काही काही गोष्टींचे संस्कार आपल्या मनावर खूप खोलवर झालेले असतात. जसं देऊळ दिसताक्षणी मराठी माणूस झटकन हात जोडतो. आत कुठला देव आहे याची चौकशी न करता ! हे संस्कार बालपणापासून झालेले असतात.
असेच संस्कार आपल्या मागच्या दोन पिढ्यांवर हिंदी सिनेमाने केले. या मातीत रहायचं तर या मातीत जे पिकतं आणि उगवतं त्याला नाक मुरडायचं नाही हा एक मुख्य संस्कार आहे. मागच्या दोन्ही पिढ्यांना हिंदी सिनेमातले नायक नायिका गाणं म्हणतात याचं आश्चर्य कधीच वाटलं नाही. कोवळ्या मनावर तसं ठसवलंच गेलं. आणि डीएनए मधे ही माहिती साठवून ठेवली गेल्याने पुढच्या पिढीने ते नैसर्गिकरित्या अॅक्सेप्ट केलं.
दोन एकसारखी माणसं एकाच वेळी एकाच गावात वावरणं हे तर इथल्या प्रेक्षकासाठी खूप कॉमन आहे पण त्यांचे आवाजही सेमच असावेत हे गृहीत धरण्यामागे या मातीची केमिस्ट्री असावी. प्रेक्षक आणि दिग्दर्शक दोन्ही या मातीचेच असल्याची ही खूण !
घोड्यासारखा चेहरा करून रडणा-या (किंवा हसणा-या ?) शाहरूखखान नावाच्या नटाला आणि काजोल नावाच्या नजरेत भरेल अशा वयात आलेल्या नटीला प्रेम आणि मैत्री यातला फरकच माहीत नसणे , ते खूपच अबोध वगैरे असणे हे देखील झटकन मान्य करून मातीतला प्रेक्षक सिनेमा हिट करतोच करतो. आठवा कुछ कुछ होता है !
घराच्या बाहेर हेलिकॉप्टर मधून उतरल्यानंतर आई भाबडेपणाने मुलाला विचारते " बेटे कब आये, पता ही नही चला !" हे शाहरूख खान, आदित्य चोप्रा, करण जोहर अशा ब्रॅण्डसोबत सहज पचून जातं. थेटरमधे कुणीही " ए भवाने ! हेलिकॉप्टरचा आवाज ऐकू आला नाही व्हय ?" असं चुकूनही विचारत नाही. लोक मान्य करत राहतात कारण समोर येईल ते खावं, अन्नाला नावं ठेवू नयेत, पानाचा अनादर करू नयेत हे आपल्या डीएनएतच नाही का ? दिवाळी, दसरा किंवा पाडव्या सारख्या सणालाच गोडधोड करून खायची संस्कृती आपली ! रोज रोज सण करणारे लोक आपण नाहीतच. म्हणूनच सणासुदीच्या भेटीप्रमाणे येणा-या मुघल ए आझम, शोले, जंजीर, खामोशी, जागते रहो, नया दौर, आवारा, श्री ४२०, छलिया, बावर्ची या आणि अशा शिदोरीच्या जोरावर वक्त, अमर अकबर अँथनी, सौदागर, खिलाडी आणि अनेक सुनील शेट्टीपट देखील ते सहज पचवून गेले.
मात्र, लोकांची चव बिघडवणारे ऋषिकेष मुखर्जी, बासू चटर्जी, सई परांजपे असे खोडसाळ आत्मे मागेही होऊन गेले तसेच आताही राजकुमार हिरानी, अनुराग कश्यप, संजय लीला भन्साळी, झा, राजकुमार संतोषी इ. आत्मे आहेतच. अनेक दिवसांच्या उपासमारीनंतर अचानक पंचपक्वान्नाचं ताट वाढलं जावं तसा त्या काळात "आनंद" हा ऋषिदांचा सिनेमा येतो आणि लोक त्याच तिकिटात पंचपक्वान्नाची मेजवानी मिळते म्हणून तुटून पडतात. पुन्हा असा हा योग लवकर येणार नाही हे जसं त्यांना माहीत असतं तसच बॉलिवूडलाही. म्हणून मग त्याच ताटातले सांडलेले पदार्थ घेऊन आलेला कल हो ना है देखील हिट होतोच. मूळची थाळी सात्विक असते. तिची चव लोक आजही विसरलेले नसतात. म्हणूनच खरकटं आहे हे माहीत असूनही दु:खाच्या सीनमधली कमालीची मेलोड्रॅमाटिक अॅक्टिंग असलेला शाहरूख लोकांना सहन होतो. शाहरूख खान या नटाचे आपल्या सिनेसृष्टीवर अनंत उपकार आहेत. त्याच्याच मुळे दिलीपसाब, राजेशखन्ना (बॉबकट करायच्या आधीचा), देवसाब ही मंडळी अगदी नॅचरल वाटू लागली. बावर्ची सारख्या ऑल टाईम क्लासिक असलेल्या सिनेमावरचा दत्त म्हणून समोर येणा-या संजयचा खूबसूरतही आपण याच न्यायाने स्विकारतो.
हे सगळं कसं सुरळीत चाललेलं होतं. पण ....
मधल्या काळात चीज बर्गर, पिझ्झा खाणारी आणि कोक पिणारी एक पिढी उदयाला आली. या पिढीला पिठलं भाकर, कांदा असा मेन्यु गावठी वाटणं साहजिकच होतं. त्यांच्या तोंडी कधीही न ऐकलेली कॉण्टिनेण्टल डिशेसची नावं ऐकूनच गुदमरायला होत होतं. चिकन चॅव चॅव विथ कोक्रच लेग्ज पुढे श्रीखंड कसं गोड लागावं ? मागच्याही पिढीत अमिताभ बच्चनला नावं ठेवत सुपरमॅनला आणि जनू बांडेला गर्दी करणारे बर्गर होतेच. स्पेसमधून आलेले किडेमूंगी मारायचे हॉलिवूडपट बघणारे हॉट डॉग्ज होतेच. पण त्यांच्यावर इंग्लिश सिनेमा धंदा वगैरे करू शकत नव्हता.
पण त्यामुळं झालं काय कि झुणका वाले आणि बर्गर वाले असे दोन गट तयार झाले. झुणक्याला गावठी असं अल्पसंख्य बर्गरवाले उघडपणे म्हणू शकत असले तरी बर्गर आवडत नाही असं म्हणण्याची हिंमत झुणकेवाल्यांच्यात नव्हती. तसं केल्याने हीन अभिरूचीचा आरोप होण्याची शक्यता जास्त ! इंग्लीश कळत नाही हा आरोप तर मूळव्याधासारखा ठुसठुसणारा ! मग काय, एक धोरण म्हणून मराठी माणूस हिंदीवाल्यांपुढे जे करतो त्याचप्रमाणे सरळ लोटांगण घालत झुणकेवालेही बर्गर खाऊ लागले. हिचकॉकचा सिनेमा कळाला नाही तरी रामसेपटांपेक्षा तो कसा भारी आहे हे झुणकावालेच सांगू लागले...आणि थोडासा रुमानी हो जाये सारखा नानाचा सिनेमा न पाहताही शिंडलर्स लिस्ट बद्दल भरभरून बोलू लागले. आमचे झुणका भाकर केंद्र कधी सुधारणार असे गळे काढू लागले......
आणि इथंच सगळा घोळ झाला.
झुणका भाकर केंद्रवाल्यांनाही वाटू लागलं कि आता काही खरं नाही. गि-हाईकाचा डीएनए मॉडीफाय झाला भौतेक ! आता बर्गर ठेवायला पाहीजे दुकानात. पण अजूनही झुणका खायला भरपूर पब्लिक येतच होतं. मग काय झुणका विथ पाव अशा डिशेस दिसू लागल्या आणि द वेन्सडे सारखे सिनेमे थेटरात झळकू लागले. या सिनेमाला ओरिजिनल बर्गरवाल्यांनी डोक्यावर घेतलं, मॉडीफाईड डीएनएंनी इमेज जपत कौतुक केलं तर अजूनही झुणका खाणा-यांनी टीव्हीवर पाहणं पसंत केलं. पण ही चव सगळ्यांना आवडलीच. याचदरम्यान मल्टीप्लेक्सही आले आणि स्वस्त असूनही झुणकावाले पण अभिरूची जपण्यासाठी तिकडे वळले. मग काय गणितंच बदलली. एक रूपयात झुणका भाकर केंद्रावर कुणीच दिसेना ! मग मेकओव्हरची स्पर्धा सुरू झाली आणि पिझ्झा हट आणि कष्टाची भाकर केंद्र सारखेच दिसू लागले. बाबा आढावांचा फोटो मॅकडोनाल्ड सारखा दिसू लागला !
झु. भा. गोटात अस्वस्थता पसरली. मात्र पं सलीमखान शास्त्री आणि जावेदपंत अख्तर हे बॉलिवूडचे अध्वर्यू त्यांना पॅनिक होऊ नका असा सल्ला देत राहीले. साक्षात महामुनी व्यास आणि वाल्मीकि यांनीच सांगितल्यावर बॉलीवूडवाल्यांनी विश्वास ठेवला. सर्वशक्तीमान अमिताभ बच्चन यांनी देखील भारतीय सिनेमा जगात टिकणारा आहे असं सांगितलं. पितामह भीष्मांच्या या शब्दांनी त्यांना हुरूप आला.
आता झुणका भाकर केंद्रवाले आक्रमक झाले. च्यायला ! मॅट्रीक्सवाल्यांना काशाची वाटी आणि घायलच्या सनी देऑलच्या माथी मात्र काठी ? बच्चनपटांच्या कुरापती आणि जनू बांडेच्या पंचारती ??
ये ना चालो बे !
मग काय म्हणता राव ! हमाल पंचायत, कष्टाची भाकर, झुणका भाकर केंद्र हे असे पेटले असे पेटले कि बस्स ! त्यांनी असा दबंग काढला.. असा काढला कि ज्याचं नाव ते ! दबंगमुळं पुन्हा झुणका भाकर केंद्र जोरात चालू लागली. आता ओरिजिनल अमेरिकन बर्गर देखील मुद्दामून हिंदीतून यायला लागल्याने झु.भा. वाले सावध झालेच होते. दबंग वर ते स्वस्थ बसले नाहीत. त्यात मिरच्या टाकल्या, लसणाचा ठेचा टाकला आणि असा सिंघम आणला असा सिंघम आणला कि स्पायडीचा तिसरा भाग पालापाचोळ्यासारखा उडून गेला. लसणाच्या ठेच्याने आणि मिरचीच्या झटक्याने स्पायडीला अशी आग लागली कि भारतीय लोकांना पाणी का वापरावंसं वाटतं त्याचा त्याला पुढचे अनेक दिवस साक्षात्कार होत राहिला.
खरं तर स्पायडी मधे पण झु.भा. वाल्यांसारखे कांदा, तेल, मसाले टाकलेच होते. पण क्रिशच्या झंझावातापुढे सुपरमॅनच्या पँटवर अंडरपँट घालायच्या सवयीचा घात झाला आणि मग बर्गरवाले चिंताक्रांत झाले. क्रिशच्या सीडीज ते २४ x 7 पाहू लागले आणि झु.भा. केंद्रातून चोरलेला मसाला टाकून मानव कोळीचा नवा अवतार आला. सिनेमा धो धो चालला आणि बर्गरवाल्यांचा जीव भांड्यात पडला.
आता बर्गर वाल्यांचाही डीएनए मॉडिफाय झाला ! संपूर्णपणे बॉलिवूडचाच वाटावा असा मार्क ऑफ द झोरो त्यांनी काढला. जॅकी चॅननेही हरवले सापडले फॉर्म्युला स्विकारून जुळ्या भावांचा हॉलिवूडपट काढला. स्पायडीच्या डोळ्यांत आरके सारखे व्याकूळ भाव आले. हे कमी म्हणून कि काय हॉलिवूडमधे भारतीय अभिनेते दिसू लागले. आणि बॉलिवूडच्या ऐश्वर्या रायपुढे हॉलिवूडपटांचे प्रस्ताव येऊ लागले.. !
...पण हे इथंच थाबणारं प्रकरण नाही. मानवी भावभावनांच्या हिंदोळ्यावर झुलणा-या या जीन्समधली मिसिंग लिंक जोडली गेल्याशिवाय हा मेकओव्हर थांबणारा नाही. एकदा हे झालं कि मग टॉम क्रूझ आणि अँजेलीना जोली गाणं म्हणताहेत, आयटेम साँगवर नऊवारी लुगड्यात हॉलिवूडच्या कॅथेरीन झिटा जोन्सची पावलं थिरकताहेत हे दिसू लागेल. पिटातला प्रेक्षक नावाचा वर्ग उदयाला येईल. शिट्ट्या मारणे आणि नाणी फेकणे हे तिकडेही होऊ लागेल, देखाना सोचाना च्या चालीवर डिडन्ट सी हाय रे डिडन्ट थिंक या गाण्यावर थेटरात डान्स होऊ लागेल आणि माझी फिल्लमबाजीचं बर्गर वर्जन शिरीष कणेकर अमेरिकेत सादर करताना दिसतील.
आणि संस्कृतीरक्षक देखील समाधानाने म्हणतील ... आपल्या मातीतल्या झुणक्याची सर बर्गरला नाही हे उशिरा का होईना जगाला कळालं !!
- Kiran..
वा ! छान .
वा ! छान .
मस्तच.. विनोदाचा भाग सोडला
मस्तच..
विनोदाचा भाग सोडला तर टिप्पण्या मार्मिक आहेत..
शाहरुखच्या काही जुन्या आणि आवडत्या चित्रपटांच्या आठवणी देखील जाग्या केल्यात..
कभी खुशी कभी गम हा चित्रपट माझ्या आईचा ऑल टाईम फेवरेट.. ४०-४५ वेळा पाहिला असेल.. आणि यात जराही आतिशयोक्ती नाहिये.. जेव्हा जेव्हा हा चित्रपट टीवी वर लागतो, माझी आई चॅनेलच चेंज करायचे विसरून जाते..
आणि या लेखात उल्लेखलेला सीनही खासच.. जेव्हा मी कॉलेज-ऑफिसमधून येतो तेव्हा मला आल्या आल्या चहा लागते आणि आई तो गरमागरम घेऊन हजरच असते.. तेव्हा मी शाहरुखचा डायलॉग मारतो.. हे मां, तुम्हे हमेशा मेरे आनेसे पहले ही कैसे पता चल जाता है..
चांगलं लिहिलय. पण टाईमलाईनमधे
चांगलं लिहिलय. पण टाईमलाईनमधे गडबड आहे.
सिंघम आणि स्पायडी३ एकत्र आले नाहीत.
तरीपण काही खास लक्षात घेण्यालायक मुद्दे:
१. बर्गरवाले आता आपल्या प्रसिद्धीच्या बजेटमधे भारतासाठी खच्चून पैसा बाजूला काढून ठेवतात. त्यासाठी त्यांचे स्टार्स भारतात यायला उत्सुक असतात आणि इथे आल्यावर "आय वॉन्ट टू वर्क इन बॉलीवूड" हे अभिमानाने सांगतात. त्यांच्या सिनेमा इथे चार भाषामधे रीलीज होतो.
सलमान खान हे सिंगल स्क्रीन सिनेम्याचे बादशाह आहेत. हे कायम लक्षात ठेवा.
२. बर्गरवाले झुणकाभाकर फिल्म बनवण्यामधे इंटरेस्टेड आहेत. बनवत आहेत आणि यशस्वीदेखील होत आहेत. सोनी, फॉक्स, कोलंबीया भारतामधे बस्तान बसवत आहेत. त्यांचे सिनेमाचे रिमेक देखील बनवत आहेत. आता कॉपीपेस्टचा जमाना गेला. भट्ट कँप वैतागमोडमधे.
३. तुम्ही दबंगचा उल्लेख केलात, पण हे कसे विसरलात जी त्याच्या मूळ आयडियेची कल्पना सलीम खान यांचीच होती. पॅनिक न होण्याचा नुसता सल्ला नाही दिला त्यानी, तर मार्गपण दाखवला
४. आणि आयटेम साँगबद्दल: छम्मा छम्माचे हॉलीवूड व्हर्जन विसरलात का?
५. द वेन्सडेच्या आधीपासून मल्टिप्लेक सिनेमा अशी जमात उदयाला येत होती, भेजा फ्राय हे त्याचे उत्तम उदाहरण. दबंगमुळे सिंगल स्क्रीनची शान परत आली.
६.मध्यंतरी एनाराय लोकांच्या सिनेम्यानी डोके उठवले होते. डीडीएलजे पासून ते पार कँक पर्यंत. नशिबाने आता त्या सिनेम्याची क्रेझ गेली. टशनसारख्या फ्युझननंतर यशराजपण रबनेबनादीजोडी आणि इशकझादेकडे वळाले.
मध्यंतरी एनाराय लोकांच्या
मध्यंतरी एनाराय लोकांच्या सिनेम्यानी डोके उठवले होते. डीडीएलजे पासून ते पार कँक पर्यंत. नशिबाने आता त्या सिनेम्याची क्रेझ गेली.
अगदी अगदी
शंभरदा अनुमोदन !!
मुहब्बते हा कळस होता लोकांच्या सहनशक्तीचा !!
चौकट राजा, मी नताशा - धन्यवाद

अभिषेक - थँक्स रे
भारीच!
भारीच!
:हहगलो: :हहगलो: मस्तच
लै भारी!
लै भारी!
स्पर्धेत आढावा घेण्यासाठी लेख
स्पर्धेत आढावा घेण्यासाठी लेख पाडावा म्हटलं.. आणि या लेखाची आठवण झाली.
सही
सही किरन.
आवडेश...................
ए भवाने ! हेलिकॉप्टरचा आवाज
ए भवाने ! हेलिकॉप्टरचा आवाज ऐकू आला नाही व्हय गं ?" असं चुकूनही विचारत नाही.
आमच्या कोलापुरला या एकदा पिच्चर बघायला,
याच्याही पुढचे डॉयलॉग्ज ऐकायला मिळतील थेटरात.
जब्राट ओ भाउ एकदम
जब्राट ओ भाउ एकदम जब्राट...... लोलले हसुन हसुन
घोड्यासारखा चेहरा करून रडणा-या
(किंवा हसणा-या ?)
शाहरूखखान नावाच्या नटाला
अनेक दिवसांच्या उपासमारीनंतर अचानक पंचपक्वान्नाचं ताट वाढलं जावं तसा त्या काळात "आनंद" हा ऋषिदांचा सिनेमा येतो आणि लोक त्याच तिकिटात पंचपक्वान्नाची मेजवानी मिळते म्हणून तुटून पडतात. पुन्हा असा हा योग लवकर येणार नाही हे जसं त्यांना माहीत असतं तसच बॉलिवूडलाही. म्हणून मग त्याच ताटातले सांडलेले पदार्थ घेऊन आलेला कल हो ना है देखील हिट होतोच. मूळची थाळी सात्विक असते. तिची चव लोक आजही विसरलेले नसतात. म्हणूनच खरकटं आहे हे माहीत असूनही दु:खाच्या सीनमधली कमालीची मेलोड्रॅमाटिक अॅक्टिंग असलेला शाहरूख लोकांना सहन होतो. शाहरूख खान या नटाचे आपल्या सिनेसृष्टीवर अनंत उपकार आहेत. त्याच्याच मुळे दिलीपसाब, राजेशखन्ना (बॉबकट करायच्या आधीचा), देवसाब ही मंडळी अगदी नॅचरल वाटू लागली.
अगदी खर आहे हे .
मध्यंतरी एनाराय लोकांच्या सिनेम्यानी डोके उठवले होते. डीडीएलजे पासून ते पार कँक पर्यंत. नशिबाने आता त्या सिनेम्याची क्रेझ गेली. ....... डोक्यात जातात असले सिनेमे .
बाकि एकदम झक्कास लिहिलेय
सानीच्या प्रतिसादाची आठवण
सानीच्या प्रतिसादाची आठवण झाली
Pages