देरसू उझाला...

Submitted by jayantckulkarni on 29 June, 2012 - 01:42

जे जंगलात हिंडतात, ट्रेकींग करतात, त्यांना भावणारा हा सिनेमा. मला तरी हा बघितल्यावर रात्रभर झोप आली नाही.
देरसूची शप्पत !

दोन गोष्टी नेहमी माझ्या हाताशी असतात.

  1. पाडस नावाचे पुस्तक आणि
  2. देरसू उझालाची सी. डी.


देरसू उझाला
   एका ओबड-धोबड मातीच्या थडग्यापाशी कपितान मान खाली घालून उभा आहे. ज्याने आपला प्राण वाचवला आहे अशा मित्राचा मृत्यू बघणे यासारखी क्लेषकारक घटना या जगात असेल असे मला वाटत नाही. थडग्याच्या डोक्याच्या बाजूला सैनीकांच्या थडग्यावर जशी त्याची रायफल उभी करतात तशी एक काठी रोवून उभी केली आहे. ही काठी आपण कधीच विसरू शकत नाही. आजूबाजूला जंगलातल्या उंच झाडाच्या बुंध्यांच्या सावल्या वातावरण इतके गंभीर करतंय की ते आपल्या अंगवर येतंय. तेवढ्यात त्याची ह्रदय पिळवटून टाकणारी हाक अस्पष्टशी बाहेर पडते – "देरसू".
पुढच्याच क्षणी पडद्यावर जंगलाच्या पार्श्वभुमीवर, ते थडग, काठी आणी जंगल दिसते आणी आपल्या नजरे समोरून गेल्या दोन तासाचा चित्रपट उलगडत जातो. मन खिन्न, उदास होतं जणू काही आपला जवळचा आप्त किंवा मित्रच गेला आहे, परत कधिही न भेटण्यासाठी. मागच्या दोन तासात दहा वर्षांची सोबत देणार कोण हा ? आणि काय त्याचे आणि आपले नाते ? आता ज्या माणसाचे या पृथ्वीशीच जवळचे नाते आहे त्याचे आणि आपले नाते काय असणार ? तुम्हीच सांगा ! त्याचे नाव देरसू उझाला आणि ज्या सिनेमातल्या चित्राचे वर्णनाने या परिक्षणाची सुरवात केली आहे त्या सिनेमाचे नावही तेच "देरसू उझाला"
१९०२ साली एक रशियन सैन्यातला सर्वेयर आणि त्याची प्लाटून चीन आणि रशियाच्या सहरद्दीवर युसोरी नदीच्या बाजूच्या प्रदेशाचे नकाशे काढयच्या मोहिमेवर निघाले होते. त्या काळात प्रत्यक्ष जागेवर जाउनच हे नकाशे काढायला लागत. त्यासाठी जी अग्नीदीव्ये त्यांना पार करायला लागत, त्याची आपण या काळात कल्पनाच नाही करू शकणार. त्या लोकांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. त्याचे नाव होते- "व्लादिमीर अर्सेनिव"
असेच एकदा जंगलात पुढे जायला वाटच नसल्यामुळे त्यांचा मुक्काम दाट झाडीत पड्तो. सगळीकडे झाडे उन्मळून पडलेली असतात. वातावरण गुढ, काळोख, रातकिड्यांच्या आवाजाने भारून गेलेले असते. याचा अनुभव ज्यांनी ट्रेकींग करताना रात्री जंगलात मुक्कान ठोकला आहे त्यांना आला असेल. अशावेळी मनात नको नको ते विचार येतात. भुतकाळ मनातून पापण्याच्या आड उतरतो. डोळे मिटताएत तोच दगड गडगडल्याचा आवाज कानावर येतो. तो एकताच सर्व आपापल्या बंदूकी सावरत, सरसावत उठतात. एकजण म्हणतो सुध्दा "अस्वलच असणार ! तयार रहा !" सगळे आपल्या रायफल्स बोल्ट करतात तेवढ्यात एका माणसाचा आवाज ऐकू येतो
"Please to not shoot ! Me are people"
या वाक्यात विशेष काय आहे / पण हे वाक्य ज्या स्वरात म्हटले गेले आहे त्यातला साधेपणा आणि प्रामाणिकपणा आपल्या ह्रदयाला स्पर्श करुन गेल्याशिवाय रहात नाही. त्या स्वरातला, आवाजातला ह गूण आपल्या कायमचा लक्षात रहातो. मग आपल्याला देरसूचे पहिले दर्शन होते. मी जेव्हा देरसुला पहिल्यांदा बघितले तेव्हा तो मला एका श्वापदासारखा भासला. दुसर्‍यांदा बघितले तेव्हा तो मला एखाद्या शिकार्‍यासारखा भासला आणि आत जेव्हा जेव्हा मी हा सिनेमा परत परत बघतो किंवा दाखवतो तेव्हा तेव्हा तो मला एखाद्या जंगलाच्या देवतेसमान भासतो. माणूस तोच पण आपण मात्र हा सिनेमा बघितल्यावर तेच रहात नाही हेच खरं.

देरसूच्या भुमिकेत मंझुकने कमाल केली आहे. अकिराला (माझा अत्यंत आवडता दिग्दर्शक)

जेव्हा हा सिनेमा दिग्दशित करण्यासाठी तात्कालिन रशियन सरकारकडुन बोलावण्यात आले तेव्हा या भुमिकेसाठी योग्य अशा नटाचा शोध घेणे हे त्याच्या दृष्टीने सर्वात महत्वाचे होते. देरसूच हा सिनेमा तारून नेणार होता. सतत दोन वर्षे अथक प्रयत्न केल्यावर – प्रयत्न म्हणजे काय, तर सगळ्यांना घेऊन रोज मंगोलियन व रशियन चित्रपट बघायचे आणि त्यात एखादा पटेल असा नट दिसतो का ते बघायचे. एके दिवशी त्याला एका सुमार मंगोलियन चित्रपटात एका छोट्याशा भुमिकेत मंझूक सापडला. त्याला ताबडतोब बोलावून घेण्यात आले. अकिराने बोलावले आहे म्हणजे नाही म्हणायचा प्रश्नच नव्ह्ता. त्याकाळात चित्रपट जगतात अकिराचा प्रचंड दबदबा होता. अकिराने त्याची मुलाखत एका बंद खोलीत घेतली. २/३ झाले, बंद खोलीचे दार काही उघडले नाही, बाहेर सगळे वाट बघत होते कारण देरसू सापडल्यावर चित्रिकरण सुरू होणार होते. न राहवून त्याच्या एका मदतनिसाने खोलीचे दार किलकिले करुन आत डोकावले तर बुटका मंझूक खुर्चीत बसला होता आणि अकिरा त्याच्या समोर उभा राहून त्याच्याशी बोलता होता. हे बघून तो उडालाच कारण अकिराच्या समोर बसायचे धाडस त्या काळी कोणातही नव्हते.
मंझूक !
पण आपला मंझूकसुध्दा तेवढ्याच ताकदीचा कलाकार होता. त्या चित्रपटाच्या चित्रिकरणाच्या दरम्यान अकिराला मंझूकला एकदाही अभिनयाच्या सुचना द्याव्या लागल्या नाहीत. मंझूकचे नाव त्याच्या प्रदेशात तेवढेच महत्वाचे होते (तुवान). कलाक्षेत्रात काय केले नव्ह्ते त्याने ? लेखन, नाटक, कविता, चित्रकला, रेडीओ, चित्रपट, गाणे, वादन, असे एकही क्षेत्र नव्हते ज्यात त्याने आपला ठसा उमटवला नव्ह्ता.
अकिराचा सगळ्यात आवडता हा नट १९९९ साली स्वर्गवासी झाला. त्यावेळी त्याचे वय ८९ होते. एकच वर्षाने अकिरा गेला तेव्हा त्याचे वय ९० होते. त्या दोघांची मैत्री मृत्यूनेच सोडवली.
देरसू उझाला ही पण दोन मित्रांची गोष्ट म्हणता येईल. अर्सिनेवने या पहिल्या भेटीनंतर देरसूला त्या घनदाट जंगलात वाटाड्या म्हणून चलण्याची विनंती केली आणि दोघांनीही ती दोस्ती शेवटपर्यंत निभावली. त्यांच्या त्या मैत्रीच्या प्रवासाची ही गोष्ट आहे.
आता हा पहिल्या भेटीतलाच प्रसंग पहा ना. शेकोटीतली लाकडे आवाज करत असतात तर हा त्या लाकडांच्या अंगावर ओरडून गप्प व्हायला सांगतो " काय पिरपिर चालवलीये मगा पासून" देरसूचे माग काढायचे कसब अजबच असते. जंगलात आयुष्य गेल्यामुळे त्याच्या रक्तातच ते जंगल भिनलेले असते. इतर प्राण्यांसारखेच त्याला वास व चाहुल लागते. त्या माग काढायच्या कसबाचे २/३ प्रसंग लक्षात रहाण्यासारखेच आहेत.
युरी सोलोमीन या नटाने पण अर्सिनेवचे काम उत्कृष्ट केले आहे. लेखाकाने जे काही लिहीले आहे त्याला तर तोडच नाही. उदा. ते असेच एकदा चाललेले असताना, देरसू अर्सिनीवच्या सैनिकांना म्हणतो "तुम्ही या जंगलात बाळं आहात नाही शिकलात तर नाहक मराल या जंगलात.
अर्सिनेवला देरसूची खरी महती पटते ती अशाच एका प्रसंगात. त्यांना वाटेत एक झोपडीसदॄश आसरा लागतो, तर देरसू ती झोपडी दुरुस्त करतो आणि अर्सिनेवला थोडे तांदूळ मागतो. अर्सिनेवला ते त्याला कशाला मागतोय ते कळत नाही. विचारल्यावर देरसू त्याला सांगतो " या जंगलात चुकलेले वाटसरु येतील, त्यांना उपयोगी पडतील. अर्सिनेवला हे उत्तर अपेक्षितच नव्ह्ते. इथे जे कोण येणार आहेत, आणि जे त्याला पुढे कधिही भेटायची शक्यता नव्हती अशा माणसांची देरसू काळजी करत होता.
देरसूनी त्याच्या भाषेत आणि विचाराने जंगलाचा कायदा आणि आयुष्याच्या कल्पना फार सोप्या करून टाकल्या होत्या. जंगलातल्या सर्व गोष्टींना त्याने मनुष्यत्व बहाल केले होत्ते. हा सुर्य एक माणूस, हा चंद्र एक माणूस, प्राणी माणसे, उंदीर माणसे,एवढ्च काय, वारा, पाऊस, आग ही सर्व माणसेच.
आणि साधेपणा किती असावा माणसात ? याचेच एक उदाहरण अकिराने फार छान चित्रित केलंय. हे सगळे सैनिक रस्त्यात एका दोरीला एक बाटली बांधून नेमबाजीचा सराव किंवा गम्मत समजा करत असतात. देरसू त्यांना म्हणतो " अरे बाबांनो या जंगलात बाट्ली मिळायची मुष्कील, कशाला ती बाटली फोडताय ?' खेळ असा असतो, झोका दिलेल्या बाटलीला गोळी मारायची. सगळ्यांचे नेम चुकतात. शेवटी एक जण देरसूला हेटाळणीने म्हणतो " काय करायचाय का तुला प्रयत्न ? देरसू त्यांना अगदी भोळेपणाने सांगतो " मी त्या बाटलीला नाही गोळी मारणार. फुटेल ना ती. मी त्या दोरीला मारतो, पण ती बाटली मला द्यायची." आणि तो ती बाटली जिंकतो.
अशाच एका रात्रिच्या मुक्कामात देरसू त्याचे कुटुंब देवीच्या साथीत कसे मरते आणि ते सगळे घरदार त्याला कसे जाळुन टाकायला लागते याची ह्रदयद्रावक कहाणी सांगतो. त्या वेळेचा मंझूकचा चेहर्‍यावरचे भाव आणि अभिनय मी तरी विसरू शकणार नाही आणी त्या वेळेची गुढ वातावरण निर्मिती ही अकिराची करामत. एक आता सांगायला हरकत नाही या चित्रपटातील प्रत्येक फ्रेम ही एक उत्कृष्ट छायाचित्र आहे आणि ज्यांना कंपोझीशन शिकायचे आहे त्यांनी हा चित्रपट त्या दृष्टीकोनातून जरूर बघावा.
देरसूला नैसर्गिक संकटांची चाहुल जनावरांसारखीच लागते. अशाच एका बर्फाच्या वादळात तो अर्सिनेवचा प्राण कसा वाचवतो हे मी सांगत नाही. बघायलाच पाहिजे. या पहिल्या प्रवासाच्या शेवटी जेव्हा त्यांचे मार्ग वेगळे होणार असतात, तेव्हा देरसू त्याच्या दोस्ताला म्हनजे अर्सिनेवला बंदूकीच्या गोळ्या मागतो त्या वेळी त्याच्या मनाची होत असलेली घालमेल नुसती चेहर्‍यावरुन आणि स्तब्ध राहून मंझूकने कमाल केली आहे. न बोलता, स्तब्ध राहूनही अभिनय करता येतो, आणि आपल्यापर्यंत त्याच्या मनातले भाव पोहचवता येतात, हे मलातरी प्रथमच कळाले.
त्यांचा निरोप सभारंभही ऐकण्यासारखा आहे. आपल्याला वाटते हा चित्रपट संपला इथे. पण हा चित्रपट असे काही वळण घेतो की आपल्याला रात्री झोप येणे मुष्कील.
अर्सिनेवची आणि देरसूची पुनर्भेट १९०७ च्या हिवाळ्यात होते. बर्फाच्या नद्या तुटायला लागलेल्या असतात, त्या काळात.
अर्सिनेव देरसूची भेट सुध्दा अनभुवण्यासारखी आहे. देरसूला जंगलातली जनावरंचे वागणे समजू शकत होते पण माणसांचे वागणे समजणे त्याच्या आवाक्याबाहेरचे होते. पण आता देरसूचे वय झालेले असते. ते कोणीही थांबवू शकत नाही. त्या नंतर अशा घटना घडायला लागतात की त्याची म्हातारपणाची भिती ही वेगळ्या स्वरुपात त्याच्या मनाचा कब्जा घेते. वाघाला "अंबा" – त्याच्या भाषेत, गोल्डीच्या जमातीत जंगलाच्या आत्मा मानतात आणी जंगलाचा देव , त्याचे नाव "कांगा" त्याला शेवटी भास व्हायला लागतात की कांगा त्याला मारायला अंबाला पाठवतोय आणि आत त्याला दिसत नसल्यामुळे तो मरणार आहे. विशेषत: त्याला जेव्हा नेम घेण्याइतकेही दिसत नाही तेव्ह मात्र तो कोसळतोच.
शेवटी जंगलात ज्याने आपले प्राण अनेकदा वाचवले त्या मित्राची दोस्ती निभवण्यासाठी अर्सिनेव आपल्या या म्हातार्‍या मित्राला स्वत:च्या घरी घेऊन जातो. तिथे त्याच्या मुलाशी देरसूची गट्टी जमते. एकदा अर्सिनेव आपल्या मुलाला विचारतो " काय रे देरसू तुला जंगलातल्या गमती जमती सांगतो का नाही ?"
"हो सांगतो ना !"
"एवढेच नाही, त्यानी तुझ्या वडिलांचे प्राण अनेकदा वाचवले आहेत हे माहिती आहे का तुला?"
"नाही त्या बद्दल तर तो काहिच बोलला नाही"
"त्याचे त्याला काही विशेष वाटत नाही हाच त्याचा मोठेपणा आहे," अर्सिनेव.
पण देरसूचे मन त्या शहरात रमत नाही. तो खिन्नपणे दिवस काढत असतो. एक दिवस धीर धरून तो त्याच्या मित्राची, कपितानची जंगलात जाण्यासाठी परवानगी मागतो.
एका भावूक प्रसंगी...........

अर्सिनेव जड अंत:करणाने ती देतो पण जातांना त्याच्या हातात एक करकरीत नवीन बंदूक ठेवतो " देरसू तुला कमी दिसत असले तरी तु या बंदुकीने नेम धरु शकतोस, ही तरी तू बरोबर घेऊन जा !"
शेवटची भेट.... Sad
देरसू गेल्यानंतर दोनच दिवसांनी अर्सिनेवला एका मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांची तार येते –
मृतदेहावर आपले कार्ड सापडल्यामुळे आपणास विनंती...................
हे लिहीताना सुध्दा त्याचा मृत्यू आठवून माझे मन खिन्न झाले आहे......शहरातल्या लोकांनीच त्याचा घात केलेला असतो.....
देरसू उझाला : माक्झीम मंझूक
अर्सिनेव : युरी सोलोमीन. त्याच्या गावाचे co-ordinates Lat 48°28'36.18"N Lon 135°05'39.63"E
दिग्दर्शक : अकिरा कुरोसावा
लेखक : व्लादिमीर अर्सिनेव.
खरा देरसू.

जयंत कुलकर्णी.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा! छानच लिहिलंय! खरंच हा पिक्चर पहायला हवा.
आणि पाडस हा राम पटवर्धनांनी केलेला अनुवाद आहे ना? (द यर्लिंग????)
अर्रे हे पुस्तक मी किती वेळा पारायणं केली आहेत! अत्यंत आवडतं पुस्तक! पण संग्रही नाही.
एका वेगळ्याच जगात घेऊन जातं हे पुस्तक! आता परत वाचायची इच्छा होतेय!

जयंतराव.....

एरव्ही अकिरा कुरोसावा हे नाव घेतले की जगभरातील सिनेरसिकांची मान आपोआप खाली झुकते ते प्रामुख्याने "रोशोमोन" तसेच "सेव्हन सामुराई" च्या जादूसाठी. पण त्याच्या "द हिडन फोर्ट्रेस, हाय अ‍ॅण्ड लो, रान, इकिरू, कागेमुशा" या आणि अर्थातच 'देर्सू उझाला' या रत्नानांही जगभरातील समीक्षकांमध्ये तितकीच मान्यता आहे आणि आता त्यापैकी 'देर्सू' बद्दल तुम्ही लिहिलेला हा सुंदर लेख वाचताना पुन्हा एकदा कपितान आणि देर्सू ही जोडी त्या जंगलात भटकत असल्याचे माझ्या नजरेसमोर आले. इतका विलक्षण परिणाम आहे त्या म्हातार्‍या शिकार्‍याचा.

पाहिला आहे मी हा चित्रपट, अगदी कित्येकवेळा. विशेष म्हणजे या चित्रपट निर्मितीच्या आधीच काही दिवस कुरोसावाने आत्महत्येचा प्रयत्न केला होता पण आपल्या रसिकांच्या सुदैवानेच म्हणा तो त्यातून आश्चर्यकारकपणे वाचला होता. तीस वर्षापूर्वी वाचलेल्या एका प्रवासवर्णनच्या शिदोरीवर इतकी अप्रतिम कलाकृती निर्माण करणे हे केवळ कुरोसावाच करू जाणे.

चित्रपटाच्या कथानकासोबतीने आपल्याला भेटतात ती जंगलातील धुके, सूर्यप्रकाश, पाऊस, बर्फवृष्टी, संधीकाल....आणि ही दृश्ये अत्यंत परिणामकारक केली आहेत ते तितक्याच तोडीच्या छायाचित्रणाने. 'देर्सू' ला परत रानात पाठवून 'वन्यजीवन कुरोसावाने ग्लोरिफाय केले आहे' असा टीकेचा सूर त्या काळी काही टीकाकारांनी लावला होता; पण प्रत्यक्षात चालू विज्ञानयुगात माणूस काहीतरी हरवून बसला आहे हे दाखविणे कुरोसावाला त्या कथेतून अपेक्षित असल्याने देर्सूचे शहरातून निघून जाणे हे आजची मेट्रोंची स्थिती पाहता कुरोसावाचे दिग्दर्शन योग्यच म्हणावे लागते.

मला वाटते ह्याच भूमिकेतून 'देर्सू उझाला' ला त्या वर्षीचे 'बेस्ट फॉरिन फिल्म' चे ऑस्कर मिळाले असावे.

(अवांतर नाही, तरीही ~~ 'पाडस' च्या प्रेमाबद्दल तुम्हाला कधीतरी कॉफी पाजतो, जयंतराव)

अशोक पाटील

सकाळ मधे सुदधा ह्या चित्रपटावर एक लेख आलेला होता...तो ही खुप मस्त होता..त्यांनी सुरु केलेल्या त्या सिरीजमधे सगळेच चित्रपट हटके,वेगळे होते.. Happy मी त्याच कात्रण काढुन ठेवल आहे ..तुम्ही सुदधा पुन्हा एकदा डोळ्यासमोर देरसु उभा केला Happy
चित्रपट पाहण्याचा योग केव्हा येईन Sad

माझा अतिशय आवडता चित्रपट. अनेकवेळा पाहिलेला... आणि तरीही देरसू ज्या स्टाईलमधे "कापितान" म्हणुन हाक मारतो ना, ते दरवेळी नव्याने आवडतं मला Happy
मस्त लिहिलाय लेख Happy

जयंतदादा, धन्यवाद !
माझाही अतिशय आवडता चित्रपट आहे हा. खुप वेळा पाहिलाय आजपर्यंत. कुणाला हवा असेल तर माझ्या विपूत संपर्क साधावा. I would love to share this Happy