दसरा

Submitted by बागेश्री on 16 August, 2012 - 08:34

"आजवर तू किती स्पर्धा जिंकल्यास, वक्तृत्वाच्या?"

"अस्तील १७-१८, का गं"

"तुझ्या मते, वक्तृत्वात महत्त्वाचे काय?"

"बोलण्याची पद्धत, देहबोली, उभे राहण्याची पद्धत, शब्दफेक, उच्चार आणि आत्मविश्वास"

"अच्छा, म्हणाजे पूर्वतयारीला शून्य महत्त्व"

"अं... हो... म्हणजे, मी सांगितलेलं सगळं असेल तर, पूर्वतयारी काय मोठी गोष्ट?
तुला मागच्या महिन्यातलं माझं भाषण आठवतंय? माध्यम ग्रूपतर्फे आयोजित "आजच्या काळात संस्कार वर्गाची आवश्यकता" मला ८ तासांची अवधी दिली होती फक्त, आणि तब्बल पाच मिनीटांच भाषण करायचं होतं... पाठांतर, तयारी सगळं केलें निव्वळ ४ तासात..."

"हो, पण तू म्हणालीस, तुला ऐनवेळी काहीच सुचले नाही बोलायला"

"मग काय...ऐनेवेळी स्टेज वर काहीच आठवेना.. "

"अगं, पण ती ढाल काही ढापून आणली का, बक्षीसाची?"

"नाही गं....पण ७वीत असताना खरडून पाठ केलेलं "इंधन वाचवा, देश वाचवा" चे सगळे मुद्दे पोरांच्या संस्कारांना दिले चिकटवून...

"ऑ??, ते कसे?"

ऐक....

'जसे, नैसर्गिक खनिजांचा साठा उपसून काढून, काढून, पोखरून मानवाने पृथ्वीला उघडी बोडकी करून टाकली आहे, तशीच पाश्चिमात्य उघड्या वाघड्या संस्कृतीने आज, भारतीय संस्कारांना पोखरून टाकले आहे...'
हेsssssss टाळ्या पडल्या
मग काय...

आज इंधन वाचवले तर जसा देश वाचू शकतो, तसेच आज संस्कार घातले, तर उद्या आपल्याला वृद्धाश्रमात जाण्याची गरज न पडून घर वाचू शकते....

खाद्यपदार्थ तयार करताना पूर्वतयारी केली, गॅस सूरू न ठेवता, तर कसे इंधन वाचते...
व संस्कारवर्गात पोरांना घालू शकलो तर आई-बाबांची एनर्जी कशी वाचते...

एक ना अनेक
सूचले सूचले, सुचतच गेले...

जिल्हास्तरीय स्पर्धेचे दुसरे पारितोषिक आणले... तेव्हापासून तर खात्रीच झालीये... फक्त बोलण्यावर जिंकता येते, मुद्द्यांचा वाद नाही, थोडी फार विषयाची माहिती पाहिजे.... बास"

"चल मग"

"ओये, कुठे"

"वरच्या कलादालनात स्पर्धा सुरू आहे"

"_____"

"उत्स्फुर्त वक्तृत्व स्पर्धा"

"आज दाखवच मला बोलून आणि जिंकून"

"कबूल, पण हे बघ मला मोठे, गहन, चिंतनात्मक विषय आवडातात... टाईम्पास नाही"

"ते बघू, चल...."

__________________________________

कलादालन......

इन मीन ४० लोकं असतील..
मी तर हजारांसमोर ठोकलंय राव भाषण.. श्या.. चॅलेंज असेल तर मजा...

विषय मस्त मिळावा...
- देशात निवडणूका लढवल्या जाव्यात का?
- मी पंखा बोल्तोय
- कंप्यूटर मुळे मेंदूचा कमीत कमी वापर
- मंगळावर मानवाची वस्ती आढळल्यास पृथ्वीवरील पिण्याच्या पाण्याच्या समस्येचे निराकरण
- समुद्रात तेल जहाज उलटल्यावर, त्या पाण्याच्या बाष्पीभवनामुळे ओझोन वर दुष्परिणाम होतात की नाही?
- स्वच्छ बस स्टँड
- प्लॅस्टीकचे गुणसूत्र
- बोलण्याच्या उर्जेतून वीजनिर्मिती शक्य आहे/ नाही

असं काही खरमरीत पाहिजे, जोडा- जोडीही सोपी होते. साधे सूधे विषय नकोतच, आपल्या तोडीचेच हवेत...

अश्या सर्व विचारांत, माझे नाव पुकारले गेले..
म्हणजे, माझ्याही नकळत इथे आधीच कुणीतरी नाव देऊन ठेवले होते तर.. हिच्याकडे मी पाहिले तर मिष्कील हसली.. मी ही स्त्री ईर्षेने पेटल्याचा अविर्भाव आणत टेच्यात उठले...

काचेच्या सुंदर बाऊल मधून चिठ्ठी उचलली, त्यावर विषय असणार होता... विषय वाचल्यावर मला दोन मिनीटे मिळणार होती, भाषण जुळवा जुळव करायला.. मग २ मिनीटांचे व क्तृ त्व!!

मी चिठ्ठी वाचली आणि ८०-८२ काजवे चमकले असतील!

द स रा!!!

अरे गम्मत करता का एखाद्याच्या प्रतिभेची??
हा विषय आहे?
त्या निवडणूकांच काय, पंखा तर खड् खड् करत बंद पडला वाटतं, बाष्पीभवनाचे थेंब कपाळावर आलेत, बस स्टँड सुनसान दिसतंय, समुद्रावरचे तेलाचे तवंग डोळ्यात उमटलेत, माझीच गुणसूत्र बागडलीत की मी मंगळावर, पॄथ्वीच्या पाण्याची सोय पाहू आपली?

मघाची ईर्षा मागच्या दरवाजाने कधीच पळाली... आणि कुलकर्णी बाई म्हणाल्या, संपले दोन मिनीटे, कर सुरू भाषण!!!
संपले? सुरू कधी झाली होती, २ मिनीटे?

८० डोळे मला पहात होते... काजवेही पांगले होते आता...

आणि भाषणाला सुरूवात झाली- आता आर या पार!
उजव्या हाताच्या बोटाला धरून पुन्हा इर्षा उभी!!

अह्ह अह्ह्ह अहं (घसा खाकरला)

"_____
तर, (जणू फार मुत्सद्दी नेताच बोल्तोय)

दसर्‍याला रा व ण जाळतात. (समोर हशा, मला हुरूप, पुरेशे पॉझेस)

हो...............तशी प्रथा .......आहे..

(काही विसरलीस का बये?)

माननीय अध्यक्ष मयोदय आणि गुरूजन वर्गाच्या साक्षीने मी तुम्हा सार्‍यांसमोर हा प्रश्न उपस्थित करू इच्छिते, का जाळतात?
रावण, का.............. जाळतात?

दिवाळीसारखे अभ्यंगस्नान दसर्‍याला नसते, म्हणून?
की "आली माझ्या घरी ही दिवाळी" अशासारखे गाणे दसर्‍यासार्ख्या सणाला गात नाहीत म्हणून?
दसरा पावसाळ्यात नसतो म्हणून?
की जाळपोळ करण्याची वार्षिक हौस भागवावी म्हणून....

कारणे खुशाल काहीही असोत,
पण... आपण त्या निमित्ताने किती इंधन वाया घालवतो, ह्याचा कुणीही विचार केला नाही, करणार नाही

गेला तो रावण... दूष्ट प्रवृत्ती अश्या जळतात? नाही त्रिवार नाही!!!
त्या सद्भावनेने योग्य आचरणाने जाळाव्यात, इंधनाने नव्हे !

कारण...............

कारण, देशाची सद्य परिस्थिती पाहता, इंधनाचा साठा दिवसें दिवस कमीच होतो आहे, त्यात...... आपण पृथ्वीच्या गाभ्यातून इंधन उपसून तिला उघडी बोडखी करून पोखरून टाकली आहे, त्याचप्रकारे समाजातल्या दूष्ट प्रवृत्ती आपल्या समाजाला पोखरून टाकत आहेत...

खाद्यपदार्थ तयार करताना पूर्वतयारी केली, गॅस सूरू न ठेवता, तर कसे इंधन वाचते,
तसे काहीही पूर्वतयारी न करून रावण जाळलाच नाही तर सर्व इंधन वाचते.

म्हणजेच
जर इंधन वाचवल्याने देश वाचेल, तर रावण जाळल्याचे थांबवल्याने इंधन वाचेल...

हवेचे प्रदुषण वाचवा, अभ्यंग स्नान करा, दसर्‍याची गाणी गा, पण सरतेशेवटी इंधन वाचवण्याकडेच कल असू द्या.. हाच संदेश देत

(कुलकर्णी बाईंनी २ मिनीटे संपल्याची बेल मारली)

धन्यवाद!"

------------------------------------------------

वार्षिक स्नेहसंम्मेलनातील उत्स्फुर्त वक्तृत्त्वात पुन्हा दुसरा नं आला, हे सांगायला हवंय?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुन्हा एकदा
ललिताच्या अंगाने जाणारा विनोद Proud

इथे ललिता आणि विनोद यांचा उत्स्फूर्त संबंध लावल्यास वक्तृत्व स्पर्धा आयोजक जबाबदार राहणार नाहीत. Wink

(लिखाणाबाबत) अवांतरः विनोदी लेखनातल्या मानाने पंचेस कमी आहेत....

शुभेच्छा.....!!!!

थोडा अळणी वाट्तोय का ग ? पुन्हा विचार करून बघ..चांगला विषय आहे फक्त मांडणीने घोटाळा केला असावा...पुलेशु Happy

ओवी, भुंग्या, उकाका धन्यवाद
पंचेस कमी आहेत हे निर्विवाद कबूल आहे Happy
मीही कन्फ्युज्ड होते नक्की कुठे पोस्ट करू म्हणून.. द्विधेतून सुटकेसाठी आभार दोस्तहो!
ललित विभागात पोस्टलेय आता.
धन्सॉल Happy

ललिताच्या अंगाने जाणारा विनोद >> Lol

मला आवडले, माझ्या शाळेत असताना मी ही स्पर्धेत भाग घेत घ्यायचा म्हणून मला जास्त समजला आणि आवडला.
अभ्यंग Biggrin

पु. ले. शु.

छाने.. Happy