पिशाच्च होवुनी मला पछाडतात त्या स्मृती!

Submitted by सतीश देवपूरकर on 8 August, 2012 - 08:52

गझल
पिशाच्च होवुनी मला पछाडतात त्या स्मृती!
तनामनास सारख्या सतावतात त्या स्मृती!!

तमात जीवनातल्या लकाकल्या विजा तुझ्या;
अजून तारकांपरी खुणावतात त्या स्मृती!

झुळूक कोवळी, तिच्या कवेत फूल लाजरे!
तुझा सुवास दाटता मधाळतात त्या स्मृती!!

असेल ऊन्ह मस्तकी, उरात सावली तुझी!
उन्हातल्या सरींपरी, सुखावतात त्या स्मृती!!

कळे न स्वप्न कोणते, पहात जाग ये जिवा?
उजाडताच भोवती दवारतात त्या स्मृती!

असे नव्हे न राहिले, उरात शल्य कालचे;
धकाधकीत रोजच्या मवाळतात त्या स्मृती!

नकारतोस तू कसा? तुझाच भूतकाळ हा!
क्षणोक्षणी पहा तुला पुकारतात त्या स्मृती!!

तुझीच पावले जिथे तिथे पथात पाहिली;
सुन्या पथास पाहता दुखावतात त्या स्मृती!

कुठून अन् कशी करू तयार उत्तरे तरी?
सवाल रोज वेगळा विचारतात त्या स्मृती!

न हालचाल एकही, न लाट वा तरंगही;
अशा कशा मनामधे उफाळतात त्या स्मृती?

कळे न छेडली कुणी सतार काळजातली?
नसानसातुनी पुन्हा निनादतात त्या स्मृती!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे कुठले वृत्त?????? रावणाचे शिव तांडव स्तोत्र या छंदात आहे असे वाटते.

जटाटवीगलज्जलप्रवाहपावितस्थले,

गलेऽवलम्ब्यलम्बितां भुजङ्गतुङ्गमालिकाम्‌।

डमड्डमड्डमड्डमन्निनादवड्डमर्वयं,

चकारचण्डताण्डवं तनोतु नः शिवो शिवम्‌ ॥१॥

नकारतोस तू कसा? तुझाच भूतकाळ हा!
क्षणोक्षणी पहा तुला पुकारतात त्या स्मृती!!

कळे न छेडली कुणी सतार काळजातली?
नसानसातुनी पुन्हा निनादतात त्या स्मृती!

>>>>>>>>>>>हे दोन खूप सहज् सुन्दर झालेत सर मस्त
बाकीचे शेरही छान आहेत
__________________

कुठून अन् कशी करू तयार उत्तरे तरी?
सवाल रोज वेगळा विचारतात त्या स्मृती!>>>>>>>>>>>>
यावरून माझा स्वप्नभोळ्या मनाने दुपारू नये ....मधील एक शेर सहज आठवला

उत्तरे मागता...... उत्तरे मगती
प्रश्न त्या माणसांना विचारू नये

धन्यवाद !!

शेळीजी! वृत्ताचे नाव माहीत नाही. मी ठरवून वृत्त निवडत नाही. जसा मिसरा ओठावर येतो, ती लय पकडून, जर माझ्या पांडुरंगाने परवानगी दिली तर पुढील मिसरे त्या लयीत लिहितो. ट्यूबलाईट (लेखणीची) डीम झाली की, ती गझल सद्ध्यापुरती झाली, असे समजतो व रचना बरी वाटली तर ती इथे पोस्ट करतो.
प्रतिसादांची संख्या व गुणवत्ता यांचा विचार करत नाही, कारण मी काय लिहितो आहे, याची मला पूर्ण खात्री व जाणीव असते. खराब लिखाण वाटले, तर मी ते कागदावर उतरवतच नाही. मनातच त्याला डच्चू देतो. माझा आतला आवज मला योग्य तो सिग्नल देतो!
.........प्रा.सतीश देवपूरकर

देवसर मी आपल्याशी सहमत आहे
इतरान्कडे जास्त लक्ष देवू नका तुम्ही लिहीत रहा व प्रकाशित करत रहा
आम्हाला त्यातून जितका आनद मिळवता येईल तितका आम्ही मिळवूच ते काम आमच्यावर सोपवा ............तुम्ही लिहीत रहा व प्रकाशित करत रहा !

आपला नम्र
वै व कु

तमात जीवनातल्या लकाकल्या विजा तझ्या;>>>तुझ्या असे करावे
असेल ऊन्ह मस्तकी>>>>>>लगा लगा लगा लगा चे लगा लगा गागा लगा ..............................असे झाले आहे काय तपासावे
(ऊन्ह चे ऊन असे केले तर बरोबर ठरेल का ?)

ऊन बरोबर होईल.

गझल अगदी लयबद्ध झाली आहे.

http://www.youtube.com/watch?v=ZZ-WoPkxpTA&feature=related शेर या चालीत म्हणुन बघा.

लगालगा लगालगा लगालगा लगालगा ६ गुणिले ४ बरोबर २४ मात्रा.

हे कलिंदनंदिनी वृत्त ... तुमच्या दोस्तांनीही वापरले आहे. Happy

http://gangadharmute.wordpress.com/2011/03/02/laga/

मस्त गझल. Happy

तमात जीवनातल्या लकाकल्या विजा तझ्या; --------- इथे तुझ्या असे असावे(टायपो??)
अजून तारकांपरी खुणावतात त्या स्मृती!

असे नव्हे न राहिले, उरात शल्य कालचे; --------- इथे कहीतरी खटकते (????)
धकाधकीत रोजच्या मवाळतात त्या स्मृती!

कळे न स्वप्न कोणते, पहात जाग ये जिवा?
उजाडताच भोवती दवारतात त्या स्मृती! ......... छान.

प्रा.महोदय ..............मला एक गोष्ट अज्जिब्बात न्नाही आवडली..........
अहो काय हे वैवकु,शेळी ,सुधाकर, अशा चिल्ल्या-पिल्ल्यान्नी तुम्हाला सुधारणा सुचवाव्यात हे काही मला पटत नाहीये बुवा
ही वेळ यावी तुमच्यावर ?.छी!!
पुढच्यावेळी योग्य ती काळ्जी घ्यालच ही अपेक्षा!!!

आपला
क्ष.य.ज्ञ.

क्ष.य.ज्ञजी! आपल्या आवडीनिवडी, चोचले इत्यादिंचा मी आदर करतो.
चांगल्या व वाजवी सुचवण्या असतील तर मी त्यांचे स्वागतच करतो, मग त्या कुणीही केलेल्या असो, अगदी तुम्ही सुद्धा! शेंबड्या पोराचे पण काही चांगले असेल तर तेही मी स्वीकारतो!
..........प्रा.सतीश देवपूरकर

सतीशजी,
कुठून अन् कशी करू तयार उत्तरे तरी?
सवाल रोज वेगळा विचारतात त्या स्मृती!.
मस्त..
कळे न छेडली कुणी सतार काळजातली?
नसानसातुनी पुन्हा निनादतात त्या स्मृती!..
सुंदर..
गझल मस्तच आहे..

अवांतर :
@ वैवकु,
तमात जीवनातल्या लकाकल्या विजा तझ्या;>>>तुझ्या असे करावे
असेल ऊन्ह मस्तकी>>>>>>लगा लगा लगा लगा चे लगा लगा गागा लगा ..............................असे झाले आहे काय तपासावे
(ऊन्ह चे ऊन असे केले तर बरोबर ठरेल का ?) ===>>>

'ऊन्ह' लिहा किंवा 'ऊन' लिहा दोन्ही प्रकारे ते वृत्तात बसते आहे...कारण दोन्हींची लगावली 'गाल' अशीच होईल..( वै.म. चुभूद्याघ्या वगैरे आहेच )

छानच