अव्याहत चालायाचे पायांनी कबूल केले!

Submitted by सतीश देवपूरकर on 24 June, 2012 - 03:55

गझल
अव्याहत चालायाचे पायांनी कबूल केले!
क्षण एक एक जगण्याचे श्वासांनी कबूल केले!!

त्या पहिल्या भेटीमधले, संभाषण मौनामधले;
जे मनात होते ते ते, डोळ्यांनी कबूल केले!

ह्यामुळेच झालो राजी; मी गझला लिहिण्यासाठी,
ह्रदयास थेट भिडण्याचे शब्दांनी कबूल केले!

दिसतात जगाला काटे मी म्हणू लागलो तेव्हा;
ह्रदयातच घर करण्याचे काट्यांनी कबूल केले!

काळजात अजुनी माझ्या तेवते ज्योत स्वप्नांची,
तिमिरात हात देण्याचे स्वप्नांनी कबूल केले!

वैराण माळही क्षणभर बहरला मनाने थोडा;
ना चुकता बरसायाचे मेघांनी कबूल केले!

मी दिले सुकाणू माझे लाटांच्या हातामध्ये;
न्यायचे तटावर मजला, लाटांनी कबूल केले!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

गुलमोहर: 

अप्रतीम गझल!

फक्त

ना चुकता बरसायाचे मेघांनी कबूल केले! >> ही ओळ थोडी पटली नाही..

'न चुकता' जास्त श्रवणीय वाटत, 'पर्यायी' काही असेलच.. क्रु गै न.... धन्यवाद! Happy

ह्यामुळेच झालो राजी; मी गझला लिहिण्यासाठी,
ह्रदयास थेट भिडण्याचे शब्दांनी कबूल केले!

हा शेर आवडला :), 'हृदयांस' असे केल्यास इतरांच्या असा फील येऊन शेरात अजून मजा यावी. अनुस्वार नसल्यास शायराच्या हृदयास असे वाटते मग शेर तितकासा भिडत नाही.

ह्यामुळेच झालो राजी; मी गझला लिहिण्यासाठी,
ह्रदयास थेट भिडण्याचे शब्दांनी कबूल केले!

मी दिले सुकाणू माझे लाटांच्या हातामध्ये;
न्यायचे तटावर मजला, लाटांनी कबूल केले!

सर ; अप्रतीम शेर आहेत हे ................

ह्यामुळेच झालो राजी; मी गझला लिहिण्यासाठी,
ह्रदयास थेट भिडण्याचे शब्दांनी कबूल केले!>>>

प्रमोशन दिलंत तर बदली स्वीकारेन सारखेच झाले हे म्हणजे.

गझला लिहिण्यासाठी राजी होणे ही पोझ नावीन्यपूर्ण आहे

शेवटचा शेर आवडला