आठणींच कपाट-भाग २

Submitted by विनीता देशपांडे on 28 July, 2012 - 12:23

नचिकेतच्या डोळ्यासमोर क्षणभर काळीसावळी धीट मुलगी उभी राहिली...पण गार्गी माझी आई तर गोरी पान मग हे सगळं कोणी लिहिलं असावं ? कोणाची ही डायरी ? त्याच्या चेहर्‍यावर प्रश्नार्थक भाव बघून अनुला गहिवरुन आलं. त्याचा हात हातात घेत म्हणाली...रात्र फार झाली आहे उद्द्या वाच...पण नचिकेतची उत्सुकता आता शिगेला पोहचली होती. याचा सबंध आपल्याशी कसा हे त्याला जाणून घ्यायचं होत..पण आत्तापर्यन्तच्या वाचण्यातून त्याला कुठलाच अंदाज येत नव्हता. डायरीतील एकुलत्याएक गार्गी बद्दल तो विचार करु लागला. डायरीच्या शेवटच्या पानांमधे काही फोटो होते..तो ते निरखून बघू लागला. एका १७-१८ वर्षाच्या तरुणीचे फोटो होते, पण ते ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाइट आणि जुने असल्यामुळे काहीच कळत नव्ह्ते. त्याने फोटोच्या मागे बघितले " गार्गी देवदत्त खानोलकर..ता.१९/१२/१९७६" आणि कुठ्ल्यातरी स्टुडिओचे नाव देखिल लिहिले होते. हेच नाव आता त्याच्या डोक्यात पिंगा घालत होते. कोण ही गार्गी ? माझ्या आईच नाव गार्गी..माझा या सर्वांशी काय सबंध?
सुहास तर माझ्या बाबांच नाव.
त्याच्या विचारांची गाडी यावरच येऊन थांबत होती.
त्याच्या लहानपणी आई तिच्या अनेक आठवणी सांगायची...पण याचा उल्लेख त्याला ऐकल्याचा आठवत नव्हता....हं एक मात्र त्याला नक्की आठवतय की आई त्याला या कपाटाला हात लावला तर फटके लावायची. तिच्या खूप आठवणी निगडीत आहे असं ती नेहमी म्हणत असे...तसं पाहिलं तर त्या कपाटात जुन्या सामानाखेरीज काही विशेष नव्हते हे त्याला आठवत होते. घरातील नवे फर्निचर करतांना ते मोडीत काढण्याचा विचार त्याने आई बाबांपूढे मांडला होता पण आई तयार झाली नाही तर त्याने त्या कपाटाभोवती लाकडाचे दोन दार बसवुन ते जुनं कपाट इतरांना दिसणार नाही अशी व्यवस्था केली होती. बाबा नेहमी ते तुझ्या आईच आठवणींच कपाट आहे रे..म्हणून टिंगल करायचे.

पाणी पिऊन नचिकेतने परत डायरी वाचायला घेतली.
मधली बरीचशी पानं कोरी होती.

२५/०९/१९७५
मधले दिवस कसे भुरकन उडून गेलेत. किती प्रयत्न केला डायरी लिहायचा, पण शक्यच झालं नाही.
......अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करायला हवा म्हणून कॉलेज मधे हुद्दार सर वेगाने शिकवत होते.
काय कोण जाणे बाबा आज नेहमीसारखे वाटले नाही. बॅंकेत काही प्रॉब्लेम आला असं वाटत आहे, कारण लिमये काका हल्ली रोज येत आहेत. त्यांच्या बोलण्यावरुन तरी काही अंदाज येत नाही आहे. असो...बाबा सक्षम आहे समस्या सोडवायला. आई मात्र उगीच काळजी करत बसते.
कुमुदच लग्न जमलं. ऐकून फार आनंद झाला नाही.
कुमुद किती हुशार आहे...तिने अजून शिकायला हवे...पण तिच्या वहिनीच्या नात्यातल्या मुलाने मागणी घातली म्हणे...पण कुमुदने नाही म्हंटले असते तर..असो हा ज्याचा त्याच्या घरचा प्रश्न आहे..मला वाटून काय उपयोग...कुमुदपण लग्नाला सहज तयार झाली याचं मला आश्चर्य वाटलं....सुमी तरी कुठे खुश आहे हे ऐकून...असो आमची एक मैत्रीण आम्हाला सोडून मराठवाड्यात जाणार या दु:खाचा भार आम्हाला सध्यातरी पेलवत नव्हता. कुमुदला याबाबत सल्ला हवा असता तर तो तिने मागितला असता....याविषयावर तिच्याशी बोलू असा सुमीचा हट्ट चालूच होता पण मी कुमुदच्या लग्नाबद्दल तिचे आईवडिल समर्थ असतांना आम्ही काय बोलणार. शेवटी ज्याने त्याने आपआपल्या आयुष्याचे निर्णय पडताळून बघणे योग्य असते...(अर्थात असे माझे बाबा म्हणतात ) यावर मी ठाम होते. कुमुद तशी अबोल आणि साधी सुधी....या विषयावर तिने आपले मत घरच्यांना सांगितले नसणार...असं सुमीचं म्हणण....तो तिच्या आयुष्याचा प्रश्न आहे...यावर तिने गंभीरपणे विचार करायलाच हवा. हे माझं म्हणण. या वरुन माझी आणि सुमीची बाचाबाची झालीच....शेवटी कुमुदला गाठून आम्ही तिला विचारलं.....ती आमच्याशी मोकळी बोलली नाही.......मी तिला चारचारदा विचारलं...लग्नाबद्दल तुझ्या काही अपेक्षा असतील..स्वप्न असतील..त्या कल्पनेत तो मुलगा बसतो का? पठ्ठी काही बोलायला तयार होईना. आम्ही दोघींनी या विषयावर बोलायचं सोडून दिलं.
आजच्या ओळी: कुमुदला समर्पित गोविंदाग्रजांची "गोफ" कविता...जो ती अर्धाच विणून पूढे निघाली....वेगळ्या वाटेवरुन...
पदर आणिले तुझे कांही तूं, माझे आणि मीहि तसे
हांसत खेळत गोफ गुंफिला, कळले नाही कधी कसे

एकमेकांभवती फिरतां , गिरकी जीवांना आली
चढत चालला खेळ जसा तो, नजरहि धुंद तशी झाली

परि दैवाचा खेळ निराळा- खेळ नकोसा तुज झाला
ज्या खेलाने जीव रंगला, त्याचा कंटाळा आला......

थांब, उलगडूं गोफ कठीण हा शांत बुद्धिने सखे असा-
की न तुटावा पदर एकही, धागा धागा नीट तसा

२/१०/१९७५
दिवाळी जवळ आली. सगळे दिवाळीच्या तयारीत मग्न आहेत. आम्ही मैत्रिणी नवा सिनेमा " शोले " बघायचा विचार करत आहोत. सर्वांच्या घरुन परवानगी मिळाली पाहिजे. तरच मज्जा. अमिताभ माझा आवडता नट. माझा काय सर्वांचाच. आई कुमुदच केळवण करायच्या मागे होती..रुखवंतासाठी तू काहीतरी कर म्हणून माझ्या मागे लागली होती..तेव्हा मला कळलं जे या वयात येणार्‍या मुलींना कला येते ती मझ्या अंगी नाहीच.. भरतकाम..रांगोळी..मेहंदी...शिवणकाम..बापरे..मला हे शिकायला लागणार या भितीने अंगावर काटाच आला. मी असल्या गोष्टींमधे कधीच रमली नाही आणि असलं काही शिकावं किंवा या गोष्टी मला यायलाच पाहिजे असं कधीच वाटलं नाही. सुधा आजीकडे प्रत्येक दिवाळीत रांगोळी काढायची मी कशीही काढली तरी छान म्हणायची.
आई गौराबाईकडून घरची साफसफाई करुन घेत होती. सुधा आजी आणि आई दिवाळीतील फराळाची यादी आणि तयारी करत होत्या. सुधा आजी तशी एकटीच असते. तिला दोन मुली एक दिल्लीला एक मुंबईला...एक जावाई मंत्रालयात तर एक मिल्टरीत. मिल्टरीत असणार्‍या मुलीची वारंवार बदली होत असे. अधून मधुन त्या यायच्या पण तशी आजी एकटीच रहात असे...चार वर्षापूर्वी आबाही निवर्तले...तेव्हापासून आम्हीच त्यांच्या घरचे होतो. आई बाबा त्यांच्याकडे जातीने लक्ष द्यायच्या. अधून मधुन त्यांचे नातेवाईक मंडळी येऊन राहून जायची. माझ्या तर दिवसातून चार चकरा होतात हे नेउन दे..ते घेउन ये... सतात चालायचच.
एकंदरित दिवाळीची चाहूल लागली होती...मैत्रिणी नवे कपडे नवे ड्रेस घेण्याबद्दल चर्चा करत होत्या.माझ्या सर्वात नावडता विषय होता तो. आपाअपल्या आवडिने घ्यायचे आणि घालायचे त्यात एवढी तास न तास चर्चा करण्यात वेळ कसा काय वाया घालवतात या सार्‍याजणी मला कधीच कळले नव्हते आणि जाणून घेण्यातही रस नव्हता. मला सार्‍या अरसिक म्हणून चिडवायच्या... मला खरच आवडत नव्हतं हे सारं. आजच्या ओळी:
माझ्यासाठीच कवी बींची "अनुकार" या कवितेतील ओळी :
दोष कुणाला ? एकदां निखालस बोला.
भूभृत्कटावृतनखंडी,
कटु वागजल्पनतांडव मांडी
प्रतिध्वनिप्रति परिसुनि सांडी
निज भानाला, एकदा निखालस बोला.......
या रचनेतील शेवट्ची दोन कडवी खूप छान आहेत
अमोघ बळ शब्दांचे पाही
आंत साठवी अनन्तासाही
शब्दे शब्द कसा मग जाई
हा हारीला ! एकदा निखालस अबोला.
अंधार नगराचाचा उलटा न्याय
अदंडय दंडा भाजन होय
पय घटिका पी, घड्याळ हाय
खाई टोला, एकदा निखालस बोला

५/१०/१९७५
कॉलेजमधे परीक्षा सुरु झाल्यात. बाबांनी आजच माझ्या रेडिओ ऐकण्यावर नाराजी व्यक्त केली. मला त्यांचा थोडा राग आला.. तसा बाबांचा राग येत नाही, आला तर लवकर निवळतो...आईच मात्र तसं नाही...आमचा अबोला बरेच दिवस असतो. बाबांच्याच मध्यस्थीने तो बोलका होते. बाबांचा मूड आज छान होता..बहुतेक त्यांच टेन्शन संपुष्टात आलं असाव. देवाची कृपा....अरे...माझ्या तोंडून हे शब्द ऐकून मीच चरकले...पण मी नास्तिक ,नाही श्रध्द्दाळु आहे....याची जाणीव मला आजच झाली. " परिस्थिती माणसाला खूप काही शिकवते" आणि "परिस्थिती माणसाचा अदृष्य गुरु आहे" हे माझ्या बाबांचे ठरलेली वाक्य.....मी हसते या वाक्यांना पण ते म्हणतात मोठी झाल्यावर पटेल तुला. आमचे असे शाब्दिक मुक्तकं बरेचदा होत असत. आणि आईच या मुक्तकांना पूर्णविराम देत असे..आणि नेहमीच माझ्या बाबांना मला लाडवून ठेवल्याचा टोमणा ऐकावा लागत असे.
माझा अभ्यास तसा बरा चालला आहे. भिती आहे ती रसायनशास्त्राच्या पेपरची .सुमीचे पेपर तिच्या चेहर्‍यावरुन कळत होते की ठीकठीक गेले ते.....हल्ली अभ्यासत तिच लक्ष नसतं. परिक्षेच्या टेन्शनने आज कुठलीच कविता आठवत नाहीया. खरच...अगदी कुठलीच नाही. ( मी कुठलीच शपथ कधीच घेत नाही आणि खोट कधी बोलत नाही ) मला या शपथ घेण्याची का कोणजाणे लहानपणापासून चीड येते. लहानपणी कळत नव्हते ते का म्हणून, पण आता असं वाटत की शपथ घेणे म्हणजे आपणच समोरच्या माणसाच्या मनात अविश्वास निर्माण करणे.

१५/१०/१९७५
संपली एकदाची परीक्षा. तिमाही परिक्षेच मला टेन्शन आलं होतं, हं...थोडसं.....आलं होतं. कुमुदच्या घरी तिच्या लग्नाची बोलणी आहे असं कळल्यावर आम्ही ती आटोपल्यावर सिनेमा बघायच असं आज ठरवलं. कुमुदचा निरंजन दादा तिकीटं काढून देणार होता. नेहमीप्रमाणे ललिता, वेणू, विजया, रेणुका आणि गौरी यांच्या घरुन "ना हरकत परवाना मिळवणे" हे माझं मिशन होतं. तसा हा आमचा नेहमीचा कार्यक्रम..सिनेमाचं ठरलं रे ठरलं...मैत्रिणींच्या आई वडिलांकडून होकार आणायची जवाबदारी माझ्यावर असायची. बहुतेक पालक तू जाणार आहेस ना..मग पाठवते. असं म्हणत हो म्हाणायचे.
आजच्या ओळी कॉलेजमधे शिकवलेली बहिणाबाईंची "मन" या कवितेतील आहे.
मन वढाय वढाय
उभ्या पिकातल ढोर
किती हाकला हाकला
फिरे येतं पिकांवर......

......मन पाखरु पाखरु
त्याची काय सांगु मात
आता व्हतं भुईवर
गेलं गेलं आभायत.
३०/१०/१९७५
काय हल्ली डायरी लिहायला होत नाही....की मीच लिहित नाही. दोन गोष्टी गेल्या आठवड्यापासून मला त्रास देत होत्या ते म्हणजे आईकडून कळलं की कुमुदच्या लग्नात बर्‍यापैकी हुंडा मागितला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ,खर तर हे गुपित मी लिहू नको लिहू या संभ्रमात होते. म्हणून डायरी लिहिणे टाळत होते. सुहास दादाच्या आपल्या घरी चकरा नेहमीपेक्षा वाढल्या आहे. सुमीच सुहासदा असतांना सतत येणं मला कधीच लक्षात नाही आलं ...पण आज समितीतून येतांना मी दोघांना कॉरपोरेशनच्या शाळेजवळ बघितलं. दोघं नेहमी सारखी बोलत होती....."पण"........? मला काही तरी वेगळच वाटलं. हा "पण" शोधून काढायलाच हवा.
सुमीला थेट विचारुन टाकते... बघू...काही सांगते का ? कुमुदच्या लन्गाबद्दल माझ्या मनात का सारख्या शंका येत आहेत माहिती नाही. कोणाला विचारु ? आईला, हो अरेच्चा आईलाच विचारुया. या विचारानं मलाच हायसं वाटलं. माझी आई मला कधीच चुकीचा सल्ला देणार नाही याची मला खात्री होती.
आज वर्तमानपत्रात एक सुंदर कविता छापून आली होती...
कवि बींची "आठवण" कविता :
ऊन उतरते होतें, वारा पडला होता बंदी
दिशादिशांच्या नेत्री भरली होती मादक धुंदी

नेती जिकडे पाय मागुनी शरीर तिकडे जातें
शून्यत्वाचा अभाव उघडे डोळे पहात होते

मंदावत पाउले चालली खिन्न मनाच्या भारें
तीव्र भाव हो जसा मंदतर अवास्तविक विस्तारें

मूर्तीमंत रुक्षता वावरे अफाट त्या मैदानी
उडता जीव न दिसला एकही ध्वनि नच पडला कानी

रिता एकटेपणा जगी या भीषणतर भारी
साक्षात्कारी अनुभविली मी मारकता ती सारी.
या उदास ओळींचा मला फारसा अर्थ कळला नाही पण का कोण जाणे माझ्या मनाला खूप भावल्यात.

४/११/१९७५
आईशी मी कुमुदच्या लग्नाबद्दल बोलले...तिने मला कुमुद या लग्नाला मनापासून तयार आहे का एवढाच प्रश्न विचारायला सांगितला. कारण आईच्या मते कुमुदच्या घरचे तिच्या सासरच्या मंडळींवर खूपच खूश आहेत.
त्यांची आर्थिक परिस्थिती तर छानच होती..त्यांचा त्यांच्या गावात दरारा आणि रुबाबही होता , अशा स्थळाला नाही म्हणणे ते शक्य नव्हते. कोणाच्या खासगी निर्णयात ढवळाढवळ करण्याचा आम्हाला अधिकारही नव्हता.
माझी कुमुद्बद्दल काळजी करणे हे आईलापण रास्त वाटले. असो....आई आपल नेहमीच वाक्य " प्राक्तन आपल्या हाती नसत...ज्याचे त्याला मिळणारच शेवटी " बोलुन मोकळी झाली. मीही ठरवले आईने सांगितलेले ऐकायचे. आजच्या ओळी: मनातलं न सांगणार्‍या कुमुदसाठी सांग पोरी सांग सारे ही मनमोहन यांची कविता
सांग पोरी सांग सारे, सांग पोरी सांग सारे
लाजतेस का ? सांग सारे.......................
कुंकुभाळी पांगलेले, गाल दोन्ही गुंजलेले
मैत्रीणीशी बोलतांना, अंग तुझे का शहारे ?

>>>>>>>>>>>>>>>.......<<<<<<<<<<<<<<<<<<<
"या ओळी वाचून नचिकेत सुन्न झाला. डायरी वाचत तो कोणत्या विश्वात पोहचला होता.....या कथेत मी इतका गुंतलो आहे. वेळेचं भान नाही...काळाचं भान नाही. कोणी तरी गोष्ट सांगतो आहे आणि तो ऐकतो आहे असा त्याला भास झाला.......तो स्वत:शीच बोलतांना बघून ,कॉफी घेणार का ? अनुने विचारले.
थोडसं भानावर येत तो म्हणाला हं कर चालेल.
कुमुद...सुमी..सुहास....गार्गी....तिचे बाबा...यात नचिकेत कुठेतरी स्वत:लाच शोधत होता.
कॉफी पिउन नचिकेतने परत डायरी वाचायला सुरवात केली..
मधली बरीच पानं रिकामी होती.
काही फोन नंबरस ,काही हिशेब, काही अकाउंट नंबरस अधेमधे लिहिले होते. फोटोवरुन पण नचिकेतला काही अंदाज लागत नव्हता. संपूर्ण डायरी वाचल्याशिवाय पर्याय नव्हता. उद्याची ऑफिसला सीक लीव्ह टाकायची आणि हे काय प्रकरण आहे हे वाचून काढायच. त्याला झोप येत होती..आणि डोकं विचारांनी बधीर झालं होतं.
विचार काही त्याला स्वस्थ झोपू देणार नव्हतेच....बेडवर झोपून तो डायरी वाचू लागला...अनुला गाढ झोप लागली होती. तिला कशाला उठवायचं म्हणून तो लाईट बंद करुन स्टडीमधे गेला.

१७/११/१९७५
किती दिवसांनी लिहितेय..कारणही तशीच होती. आईला दवाखान्यात हलवलं आहे. बाबांवर बराच ताण आला आहे. पायाच ऑपरेशन करावं लागणार का दोन दिवसात कळणार आहे. आत्या मावशी आळीपाळीने येउन घर सांभाळतात ....माझा अभ्यास...आणि घरातील इतर कामं...आणि आईपाशी दवाखान्यात बसणं यातच सारा वेळ जातो आहे. उद्या एखाद चांगल पुस्तक घेउन जाईन वाचायला. कॉलेजमधुन परस्पर जायच म्हणजे आत्ताच टाकलं पाहिजे दप्तरात....कोणत नेउ....कवितांच नेते. आईला पण वाचून दाखवता येतील.
आज सुमीने काय सांगितले...कुमुद्च्या लग्नाची तारीख....५ फेब्रुवरीला अजून अवकाश आहे. ही कार्टी परिक्षा देणार का माहित नाही. निदान परिक्षा झाल्यावरतरी घरच्यांनी तारिख काढायची ना...तेवढाच बाराव्वी झाल्याचा शिक्का मिळाला असता.... या बाईसाहेबांना पण घाई किती...काहीच म्हटले नसेल तिने....जाउ दे तो विषय. सगळं ठरल्यावर नाहक चर्चा आणि काळजी करण्यात आता काहीच अर्थ नव्हता. आज कविता काय कुठल्याच ओळी आठवत नाही..विचारांच्या कल्लोळात जणू सारे शब्द थिजून गेले असं वाटतं आहे.

२०/११/१९७५
आईच्या तपासण्या सुरु झाल्या...गुडघ्याला जब्बर मार लागला आहे....इतरही हाडांना मार लागला आहे..त्यामुळे ती हाडं जुळेस्तोवर ऑपरेशन करता येत नव्हतं. डॉ.पेंढारकरांनी मला आईचे एक्स-रे रिपोर्ट दाखवले आणि समजवुन सांगितले...अर्थात ते समजवुन घेण्याचा पुढाकर मीच घेतला होता. येणार्‍या जाणार्‍यांची रीघ कागली होती.
परवा मी डायरी दवाखान्यात नेली..पण जो तो बघायला मागतो...तेव्हा ठरवलं वेळ मिळेल तसे लिहिणार पण कोणाला दाखवणार नाही...सुमीला तेवढं माहिती आहे...आणि अर्थातच आई-बाबांना. त्यांनीच तर आपलं स्वातंत्र्य आणि विचार स्वातंत्र्याची जपण्याची सवय मला लावली. माझ्या सोबतच्या इतर मुलींना बघून मला अधेमधे असं उगाच वाटतं...की मी इतर मुलींसारखी...शामळु.....लाजाळु...आपल्या भावना आपल्यातच कोडंणारी नाहीच. आपलं म्ह्णण सडेतोड मांडण..आपला हक्क...आहे. हे मला माहित नाही..पण मी जरा जास्तच धीट आहे हे मला इतरांच्या बोलण्यावरुन कळायला लागलं आहे. थोडक्यात इतरांकडून मी नेमकी कशी आहे याचा मला शोध लागत रहातो.. अधूनमधुन.

२८/११/१९७५
आईच ऑपरेशन झालं..आईला असं अंथरुणावर लाचार बघवत नव्हतं. तिला होणारा त्रास मला आणि बाबांना होत होता. तेव्हाच मी ठरवलं आता आईशी कध्धी कध्धी अबोला धरणार नाही. ती आधीसारखे बरी होउन घरी लवकरात लवकर यावी ही एकच इच्छा आहे. आणि ही इच्छा पूर्ण होण्यासाठी मी आजकाल..कॉलेजच्या पटांगणातल्या देवळात रोज जाते. हात जोडतांना मला उमगलं की ईश्वर जे आजवर माझ केवळ श्रध्दास्थान होत...आज माझ शक्तीस्थान आहे....समजण्याची समजून घेण्याची..शक्ती तू मला दिली ..तू आज माझा आधार झाला..मला कुठल्या क्षणी कोसळु दिल नाही....तुझे कितीही नाव असलेत तरी माझ्यासाठी तू मला सावरणारी एक दिव्यशक्ती आहे. तुझ्यापूढे बसले के अस वाटतं की न सांगताच तुला सार काही कळलं आहे आणि मनातून मळभ आपोआप दूर झालं. मी कोण होते.....नास्तिक..श्रध्दाळु..नाही मी आजच आस्तिक झाले. आजच्या ओळी समितीत आम्ही साने गुरुजींची एक प्रार्थना म्हणतो त्यातील आहे:
नको माझे अश्रु कधी नेऊ देवा
हाचि थोर ठेवा माझा एक ॥
बाकि सारे नेई धन-सुख-मान
परी हे लोचन राखी ओले ॥
माझे रुप मज अश्रु दावितात
हेचि तातमात प्राणदाते ॥
२/१२/१९७५
आत्या आणि मावशी आईचे ऑपरेशन व्यवस्थित झाले बघून आपाआपल्या घरी गेल्यात. आईला दवाखाण्यातून सुट्टी होईल त्या दिवशी त्या परत येणार होत्या. पण आता घरची सर्व जवाबदारी माझ्या अंगावर पडल्याची जाणीव मला होतं होती. खरच परिस्थिती माणसाला खूप काही शिकवते याची प्रचिती मला आली. पण अशा विकट परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी लागणार धैर्य आणि बुध्दी मला माझ्या आईबाबांनीच दिली ना. मैत्रिणी-नातेवाईक-शेजारचे यांच्या मदतीने मी घर-कॉलेज-दवाखाना-अभ्यास हा सारा व्याप कसोशीने सांभाळत होते.
१०/१२/१९७५
आज आईची दवाखाण्यातून सुट्टी झाली...मलाच खूप बरं वाटल. सुमी तर सावलीसारखी बरोबर होती. तिने मला खूप सावरलं...सुमीला मी न सांगताच माझं सार काही कळतं....
सुधा आजी..नरुमावशी..गौराबाई सार्‍यांनीच खूप मदत केली. आई येणार म्हणुन मी गौराबाईच्या मदतीने घर आवरुन ठेवले. घरी आल्यावर आई म्हणाली कशी माझी चिमणी आजकाल चीवचीव करत नाही का ? तर आत्या लगेच कशी म्हणाली...आपली मैना आता मोठी झाली वहिनी...आत्यानी आईला माझ्याबद्दल काय काय सांगितलं ठाउक नाही पण आईच्या डोळ्यात एक वेगळच समाधान बघितल मी आज. मलाही छान वाटल ते समाधान बघून. माहं मलाच जाणवलं इतक्यात मी मोठ्यांसारखी वागत होते....
कदाचित बाबा म्हणाले तेच बरोबर...परिस्थिती माणसाचा अदृष्य गुरु या गुरुने मला बरेच काही शिकवले यात शंकाच नाही .सगळ्यांच्या नजरेत कौतुक बघून देवाने मला शहाणपण लवकर दिलं का ?मला उगीच वाटून गेले. असो...आज केशवसुतांची घड्याळ कवितेच्या ओळी आठवून गेल्यात:
गडबड घाई जगात चाले
आळस दुलक्या देतो पण
गंभीरपणे घड्याळ बोले-
आला क्षण गेला क्षण.....
.............. आनंदी आनंद उडाला
नवरीला वर योग्य मिळाला
थाट बहुत मंडपात चाले-
भोजन,वादन,नर्तन,गान
काळ हळू ओटीवर बोले-
आला क्षण गेला क्षण
माझ्या आयुष्यात अजून कसले क्षण येणार कोणास ठाउक ? पण घड्याळ्याच्या काट्यांवर आपले आयुष्य असेच पूढे पूढे जात रहाणार इतक नक्की.
(क्रमशः)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

विनीता:

छान फुलतेय! ही गार्गी कवितावेडी असल्याने आम्हाला पण छान छान कविता वाचायला मिळताहेत. पुढचा भाग लवकर टाक.