आषाढी सांज

Submitted by ओवी on 27 July, 2012 - 14:11

ढगांची रांग आषाढी सांज
कधीच नाही सरायची

ओलेत्या मनात हव्याशा स्वप्नात
खरीखुरी चिंब जगायची

धुक्याच्या कुपीत धारांच्या मिठीत
थेंबथेंब नक्षी रेखायची

सजल छायेत देवाच्या मायेत
चातक चोचीने झेलायची

हिरव्या रानात पिवळ्या ऊन्हात
भान हरपून भूलायची

वार्‍याचा मारवा शिरशिर गारवा
थरारुन झोकात फुलायची

नाना परींच्या नाचर्‍या सरींच्या
पाऊलखुणा शोधायची

आभाळ तोलीची हिरव्या बोलीची
अवखळ गीते बोलायची

ढगांची रांग आषाढी सांज
कधीच नाही सरायची

क्षणांच्या गतीत हळव्या स्मृतीत
अलगद जपून ठेवायची !

गुलमोहर: 

ओवी, गोड जमली आहे. पहिलीच कविता ना? Happy एकदम पावसाळी संध्याकाळचं चित्रं आलं डोळ्यासमोर.

आता या नंतर काही वाचत नाही. आता खरंच प्रचंड झोप आली आहे. पाऊस नाहीए तर छानशी पावसाची स्वप्न तरी येवु देत कवितेमुळे. Happy गुड नाइट !

धन्यवाद मंडळी!
श्रावणात आषाढाची कविता? >>>> नानुभाऊ, आषाढातच टाकणार होते.... तेवढ्यात नी ची 'पाऊस' ही काकाक वाचली (जी अज्जिबात 'काकाक' नाहीये, उलट एकदम नितळ पारदर्शी आणि प्रामाणिक आहे! ) मग परत एकदा धीर गोळा करून टायपेपर्यंत श्रावण की हो उजाडला! Happy