थेट... डब्बा गुलच्या सेटवरुन.

Submitted by धुंद रवी on 17 July, 2012 - 11:00

Dabba Gul Logo.jpg

सगळीकडे वेगवेगळ्या रंगाच्या प्रकाशाचा नुसता झगमगाट... मनातलेही विचार ऐकु येणार नाहीत इतक्या जोरात वाजणारं ‘डब्बा गुल’ संगीत... कुठल्याही रंगमंचाला असतो तो श्वासांवर दरवळणारा गंध.... आसपास वावरणारे सेलिब्रेटीज्.... विलक्षण गोड आणि कमालीच्या छळवादी कार्ट्यांचा अफलातून गोंधळ आणि ‘स्कीट रायटर’ म्हणुन सगळ्यांनीच आवर्जुन दखल घेतल्यामुळे सुखावलेलं मन.......
......ह्या अशा भारावलेल्या वातावरणात हरवलेला मी रंगमंचाजवळ उभा होतो.

आयुष्यानी जे काही ‘जीवघेणे क्षण’ दिलेत त्यातले बहुतेक मी रंगमंचावरच जगलेत. पण अजुनही रंगमंचाची झिंग काही कमी होत नाही. आणि ह्या क्षणी तर मी ‘चंदेरी रंगमंचावर’ होतो. झी-मराठीवर दर बुधवार-गुरुवार डब्बा गुल नावाचा एक शो होतो. लाडक्या मायबोलीकर कौतुक शिरोडकरमुळे ह्या कार्यक्रमाची स्कीट्स लिहायची संधी मिळाली आणि ती सादर होताना प्रत्यक्ष पाहण्यासाठी मी स्टुडिओत पोहचलो होतो.
डब्बा गुलच्या त्या रंगमंचावर हात ठेऊन किती वेळ उभा होतो कोणास ठाऊक..!

अचानक खांद्यावर एक हात आला आणि त्या मागुन एक वाक्यही.... "तुझा पहिलटकरणीचा आनंद, उत्साह आणि कुतुहल मी समजु शकतो. तुझं मन भरलं की सांग.. म्हणजे जरा काम पण करु." इती कौतुक शिरोडकर.
त्या धुंद वातावरणातून कौतुक मला कामासाठी म्हणुन सेटवरुन घेऊन गेला. थोड्यावेळानी मी कामाला टांग मारुन पुन्हा सेटवर आलो... कौतुकशिवाय.

एक मोलाचा सल्ला : तिथं आपली दखल घेतली जावी असं कोणाला वाटत असेल तर त्या शहाण्या माणसानी कौतुकसोबत अजिबात फिरु नये. तो सोबत असेल तर तिथल्या स्टुडिओबाहेरचं कुत्रही आपल्याकडे बघत नाही. कौतुकशिवाय तिथं दुसरं कोणी सेलिब्रिटी असुच शकत नाही. डब्बा गुलची कलाकार पोरं तर त्याची भक्त आहेत. त्याला तिथे सगळे ‘सिंघमदादा’ म्हणुनच हाक मारतात. ‘मोहरलेल्या आंब्याच्या झाडाला दिसेल तिथे आंबे लटकावे’ असं त्याला पोरं लटकलेली असतात. आणि बघावं तेंव्हा चार पोरं तरी त्याच्या गळ्यात पडलेली असतात. (मुलांच्या पालकांविषयी कौतुकच्या परवानगीनंतर पुन्हा कधीतरी लिहीन.)

तिथल्या एका पोरानी मला ‘स्कीट रायटर’ म्हणुन ओळख दिली तर आपला मायबोलीकर चाफ्या चक्रावलाच. कारण त्या मुलांच्या दृष्टीनी जगात फक्त एकच रायटर आहे.. कौतुक शिरोडकर..! असो.)

तर मी पुन्हा सेटवर आलो. विजय पटवर्धनशी ओळख झाली. मध्ये त्यानी लिहलेल्या एका नाटकासाठी, मला कविता-गाणी लिहण्याचा योग आला होता. शिवाय फूबाईफू च्या ग्रॅन्ड फिनालेसाठी माझं एक स्कीट झालं होतच. हे धागे आमच्या गप्पा रंगायला पुरेसे होते. गप्पा मारायला मस्त माणुस आहे तो. त्यात माझी डब्बा गुलची दोन स्कीट्स विजयनी इतक्या खणखणीत वाजवली होती की एकमेकांचं कौतुक करायला आम्हा दोघांकडही बराच स्कोप होता.

विजयशी गप्पा मारत असतानाच ‘बब्बी’ नामक एक चुटचुटीत पोरगी आली आणि माझा ताबाच घेतला तिनी. ‘मी कसं छान स्कीट लिहतो’ हे मलाच सांगुन, माझी ओळख तारे मास्तरांशी करुन द्यायला घेऊनही गेली. तारे मास्तर म्हणजे अफाट माणुस आहे. माझ्या मामानी १९७८ साली त्यांचं ‘चंदाराणी’ केलं होतं. त्यानंतर गेल्या ३४ वर्षात त्या दोघांचं बोलणंही नाही. पण मामाचं नाव सांगताच त्यांनी तेंव्हाच्या आठवणी सुद्धा सांगितल्या. तारे कुटुंबानी १९८० च्या आसपास चालवलेल्या बालनाट्य चळवळीविषयी गप्पा झाल्या. त्यांच्या फार जिव्हाळ्याचा विषय असावा तो. त्यांनी साकारलेल्या ‘१० फ’ चित्रपटातल्या भुमिकेचं कौतुक वाटल्याचं त्यांना सांगितलं आणि त्या गप्पांचा धागा पकडत ते जुन्या काळात हरवुन गेले. अरुण सरनाईक, राजा गोसावी, यशवंत दत्त यांच्यासोबत काम केलेल्या तारे मास्तरांकडे जुन्या काळच्या किस्श्यांची खाण होती. तारे मास्तरांसोबतचा तो दिड तास फार छान गेला.

बघता बघता शूटींगची वेळ झाली आणि कौतुक मला घेऊन पुन्हा सेटवर आला. कौत्याचं सेटवर इतकं वजन आहे की, ‘तो तिथं गेला आणि स्पॉटदादा त्याच्या सरबराईला आले नाहीत’ असं होणारच नाही. कौतुकसाठी एका खूर्चीची सोय करण्यात आली, जी त्यानी मला बसायला दिली. ती खूर्ची होती श्रीरंग गोडबोले यांच्या शेजारची. त्यामुळे शूटींगची सगळी प्रोसेस मला जवळून पाहता आली. तिथे लावलेले सुमारे दहा-बारा कॅमेरे आणि त्यातलं वेगवेगळं फुटेज, ऑनलाईन डायरेक्टर श्रीचं ऑव्हरऑल को-ऑर्डीनेशन, तुषारचा अफलातुन बॅन्ड, मुलांचं ‘म्याड’ सादरीकरण, १७६० टेक्नीकल इश्युज, त्यात श्रीरंग गोडबोलेंच चौफेर लक्ष आणि फायनल प्रोफेशनल टच आणि कौतुकची अखंड कॉमेंट्री... मजा आली ते सगळं अनुभवताना. गंमत म्हणजे बहुतेक स्कीट्स कुठल्याही रिटेकशिवाय झाली.

डब्ब गुलची मुलं तर अफाटच आहेत. सगळ्या मुलांना एकाच वेळी एकाच ठिकाणी आणणं एकाही माणसाला शक्य नाही. त्यामुळे मिळेल तेवढी पोरं पकडली आणि तो क्षण छायाचित्रीत करुन घेतला.

Dabba Gul Team.jpg

रविंद्र मठाधिकारी ह्या नावावरुन ‘मी धष्टपुष्ट आणि रांगडं व्यक्तिमत्व असेल, पण मी अगदीच तसा नाही’ अशी गुगली एका स्पष्टवक्त्यानी मला टाकुन माझी (देह)यष्टी उडवली. एखाद्या दिग्गज साहित्यिकानी, उमेदवारीच्या काळातल्या स्ट्रगलर लेखकाला द्यावी.. अशा आविर्भावात "चांगली असतात स्कीट्स तुमची" अशी कॉम्प्लीमेंट एका आगाऊ पोरानी मला दिली आणि मी गहिवरुन "आभारी आहे" इतकंच म्हणु शकलो. तिथं मी नुसता कान खाजवला तरी एक कार्ट दिवसभर माझ्या कानाशी ‘ही खाज आहे भाऊ, ही खाज आहे भाऊ’ ही जाहिरात कोकलत होतं. आणि मग उगाचच मी सुद्धा तेच गाण गुणगुणत... किंबहुना.. खाजवतच बसलो.

पण ह्या सगळ्या मुलांकडून खुप काही शिकण्यासारखंही होतं. त्यांचं रसरसुन जगणं... त्यांचा ओसंडून वाहणारा उत्साह... त्यांचा कॉन्फीडन्ट वावर... सगळंच अफाट. पण सगळ्यात छान होतं ते त्यांचे एकमेकांसोबतचे संबंध. कुठेही स्पर्धेचा लवलेशही नव्हता. ‘आनंद द्यायचा आणि घ्यायचा’ ह्या एकाच तत्वावर ती सगळी मुलं जगतात आणि धुडगुस घालतात. आयुष्य फार सोपं करुन जगतात ही पोरं. हे असंच टिकावं आणि आपल्यालाही जमावं असं वाटलं.

त्यातल्या रुगुली नामक प्राण्याचा फॅन झालो मी. इतकं निरागस आणि प्रेमळ कार्ट आहे की प्रेमातच पडायला होतं त्याच्या. माझं एक ‘कानाला खडा’ नावाचं स्कीट त्यानी आणि पतुकली नामक इरसाल कोल्हापुरकरानी इतक्या जोरात वाजवलं की ‘लई भारी स्कीटसाठी’ वाजवण्यात येणारा पोंगा, देण्यात येणारा ब्लास्ट, ग्रीन सिग्नल, चॉक्लेट्स आणि बेस्ट पर्फोर्मन्सची टोपी हे सगळं माझ्याच स्कीटला मिळालं. पण माझ्यासाठी खरा आनंद तेंव्हा होता जेंव्हा रुगुली आणि पतुकलीनी स्कीटनंतर मला येऊन मिठी मारली.
......असे खुप क्षण साठवले आणि मोहरुन गेलो.

दर आठवड्याला काही स्कीट्स लिहुन पाठवायचो आणि मग कौतुकला फोन करुन करुन छळायचो. त्याच्या बायकोचे काही वर्षात इतके फोन त्याला आले नसतील, जितके मी आणि चाफ्यानी त्याला ह्या महिन्यात केलेत. त्यानी स्कीट निवडल्याचं सांगितलं की शूटींग कधी आहे याचे फोन... मग शूटींग कसं झालं याचे फोन... मग कधी टेलीकास्ट होणार यासाठी फोन... मग झालेला आनंद साजरा करण्यासाठी फोन...
आमचा ‘पहिलटकरणीचा आनंद’ समजुन घेऊन कौतुकनी हे सगळे फोन न कंटाळता घेतले. त्यापेक्षा जास्त फोन स्वतःहुन केले. त्याला मानाचा मुजरा.

ग्रॅन्ड फिनाले तर माझ्यासाठी खुपच ‘स्पेशल इव्हेंट’ होता. एक तर ग्रॅन्ड फिनालेमधल्या फायनल दहा स्कीट्स मध्ये माझी तीन स्कीट्स होती आणि दुसरं म्हणजे डब्बा गुल आणि झी-मराठी कडून आम्हां व्यंगलेखकांना खास निमंत्रण होतं.
"तुमची थोबाडं टिव्हीवर दिसणार आहेत, तर जरा चांगले कपडे घालुन या आणि बरं दिसता आलं तर बघा" असा एक पुणेरी निरोप मुंबईकर कौतुककडून आला आणि मग मी आणि चाफ्यानी रिक्षाच काय, टेम्पो फिरवायचं ठरवुन टाकलं. (चाफ्यानी तर मुखचंद्र रंगवायला अर्धा किलो मुलतानी माती आणल्याची आणि ती थोबाडावर थापल्याची अफवा आमच्या विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली होती.)

ग्रॅन्ड फिनालेत कौतुकची चार आणि माझी तीन स्कीट्स झाली. धमाल आली. आणि मग निलेश साबळेने आम्हां लेखकांना रंगमंचावर बोलावलं. मी, कौतुक, विभावरी देशपांडे, चाफ्या आणि सागर असं आमच्या पाच जणांची ओळख करुन दिल्यानंतर मेंटॉर्स, सगळी मुलं, परिक्षक, प्रेक्षक, पालक आणि शूटींग युनीट.. असं सगळ्यांनीच आम्हाला Standing Ovation दिलं. मग आम्हाला दिल्या गेलेल्या ‘ब्लास्ट’चा आनंद घेत आम्ही खाली उतरलो...
..का वर ढगात गेलो कोणास ठाऊक..!

येत्या रविवारी म्हणजे २२ जुलैला संध्याकाळी ७ वाजता झी-मराठीवर ग्रॅन्ड फिनाले होतोय. जरुर बघा.... आमची स्कीट्स आणि आम्हांलाही.

विनोदी लेखक म्हणुन कौतुकाच्या टाळ्या आणि Standing Ovation लुटताना थोडा स्मृत्याकुल झालो आणि काही क्षण मागे गेलो. इथे मायबोलीवर येण्याआधीचे दिवस आठवले. इथे आलो होतो ते एक कवी म्हणुन. कंपुगिरी किंवा ‘जुन्यांनी नव्यांना घेरुन पळवुन लावण्याचा’ कसलाही वाईट अनुभव आल नाही. किंबहुना इथे मंडळींनी सांभाळून घेतल्याच्याच आठवणी गाठिशी. अशातच एक विनोदी लेख माबोकरांनी उचलुन धरला आणि मग विनोदी लिहतच गेलो. मग माबोकरांकडून भरभरुन मिळालं ते प्रेम आणि कौतुक. माझ्यातला विनोदी लेखक ही फक्त मायबोलीकरांची देणगी आहे आणि आज हे ऋण व्यक्त करताना मनापासुन आनंद होतोय. अर्थात हे ऋण फेडण्याचा एकच मार्ग मला दिसतोय आणि तो म्हणजे खुप सारे विनोदी लिखाण करुन माबोवर पोस्टणे. ते करेनच.

कौतुक शिरोडकर नावाचा एक जीवाभावाचा मित्र मिळाला ते ही इथंच.

आता डब्बा गुलचं पहिलं पर्व संपलंय. त्यात माझी एक, दोन नाही तर तब्बल १६ स्कीट्स झाली. त्यातल्या दोन-तीन स्कीट्सची लींक इथे देतोय. जर तुम्ही डब्बा गुलचं हे पर्व पाहिलं नसेल तर ह्या लींक्स जरुर बघा आणि कशी वाटली ते न विसरता कळवाही. ‘आता डब्बा गुल नसेल’ ही पोकळी छळते ना छळते तोच ई-टिव्हीकडून मला बोलावणं आलय आणि ई-टिव्हीनी माझी तीन स्कीट्स शूट केली सुद्धा. ती स्कीट्सही ह्या महिन्यात टेलिकास्ट होतील. तिथल्या सेटवरही एक चक्कर टाकुन आलो. तो अनुभवही लवकरच कळवेन.

Dabba Gul - Grand Finale.jpg

तुर्तास व्यक्त करण्यासारख्या दोनच गोष्टी...

१. Writer म्हणुन झी-मराठीवर Standing Ovation मिळाल्यानंतर अनुभवलेला उन्माद... आणि
२. मायबोली जिंदाबाद.

मायबोलीकर धुंद रवी

काही लींक्स :
चोरावर मोर - http://www.youtube.com/watch?v=NMm09x2PFqw
कानाला खडा - http://www.youtube.com/watch?v=r8YRsACHzeM
पत्रोत्तर - http://www.youtube.com/watch?v=o63RWTEWjXQ
आरोपी - http://www.youtube.com/watch?v=GLlADZFqN-M

Group content visibility: 
Public - accessible to all site users

झकास.. अभिनंदन..... तरीच कौतुकरावांच काहिच वाचायला मिळलेलं नाहिय बर्‍याच " वर्षात " ...
कौतुकराव तुमच पण अभिनंदन....

ग्रेट!!! तुमच्या टिम च आणि माबोकरांच अभिनंदन..!!!!
येत्या रविवारी म्हणजे २२ जुलैला संध्याकाळी ७ वाजता झी-मराठीवर ग्रॅन्ड फिनाले होतोय. जरुर बघा.... आमची स्कीट्स आणि आम्हांलाही. >>> नक्की नक्की ..
तुमचा अनुभव जबरीच. इथे शेअर केल्याबद्दल धन्यवाद Happy

खूप अभिनंदन!! बघायला मिळाला तर नक्की बघेन कार्यक्रम!
बायदवे, 'माझी लुंगीखरेदी'चे वाचन होत असतं आमच्या घरी कायम!! असेच हसवत राहा सर्वांना!! Happy

धुंद रवी

मनापासून आनंद झाला वाचून. लिहीलंयस पण छान. कौतुक शिरोडकर हा एक दुर्मिळ असा मोठ्या मनाचा माणूस आहे. तसं तो कधी जाणवू देत नाही आणि त्याचं खूप कौतुक केलेलंही त्याला चालत नाही Biggrin

तुझ्या लेखणीला न्याय मिळाला इतकंच म्हणतो.

अभिनंदन ! तुमच्या तिघांचे. आपल्या मायबोलिकरांची कामगिरी पाहुन मनापासुन आनंद झाला. खुप कौतुक वाटते तुमच्या सर्वांचे. तुमचा अनुभव वाचुन माझ्या भाचीची आठवण झाली. सध्या चालु असलेल्या "महाराष्ट्राची लोकधारा" मधे ती ८-९ नाचात होती. तिचाही तुमच्यासारखाच अनुभव होता.....पहिलटकरणीचा... अर्थात हे यश मिळण्यासाठी खुप मेहनत तुम्हाला घ्यावी लागते म्हणुन जास्त कौतुक वाटते.

प्रतिसादात लिहीन म्हणालेलो पण आता शब्द सापडत नाहीत.. असो रवी अभिनंदन आणि कौतुकचे आभार्स
आणि मायबोलीकरांचे अनेक धन्यवाद Happy

http://www.youtube.com/watch?v=QqFrmThJO4A
http://www.youtube.com/watch?v=qCng2uUD_go&feature=relmfu
http://www.youtube.com/watch?v=uU_6TvngRxA
http://www.youtube.com/watch?v=AC8bK97iJfE

आणि खासच म्हणजे http://www.youtube.com/watch?v=lfuqK84nCIA कौतुकचं कौतुक Happy

कौतुक,रवी आणि चाफा..खुप खुप अभिनंदन !!!
डब्बा गूल आमच्या आवडत्या कार्यक्रमापैकी एक. त्यात आता तूम्हा सर्वांच्या नावाची भर पडल्याने कधी या लिंक्स बघू असे झालेय. कौतूक बद्द्ल पण खूप ऐकून आहे, या महाशयांना आता पहायला पण मिळेल Happy
परत एकदा अभिनंदन आणि बेस्ट लक!!!!

Pages