काळ नाही, वेळ नाही, वाट नुसती पाहतो!

Submitted by सतीश देवपूरकर on 6 August, 2012 - 11:54

गझल
काळ नाही, वेळ नाही, वाट नुसती पाहतो!
मी अहोरात्री तुझ्या स्मरणात नुसता तेवतो!!

माझिया वाट्यास कोणी जात नाही शक्यतो;
मी फुलांच्या भोवती काट्यांप्रमाणे राहतो!

आग शेजारी तरीही लोक सारे थंड का?
दूर रानातील वणवा काळजाला पोळतो!

आसवे ढाळायलाही वाचले नाही कुणी;
कोण जाणे, कोण भरपाई कशाची मागतो?

फोडला टाहो न साधा हुंदका सुद्धा दिला;
हे मला ठाऊक की, मी काय आहे सोसतो!

आजही प्रत्येक घटना आठवे घडली कशी;
जीवनाचा आजही आलेख मी रेखाटतो!

जाहली पडझड कितीदा, भंगली स्वप्ने तरी;
रोज स्वप्नांचे नवे प्रासाद आता बांधतो!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर ..आपली ही गझल नेहमीप्रमाणे खासच आवडली. परंतू एक प्रश्न - काफियाची आलामत संभाळली गेली नाही, त्याचे काय? की असे एखाद्या प्रकारच्या गझलेत चालते?

ही एक गैरमुरद्दफ गझल आहे. म्हणजे फक्त काफिये आहेत. रदीफ नाही.
काफियातली अलामत इथे अकारान्ती आहे, जी सर्व शेरांत पाळली गेलेली आहे.