'वैतागवाडी' आणि 'राडा' - भाऊ पाध्ये

Submitted by साजिरा on 2 July, 2012 - 06:57

'भाऊ पाध्ये' या नावापाठोपाठ 'वासूनाका' हे नाव जोडूनच माझ्या मनात कायमच येत गेलं आहे. महानगरांतली पात्रं, त्यांचे व्यवहार, त्यांची नाती, त्यांची लैंगिकता मोठ्या ताकदीने आणि धाडसाने रेखाटणार्‍या या कलंदर लेखकाने भाराभर नसल्या तरी मोजायला दोन्ही हातांची बोटं लागावीत इतक्या तरी कादंबर्‍या लिहिल्या. पण या सर्वांत 'वासूनाका'ने त्यांना बरंच काही दिलं. प्रसिद्धी, वाद, मानहानी हे तर दिलंच, पण स्वतःच्याच शैलीचं, कुवतीचं भान आणि शिवाय अस्सल महानगरीय व्यवहार तसेच्या तसे कागदावर उतरवण्याचं धाडस त्यांना या पुस्तकाने दिलं असं वाटतं.

'डोंबार्‍याचा खेळ', 'करंटा', 'वैतागवाडी' ही त्यांची 'वासूनाका'च्या आधीची पुस्तकं. या कथानकांनी चढत्या क्रमाने वाचकवर्गाचं लक्ष वेधून घेतलं आणि त्यातल्या १९६५ सालच्या 'वैतागवाडी'मुळे समीक्षकांनीही पहिल्यांदाच त्यांना गांभीर्याने घेतलं असावं. आपले डोळे लख्ख उघडे आणि मन जागं ठेऊन मुंबईत फिरणार्‍या भाऊ पाध्यांना त्यानंतर एकापाठोपाठ एक कथानकं दिसू लागली. वरवर सपक आणि असंवेदनशील वाटणार्‍या या कथा त्यांनी त्यांच्या शैलीत लिहून काढल्या तेव्हा त्यातल्या ठसठशीला रूप आलं. मुंबईची ही रूपं बघून काही चकित झाले, काही चिडले, काही अक्षरशः भ्याले! भाऊ पाध्यांनी रेखाटलेले हाऊसिंग बोर्डाचे कारभार आणि त्यातल्या घरांत होणारे तळाखालचे-पडद्याआडचे व्यवहार, आणीबाणी, संयुक्त महाराष्ट्र चळवळ यासारख्या घडामोडींमुळे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सामान्यांचं बनत-बिघडत चाललेलं जीवन हे अनेकांना 'आपलं' वाटलं.

मुंबईतल्या शिवसेनेच्या वावराची पार्श्वभूमी असलेलं 'राडा' १९७५ साली आलं, तेव्हा शिवसैनिक चिडले. भाऊंनी धरलेल्या आरशात स्वतःचं भयानक रूप बघून त्याकाळचे हे नवसैनिक बिथरले. शिवाय बीभत्सपणा आणि अश्लीलतेचे आरोप झाले, ते वेगळंच. आपला मुद्दा मांडण्यासाठी शिवसैनिकांनी 'ठाकरी' स्टाईलमध्ये जी काही खास हत्यारं डेव्हलप केली होती त्यातलं 'राडा करणे' हे एक मुख्य हत्यार. भाऊ पाध्यांच्या 'राडा' विरूद्ध हे हत्यार उगारलं गेलं, आणि पुस्तक वाचनालयांतून, दुकानांतून, प्रकाशकांकडून गायब झालं! त्यानंतर १९९७-९८ मध्ये निखिल वागळ्यांच्या अक्षर प्रकाशनाने 'राडा' पुन्हा प्रकाशित केलं.

असंख्य दबावांत कुठच्या तरी अगम्य बळाने रेटत चाललेला महानगरी रामरगाडा दाखवणारे 'वैतागवाडी' आणि 'राडा' हे नितळ आरसे. कुठचाही दंभ, दर्प, अभिनिवेश, खोटेपणा, कलात्मक अलंकारिकता, निरूपयोगी भावुकता, नाट्यमयता यांचा आधार न घेता 'वैताग' आणि 'विध्वंस' या निरनिराळ्या टोकाच्या अस्स्सल मानवी भावना रेखाटणारी दोन पुस्तकं.

***

महानगराच्या छोट्या समस्या काळानुरूप मोठं रूप धारण करतात, तर कधी कालबाह्य होतात. भाषा बदलत जाते. राजकीय, सामाजिक संदर्भ बदलत जातात; पण पार्श्वभूमीवर असलेली महानगरांतलं किडामुंग्यांचं जीवन जगणारी पात्रं मात्र वर्षानुवर्षे तशीच राहतात. श्रीधर सोहोनी हे 'वैतागवाडी'चं मुख्य पात्र कित्येक संदर्भ बदलूनही इतक्या वर्षांनंतर मुंबईच्या रस्त्यारस्त्यांत, नाक्यानाक्यावर, चाळींत, झोपड्यांत, खुराड्यांत आजही बघायला मिळतं. राहायला जागा शोधणार्‍या या माणसाची 'मुंबईत राहणं' ही अगतिकता आहे, नाईलाज आहे. त्याला आत्महत्या करायची नाही. कडेलोट करवून घ्यायचा नाही. जगायचं तर आहेच. मग त्यासाठी पावलापावलावर लागणारी ही दुर्दम्य इच्छाशक्ती कुठून आणायची हा प्रश्न सतत सोडवत राहणं- हे आलंच. झोपडपट्टीत, गटारांच्या साम्राज्यात, चाळीत, हाऊसिंग बोर्डाच्या घरांमध्ये पॅरासाईट म्हणून- अशी कुठेही राहायची तयारी त्याने केली आहे. सध्याच्या मालकाने हलकटपणा करून एक तारखेच्या आत बाहेर व्हा म्हणून सांगितलंय. सध्याची जागा म्हणजे जेमतेम दोन जीव आणि एक गादी, एक स्टोव्ह इत्यादी निकडीचं सामान मावेल इतकीच आहे. नवीन जागेकडूनही त्याला जास्तीत जास्त इतकीच अपेक्षा आहे.

इतकं निकराने कशाला जगायचं आहे, याची उत्तरंही अगदी साधी आहेत. जगायला भाग पाडणारी, बोलून का होईना आधार देणारी माणसं त्याला भेटत आहेत. जिच्याशी प्रेमविवाह केलाय ती- त्याची बायको गर्भार आहे. त्यासाठी तरी जगायलाच हवं. शिवाय या नायकाची मराठी रंगभूमीवर थोडीफार ओळख आहे. ही 'थोडीफार' ओळख अनेकदा त्याला आधार देते, पण अनेकदा अडचणीतही टाकते. अशी नाट्यक्षेत्रात 'थोडीफार' ओळख असणार्‍या माणसाला अशी भणंग समस्या असू शकेल- हे जिथं पटायची शक्यता नाही, तिथे तो आपल्याला पोखरून टकणार्‍या, उध्वस्त करू शकणार्‍या प्रश्नाबद्दल बोलू शकत नाही. बोलत नाही. बायको वेळोवेळी 'बाईसुलभ' प्रश्न विचारते आणि तो आपोआपच आरोपीच्या पिंजर्‍यात ढकलला जातो. मग नाईलाजाने का होईना कसंतरी स्वत:ला सिद्ध करणं. म्हणजे जगणं आलंच!

रोज आजूबाजूला जी माणसं भेटतात ती कधीतरी आशेचा किरण दाखवतात. म्हणजे जगणं आवश्यक! यातलाच एखादा माणूस अचानक रूप पालटून धोबीपछाड टाकतो तेव्हा आशा दाखवणार्‍या दुसर्‍या माणसाकडे नायक वळतो (नव्हे, पळतो)- तेव्हा नायकाला नि आपल्यालाही कळतं- हे म्हणजे निव्वळ जगण्यासाठी कारणं शोधत बसणं आहे..!

आता चार-पाच दशकांनंतर 'घर शोधणं' या समस्येचे मुंबईतले संदर्भ आज कदाचित थोडेफार बदलले असतील, पण जगण्यातलं सतत काहीतरी शोधणारी माणसं अंगाखांद्यावर किडामुंग्यांसारखी वागवणारी महानगरं तशीच आहेत, नव्हे फोफावत आहेत. ती फोफावत आहेत, याचं कारण एकच- या महानगरातल्या सार्‍यांना या महावैतागवाडीत कसंतरी, बरंवाईट, चांगुलपणाने, हलकटपणाने, मानाने, नितीमत्ता फेकून देऊन, गरीबीत, श्रीमंतीत, झोपडपट्टीत, महालात राहायचं आहे.. जगायचं आहे!!

***

आदिमानवाइतकं आता आपल्याला निरागस कोणत्याच काळात होता यायचं नाही बहुतेक. पोटापुरती शिकार करून निसर्गाचा समतोल आपोआप राखला जाईल, अशा पद्धतीने जगणारे आदिकाळातले लोक प्राण्यांपेक्षा फारसं स्वतःला वेगळं समजत नसावेत. प्राण्यांपेक्षा आपण काहीतरी बाबतीत वेगळे आहोत, ही जाणीव जेव्हा माणसाला पहिल्यांदा झाली असेल, तेव्हा त्याने त्याकाळच्या वन्य संस्कृतीवर गरजेच्या पलीकडे, पुढे जाऊन आक्रमण केलं असेल- त्यालाच 'आद्य राडा' असं म्हणता येईल का?

वन्य संस्कृतीला शेवटाकडे हळुहळू ढकलत नेत, नैसर्गिक न्याय डावलून पशूप्राण्यांना हद्दपार करून स्वतःला राहण्यासाठी, शेती करण्यासाठी माणसाने जमीन हडप केली असावी. पुढे यथावकाश या शेतीसंस्कृतीच्या मढ्यावर औद्योगिक, भांडवली, शहरी आणि पुढे महानगरी संस्कृतीने पाय रोवून उभं राहायला सुरूवात केली आणि 'राड्या'च्या निरनिराळ्या आवृत्त्या निघू लागल्या. या 'राडा' संस्कृतीचे स्वतःचे नियम तयार झाले. लोकशाहीच नव्हे, तर नैसर्गिकता आणि नैतिकतेला फाट्यावर मारून आपल्याला पाहिजे ते करण्याच्या निरनिराळ्या पद्धती रूढ होऊ लागल्या.

पण यातही मुळचं 'आदिपण' स्वभावात सुप्तपणे मिरवणारी माणसं पैदा होतातच. त्यातली काही वरवर आजूबाजूला चाललेलं सारं काही सार्‍या नियमांसकट स्वीकारतात, पण आतून तुटलेली, दुखावलेली राहतातच. हे दुखणं प्रमाणाबाहेर वाढतं, तेव्हा ती बंड करायला बघतात. पण भुसभुशीत ढेकळांवर जड फळी फिरवून जमीन सपाट करावी त्याप्रमाणे कुठच्या तरी अनामिक फळ्या सतत आदळत राहतात. डोकं वर काढणार्‍या निरनिराळ्या भावनांच्या ढेकळांना सपाट करून टाकतात. महानगरी संस्कृतीत तर हे अधिक क्रुरपणे, अनैतिकपणे होत राहतं. हतबलता पदरी आलेली ही अशी माणसं मग एकतर विनाशाकडे, शेवटाकडे जातात किंवा मग विनाशाच्या जवळजवळ टोकापासून कुठच्या तरी दबावाने परत येऊन मन मारून टाकून पुन्हा सामान्य जगणं सुरू करतात, ज्यात कुठचाही जिवंतपणा, नैसर्गिकता नसते.

'मंदार अण्णेगिरी' हा असाच एक तरूण. एका सुखवस्तू कारखानदाराचा मुलगा. ताडामाडांच्या आणि सोन्यासारख्या झाडांच्या मढ्यांवर उभं राहू पाहणारी भांडवली कारखानदारी त्याला भावत नाही. पण इतक्या मोठ्या अन भयानक रेट्याचं हे दुष्ट चित्र तो एकटा बदलूही शकत नाही, याची त्याला संपूर्ण कल्पना आहे.

शिवसेनेचं मुंबईत व्यवस्थित बस्तान बसण्याचा हा काळ. 'मराठी कार्ड' फडकावणार्‍या ठाकर्‍यांची धडक शैली लाखो तरूणांना भावण्याचा काळ. हे तरूण आपल्या नेत्याच्या वागण्याचा अर्थ आपापल्या पद्धतीने लावतात. रिकाम्या हातांना काम मिळतं. महानगरांत सडत चाललेल्या सर्जनशीलतेला, उत्साहाला वाट मिळते. या उत्साहाचं बोट धरून वरच्या फळीचे नेते आपल्याला पाहिजे ते करून घेण्यासाठी- लादलेले संप, दडपशाही बंद, मोर्चे, सामान्य माणसाला घाबरवणारी दहशत, तोडफोड आणि शिवीगाळ, जोरदार घोषणाबाजी, राडेबाजी अशी नवनवी हत्यारं जन्माला घालतात. हे सारं रस्त्यावर साकार करत राहणारी ही विशी-पंचविशीची पोरं 'हेच बरोबर आहे, आयुष्य असंच असतं आणि हेच आपलं ध्येय वगैरे आहे-' हे पक्कं मनात ठसवून घेतात.

'मराठी'चा झेंडा नाचवता नाचवता हितसंबंध असतील तिथं अमराठी धंदेवाईकाला कंपूत घेणं आणि एरवी एखाद्या निरूपद्रवी पण आपल्या दृष्टीने निरुपयोगी ठरलेल्या 'मराठी' व्यावसायिकाचा धंदा बसवणं- अशा प्रकारच्या या राडेबाजीतलं फोलपण, दांभिकपण मंदारला पहिल्यापासूनच कळतं, त्यामुळे तो त्या वाटेला कधीच जात नाही.

पण सन्माननीय 'शाखाप्रमुख' आणि त्यासोबतचे शूरवीर राडेबाज यांचे हितसंबंध हा एक नवीन दबावगट तयार होतो. या सार्‍याला वैतागून मंदार घर सोडतो. टोकाची व्यसनाधीनता, नैतिक अधःपतन असा हळुहळू मंदारचा प्रवास होऊ लागतो आणि मग काहीही राडे करून मंदारला त्याच्या स्वतःच्या, म्हणजे सन्माननीय कारखानदाराच्या घरी परत आणणं हे 'राडा' गँगचं परमकर्तव्य होऊन बसतं..!

शिवसेनेच्या 'गोरेगाव शाखे'चं वर्णन, गोरेगावच्या 'मर्‍हाठीबाणा-उद्धारक-मिनी-छत्रपती' शाखाप्रमुखाचं राजकारण आणि घरगुती आयुष्य, कारखानदाराच्या घरातलं कुठच्याही अनामिक दडपणाखाली असलेलं वातावरण, 'खुबसुरत' काकु आणि शालिनी सारख्यांच्या 'स्त्रीत्वा'चे असंख्य आयाम, गजूच्या अड्ड्यावरचा शेवटचा प्रसंग हे सारं वर्णन करतानाची भाऊ पाध्यांची शैली आपल्याला स्तिमित करून जाते. सार्‍या वर्णनांत पाध्ये सरसकट मुंबईसारख्या ठिकाणी दिसणारी बर्‍यावाईटांचं लैंगिक वागणं तसंच्या तसं, वास्तवात आहे त्याच भाषेत शैलीत धाडसाने उतरवतात. हे सारं करताना त्याकाळचे भौगोलिक-राजकीय-सामाजिक संदर्भ, इतकंच काय, पण शिवसेनाप्रमुख आणि शिवसेनेच्या वरच्या फळीतल्या नेत्यांची नावंही बेधडकपणे वापरतात. 'हे असंच आहे, आणि ते मी मांडणार' हा निश्चय ठायीठायी दिसतो.

शेवटी नेमाड्यांनी प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे- '..'राडा'च्या सूत्रातून या महानगरी दबावाचं समर्थ वास्तव समोर येतं. भाऊ पाध्ये हे मुंबईचे एक मोठे इतिहास्कार आहेत याचीही 'राडा' साक्ष देते!'

***
***

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त परीक्षण. मी पाहिलीत असली माणसं. मुंबई मला एकाच वेळी खूप आवड्ते आणि तिची फार्फार भीतीपण वाटते. वाचीन दोन्ही पुस्तके कुठून तरी मिळवून.

मी ही दोन्ही पुस्तकं वाचली नाहीयेत. वाचायला हवी Happy
एकुणच 'वासूनाका' काय किंवा भाऊ पाध्ये वाचल्यावर मला हल्लीच्या अनेक सिनेमांचे 'स्क्रीनप्ले' डोळ्यासमोर येतात. ६०-७० च्या काळात ह्या माणसानं जे लिहून ठेवलंय, आज अनेक चित्रपटातून ते पाहायला मिळतं असं मला नेहेमी वाटतं.

उत्कृष्ट परीक्षण! ही पुस्तके वाचून झाली तेव्हा तीव्र इच्छा झाली होती त्यावर काही लिहायची. पण 'अपने बस की बात नाही' असे वाटून सोडून दिले. Happy ते वाचून झाल्यावर जाणवलेली, कळलेली प्रत्येक गोष्ट तू नेहमीप्रमाणेच समर्पक आणि चपखल शब्दात मांडली आहेस.

पांढरपेशा सामान्य माणसाचे महानगरीय आयुष्य, औद्योगिक क्रांतीचे पटकन लक्षात न येणारे पण मुळापर्यंत खोलवर झालेले परिणाम, बदलत चाललेली मूल्यव्यवस्था आणि या बदलाशी जुळतं घेताना वाट्याला आलेले उद्ध्वस्तपण भाऊ पाध्ये अगदी सहज सांगत जातात. हे सगळ खरंतर तेव्हाही होत होतं, आजही होत आहे; उद्याही होणार. बदलत्या काळानुसार बदलत चाललेल्या समाज जीवनाचा हा धावता पट एका अर्थाने कालातीत आहे!

रार Happy 'भिकार पटकथांवर वर्षानुवर्षे सिनेमे बनवणार्‍या मराठी निर्माता दिग्दर्शकांना भाऊ पाध्यांची कथानकं दिसत नाहीत का?' असा खडा सवाल 'राडा'च्या प्रस्तावनेत टाकला आहे. तूही जवळजवळ तेच लिहिलंस बघ!

श्री.साजिरा....

मी आणि माझे मित्र ज्यावेळी कॉलेजमध्ये शिकत होतो त्यावेळी नेमाडे, शहाणे, दंडवते आणि अर्थातच भाऊ पाध्ये यानी आमच्या पिढीला वेडे केले होते, म्हणजे फडके खांडेकर सबकुछ झूठ असे वाटणारा तो काळ होता आणि जरी नेमाडे 'कोसला' नंतर बरीच वर्षे खर्‍या अर्थाने कोसल्यात गेले, तरी भाऊ पाध्येंच्या एकापेक्षा एक सरस अशा कादंबर्‍यांनी आणि कथांनीही पिढीची मोहिनी उतरविली नाही.

तुम्हाला सांगितले तर आश्चर्य वाटेल पण मी खुद्द भाऊ पाध्ये याना 'वैतागवाडी" आणि 'वासूनाका' वर कोल्हापूरात शिवाजी विद्यापीठात व्याख्यान देताना ऐकले आहे. चक्क आठवड्याभराचा तो कार्यक्रम होता (थॅन्क्स टु डॉ.गो.म.पवार, त्यावेळेचे मराठी विषयाचे विद्यापीठातील प्रमुख, ज्यांची नेमाड्यांशी अरेतुरेची मैत्री असल्याने भाऊशीही तसेच नाते निर्माण झाले होते) आणि त्यावेळेचा डायसवरील त्यांचा आविर्भाव 'अनिरूद्ध' पेक्षा अगदी 'पोक्या' आणि 'मधू' शी साम्य दर्शविणारा, तेही त्यावेळेच्या ऑडियन्सला भावले होते. तसे पाहिले तर पाध्ये यांचे नायक कधीच 'सुपर' वाटणार नाही अशी त्यानीच काळजी घेतल्याचे दिसते. प्रत्येक वाचकाला असेच वाटायचे की, अरेच्या हा तर माझ्या शेजारचाच की. अगदी सर्वसामान्यांच्या व्यथा आणि त्यापोटी महानगरात होणारी ससेहोलपट याचेच प्रतिनिधी होते सारे. घराच्या तृष्णेने कासाविस झालेला सोहनीसारखा एक कनिष्ठ कारकून असो, तळागाळांतील कामगारांसाठी झटणारा मधू, होमसिकचे निळूभाऊ असोत, इतकेच काय 'अग्रेसर' वैजू असो....ही सारी पात्रे कधीही 'लार्जर दॅन लाईफ' वाटली नाहीत.

तुमच्या लेखातील 'मंदार' हा देखील असाच एक तरुण आणि शिवसेनेच्या उदयानंतरचा तो 'राडा' काळ असल्याने त्यातील वर्णन त्यावेळेच्या तमाम तरुणांसाठी एक दिशादिग्दर्शनच ठरले.

तुम्ही नेमाडे यांच्या 'राडा' प्रस्तावनेचा छान उल्लेख केला आहे. महानगरातील अनेक पात्रे त्यांचे नायक आहेत (विशेषतः वासूनाका गॅन्ग) पण खोलवर त्यांच्या साहित्याचा अभ्यास करत गेल्यास भाऊंच्या दृष्टीने 'मुंबई' शहरच त्यांचा खर्‍या अर्थाने नायक होते.

'बिढार' मधील चांगदेव पाटील मुंबई सोडून अन्यत्र नोकरी करण्यास, जगण्यास बाहेर पडतो तर या शहरावर अतोनात प्रेम करणारे त्याचे झाडून सारे मित्र त्याच्या निर्णयावर टीका करतात. त्यात जसे कवि पु.शि.रेगे होते तसेच भाऊ पाध्येही होतेच, कारण मुंबई शिवाय त्यांच्यातील लेखक जगूच शकत नव्हता.

एका चांगल्या लेखाचा वाचन आनंद मिळवून दिल्याबद्दल श्री.साजिरा यांचे आभार मानतो.

अशोक पाटील

छानच लिहिलं आहे. 'राडा' जबरदस्त पुस्तक आहे. वासूनाका ठिकठाक. भाऊ पाध्यांची भाषा आज इतक्या वर्षांनंतर, भाषेचे इतके बरेवाईट प्रयोग झाल्यानंतरही अजून अंगावर येते हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. वैतागवाडी वाचलेलं नाही.

त्यांच्याबद्दलचा हा एक ब्लॉगही वाचायला इंटरेस्टींग वाटतो.

http://bhaupadhye.blogspot.in/2010/07/about-bhau.html

सुंदर परीक्षण..राडावर लिहायच्या आधीचं पूर्वभाष्य तर फ़ारच आवड्लं..काहीतरी मूळ्जात वाचल्याचा आनंद झाला.
‘राडा’ हे पुस्तक मी वाचले आहे.पण ते ‘खुबसुरत काकू’ ह्या नावाने.ह्या नावाने ते बहूदा ‘मेनका’ मासिकात क्रमश: प्रसिध्द झाले असावे.

<एका चांगल्या लेखाचा वाचन आनंद मिळवून दिल्याबद्दल श्री.साजिरा यांचे आभार मानतो.

अशोक पाटील>

मी पण असेच म्हणतो.