतं आणि त्याची दहशतही वाढायला लागते.

हिंदी सिनेमाच्या चाहत्यांनी त्याच्याआधी त्याच्यासारखा व्हिलन पाहिला नव्हता आणि कदाचित त्याची बरोबरी करणारा दुसरा व्हिलन होणारही नाही. खलनायकपदाच्या सर्वोच्च शिखरावर तो गेल्या तीन दशकाहूंन जास्त काळापासून आहे आणि तो अजरामर झालाय. व्यक्तिशः मला 'अग्निसाक्षी'च्या विश्वनाथमधे, 'चायना गेट'च्या जगीरामधे, आणि 'परिंदा'च्या अन्नामधे थोड्याफार प्रमाणात ‘त्याचा’ खुनशीपणा जाणवला. हां.. आणि अजून एकदा तो खुनशी थंडपणा जाणवला होता तो 'सत्ते पे सत्ता'तल्या बाबूच्या एन्ट्रीच्या वेळेला. पाठीतून भीती जाणवलेली अजूनही आठवतेय. (आणि बॉस..त्या एन्ट्रीतलंही आर. डी. बर्मनचे खत्तरनाक पार्श्वसंगीत!) बाकी 'शान'च्या शाकाल पासून ते 'मि. इंडिया'च्या मोगॅम्बोपर्यंत, 'कर्मा'च्या डॉ. डँगपासून ते अगदी आत्ता आत्ता 'दबंग'च्या छेदी सिंग किंवा 'सिंघम'च्या जयकांत शिक्रेपर्यंत कुणी म्हणजे कुणीच त्याची उंची गाठू शकलं नाहीये. दोनच उदाहरणं देतो म्हणजे खात्रीच पटेल!

पहिलं -- आत्तापर्यंत कुठल्याही सिनेमाचे फक्त संवाद इतके अजरामर झाले नाहीयेत की ज्याच्यामुळे ऑडियो रेकॉर्ड्स कंपनीने त्या संवादांची रेकॉर्ड काढलीये आणि त्या संवादातही खलनायकाच्या एन्ट्रीच्या प्रसंगातले संवाद सर्वात जास्त गाजलेत. शिवाय खलनायक इतका जास्त लोकप्रिय झालाय की त्याच भूमिकेवर आणि त्याच एन्ट्रीच्या प्रसंगावर बेतलेली चक्क बिस्कीटांची जाहिरात निघाली. बरं जाहिरात निघाली तर निघालीच पण सिनेमाच्या मध्यंतरात ती जाहिरात दाखवली जायची आणि बच्चेकंपनीपासून मोठ्या लोकांपर्यंत सगळे आवडीने ती जाहिरात बघायचे!

दुसरं -- अगदी आत्ताचं उदाहरण! काही दिवसांपूर्वी घरी बेसमेंटमधे प्रॉजेक्टरच्या मोठ्या पडद्यावर तो सिनेमा बघत होतो. बच्चेकंपनीत माझा मुलगा आणि भाचा असे दोघं होते. दोन्ही मुलं सात - साडेसात वर्षांची. त्यापैकी आमच्या चिरंजीवांचा तो सिनेमा तीन वेळा बघून झाला होता आणि आता ते चौथ्यांदा बघत होते. ह्या बाबतीत एकदम बापावर गेलाय! आमचा भाचा मात्र पहिल्यांदाच तो सिनेमा बघत होता. बेसमेंटच्या अंधारात त्या मोठ्या पडद्यावर 'तो' आला आणि आमच्या भाच्याने आपल्या बाबाचा हात घट्ट धरून ठेवला. बरं आमचा भाचा अगदी जन्मापासून सातेक वर्ष पुण्यात वाढलाय. त्यामुळे 'दबंग', 'सिंघम' वगैरे कधीच बघून झाले आहेत पण त्या व्हिलनच्या एन्ट्रीने मात्र त्याला नक्की हादरवलं होतं. खरंतर माझ्या मुलगा काय किंवा भाचा काय, त्या दोघांनाही सत्तरच्या दशकातले सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय इ. कुठलेही संदर्भ नाहीत. तरीही त्या खलनायकाला पडद्यावर बघताना ते टरकले ते थेट सत्तरच्या दशकातल्या प्रेक्षकांसारखेच!! अर्थात त्याची सिनेमातली एन्ट्रीच असली जब्बरी आहे ना भिडू की पूछो मत!

आपल्या डोळ्यांसमोर डोंगराळ भागातले मोठमोठे खडक दिसायला लागतात. सुरूवातीला कॅमेरा अशा कोनातून फिरत असतो की वाटतं जणू आपणच त्या डोंगराळ भागातल्या थोड्या खोलगट जागी आहोत आणि उंच मोठ्या खडकांकडे बघत आहोत. आपल्या कानांवर धीम्या चालीतल्या बुटांचा आवाज येतो -- खाड खाड खाड! पाठोपाठ मोठाल्या ढोल किंवा नगार्‍यावर ठाय लयीत टिपरी पडायला लागते. त्यापाठोपाठ सुरू होतं ते विचित्र आवाजात भेसूरपणे कुत्रं रडल्यासारखं पार्श्वसंगीत…ऊंsss..ऊंsss..ऊंsss..!! त्याचसुमारास दिसतात संपूर्ण पडदा व्यापून टाकत थोड्या छोट्या खडकावरून दुसर्या खडकावर चालत जाणारे त्याचे पाय! अक्षरश: पाय दिसतायत हं फक्त. पाय म्हणजे गुडघ्याच्या आसपासच्या भागापासून खालचा भाग.. बस्स. पैलेछूट नजरेत येते ती मिलिटरी ऑलिव ग्रीन रंगाची, पिदडून वापरलेली त्याची पँट आणि नजरेत खुपणारे दणकट काळे बूट. त्याचबरोबर नजर खिळवून ठेवतो तो पायांच्या जोडीने एखाद्या जहरी सापासारखा वळवळत, खडक घासत फिरणारा काडतुसांचा चामडी पट्टा! आधीच अंगावर येणार्या पार्श्वसंगीतात भर म्हणजे त्या पट्ट्याचे बक्कल खडकांवर आपटत गेल्यामुळे होत असलेला आवाज! ते दृष्य भन्नाट ... म्हणजे भन्नाटच, खंग्री, कडक, एक नंबर, बेस्ट, अल्टिमेट, केवळ, वाईट्ट, टोटल, विषय संपला… ह्यापैकी कुठलंही विशेषण वापरायचं! भावना पोचतातच!!

त्या दृष्यापासून पुढे मग त्याचा क्रूरपणा उलगडतच जातो. मगाशी म्हणालो तसं "सूअर के बच्चों" ह्या शब्दांबरोबर तो पडद्यावर पूर्ण दिसतो. स्वतःच्या दहशतीबद्दलचा माज दाखवत तो बोलायला लागतो. त्याच्या कपड्यांचंही डिटेलिंग इतकं नीट आहे की त्याच्या खांद्यावरची तुटकी कापडी पट्टीही आपल्या नजरेतून सुटत नाही. अट्टल डाकू कपड्यांच्या नीटनेटकेपणाकडे कशाला लक्ष देणार? संबंधच काय? त्याच्या खदखदून हसण्यातसुद्धा खुनशीपणा आहे. त्या चित्रपटाच्या दिग्दर्शकाचंही कौशल्य असं की पूर्ण सिनेमाभर आपण खलनायकाच्या एका वरचढ एक खुनशीपणामुळे, हलकटपणामुळे दचकत राहतो, चुकचुकत राहतो. सिनेमातली नाच-गाणी, रोमान्स, विनोदी प्रसंग हे सगळं बघत असतानाही मनाच्या कोपर्यात कुठे तरी वाटत असतं की तो कधीही, कुठूनही अचानक आपल्यासमोर येईल. लहान मुलांना जसं रात्रीच्या अंधारात भुताची गोष्ट सांगताना मधेच एकदम 'भ्भॉ!' केलं की ती दचकतात अक्षरश: तसेच आपणही दचकू असं वाटत राहतं!

वारकरी जसा वर्षातून एकदा वारी करतो तसे आपणही वर्ष-सहा महिन्यांतून एकदा(तरी) तो सिनेमा बघतोच. पण हा लेख वाचत असलेल्यांपैकी (मोजक्या) कुणालाही जर असा प्रश्न पडला असेल की हे नक्की कुणाचं पुराण आहे तर त्यांना 'गुगल' करण्यासाठी तरी त्याचं नाव सांगावंच आता! अजून दोन-चारशे वर्षांनंतर भारतीय संस्कृतीतल्या 'लार्जर दॅन लाईफ' अशा खलनायकांबद्दल जेव्हा कधीही गप्पा होत असतील तेव्हा त्यात चार नावं नक्की असतील -- रावण, दुर्योधन, कंस, आणि गब्बर सिंग!
----------------------------

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगला विषय निवडलाय. गब्बरसिंग ही अजरामर व्यक्तिरेखा आहे. याचं श्रेय अमजदखानच्या अभिनयाला आणि रमेश सिप्पींच्या दिग्दर्शनाला तसेच पटकथाकारालाही जातं. खूप विचार झालेला असणार या व्यक्तिरेखेवर ! शोलेचा यूएसपी गब्बर ठरला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अशीच किंवा जास्तच दहशत गर्दीश मधे मुकेश ऋषीने निर्माण केली होती.

सुंदर लेख....... आजकाल च्या चित्रपटामधे व्हिलन नावाचे पात्र विनोदी झालेले आहे......अमरीश पुरी, प्राण, रंजीत, अमजद खान अशी भारदस्त आवाजाची आणि व्यक्तीमत्वाची माणसेच उरली नाही आहेत...:( त्यातल्यात्यात ...संघर्श मधला आशुतोष राणा, फोर्स मधला विद्युत जामवाल, हे शेवट पर्यंत आवडले... सिंघम मधला जयकांत संपुर्ण चित्रपट खलनायक खुनशी दाखवला आहे...परंतु शेवटी त्याचा पण विनोदी शेवट केला आहे...
.
.
अवांतर :
आत्तापर्यंत कुठल्याही सिनेमाचे फक्त संवाद इतके अजरामर झाले नाहीयेत की ज्याच्यामुळे ऑडियो रेकॉर्ड्स कंपनीने त्या संवादांची रेकॉर्ड काढलीये......... "मैने प्यार किया" या चित्रपटाच्या संवादाची ऑडीओ कॅसेट आलेली होती..ती सुध्दा प्रचंड गाजलेली..:)

अश्विनी..............संघर्ष मधे काजोल कुठे आणलीस...?...:अओ:.......अक्षय आणि प्रिती होती........... काजोल आणि आशुतोष चा चित्रपट वेगळा ...त्यात काजोल चा डबल रोल आहे

खूप विचार झालेला असणार या व्यक्तिरेखेवर ! >>> अगदी !!

आवडलं. Happy

अनेक कानाकोपर्‍यातले, कुठले कुठले सिनेमे पाहिले, पण 'शोले' सिनेमा मी तसा बर्‍याच उशीरा पाहिला. पण पाहिला तो थिएटरमधेच. शाळकरी वयात मला पडद्यावरच्या मारधाडीची खूप भीती वाटायची. त्यामुळे त्याप्रकारचे सिनेमे टाळण्याकडेच माझा कल असायचा. Lol तरीही 'शोले' टाळला गेला नाही ते बरं झालं.
मुळात 'शोले'सारखे सिनेमे 'प्रत्येक पात्रासाठी एकेकदा' या प्रमाणात पहायचे असतात. पण तो गब्बरसाठीच किमान ३-४दा पाहणारे भरपूर रसिक असतील.

सही रे! जबरी!

काही शॉट्स मधे त्याच्या नजरेतून दिसलेले भाव खतरनाक होते:
- होळीच्या गाण्यानंतर "किराये के तट्टू" पकडून समोर उभे केल्यावर मान वळवून ठाकूर कडे बघतो तेव्हा
- "तुझे याद रख्खूंगा..." म्हणताना ठाकूर कडे बघतो तेव्हा
- शेवटी ठाकूरने भरपूर जखमी केल्यावर घाबरून त्याच्याकडे बघताना

अरे हा उदयन. तो कुठला सिनेमा काजोलचा डबल रोलवाला? तो मी पुर्णपणे टेन्शनमध्ये पाहिला होता. घरात असूनही सोफ्यावरुन पाणी प्यायलाही हलले नव्हते.

लेख आवडला. शोले हे अजब रसायन होतं. खुद्द सिप्पींनाही ते परत जमलं नाही. अमिताभ त्याच्या ब्लॉगवर मधूनमधून आठवणी काढत असतो शोलेच्या.

यातले कितीतरी प्रसंग लक्षात राहतात. गब्बर मुंगळा मारतो तो प्रसंग किंवा अमिताभच्या एक्सपर्ट कमेंट्स. 'तुम्हारा नाम क्या है बसंती?' Proud अमिताभला मारलं नसतं तरी चाललं असतं असं प्रत्येक वेळी बघताना वाटून जातं.

असं म्हणतात की 'डार्क नाईटचा' 'जोकर' (heath ledger) ऑलटाईम सुपर व्हिलन आहे म्हणून..
पण मला 'गब्बर' सगळ्यात बेस्ट वाटतो. (जोकर आवडत असूनही)
दोघांच्या फिलॉसॉफीत थोडासा फरक आहे.
'जोकर' ला फक्त विध्वंस हवाय, त्याच्या मते कुणी सुधरू शकत नाही. त्याला उंदरा-मांजराचा खेळ आवडतोय कारण त्याला त्याचे अनुयायी/विचार वाढवायचे आहेत. मग सगळ्याचाच विध्वंस सोपा.
गब्बरचं थोडं वेगळंच, 'गब्बर'च्या जुलमापासून वाचायचंय तर गब्बरंच मदत करु शकेल, दुसरा कुणीच नाही' ही त्याची भन्नाट फिलॉसॉफी! त्याला विध्वंस नकोय, फक्त भीती वाढवायचीये.
"यहाँसे पचास-पचास कोंस दूर...." असंला महान डायलॉग तो उगीच नाही म्हणत.

लेख आवडला.
गब्बर बद्दल काही सांगायला मिळालेल्या या संधीबद्दल धन्यवाद!

जो डर गया, सो मर गया........... गब्बर झिंदाबाद.........
सुर्रेख लिहिलंय......... गब्बर तो गब्बरच, असा पुन्हा होणे नाही......

@फारेएण्ड
अगदी बरोबर!
तू सांगितलेल्या दृष्यांमधे त्याच्या नजरेतले भाव बेष्ट!!

@अश्विनी के, ललिता-प्रीती
'दुष्मन'मधल्या आशुतोष राणाचा उल्लेख राहिला माझ्या लेखात Sad
तो सिनेमा पाहिल्यावर मलाही आयुष्यात पहिल्यांदा पोस्टमनची भीती वाटली होती!!
तसंच दुसरा उल्लेख राहिला तो 'दीवार - द वॉल' नावाच्या सिनेमातल्या के. के. मेननच्या अभिनयाचा.

@मंजूडी
हल्ली फारसा नसतो हे खरंय पण 'गाथा चित्रशती'च्या निमित्ताने लिहायला हुरूप आला आणि वेगवेगळे लेख वाचण्यातही मजा आहे.

@ट्यागो
>> असं म्हणतात की 'डार्क नाईटचा' 'जोकर' (heath ledger) ऑलटाईम सुपर व्हिलन आहे म्हणून..
असं म्हणणार्‍यांनी गब्बर पाहिलाय का हे पाहिलं पाहिजे Happy

@दीपांजली
येस्स! 'शोले' से बहुत याराना है, वो तो बचपनका दोस्त है Happy

हायला इथेही गब्बर.. अरे मी आजच शोलेवर लिहिले तेव्हाही डोक्यात हा गब्बरच सिनेमाचा हिरो आहे हे येत होते.. त्याचे सिनेमातले सारे हिट डायलॉग.. अर्थात सारेच डायलॉग इथे लिहिले ना तर त्याची लांबी या लेखाच्या पाचपट होईल.. आपण पामर काय लिहिणार यार या लोकांबद्दल.. पण लेख छानच.. आणि गब्बर नसता तर ती शोले संवादांची ऑडियो कॅसेट निघालीच नसती..

हा गब्बु चा चेहरा 'रामगढ कि चिटी' वाला (मुंगी चित्रात नाहीये पण पहा किती दुष्ट + मिष्किल नजर आहे :फिदी:)
sholay-Gabbar-Singh-th.jpg

हा गब्बु तेरा क्या होगा कालीया
gab.jpg

आणि हा वेड्या रागोवच्या शोलेचा नवा गब्बर पहा.. तो गब्बर कमी साईबाबा जास्तं वाटतोय !
amitabh.jpg

आणि हा वेड्या रागोवच्या शोलेचा नवा गब्बर पहा.. तो गब्बर कमी साईबाबा जास्तं वाटतोय !
>>
Rofl

पण तरी मला पुर्वीचे व्हिलन कॉमेडीच वाटायचे
इमॅजिन करा बर कसाबला सारख सारख "कसाब खुष हुवा" म्हणताना Proud
व्हिलन काय असे असतात का Proud
आताही काही चांगले व्हिलन नाहियेत म्हणा
पण मध्ये मोहनिश बहल जरा बरा व्हिलन होता
पण तो फॅमेली ड्रामातला व्हिलन होता. डाकू वैगेरे म्हणुन नाही
आता अर्जुन रामपाल आणि तो फोर्स मधला हे दोघच बरे व्हिलन्स अ‍ॅवेलेबल आहेत इंडस्ट्रीकडे.
जयकांत शिक्रेही छान होता पण व्हिलन म्हणुन त्याचा राग येत नाही
इथेच फ्लॉप गेला तो

जबरी लिहीले आहे. मला आपले उगीचच तुम्ही अमिताभशिवाय दुसर्‍या कोणावर लिहीलेच नसेल असं वाटत होते.. Proud वाचायला लागल्यावर कळले मग.. Happy

वर जोकरबद्दल लिहिलय. जोकर हा शुद्ध evil वाटतो आणि म्हणून कीथ लेजरची ती भूमिका अजरामर वाटते. तशी दुसरी व्यक्तिरेखा जंगलमधे सुशांत सेनची होती. pure evil.

गब्बर awesome वाटतो. Happy

जबरदस्त!!! छान लिहिलाय लेख... गब्बरच्या एंट्रीचा प्रसंग अगदी डोळ्यासमोर उभा राहिला.....

शोले इज ऑल टाईम फेवरेट!!

स्पर्धेसाठी शुभेच्छा!!!

अमिताभला मारलं नसतं तरी चाललं असतं असं प्रत्येक वेळी बघताना वाटून जातं.<<< ++ १

डिजे Lol

Pages