दृष्टांत (टेकडीवरचे झाड)

Submitted by रसप on 2 August, 2012 - 05:51

दिवसाला मिळे समाधी
संध्येच्या काजळडोही
दरवळतो उदास वारा
कानाशी गुणगुणतोही

डोळ्यांना येते धुंदी
पण डोळा लागत नाही
वेळेचे विचारचक्र
पळभरही थांबत नाही

नजरेस सोडतो माझ्या
डोळ्यातुन मुक्त जरासे
ओघळता अश्रू देतो
सुटकेचे श्रांत उसासे

मग दूर टेकडीवरती
धूसर नजरेला दिसते
एका वृक्षाला कुठली
सोबतही उरली नसते

"मी एक एकटा नाही"
दु:खात दिलासा मिळतो
गोंजारुन मीच स्वत:ला
ओल्या डोळ्यांनी हसतो

ती संध्या हलकी हलकी
उतरून मनाच्या काठी
दृष्टांत आगळा देते
सुटती गुंत्याच्या गाठी

झेलाया वादळवारे
कमजोर कुणीही नसतो
अपुल्या शक्तीचा साठा
अपुल्याच मनाशी असतो

आताशा संध्याकाळी
मी रोज झाड ते बघतो
अन पुन्हा झगडण्यासाठी
मी नवीन हिंमत करतो....!

....रसप....
२ ऑगस्ट २०१२
http://www.ranjeetparadkar.com/2012/08/blog-post.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्या बात है.....

ते मात्रा, वृत्त, छंद यातले काही कळत नाही - पण "सुटती गुंत्याच्या गाठी " ही ओळ वाचताना तरी
"गुंत्याच्या सुटती गाठी" अशी योग्य वाटतेय - चूभुदेघे