झुणका X बर्गर - अ बिग फाईट

Submitted by Kiran.. on 7 July, 2012 - 06:31

काही काही गोष्टींचे संस्कार आपल्या मनावर खूप खोलवर झालेले असतात. जसं देऊळ दिसताक्षणी मराठी माणूस झटकन हात जोडतो. आत कुठला देव आहे याची चौकशी न करता ! हे संस्कार बालपणापासून झालेले असतात.

असेच संस्कार आपल्या मागच्या दोन पिढ्यांवर हिंदी सिनेमाने केले. या मातीत रहायचं तर या मातीत जे पिकतं आणि उगवतं त्याला नाक मुरडायचं नाही हा एक मुख्य संस्कार आहे. मागच्या दोन्ही पिढ्यांना हिंदी सिनेमातले नायक नायिका गाणं म्हणतात याचं आश्चर्य कधीच वाटलं नाही. कोवळ्या मनावर तसं ठसवलंच गेलं. आणि डीएनए मधे ही माहिती साठवून ठेवली गेल्याने पुढच्या पिढीने ते नैसर्गिकरित्या अ‍ॅक्सेप्ट केलं.

दोन एकसारखी माणसं एकाच वेळी एकाच गावात वावरणं हे तर इथल्या प्रेक्षकासाठी खूप कॉमन आहे पण त्यांचे आवाजही सेमच असावेत हे गृहीत धरण्यामागे या मातीची केमिस्ट्री असावी. प्रेक्षक आणि दिग्दर्शक दोन्ही या मातीचेच असल्याची ही खूण !

घोड्यासारखा चेहरा करून रडणा-या (किंवा हसणा-या ?) शाहरूखखान नावाच्या नटाला आणि काजोल नावाच्या नजरेत भरेल अशा वयात आलेल्या नटीला प्रेम आणि मैत्री यातला फरकच माहीत नसणे , ते खूपच अबोध वगैरे असणे हे देखील झटकन मान्य करून मातीतला प्रेक्षक सिनेमा हिट करतोच करतो. आठवा कुछ कुछ होता है !

घराच्या बाहेर हेलिकॉप्टर मधून उतरल्यानंतर आई भाबडेपणाने मुलाला विचारते " बेटे कब आये, पता ही नही चला !" हे शाहरूख खान, आदित्य चोप्रा, करण जोहर अशा ब्रॅण्डसोबत सहज पचून जातं. थेटरमधे कुणीही " ए भवाने ! हेलिकॉप्टरचा आवाज ऐकू आला नाही व्हय ?" असं चुकूनही विचारत नाही. लोक मान्य करत राहतात कारण समोर येईल ते खावं, अन्नाला नावं ठेवू नयेत, पानाचा अनादर करू नयेत हे आपल्या डीएनएतच नाही का ? दिवाळी, दसरा किंवा पाडव्या सारख्या सणालाच गोडधोड करून खायची संस्कृती आपली ! रोज रोज सण करणारे लोक आपण नाहीतच. म्हणूनच सणासुदीच्या भेटीप्रमाणे येणा-या मुघल ए आझम, शोले, जंजीर, खामोशी, जागते रहो, नया दौर, आवारा, श्री ४२०, छलिया, बावर्ची या आणि अशा शिदोरीच्या जोरावर वक्त, अमर अकबर अँथनी, सौदागर, खिलाडी आणि अनेक सुनील शेट्टीपट देखील ते सहज पचवून गेले.

मात्र, लोकांची चव बिघडवणारे ऋषिकेष मुखर्जी, बासू चटर्जी, सई परांजपे असे खोडसाळ आत्मे मागेही होऊन गेले तसेच आताही राजकुमार हिरानी, अनुराग कश्यप, संजय लीला भन्साळी, झा, राजकुमार संतोषी इ. आत्मे आहेतच. अनेक दिवसांच्या उपासमारीनंतर अचानक पंचपक्वान्नाचं ताट वाढलं जावं तसा त्या काळात "आनंद" हा ऋषिदांचा सिनेमा येतो आणि लोक त्याच तिकिटात पंचपक्वान्नाची मेजवानी मिळते म्हणून तुटून पडतात. पुन्हा असा हा योग लवकर येणार नाही हे जसं त्यांना माहीत असतं तसच बॉलिवूडलाही. म्हणून मग त्याच ताटातले सांडलेले पदार्थ घेऊन आलेला कल हो ना है देखील हिट होतोच. मूळची थाळी सात्विक असते. तिची चव लोक आजही विसरलेले नसतात. म्हणूनच खरकटं आहे हे माहीत असूनही दु:खाच्या सीनमधली कमालीची मेलोड्रॅमाटिक अ‍ॅक्टिंग असलेला शाहरूख लोकांना सहन होतो. शाहरूख खान या नटाचे आपल्या सिनेसृष्टीवर अनंत उपकार आहेत. त्याच्याच मुळे दिलीपसाब, राजेशखन्ना (बॉबकट करायच्या आधीचा), देवसाब ही मंडळी अगदी नॅचरल वाटू लागली. बावर्ची सारख्या ऑल टाईम क्लासिक असलेल्या सिनेमावरचा दत्त म्हणून समोर येणा-या संजयचा खूबसूरतही आपण याच न्यायाने स्विकारतो.

हे सगळं कसं सुरळीत चाललेलं होतं. पण ....

मधल्या काळात चीज बर्गर, पिझ्झा खाणारी आणि कोक पिणारी एक पिढी उदयाला आली. या पिढीला पिठलं भाकर, कांदा असा मेन्यु गावठी वाटणं साहजिकच होतं. त्यांच्या तोंडी कधीही न ऐकलेली कॉण्टिनेण्टल डिशेसची नावं ऐकूनच गुदमरायला होत होतं. चिकन चॅव चॅव विथ कोक्रच लेग्ज पुढे श्रीखंड कसं गोड लागावं ? मागच्याही पिढीत अमिताभ बच्चनला नावं ठेवत सुपरमॅनला आणि जनू बांडेला गर्दी करणारे बर्गर होतेच. स्पेसमधून आलेले किडेमूंगी मारायचे हॉलिवूडपट बघणारे हॉट डॉग्ज होतेच. पण त्यांच्यावर इंग्लिश सिनेमा धंदा वगैरे करू शकत नव्हता.

पण त्यामुळं झालं काय कि झुणका वाले आणि बर्गर वाले असे दोन गट तयार झाले. झुणक्याला गावठी असं अल्पसंख्य बर्गरवाले उघडपणे म्हणू शकत असले तरी बर्गर आवडत नाही असं म्हणण्याची हिंमत झुणकेवाल्यांच्यात नव्हती. तसं केल्याने हीन अभिरूचीचा आरोप होण्याची शक्यता जास्त ! इंग्लीश कळत नाही हा आरोप तर मूळव्याधासारखा ठुसठुसणारा ! मग काय, एक धोरण म्हणून मराठी माणूस हिंदीवाल्यांपुढे जे करतो त्याचप्रमाणे सरळ लोटांगण घालत झुणकेवालेही बर्गर खाऊ लागले. हिचकॉकचा सिनेमा कळाला नाही तरी रामसेपटांपेक्षा तो कसा भारी आहे हे झुणकावालेच सांगू लागले...आणि थोडासा रुमानी हो जाये सारखा नानाचा सिनेमा न पाहताही शिंडलर्स लिस्ट बद्दल भरभरून बोलू लागले. आमचे झुणका भाकर केंद्र कधी सुधारणार असे गळे काढू लागले......

आणि इथंच सगळा घोळ झाला.

झुणका भाकर केंद्रवाल्यांनाही वाटू लागलं कि आता काही खरं नाही. गि-हाईकाचा डीएनए मॉडीफाय झाला भौतेक ! आता बर्गर ठेवायला पाहीजे दुकानात. पण अजूनही झुणका खायला भरपूर पब्लिक येतच होतं. मग काय झुणका विथ पाव अशा डिशेस दिसू लागल्या आणि द वेन्सडे सारखे सिनेमे थेटरात झळकू लागले. या सिनेमाला ओरिजिनल बर्गरवाल्यांनी डोक्यावर घेतलं, मॉडीफाईड डीएनएंनी इमेज जपत कौतुक केलं तर अजूनही झुणका खाणा-यांनी टीव्हीवर पाहणं पसंत केलं. पण ही चव सगळ्यांना आवडलीच. याचदरम्यान मल्टीप्लेक्सही आले आणि स्वस्त असूनही झुणकावाले पण अभिरूची जपण्यासाठी तिकडे वळले. मग काय गणितंच बदलली. एक रूपयात झुणका भाकर केंद्रावर कुणीच दिसेना ! मग मेकओव्हरची स्पर्धा सुरू झाली आणि पिझ्झा हट आणि कष्टाची भाकर केंद्र सारखेच दिसू लागले. बाबा आढावांचा फोटो मॅकडोनाल्ड सारखा दिसू लागला !

झु. भा. गोटात अस्वस्थता पसरली. मात्र पं सलीमखान शास्त्री आणि जावेदपंत अख्तर हे बॉलिवूडचे अध्वर्यू त्यांना पॅनिक होऊ नका असा सल्ला देत राहीले. साक्षात महामुनी व्यास आणि वाल्मीकि यांनीच सांगितल्यावर बॉलीवूडवाल्यांनी विश्वास ठेवला. सर्वशक्तीमान अमिताभ बच्चन यांनी देखील भारतीय सिनेमा जगात टिकणारा आहे असं सांगितलं. पितामह भीष्मांच्या या शब्दांनी त्यांना हुरूप आला.

आता झुणका भाकर केंद्रवाले आक्रमक झाले. च्यायला ! मॅट्रीक्सवाल्यांना काशाची वाटी आणि घायलच्या सनी देऑलच्या माथी मात्र काठी ? बच्चनपटांच्या कुरापती आणि जनू बांडेच्या पंचारती ??
ये ना चालो बे !
मग काय म्हणता राव ! हमाल पंचायत, कष्टाची भाकर, झुणका भाकर केंद्र हे असे पेटले असे पेटले कि बस्स ! त्यांनी असा दबंग काढला.. असा काढला कि ज्याचं नाव ते ! दबंगमुळं पुन्हा झुणका भाकर केंद्र जोरात चालू लागली. आता ओरिजिनल अमेरिकन बर्गर देखील मुद्दामून हिंदीतून यायला लागल्याने झु.भा. वाले सावध झालेच होते. दबंग वर ते स्वस्थ बसले नाहीत. त्यात मिरच्या टाकल्या, लसणाचा ठेचा टाकला आणि असा सिंघम आणला असा सिंघम आणला कि स्पायडीचा तिसरा भाग पालापाचोळ्यासारखा उडून गेला. लसणाच्या ठेच्याने आणि मिरचीच्या झटक्याने स्पायडीला अशी आग लागली कि भारतीय लोकांना पाणी का वापरावंसं वाटतं त्याचा त्याला पुढचे अनेक दिवस साक्षात्कार होत राहिला.

खरं तर स्पायडी मधे पण झु.भा. वाल्यांसारखे कांदा, तेल, मसाले टाकलेच होते. पण क्रिशच्या झंझावातापुढे सुपरमॅनच्या पँटवर अंडरपँट घालायच्या सवयीचा घात झाला आणि मग बर्गरवाले चिंताक्रांत झाले. क्रिशच्या सीडीज ते २४ x 7 पाहू लागले आणि झु.भा. केंद्रातून चोरलेला मसाला टाकून मानव कोळीचा नवा अवतार आला. सिनेमा धो धो चालला आणि बर्गरवाल्यांचा जीव भांड्यात पडला.

आता बर्गर वाल्यांचाही डीएनए मॉडिफाय झाला ! संपूर्णपणे बॉलिवूडचाच वाटावा असा मार्क ऑफ द झोरो त्यांनी काढला. जॅकी चॅननेही हरवले सापडले फॉर्म्युला स्विकारून जुळ्या भावांचा हॉलिवूडपट काढला. स्पायडीच्या डोळ्यांत आरके सारखे व्याकूळ भाव आले. हे कमी म्हणून कि काय हॉलिवूडमधे भारतीय अभिनेते दिसू लागले. आणि बॉलिवूडच्या ऐश्वर्या रायपुढे हॉलिवूडपटांचे प्रस्ताव येऊ लागले.. !

...पण हे इथंच थाबणारं प्रकरण नाही. मानवी भावभावनांच्या हिंदोळ्यावर झुलणा-या या जीन्समधली मिसिंग लिंक जोडली गेल्याशिवाय हा मेकओव्हर थांबणारा नाही. एकदा हे झालं कि मग टॉम क्रूझ आणि अँजेलीना जोली गाणं म्हणताहेत, आयटेम साँगवर नऊवारी लुगड्यात हॉलिवूडच्या कॅथेरीन झिटा जोन्सची पावलं थिरकताहेत हे दिसू लागेल. पिटातला प्रेक्षक नावाचा वर्ग उदयाला येईल. शिट्ट्या मारणे आणि नाणी फेकणे हे तिकडेही होऊ लागेल, देखाना सोचाना च्या चालीवर डिडन्ट सी हाय रे डिडन्ट थिंक या गाण्यावर थेटरात डान्स होऊ लागेल आणि माझी फिल्लमबाजीचं बर्गर वर्जन शिरीष कणेकर अमेरिकेत सादर करताना दिसतील.

आणि संस्कृतीरक्षक देखील समाधानाने म्हणतील ... आपल्या मातीतल्या झुणक्याची सर बर्गरला नाही हे उशिरा का होईना जगाला कळालं !!

- Kiran..

गुलमोहर: 

पण या जीन्समधली मिसिंग लिंक जोडली गेली कि टॉम क्रूझ आणि अँजेलीना जोली गाणं म्हणताहेत,>>>>>>>>> काही करा..........हे मात्र करा...लय भारी वाटेल बघा......... टॉम क्रुझ गळ्यात ढोलकी अडकवुन वाजवत आहे... आनि अँजेलीना नउवारी नेसुन लावणी करते........शाकिराचा आवाज....आणि अजय अतुल चे संगीत...स्टिवन स्पिल्बर्ग चा चित्रपट.. Happy

झक्कास जमलय... आवड्या...
ए भवाने ! हेलिकॉप्टरचा आवाज ऐकू आला नाही व्हय गं ?" असं चुकूनही विचारत नाही
Happy

लय भारी !
एकेकाळी शा खा खूपच आवडायचा ब्वॉ आपल्याला Lol त्यामुळे कु कु हो है च्या वर्णनाला आक्षेप Proud
बाकी हेलिकॉप्टर आणि शेवटच्या आयटेम साँगवाल्या लायनी झकासच.
आमचं अजून बर्गरशी नाही जमत विशेष.

आयटेम साँगवर हॉलिवूडच्या अभिनेत्र्या थिरकताहेत हे दिसू लागेल.

>>> हे झालंय आधीच. आठवा, कायली मिनोग आणी अक्षयकुमार, "ब्ल्यु" चित्रपट.

धन्यवाद मित्रांनो !

थोडीशी गडबड झाली. लेख लिहून अप्रकाशित ठेवणार होतो. पण कनेक्शन एक्स्पायर व्हायला आणि लेख सेव्ह करायला एकच गाठ पडली. Biggrin नंतर वाढवायचा विचार होता, पण झालं ते चांगलंच झालं ( नाहीतर स्कीम व्हायची पुन्हा Wink )

रुणुझुणू
सॉरी बरं का.. आ.खा. फॅनक्लबमधून लेख आल्यावर हे अपेक्षितच नाही का Wink

धन्यवाद मित्रांनो..

आमच्या झुणका भाकर केंद्राच्या प्रेक्षकांनी काही अलिखित नियम मान्य केलेले आहेत. ते असे..

१. पोस्टर/ ट्रेलर पाहून अपेक्षा ठेवणे
२. सिनेमाची जातकुळी पाहून तो एंजॉय करणे
३. थेटरात शिरताना दिग्दर्शकाशी अलिखित करार असणे. हा प्रेक्षक शिंडलर्स लिस्टला जाईल तेव्हां त्याचा दिग्दर्शकाशी असलेला करार वेगळा असेल तर स्पायडीच्या दिग्दर्शकाशी वेगळा असेल. डेव्हीड धवनच्या सिनेमाच्या वेळी आणखी वेगळा असेल तर उमराव जानच्या दिग्दर्शकाशी वेगळा असेल.
४. आपले सर्व इगो, काळज्या, बुद्धीमत्ता हे गरजेप्रमाणे बाहेर हेल्मेट स्टँडला अडकवून येणे.
५. आपण देखील सिनेमा काढू शकतो असा भाव मनात न ठेवता चित्रपट पाहताना त्यात हरवून जाणे.
६. समीक्षक या प्राण्यावर विश्वास न ठेवणे. स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही तसंच चित्रपटाबाबत आहे याची त्याला खात्री असते.....
७. एमपीएससी च्या पेपरप्रमाणे आपण प्रेडीक्टेबल राहणार नाही याची काळजी घेणे. म्हणूनच शोले डोक्यावर घेतल्यानंतर शानचे धिंडवडे निघाले. अमिताभच्या नावावर इन्कलाब सारखा टुकार सिनेमाही हिट होऊ शकतो या भ्रमात असणा-या बॉलिवूडला जादूगर, तुफान, गंगा जमुना सरस्वती सहीत मै आझाद हूं सारखा सिनेमाही आपटून दाखवणे. हम आपके है कौन नंतर सूरज बडजात्याला यश मिळणारच नाही हे जातीने पाहणे.

आणखी आहेत. आठवतील तसे टंकतो Wink

दादांच्या मराठी सिनेमाला द्वैअर्थी म्हणवणार्या संस्कृतीरक्षकांची पुढची पिढी आजकाल हिंदितला द्वैअर्थी सिनेमा एन्जॉय करते हे विशेष, त्यांना" ऑल ईडीयट्स" चित्रपट सर्वात्तम वाटतो, जरी डायलॉग द्वैअर्थी असले तरी. वीस वर्षांत केवढे mutation झाले DNA मध्ये ...

किरण थोडावेळ थांबला असतास तर चालले असते......"क्या सुपरकुल है हम" हा आचरट चित्रपट बघ किंवा त्याचे ट्रेलर बघ............अजुन मटेरिअल मिळेल लिहायला... Happy

आश, वर्षुतै, दिनेशदा, ग्रेटथिंकर आभार आपले सर्वांचे Happy
वर्षुतै... डोक्यावर हात राहू दे असाच Happy

सारीका - कोंगाडी लोकांवर व्हय ? डोस्कंच बंद पडतंय बघ तिकडं ! Biggrin
उदयन - परत कधीतरी नक्कीच Happy

किरणच्या पोतडीतुन अजुन एक मजेदार आयटेम बाहेर निघाला. Lol हे पण नेहमीप्रमाणेच जबरी आहे.

मी विनोदी लेखन हा साहित्य प्रकार नेहमीच स्किप करते, पण किरण तुझं विनोदी लेखन कधीच विनोदाला विनोद असं ओढुन ताणुन नसतं. हसु आणि त्याखाली काही तरी विचारपुर्वक बौद्धिक लिखाण ( कधी कधी कोणाला काढलेले चिमकुटे का असेनात ;)) दोन्ही एकत्र असतं. मी तुझ्या फॅन क्लबात रे.

किरणच्या पोतडीतुन अजुन एक मजेदार आयटेम बाहेर निघाला. हाहा हे पण नेहमीप्रमाणेच जबरी आहे. >>>>. + १०

किरण्या hearty-laugh.gif

मॅट्रीक्सवाल्यांना काशाची वाटी आणि घायलच्या सनी देऑलच्या माथी मात्र काठी ? बच्चनपटांच्या कुरापती आणि जनू बांडेच्या पंचारती ??
ये ना चालो बे ! >>>>>> खासच नवीन म्हणी roflmao.gif

भारतीय लोकांना पाणी का वापरावंसं वाटतं त्याचा त्याला पुढचे अनेक दिवस साक्षात्कार होत राहिला.>>>
पण क्रिशच्या झंझावातापुढे सुपरमॅनच्या पँटवर अंडरपँट घालायच्या सवयीचा घात झाला >>>
सहीच मित्रा...
Rofl Biggrin Lol
Rofl Biggrin Lol

स्वाती २, आशु२९, पुरंदरे शशांक, ला़ओ, प्रसिक, संदिप आहेर, केदार २०, मयुरी, मार्को पोलो आभारी आहे रे मित्रांनो

@ मनिमाऊ
थँक्स अ लॉट Happy

@ दाद
तुमची दाद मिळाली कि समाधान वाटतं.

मस्तच लेख.
>>घोड्यासारखा चेहरा करून रडणा-या (किंवा हसणा-या ?) शाहरूखखान नावाच्या नटाला आणि काजोल नावाच्या नजरेत भरेल अशा वयात आलेल्या नटीला प्रेम आणि मैत्री यातला फरकच माहीत नसणे , ते खूपच अबोध वगैरे असणे हे देखील झटकन मान्य करून मातीतला प्रेक्षक सिनेमा हिट करतोच करतो>>
>>झु. भा. गोटात अस्वस्थता पसरली. मात्र पं सलीमखान शास्त्री आणि जावेदपंत अख्तर हे बॉलिवूडचे अध्वर्यू त्यांना पॅनिक होऊ नका असा सल्ला देत राहीले. साक्षात महामुनी व्यास आणि वाल्मीकि यांनीच सांगितल्यावर बॉलीवूडवाल्यांनी विश्वास ठेवला>>
फारच भारी Happy

Pages