इथे दुसरीही आहे वसती - रोम

Submitted by सावली on 24 June, 2012 - 13:32

इथे दुसरीही आहे वसती - रोम

रोममध्ये फिरण्याची  भलीमोठी स्वप्न घेऊन पहाटेच आम्ही पॅरिस वरून निघालो. ऑर्ली विमानतळावर  सविस्तर चेकइन वगैरे झाल्यावर आत बसलो होतो आणि तेव्हा बातम्या पाहिल्या. रोममध्ये जाळपोळ आणि दंगा चालू होता.   काहीतरी निदर्शने वगैरे होती.  बातम्या पाहून जरा टेन्शन आलं. आता तिथे जावे कि जाऊ नये हेच कळेना. भारताच्या दूतावासात फोन करून पहिला पण रविवार असल्याने तिथे सामसूमच.  इतका सगळं ठरवलंय, तिकीट, हॉटेल बुकिंग सगळं केलंय तर आता आयत्या वेळी काय करायचे हा प्रश्न! शिवाय राहिलोच तरी परीस मध्ये हॉटेल मिळणार नाही. मग जरा दैवावर भरवसा ठेवून विमानात बसलो.  रोम विमानतळावर उतरल्यावर नेहेमीसारखेच आधी लगेज घ्यायला 'लगेज' असे लिहून बाण दाखवलेल्या ठिकाणी  जात राहिलो. बराच वेळ चालल्यावर आम्ही चक्क विमानतळ  बाहेर पोचलो!  मग मात्र असली धडकी भरली! तिघांच्या सामानाची एकच चेक इन bag होती. बाकी हातातल्या सामानात एक दिवस पुरेल असे सामान होते म्हणा. 
'तू पाहिले का नाहीस बॅगेज कुठे क्लेम करायचे ते? तुझ्याशी बोलण्यामुळे मी पाहिले नाही!
'तू पुढे होतास ना? मला वाटलं तू बघशील.'  
'पण तुला बघायला काय झाले. तू होतीस ना बरोबर?'

असा एक सुखसंवाद झडला.   पण मग लक्षात आले कि असे होणारे आम्हीच एक नाही आमच्या बरोबर अजून दोन तीन जण होते. मग तिथे चौकशी केल्यावर  सामान घ्यायला पुन्हा जायचे असेल तर व्यवस्थित चेक करून जायला देणारा रस्ता होता. म्हणजे असे बरेच जण करतात तर!  

इथे खाऊन जरा बातम्यांचा अंदाज घेऊन निघालो. ट्रेनने जायचे होते. इथे तिकीट काढून ते फलाटावर जाण्याचा थोडं आधी गेटवर stamp करून घ्यावे लागते नाहीतर आपण विना तिकीट मानलो जातो.  आता युरोपातल्या त्या सुप्रसिद्ध ट्रेन आपल्याला दिसणार अशा सुखद कल्पना करत फलाटावर पोचलो. तिथे अगदीच 'अरेरे' क्षण होता. ट्रॅक मध्ये स्लीपर्स ऐवजी सिगारेटची थोटकेच टाकून त्यावर ट्रॅक लावलेत असे वाटत होते. तिकडे कानाडोळा करून ट्रेनची वाट पहात राहिलो. ट्रेन  15 मिनिटे  लेट आली. ट्रेन पाहिल्यावर मात्र चुकून आपण भारतात पोचलो का काय असेच वाटले. अतिशय गलिच्छ, सर्वांगावर ग्राफिटी असलेली, काचा न धुतलेली ट्रेन!!  जपानमध्ये चकचकीत, नुकत्याच धुतल्यासारख्या आतबाहेरून स्वच्छ ट्रेन्स, फलाटावर पडलेला छोटासा डाग घालवण्यासाठी हातात ब्रश घेऊन घासणारा तिथला स्टेशन कामगार, साबण लावून घासून धुतले जाणारे फलाट, रांग लावून चढणारे लोक  असली दृश्य बघण्याची सवय असल्याने तशाच काहीशा अपेक्षा ठेवून होतो ही खरतर आमचीच चूक.  जपानमध्ये बरेच वर्ष राहिल्यावर जग बघायच्या फुटपट्ट्या बदलतात त्या अशा.  नुसती सफाईच नाही तर इथल्या  ट्रेनचे उंच अगडबंब इंजिन, डबे, त्यांची रचना हे सगळेच जपान मधल्यापेक्षा खूप खूप वेगळे आहे.  आपल्या इथे असलेल्या लांब पल्ल्याच्या गाड्या कशा फलाटापासून उंच असतात तशाच या गाड्याही उंच आहेत. चढता उतरताना थोडी कसरत कराव्या लागणाऱ्या.  बॅग घेऊन रांग नसलेल्या गोंधळातून तशी कसरत करून आम्ही ट्रेन मध्ये स्थानापन्न झालो!   

इतक्या घडामोडीनंतर इटाली थोड्याफार प्रमाणात भारताशी साध्यर्म साधणारे आहे याची खात्री पटत चालली होती. तरीच इथून भारतात स्थाईक व्हायला गेल्यावर सुद्धा इटालियन लोकाना त्रास होत नसणार! 

ट्रेन मधून जाताना खिडकीतून बाहेर बघणे मला अजूनही लहानपणी इतकेच किंबहुना जास्तच आवडते. पण आता खिडकीवर हक्क सांगणारे एक हाफतिकीटही बरोबर असते. बरं ते शांत बसलेले नसते तर गेलेल्या घरा, झाडाबद्दल प्रश्न विचारायचा असतो आणि नेमकं तेच घर मी बघितलेलं नसतं.  त्यामुळे अखंड तोंड चालू ठेवून मायलेकी खिडकीतून बघण्यात दंग होतो. इथली घरं, शेतं वेगळीच होती. घरांना टिपिकल पिवळे, केशरी रंग होते. काही इमारती उंच मोठ्या आणि जुन्या असल्या तरी  भारदस्त दिसत होत्या  पण आपल्याकडे जुनी रेल्वे क्वार्टर्स किंवा चाळी वगैरे असतात ना तशी बरीचशी घरे दिसत होती.  लांबलचक चाळी आणि एकसारख्या चिकटून  खिडक्या दारं. .  त्यांना लाकडी दोन दारांच्या पूर्ण उघडणाऱ्या खिडक्या. मधेच कुठे बाहेरून दिसणारे लाकडाचे वाटणारे वासे.  मळकट पिवळे रंग. ग्राफिटीने रंगवलेल्या भिंती. थोडासा एक जुनाट उजाडपणा.  मन  भारत / रोम अशा हेलकावण्या खात असल्याने पुन्हा पुन्हा मला माझे सबकॉन्शस रोममध्ये परत आणावं लागतं होतं!!

शेवटी  आमचे स्टेशन आले 'टर्मिनी'.  हे नाव मला फार आवडले. इथली सगळी नावं एकदम भारीच वाटतात. टर्मिनी, बर्निनी, पानिनी, जीवोनानी अशीच काहीशी. इकारांत असल्याने स्त्रीलिंगी आहेत असे वाटते.     ट्रेनच्या पायऱ्या उतरून फलाटावर आल्यावर पुन्हा एकदा मनाला आपण रोममधेच आलोय याची आठवण करून द्यावी लागली!  आपल्या छत्रपती शिवाजी टर्मिनस मध्ये आल्याचा भास होत होता. स्टेशनच्या जुन्या भागात गलिच्छपणा आणि नव्या भागात चांगले अशी विभागणी दिसत होती.  हॉटेल स्टेशन पासून पाच सात मिनिटावर आहे हे माहित होते. पण रस्ता कळण्याचे काही जमेना. 'रस्ता विचारू नये' असे बोर्ड मात्र तिकीट ऑफिसेसच्या आसपास दिसले!!  स्टेशनच्या बाहेर आलो आणि taxi केली. 

हॉटेल चांगले होते उंच खिडक्या,  टिपिकल युरोपियन डिझाईनचे असावे.  इथले बांधकामही मला भारतातली आठवण करून देत होते.  म्हणजे मुंबईत नवीन  नाही पण जुने बांधकाम आणि  इतर ठिकाणी कसे उंच छत , घुमटाकार दरवाजे, उंच पायऱ्या असे असते तसेच काहीसे.  बाथरूम मात्र वेगळे. मोठ्या बाथरूम मध्ये एक छोटा काचेचा क्युबिकल. त्यातच शावर  आणि त्याच्या attachments .     हात उभे आडवे कसेही पसरता येणार नाहीत असे हे चिमुकले क्युबिकल त्यात आंघोळ करायची.  सध्या भारतात इटालियन क्युबिकल बाथरूम म्हणून महागडे बाथरूम मिळतात ते असेच असतात.    

हॉटेलवाल्याने कालचे दंगे आता संपल्याचे सांगितले त्यामुळे संध्याकाळी लगेच कोलोसियम बघायला निघालो. आता चार रात्री रोम मध्ये होतो  शिवाय जागा बघण्याची घाई न करता शांतपणे जे अनुभवता येईल ते अनुभवायचे असे ठरवले होते.   ट्रेन पकडून कोलोसियम नामक  स्टेशन वर पोचलो. तिथून बाहेर आलो तर समोर भिंतीसारखा मोठ्ठा कोलोसियम उभा. पॅरिस, रोम च्या या प्रवासात या ऐतिहासिक वास्तू अशा काही अचानक समोर येतात कि हा एक वेगळाच अनुभव होऊन बसतो. म्हणजे वास्तू दुरून दिसतेय. समोर मोकळी जागा आहे. तिथून आपण वास्तू जवळ   जातोय  असे काही  होत नाही. सबवे मधून बाहेर आल्यावर किंवा एखाद्या वळणावर त्या अचानक समोर उभ्या थकून दचकावतात

भग्नावषेशातल्या या वास्तूकडे पाहूनही त्याचा प्रचंडपणा डोळ्यात भरत होता. विमानतळावर रोम पास काढला होता त्यात कुठल्याही पहिल्या दोन स्थळांना विनारांग  प्रवेश होता. त्यामुळे रविवारची तिकीटाची मोठ्ठी रांग टाळली आणि आम्ही आत गेलो.  प्रचंड उंचीच्या कमानी, उंच उंच पायऱ्या आणि अंडाकृती रचना. वास्तूविशारदाची कमाल दिसतच होती. पूर्वी जेव्हा बांधले तेव्हा म्हणे याला संपूर्ण पांढऱ्या संगमरवरामध्ये मढवले होते असे कुठेतरी वाचलेले. त्याशिवाय तेव्हा ऊन लागू नये म्हणून  वर पांढऱ्या जाड कापडाची  कनातही बांधली होती.   पांढऱ्या रंगाची ही वास्तू काय अफलातून दिसत असेल त्यावेळी! नंतर रोममधल्या इतर बांधकामाच्या वेळी हे संगमरवर काढून वापरले.  आता भिंतीत मध्ये मध्ये दिसणारी भोके सुद्धा भिंतीतले धातू काढून घेण्यासाठी केली आहेत.   हे कोलोसियम म्हणजे स्टेडीयम किंवा अ‍ॅम्पि थिएटर  होते. वेगवेगळे कार्यक्रम , प्रदर्शने  इथे होत. रोमवासियांना सर्वांना यात प्रवेश होता फक्त बसण्याच्या जागा सोशल स्टेटस ( मराठी?) प्रमाणे असायच्या. पहिल्या रांगेत अर्थात राजा आणि त्याचे कुटुंबीय असत. या स्टेडीयममध्ये  ग्लॅडीएटर्स  चा क्रूर खेळ फार प्रसिद्ध होता.  हरणार्‍याला मृत्यूचीच शिक्षा असायची आणि त्यावेळी लोक त्याचा मृत्यूही मनोरंजन म्हणून पहायचे. हे आता क्रूरतेचे वाटले तरी तेव्हा सर्वमान्य होते.  वर छोटेसे संग्रहालय होते. त्यात त्यावेळच्या वस्तू आणि भग्न मुर्त्या ठेवल्या होत्या. त्यात राजा  नेरोचा एक पुतळाही आहे. तो पाहिल्यावर 'अरे! हाच तो! रोम जळताना फिडल वाजवणारा!!'  असे काहीसे विचित्र रियलायझेशन झाले. पण तिथे लिहिलेल्या इतिहासानुसार नेरोला कोलोसियम मध्ये चाललेल्या हत्या आवडत नव्हत्या. ते बंद करण्याचे त्याचे प्रयत्न होते अशी त्रोटक माहिती कळली. म्हणजे माहिती बरीच लिहिली होती पण माझ्या लक्षात त्रोटक राहिली.

कोलोसियमचा आतला भाग


कोलोसियमच्या उंच खिडक्यांमधून बाहेर - वर्तमान आणि भूतकाळ एकत्र


कोलोसियममध्ये लोकांना उभे राहण्याच्या जागा


भिंतीमधली भोके - धातू काढून घेण्यासाठी

संध्याकाळ झाली तशी सोनेरी किरणे कोलोसियम मध्ये उतरली आणि त्या सुवर्णरंगाने जणू कोलोसियम मध्ये एक वेगळीच दुनिया निर्माण केली. कि ती वेगळी दुनिया तिथे होतीच पण आम्हाला दिसत नव्हती? हजारो वर्षापूर्वीच्या त्या लोकांची, साखळदंडाने बांधलेल्या gladietors ची    आपापली आयुध परजत जाणाऱ्या सैनिकांची, त्यांच्या  राजांची , अशा वास्तू आणि शिल्प घडवणाऱ्या अनोख्या कलाकारांची अनोखी भूतकालीन दुनिया. 

इथे  दुसरीही आहे वसती,
    इतिहासाच्या भूतांची.
जीर्ण शीर्ण अवशेषांतून 
    वाहणाऱ्या सुरांची .


आर्क ऑफ कॉनस्टंटाईन कोलोसियमच्या खिडकीतून  

निळ्या केशरी सांजवेळी 
    चाहूल येते पायरवांची
गतसाम्राज्याची  भूतेच ही
   भग्न महालांमधुन चालती 

सूर्यास्ताच्या वेळी कोलोसियमच्या आवारातून दिसणारे पॅलेतिनो

आकाशात निळाई पसरली तसे आम्ही बाहेर आलो आणि कोलोसियमच्या समोर येऊन बसलो. कोलोसियमवर समोरून लाईट्स सोडले आहेत. त्या पिवळ्या प्रकाशात आकाशाचा निळा प्रकाश मिसळून कोलोसियमला रंगवून काढत होता. या सांजवेळेच्या गुढरम्य निळाईत काय जादू आहे कोण जाणे पण तिचे  गारुड उतरता उतरत नाही.   बराच वेळ तिथेच बसलो. अंधारलं तसे परतलो. 

संध्याकाळी लाईट्स लावल्यावर कोलोसियम  

दुसरा  दिवस सकाळी पॅलेतिनो  आणि रोमन फोरम मध्ये घालवला. ते पॅलेतिनो बघताना मला सारखी आपल्या किल्लेगडांची आठवण येत होती. फक्त इथे या सगळ्या गोष्टी खूपच चांगल्या अवस्थेत जोपासल्या होत्या. या पॅलेतिनोला हजारो वर्षांचा इतिहास आहे. आणि मुळचे रोम शहर हेच होते असे म्हटले जाते. ऑगस्टसच्या काळात इथे पहिले उत्खनन झाले होते आणि ब्राँझयुगाचे पुरावे मिळाले होते. त्यानंतर वेगवेगळ्या काळात उत्खनन होत होते. अजूनही इथे उत्खनन आणि शोध चालू आहेत. काही सापडलेल्या अवशेषांचा जीर्णोद्धार ( नाही !  शिमिट  आणि  निळा केशरी रंग फासून नाही !!) चालू आहे. तिथे चालू असलेले काम पाहून  मायबोलीवरच्या  'वरदा'ची फार आठवण झाली होती कारण ती एकच पुरातत्व संशोधक ( शब्द बरोबर आहे का? ) मला माहित आहे! 

राजारजवाडे आणि मंदिरे यांचे भग्न अवशेष बघताना फारसे ग्रेट वाटले नाही. मात्र रोमन फोरम आणि त्याच्या आसपासचे ते उंचच उंच खांब बघताना छाती दडपून जाते. इतक्या उंचीचे खांब कसे तयार केले असतील आणि कसे बसवले असतील हा प्रश्न पडल्यावाचून रहावत नाहीच. 

इथे  दुसरीही आहे वसती,
     बोलणाऱ्या शिळांची
त्यांच्याकडून ऐकावी गाथा  
    गतकाळाच्या वैभवाची 

  पॅलेतिनो

 पॅलेतिनोचे भग्न अवशेष 

आर्क ऑफ कॉनस्टंटाईन

 रोमन फोरम बघून जेवून अजून बाकीची ठिकाणे फिरता येऊ शकतील पण आमच्या बरोबर लेक पण असल्याने खूप उन्हातून फिरणे शक्य झाले नाही.  आम्ही दुपारचे आराम करण्यासाठी हॉटेलमध्ये परत जात होतो. 

 रोमन फोरम जवळचे एक टेम्पल 

उंचच उंच खांब ! खाली अगदी बारीकशी माणसे दिसत आहेत त्यावरून उंचीचा अंदाज येईल. 

रोमन फोरमचे खांब डावीकडे दिसत आहेत. 

संध्याकाळी  त्रेवी फौंटन बघायला गेलो. तिथे सुरुवातीला मेट्रोमधून उतरल्यावर उलट दिशेने चालायला लागलो होतो मग काहीच कळेना तेव्हा रस्ता  विचारला आणि अबाउट टर्न करून योग्य रस्ता पकडला. इथेही तेच. गल्ल्याबोळातून, गर्दीतून, फेरीवाल्या आणि रस्त्यावर टाकलेल्या रेस्तरोंच्या टेबलखुर्च्यांमधून वाट काढत होतो आणि अचानक एका वळणावर हे कारंजे उभे!  आता त्याला कारंजे म्हटले  तरी हा त्याकाळात पब्लिक बाथ होता. इतका कोरीव पब्लिक बाथ असेल तर राजवाड्यांच्या आत काय असेल असे वाटून गेलेच.  सिनेमामध्ये पाहिले तेव्हा या जागेच्या सभोवती बरीच मोकळी जागा असेल  असे वाटले होते. पण अगदी त्याच्या उलट म्हणजे आजूबाजूच्या इमारती पार चिकटून होत्या. खरं सांगायचे तर आम्ही पोचलो त्यावेळेला म्हणजे साधारण साडेचार पाचला पाहिले तर त्रेवी छान वाटले पण जादूभरे वाटले नाही.  तेव्हा समोर बसणाऱ्यांची गर्दीही फार नव्हती. आम्ही तिथल्या जागेत एक चांगली जागा पकडून बसलो. अशाच गप्पा मारल्या आजूबाजूच्या गर्दीचे निरीक्षण केले. हे बहुतेक जोडप्यांनी येण्याचे स्थळ  वाटले.  बहुतेक जोडपी कारंज्याकडे पाठ करून त्यात  नाणी टाकत होती. पाण्यात नाणे पडले कि मनातल्या इच्छा पूर्ण होतात म्हणे.

 त्रेवी 

जसजशी संध्याकाळ व्हायला लागली तशी गर्दी वाढायला लागली. बिल्डीन्गींच्या महिरपीने रेखलेले  आकाशाचे तुकडे निळे जांभळे व्हायला लागले. हळूहळू कारंजे आकाशाच्या निळ्या  आणि लाईट्सच्या सोनेरी प्रकाशाने उजळून जायला लागले आणि त्रेवीची जादू उमजायला लागली. कारंजातल्या पाण्याच्या मऊशार रेशमी लडी सोनेरी व्हायला लागल्या.  आणि सोनेरी प्रकाशात सगळ्या मूर्त्या नाहून गेल्या.  वाहणाऱ्या सोनेरी रेशमी लडी खालच्या पाण्यात पडल्या कि त्या पाण्याचा मोरपिशी रंग घेऊ कि सोनेरी अशा संभ्रमात असाव्यात असे वाटले.   निळाई आणि  सोनेरीची ही अप्रतिम  जुगलबंदी मात्र अगदी थोडाच वेळ चालली.   आकाशाने आपले काळे पांघरूण घातले आणि गर्दी पांगायला लागली तसे आम्हीही इटालियन जेवणाच्या ओढीने निघालो. 

 लाईट्स चालू केल्यावर त्रेवी 

  निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर 

पुढचा  दिवस पॅन्थेऑन आणि आसपासचे भाग बघण्याचा.   पॅन्थेऑन हे १८०० वर्षापूर्वी बांधलेलं चर्च आहे .  त्याचा घुमट वरतून उघडा आहे आणि तिथून आत प्रकाश येतो. बऱ्याच गल्ल्याबोळ पार केल्यावर हा चौक येतो. इथे बसलेले टूरिस्ट, बाजूच्या रेस्तरोंच्या लावून ठेवलेल्या टेबलखुर्च्या आणि आजूबाजूच्या अतिशय जुन्या इमारती पाहून गल्ल्यांमधून येताना आपण चुकून भूतकाळात पोहोचलो कि काय असे वाटून जाते.  इथेही थोडावेळ समोरच्या पायरीवर रेंगाळत बसलो.  
पॅन्थेऑन बघायला जाताना दिसलेला एक कोरीवकाम असलेला खांब. याचे नाव आठवत नाहीये.  

रोमन फोरमशी मिळतीजुळती इमारत. 

पॅन्थेऑन समोरून.

 पॅन्थेऑनच्या आसपासही अशा इमारती होत्या. सर्वसाधारणपणे जुन्या राहिवासी इमारती अशाच दिसतात.  
पॅन्थेऑनचे खांब आणि पायऱ्या 

पॅन्थेऑनचा उघडा घुमट  

पॅन्थेऑनमधील चर्च 

याच्या पुढची संध्याकाळ अशीच शहरात फिरत घालवली.  इथून पुढे दुसऱ्या दिवशी  फ्लोरेंस मध्ये जाणार होतो.

खरतर  आमच्याकडे असलेल्या वेळात अजून बऱ्याच गोष्टी पाहाता आल्या असत्या. पण इतकी धावपळ करायची नव्हती , शक्यही नव्हती. रोम म्हणजे अगदी भूतकाळाच्या साथीने जगणारे शहर वाटले. एकच वाईट वाटलं ते म्हणजे इथल्या कोणाशी ओळख नव्हती त्यामुळे इथले स्थानिक जीवन कसे याबद्दल अनभिज्ञच राहिलो.   

या आधीचा पॅरिस चा भाग इथे वाचता येईल.
हाच लेख माझ्या ब्लॉगवर इथेही वाचता येईल.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

मस्त लिहिलयस सावली. सगळेच प्रचि अप्रतिम. एकसे एक.

पॅलेतिनो स्कायलाईन मस्त आहे. पॅलेतिनोची गढी, एकच उंच झाड असलेलं प्रति आणि त्रेवीची वेगवेगळ्या कोनातून घेतलेली प्रचि फार आवडली. कलोसियमही अतिशय सुंदर. त्याची भव्यता मस्त टिपलीयेस. Happy

भुतांचा फोटो ... Lol (कसा काय साधलास ते लिहिणे.)

सावली फायनली. सगळं वर्णन मस्त, ओघवतं आणि नेहमीप्रमाणेच सगळेच फोटो क्लासच.

ते जपानी फूटपट्टीचं अगदी पटलंच.

सुंदर....कस्सले क्लास प्रचि आहेत ! खरंच डोळे निवले.
<< भुतांचा फोटो ... हाहा (कसा काय साधलास ते लिहिणे.)>> +१

व्वा स्वप्नाली, काय सुंदर लिहितेस! आणि फोटो तर काय अप्रतीमच!
आणि ते सांजवेळचं गारुड ...........+१००.
आता रोम बघण्याची इच्छा अगदी बळावलीये!

व्वा स्वप्नाली, काय सुंदर लिहितेस! आणि फोटो तर काय अप्रतीमच!
आणि ते सांजवेळचं गारुड ...........+१००.
आता रोम बघण्याची इच्छा अगदी बळावलीये!

ऑव.
मस्त लिहीले आहेस सावली. फोटोही सुंदर.
जपानातून बाहेर पडल्यावर खरंच सगळ्या फुटपट्ट्या बदलुन जातात.

वरदा, पराग, रोहित, रुणुझुणू , बित्तुबंगा, जागू, अगो, मंजिरी, स्वप्ना७७ , सशल, रैना , श्यामली , जिप्सी, झकासराव , सायो, कंसराज प्रतिसादाबद्दल धन्यवाद

@ मामी आणि भुतांचा फोटो आवडणारे इतरजण,
Lol तो फोटो फोटोशॉप मधे एडीट केलाय. खरी भुतं नाही दिसली! नाहीतर इथल्या अमानविय वाल्या धाग्यात लिहावे लागेल. त्यातली माणसं दुसर्‍याच एका पार्कमधे चालणारी आहेत.
@ आऊटडोअर्स,
हो गं बरेच दिवस लागले.

@ मानुषी,
नक्की बघा रोम Happy

मस्तच!

मस्त वर्णन आणि फोटो. भुतांचा खासच!!!

कोलोसियम ला गेल्यावर आम्हाला एक वेगळीच अस्वस्थता आली होती. एकदम काहीतरी अजब. त्या वेळी हलका पाउस पडत होता, त्या मुळे हवा पण उदास होती. एकंदर रोम मधे खुपच भारताच्या खुणा आढळतात. स्वछ्ता पण युरोप येवढी नामी न्हवती.

बाकी ट्रीवी जवळच असलेला 'टाइम इलेव्हेटर शो" पाहिला की नाही? खुप मस्त आहे. जुन्या रोमच्या खुणा आणि इतिहास छान गुंफला आहे.

ट्रेव्ही बघुन मला ही तसेच काही ग्रेट वाटले न्हवते. आर्थात त्याचे कारण म्हणजे जेंव्हा मी तिकडे गेले तेंव्हा पाउस होता, आमच्या कडे छत्री एकच होती तिघात मिळुन आणि आजुबाजुला खुपच कलकल होती. तसे देखील आता त्या ट्रेव्हीला सगळ्या इमारतींनी वेढुन घेतलेले असल्याने काही उद्दात्त वाटत नाही. हे.मा.वै.म.

अप्रतीम प्र.ची. , सुंदर वर्णन, सावली आपल्यामुळे इथे बसल्या बसल्या पॅरिस, रोम या स्वप्नवत शहरांची सुखद सहल घडतेय , धन्यवाद ! पु . ले . शुभेछा Happy

Pages