ओशिळांचे निवारे

Submitted by नरेंद्र गोळे on 22 July, 2012 - 23:51

ओशिळां[१]चे निवारे

सांधका[२]चे बंध सारे, ओशिळांचे अन्‌ निवारे ।
सरकत्या काचाच खिडक्या, कणपटां[३]ची त्यांस द्वारे ॥ धृ ॥

लोह-जाळ्यांची कवाडे, रक्षती खिडक्या नी दारे ।
निरखण्या आगांतुकासी, दृश्यभिंग[४] देती सहारे ॥ १ ॥

भिंतींतुनी जडल्या कळां[५]चे, छन्नमार्गी नाद[६] सारे ।
रात्रखिट्टी[७] काढता आतून, उघडे दार बा रे ॥ २ ॥

उद्‌वाहकाभोवती फिरत, चढती कसे सारे जिने ।
गाळे निवासी वसवले, जणू छन्नमार्गी हारीने ॥ ३ ॥

मजल्यागणिक चढत्या दराने, विकत घेऊ आम्ही वारे ।
तुटक सारी संस्कृती अन्‌, सदनिकांची बंद दारे ॥ ४ ॥

नरेंद्र गोळे २०१२०७२३

[१] ओतीव-शिळा म्हणजे “ओशिळा”. खरे तर काँक्रीट. त्याकरताच हा नवा मराठी पर्यायी शब्द वापरलेला आहे.
[२] दगड विटा परस्परांना सांधणारे सिमेंट. सिमेंटलाच हा नवा प्रस्तावित पर्यायी मराठी शब्द वापरलेला आहे.
[३] हल्ली “लाकडी भुशाच्या पटांची” म्हणजेच “वूडन पार्टिकल बोर्डां”ची दारे वेष्टित करून म्हणजेच लॅमिनेट करून वापरण्याची प्रथा आहे. अशा दारांना कणपटांची दारे का म्हणू नये? कारण लाकडाच्या कणांचे पट तयार करून त्यांचीच तर ही दारे घडवली जात आहेत.
[४] म्हणजे डोकावून पाहण्याची छिद्रे अर्थात पीप-होल्स. त्यांचाच हा पर्यायी मराठी शब्द.
[५] म्हणजे डोअरबेलचे बटन. दाब-कळ. अर्थात्‌ पुश-बटन. हे दाराबाहेरच्या भिंतीत जडवलेले असते.
[६] घंटीचा आवाज मात्र छन्नमार्गात म्हणजे घरातील पॅसेजमध्ये होत असतो.
[७] म्हणजे नाईट लॅच. हल्ली ही बाहेरच्याच दाराला बसवलेली असल्याने दिवसाही उघडावीच लागते!

गुलमोहर: 

छान छान. Happy

तुमच्या कवितेवरून एका 'टवाळ' कवीने केलेला हा अनुवाद आठवला. या अनुवादास वाचून मूळ (हिंदी) गाणे ओळखा पाहू-

"भवन तव उत्तुंग आहे, आणि अवरत उद्वहन
मी कसा येणार पर्युत्सुक जरी झालेय मन

वाद्यवृंदाला सवे घेऊन कर तू आगमन
नवरदेवा ये अता, छळते मला तुज आठवण
"

Rofl

असो.....असो!

ही रचना स्थापत्यशास्त्राच्या पहिल्या वर्षाच्या अभ्यासक्रमात तातडीने समाविष्ट करावी अशी सूचनावजा विनंती मी 'AICTE'ला व 'UGC' ला ताकीदपूर्वक करीत आहे !!

मायबोलीकर 'पर्यायीगझल'-गुरू प्रा.देवपूरकर सर याना नम्र विनंती की या रचनेतील सर्व नवे शब्द प्रस्तावित आहेत ते मराठी डिक्शनरीत समाविष्ट करून घेण्याकरता कायकाय हालचाली कराव्या लागतील याची संबंधिताना माहिती पुरवावी .(जेणेकरून पुढेमागे हे शब्द गझलेत आलेच तर काय करायचे असा प्रश्न पडणार नाही! )

ज्ञानेश, शाम, किरण, वैभव आणि विभाग्रज,
प्रतिसादांखातर धन्यवाद!

ही रचना स्थापत्यशास्त्राच्या पहिल्या वर्षाच्या अभ्यासक्रमात तातडीने समाविष्ट करावी अशी सूचनावजा विनंती मी 'AICTE'ला व 'UGC' ला ताकीदपूर्वक करीत आहे !!>>> कल्पना उत्तम आहे. माझे अनुमोदन.