आता उगा कशाला

Submitted by अनुराधा म्हापणकर on 30 June, 2012 - 03:09

आता उगा कशाला हा पूर आसवाचा
तो पदर रेशमाचा जेव्हा भिजून गेला

घटिका जगावयाची उरलीच नाही हाती
क्षण थांबले ते सारे, केव्हा थिजून गेला

चाले कशास आता श्वासांस मोजणे हे
डोळ्यांत प्राण माझ्या जेव्हा विझून गेला

शृंगार साज तेव्हा वायाची गेले सारे
चेहरा कलेवराचा फुका सजून गेला

ही चंदनी सुगंधी रचिली चिता कशाला
हा देह चंदनाचा जेव्हा झिजून गेला

अनुराधा म्हापणकर

गुलमोहर: 

छान....
"चाले कशास आता श्वासांस मोजणे हे
डोळ्यांत प्राण माझ्या जेव्हा विझून गेला" >>> ही द्वीपदी सर्वात अधिक आवडली.

विलाप 'मृत्युशय्येवर पडलेल्यासाठी' आहे की 'मृत झालेल्यासाठी' आहे याची विविध कडव्यांत गल्लत झालेली दिसते, व त्यामुळे या अप्रतिम रचनेच्या आशयगर्भतेला बाध येतो. काव्यसौंदर्याच्या द्दृष्टीने पाहिल्यास क्र.३ व ५ अतिशय सुंदर. एकंदरीत रचना कवयित्रीचा शब्दप्रभाव पुष्कळसा सिद्ध करते.

आता उगा कशाला हा पूर आसवाचा
तो पदर रेशमाचा जेव्हा भिजून गेला

चाले कशास आता श्वासांस मोजणे हे
डोळ्यांत प्राण माझ्या जेव्हा विझून गेला

ही चंदनी सुगंधी रचिली चिता कशाला
हा देह चंदनाचा जेव्हा झिजून गेला

छान आपण उत्तम गझलकारा बनू शकता
अनेक शुभेच्छा