लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा ९१ वा स्मृतीदिन

Submitted by किंगफीशर on 1 August, 2011 - 02:41

img1080812023_1_1.jpg
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज ९१ वी पुण्यतिथी त्यांच्या प्रेरणादायी पुण्यस्मृतींना विनम्र अभिवादन.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचे देहावसान १ ऑगस्ट, १९२० रोजी झाले. लोकमान्य जाण्याच्या दोन वर्षे आधी रशियात राज्यक्रांती झाली होती. पहिले महायुद्ध नुकतेच संपले होते आणि पराभवाचे शल्य मनात ठेवून जर्मनीने नवी वाटचाल सुरू केली होती.

लोकमान्य गेले तेव्हा चीन मात्र जगाच्या पटलावर फारसा कुठे दिसत नव्हता. ब्रिटिशांच्या साम्राज्याला सुरूंग लागला नसला तरी त्याचा विस्तार थांबला होता; आणि पहिल्या महायुद्धातच दुसऱ्या महायुद्धाची बीजे जशी पेरली गेली, तशीच ब्रिटिशांच्या महासत्तेच्या मावळतीची बीजेही तेव्हाच पेरली गेली, असे म्हणता येईल. या सर्व घडामोडी लोकमान्य पाहात होते. ते देहाने पुणे, मुंबई, कलकत्ता, सोलापूर, कोलंबो, लंडन असे कुठेही असले तरी कोणत्याही मुत्सद्दी राष्ट्रनेत्याच्या मनासमोर नेहेमी जसा जगाचा पट असतो आणि त्या पटाच्या संदर्भात तो आपल्या देशाचा, देशाच्या भवितव्याचा विचार करत असतो, तसेच लोकमान्यांचेही होते.

'केसरी' चे अग्रलेख लिहिताना, पुणेकरांचे मानपत्र स्वीकारताना, बेलगाम टीकेला खरमरीत उत्तर लिहून ते इतर वृत्तपत्रांच्या संपादकांना पाठवताना, राष्ट्रीय पक्षाचे धोरण आपल्या अनुयायांना समजावताना लोकमान्यांच्या मनात कायमच जगात काय घडतंय आणि त्याचा राष्ट्र म्हणून भारताला काय लाभ किंवा तोटा, तसेच भारताचे या पटावर काय भवितव्य याचा विचार चाललेला असे.

सर्वसमावेशक वृत्तीचा, सर्वांना बरोबर घेऊन जाणारा, छोट्यामोठ्या विसंगतींना ओलांडून व्यापक विचार करणारा, आपले जुने हट्ट-आग्रह लोकहितासाठी मागे ठेवणारा, सदोदित देशहित प्रधान मानणारा राष्ट्रनेता कसा असतो याची असंख्य उदाहरणे लोकमान्यांच्या लेखन-भाषणात ठायी ठायी दिसतात. विशेषत: १९०८ ते १९१४ अशी सहा वषेर् मंडालेत कारावास सोसून लोकमान्य पुण्यात परतले. त्यानंतरच्या त्यांच्या सर्वच प्रश्नांवरच्या भूमिका अधिकाधिक परिपक्व, कमालीच्या व्यापक होत गेलेल्या दिसतात. ते झपाट्याने राष्ट्रनेते झालेले दिसतात.

राष्ट्रप्रेमाने भारावलेला एक कुशाग्र बुद्धीचा तरुण आपल्या तशाच तेजस्वी मित्रां समवेत राष्ट्रीय शिक्षण देणारी शाळा काढतो, राष्ट्रीय बाण्याचे वृत्तपत्र काढतो या १८८०मधल्या बाळ गंगाधर टिळकांपासून १९१९मध्ये आपल्यानंतरचे राष्ट्राचे नेते महात्मा गांधी हेच आहेत; हे स्वच्छपणे सांगणाऱ्या, आपल्या अनुयायांना गांधीजींच्या मार्गापर्यंत नेऊन ठेवणाऱ्या लोकमान्यांपर्यंत टिळकांच्या नेतृत्वाचा जो विकास झाला तो थक्क करणारा आहे. गंमत म्हणजे, टिळक राजकीय सुधारणांनाच प्राधान्य देतात, त्यांना सामाजिक सुधारणा नकोच आहेत, अशी त्यांच्या नावाने खडी फोडणारी बहुतेक मंडळी होती तिथेच राहिली. त्यांना टिळकांची समावेशकता साधली नाही!

लोकमान्यांनी अवंतिकाबाई गोखले यांनी लिहिलेल्या गांधीचरित्राला १६ मार्च , १९१८रोजी प्रस्तावना लिहिली. हा टिळकांचा अगदी अखेरचा काळ. त्या प्रस्तावनेला लोकमान्यांनी शीर्षकच 'गांधीजींच्या चारित्र्याचे मर्म' असे दिले होते. या प्रस्तावनेत लोकमान्य गांधीजींचा उल्लेख 'महात्मा गांधी' असा करतात. गांधींसारख्या नेत्याचे चरित्र दरवषीर् नवे लिहिले तरी त्यात समाविष्ट करण्यासारखे भरपूर मिळत राहील, अशा शब्दांत ते गांधीजींच्या कामाला कसा वेग आला आहे, हे सूचित करतात. त्यांनी 'गांधींच्या चारित्र्याचे मर्म' आत्मिक बल अशा शब्दांत सांगितले आहे. आणि हे आत्मबल विद्वत्ता, बुद्धिमत्ता, पैसा किंवा उच्च घराण्यातला जन्म यामुळे येत नाही, असेही लोकमान्य सांगतात. गांधीजींचे आत्मबल सत्य व न्यायावरील निष्ठेतून साकार झाले आहे, असे लोकमान्यांचे अचूक निरीक्षण आहे. महात्मा गांधी यांनीही राजकीय सुधारणांनाच अग्रक्रम दिला आहे; याची नोंद करून लोकमान्य आपला आजवरचा मार्ग कसा योग्य आहे आणि तो पुढे नेणारा त्याच तोलामोलाचा नेता कसा भारताला मिळाला आहे, हे या प्रस्तावनेत स्पष्टपणे सूचित करतात. महाराष्ट्र, मराठी नेते, आपले अनुयायी हे सारे ओलांडून लोकमान्य गांधीजींच्या हाती नेतृत्वाची सूत्रे सोपवण्यास कसे उत्सुक होते, हे या प्रस्तावनेतून लक्षात येते.

लोकमान्यांच्या सामाजिक भूमिकांविषयी वारंवार टीका झाली आहे. पण 'मी स्पर्शास्पर्श मानत नाही आणि सर्वच समाजांच्या लोकांनी एकत्र जेवण्याला माझा विरोध नाही .' अशा शब्दांत लोकमान्यांनी आपली भूमिका मांडली होती. त्यांच्या अखेरच्या वर्षांत चर्मकार बंधूंनी स्थापन केलेल्या पतपेढ्यांचे उद्घाटन करण्यासाठी लोकमान्य स्वत: सोलापुरात गेले. तेथे त्यांनी केलेले भाषण त्यांच्या परिणत सामाजिक भूमिकेचे दर्शन घडवणारे आहे. लोकमान्य म्हणाले, 'कोणत्याही जातीने इतर कोणत्याही जातीला उच्चनीच समजणे योग्य नाहीच. केवळ चर्मकारांचाच नव्हे तर सर्वच समाजांचे उद्योगधंदे मारले गेले आहेत. आपल्या कर्तबगारीने हे सारे उद्योग पुन्हा समर्थपणे उभारणे आवश्यक आहे. ब्राह्माणांनी जसे कोणत्याही जातीला कमी लेखणे योग्य नाही, तसेच इतरही सर्व जातींनी आपसातला उच्चनीच, आपपर भाव टाकून द्यायला हवा. 'ब्रिटिशांनी लोकमान्यांना तेल्यातांबोळ्यांचे पुढारी म्हणून हिणवले होते. पण ती तर टिळकांची बिरुदावली ठरली. ती बिरुदावली सार्थ ठरवण्यासाठी लोकमान्यांनी आपल्या नेतृत्वाचा बेस सतत वाढवत नेला. मुंबईतल्या गिरणी कामगारांचे लोकमान्यांना जे प्रचंड पेम मिळाले तेही त्यांच्या सर्वमान्य नेतृत्वाची खूण पटविणारे आहे.

लोकमान्यांना पुणेकर नागरिकांच्या वतीने ९ डिसेंबर, १९१९रोजी जाहीर मानपत्र देण्यात आले. ही घटना त्यांच्या मृत्यूच्या आठ महिने आधी घडलेली. यावेळी सत्काराला उत्तर देताना लोकमान्य श्रोत्यांना इंग्लंडातला मजूर पक्ष आणि रशियन राज्यक्रांतीची उदाहरणे देतात. रशियात झारशाहीचे भूत गाडले गेले आहे. पण जगात आजही हे भूत ब्रिटिश सत्तेच्या रूपाने जगात शिल्लक आहे, अशा शब्दांत ते ब्रिटिश सरकारवर थेट हल्ला चढवतात. इंग्लंडमधला मजूर पक्ष तिथल्या भांडवलशाहीच्या चरकाखाली दडपला गेला आहे. याचवेळी आपण त्यांचे साह्य घ्यायला हवे, असा उघड सल्ला सर्वांना देतात. त्यांच्यावर वर्षानुवषेर् हल्ला चढवणाऱ्या मवाळपंथीयांना ते याच भाषणात सडेतोड उत्तरही देतात. पण लोकमान्यांचा भर त्यापलीकडे जाण्यावर, जगाचे बदलते रूप समजावून देण्यावर आणि स्वराज्याचे ध्येय सर्वांच्या मनावर ठसवण्यावर आहे. याच सभेत लोकमान्यांना पैसे खाल्ल्याच्या निर्लज्ज आरोपांनाही उत्तर द्यावे लागले आहे. तेही त्यांनी त्यांच्या आक्रमक शैलीत दिले. 'महाराष्ट्रात अशा स्वरुपाचे इतके हल्ले सोसावे लागलेला मीच असेन,'असे खंतावणारे उद्गारही लोकमान्य काढतात. पण सर्वांना समवेत घेऊन जाण्याची त्यांची भावना' आज तुम्ही मला विकत घेऊन टाकले आहे. सर्वांच्या हितासाठी अखंड काम करत राहणे, इतकेच माझ्या हातात आहे, 'अशा भावपूर्ण, कृतज्ञ उद्गारांमधून प्रकट झाली आहे. या सभेत चिरोल खटला हरल्यामुळे साऱ्या खर्चाची भरपाई म्हणून तीन लाखांची थैली देण्यात आली. लोकमान्यांना मानपत्र देणाऱ्यांचा आवाज आकाशाला भिडलेला आणि त्यांच्या विरोधात आवाज करणारे मात्र हाताच्या बोटांवर मोजायला लागणारे.

लोकमान्यांचे नेतृत्व सर्वसामान्यांमध्ये किती मुरले होते, याचे दर्शन घडवणारी ही मानपत्राची सभा होती. ही लोकमान्यांच्या अगदी अखेरच्या काळातली सभा. त्यामुळे ते आपले सारे हृदगत, आपल्या आयुष्याचे ध्येय श्रोत्यांना सांगून टाकतात. त्याचवेळी देशातल्या स्वराज्यप्रेमी जनतेेने काय करायला हवे, याचेही दिग्दर्शन करतात. तसे म्हटले तर ते यावेळी देशातल्या प्रत्येकच देशप्रेमी नागरिकाला उद्देशून बोलत होते. या सभेनंतर काही महिन्यांनी लोकमान्यांचे मुंबईत देहावसान झाले. त्यावेळी मुंबईत सागराच्या किनाऱ्यावर जो आम जनतेचा जनसागर उसळला, तो जनतेच्या हृदयात लोकमान्यांचे काय स्थान आहे, हे दाखवणारा होता. एका तरुण संपादकापासून सर्वमान्य राष्ट्रीय नेत्यापर्यंत लोकमान्यांचा प्रवास कसा झाला , याचा हा जनसागर म्हणजे जिवंत इतिहासच होता!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टिळकांसारखे व्यक्तिमत्व त्यांच्या आधी दहा हजार वर्षात झाले नाही आणि पुढील दहा हजार वर्षात होणार नाही. अजुन ९ वर्षांनी त्यांच्या निधनाला १०० वर्षे पुर्ण होतील तरी देखील त्यांची स्मृती कायम राहिली आहे तसेच त्यांचे विचार लोकांना अभ्यासावेसे वाटतात यातच सारे काही आले.

या धाग्याला निव्वळ ७ हीट्स...!!! <<<
काय करणार इथे फराहान अख्तर किंव्हा आमीर खान नाही आहे ना.

काय करणार इथे फराहान अख्तर किंव्हा आमीर खान नाही आहे ना.>>>>>>>>>>>>>>>
बरोबर.............. फालतु चे इथे काही वाद चर्चा होणार नाही...............म्हणुनच

त्रिवार अभिवादन..................टिळकांचे विचार १% जरी राजकारण्यांनी उचलले तर परत परत बॉम्बस्फोट वगैरे होनारच नाही.......देशाची मान कशात ही खाली जानार नाही

जो तो वंदन करी उगवत्या
जो तो पाठ फिरवी मावळत्या
रीत जगाची ही रे सवित्या
स्वार्थपरायणपरा
मावळत्या दिनकरा
अर्घ्य तुज जोडुनि दोन्ही करा

लोकमान्यांसारख्या लोकोत्तर महापुरुषाचे चरित्र श्री. गंगाधर गाडगीळांनी लिहिले आहे - "दुर्दम्य" या नावाने - फार अप्रतिम पुस्तक आहे हे..... माहितीपूर्ण, वाचनीय व संग्राह्य.
लोकमान्यांना सादर प्रणाम.

अरे वा.. कुठे मिळेल? पेक्षा कधी आले बाजारात? प्रकाशन कुठले?
(महेश, मायबोली रसग्रहण स्पर्धेत लिहा असे सूचित करतो.)

>>महेश, मायबोली रसग्रहण स्पर्धेत लिहा असे सूचित करतो
इकडे आलेला प्रतिसाद उशीरा पाहिला. पण तरीदेखील मी रसग्रहण लिहिण्याचा योग येणे अवघड आहे. कारण "दुर्दम्य" नावाप्रमाणेच आहे. आणि त्याचा आवाकापण मोठा आहे.

‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ अशी सिंहगर्जना करून ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीविरुद्ध हिंदुस्थानी जनतेत असंतोषाची बीजे रोवणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज ९२वी पुण्यतिथी. त्यांच्या प्रेरणादायी पुण्यस्मृतींना विनम्र अभिवादन!

लोकमान्यांच्या स्मृतीला त्रिवार अभिवादन!!

धन्यवाद हा धागा योग्य वेळी पुन्हा वर आणल्याबद्दल.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज ९२वी पुण्यतिथी. त्यांच्या प्रेरणादायी पुण्यस्मृतींना विनम्र अभिवादन!
"लोकमान्यांनी अवंतिकाबाई गोखले यांनी लिहिलेल्या गांधीचरित्राला १६ मार्च , १९१८रोजी प्रस्तावना लिहिली. हा टिळकांचा अगदी अखेरचा काळ. त्या प्रस्तावनेला लोकमान्यांनी शीर्षकच 'गांधीजींच्या चारित्र्याचे मर्म' असे दिले होते. या प्रस्तावनेत लोकमान्य गांधीजींचा उल्लेख 'महात्मा गांधी' असा करतात. "- हे माहित नव्हते.
नारायणराव राजहंसांचा 'बालगंधर्व' लोकमान्यांनी केला त्याप्रमाणे मो. क. गांधींचा उल्लेख 'महात्मा' असा करणारे पहिले महापुरुष लोकमान्य तर नाहीतना?
'दुर्दम्य' वाचले आहे. अप्रतीम आहे. श्री. ना. पँडसे यांनीही जाण्यापूर्वी टिळकांवर कादंबरी /चरित्र लिहिले आहे असे ऐकले आहे . पुस्तकाचे नाव कोणास माहीत आहे का?

महात्मा ही पदवी टिळकानी दिली की टागोरानी दिली?
राष्ट्रपिता ही पदवी नेताजीनी दिली.

बालगंधर्व ही पदवी टिळकानी दिली.

टिळकानाही पदवी होती.. हिंदी ( भारतीय) असंतोषाचे जनक... कुणी दिली होती? कुणीतरी इंग्रज गवर्नर / तत्सम कुणीतरी?

टिळकाना नमस्कार.

>>टिळकानाही पदवी होती.. हिंदी ( भारतीय) असंतोषाचे जनक... कुणी दिली होती? कुणीतरी इंग्रज गवर्नर / तत्सम कुणीतरी? <<
त्या इंग्रजाचे नाव 'चिरोल' कि ज्याच्यावर त्यांनी खटला भरला. तो चिरोल केस म्हणून गाजला.

टिळक यांनी लिहिलेला "या सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?" हा संपूर्ण अग्रलेख असल्यास त्याची लिंक द्यावी.

मो. क. गांधींचा उल्लेख 'महात्मा' असा करणारे पहिले महापुरुष लोकमान्य तर नाहीतना? >>>

लोकमान्य असा उल्लेख कुणी केला ?

लोकमान्य गेले तेव्हा चीन मात्र जगाच्या पटलावर फारसा कुठे दिसत नव्हता. ब्रिटिशांच्या साम्राज्याला सुरूंग लागला नसला तरी त्याचा विस्तार थांबला होता; आणि पहिल्या महायुद्धातच दुसऱ्या महायुद्धाची बीजे जशी पेरली गेली, तशीच ब्रिटिशांच्या महासत्तेच्या मावळतीची बीजेही तेव्हाच पेरली गेली, असे म्हणता येईल. या सर्व घडामोडी लोकमान्य पाहात होते. ते देहाने पुणे, मुंबई, कलकत्ता, सोलापूर, कोलंबो, लंडन असे कुठेही असले तरी कोणत्याही मुत्सद्दी राष्ट्रनेत्याच्या मनासमोर नेहेमी जसा जगाचा पट असतो आणि त्या पटाच्या संदर्भात तो आपल्या देशाचा, देशाच्या भवितव्याचा विचार करत असतो, तसेच लोकमान्यांचेही होते. >>>>> अगदी खरे आहे.
लोकमान्यांचा एकंदरीत जीवनपटच आगळा-वेगळा -
१] मुत्सद्दी, राजकारणी - मात्र नि:स्पृह आणि अतिशय निर्भिड व्यक्तिमत्व.
२] राष्ट्र्कार्याला संपूर्णपणे वाहिलेले जीवन
३] सतत व्यापक विचार व दूरदृष्टी असणारे
४] जगातील सर्व घडामोडींवर सतत नजर
५] स्वतःच्या मतांवर अतिशय ठाम, कणखरपणे आपली बाजू मांडणारे
६] जिनियस कॅटॅगरीतले गणिती व खगोलशास्त्रज्ञ
७] संस्कृततज्ज्ञ
८] उत्कृष्ठ वकील - (कधीही पैसे न घेता सर्वसामान्यांना अभ्यासू वकिली सल्ला देणारे एकमेव वकील असावेत)
९] समाजमन ओळखून त्याप्रमाणे सर्वांना सामावून घेणारे
१०] आपल्या साथीदारांची अतोनात काळजी वाहणारे
११] गीतारहस्य लिहिणारे
१२] सर्वात महत्वाचे - निष्काम कर्मयोगी - ही गोष्ट जगून दाखवणारे अती दुर्मिळ राजकारणी.

असा महापुरुष पुन्हा होणे नाही - एकमेवाद्वितीयम - त्यांच्याचरणी सादर प्रणाम.

आणखी ५ वर्षानी लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त गेल्या १०० वर्षात आणि भविष्यात ही टिळकांच्या कार्याचे आणि विचारांचे महत्त्व यावर चर्चा जरुर व्हावी , मध्यंतरी 'भाजी ब्रिगेड सारख्या फालतू संघटनानी टिळकांवरही "ब्राह्मणी"पणाचा आळ घेवून आपला वैचारिक खुजेपणा सिद्ध केला होता , त्या पार्श्वभूमीवर येणार्या पिढीला टिळकान्ची खरी ओळख करून देणे आवश्यक ठरते....
असो

लो.टिळकाना पुण्यतिथीनिमित्त सादर अभिवादन !

समयोचीत लेख !
लोकमान्यांना त्रिवार विनम्र अभिवादन !

लोकमान्यांचे कै. न. चिं. केळकरांनी लिहीलेले चरित्र माझ्या मते जास्त व्यापक आणि सर्वसमावेषक आहे. त्यांच्या सर्व गुणदोषांसहीत उतरले आहेत. हे चरित्र एकुण तीन खंडात आहे.

IMG01062-20130923-1852.jpg

लोकमान्य टिळकांच्या स्मृतीस मनःपुर्वक अभिवादन !

विशाल, केळकरांचे पुस्तक सुचवल्याबद्दल धन्यवाद.

पुढील पुस्तकही चांगले असावे.

ADurdamya.jpg

Pages