सनम - २

Submitted by बेफ़िकीर on 30 June, 2012 - 09:14

आपल्या धाकट्या मुलाने लग्न करून घरी आणलेली मुलगी म्हणजे आसपासच्या शंभर गावातल्या बायाबायपड्यांनी रांग लावून बघावी अशी मूर्ती आहे हे भिकाच्या लक्षात आले तसा त्याच्या जिवाला विसावा मिळेना... या मुलीचं काय करावं? हिला काम सांगायची पंचाईत. असली खणखणीत आणि सोन्याचा वर्ख लागलेली मुलगी आपली सून? तिच्यायला आपल्या शंभर पिढ्यात हा रंग नव्हता कोणत्या बाईचा. सगळ्या वडारणी काळ्या ठिक्कर साल्या. हिचं म्हणजे न्यारंच सगळं. वीज लखलखावी तशी हालते. देवळातली घंटा वाजावी तशी बोलते. डोंगरातून झरा वाहावा तशी हासते. जवळून गेली तर आपल्याच अंगावं अत्तर मारल्यागत वास येतो. चुकून हात लागला तर आग लागल्यासारखं वाटतं. हिचं करायचं काय? घराबाहेर भांडी घासायला बसवली तर गावातली टवाळ पोरं समोरून हालेनात. घरात चुलीपुढं बसवली तर तिचे दीर घरातून बाहेर जाईनात आणि जावा तिच्याशी घाबरून बोलेनात. धाकटा विन्या तर अजून तिला हात लावू धजत नाहीये. दोन खोल्यात आपण दोघं, आपली चार मुलं, चार सुना आणि सहा नातवंडं. हिला पाहून तर असं वाटतंय सालं आपल्याच संग निजवावं हिला.

भिकाचा पाय घरातून बाहेर पडत नव्हता. पन्नाशीचा भिका रोज राबायला जायचा. चार मुलांपैकी मोठ्यानं टपरी टाकली होती विडी तंबाखूची. दुसरा ट्रकवर किन्नर होता. तिसरा अंडा ऑम्लेटची गाडी टाकण्याच्या विचारात गावभर फिरत होता. आणि चौथा विन्या भिकाबरोबरच राबायला जात होता. पंधरा दिवसांपूर्वी विन्यानं भिकाला सांगितलं.

"आबा... नेमन गावला झुरके म्हून हाये.. त्याची... त्याची पोरगी कर मला.. पोरगी म्हंजंच हुंडाय बग"

खदाखदा हासणारा भिका आजारी बायकोला कसेबसे घेऊन नेमनला जाऊन पोचला आणि झुरक्यासाठी ठरलेली खुणेची शीळ वाजवली तर काय? शिळीचा आवाज रानात विरायच्या आत झाडावरून धप्पकन एक अप्सरा खाली पडली. पडली म्हणजे चांगली मांजरासारखी उभी राहिली आणि समोरहे दोघंही आपल्या देखणेपणाने घायाळ झाल्याचे लक्षात येताच आजून म्हणाली...

"कोन??? मी झुरक्याची पोर... सनम"

तोंडंच बघत बसले भिका आणि त्याची बायको एकमेकांची! ही झुर्क्याची पोरगी? रानात इंग्रज आलावता काय? हा रंग? ही असली जवानी? हे वय्?हे असे झाडावरून खाली उतरणं? ही काय विन्याला पसंत करतीय???

"बाप कुठंय तुझा?"

"काय कामे?"

सनमने खणखणीत आवाजात विचारल्यावर 'आता हिला कसं सांगायचं' या विचारात भिका उभा राहिला. भिक्याची बायको रत्नी खुदकन हासली आणि सनमजवळ गेली. सनमच्या खांद्यालाही लागत नसेल ती. सनमच्या चेहर्‍यावरून आपले दोन्ही हात तळहात रगडून तिने काहीतरी पुटपुटले आणि म्हणाली...

"तुला सून करून घ्याया आलूयत"

सनमच्या गोर्‍या चेहर्‍यावर लालेलाल रंगाची उधळण झाली.... खाडकन तोंड फिरवून ती म्हणाली...

"बाबासंगंच बोला... मी चाल्ले"

असं म्हणून धावत सुटली... मोठी टेकडी सहजगत्या चढत होती ती धावत धावत... मागून भिक्याने बेंबीच्या देठापासून बोंब मारली...

"अय प्वारी... जात कन्ती तुम्ची????"

पुढचे पाऊळ न उचलता थबकलेली सनम हळूहळू मागे वळली... बरेच खाली ते दोघे उभे होते... संपूर्ण चेहर्‍यावर लज्जा पसरलेली असल्याने सनम लालबुंद दिसत होती... जणू डोंगरातून सूर्य उगवावा... मान खाली घालून तिरक्या नजरेने पण त्या दोघांना स्पष्ट ऐकू येईल अशा आवाजात मानेला हेलकावे देत तिने सांगितले...

"लम्मान...."

दोन्ही हात तोंडावर दाबून हसू दाबत सनम पुन्हा पाठमोरी होऊन टेकडी चढू लागली...

भिका आणि रत्नी हासत एकमेकांकडे पाहातच राहिले.....

"ही म्येन्का न्यायची व्हय घरी आपन???"

भिकाच्या याप्रश्नावर रत्नी पुन्हा हासली आणि म्हणाली...

"उल्टा हुंडा द्यावा लागंल... "

"नगंचे त्ये... इन्याला सांग म्हनाव पसन नाय क्येलं प्वारीनं..."

भिकाचे हे नकारात्मक वाक्य विरेतोवर मागून खणखणीत आवाज आला..

"कोन म्हनायचं???"

दोघेही मागे वळले. सव्वा सहा फूट उंच आणि खणखणीत हाडापेराचा झुर्के उभा होता...

"मी झुर्के... तुमी कोन???"

"आमी.. आमी भिका वडार... ही आमची घरवाली..."

"बरं?????"

"त्ये... इन्याय आमचा धाकला मुलगा.. त्येला.. त्ये..तुमची मुलगी पायजंल..."

झुर्क्याच्या दणदणाटी हासण्याने झाडेही हादरली...

"यवढंच व्हय??? पर आमी लमान... रानात र्‍हातुय आन रानावं जगतूय... "

"जातीचं काय नाय..."

"आन हुंडा नाय परवडायचा...."

"आता मुलगीच सोनंय की...????"

पुन्हा झुर्के दणदणीत हासला..

"चला घर्ला... सन्मीच्या आयला भ्येटा... बकरीच्या दुधाचा च्या घ्या... आन मग जा..."

हासत हासत आणि झुर्केपेक्षा कितीतरी जास्त दमत दोघेही टेकडी चढून गेले... आजारी रत्नीला चौथी सून येण्याचा आनंद ठणठणीत बनवू लागला... आणि लांबवर ते झोपडे दिसले... अशा ठिकाणी आपलंही झोपडं असावं असं वाटू लागलं भिकाला आणि रत्नीला...

"माम्येवं......."

झुर्क्याची हाक रानाला थरथरवून गेली... तीन शिकारी कुत्री तुफान वेगाने भुंकत या तिघांकडे धावली तशी झुर्क्याने काठी दाणकन जमीनीवर आपटत शिव्या घातल्या.. तशी ती कुत्री जिभा चाटत गरीब होऊन नुसतीच या तिघांकडे पाहू लागली... तिकडून मामी, म्हणजे सनमची आई बाहेर आली आणि कपाळावर हात ठेवून यांच्याकडे पाहू लागली... सनम कुठे दिसेना.. काही बकर्‍या ओरडल्या.. पाच सात मिनिटांनी त्रिकूट झोपड्यासमोर येऊन थांबले...

"च्या टाक.. याहीयत.. सनमची बोल्णी करायलायत..."

खुदकन हासून मामी आत गेली. सनमला स्थळ आलेलंच नव्हतं आजवर. तिच्याकडे पाहून कोणाची मागणी घालायची हिम्मतच व्हायची नाही. आणि झुर्क्याला आणि मामीला हे समजायचं नाही की एवढ्या उफाड्याच्या सुंदरीला मागणी का येईना??? त्यात झुर्क्याची ख्याती तिसरीच... फरशी घेऊन काहीदा गावातून फिरणार्‍या झुर्क्यानं आजवर तीन सुपार्‍याही घेतल्याची वदंता होती... रानोमाळ हिंडणारे हे तिघे जवळ पैसा अडका बाळगून नाहीत हे तर सगळ्यांनाच माहीत होते... आणि सर्वात महत्वाचे म्हणजे माकडासारखी या झाडावरून त्या झाडावर उछलकूद करणारी सनम आपल्या घरी सून म्हणून यावी, तेही लमाण जातीची असून, हे कोणाला परवडेना! त्यामुळे खालच्या गावात सनमच्या एका दर्शनासाठी म्हातारेकोतारेही आशाळभूतासारखे बसत असले तरीही सनमला मागणी घालण्याची कोणाची हिम्मत नव्हती. पण नदीपलीकडे असलेल्या भिका वडाराला काय माहीत या गोष्टी? तो आपला आला रत्नीला घेऊन.

या सगळ्यामुळे 'सनमला चक्क मागणी घालणारे आले' या एकाच घटकाने हरखलेले झुर्के आणि मामी आता पाहुणचाराची शक्य ती पातळी गाठू लागले. मगाशी नुसतीच ठिगळांची चोळी आणि बेंबीखाली खोचलेलं पातळ अशा अवतारात खुद्द सासू सासर्‍यांपुढे उडी मारणारी सनम आता आतमध्ये आवरत होती. मामी तिचे केस विंचरत असताना चुलीपुढे सनम चहा टाकत होती.

इकडे झुर्क्याने भिकाशी गप्पा सुरू केल्या तशी रत्नी आत गेली. झोपडी लहानच होती. पण त्यातही दोन खोल्या केल्या होत्या. बाहेरच्या खोलीतून रत्नी आत गेली तर एक मेलेले माकड तिथेच पडलेले होते. ही शिकार असावी हे रत्नीला समजले.ती आता अंधारलेल्या खोलीत सनमच्या हालचाली न्याहाळू लागली. स्त्रीला हेवा वाटावा असे शरीर होते सनमचे. खुद्द सासू त्या खोलीत आल्याने तिने एकदाच पटकन उठून पायावर डोके ठेवले ते पुन्हा काही मान वर केली नाही. रत्नी मात्र झोपडी विकत घेतल्याच्या थाटात मामीशी गप्पा करत होती.

शेवटी हिय्या करून रत्नीने मामीला अपेक्षित तोच प्रश्न विचारला...

"तुमी इट्टलरंगाच्या... याही इट्टलरंगाचे... आन ही अशी कशी???"

मामी चलाख!

"काळ्यातनं काळंच काढून टाकलं की ग्वारंच उरनार ना?"

सनमची मोठी बहिण शोभत असलेल्या मामीचे ते उत्तर ऐकून रत्नी खुष तर झाली , पण डोक्यात किडा वळवळत राहिलाच. तोवर मामी पुढे म्हणाली...

"लम्मान लोकांचं आसंच आस्तंय... कुनी गोरा... कुनी काळा..."

मान हालवून रत्नीने सनमने पुढे केलेला पाण्याचा ग्लास हातात घेतला. खरे तर 'काळ्यातून काळे काढून टाकलेले नव्हते' तर 'काळ्यात काळे मिसळलेले होते'. पण हे काही रत्नीला बोलायचे सुचेना.

पदर घेऊन सनम उभी राहिली आणि मामी तिला धरून भिकाच्या पाया पडायला घेऊन चालली. डोक्यावर पदर घेतलेली सनम दारात उभी राहिली तसे भिका आणि झुर्क्याच्या मनात वेगवेगळे विचार आले. भिकाला वाटले की ही वीज कशी राहील आपल्या घरी! आणि झुर्क्याला वाटले की एरवी माकडासारखी टणाटण उडणारी आपली सनम डोक्यावर पदर घेतल्यावर काय सुलक्षणी द्सिते. सनमने क्रमाने आधी भिका रत्नीला आणि मग आई बापांना नमस्कार केला आणि आत जाऊन पाणी घेऊन परत बाहेर आली.

"बैठकीचं कसं सरकार?"

झुर्क्याने भिकाला विचारले आणि भिकाला तोंड फुटले.

"आमचा इन्या शेतात राबतूय... आज उद्या जिमीन घेनारच... तवा.. बरं... परत येकत्र कुटुंब हाये.. दहा पंधरा मान्स रोजची दोन यळां जेवतायत... वडारांचं मुख्यंय आमी... "

"आगदी खरं..."

"तवा.. बघा आता.. म्हन्जे.. अंगावं किती घालाल?"

"आमची सनम म्हन्जे सवता सोनंय सरकार...बघताच हायेत तुमी..."

"पर एक रीत आसती.. आमचं काय नाय.. समाजाला उत्तर द्याया सांगावं लागतं काहीबाही..."

"बघा आता पाच हजार करतो सगळं मिळून..."

"आहो ही काय भाजी नाही आनायची है ना??.. आसं करा.. तुमचं माझं जाऊदेत... बारा हजार करा... शेवटी जातीचंबी हायेच की... आता बरूबरीच्या जातीत आस्तं तं आमीबी इतकं तानलं नस्तंच ना?"

शेवटी तो सौदा आठ हजारावर तुटला. रत्नीने नाकं मुरडून 'काहीच आनंद वाटत नसल्याचे' दहा वेळा दाखवले. भिकाची नजर काही सनमवरून हटेना.

अंधार पडायच्या आत दोघे आपल्या अनार गावी परतले आणि विन्याला होकार सांगताच घरात जणू जल्लोश झाला. विन्याच्या मोठ्या वहिन्यांनी त्याला फार चिडवले. मोठे भाऊ भिकाशी हुंड्याबाबत बोलत राहिले. अजून कोणालाच काहीच माहीत नव्हते. शेवटी चहापाणी झाल्यावर भिकाने सगळ्यांना समोर बसवून सांगितले.

"मुलगी लय यगळीय ती... आपल्यासारखी नाय ती... लय यगळीय.. ईज हाये ईज नुसती... असा रंग न्हाय पाहिला... असं अंग नाय पाहिल्यालं.. आसं वाग्न आन आसं हालणं चालणं नाय पाहिल्यालं... शिकार करतीय ती रानात यकटीच... ही अशी माकडागत झाडावं चढतीय... हित्त आली तर आख्ख गाव जमंल बघायला.. यक लक्षात ठिवा... तिला आपली जागा न्हेमी दाखवत चला.. लम्मान पोरगीय... आपल्या खालचीय... यताजाता जातीवं ब्वाला.. तिचा आवाज वर यता कामा न्हाय... गावातलं मानूस घरात यता कामा नाय तिला बघाया.. सनासुदीला भाईर न्यायची आस्ली तं हन्वटीखाली पदर याया हवा तिचा.. पुरुष मानसाशी तिला सबूद बोलू द्यायचा नाई.. आनि कामं तं इतकी सांगा भवानीला... की तब्येत ही अशी कांडक्यागत व्हायला हवी तिची सा म्हैन्यात.. मग बरूबर हुंडा देतूय बघा लम्मान"

त्यावर रत्नीने तडका मारला...

"बाप काळा... आय काळी.. प्वारगी नुसती सोनं... आसं कुटं आस्तं व्हय निर्मले??? "

मोठ्या सुनेने मान हालवून होकार भरला.. धाकट्या दोघी सुना एकमेकींकडे पाहू लागल्या.. त्यांच्या दिसण्या बोलण्याच्या वरताण कोणीतरी घरात येणार आणि तीही धाकटी जाऊ म्हंटल्यावर आत्ताच त्यांची डोकी फिरायला लागली...

दहाव्या दिवशी झुर्क्याने जमेल तसे लग्न केले आणि दोघांनी ओक्साबोक्शी रडत आपल्या सनम बाळाला सासरी पाठवले.. त्या लग्नात तर सनमला पाहून हाहाकारच उडला... तीनही जावांची थोबाडं पाहण्यासारखी झाली होती... ही असली मुलगी घरात सून म्हणून आल्यावर आपलं काय राहणार अशी तोंडं करून नुसत्या बसल्या होत्या.... झुर्क्यानं दोन बोकड कापले होते.. मामीनं गावातल्या एका लमाणी बाईला मदतीला घेऊन जे काही जेवण बनवलेले होते ते कोपरापर्यंत आडवा हात मारून खाताना लोकं वळून वळून सनमकडे बघत होते.

विन्याची तर हालत खराब होती... आपल्याही पेक्षा दोन इंच उंच असलेल्या पोरीला घरी न्यायचं बायको म्हणून?.. आणि तीही असली दिसायला??? आपली लायकीच नाही हे त्याला समजले.. नवर्‍या मुलीसारखा तोच लाजत होता मित्रांनी थट्टा केल्यावर... आणि मग सनमने सगळ्यांना आग्रह करण्यासाठी विन्याबरोबर फिरून डाव डाव बुंदी ओतली... ती जवळ आली की ती दिसेनाशी होईस्तोवर लोक बघतच बसायचे.. विन्या तिचा शेतावरचा गडी असल्यासारखा दिसत होता... पण छडमाड छाती पुढे काढून नवरदेव सगळ्यांची ओळख आपल्या बायकोला करून देत होते.

विन्याच्या मित्रांनी तर तिला इतक्या वेळा बुंदी वाढायला लावली की बुंदी संपत आली.. मग खासगीत एकट्याने जाऊन विन्याने त्यांना दम भरला...

"फुकटच्योत भडव्यावं.. गप उटा.. हात ध्वा आन निघायचं बघा.. बापाचा माल आहे काय बुंदी म्हन्जे?"

हासत हासत सगळे उठले आणि लग्न पार पडल्यावर सासरी आल्यानंतर जावांनी दोघांना ओवाळले. ताम्हणातल्या ज्योतींना जणू सनमचा उजेड मिळत होता...

मागून अख्ख्या गावानं भिका वडार्‍याला अप्सरा मिळाल्याचे सांगितले आणि भिकाच्या घरच्या सगळ्यांचीच मान अभिमानाने ताठ झाली...

सासू आणि जावांबरोबर आत झोपायला जाताना विन्याने आपल्याला डोळा मारलेला पाहून मात्र क्षणभर सनम थबकलीच.. शर्ट वगैरे काढल्यावर अनुसत्या बनियनवर त्या विन्याच्या अंगाची कृश काडी कशीतरीच दिसत होती.. सनमने तर त्याला सहज उचलले असते.. बाकीच्या भावांच्या डोळ्यांत दारूने येणारा रंग आणि भाव स्पष्ट दिसत होता.. जावा नाकं उडवत एकमेकींशीच बोलत बसल्या होत्या.. भिकाजी उघडाबंब होऊन पोट खाजवत दारू रिचवत होता.. आणि सासू सनमला म्हणत होती...

"ए लमान.. भांडी धुवून टाक ती... उद्या सकालवर न्हाय ठिवायचीयत..."

गपचूप सनम बाहेरच्या खोलीत आली. सगळेच्या सगळे पाच पुरुष चूपचाप होऊन तिला निरखत असतानाच तिने पातळ वर उचलून कंबरेत खोवले आणि खाली बसून भांड्यांचा ढीग धुवायला घेतला.

मोठा दीर तापलेल्या आवाजात म्हणाला...

"ए... आवाज नकूय जास्त... गपचूप धुवायची भांडी.."

भांडी घासायला पाऊण तास लागला. तोवर हे पाचही जण आडवे पडलेले होते आणि लहान दिवा लावलेला होता. त्यातले तिघे तर घोरूही लागलेले होते. आवरून सनम आतल्या खोलीत जात असताना... अचानक तिच्या उजव्या पोटरीवर हाताची पकड बसली.. स्त्री सुलभ प्रतिक्रियेनुसार ती तिथून पटकन सटकली... विन्याने चार मोठे भाऊ आणि सासर्‍यादेखत आपल्याला छेडले याची तिला भयंकर लाज वाटली होती... अंगभर मोहरून ती आतल्या खोलीत गाल लाल करत पोचली तर चौघीही बायका जाग्याच होत्या... मुले फक्त झोपलेली होती... त्या बायकांना जाग्या पाहून आत्ताच विन्याने केलेला प्रकार आठवून सनम मंद हासत मान खाली घालत एका भिंतीला टेकून बसली...

तोच बाहेरून आवाज आला.. भिकाचा.. मोठ्या जावेला उद्देशून...

"निर्मले... पाय लय दुखतायत..."

सनम बसल्या जागी शहारली.. ही तक्रार बायको असताना आणि मुलगा असताना सुनेला का सांगितली जात आहे हे तिच्या मनात आले तोवरच... तिची सासू मोठ्याने उद्गारली..

"नवी सून आलीय ना घरला??? का जुन्यांनीच कामं करायची??? जा गं..."

त्याच क्षणी सनमने मनात ठरवले होते.... विन्याला पटवून येथून बाहेर पडायचे... तीन तीन दीर आणि नवरा तिथेच असताना सासर्‍याचे पाय आपण दाबायचे हे काही तिला झेपत नव्हते... पण विन्याही काही म्हणाल्याचे दिसत नव्हते..

काही दिवस कसेबसे ढकलायचे आणि सरळ वेगळे राहायचे असा निर्णय मनातल्या मनात घेत ती उठली आणि बाहेर जायला लागली तोवरच भिका ओरडला...

"लम्मान प्वारीनं शिवायचं न्हाई मला.. तू ये न्हाईतर निर्मलेला पाठव..."

गपचूप निर्मला उठली आणि बाहेर गेली... तिच्या नवर्‍याला हे कसे चालते हे सनमला समजत नव्हते... विन्याला आणि सगळ्यांनाच हे का चालते हेही समजत नव्हते... तेवढ्यात सासू सनमला म्हणाली...

"त्या मोरीनजीक घाल गं तुझं हांत्रून.. हित्तं आमच्यात शिवाशिवी न्हाय चालायची..."

सनमचे रक्त उसळ्या मारू लागले... हे सगळे फक्त पहिल्याच रात्री घडत होते.. हे आपल्या बापाला सांगावे की काय हेच सनमला समजत नव्हते... आईबापांनी तर तिला सासरच्यांदेहत स्पष्ट सांगितले होते.... आजपासून तू त्या घरची... काय बरंवाईट होईल ते तिकडेच... आमच्याकडे फक्त सणासुदीला नाहीतर बाळंतपणाला यायचं...

तेव्हा ते शब्द गोड लागले होते कानांना... आत्ता त्या शब्दांमागचा खरा अर्थ समजत होता.. मगाशी आपल्याला हळू आवाजात भांडी घासायला लावणारा आपला दीर आत्ता त्याच्या बायकोला त्याच्याच वडिलांचे पाय चेपताना बघत असेल... आणि त्याची आई इथे आरामात घोरतीय.. सनमने सहज पडल्यापडल्याच मागे अंधारात पाहिले... मागे मोरी होती... सगळ्या बायका येथेच बाथरूमला जात होत्या आणि आंघोळही येथेच करत होत्या...

अख्खे रान मनसोक्त हिंडताना आपल्याला कोणाच्या बापाची हिम्मत झाली नाही हे सांगायची की तू इथे बस तिथे बस... आणि आज लग्न करून सासरी काय आले.... तर मोरीपाशी झोपायला लावतायत मला???

सनमला आठवला तिच्या त्या रानातील सुसाट वारा... पानांची मुक्त सळसळ... खारी... पक्षी... माकडे... ससे... आणि काय काय.. केवळ अठराव्या वर्षी लग्न करून ती सासरी आली होती... आणि पहिल्याच दिवशी हे असले प्रसंग नशिबी आलेले होते... तेवढ्यात काहीतरी सरसरत अंगावरून गेल्याचे जाणवले... बहुधा उंदिर असणार... शहारत सनम उठून बसली... ते सासूने पाहिले... सासू लगेचच म्हणाली...

"सनम मला याद आलं आत्ता... उद्या गोंधळी यायचंयत... मसाला वाटून ठिवावा लागंन... जा भाईरच्या खोलीत... मसाला वाटाया घ्ये..."

तो उंदिर अंगावरून गेल्यावरही आपण शांतच पडलेलो असतो तर कदाचित हे काम आपल्याला सांगण्यात आलेही नसते असे सनमच्या मनत आले... नाही तर म्हणता येणारच नव्हते... पहिल्याच दिवशी सुनेने कामाला नकार दिला म्हंटल्यावर मोठेच प्रकार झाले असते ... त्यात बाहेर थोरल्या जाऊबाई सासर्‍यांचे पाय चेपत बसलेल्या दिसणार... आज सासरे तिला बोलावतायत... उद्या माझे दीर मला बोलवायला लागतील...

सनम चडफडत बाहेरच्या खोलीत गेली.. मोठा दीर पाठ करून घोरत होता.... निर्मला सासर्‍यांच्या पोटापाशी बसून त्यांचे पाय चेपत होती... ताडकन त्या दृष्यावर लाथ मारावी असे सनमच्या मनात आले.. त्यात आणखीन विन्या तिच्याचकडे पाहात लाळ गाळत होताच... निर्मलाने वळून सनमच्या रुपाकडे आणखीन एकदा पाहिले... एक दीर पाणी प्यायच्या निमित्ताने उठला आणि त्यानेही सनमला एकदा पाहून घेतले...

किरकोळ कामांनी सनमला काहीच झाले नसते... रोज लाकडे फोडणारी मुलगी ती... तिने सहज मसाला वाटायला घेतला.. काही वेळाने तिने सहज सगळ्यांकडे एकदा नजर टाकली... निदान विन्याला तरी आपल्याला आत्ता काम सांगण्यात आल्याचे वाईट वाटत आहे की नाही हे तिला बघायचे होते..

पण तिची नजर गेली दोन्ही खोल्यांमध्ये असलेल्या एका खिडकीच्या उघड्या दाराकडे... लगेच तिने आपल्या उजव्या कोपरावर नजर वळवली... लहानसे खरचटल्याचे तिला आठवले.... मगाशी जाताना विन्याने पाय पकडला होता तेव्हा घाईघाईत आत पळून जाताना ती खिडकी आपल्या कोपराला लागली हे तिला आठवले.. पण आत्ता तिला काहीतरी वेगळेच जाणवले.. ती खिडकी कुठे आणि विन्या कुठे... मग... मग... आपल्याला कोणी छेडले??? दीर... आत्ता पाणी प्यायला उठलेला दीर... सनमने त्वेषाने आपल्या मुठी वळल्या.. त्या सर्वजणांवरून नजर वळवली आणि पुन्हा मसाला वाटायला घेतला.. तेवढ्यात निर्मलाची आणि सासर्‍यांची नजरानजर झालेली तिने पाहिली... निर्मला खुसखुसत सासर्‍यांशी काहीतरी कुजबुजत बोलत असलेली तिला दिसली...

त्याचक्षणी सनमने ठरवले... येथून विन्यासकट किंवा विन्याशिवाय.... पळून जायचे म्हणजे जायचे... आणि तेही शक्य तितक्या लवकरच..

पण तिला हे माहीत नव्हते... की ती येथून पळून जाणार असली तरी येथील प्रकारांना घाबरून नव्हे... तर...

........पाचहीजणांचे मुडदे पाडून

===================================

-'बेफिकीर'!

गुलमोहर: