अधिवेशनामागचे चेहरे : श्री. बाळ महाले

Submitted by अजय on 9 July, 2012 - 09:00

बृह्न्महाराष्ट्र मंडळाच्या १६ व्या अधिवेशनाचे मुख्य निमंत्रक श्री बाळ महाले यांच्याशी नुकताच संवाद साधायची संधी मिळाली.

1) अधिवेशनामधे तुमचं कार्यक्षेत्र कुठलं आणि संयोजनात तुमची कुठली भूमिका आहे?
अधिवेशनात मुख्य निमंत्रक म्हणून माझी प्रमुख भूमिका म्हणजे अधिवेशनासाठी लागणाऱ्या संघटनेची उभारणी, वेगवेगळ्या समित्यांमधील समन्वय आणि जनसंपर्क. मला सांगायला खूप आनंद होतोय की आमची दोनशेहून अधिक उत्साही स्वयंसेवकांची संघटना तयार झाली आहे आणि ही संघटना दर महिन्याला वाढतेय.
ह्यात केवळ बोस्टनच नव्हे तर अमेरिकेतील इतर राज्य आणि भारतातल्या स्वयंसेवकांचा सुद्धा समावेश आहेत. दर महिन्याला सर्व समित्यांचे अध्यक्ष भेटून एकमेकांच्या समित्यांमध्ये समन्वयाविषयी चर्चा करतात. तसेच सर्व स्वयंसेवक दर तीन महिन्यांनी भेटून अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेतात. २०१३ च्या अधिवेशनाचे चित्र आता आमच्या मनात हळू हळू साकार होतंय. अधिवेशनाच्या कामानिमित्ताने आम्ही एकमेकांच्या बरेच जवळ आलो आणि आम्हाला एकमेकांच्या कौशल्याची, नवीन पैलूंची ओळख होतेय हा एक अतिशय आनंददायी भाग म्हणता येईल.
जनसंपर्काच्या क्षेत्रात आमची मार्केटिंग टीम आणि बी एम एम चे अध्यक्ष श्री आशिष चौघुले यांच्या बरोबर आम्ही हळू हळू सुरुवात केली आहे. ह्या उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही बरेचजण भारतात जाणार आहोत. त्यावेळेस बर्‍याच मान्यवर लोकांना भेटून अधिवेशनाचे निमंत्रण देण्याचा आमचा मानस आहे. गेल्या तीन महिन्यात अधिवेशनाच्या कामांनी प्रचंड वेग घेतला आहे. दर ८-१५ दिवसांनी अधिवेशनाच्या कामातल्या काहीना काही घडामोडी पूर्ण होतायत.Bal_mahale.jpg2) आणि तुमच्या विभागातल्या तयारीबद्दल अगदी ताजी खबर?
आपलं अधिवेशनाचं ठिकाण प्रॉव्हीडन्स , र्‍होड आयलंड, ठरलं आहेच, पण आता रहाण्याची सोय (हॉटेल), येण्याजाण्याची व्यवस्था याच्याशी निगडीत गोष्टींनीही खूप वेग घेतला आहे.

3)अधिवेशनाव्यतिरिक्त तुमचा नेहमीचा व्यवसाय/कार्यक्षेत्र काय आहे?
मी दिवसा Computer Associates मध्ये Senior Director in Program Management चे काम करतो. ह्याच बरोबर मी Agile Coach म्हणून सुद्धा काम करतो. याचा मला अधिवेशनाच्या कामासाठी सुद्धा खूप उपयोग होतो आहे. आपलं अधिवेशन जास्त Creative आणि Collaborative कसं करता येईल याचा मी नेहमीच प्रयत्न करत असतो.

4)येत्या अधिवेशनाची थीम "ऋणानुबंध/नाती/रेशीमगाठी" अशी आहे. आणि आपल्या सगळ्यांचे आपल्या शाळेबरोबर/ कॉलेजबरोबर ऋणानुबंध असतात. तुमच्या शाळा/कॉलेजच्या काही आठवणी आहेत का?

कॉलेज म्हटलं की माझ्यासमोर फर्ग्युसनचं कॅन्टीन , वैशाली / रुपाली च्या कट्ट्यांवरच्या गप्पा, COEP च्या बोट क्लब वरची मजा आणि पुण्यातल्या सर्व कॉलेजचे funfairs डॉळ्यासमोर येतात. अधिबेशनाच्या निमित्ताने मी बर्‍याच मित्रांशी संपर्क केलाय. आमची अशी कल्पना आहे की आपल्या अधिवेशनात बर्‍याच शाळा कॉलेजमधल्या मित्रांचा स्नेहभेटीचा, Reunion चा कार्यक्रम व्हावा. मी स्वतः फर्ग्युसन, COEP आणि आयआयटी मद्रास मधल्या मित्रांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतोय. पण अधिवेशनात असलेले इतर स्वयंसेवक त्यांच्या त्यांच्या शाळा़कॉलेजची स्नेहभेट व्हावी म्हणून प्रयत्नात आहेत. आणि आपल्या अधिवेशनाचं जे सूत्र आहे, "ऋणानुबंध" त्यात हे अगदी चपखल बसणारं आहे. मला स्वत:ला माहिती नव्हतं बॉस्टनमधेच माझ्या कॉलेजातले इतके जण आहेत,

5) तुमच्या कामासाठी तुम्हाला मायबोलीकरांची काय मदत होऊ शकेल?
मला मायबोलीकरांकडून २-३ मदतीच्या अपेक्षा आहेत. पहिलं म्हणजे मायबोलीकरांना मराठीच्या संवर्धनासाठी जर आपल्या अधिवेशनाच्या व्यासपीठाचा काही उपयोग होणार असेल तर त्यांनी तो जरूर करावा. दुसरं मायबोलीकरांनी त्यांचं साहित्य स्मरणिकेसाठी पाठवलं तर त्याचं स्वागत आहे. आणि तिसरी म्हणजे, जरी हे १६ अधिवेशन असलं तरी आजही कित्येकांना हे अधिवेशन म्हणजे काय असतं, कुठं असतं, कधी असतं , त्यातून मराठी समाजासाठी काय निष्पन्न होतं हे माहिती नाही. मायबोलीकरांनी ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवलीत तर अधिवेशनाच्या यशासाठी ती एक मोठी मदत ठरेल

प्रत्येक अधिवेशनात शेकडो स्वयंसेवक, कार्यकर्ते असल्यामुळे त्या सगळ्यांच्या कल्पनेतून ते प्रत्यक्षात येतं आणि त्यामुळे प्रत्येक अधिवेशन हे काहीतरी वेगळं असतं. या अधिवेशनासाठी येणार्‍या कल्पना फक्त आमच्या बोस्टनपुरत्या मर्यादित न रहाता सगळ्या जगातून आल्या तर सगळ्या जगाशी आमचे "ऋणानुबंध" पक्के होतील आणि "ऋणानुबंध" हे अधिवेशनाचं सूत्र जागतीक पातळीवर नेता येईल. विशेषतः आपल्या पुढच्या पिढीसाठी हा मराठीचा वारसा आपल्या जपून ठेवायचा आहे. आणि तुमच्या सगळ्यांच्या नवीन कल्पना आम्हाला हव्या आहेत.

अधिवेशनाच्या तयारीत अतिशय व्यस्त असुनही, मायबोलीकरांसाठी संवाद साधण्यासाठी तुम्ही वेळ काढलात त्याबद्दल धन्यवाद.

अधिवेशनाची अधिकृत वेबसाईट.
http://www.bmm2013.org

अधिवेशनाचं अधिकृत फेसबुक पान.
https://www.facebook.com/bmm2013

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा ! तुम्ही COEP चे, हे वाचल्यावर खूप छान वाटले. COEP चे Gettogether होणार असेल तर त्याची अधिक माहिती कुठे मिळेल?

चला, RI ला होणार्‍या सम्मेलनाची सूत्रं आता हलू लागतील.
मायबोलीच्या माध्यमातून याची चांगली जाहिरातही व्हावी. दरवर्षी कार्यक्रमात बालमोहन (दादर) चे get-together असतेच असते. इतर शाळा कॉलेज गटानीही आत्तापासून प्रयत्न केले तर त्यांचीही भेट होऊ शकेल.

सगळ्या माबोकरान्नी या सम्मेलनाला येणाची तयारी केली तर आपलंही एक ए.वे.ए.ठि. होऊन जाईल.

शिकागोचे अधिवेशन खरोखरच देखणं झालं होतं. याही सम्मेलनाकडून खूप अपेक्षा आहेत. शेकडो स्वयंसेवकांच्या दोन वर्षाच्या अखंड प्रयत्नान्ना यश यावं आणि एक खूप सुंदर सम्मेलन व्हावं ही अपेक्षा..

मी जाणार आहे अधिवेशनाला. चिकित्सक (गिरगाव, मुंबई) कोणी येणार आहेत का? आपल्यालाही गेट टुगेदर करता येईल.

नमस्कार , मायबोली गीत अधिवेशनात म्हणता किंवा सीडी/डीव्हीडीवर प्ले करता येइल

विनय, वैभव,

मी पण जाणार आहे या अधिवेशनाला. तेव्हा नक्कीच एकत्र भेटू. अजून कोण मायबोलीकर जायचं नक्की करत आहेत?

अजय जी/ महाले जी,
गेल्या बी.एम्.एम चे काहे वृतांत, प्रचिंचा एखादा धागा नक्की माबोवर परत नव्याने सुरु करता येइल, यात प्रामुख्याने जुन्या कार्यकर्त्यांचे अनुब्भव, कामाचे स्वरुप्, अशी सहज विभागणी ही करता येइल...
याच काळात भारताही काही प्रमुख ठिकाणी VC /skyipe अशा माध्यमातुन बी.एम्.एम गट्ग करता येइल का.. हे गट्ग त्या-त्या स्थानिक पातळीवरुन प्रायोजित करता येतेल आणि त्यातला काही नीधी हा बी.एम्.एम साठीही जमा करता येइल

@परदेसाई
धन्यवाद. तुमच्या सूचनांबद्दल.

समीर, वैभव, श्री, चंबू
तुम्ही सगळे आलात तर आपल्याला नक्कीच भेटता येईल. अटलांटा, फिलाडेल्फिया, शिकागो अधिवेशनात मायबोलीचं गटग झालंय.

घारुआण्णा ,
तुमच्या कल्पना छान आहेत. पाहतो कुठल्या प्रत्यक्षात उतरवता येतील ते.

आत्तापर्यंत एकाही अधिवेशनाला गेलेलो नाही. दरवेळी अधिवेशना बाबत कुतुहल असतेच. ह्यावर्षी जाण्याचा विचार आहेच. इतर मायबोलीकरांचे गटग झाले तर अजुन मजा येईल.
जरी हे १६ अधिवेशन असलं तरी आजही कित्येकांना हे अधिवेशन म्हणजे काय असतं, कुठं असतं, कधी असतं , त्यातून मराठी समाजासाठी काय निष्पन्न होतं हे माहिती नाही>> हे मलाही माहिती नाही. ह्या अधिवेशनाला गेल्यानंतर अनुभव घेऊ.
अधिवेशनासाठी शुभेच्छा!

अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर...
काय असतं?
. अमेरिकेतल्या सगळ्या मराठी मंडळानी एकत्र येऊन, सगळ्या मराठी माणसांना एकत्र आणणारे अधिवेशन. यात इतर देशातूनही बरीच मंडळी येतात पण प्रामुख्याने अमेरिकेत राहणारी मराठी माणसं आवर्जून येतात.
. आतापर्यंत पाहिलेल्या सम्मेलनांमधे आलेल्या प्रेक्षकवर्गांमधे ५५+ लोक जवळपास ६०% किंवा जास्त असतात.
. दोन तीन दिवसांमधे भरपूर करमणूकीचे कार्यक्रम असतात. या कार्यक्रमांमधे भारतातून बरेच कलाकार आणले जातात, तसेच अमेरिकेत स्थानिक असलेल्या कलाकारांचे कार्यक्रम असतात.
. त्याशिवाय व्यावसाय करणार्‍या मराठी उद्योजकांसाठी काही कार्यक्रम असतात.
. लग्नेच्छू वधू-वरांसाठी 'स्नेहबंधन' हा कार्यक्रम असतो.
. लहान मुलांसाठी करमणुकीचे कार्यक्रम असतात.

एकंदरीत २ ते ३ दिवस करमणूक आणि भेटीगाठी घेण्यात कधी गेले ते कळतही नाहीत..

कुठं असतं? दर दोन वर्षांनी होणारं हे सम्मेलन कोणत्यातरी एका मराठीमंडळाच्या पुढाकाराने पार पडतं. यावर्षी न्यु ईंग्लंड मराठी मंडळाने पुढाकार घेतला आहे. त्यापूर्वी शिकागो (२०११), फिलाडेल्फिया (२००९), सियाटल (२००७), अटलँटा (२००५), न्यूयॉर्क (२००३).... इत्यादी ठिकाणी हे सम्मेलन झालेलं आहे. यावर्षीचं सम्मेलन र्‍होड्-आयलंड येथे होणार आहे.
बहुतेक ठिकाणी एकादा मोठ्या Convention Center मधे सम्मेलन होतं.

कधी असतं? दर दोन वर्षानी, बहुतेक वेळा ४ July च्या W/e ला धरून हे सम्मेलन असतं. ३००० ते ५००० लोकांची उपस्थिती असते. Booking जानेवारी/फेब्रुवारी मधे सुरू होतं. Convention Center च्या जवळपास असलेल्या Hotels मधे लोकांची रहाण्याची व्यवस्था होते. खाणंपिणं सगळं काही Convention Center मधे असतं.

मराठी समाजासाठी काय निष्पन्न होतं : एकत्र येणं...

जाणवलेल्या काही गोष्टी:
१. तिसर्‍या दिवशीपर्यंत अति-करमणुकीमुळे दमून जायला होतं.
२. खाणंपिणं बहुतेकवेळा उत्तम असतं.
३. रहाण्याची सोयही उत्तम असते.
४. प्रत्येकी $२५० च्या जवळपास फी असते. त्याव्यतिरिक्त रहाण्याचा, आणि प्रवासाचा खर्च असतो.
५. भारतातून चांगले चांगले कार्यक्रम आणण्याचा प्रयत्न होतो. (याबद्दल बरीच मते आहेत).

एकंदरीत एक सम्मेलन संपले की पुढचे कधी आणि कुठे याची उत्कंठा लागते..

अजयः छान मुलाखत..अधिवेशन उत्तम होणारच!
परदेसाई: ते बॉस्टन च मराठी मंडळ नसून, NEMM- न्यु ईंग्लंड मराठी मंडळ ( असं सर्वसमावेशक) आहे :)..
र्‍होड आयलंड न्यु इंग्लंड चाच भाग आहे Happy

>>अमेरिकेतल्या सगळ्या मराठी मंडळानी एकत्र येऊन, सगळ्या मराठी माणसांना एकत्र आणणारे अधिवेशन. यात इतर देशातूनही बरीच मंडळी येतात पण प्रामुख्याने अमेरिकेत राहणारी मराठी माणसं आवर्जून येतात.
. आतापर्यंत पाहिलेल्या सम्मेलनांमधे आलेल्या प्रेक्षकवर्गांमधे ५५+ लोक जवळपास ६०% किंवा जास्त असतात. <<

वरील वाक्यात भर टाकु इच्छितो; परदेसाईंची परवानगी गृहित धरुन... Happy

आतापर्यंत पाहिलेल्या सम्मेलनांमधे आलेल्या प्रेक्षकवर्गांमधे (स्थानिक) ९५% लोक फर्स्ट जनरेशन (FOBs पकडुन) असतात; उरलेले ५% कार्यक्रमांमध्ये भाग घेणारी चिल्ली-पिल्ली असतात.