एकटेपण

Submitted by dr.sunil_ahirrao on 2 June, 2012 - 02:58

जेव्हा आपलं असं कुणीही नसतं,
तेव्हा सोसता येतो एकटेपणा
एक अनिवार्य सत्य म्हणून !

आणि
साहता येतो
मनाच्या उदार भिंतींचा कोसळता आक्रोश
मनाच्याच सांदीकोपऱ्यात पिशाच्याप्रमाणे,
निर्विकार..

इथे
मनाच्या स्मशानात
स्तब्ध शांत काळोखात पेटत जाताहेत
आत्मघाती चिता -
अंधाराला डागण्या देत प्रसवताहेत
दु:खाची चिवट पिलावळ...

आताशा
तुझ्यामाझ्या मिसळत्या श्वासांतूनही
प्रकटत नाही अद्वैत !
होत नाही आताशा
तुझ्या ओठांच्या आणि डोळ्यांच्या सीमारेषेवरील सत्य , एक !

पापण्यांतील खाऱ्या पाण्यात
उरलीय नुसती धग;
नाही सोसवत आता
तुझ्या मिठीतले माझे एकटेपण ...!

_डॉ.सुनील अहिरराव
http://aaskmed2.blogspot.in/2012/05/blog-post.html

गुलमोहर: 

आताशा
तुझ्यामाझ्या मिसळत्या श्वासांतूनही
प्रकटत नाही अद्वैत !
होत नाही आताशा
तुझ्या ओठांच्या आणि डोळ्यांच्या सीमारेषेवरील सत्य , एक !

पापण्यांतील खाऱ्या पाण्यात
उरलीय नुसती धग;
नाही सोसवत आता
तुझ्या मिठीतले माझे एकटेपण ...! >>>>>>
सुन्दर कविता ... !!

प्रिस्क्रीप्शनवरील हस्ताक्षर न समजणे एक गोष्ट व अख्खी कविता न समजणे दुसरी गोष्ट विभाग्रजजी, मलाही नाही समजली. कदाचित चेतनाजी मदत करतील.

प्रद्युम्नसन्तु ... कविता नाही समजवता येत मला तरी ..तितकी मतिही नसेल मला,त्यामुळे मी नाही हा समजवु शकणार ... तुमच्या सारख्या प्रगल्भ व्यक्तिने इतका मोठा मान मला दिल्याबद्दल धन्स
पण माझ्या मते कविता ज्याला त्याला आपापल्या जिवन अनुभवा नुसार जशि भिडते तशी पोहचते ... एखादे ओळ,कडवे भिडले तरी कविता आवडते ... खुप कविता समजत नाहीत पण भिडणारे काहीतरी असते कलाक्रुतीत ..... तेवढे मात्र नक्कि शोधते मी .. Happy