विषय क्र. १ - आम्ही तिघी आणि 'देवदास'

Submitted by बागेश्री on 14 August, 2012 - 02:24

"पिंके, आज ह्या साईड ने जाऊयात ट्युशन ला...."

"इकडनं??... का?"

"मला ते ऐश्वर्याचं तळहातावर दिवा धरलेला आणि त्याकडे एकटक ती बघत असलेली पोस्टर हवंच्चं आहे... तो ह्यासाईडला एक माणूस बसतो ना पोस्टर्स घेऊन त्याच्याकडे मिळेल नक्की"

"अगं पण लावणार कुठे, पल्लू? घरमालकिण बदडेल ना!!"

"कोण म्हणतंय लावायचंय"

"मग खर्च कशाला?"

"पिंके, तुला प्रश्नच फार पडतात, ठेवू फोल्ड करून... किंवा करू काहीतरी, पुट्ठ्यावर चिकटवून पुस्तकांच्या चळतीवर ठेवू... "

"नही पारो... तुम्हे तील तील जलते मै नही देख सकता... मुझे याद आती हो तूम मै जब जब सांस...

"पिंके, बास... एकदाच पाहिला तो चित्रपट अन संवाद पाठ झालेत... पुन्हा एकदा पाहिलाच पाहिजे..."

"पहिली गोष्ट- पॉकेट्मनी संपत आलीये मॅडम... आणि दुसरी- तोंडावर परिक्षा आलीये, तिसरी- स्वाती इथे नाही, तिला कळलं तिला सोडून पाहिला पिक्चर, तर गहजब... "

(पण माझं ऐकतंय कोण, मॅडम पोस्टर निवडण्यात मश्गूल)

"पिंके, कोणतं छान आहे?"

"ब्लॅक अ‍ॅंड व्हाईट"

"डन!! भय्या ये वाला देना ब्लॅक अ‍ॅंड व्हाईट, कितनेको? आणि पिंके, स्वाती टपकणार आहे सकाळीच उद्या "

----------------------------------------------------------------------------------------

मी: तुला वेड बिड लागलंय का???

स्वाती: "ए, ही अंगावर साप- बिप पडल्यासारखं काय ओरडतेय?"

पल्लू: नाही स्वाते, मलाही पिंकीचंच बरोबर वाटतंय

मी: मग काय... बये, ह्या उदगीर मधे सात नंतर मुली फिरताना फारश्या दिसत नाहीत, ज्या काही तुरळक दिसतात, त्या मेस वर जाणार्‍या येणार्‍या आपल्याच इन्जिनीअरिंग कॉलेजच्या...आणि पिक्चर कुठे पहायचा तर तो नव्या थियटर मधे.. पार उदगीरबाहेर! तो ही आणि लास्ट शो बघायचा??
बरं चल, केली हिम्मत, गेलोही.. परतून आल्यावर इकडे वर कसे येणार... आपल मेन गेट १० वाजता बंद होते... मरवायेगी तू!

पल्लू: पिंके सगळं बरोबर... आणि आपली ही ओपन टेरेस खोली, इथे पोहोचण्याचे पायर्‍यातले ग्रीलचे दारही बंद असणार! सर्व अडचणी असतीलच यार.... पण विचार कर हे असलं कॉलेज लाईफ पुन्हा मिळणार का, रात्रीचं मूव्ही पहाणं, वॉव कसलं थ्रिलींग असेल ते?

मी: आय नो.. मजा येईल.. म्हातारपणी नातू, पणतूंना सांगायला किस्सा ही मिळेल.. पण हा पोरकट्पणा नको करायला यार...
जाऊ-पाहू, पण दुपारचा शो पाहूयात ना येत्या रविवारी.. कारण शनिवारी 'सी प्लस' ची ट्यूशन पण संपेल, मग रविवार दुपार मोकळीच

स्वाती: अच्छा? तेव्हा येणार तू? सोमवार पासून पेपर्स आहेत! तू कसली येत्येस? आणि उद्यापासून आपण तर ब्वॉ फुल्ल ऑन अभ्यास, मी नाही येणार कुठे... आख्खी पी एल ह्या ट्यूशनमुळे इथेच लटकून काढली, घरी पण नाही गेलो... चला ना मूव्ही ला!

पल्लू: स्वाते, तू पण काय... येईल ती, कशी नाही येत.. पकडून घेऊन जाऊ! आज रात्री ११ चा शो डन.....

-------------------------------------------------------------------------------------

वय वेडं होतं... मनावर देवदास व्यापून होता...एकदा हा चित्रपट पाहून समाधान नव्हतं! आपल्यासाठी असं झुरणारं कुणी असावं, हे वाटणारं ते वेड होतं! संजय लीला भंसाळीच्या सादरीकरणाने, पारो, चंद्रमुखीने... श्रेया घोशालच्या आलापांनी धुंद केलें होतं...

असं होण अपार साहाजिक होतं... कारण तेव्हा निसर्ग आमच्यावर उदार होता नि ते वय......... वेडं होतं!

-------------------------------------------------------------------------------------

मी: काकूंना काय सांगितलंय आपण? घरी परत कसं येणार आहोत?

पल्लू: सांगितलंय, इकडे माझ्या नातेवाईकांच्या कडे जातोय, परतायला उशीर होईल... तर त्या म्हणाल्या संतोषला फोन करा, रात्री तो अभ्यास करत जागा असेल, तर तो दरवाजा उघडेल, बेल वाजवू नका... सोप्पंय!

मी: हुश्श, खरंच सोप्पंय.. संतोषला आपण पिक्चरला गेलो होतो, असं खरं सांगितलं तरी धोका नाही म्हणा.. काकूपर्यंत जायची नाहीच गोष्ट... तो आपल्याच कॉलेजात आहे आहे ना..!!

ह्या वाक्यावर थियेटर कडे भरधाव सुटलेल्या त्या रि़क्षात हशा पिकला...

संतोष!- घरमालकिणींचा मुलगा- आम्हाला कॉलेजमध्ये ज्युनिअर, त्याचं कॉलेजातलं 'ताजं, सुंदर, नाजूक गुपित' आम्हा तिघींनाही ठाऊक होतं! गुपितं असली की ती जपण्यासाठी पडती बाजू घ्यावी लागते, कित्येकदा.. आज त्याची पडती बाजू, आमची जमेची बाजू ठरली!

जेट विमान न चालवू शकल्याने जीवनावर असलेला सारा राग काढण्याच्या अविर्भावात ती रिक्षा थियेटरच्या आवारात शिरली...
अगदी तयारीने आलेल्या स्वातीने, त्याचे मोजके पैसे चुकते केले...

मी नि पल्लू तिकीट खिडकीकडे वळालो! आधीच महिना अखेर..! संपत आलेल्या पॉकेट्मनी मधली ही चैन जितकी चिंतादायी तितकीच रोमांचकारी वाटली.. पण काही क्षणच...
एक एक नजरा आमच्यावर स्थिरावत होत्या... मघासपासून फुललेले हास्य हळूच दबकत होते... कुजबूज होणारच होती... जिथे संध्याकाळी सात- आठ नंतर मुली घरात शिरलेल्या असतात, तिथे नव्याने उघडलेल्या ह्या चित्रपटगृहात लास्ट शो पहायला तीन पोरी'च' जमल्यात म्हणजे काय?

एकमेकींचा हात दाबून हिम्मत एकवटली गेली...

एक बांगडी असलेला हात तिकीट्घराच्या खिडकीतून पलिकडे डोकावताच, बाहेरच्या व्यक्तीचा चेहरा बघण्यास तिकीटविक्रेताही उठून उभा राहून, विचित्रसे हसून खाली बसला... मघासपासून त्याचा जाडा-भरडा "कितने टिकीट?" हा प्रश्न अचानक प्रेमभरा "कितsssने टिकीssssट?"असा आला... आणि

माझ्या कानाजवळ "पिंके, तुझं बरोबर होतं, नको काढूस तिकीट, चल रूमवर परत..."
"आता गप्प बस... आता आज मूव्ही पहायचाच, तू डर मत चंद्रमुखी..."

चित्रपट सुरू होईपर्यंत एका ठिकाणी घोळका केल्यासारखं उभे राहून गप्पा मारल्या... शो सुरू झाल्यावर पाच मिनीटांनी आत शिरलो आणि..

तीन तिकीटे घेऊन आम्ही मागून तिसर्‍या अशा रांगेत स्थानापन्न झालो.. अंधारात भिती वरमली.. कारण आता त्या नजरा फारशा दिसणार नव्हत्या... रूतणार नव्हत्या!

आणि शिरकाव झाला त्या मोहमयी दुनियेत!!! संजय लीला भंसाळींनी बखुबीने सजवलेली दुनिया!

भव्य दिव्य सेट... मोहक रंगसंगती.. रंगीत तावदानं..... बेंगॉली वातावरण... आणि खूप काही!!!

तब्बल दहा वर्षांनी सोनपूरच्या घरी, घर कसले भव्य राजवाडा जणू.... परतणारा श्री नारायण मुखर्जी- जमीनदारांचा सुपूत्र 'देवदास'!!

वयाच्या दहाव्या वर्षी आपल्याला सोडून गेलेल्या बालमित्राची वाट पहाणारी चक्रबोर्तींची कन्या- पार्वती चक्रबोर्ती!
मित्र लवकर परतावा म्हणून तिने 'अखंड' तेवत ठेवलेला दिवा... सारं विलक्षण... सुंदर! आता तिचे सुंदर युवतीत झालेले रुपांतर...
आणि तिची आर्त साद..

"मोरे पिया, अब आ जा रे मोरे पिया!!"
श्रेया घोशाल च्या मधाळ आवाजाने ही साद कातर होऊन चित्रपटगृहात झिरपत राहते... ऐश्वर्येचं रूप तितकच सुखद वाटत रहातं!!

इंग्लडला उच्च- शिक्षणासाठी गेलेल्या देवदासच्या परतण्याचा सोहळा तुम्हाला मुखर्जी- चक्रबोर्ती कुटुंबियातलाच एक सदस्य करून टाकतो...

इतक्या वर्षांनी परतूनही आई- वडील कुटुंबीय ह्यांपे़क्षा आधी 'लाडक्या पारो'ला भेटायला गेलेला देवदास, मैत्रीचं रुपांतर प्रेमात झाल्याची मूक कबूली देऊन जातो!!

मग एक एक संवाद..
एक एक पात्र आपलं काम चपखलपणे करत जातं.... करतच जातं!

उच्च- नीच समाज वर्गाच्या, अहंकाराच्या, पोक्त स्वाभिमानाच्या रेषा ह्या प्रेमी युगूलांत आडव्या न आल्या तर नवल...

ह्याची परिणती म्हणून पारोचे भलत्याच उमरावाशी होणारे लग्न आणि देवदासचा गृहत्याग!!

देवदासचे पारोला तिरमिरीत पत्र "आपल्यात कधीच प्रेम नव्हते" पण त्याच प्रेमात अखंड झुरणारा देव..
मिष्कील चुन्नीबाबूचा प्रवेश... आणि ज्या नीच समाजस्तरामुळे पारोला धुडकावण्यात येते.. त्याच वेश्यागृहात देवचा प्रवेश्...आणि दुसर्‍या रुपमवतीचा भव्य स्क्रीनवर प्रवेश....चंद्रमुखी!

एक तवायफचा रोल इतका रुबाब, आब राखत कुणी सादर करणे खरेच आव्हानात्मक असावे, सौदर्याला रूबाबाची झळाळी पाहून मन तृप्त न झाले तर आश्यर्यच!

आता,
"हम पे ये किसने हरा रंग डाला..."
सादर होताना माधुरीच्या अदाकारीने, कविताच्या चढत्या आवाजाने तो मुजरा अफाट सुंदर भासू लागतो....

चंद्रमुखीने देवच्या प्रेमात पडणे...
देवचं पारोवरचं प्रेम विसरण्यासाठी मद्याला आपले करणे...
आणि देव च्या आठवणीत पारोने तो दिवा तेवता ठेवणं...

सारे अगम्य... गुंतागूंतीचे पण चटका लावणारे!

------------------------------------------------------------------------

जगात ल़क्ष ल़क्ष माणसे आहेत... समाज आहे... त्याचे नियम आहेत.. आपण समाजाचा भाग असल्या कारणाने ते नियम आपल्यावर गारूड करून आहेत! अशावेळेस हृदयातील भावनांना समाज लीलया कूस्करून बेमालूम पुढे निघतो... तो चालतच असतो अशी असंख कलेवरं घेऊन, हे नव्याने जाणवले!

जगात ताठ मानेने रहायचे असेल, चांगलं जीवनमान हवे असेल तर इतके भावनिक असून चालत नाही- हा धडा नकळत गिरवल्या गेला....

दूपारपर्यंत, आपलाही कुणी देवदास असावा ह्या भावनेचं हसू आलं! कुणासाठी कुणी आयुष्यभर झुरून सोन्याचं जीणं मातीमोल का करून घ्यावे?

'जगणं" हे देणं आहे विधात्याचं.. ते पुरेपूर जगून, जगताना इतरांना जगवून त्याला फुलवावं... सुंदर करावं.. भावनातिरेकाने कुणी कुठल्याच पदाला पोहोचत नाही...

जगण्याचा राजमार्ग असताना, भावननेंच्या धूळभरल्या पाऊलवाटा धुंडाळत आयुष्याची माती का करावी? आयुष्यात समतोल महत्त्वाचा भावनेचा, वास्तवाचा.. हे नकळत बिंबलं.. मनावर... व्यक्तिमत्त्वावर!

---------------------------------------------------------------------------------------------
आम्ही तिघींनी चित्रपट अर्ध्यातच सोडायचं ठरवलं!
कारण नंतर रिक्षा मिळणार नाही.. आणि उशीरा लोकांच्या नजरा आणखी झेलाव्या लागतील म्हणून....

झटकन निघून, पटकन रि़क्षा करून.. घरी पोहोचून संतोषच्या कृपेने रात्री १२.४५ च्या आधीच, घरात प्रवेश करते झालो!!!

---------------------------------------------------------------------------------------------

ह्या धाडसात,
आम्हांला खरेतर कुठल्याच व्यक्तीकडून काहीच त्रास झाला नाही! पण मनच सतत खात होतं, म्हणून सुखरूप घरी पोहोचण्याकडेच कल होता! (तरी सोबत पर्समधे कटर घेऊन गेलो होतो, सेल्फ डिफेन्सच्या तयारीने)

घराबाहेर राहून इंजिनीयरींग करताना केलेले एकूलते एक धाडस, ते दडपले धपापते उर, आज 'देवदास' च्या निमित्ताने आठवले...

आम्ही तिघी लग्नानंतर तीन वेगळ्या ठिकाणी आहोत... पण भेटलो आणि हा विषय नाही निघाला असे होत नाही... आणि मग एकमेकांना उत्स्फुर्त टाळी देऊन डोळ्यात उतरलेली चमक साठवत, 'असं परत एकदा केले पाहिजे यार' म्हणत... आम्ही पुन्हा परततो......

-बागेश्री.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाचले. मस्त लिहिले आहे. तिकीट विकणार्‍याच्या आवाजातील फरक मजेशीर वाटला. असे होतेच.

मुलींना 'असे काही करणे' हे अजूनही साहसी वाटणे ही दुर्दैवी बाब आहे, पण ललितात म्हंटल्याप्रमाणे प्रत्यक्षात त्रास कोणाकडूनच झाला नाही याचा अर्थ असाही होतो की काही वेळा मनातील भय उगाचही असू शकते Happy

शुभेच्छा

"हम पे ये किसने हरा रंग डाला..."
सादर होताना माधुरीच्या अदाकारीने, श्रेयाच्या चढत्या आवाजाने तो मुजरा अफाट सुंदर भासू लागतो. >>>>>>>>>> आवाज कविता कृष्णमुर्तीचा आहे ...

धन्यवाद उदय, बदल केला आहे.

बेफिकीर,
परिस्थीती, जागा ह्या सर्वांचाही परिपाक असतोच की... ही घटना १० वर्षांपूर्वीची आहे... तेव्हा पुणे- मुंबईत असतो तर इतकी भिती नसती वाटली कदाचित! Happy

छान लिहिलयेस बागे !
देवदास मी फस्ट डे फस्ट शो पाहिला होता. ते ही शाळेला दांडी मारून!
पहिल्यांदाच पिक्चरसाठी शाळा वैगेरे बुडवली होती Wink
देवदास मला आवडला तो माधुरीसाठी, मग शाहरुख आणि मग ऐश्वर्या!
ऐश्वर्या मला आवडत नाही पण देवदास मध्ये आवडली होती. अर्थातच तिला माधुरी ची सर येणार नाही पण तरी ठिक आहे.

मस्त लिहीलेय आणि वेगळ्या पद्धतीने....!!
आवडेश.

( देवदास फक्त आणि फक्त ऐश्वर्याच्या डोळ्यांसाठी पाहिला. तिच्या डोळ्यातली व्याकुळता !!! दुसरं काही आवडलं असेल तर सेटस, रंग, संगीत आणि नृत्य )

ऐश्वर्या मला आवडत नाही पण देवदास मध्ये आवडली होती.>>>>>>>>>>>>> +१
माझ्या आजीने आम्हाला नेले होते चित्रपट पहायला. तिला दिलिप कुमारच्या देवदास ची आठवण म्हणुन हा मुवी बघायचा होता Happy
देवदास मधे मला आवडलं ते म्हणजे भन्साली, संगीत, श्रेया घोशाल, खास मार डाला - कविता कृष्णमुर्ती, किरन खेर आणि माधुरी.
ऐश्वर्या जेव्हा माधुरीच्या घरी माती घ्यायचं निमित्त करुन देवदासला शोधायला येते तेव्हाचा त्या दोघींमधला प्रसंग मस्तच.
चटका लावणाराच चित्रपट आहे खरा.

जगण्याचा राजमार्ग असताना, भावननेंच्या धूळभरल्या पाऊलवाटा धुंडाळत आयुष्याची माती का करावी? आयुष्यात समतोल महत्त्वाचा भावनेचा, वास्तवाचा.. हे नकळत बिंबलं.. मनावर... व्यक्तिमत्त्वावर ! >>>

चपखल निष्कर्ष बागेश्री...पण प्रेम नावाच्या मृगजळात अडकलेल्यांना चैन कहां आराम कहां!
यांनीच तर कथानकांच्या चौकटी पुरवल्या,दडपलेल्या जीवनांना विरंगुळा दिला.

शुभेच्छा.

बापरे, उदगीर मधे हे धाडस..तेही दहा वर्षांपूर्वी. महान आहात. नवीन टॉकीजला जाऊन शेवटचा शो पाहीलात. सा. दंडवत तुम्हाला.
(उदगीर आजोळ असल्यामूळे तिथलं एकूणच वातावरण माहीत आहे मला. मला तर उदगीरमधे माझ्या बहिणीनेही घराबाहेर पडू नये असे वाटत असे इतक्या त्या 'नजरा' तीव्र असत.)

देवदास चित्रपट माझा फारसा आवडीचा नाही... कदाचित मी शाहरुखचा चाहता असल्याने आणि देवदास या नायकप्रधान नाव असलेल्या चित्रपटात पारो आणि चंद्रमुखीच जास्त भाव खाऊन गेल्याने तसे झाले असावे..

पण अनुभव मात्र आवडला..

सांगलीला हॉस्टेलला असताना आम्ही रात्री जेवून लास्ट शो बघायला जायचो.. तेव्हा आधीचा शो बघून बाहेर पडणार्‍या मुलींना बघून हळहळायचो की हे काय, आम्ही आलो आणि तुम्ही चाललात.. पण त्यांनी लास्ट शो बघायचा प्रश्नच नव्हता आणि आम्ही सुद्धा लास्ट शो बघण्यातच धन्यता मानणारी जमात त्यामुळे एकत्र चित्रपट बघायचा हा योग कधी जुळून आला नाही..

असो, आठवणींना जागवल्याबद्दल धन्यवाद... सुरेख शब्दबद्ध केले.. डोळ्यासमोर चित्र उभे राहिले.. स्पर्धेसाठी शुभेच्छा आहेतच.. Happy

मस्त लिहीलंय... आम्ही चार मैत्रिणी 'भूत' सिनेमाचा ९चा शो बघायला गेलो होतो. पण तिथे सगळेच घाबरलेले होते त्यामुळे आम्हाला कोणाची 'तशी' भीती वाटली नाही. Wink

ओह! म्हणजे उदगीर मधे दहा वर्षांपूर्वी त्या शो च्या वेळेस बघितलेल्या तिघिंपैकी एक तू होती तर. तरीच तुझा चेहरा ओळखीचा वाटत होता Happy

Mast!

मस्त!मस्त!!मस्त!!!
खूप मस्तं लिहिलंयस..
नवीन 'देवदास' नव्हताच आवडला.. पण तुम्हा तिघींची जंमत खूप आवडली.. Happy

मस्त लिहीलय बागेश्री Happy

नवीन 'देवदास' नव्हताच आवडला.. पण तुम्हा तिघींची जंमत खूप आवडली..<<< + १

सिनेमा पाहिला नव्हता मी.. पण शेप आवडला म्हणुन दोन दिवे गाडगीळांकडुनन घेतले तर त्याचे नांव 'देवदास दिवा' असे सांगितले होते Lol

स्पर्धेसाठी शुभेच्छा!!

छान लिहिलंय. आवडलं. Happy

(या स्पर्धेच्या निमित्ताने अनेक मंडळी लिहिती झाली आहेत, हे आवडलं. चित्रपट आपल्याला किती जवळचा वाटतो त्याचं हे एक द्योतक म्हणता येईल.)

मनःपूर्वक आभारी आहे दोस्तहो!

खरे तर, स्पर्धेच्या इर्षेने लिहीलेच नाही आहे, मिवाची विपू आली आणि 'चित्रपटाची निगडीत असलेला हा किस्सा' पटकन स्मरला...
ह्या स्पर्धेच्या निमित्ताने तो शब्दबद्ध झाला, इतकेच काय ते!

अनेक नव्या आयडींनीही वाचून इथे प्रतिसाद दिलाय ते पाहून आनंद झाला खूप!
लोभ असावा Happy

बागेश्री,
आम्ही असलेच धाडस " खलनायक" च्या वेळी केले होते ( रात्रीचा शो नाही, पण तेव्हा तो A grade जाहीर केला होता सिनेमा, सन्जु बाबा चे प्रताप इ. कारणानी विरोध होता त्या चित्रपटाला).
हॉस्टेलला रहायचो, परत आल्यावर रेक्टरबाई वाटच पहात बसल्या होत्या दारात! (कोणीतरी चहाडी केली )
घरून पत्र वगेरे आणावे लागले होते त्यावेळी Sad

आत्ता हसू येते, पण तेव्हा वाट लागली होती!

Pages