मी मिथिला ...

Submitted by मिथिला on 3 August, 2012 - 14:08

असे म्हणतात की देव आपल्या भक्तांची परीक्षा घेतो.. पण मी गेल्या काही दिवसांत कट्टर नास्तिक झाले होते.. आणि तरीही तो माझी कसली परीक्षा घेत होता देवच जाणे. तेही आयुष्याच्या एका महत्वाच्या टप्प्यावर.. निर्णय घेऊ तरी कशी घेऊ.. कुठल्यातरी सिनेमात पाहिले होते की अश्यावेळी डोळे बंद करायचे, विचार शून्य करायचे, आणि ज्याचा चेहरा डोळ्यासमोर येईल तोच आपला जोडीदार. पण डोळे बंद करायला देखील भिती वाटत होती. कारण ज्याचा चेहरा डोळ्यासमोर यावा असे वाटत होते.. तो आलाच नसता तर.. तर.... माझ्या मनात कोणीतरी होते तर... मग गरजच काय होती निर्णय घ्यायची... पण हे प्रेमाचे गणित एवढे सोपे असते तर मग प्रश्नच नव्हता ना.. याचा एखादा असा फॉर्म्युला नसतो पण उत्तर मात्र अचूकच शोधायचे असते.. कारण आयुष्य डावावर लागलेले असते.. दोघांचेही... तर कधी कधी तिघांचेही..

-..-..--..-..--..-.. --..-..--..-..--..-..--..-..--..-..--..-..--..-..--..-..--..-..---..-..--..-..--..-..--..-..--..-..-
-..-..--..-..--..-.. --..-..--..-..--..-..--..-..--..-..--..-..--..-..--..-..--..-..---..-..--..-..--..-..--..-..--..-..-
-..-..--..-..--..-.. --..-..--..-..--..-..--..-..--..-..--..-..--..-..--..-..--..-..---..-..--..-..--..-..--..-..--..-..-

रोहनला माझ्या आयुष्यातून वजा करून एक काळ लोटला होता. त्याच्या आठवणी आता स्मृतीतून झपाट्याने नाहिश्या होत होत्या. मनाच्या कुठल्या कोपर्‍यात त्यांना कोंडून ठेवले होते त्याचा पत्ता देखील विसरले होते. यावर्षी या सार्‍याला परवानगीही नव्हती.. मुळीच नव्हती.. इंजिनिअरींगचे शेवटचे वर्ष होते. मागचे वर्ष फुकट जाता जाता वाचले होते. खरे तर, रोहनशी वेगळे होण्याचे दु:ख असे फारसे झाले नव्हते, पण माझ्या आयुष्यातील दोन वर्षे मी रोहनसारख्या मुलाबरोबर फुकट घालवली याचे शल्य बोचत होते. माझ्या मैत्रीणींना देखील तो कधीच आवडला नव्हता. पण प्रेम आंधळे असते असे म्हणतात ते यालाच बहुतेक. त्याच्या अहंकारी स्वभावाला मी नेहमी त्याचा पॉजिटीव्ह अ‍ॅटीट्यूड समजण्याची चूक केली होती. स्मिताला देखील त्याच्यात रस होता, पण रोहन मला मिळाला म्हणून ती माझे त्याच्याविरुद्ध कान भरत आहे अश्या गैरसमजातून तिला देखील भर कॅंन्टीनमध्ये भलेबुरे सुनावले होते. आयुष्यात नशीबानेच अशी एखादी मैत्रीण मिळते, पण रोहनच्या प्रेमात वेडे झालेली मी तिला कायमची गमावून बसले होते. प्रेम केवळ माणसाला आंधळेच नाही तर हलक्या कानाचे देखील करते हे का नाही कुठल्या पुस्तकात लिहीलेले. हाच आहे आपल्या आयुष्याचा जोडीदार, आपला मिस्टर परफेक्ट असे समजून घरच्यांशी सुद्धा भांडले होते. त्रास या सार्‍याचा होत होता.. राग स्वताचा येत होता.. त्याचा नाही.. तो आधीपासून तसाच होता, पुढेही तसाच राहणार होता, त्याने आपला स्वभाव माझ्यापासून ना कधी लपवला होता, ना मला फसवले होते. चूक तर माझीच झाली होती.. त्याला ओळखण्यात.. त्याला समजण्यात.. त्यामुळे सावरायला जड जात होते.. आणि कुणाल नसता तर... तर कदाचित आजही मी त्याच कडवट आठवणींमध्ये अडकून पडले असते.

कुणालची आणि माझी ओळख गेल्याच वर्षीची. जेव्हा रोहनपासून मी वेगळी झाले त्याच सुमारास कुणाल माझ्या आयुष्यात आला. कुणाल नसता तर रोहन प्रकरणातून मला एवढ्या लवकर बाहेर पडता आले नसते. सर्वांपासून वेगळी आणि अलिप्त राहू लागले होते मी. लेक्चरला बसायचे म्हणून बसायची पण लक्ष समोरच्या फळ्यावर नसून कुठेतरी भूतकाळाच्या पटलावर लागलेले असायचे. अभ्यास करायला पुस्तक घ्यायचे तर तासनतास एकच पान बघत बसायची, भानावर यायची तेव्हा त्याच पुस्तकावर डोके ठेऊन रडत बसायची. माझ्या आयुष्याची अशी वाट लावणारा मात्र कुठेतरी आपल्या आयुष्यात खूष असेल, जिथे आपल्याला साधे त्याच्या आठवणीतदेखील स्थान नसेल ही जाणीवच मला क्षणाक्षणाला मारून टाकायची. अश्यातच कुणालच्या रुपाने मला एक फिलॉसॉफर, एक सच्चा मित्र मिळाला होता. कोणीतरी वापरून सोडलेली मुलगी आहे, एकटी आहे, आधाराची गरज आहे, आता आपला चान्स आहे, असे भाव त्याच्या नजरेत कधीच नव्हते. म्हणून तो सार्‍यांपेक्षा वेगळा होता. त्याच्या सहवासात घालवलेला काळ मला वेगाने रोहनच्या आठवणींपासून दूर घेऊन जायचा. गेल्यावर्षी त्याच्याच जोडीने अभ्यास करून मी माझे सारे विषय सोडवले होते.

कुणाल तसा फारसा हुशार नव्हता. पण कमालीचा सिन्सिअर होता. कॉलेजला आपण येतो ते फक्त अभ्यास आणि अभ्यास करायला, आणि हाच एक मार्ग आहे इंजिनिअरींगची वर्षाची पंचवीस हजार रुपयांची फी वसूल करायचा यावर त्याचा ठाम विश्वास होता. त्याचे इतर मित्र त्याला रोबोट बोलायचे, कारण एकदा त्याने अभ्यास करायला पुस्तकात डोके खुपसले की खुपसले, मग ते ना डावीकडे हलायचे ना उजवीकडे. तसा तब्येतीचा विचार करता चांगल्या पिळदार शरीराचा होता पण हालचाल मात्र पुन्हा रोबोटसारखीच. लवचिकता हा प्रकार फक्त सापांमध्येच असतो, माणसांनी नेहमी ताठ शरीरानेच वावरले पाहिजे असा त्याचा समज असावा. खरे तर माझ्यासारख्या एकेकाळच्या हॅपी गो लकी मुलीचा कुणालसारखा मुलगा मित्र होणे कधी शक्य झाले नसते. पण मिथिला आता पहिल्याची मिथिला राहिली नव्हती. जिच्या श्वासातूनही नेहमी संगीताचे सूरच बाहेर पडायचे तिला हल्ली गाणे गुणगुणायला देखील भिती वाटू लागली होती की न जाणे गळ्यातून दर्दभरे नगमेच बाहेर पडावेत आणि जखमेला पुन्हा पाणी सुटावे. पण कुणाल गायचा.. फक्त माझ्यासाठी गायचा.. गळा मूळचा गोड असूनही केवळ संकोची वृत्तीने आखडते घेणारा, आम्ही दोघेच असताना माझ्या फर्माईशीवर मस्त सुटायचा. कुठेतरी त्याच्यात लपलेले एक वेगळे व्यक्तीमत्व माझ्यासमोर बाहेर यायचे. हा कुणाल कोणाच्याच ओळखीचा नव्हता जो मला माहीत होता, जो मला समजला होता.

आयुष्यात एक बॅड पॅच आला होता, ज्यातून मी आता बाहेर पडले होते. सभोवतालचे वातावरण पहिल्यासारखे आल्हाददायक वाटत नसले तरी क्लेशकारक नव्हते. आयुष्य ही एक चोवीस तासांची ड्यूटी आहे असे समजून मी जगत होते. सकाळी लवकर उठून कॉलेजला यायचे, एकही लेक्चर न बुडवता सारे अटेंड करायचे, जर चुकुन एखादा ऑफ पिरीअड मिळालाच तर जर्नल, ट्यूटोरीअल पूर्ण करत लायब्ररीमध्ये बसायचे. संध्याकाळी पाच वाजता घरी जायचे. जर शेवटचा तास होणार नसेल तर परत लायब्ररीत जायचे किंवा इथेतिथे कुठलाच टाईमपास न करता थेट घर गाठायचे..... जसे एखाद्याला वाचायला देखील हे सारे कंटाळवाणे वाटत असेल अगदी तसेच कंटाळवाणे आयुष्य मी जगत होते. आणि कालपर्यंत माझ्या या नीरस आयुष्याचा सर्वोत्तम भाग होता तो कुणाल.... हो कालपर्यंत.... कारण आजपासून माझे आयुष्य बदलणार होते. आणि याची चाहूल मला आज त्याला पाहताच लागली होती.

आजही नेहमीसारखेच लवकर कॉलेजला पोहोचले. तसे आमच्या क्लासमधील बरीच मुले लवकर येतात, काही महाभाग तर तास-तास आधीही येतात. पण ते सारे आपापला ग्रूप बनवून कॅंटीन किंवा जिमखान्यामध्ये पडलेले असतात. लेक्चर सुरू होऊन दहा-पंधरा मिनिटे झाली की मग त्यातील एकेक चेहरे उगवू लागतात. त्यामुळे क्लासमध्ये शिरणारी पहिली शक्यतो मीच असते. आजही नेहमीप्रमाणे क्लास रिकामा असेल असे वाटले होते, पण अंदाज चुकला. आधीच कोणीतरी तिथे येऊन बसला होता. तेही सरांच्या खुर्चीवर.. कोण असावा बरे..? नवीन एखादे सर तर नक्कीच नसावेत. चेहर्‍यावरून तर पोरसवदा वाटत होता. माझ्याकडेच रोखून बघत होता. अर्थात दुसरे होते कोण वर्गात.. काय करावे..? त्याच्याकडे बघून हसावे, तो कोण आहे याची चौकशी करावी की सरळ दुर्लक्ष करावे.. या विचारात असताना तोच माझ्याकडे बघून हसला..

"नवीन स्टुडंट का..??"

अंह.... हे मी नाही म्हणाले, तर त्यानेच हे मला विचारले. मला जरा आश्चर्यच वाटले. माझ्याच वर्गात येऊन हा खुशाल मलाच नवीन स्टुडंट बोलत आहे.

"कोण मी? की तू..? आय मीन तुम्ही..??" काय माहीत स्टाफचा देखील असावा म्हणून मी त्याला आदरार्थी संबोधले.

"हो मी नवीन आहे." तो उत्तरला, "पण स्टुडंट नाही, असिस्टंट लेक्चरर.. तुझ्या चेहर्‍यावर हाच प्रश्न दिसत होता, पण तू विचारत नव्हतीस म्हणून म्हटले, चला आपणच विचारूया." आणि हसायला लागला.. उगाचच.. ही जरा वेगळीच केस आहे हे तेव्हाच समजले.

"नाव काय तुझे?" त्यांनी विचारले,

"मी... मी मिथिला..!! मिथिला जोशी.. आणि आपले नाव?"

"आपल्यात सर कोण आहे?"

त्यांच्या या पवित्र्याने मी भांबावलेच, तरीही शांतपणे उत्तरले, "आपण सर"

"आणि स्टुडंट कोण आहे?"

"मी..."

"मग प्रश्न कोण कोणाला विचारणार...?"

हाह...! प्रश्न..?? काय एवढे प्रश्न विचारणार होते मी त्यांना.. आपले नाव आणि शिकवायचा विषय बस्स.. तरीही उगाच आपण उद्धटपणा करायला नको, काय माहीत कदाचित यांच्याच हातात आपले या वर्षाचे टर्मवर्कचे मार्क असायचे, उगाच आपल्याबद्दल मनात राग धरायला नको.

"कुठे राहतेस?"

आता याच्याशी यांना काय घेणे देणे होते.. तरीही शक्य तेवढा संयम ठेवत उत्तरली, "दादर"

"दादरला कुठे?"

तोंडात आले होते.. घरात.. पण परत संयम ठेवला, "दादर..., दादर वेस्टला"

पुढचा प्रश्न विचारायला त्यांनी तोंड उघडले तेवढ्यात सर आले. पाठोपाठ वर्गाबाहेर जमलेल्या वीस-पंचवीस मुलांचा ग्रूपदेखील आत शिरला. तसा तो लगेच खुर्चीवरून उठून खाली बेंचवर येऊन माझ्याच बाजूला बसला..

ओह्ह.. म्हणजे हा स्टुडंट होता तर...!!

तसे आमच्या क्लासमध्ये मुले-मुली बाजूबाजूला बसायचे त्यामुळे यात कोणाला काही गैर वाटण्यासारखे नव्हते, पण याने नेमके माझ्याच बाजूला येऊन बसावे. आधीच झाल्याप्रकाराने मला त्याचा रागच आला होता. जराश्या रागाच्या स्वरातच मी त्याला विचारले, "हा काय प्रकार होता?" उत्तरादाखल परत तो गोड हसला, "घाबरू नकोस इशिका, ही रॅगिंग नक्कीच नव्हती, तसेही मी विसरून गेलोय की तू कुर्ला ईस्टला राहतेस.." मला त्याही परिस्थितीत हसायला आले. पक्का फ्लर्ट दिसत होता. पण मगाशी जे वाटले तसे नव्हता. निदान घमेंडी तरी नव्हता.... रोहनसारखा...!!

पूर्ण लेक्चरभर त्याची चूळबूळ चालू होती. सारखा खिशातून घड्याळ काढून बघत होता. एवढीच सारखी वेळ बघायची होती तर हातात घड्याळ का घालत नाहीस असे विचारावेसे वाटले. सर काय शिकवत आहेत याकडे जराही लक्ष नव्हते. वहीत काही लिहूनही घेत नव्हता. अक्षरही असे की जे थोडेफार लिहिले होते ते इंग्लिश मध्ये आहे एवढेच काय ते समजत होते. नजर मात्र पूर्ण वर्गभर फिरत होती. मुलींच्या ग्रुपकडे जरा जास्तच. कदाचित मी आधीच त्याच्याबद्दल एक मत बनवून ठेवले असल्याने तसे मला वाटले असावे, प्रत्यक्षात तसे नसावेही. शेवटी न राहवून मी त्याला विचारले, "काय झाले, पहिल्याच दिवशी वैतागलास का आमच्या कॉलेजला?"

"तुझ्या आजोबांचे नाव भाऊराव पाटील आहे का?" उत्तरादाखल त्याचा प्रतिप्रश्न..

थोडा वेळच लागला माझी ट्यूब पेटायला.. आमच्या कॉलेजचे नाव कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय असे होते..

"वेरी फन्नी, आम्ही तुझ्या आधीपासून आहोत म्हणून आमचे कॉलेज बोलत आहोत."

"त्याने काय फरक पडतो, फी तर आपण दोघांनी सेम भरली आहे. आता हे जेवढे तुझे कॉलेज आहे तेवढेच माझेही आहे. आणि तू या कॉलेजमध्ये माझ्या आधीपासून आहेस या गैरसमजात राहू नकोस, माझा डिप्लोमा इथूनच झाला आहे."

ओह्ह.. तरीच हा नवीन असून देखील एवढा कॉन्फिडंट वाटत होता.. बाकी याच्याशी उगाच वाद घालण्यात अर्थ नव्हता. आपण काहीही विचारले तरी आपल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आधीच याच्याकडे तयार असणार हे एव्हाना मी समजून चुकले होते. आणि तसेही आम्ही पहिल्याच बेंचवर बसलो असल्याने शांत बसणेच योग्य समजले. मध्येच त्याने वहीच्या पहिल्या पानावर आपले नाव सुवाच्य अक्षरात लिहायला घेतले. सर काय शिकवत आहेत या कडे त्याचे जराही लक्ष नव्हते. तो आपल्याच नादात मग्न होता. मगाशी त्याचे अक्षर मी पाहिले होते. ते पाहता नाव लिहायला त्याला एवढा वेळ का लागत होता हे मी समजू शकत होते. डोकावून पाहावेसे वाटले की नक्की कसे लिहितो आहे ते, पण तो वहीची एक बाजू उचलून, झाकून लिहित होता. कदाचित त्याचे अक्षर बघून मी हसू नये म्हणून ही काळजी असावी.. मला खरे तर त्याचे नाव जाणून घेण्यात रस होता. पण छे, काही दिसत नव्हते, त्यापेक्षा लेक्चरनंतर त्यालाच विचारूया सरळ असे ठरवले.

अकरा वाजता लेक्चर संपला. आता पंधरा मिनिटांचा ब्रेक होता. त्याच्या चेहर्‍यावरील सुटकेचे भाव पाहता मला समजले की हा काही सगळे लेक्चर हजर राहणार्‍या कॅटेगरीतील दिसत नाही. "काय झाले, सकाळीच ही हालत, अजून अख्खा दिवस बाकी आहे."

"अरे यार हे सकाळी सकाळीच लेक्चर बसणे मला जमत नाही"

"मग रात्रशाळेत जायचे होतेस ना.." तसा तो हसला.. मनापासून..

"खरे तर मी निशाचरच आहे, पण रात्री अभ्यासाव्यतिरीक्त करण्यासारख्या बर्‍याच चांगल्या गोष्टी आहेत जगात."

"जसे की?" मी पटकन विचारले, तो फक्त हसला... वेड्यासारखाच प्रश्न होता खरे तर हा..

"नाव सांगितलेस नाही तुझे?" मी चटकन विषयांतर केले.

"अभि."

"अभी? फक्त अभी?"

"हो माझे नाव फक्त ‘अभी’च आहे... तसे प्रेमाने काहीजण मला ‘अभिजीत’ बोलतात.. तुला काय बोलायला आवडेल.." आम्ही दोघेही हसायला लागलो.

खरेच वेडा होता. आणि ईंटरेस्टींगदेखील.. आज बर्‍याच दिवसाने मी हसले होते, कोणाला हसवले होते. मी त्याला अभी’च बोलायचे ठरवले.... ते ही प्रेमाने..

पंधरा मिनिटांचा ब्रेक संपून आणखी पंधरा मिनिटे झाली होती. पुढच्य तासाचे लेक्चरर अजून आले नव्हते. एकेका ग्रूपने आपापल्या बॅगा उचलायला घेतल्या आणि बघता बघता वर्ग रिकामा झाला. आज कुणाल कॉलेजला आला नव्हता. त्याचा फोनही लागत नव्हता. नेहमीसारखा चार्जिंगला लावायला विसरला असावा. मला त्याची गरज असते तेव्हाच तो गायब असतो... कदाचित जेव्हा तो नसतो तेव्हाच त्याची जास्त उणीव भासत असावी. आणि हा माझा नवीन मित्र देखील कुठे गेला होता कुणास ठाऊक. कदाचित त्याचे जुने मित्र भेटले असावेत. याच कॉलेजमधून डिप्लोमा केला होता, असे बोलत होता ना..

शी..!! परत मी एकटीच वर्गात राहिली होती. रोहन प्रकरणापासूनच मी सर्वांपासून अलिप्त राहायला सुरुवात केली होती आणि त्यानंतर मग जणू काही त्या सर्वांनीच मला वाळीत टाकले होते. त्यांचेही योग्यच होते म्हणा, ते सारे कॉलेजला आपले आयुष्य एन्जॉय करायला यायचे. ही वेळ, हा काळ पुन्हा कधी त्यांच्या आयुष्यात येणार नव्हता. मग ते का म्हणून माझी दुखडी ऐकण्यात तो वाया घालवतील. खरे तर बर्‍याचदा मनात यायचे की स्वताहून त्यांच्यात मिसळावे. एखादे पाऊल त्यांच्या दिशेने टाकून तर पहावे.. कदाचित तिथूनही प्रतिसाद मिळेल. पण स्मिताशी मैत्री मी कशी निभावली याची सारा कॉलेज साक्ष होता. जी आपल्या जिवाभावाच्या मैत्रीणीशी अशी वागली ती आपल्याशी काय इमान राखणार असा विचार जर त्यांच्या मनात येत असेल तर त्यात त्यांची काही चूक नव्हती.

हा ऑफ पिरिअड का उगाच येतो.. आयुष्यातील एकटेपणा जरा जास्तच जाणवायला लागते.. न राहवून पुन्हा उगीचच कुणालला फोन लावला. परत एंगेज टोन.. वैतागून कट केला तो समोरून अभी येताना दिसला. मनाला आतून कुठेतरी बरे वाटले.. जाणवले हे.. अचानक मूड चांगला झाल्यासारखे वाटले. हसूनच त्याला गूड न्यूज दिली, "लेक्चर ऑफ आहे, जा मज्जा कर." मनातून खरे तर तो जाऊ नये असेच वाटत होते.

"काय बकवास आहे, सगळा मूड ऑफ झाला.." पुन्हा एक अनपेक्षित प्रतिक्रिया.

"अरे ठीक आहेस ना? मी म्हणाले लेक्चर ऑफ आहे"

"अग पण मी बसायचा मूड बनवून आलो होतो ना.. तेही एवढ्या मुश्किलने.. आता उद्या माझा मूड बदलला तर या लोकांच्या हाती लागणार आहे का मी? विचार केला होता आजच सर्व प्रोफेसर लोकांना आपला चेहरा दाखवून घ्यावा मग उरलेली सेमिस्टर भटकायला मोकळा."

प्रत्येक गोष्टीत उलटा विचार, कोणालाही आपल्या मनाचा ठाव लागू न देण्याचा स्वभाव.. कदाचित या मुळेच मी त्याचा जास्त विचार करू लागले होते..

"तुझा काय प्लॅन आहे?" त्याच्या या प्रश्नाने मी भानावर आले.

"माझे काय, मी लायब्ररीमध्ये जाईन."

"का? काही सबमिशन आहे का?" त्याने विचारले.

"नाही, काही खास असे नाही, पण पुढच्या आठवड्यात रचना मॅडम जर्नल कम्प्लीट करायला सांगतीलच."

"पुढच्या आठवड्यात...??", तो किंचाळलाच..

"पुढच्या आठवड्यात करायचे आहे ना, मग तू आताच का करतेस? पुढच्या दिवसाचा इथे भरवसा नसतो आणि तू पुढच्या आठवड्याचे टेंशन घेत आहेस.. कशावरून पुढच्या आठवड्यात त्या जर्नल पूर्ण करून आणायला सांगतीलच.. कदाचित नवीन प्रॉब्लेमसुद्धा देतील.. पुढच्या आठवड्यात आपण जिवंत असू की नाही याची पण गॅरंटी देता येत नाही यार.. किंवा आपण राहू आणि रचना मॅडमच......"

"अरे बस...!! देवाने तोंड दिलेय म्हणून काय तोंडाला येईल ते बडबडतच राहायचे का?" मी जराशी चिडलेच त्याच्यावर. तसे त्याने चेहर्‍यावर एकदम निरागस भाव आणले. अचानक एखादे पिल्लू दिसायला लागले मला त्याच्यात. तशी माझी चिडचिड थांबली.

"बोल, तुझ्याकडे काही दुसरा प्लॅन आहे का?" मी विचारले. तसा लगेच खुलला. पक्का नौटंकीमास्टर होता.

म्हणाला, "मला तुझे कॉलेज तर दाखव."

तसे मी म्हणाले, "अरे पण तू आधी ही होतास ना या कॉलेजला.."

"कोणी सांगितले तुला हे?"

"अरे तूच तर मगाशी बोललास ना?"

"ओह्ह, ते तर मी असे बोलतच राहतो. सगळे थोडी ना खरे असते. ती तर अशीच थाप मारली होती, तुझे तोंड बंद करायला." आणि हसायला लागला.

पण यावेळी मात्र मला हे आवडले नाही. त्याने माझ्या चेहर्‍यावर हे वाचले तसे सॉरी म्हणाला.. तेवढा समजूतदारपणा होता म्हणजे त्याच्यात..

कॉलेज फिरवायचे म्हणजे नक्की काय दाखवणार होते मी याला. गेले काही महिने मीच स्वता लायब्ररी आणि क्लासरूमच्या पलीकडे कॉलेज पाहिले नव्हते. तसा तोच म्हणाला चल कॅंटीनपासूनच सुरूवात करूया. खरे तर आमच्या कॉलेजमध्ये दोन कॅंटीन होते. त्यातील एक म्हणजे ज्याला आम्ही छोटे कॅंटीन बोलायचो, तिथे शक्यतो प्रेमी युगुलच जायची. तिथे खास असे काही पदार्थ मिळायचे नाहीत पण त्यांना हवा असलेला एकांत मात्र हमखास मिळायचा. रोहन बरोबर मी इथे काही वेळा आले होते. पण या जागेची प्रसिद्धीच अशी होती की लायब्ररीच्या जवळ असून देखील मी कुणाल बरोबर इथे येण्याचे टाळायचे. अभीची पावले त्या दिशेला वळलेली बघून मी जरा चरकलेच. आता याला कसे समजवायचे हा विचार करू लागले तसे तोच म्हणाला, "ही जागा काही खास दिसत नाहिये, हे एवढेच आहे का तुमचे कॅंटीन?"

"हे असेच छोटेसे आहे रे, इथे खास असे काही मिळत नाही, चल मी तुला दुसरे दाखवते." असे बोलून मी त्याला तिथून घेऊन गेले. फिरताना रस्ताभर एखाद्या लहान मुलासारखे त्याचे हे काय आहे, ते काय आहे, ही कोणती बिल्डींग, ते कोणते डिपार्टमेंट चालूच होते. जसे गावातील एखादा खेडूत शहरातील मोठ्या मोठ्या इमारती बघून अचंबित होतो आणि त्याला त्या प्रत्येक गोष्टीचे कौतुक वाटायला लागते, एखाद्या लहान मुलाला सभोवताली दिसणारी प्रत्येक गोष्ट ही नवीन आणि आयुष्यात पहिल्यांदा दिसणारी असते म्हणून त्याबद्दल जाणून घेण्याची त्याची उत्सुकता असते. तसा त्याचा उत्साह होता. मी देखील न कंटाळता त्याच्या सार्‍या प्रश्नांची उत्तरे देत होते. आम्ही कॅंटीनमध्ये पोहोचलो तसे म्हणाला, "भूक नाही आहे, फक्त चहा पिऊया. जेवणाचा डबा आणलाय मी घरून.."

अरे हो, खरेच की.. जेवणाचा डबा मी देखील आणायचे. कॉलेजमध्ये बरेच जण होस्टेलवर राहणारे असल्याने सार्‍यांचाच काही डबा नसायचा. याने आणलाय म्हणजे हा इथेच राहणारा असावा. मगासपासून मी याची काही चौकशी देखील केली नव्हती... एक नाव सोडून..

"आई बनवून देते डबा?" मी त्याला विचारले.

तसा लाजला, आणि म्हणाला, "नाही बायको बनवते.."

"काय??" मी जराशी किंचाळलेच.

तसा हसायला लागला. म्हणाला, "अग ईडीयट, या वयात कोणाची बायको असते का? साहजिकच आहे, आईच बनवून देणार ना."

एकाही प्रश्नाचे याला सरळ उत्तर देता येत नाही का?

"तेवढे समजते, मला फक्त हेच विचारायचे होते की घरी कोण कोण आहेत? आई आहे का?" मी म्हणाले.

"आई तर सर्वांच्याच घरी असते ना.?"

त्याच्या या वाक्यावर एकदम आवंढा दाटून आला. पुढे काय बोलायचे सुचलेच नाही. कसेबसे पुटपुटले, "नाही, सर्वांच्याच घरी नसते."

थोडावेळ तसाच शांततेत गेला. यावर त्यालाही पुढे काय बोलायचे सुचले नसावे. म्हणून मीच पुढे बोलणे सुरू केले, "माझी आई लहानपणीच गेली. मी पाचवीत होते तेव्हा... आठवणीदेखील धुरकट धुरकट आहेत. आईने सांगितलेल्या गोष्टी आठवत नाहीत पण आई गोष्ट सांगायची हे आठवते. आई किती चांगली होती हे नाही आठवत पण माझे तिच्यावर खूप प्रेम होते हे मात्र आठवते.." बोलता बोलता कंठ दाटून आला. आईला जाऊन आज बरीच वर्षे झाली होती. माझ्या सर्व मित्रमैत्रीणींना हे माहीत असल्याने कधी तिचा विषय असा निघायचा नाही. कोणी परक्याने विचारलेच तर सहज सांगून मोकळी व्हायची. पण आज मात्र का माहीत नाही तिच्या आठवणीने ऊर भरून आले. क्षणभरासाठी का होईना आईची कमतरता जाणवून गेली. अभीला आई आहे आणि मला नाही.... अभी कसा आयुष्याचा प्रत्येक क्षण मनसोक्त जगतो आणि मी मात्र जगात आले आहे तर मरेपर्यंत जगलेच पाहिजे या भावनेने जगतेय.... अभीला भविष्याची, साधे उद्या काय होणार याची देखील चिंता नाहिये आणि मी मात्र अजूनही भूतकाळाचेच ओझे वाहावत बसलीय... नकळत मी माझ्या आणि अभीच्या आयुष्याची तुलना करू लागले. पण खरा फरक होता तो आमच्या दोघांच्या आयुष्याकडे पाहण्याच्या दृष्टीकोणात. आज त्याचा पहिलाच दिवस होता पण जराही बुजलेपण किंवा एकटेपणाची भावना त्याच्या चेहर्‍यावर नव्हती. चार तासातच माझ्याशी असा बोलायला लागला की जणू चार वर्षांची मैत्री. आज त्याने मला हसवले, मला रडवले, थोडीशी चिडले मी त्याच्यावर तर काही गोष्टी खरेच आवडल्या त्याच्या... माझे आयुष्य मी अभीच्या नजरेतून पाहू लागले आणि अचानक मला ते चांगले वाटू लागले. कुणालने मला आजपर्यंत जगण्याचा आधार दिला होता, पण अभी मला जगण्याची दिशा दाखवत होता.

.
.
.

क्रमशः

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अभीचे कॅरेक्टर हळूहळू रंगत गेले आणि इतक्यातच क्रमशा... Sad

छान लिहिले आहे... पुढील भागाच्या प्रतीक्षेत.. Happy

एक शंका - आपलेही नाव मिथिला.. कथेचेही नाव मी मिथिला.. नायिकेचेही नाव मिथिला... सत्यकथा आहे का?

एक शंका - आपलेही नाव मिथिला.. कथेचेही नाव मी मिथिला.. नायिकेचेही नाव मिथिला... सत्यकथा आहे का?
----------------------------------------------------------------
हो..!!

----------------------------------------------------------------

स्टाईल कुछ जाना पहचाना लगता है, अभी तुला नाही वाटत ?
----------------------------------------------------------------
शेक्सपीअर??

----------------------------------------------------------------

वाचल्यासारखी वाटतेय आधी.
----------------------------------------------------------------
शक्य आहे, एका संकेतस्थळावर होती.. पण तिथेही अर्धवटच.. सध्या तिथे ना कथा आहे ना माझे अकाऊंट..!!

ट्रिपति, अचानक तुम्हाला हे कुठे सापडले माहीत नाही, पण धन्यवाद
यात आणखीही पुढे काही लिहिलेले, पण ते शोधावे लागेल. कारण इथे २०१२ दाखवत असले तरी लिखाण त्याच्याही वर्ष-दीडवर्षे आधीचे आहे.
सापडले तर टाकते,
तुम्हाला आवडले तर पुढेही लिहिते,
पण जमल्यास यातही बराच फेरफार करायचा विचार आहे. कथेत नाही तर शैलीत आणि झाल्यास कथेतील नावांमध्ये.. खरी नावे घेऊन लिहिल्याशिवाय लिखाणाची फीलिंग येणार नाही असे वाटते. Happy

Mithu, ती तूच आहेस का जी attendance ला मैथिली चे Pronunciation त्वरीत "It's मिथिला" करायची?

"आई तर सर्वांच्याच घरी असते ना.?"

त्याच्या या वाक्यावर एकदम आवंढा दाटून आला. पुढे काय बोलायचे सुचलेच नाही. कसेबसे पुटपुटले, "नाही, सर्वांच्याच घरी नसते."

>>>>>

भाई ये तो शाहरूख है....
मै हू ना Happy