रिमझिमतो हृदयात सारखा गतकाळाचा मेघ सावळा!

Submitted by सतीश देवपूरकर on 30 July, 2012 - 10:04

गझल
रिमझिमतो हृदयात सारखा गतकाळाचा मेघ सावळा!
वैशाखाचा दाह भोवती, आत परंतू ऋतू वेगळा!!

लकाकताना विजा स्मृतींच्या, क्षणात उजळे व्योम मनाचे;
मृद्गंधाचा सडा दरवळे चित्तामध्ये जणू आगळा!

स्वप्नांच्या उमलल्या कळ्या अन् मोहरले रोमरोम गात्री;
प्राणामध्ये सुरू जाहला एक अनोखा रंगसोहळा!

लावण्याने नटली सृष्टी, नजर हवी ती पहावयाला;
अवघा देहचि झाले डोळा, भले जरी मी असे आंधळा!

त्या वृष्टीने पुन्हा पेरल्या हृदयामध्ये नवीन आशा!
मातीमधुनी वर डोकावे नवस्वप्नांचा कोंब कोवळा!!

अखेर तो पाऊस थांबला, पण पाघोळ्या झरत राहिल्या;
थेंब थेंब मी वेचत बसलो, म्हणो कुणीही मला वेंधळा!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

गुलमोहर: 

व्वा! देवसर....हॄदयतली ही रिमझीम बरसात अतिशय छान कोरली आहे. मला प्रत्यक शेर खासच आवडला.

मतला आणि शेर १-२ अतिशय आवडले.

अवघा देहचि झाले डोळा, भले जरी मी असे आंधळा! ... व्वा.

......एखादा चित्रकार जसे आपल्या अप्रतिम कलाकृतीमध्ये अचुकतेने रंग भरत जातो तसे तुमच्याकडे भाषा- शब्द- उपमा प्रतिमा आणि प्रतिके यांच्यातून एक अप्रतिम रसायन निर्माण करण्याची कला ही अप्रतिमच आहे.

..हा रंगीत आनंद दिल्याबद्दल -- धन्यवाद.