अर्धा ग्लास

Submitted by अजित अन्नछत्रे on 1 August, 2012 - 12:11

ऋतुराज, काय छान आहे कि नाही माझ नाव? ऋतूंचा राजा जो वसंत, म्हणजेच ऋतुराज! मला माझ्या नावाचा फार अभिमान आहे! माझ्या आई-वडिलांनी माझ्या करिता जेवढ्या चांगल्या गोष्टी केल्या त्या पैकी ही सगळ्यात चांगली गोष्ट - म्हणजे माझे नाव ऋतुराज ठेवले ही!

नाही तर विठ्ठल वाघचौरे! हे काय नाव झाले? ना आकार ना उकार, किती ओबड दोबड! असो, या नावाबद्दल आणि व्यक्तीबद्दल लवकरच सांगीन - पण प्रथम माझ्या बद्दल!

माझ्या कामाबद्दल बोलायचे झाले तर "जैसा नाम वैसा काम!" देशातल्या नामवंत Institutes मधून मेकेनिकाल इंजीनेरिंगच आणि MBA च शिक्षण आणि लगेचच लट्ठ पगाराचा white caller job ! पाच वर्षात सहा jobs बदलले, आणि आता तर MD च झालो होतो! आत्ताच्या job मध्ये मीच एका Holland मधील कंपनी बरोबर collaboration स्थापित केलं होत. ह्या collaboration च्या अंतर्गत आमच्या कंपनीला नाशिक जिल्ह्यात निफाड इथे एका dairy कंपनी मध्ये latest Dutch technology ची high speed centrifuges उभी करण्याचे contract मिळाले होते - ते ही माझ्या प्रयत्नानीच! त्यामुळे कंपनीने installation चे कामही माझ्याकडेच सोपवले होते. High speed centrifuges पुढच्या आठवड्यात Holland हून site वर पोहोचणार होती. Installation मध्ये मदत करायला त्यांचा engineer मार्टिन Holland हून दोन दिवसात येणार होत. मग दोन दिवसात installation, आणि मग back तो pavilion - म्हणजे मुंबई! आता माझा मुक्काम एक आठवडा तरी निफाडला होता हे निश्चित!

विठ्ठल वाघचौरे, हो तो मला इथेच भेटला. ज्या कंपनीत आमची centrifuges बसवायची होती त्या कंपनीत काम करणारा engineer. विठ्ठल वाघचौरे - किती ओबड दोबड आहे नाही नाव? कुठे ऋतुराज देशपांडे आणि कुठे विठ्ठल वाघचौरे! खर पाहिलं तर त्याच व्यक्तिमत्व पण तस किरकोळच होत - त्याच्या नावाला शोभणार! वय असाव साधारण पंचेचाळीशीच्या वर - उतारवयाकडे झुकलेलं. बुटका म्हणावा तर उंच वाटणारा, अन उंच म्हणावा तर बुटक्यात मोडणारा. डोक्यावरचे केस विरळ झालेले, तर उरल्या सुरल्या केसांवर पांढरी छटा पसरलेली. कपाळावर आठ्या पडलेल्या. भाषा साधारण गावाकडचीच.

त्या दिवशी सकाळी जेव्हां तो भेटला ती भेट माझ्या चांगल्या स्मरणात राहील - कारण? कारण त्या दिवशी आमच भांडण व्हायचंच काय ते राहून गेल होत - तेही पहिल्याच भेटीत!

"नमस्कार, मी विठ्ठल वाघचौरे"

"Hello, माझ नाव ऋतुराज देशपांडे"

"काय? राज? कुठला राज?"

"ऋतु, ऋतुराज" मी ओरडतच म्हणालो.

"अरे वा! छान आहे हो नाव! ऋतुराज!" वाघचौरे थोडा विचार करून म्हणाला, "म्हंजे वसंतराव म्हणा की!"

काय, मी आणि वसंतराव? माझ डोकच सटकल. "ओ, excuse me, वसंतराव नव्हे, ऋतुराज, काय? ऋतुराज!" मी वसकन ओरडलो.

"अहो, त्येच ते, तुमच्या पुण्याकडचे ऋतुराज म्हन्जेच आमच्या गावाकडचे वसंतराव!"

एव्हाना माझी तळपायाची आग मस्तकाला गेली होती. माझ अस केविलवाण नामविच्छेदन आत्तापर्यंत कोणीच केल नव्हत. वाटल की ह्या वाघचौरेची गचांड पकडावी आणि खेचाव सरळ खाली! पण करता काय? त्याच्याच गल्लीत असल्यामुळे मूग गिळून गप्प बसण्या व्यतिरिक्त माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता.

संध्याकाळी जेव्हां मी गेस्ट-हाउस वर पोहोचलो तेव्हां वाघचौरे माझी वाट पहात होता. मी यायच्या आधीच त्याने बहुतेक सारी तयारी करून ठेवली असावी. खर तर वाघचौरेने आणलेले चिकन चांगलेच टेस्टी झाले होते. पण मला वाघचौरेला चारी मुंड्या चीत झालेलं लौकरात लौकर पहायचं होतं. त्यान मागे वळून फ्रीज मधली बिअरची बाटली काढली. दोन ग्लास आणि एक बिअरची बाटली - तीही छोटी! "बहुत नाइंसाफी है रे!" माझ्या मनात विचार आला. त्यान बिअर बॉटल ओपन करून समोरच्या दोन्ही ग्लासात भरली - दोन जेमतेम अर्धे बिअरचे ग्लास. काय होणार त्यान?

"वाघचौरे ग्लास अर्धा रिकामा आहे" मी पटकन म्हटल. नाही तरी मी वाघचौरेच्या त्रुटीवर बोट ठेवण्याची संधी शोधतच होतो.

"का वसंतराव, 'ग्लास अर्धा रिकामा' आहे अस का म्हणताय?" वाघचौरेने विचारले.

"नाहीतर काय म्हणू?" मी उत्तरलो.

"नाही, 'ग्लास अर्धा भरलेला' असहि म्हणू शकता!" वाघचौरे म्हणाला.

"नाही, 'अर्धा ग्लास रिकामा' हे वर्णनच मला बरोबर वाटतंय" मी खोचट पणे उत्तरलो.

"तुम्हाला माहिती आहे वसंतराव, 'अर्धा ग्लास भरलेला' आणि 'अर्धा ग्लास रिकामा' या परस्पर विरोधी वृत्ती आहेत!" वाघचौरे म्हणाला.

"ते कस काय बुवा?" मी छद्मीपणे विचारल.

"नाही, 'अर्धा ग्लास भरलेला' हे वर्णन समाधानी वृत्तीच द्योतक आहे तर 'अर्धा ग्लास रिकामा' हे असमाधानी वृत्तीच!"

"वाघचौरे, शिकवा आता आजोबांना!" मी काहीतरी बोलायचं म्हणून बोललो.

"का, तुम्हाला अस वाटत नाही वसंतराव? आता हेच बघा ना, 'अर्धा ग्लास भरलेला' अस मानणारी व्यक्ती आपल्या कडे काय आहे यालाच महत्व देत असते!"

"अस? मग 'अर्धा ग्लास रिकामा' अस मानणाऱ्या व्यक्तीच काय?" मी विचारल.

"हं..., हि व्यक्ती नेहमी आपल्या कडे काय नाहीए त्या गोष्टींचाच सतत विचार करीत असते" वाघचौरे उत्तरला.

"मग, त्यात चुकीचे काय आहे? या जगात माणसानी नेहमी असमाधानी असणच जरूरीच असत! 'अर्धा ग्लास भरलेला' अस मानणारी अल्पसमाधानी माणस आयुष्यात काहीच मिळवू शकत नाहीत!” मी बरोब्बर वाघचौरेला टोला मारला.

"मला नाही तस वाटत!" वाघचौरे उत्तरला.

"मग? तुमच्या म्हणण्यानुसार 'अर्धा ग्लास भरलेला' म्हणजे काय?"

"आपल्याला आयुष्यात जे काही मिळालेले आहे - मग ते जन्मजात असो किंवा स्वप्रयात्नानी असो - त्याबद्दल मानलेल समाधान आणि त्याबद्दल देवाचे मानलेले आभार म्हणजेच 'हाफ ग्लास फुल!"

"म्हणजेच अल्पसमाधानी, नाही का?"

"नाही, नाही! अल्पसमाधानी व्यक्ती तर आपल्याला आयत्या मिळालेल्या दोन घोटावरसुद्धा समाधान मानते! पण ज्याला पुढे जायचे आहे त्यान 'आपल्या जवळ काय आहे' याच भान ठेवणं अतिशय जरुरीच असत. त्यामधूनच त्याला पुढे जायची ताकद मिळत असते!"

"अच्छा? मग 'अर्धा ग्लास रिकामा' म्हणजे काय?"

"माझ्या दृष्टीने आपल्याला आयुष्यात जे काही मिळालेले आहे - मग ते जन्मजात असो किंवा स्वप्रयात्नानी असो - त्याच्याकडे काडी इतकही लक्ष न देता आपल्याला जे मिळाले नाही तिकडेच सदैव लक्ष देणे आणि त्यासाठी सतत देवासमोर गाऱ्हाणे मांडणे म्हणजेच 'अर्धा ग्लास रिकामा'!"

ते सार ऐकून मी अवाकच झालो. आता 'अर्धा ग्लास Philosophy' ही मला काही नवीन नव्हती. पण बिअर पिताना ज्या सफाईदार पणे ती वाघचौरेने मांडली ते ऐकून खर तर माझी बोलटीच बंद झाली होती - पण ते मानायला मी तयार नव्हतो इतकच.

दुसऱ्या दिवशी सकाळी मार्टिन आला. वाघचौरे बरोबर आता त्याचा काय धमाका होतोय याचीच मी वाट बघत होतो.

"Hello, my name is Martin” मार्टिनने स्वतःची ओळख करून दिली.

“Hello, I am विठ्ठल वाघचौरे”

“What?” मार्टिनने प्रश्न केला.

“विठ्ठल, विठ्ठल वाघचौरे”

“What? I don’t understand.” मार्टिन पुन्हा म्हणाला.

“You don’t understand? I tell you – you know पंढरपूर?”

“No, I don’t know”

“You know वारकरी?”

“No, I don’t know”

एव्हान हे संभाषण चांगलच इंटरेस्टिंग होऊ लागल होत. मला वाटल, वाघचौरे बहुतेक आता वारकरी संप्रदायाचा सारा इतिहास ह्या Holland कराला सांगणार!

“You know विठ्ठल? विठ्ठल – God of Maharashtra? That is my name!”

मार्टिन माझ्या कडे वळून म्हणाला, “Raaj, What is he saying?”

“Don’t worry about him. He is telling that his name is विठ्ठल वाघचौरे” मी उत्तरलो

“Oh – that is a very difficult name! Instead, I will call him - Witty!”

मार्टिनने वाघचौरेच्या नावाची केलेली काटछाट पाहून मला चांगलाच आनंद झाला - मला वसंतराव म्हणतो काय?

वाघचौरे दोन मिनिटे शांत होता. मग, का कुणाला ठाऊक, त्यान मार्टिनला पुन्हा प्रश्न केला.

“You take bath? Every day?”

“Yes, why?”

“You take bath - over your head or under your head?”

मार्टिनने पुन्हा माझ्याकडे वळून प्रश्न केला, "Raaj, what is he saying?”

“He is asking whether you make your hair wet whenever you take bath.”

वाघचौरेचा गमतीदार प्रश्न ऐकून मार्टिनने आपल्या उरल्या सुरल्या केसांवरून हात फिरविला आणि म्हणाला, “Oh, you Witty!”

मार्टिनच्या उत्तरात बहुतेक श्लेष अपेक्षित असावा (pun intended)!

दुसऱ्या दिवशी आम्ही जेव्हां भेटलो तेव्हां आमच्या समोर असलेल्या कामाची आम्हाला पूर्ण कल्पना होती. ती Holland हून आलेली महाकाय centrifuges , भारतात प्रथमच install करण्यात येणार होती. कंटेनर्स मधून ती भरभर unpack करण्यात आली. मग foundation , स्प्रिंग्स आणि कॉलम पटपट बसवण्यात आले. Centrifuges त्यावर fix करण्यात आली. हे सार करताकरता ४-५ तास कसे निघून गेले ते कळलेच नाही. आता उरले ते शेवटचे काम - ते म्हणजे centrifuges ground foundation वर चढवणे आणि screws नी पक्की करणे. पण पाहतो तर काय - foundation screws कुठे आहेत? ते तर गायब होते! त्यांच्या शिवाय तर गाडी पुढे सरकणे शक्यच नव्हते. मार्टिनने Holland ला फोन लावला तेव्हां त्याला समजल कि foundation screws separately पाठवण्यात आले आहेत आणि ते साईट वर पोहोचायला २-३ दिवस लागतील. मार्टिन तर आज संध्याकाळीच परतणार होता. मला समजल - काम पूर्ण झाल्या शिवाय माझी येथून सुटका नव्हती. म्हणजे पुढचे कमीतकमी २-३ दिवस तरी मी इथे निफाडला अडकलो होतो.

________________________________________

संध्याकाळी जेव्हां वाघचौरे मला भेटायला गेस्ट हाउसला आला तेव्हां मार्टिन आधीच परतला होता. वाघचौरेला बहुतेक माझी व्यथा समजली असावी.

"काय वसंतराव, काय प्रोग्राम आहे पुढचे २-३ दिवस?" त्यान विचारल.

माझ्याकडे तर काहीच उत्तर नव्हत. मग शांतता भंग करत वाघचौरेच म्हणाला, "वसंतराव, तुम्हाला एक कल्पना देऊ? तुम्ही वणीच्या देवीला का जाऊन येत नाही?"

त्यान दिलेल्या idea च मला थोड आश्चर्यच वाटल. "वणीची देवी? ती कुठे आहे?" मी विचारलं.

"आहे इथून साधारण ५०-६० किलोमीटर दूर. उद्या सकाळी निघा, दुपारपर्यंत पोचाल तिथे. देवीचे दर्शन घ्या आणि जेवण करून परत फिरा. संध्याकाळ पर्यंत पोहोचाल गेस्ट-हाउसला." वाघचौरे उत्तरला.

मला वाघचौरेची idea काही फारशी पसंत पडली नाही. "नाही, नाही वाघचौरे, मी देवीला कधी गेलो नाही आणि जाणारही नाही." मी उत्तरलो.

"अहो वसंतराव, देवी सगळ्यांनाच दर्शन देत नाही! तुम्हाला आयती संधी साधून आली आहे - भाग्यवान आहात! वाटलं तर कंपनीची गाडी बुक करतो तुमच्या करता उद्यासाठी." वाघचौरे म्हणाला.

माझ्याकडे वाघचौरेने दिलेली idea मानण्या शिवाय दुसरा पर्यायच नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी मला pick-up करण्यासाठी जेव्हां गाडी उभी राहिली तेव्हां माझ्या समोर काय वाढून ठेवल आहे याची मला काडीमात्र कल्पना नव्हती. रस्ता चांगलाच खाच-खळग्यांचा होता. त्यात पुन्हा पावसाळ्याचे दिवस असल्याने रस्त्यांची फारच दयनीय अवस्था झाली होती. रात्र भर जरी जोरदार पाऊस पडला असला तरी आत्ता कडकडीत ऊन पडल होतं. आम्ही साधारण तासाभरातच गावं आणि शेते सोडून डोंगराच्या चढणाला लागलो. घाटातला रस्ता चांगलाच वळणावळणाचा होता. पुढच्या तासाभरात आम्ही साधारण अर्धा-पाउण रस्ता पार केला असेल. आता शेवटचा दीड-दोन किलोमीटर रस्ताच काय तो उरला असेल तेव्हां शिवान गाडी थांबविली.

"साहेब, गाडी ह्यापुढे जात न्हाई - शेवटच अंतर तुम्हाला पायीच जाव लागणार" शिवा म्हणाला.

"काय?" मी चमकून विचारल.

"होय साहेब, सगल्यांना हे अंतर पायीच जाव लागत्याय बगा" शिवा उत्तरला.

बाहेर दुपारच ऊन मी म्हणत होत आणि रात्रीच्या पाऊसान सारा रस्ता चिखलमय झाला होता. वाटलं, तसंच परत फिरावं - पण देवीच दर्शन घेतल्या विना परत फिरणंसुद्धा प्रशस्त वाटेना. मी तसाच उन्हातून आणि चिखलातून चालू लागलो. अर्ध्या-पाऊण तासात मी वर पोहोचलो. देवीच देऊळ आता फार दूर नव्हत. मी लगबगीने पाय उचलला - तेवढ्यात एक छोटी मुलगी माझ्या समोर उभी राहिली आणि म्हणाली,

"साहेब, घ्या ना! पूजेच आणि प्रसादाच तबक!"

मला नाही म्हणावेना. मी तिच्या हातावर पैसे ठेवून पुढे चालू लागलो. आजूबाजूला कोणीच नव्हत. देवीच देऊळ साधारण १०० मीटरच दूर असेल. तेवढ्यात, कुठून कोणाला माहित, एका माकडांच्या झुंडीन माझ्या हातातल्या तबकावर हल्ला चढवला. मी स्वतःला सांभाळता सांभाळता चिखलातून खाली घसरलो. मर्कटानी तबकातील प्रसाद फस्त केला आणि छूमंतर झाले. इकडे मी चिखलाने पूर्णतय: माखलेला होतो. पायाला थोड-फार खरचटल होत. तसाच कसाबसा उभा राहिलो, तबक उचललं, अन मागे फिरलो - देवीच दर्शन न घेताच. उतरणीचा रस्ता कसाबसा पार केला आणि गाडी जिथे उभी केली होती तिथे पोहोचलो.

"शिवा, चल बाबा परत" मी म्हणालो.

"चला साहेब, देवीच दर्शन झाल ना?" शिवान विचारल
.
"परत फिर आता गेस्ट-हाउसला." मी शिवाच्या प्रश्नाचे उत्तर देणे टाळले.

"अहो, पण ह्ये काय हो? चिक्खल कसा लागला?" अस म्हणत त्याने गाडीतून एक पंचा काढला आणि माझ्या कपड्याला आणि शरीराला लागलेला चिक्खल पुसून काढला.

गाडी परत निघाली. मी जाम वैतागलेलो होतो. त्या मर्कटानी माझ्यावर केलेला हल्ला, माझं घसरून पडण - सार माझ्या डोळ्यासमोर उभ राहील. एवढे होऊन सुद्धा देवीच दर्शन झाल नाही ते नाहीच. मी मनातल्या मनात वाघचौरे वर जाम खवळलेलो होतो. त्यांनीच ही idea दिली. गेस्ट-हाउसला पोहोचल्या वर त्याची चांगलीच हजेरी घ्यायची मी ठरवली. माझ्या डोक्यात विचारचक्र जोरात फिरत होती.

एवढ्यात, काय झाल कुणास ठाऊक, शिवाने जोरदार ब्रेक मारला - वळणावरून येणाऱ्या ट्रकला चुकवण्यासाठी. आमची गाडी उजवीकडे असणाऱ्या कठड्याला आदळली आणि पुन्हा मागे फिरली. एव्हड्यात मोट्ठा आवाज झाला - गाडीच टायर बहुतेक फुटलं असाव. गाडी तशीच पुढे गेली आणि
डावीकडे असलेल्या एका लहानशा झाडाच्या बुंध्यावर आदळून थांबली.

आता तर माझी तळपायाची आग मस्तकाला गेली होती. मी तसाच बाहेर उतरलो. गाडीच मागच टायर पंक्चर झाल होत. मी क्षणभर आजूबाजूला नजर फिरवली - कोणी चिटपाखरुही दिसत नव्हत. रस्त्यावरून एखाद तुरळक वहान जात-येत होतं. दुपारची ४ ची वेळ असावी. दोन-अडीच तासात अंधारच पडणार होता. त्यात पुन्हा पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे पाऊस कधी पडेल हे काही सांगता येत नव्हत. अशा परिस्थितीत ही गाडी दुरुस्त होणार कधी आणि आम्ही गेस्ट-हाऊसला पोचणार कधी हा एक प्रश्नच होता.

तेवढ्यात शिवा म्हणाला, "साहेब आता तुम्ही अस करा, तुम्ही मिळेल त्या गाडीन गेस्ट-हाऊसला जा. मी बघतो या गाडीच काय करायचं ते."

अस म्हणून त्यान खाली जाणाऱ्या एका गाडीला हात केला. सुदैवानं ती गाडी थांबली. शिवान सारी परिस्थिती समजावून सांगितली आणि मला गेस्ट-हाऊसला सोडण्याची विनंती केली. साधारण तासाभरातच मी गेस्ट-हाऊसला पोहोचलो सुद्धा!

रूममध्ये पोहोचल्यावर मी लगेच एक शॉवर घेतला आणि मला जिथे-जिथे लागल होत तिथे-तिथे मलमपट्टी केली. तेवढ्यात वाघचौरे आला.

"काय, कशीकाय झाली trip? झाल का देवीच दर्शन?" वाघचौरेने प्रश्न केला.

मी खवळूनच उठलो. मी त्याला घडलेला सारा घटना क्रम सांगितला आणि त्याच्यावर खेकाचलो, "वाघचौरे, हे सार तुमच्या मुळेच झाल. तुम्ही ही कल्पना सुचविली नसती तर काहीच झाल नसत." मी वाघचौरेवर तोंडसुख घेतलं. वाघचौरे माझ्याकडे आ करून बघतच बसला. १०-१५ मिनिटे तो काही बोललाच नाही. माझ्या तोंडातून शब्द आग ओकत होते - पण तो शांतपणे बसून होता.

"ऋतुराज, जे काही आज घडल त्या बद्दल मला खूप सहानुभूती आहे."

मी क्षणभर चमकून वाघचौरे कडे बघितलं - आत्ता पर्यंत 'वसंतराव' अस म्हणणाऱ्या वाघचौरेन मला प्रथमच 'ऋतुराज' अस संबोधल होत.

"पण, मला एक गोष्ट सांगा, तुमच्या दृष्टिने या साऱ्या घटनाक्रमात घडलेली सगळ्यात चांगली गोष्ट कोणती?" वाघचौरेन प्रश्न केला. त्याच्या शब्दात एकप्रकारची धार आली होती.

"काय वाघचौरे, अहो इथे वाईट घटनांची मालिका लागली आहे आणि तुम्ही मला 'चांगली गोष्ट कुठली घडली' असं विचारताय?" मी वसकलो.

"हाच प्रॉब्लेम आहे तुमचा ऋतुराज!” थोडा वेळ विचार केल्यानंतर वाघचौरेन प्रश्न केला “तुम्हाला सगळ्यात जास्त कशाची जरुरी आहे सांगू?"

"कशाची?"

"तुमचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्याची!”

"ते कशा बद्दल?" मी विचारल.

“त्याच कारण अस कि आपल्याला आयुष्यात ज्या चांगल्या गोष्टी मिळालेल्या आहेत त्याकडे तुमच काडीइतकही लक्ष नाहीये - आणि जे आपल्याला मिळालेलं नाही तिकडेच फक्त तुम्ही लक्ष देता आहात!" वाघचौरे उत्तरला. "हा प्रॉब्लेम फक्त तुमचाच आहे अस नाही - आजकालच्या जीवघेण्या स्पर्धेत उतरलेल्या प्रत्येकाचा हाच प्रॉब्लेम आहे! अरे, जरा दम धरा! आपल्याला काय प्राप्त झाले आहे त्याचा आस्वाद घ्या, त्या बद्दल देवाचे आभार माना! का उगाचच 'आपला ग्लास अर्धा रिकामा आहे' असे मानून मृगजळाच्या पाठीमागे धावत राहणार? आणि समजा, ग्लास भरता आला नाही तर? मग आहे मानसिक ताणतणाव आणि त्यातून उद्भवणारे शारीरिक आणि मानसिक आजार! अस करत बसाल तर आपला अर्धा भरलेला ग्लासही कदाचित रिकामा होऊन जाईल!"

"वाघचौरे, तुम्ही काय बोलताय हे मला काडीमात्र समजत नाहीये" मी म्हणालो.

"ऋतुराज, मी तुम्हाला एक suggestion देतो. तुम्ही वणीच्या देवीला पुन्हा एकदा जाऊन या! नाहीतरी तुम्हाला देवीच दर्शन कुठे झालाय?"

मी पुन्हा वैतागलो, "ही कल्पना देताना तुम्हाला काहीच कस वाटत नाही?" मी सरळ प्रतिप्रश्न केला.

"बघा बुवा. मी उद्या तुम्हाला पुन्हा गाडी पाठवतो शिवाबरोबर. तुम्हाला वाटल तर जाऊन या पुन्हा वणीच्या देवीला. कदाचित, तेथेच तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे मिळतील!”

एव्हढ बोलून वाघचौरे निघून गेला. आजचा घडलेला घटनाक्रम आणि वाघचौरेन दिलेल suggestion यांचा मेळ काहीकेल्या बसत नव्हता. मी पुढचे १-२ तास नुसताच विचार करत बसलो होतो. आपल्याला देवीच दर्शन झाले नाही याची रुखरुख पण मनाला लागून राहिली होती. आणि मी वाघचौरेला फोन लावला.

"वाघचौरे, मी वणीच्या देवीला उद्या पुन्हा जायला तयार आहे"

"वेरी गुड! जरूर जा."

"पण एका अटीवर!"

"अट? कुठली अट?"

"तुम्ही माझ्या बरोबर आल पाहिजे. याल ना माझ्या बरोबर?"

"ऋतुराज, उद्या माझा कामाचा दिवस आहे."

"कामाचा दिवस? उद्या शनिवार - कामाला तर सुट्टी आहे. मग कुठलं काम?"

"अहो कामाची काय कमी आहे? उद्या मला प्रथम आईला दवाखान्यात घेऊन जायचंय, गुरांना चारा आणून त्यांना खाऊ घालायचाय, गाईच दूध काढायचं, गोठा साफ करायचाय, शेतावरची काम करायची आहेत, मुलांचा अभ्यास घ्यायचाय, आणि शेवटी देवाची पूजा पण करायची आहे!"

"काय, ही सारी काम तुम्ही उद्याच करणार आहात?"

"हो, का?"

"तुम्हाला ही असली काम करताना कंटाळा येत नाही?"

"कंटाळा? कशाबद्दल? नाही बुवा!"

"ते कसं काय?" मी विचारल.

"कारण सांगू? ऋतुराज, माझा अर्धा ग्लास हा भरलेला आहे!” वाघचौरे उत्तरला.

मी काहीच बोललो नाही. "तुम्ही अस करा, उद्या जाताना माझ्या घरापाशी थांबा, त्यावेळेस शक्य असेल तर मी येईन!" वाघचौरे म्हणाला आणि त्याने फोन ठेऊन दिला.

__________________________________

दुसऱ्या दिवशी सकाळी शिवा गेस्ट-हाउसला गाडी घेऊन तयार होता. आम्ही वाघचौरेला घ्यायला जेव्हां त्याच्या घरी पोहोचलो तेव्हां घरामध्ये मला कोणीच दिसेना. खर तर वाघचौरेच घर बघण्याची मला उत्सुकता लागली होती. बरेच दिवस झाले असतील, शहरी जीवनाच्या धकाधकीत, मी गावाकडची राहणी अनुभवलीच नव्हती. बाहेर लावलेल्या झोक्यावर मी क्षणभर विसावलो. आजूबाजूला असणारी गर्द हिरवी झाडी अन त्यातून निघणारे पक्ष्यांचे मधुर नाद, सार वातावरण काहींस जादूमयचं होता. मनाला शांत करणार. बाजूलाच गाईची गोठा होता. कोणीतरी स्त्री गाईच दूध काढत असावी. दूध काढताना तिच्या हातातील बांगड्यांचा होणारा नाद वातावरणात एकप्रकारचा गोडवा आणत होता. मागे मंद आवाजात एक जुन भावगीत लागल होतं.

ते दूध तुझ्या त्या घटातले, का अधिक गोड लागे न कळे!

साईहून मऊ मऊ बोटे ती, झुरूमुरु झुरूमुरु धार काढती!
रुणुझुणु कंकण करिती गीती, का गान मनातील त्यात मिळे!
का अधिक गोड लागे न कळे!

भा. रा. तांबे यांच्या लेखणीतून उतरलेलं आणि लतादिदिनी आपल्या स्वरांनी अजरामर केलेलं हे
भावगीत आज बरेच दिवसांनी माझ्या कानावर पडल होत. मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी धूळ खात बसलेल हे माणिक आज बरेच दिवसांनी काना - मनात निनादल होत.

"गेस्ट हाउस मधलेच पाहुणे तुम्ही ना? तुमच्याकरता एक पाकीट ठेवलाय 'ह्या'नी समोरच्या टेबलावर." आतून आवाज आला.

मी अधीरतेन ते पाकीट उघडल आणि आतील चिट्ठी वाचू लागलो. "प्रीय ऋतुराज, घरकामामुळे मी आज तुमच्या बरोबर येऊ शकत नाही, त्याबद्दल क्षमस्व. तुमच्या प्रश्नांची उत्तरे आज तुम्हाला मिळतील याची मी आशा करतो. आपला, विठ्ठल वाघचौरे."

वाघचौरे आपल्याबरोबर येणार नाही या विचारानं मी थोडा खट्टू झालो अन तसाच उठून गाडीमध्ये जाऊन बसलो. पण त्या भावगीतान आणि वाघचौरेच्या घरातल्या जादूमय वातावरणान माझ मन थोडस खुलल होतं. शिवान गाडी पुढे काढली. नुकतीच पावसाची सर पडली असावी - त्यामुळे वातावरण कस ताजतवान झाल होत. आजूबाजूची हिरवीगार ओलसर झाडी आणि टेकड्या, मधूनच कानावर पडणार पक्षांच कूजन, दुथडे भरून वाहणारे झरे आणि नद्या - सारं कसं आल्हाददायक वाटत होतं.

"काहीं गाणी नाहीत का रे शिवा?" मी विचारल.

शिवान आतली केसेट काढून पटकन लावली. गाण लागल होत: “ते दूध तुझ्या त्या घटातले, काधीक गोड लागे न कळे!”

मी क्षणभर चमकलो. काय, तेच गाण पुन्हा? हे कस शक्य आहे? पण जास्त विचार न करता मी गाण्यात पुन्हा रमून गेलो.

अंधुक शामल वेळ टेकडी! झरा, शेत, तरु मध्ये झोपडी!
त्यांची देवी धारहि काढी, का स्वप्न भूमी बिंबुनि मिसळे!
का अधिक गोड लागे न कळे!!

कवीने आपल्या काव्यात रेखाटलेले चित्र अक्षरशः माझ्या डोळ्या समोर दिसत होते. कालचे वाघचौरेचे बोल मला आठवू लागले. काय या जीवघेण्या स्पर्धेच्या जगात, मी जीवनाचा आस्वाद घेण्याची कलाच विसरून गेलो होतो? मंद स्वरात मागे गाण चालू होत.

या दृश्याचा मोह अनावर, पाय ओढुनी आणी सत्वर!
जादू येथची पसरे मजवर, का दूध गोडही त्याचमुळे!
का अधिक गोड लागे न कळे!!

आजूबाजूला बहरलेल्या निसर्गच रसग्रहण करण्यात गुंग झालेला मी कधी मुक्कामी येऊन पोहोचलो ते माझ मलाच समजल नाही. शिवाने गाडी उभी केली आणी म्हणाला. "साहेब, तुम्ही जाऊन या देवीच्या दर्शनाला." मी भरभर पाय उचलला. आज सारच सोप वाटत होत. मर्कट चेष्टा तर कुठेच नव्हती. देऊळात शिरलो आणि देवीच्या पायावर डोक ठेवल. देवीन मला आज दर्शन दिल होत. मी तीर्थ-प्रसाद घेतला आणि परतीला निघालो. खाली पोहोचल्यावर शिवान लगेच गाडी मागे फिरवली. माझ्या मनात अजून विचारचक्र चालूच होती.

मग, का कुणास ठाऊक, मी शिवाला म्हणालो, "शिवा, आपल्या गाडीला काल जिथे अपघात झाला तिथे पुन्हा एकदा गाडी थांबव. मला ती जागा परत बघायची आहे!"

शिवान त्या ठिकाणी गाडी अचूक थांबविली. मी पटकन खाली उतरलो आणि काल नक्की काय झाले असावे याचा अंदाज घेऊ लागलो. समोरच वळण खरोखरीच अवघड होत. वळणाआडून येणार वहान दिसण्याची तसूभरही शक्यता नव्हती. काल गाडीने करकचून मारलेल्या ब्रेकचा ठसा अजूनही रस्त्यावर दिसत होता. गाडी ज्या ठिकाणी कठड्यावर काल आदळली होती तेथे मी क्षणभर गेलो. आणि, हे काय! पलीकडे खोल दरी होती!! माझ्या अंगावर सरसरून काटा उभा राहिला. याच कठड्याने माझा जीव वाचविला होता. आणि ... आणि... समोरच दृश्य पाहताना तर माझ्या हृदयाचा ठोकाच चुकला! दहा मीटर अलीकडे आणि दहा मीटर पलीकडे कठड्याचे नामोनिशाण नव्हते! काल गाडी जर दहा मीटर अलीकडे किंवा पलीकडे गेली असती तर .....? मला कल्पनाच करवेना! मी मागे फिरलो आणि डावीकडे गेलो - तिथेही तेच! काल गाडी ज्या झाडावर आदळून थांबली होती त्या झाडाच्या बुंध्याचा मोठा भाग गाडीबरोबर झालेल्या आघातामुळे तुटून बाहेर पडला होता! आणि पलीकडे पुन्हा दरी!

मला काल वाचवण्याचा कोणीतरी अतोनात प्रयत्न केला होता!

मला वाघाचौरेच्या प्रश्नाच उत्तर मिळाल होत - कालच्या घटनाक्रमात घडलेली सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे माझा वाचलेला जीव! खरोखरीच, देवानेच काल माझा जीव वाचवला होता! आणि मी? आपल्याला मिळालेल्या जीवनदानाबद्दल देवाचे आभार मानायचे सोडून मी फक्त मर्कटलीलामधेच अडकून पडलो होतो! वाघचौरेवर मिळविलेल्या शाब्दिक विजयावर समाधान मानीत होतो! माझ्या आयुष्यात धन, प्रतिष्ठा - सार तर होत! मग, पाच वर्षात सहा जॉब्स बदलणारा मी, वणवण फिरत काय शोधात होतो जीवनात?

थरथरत्या तनाने आणि मनाने मी तसाच मागे फिरलो. त्या झाडाला कडकडून मिठी मारली अन त्या कठड्या वरून मायेचा हात फिरवला. क्षणभर त्या झाडाखाली विसावलो. मला तहान लागली होती. मी गाडीतून पाण्याची बाटली काढली - त्यातलं उरलसुरलेल पाणी मी ग्लासात ओतलं.

जेमतेम अर्धा ग्लास! मनात विचार आला : 'अर्धा ग्लास भरलेला' कि 'अर्धा ग्लास रिकामा' ?

नाही, नाही! आज हा ग्लास 'अर्धा भरलेलाच' होता!

____________________________________

आता दर वर्षी मी वणीच्या देवीला जातो. देवीच्या पाया पडून देवीच दर्शन घेतो. आणि हो, परतताना त्या झाडाखाली दहा-बारा मिनिटे हमखास बसतो. त्या झाडाचा आता मोठा वृक्ष झालाय! त्या झाडाच्या सावलीत मला एक वेगळाच आनंद मिळतो. आईच्या मायेचा भास मला त्या छायेत होतो. मी तर त्या वृक्षाचे नामकरण 'कल्पवृक्ष' असेच केले आहे! कारण, माझ्या जीवनातील कित्येक क्लिष्ट प्रश्नांची उत्तरे मला याच झाडाखाली मिळाली आहेत!

आणि विठ्ठल वाघचौरे? त्यानंतर तो मला कधीच भेटला नाही. त्याने तो जॉब सोडला होता. खूप प्रयत्न करूनही मला त्याचा पत्ता आजपर्यंत मिळालेला नाही. पण दरवर्षी मी वणीच्या देवीहून परतताना त्याच्या घरात जरूर डोकावून बघतो - या आशेने कि तो कदाचित दिसेल! पण तो काही दिसत नाही. अन नकळत माझ्या तोंडातून शद्ब बाहेर पडतात: "विठ्ठला, परत कधी भेटशील रे?"

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गोष्ट छान रंगवलली आहे .. Happy

पण शेवटचा परिच्छेद उगीच आहे असं वाटलं .. त्यामुळे अचानक एका साधी सरळ (पण खूप मतितार्थ असलेली) गोष्ट अनरिअलिस्टीक झाल्यासारखी वाटली ..

प्रिय मामी, रचु, कल्पु, सुरभि, सशल, चिखल्या आणि श्री,

गोष्ट आवडल्या बद्दल आणि अभिप्राया बद्दल धन्यवाद!

प्रिय चिमुरी, निशीकांत, मित, दक्षिणा, मनस्विता, अनुसया आणि दीपाली,

आपल्या सर्वांचे अभिप्रायाबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

प्रिय टकाटक, अमृता अमित, शिल्पा_के, सायो आणि सर्व जण,

कथा आवडल्याबद्दल आणि आपल्या प्रतीसादाबद्दल धन्यवाद!

Pages