पापा कहते है... : चंदेरी पडद्यावरील वडिल

Submitted by संयोजक_संयुक्ता on 17 June, 2012 - 01:38

baba.jpg

********************************************************

हिंदी सिनेमांमधे 'मां की ममता' च्या तुलनेत 'बा की बापता' हा प्रकार अगदीच रुक्ष पद्धतीने हाताळला गेलाय हा विचार माझ्या डोक्यात आता येतो.

पण एके काळी, हिंदी सिनेमाच्या भाषेत गुल से गुलीस्तान होण्याच्या वयात असताना मला माझ्या आणि आजूबाजूच्या जगातल्या सगळ्या नीरस, शिस्तप्रिय बापांच्या तुलनेत हिंदी सिनेमांमधले बाप कसे अत्यंत प्रेमळ, दिलखुलास! सगळ्यांनी त्यांचा आदर्श ठेवायलाच हवा असं ठामपणे वाटत असे.

पण तसं अर्थातच नव्हतं. "बेटी, इन छुट्टीयोंमे तू स्वित्झर्लंड (किंवा गेला बाजार कश्मीर) क्युं नही चली जाती?'' असं आम्हाला कधीही (गहिवरुन) विचारलं गेलं नाही, त्याऐवजी आमची रवानगी भोसला मिलिटरी स्कूलच्या सुट्टीतल्या प्रशिक्षण वर्गांना किंवा कंटाळवाण्या नाट्यशिबिरांना केली जायची.

तसंही एकंदरीत हिंदी सिनेमातल्या पांढर्‍या केसांच्या, मळकट साडीतल्या, कष्ट करुन कसेबसे दोन घास मिळवणार्‍या, खोकून खोकून बेजार झालेल्या 'मां' च्या तुलनेत बाप कितीतरी रुबाबदार, सुटाबुटात दाखवलेले असायचे, त्यामुळे बाप हो तो ऐसा असं कुणालाही (म्हणजे मला) वाटणारच.

सिनेमातल्या बापांना बडा कारोबार सांभाळण्याचं काम असे. प्रत्यक्ष आयुष्यात आजूबाजूचे सगळे बाप निमूट उठून ऑफिसला जाणारे, रविवारी केस कापायला नेणारे, फार तर कधीतरी हॉटेलात जेवायला न्यायची चैन करणारे. हिंदी सिनेमात बेटी के जनमदिनपर हिरोंका का हार तर प्रत्यक्षात???

... असं कितीतरी.

मात्र हे वय सुदैवाने लवकर मागे पडलं आणि मग हिंदी सिनेमांमधल्या बाकीच्या व्यक्तिरेखांप्रमाणेच या बापांवरही अन्यायच झालेला आहे हे ध्यानात यायला वेळ लागला नाही. कोणत्याही व्यक्तिरेखेचा 'इसेन्स' कधीही सर्वांशाने एक्स्प्लोर न करणे ही आपल्या इथल्या लेखक-दिग्दर्शकांची खासियतच आहे. त्यातून बापही सुटले नाहीत. म्हणजे 'बाप' असतोच. त्याशिवाय एकही सिनेमा कधीही पडद्यावर येण्याची शक्यता नाही. पण या बापाला सशक्त व्यक्तिरेखेत यायचं तर आपल्या पोटच्या अपत्यासोबत, जो सिनेमाचा हिरो असतो, या ना त्या प्रकारचा 'संघर्ष' करणं भाग असतं. कधी बगावत, कधी तात्त्विक वाद किंवा जनरेशन गॅप ... पण मुलासोबत 'संघर्ष' अटळ. तसं नसेल तर मग एकजात सगळे पडद्यावरचे बाप असले काय, नसले काय छाप भूमिकांमधे.

पडद्यावरचे बाप पृथ्वीराज कपूर, बलराज सहानीसारख्या अभिनयातल्या दिग्गज बापांपासून ते नाझिर हुसेन, रेहमानसारख्या पर्मनन्ट चरित्र अभिनेत्यांपर्यंत सर्वांनी रंगवले. एकेकाळचे सुपरस्टार्स दिलिपकुमार, राजेश खन्ना, अमिताभ बच्चन बाप झाले, मग ऋषी कपूर, सलमान, आमिरही बाप झाले.

यापैकी लक्षात रहाणारे, वेगळे बाप फार थोडे. जेमतेम हाताच्या बोटांवर मोजता येतील असे. उरलेले सगळे बाप काही ठराविक, ढोबळ वर्गवारीत फिट बसवता येतात. अर्थात ढोबळपणानेच कारण कुणीतरी म्हटलंय (बहुतेक शिरिष कणेकरांनी) त्याप्रमाणे हिंदी सिनेमातल्या बापाला कायम दोन ’हैसियती’ असतात. आपल्या सोयीने तो त्यातली एक पुढे करतो. म्हणजे आज मैं तुम्हारे बाप की हैसियतसे नही, एक पुलिस अफ़सरके हैसियतसे बात कर रहा हूं ... वगैरे.

त्यामुळे अशा वेगवेगळ्या हैसियतींसकट केलेल्या या वर्गवार्‍या आहेत हे ध्यानात ठेवा. उदा.

१) महत्वाकांक्षी, बिझिनेसमन बाप - खानदान की इज्जत, नाम, पैसा हे यांना सर्वात महत्वाचे. हे सत्ताधारी वर्गातले. सिनेमातल्या संघर्षाचा कणा या बापांच्या हट्टीपणावर उभा असतो. आपल्या मुला-मुलींच्या प्रेमाला विरोध करणे हे यांचे प्रमुख कर्तव्य. हे बाप प्रेमळ असतात पण सिनेमाचा शेवट होईपर्यंत ते आपल्याला (आणि अर्थातच त्यांच्या मुलांना) कळत नाही. आरडाओरडा, जबरदस्त डायलॉग, ठाशीव मुद्राभिनय आवश्यक.

पहा. 'मोगले आझम' पासून 'बॉबी', 'कयामत से कयामत', 'मोहोब्बते' पर्यंत अनेक सिनेमा. पृथ्वीराज कपूर, चंद्रमोहन, प्राण यांच्या समर्थ अभिनयामुळे ही कॅटेगरी महत्वाची, मध्यवर्ती ठरली. 'दिलवाले दुल्हनिया' मधला अमरीश कपूरचा बापही याच वर्गवारीतला.

२) तुपकट, प्रेमळ बाप - मेनस्ट्रीम हिंदी सिनेमांमधले हे सर्वात जास्त संख्येचे बाप. कारोबार सांभाळायला मॅनेजर, जवळ पैसा असतो, मोठ्ठी हवेली असते. छुट्टीयोंमे कश्मीर यांनाच सुचते. मुख्यत्वे नाझिर हुसेन, नंतर आता आलोक नाथ, अनुपम खेरने ही कॅटेगरी आपल्या खांद्यांवर पेलली. हे खांदे झुकलेले असणे महत्वाचे. शिवाय यांची हृदये कमकुवत असतात. एक हात सतत छातीवर दाबलेला असणे आवश्यक.

३) केविलवाणे, गांजलेले बाप - हेही प्रेमळच. फक्त यांच्याकडे बेटी के दहेज के लिये पैसा नसतो. आर्थिकदृष्ट्या कमकुवत गटातले. अन्याय सहन करण्याची जबरदस्त ताकद, डोळ्यांतून अश्रू, हात थरथरणे आवश्यक. अनेकदा हे बाप आंधळे दाखवतात. मनमोहन, हंगल डोळ्यांसमोर यायलाच हवेत.
यात अजून एक उपकॅटेगरी ज्यांची इकलौती बेटी नाजायज बच्चेकी माँ बनणार असते. उदा. 'आराधना'.

४) दुष्ट, कारस्थानी, कपटी - यांच्या पोटी सिनेमातले व्हिलन जन्माला येतात. बहुतेककरुन हे लंगडे दाखवतात, एक काठी टेकवत चालणारे, किंवा एकच डोळा असतो यांना. कन्हैयालाल, जीवन, प्राण, किरणकुमार, सदाशीव अमरापुरकर ... अनेक.

५) विनोदी, दिलखुलास बाप - ओमप्रकाश, मोतीलाल पासून गोलमालमधल्या उत्पल दत्त पर्यंत अनेकांनी हे बाप खुलवले. यात अजून एक मोठी उपकॅटेगरी आहे. आचरट, मूर्खशिरोमणी बापांची. सिनेमातले साईड हिरो-हिरॉइनी यांच्या पोटी जन्मतात. यातले दिग्गज म्हणजे धुमाळ, आसित सेन, राजेन्द्रनाथ, प्रेमनाथ पासून कादरखान. अनुपम खेरनेही आपले कौशल्य यात अनेकदा दाखवले. 'कभी अलविदा ना कहना' मधला अमिताभ बच्चनचा बापही याच कॅटेगरीतला.

मात्र या कॅटेगरींमधे ढोबळपणे न बसणारेही काही बाप हिंदी सिनेमांमधून दिसले. लखलखत्या हिर्‍याप्रमाणे त्यांचं अस्तित्त्व सिनेमामधे चमकून उठलं. आपल्या अभिजात अभिनयाने त्यांनी एरवी सामान्य वाटू शकणारे बाप असामान्य व्यक्तिरेखांच्या चौकटीत बसवले. काही गुणी दिग्दर्शकांनी एकसुरी, सपाट व्यक्तिरेखेला गहिरे पैलू पाडून लौकिकापेक्षा वेगळे बाप जन्माला घातले. हे बाप कायम लक्षात राहीले.

चंद्रमोहन (शहिद-१९४८) - देशभक्ती, चले जाव चळवळीला मुख्य स्थान असणारा हा चित्रपट. राम (दिलीप कुमार) हा राजबहाद्दूर द्वारकादासांचा (चंद्रमोहन) देशभक्त मुलगा. स्वातंत्र्य चळवळीत उडी घेण्याकरता तो घर सोडतो. दिलिप कुमारने केलेली क्रांतिकारकाची भूमिका सशक्त होतीच पण चंद्रमोहनची बापाची भूमिका जास्त तगडी वाटली. मुलाला विरोध करताना आपल्या भरदार आवाजाचा, भेदक नजरेचा पुरेपूर वापर त्यांनी केला. बाप-मुलाच्या संघर्षाचे अनेक नाट्यमय प्रसंग सिनेमात आहेत.

पृथ्वीराज कपूर (आवारा-१९५१) - 'मोगले आझम' मधल्या पृथ्वीराज कपूरची बापाची भूमिका सर्वात जास्त गाजली तरी त्यात तो बाप कमी आणि सर्वशक्तिमान अकबराच्या भूमिकेत जास्त रमल्यासारखा वाटतो. सगळं बळ एकवटून आपल्या बगावत केलेल्या मुलाच्या विरोधात उभा ठाकलेला हा बाप सत्ताधारी सम्राट म्हणून उकृष्टच होता. पण 'आवारा' चित्रपटातला पृथ्वीराजचा बाप हा प्रत्यक्षातही राज कपूरचा बाप असल्याने असेल पण जास्त जिवंत, खराखुरा वाटला. आवारा हा तसाही राजकपूरचा मला सर्वात जास्त आवडलेला सिनेमा म्हणूनही हे मत असू शकते.

पृथ्वीराज कपूर महत्वाकांक्षी, यशस्वी वकील. त्याच्या पत्नीचं अपहरण होतं आणि तिला त्यानंतर झालेलं मुल हे आपलं नाही असा तो गैरसमज करुन घेतो आणि तिचा त्याग करतो. अनेक वर्षांनी तो मुलगा म्हणजे राजकपूर मोठा होऊन नामांकीत चोर बनतो. आता वडिल मोठे, प्रतिष्ठीत जज्ज बनलेले असतात. बाप-मुलाची आमने सामने अनेकदा होते. करारी, कठोर पण आपल्या हातून झालेल्या गैरसमजाची जाणीव असल्याने मन खात असणारा, हळवेपणा लपवायला धडपडणारा बाप पृथ्वीराजने बहारदारपणे रंगवला. तुरुंगाच्या गजांआड असताना बापमुलातल्या दुराव्याच्या भिंती कोसळतात तो प्रसंग अप्रतिम आहे.
याच अभिनयाची आणि व्यक्तिरेखेची ओळ पुढे नेली शक्ती सिनेमातल्या दिलीप कुमारच्या कर्तव्यनिष्ठ पोलिस अधिकारी बापाने. मुलाच्या मनात आपल्याबद्दल गैरसमज आहे, त्यामुळे तो कमालीचा दुखावलाय हे समजूनही दुराव्याच्या भिंती दूर न करु शकलेला, प्रत्येक संघर्षाच्या क्षणी आतून अधिकाधिक कोसळत जाणारा बाप दिलीप कुमारने ताकदीने उभा केला.

अशोक कुमार (आशिर्वाद, १९६८) - बापमुलीतले कोवळे, प्रेमळ बंध यात फार हळवेपणाने आले आणि याचे शंभर टक्के श्रेय अशोक कुमारच्या ग्रेट, संवेदनशील आणि सहजतेची परिसीमा गाठणार्‍या अभिनयाला. अनेक चढ-उतार कथानकात येतात आणि प्रत्येक वेळी मुलीवरच्या प्रेमाने काठोकाठ भरुन ओसंडणारे अशोक कुमारचे डोळे पाहून आपला जीव गलबलतो. मुलीला बिदा करतानाच्या दृश्यात तर डोळ्यात पाणी आला नाही असा प्रेक्षक विरळाच.

अशोक कुमारने मुलीवर जीव लावलेला असा बाप अजूनही काही सिनेमांमधून रंगवला. प्रत्येकवेळी हा बाप खराच वाटला. 'मिली' सिनेमामधे जीवघेण्या आजाराला तोंड देणार्‍या स्वत:च्या मुलीला मानसिक बळ पुरवताना थकून गेलेला पण तरीही उत्साहाच्या आवेशात वावरणारा अशोक कुमारचा बाप कोण विसरेल? सुनीलदत्तने 'दर्द का रिश्ता' (१९८२) मधेही असाच एक हळवा, मुलीच्या जीवघेण्या आजाराशी सर्वशक्तिनिशी झुंजणारा, मुलीवाचून जगणं अशक्य वाटणारा बाप सुरेख रंगवला. 'काश' सिनेमात जॅकी श्रॉफने आपल्या मरणाच्या दारात असणा-या मुलाचे मन जपण्याकरता धडपडणारा बाप संवेदनशीलतेने रंगवला. अपंग मुलाला जिद्दीने स्वत:च्या पायावर उभं करताना बापाने केलेले जीवापाड प्रयत्न मेहमुदने 'कुंवारा बाप' मधून ताकदीने दाखवले. त्याचा उल्लेख व्हायलाच हवा.

पोटच्या अपत्याच्या कायमच्या वियोगाने मन कातर बनलेले अनेक बाप हिंदी सिनेमाच्या पडद्यावर अशा तर्‍हेने आले.

संजीव कुमार (कोशीश, १९७२) - संजीव कुमारसारख्या जातीवंत, अस्सल अभिनेत्याने रंगवलेल्या इतक्या विविध भूमिका आहेत, बाप या व्यक्तिरेखेमधे त्याने वेगवेगळ्या चित्रपटांत इतके अनोखे रंग भरलेले आहेत की त्याकरता जितके लिहावे, जितकी उदाहरणे द्यावी ती कमीच पडतील. कोशीशमधे तर त्याने कमालच केली होती. आपल्याला झालेले मूल आपल्यासारखेच मुके-बहिरे तर नाही या आशंकेने हादरुन गेलेला बाप किंवा नंतर आपलाच मुलगा लग्न करताना एका मुलीला ती अपंग आहे या कारणास्तव नाकारतोय हे कळल्यावर मनातला उद्वेग, अगतिक संताप, दु:ख ताकदीने त्याच्या चेहर्‍यावर, देहबोलीत दिसतं. असह्य होऊन त्याच्यातला बाप मुलावर हात उगारतो तेव्हाचा त्याचा मुद्राभिनय अशक्य होता.

उत्पल दत्त (गोलमाल, १९७४) - काही व्यक्तिरेखा इतक्या सशक्त रंगवलेल्या असतात की त्यांच्या जीवावर आख्खा सिनेमा तोलून धरला जातो. मात्र त्या रंगवणारा अभिनेता जर ती पेलण्याइतका समर्थ नसेल तर व्यक्तिरेखा आणि पर्यायाने सिनेमा पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळू शकतो. भवानी शंकरसारखे ब्रिलियन्टली स्केच्ड कॅरेक्टर हिंदी सिनेमांमधे फार कमी वेळा दिसतं. व्यक्तिमत्वाचे बारकावे खूप कमी सिनेमांमधे इतक्या बारकाईने रंगवलेले आढळतात. स्वत:च्या वैशिष्ट्यपूर्ण विचारसरणीला, तत्त्वांना जपणारा, त्यात कसलीही तडजोड न करणारा आणि आपल्या मुलीलाही तशाच चौकटीत बसणारा मुलगा जीवनसाथी म्हणून मिळावा म्हणून आग्रही असणारा उत्पल दत्तचा भवानी शंकर हिंदी सिनेमांमधला एक विलोभनीय बाप.

'प्यार किये जा' मधला आपल्या अतरंगी मुलाच्या कारनाम्यांनी हैराण झालेला ओमप्रकाशचाही बाप यानिमित्ताने आठवला.

राजेश खन्ना (अवतार, १९८३) - आपली सुपरस्टार इमेज बाजूला ठेवून ज्या काही मोजक्या, चांगल्या भूमिका राजेश खन्नाने साकारल्या त्यातली ही एक प्रमुख. खेडवळ पण स्वाभिमानी, जिद्दी, मुलाच्या स्वार्थीपणाला तोडीस तोड उत्तर देणारा यातला बाप नक्कीच वेगळा.

नसिरऊद्दीन शहा (मासूम, १९८३) - अत्यंत संवेदनशीलतेने, संयमाने हाताळणी झालेला हा सिनेमा. ज्याच्या अस्तित्वाचीही जाणीव नसते असा आपला मुलगा अचानक आपल्या पूर्वायुष्यातल्या काही घटनांची आठवण करुन देत आपल्या समोर येऊन उभा ठाकतो, आपले सुबक घरकुल त्याच्यामुळे मोडकळीला येत आहे हे जाणवूनही पोटातून आलेल्या उमाळ्याने त्या निरागस मुलावर प्रेम करण्यापासून स्वत:ला रोखू शकत नाही असा यातला नासिरने रंगवलेला जीके वन ऑफ द बेस्ट.

'अकेले हम अकेले तुम' मधे अमिर खाननेही बापमुलातले प्रसंग हृद्य वठवले आहेत.

अमिताभ बच्चन (सरकार, २००५) - 'गॉडफादर' ला भारताकडून दिलं गेलेलं हे उत्तर मानलं जाऊ शकतं का यावर निश्चितच वाद होऊ शकतील, पण यातल्या अमिताभ बच्चनच्या राजकारणी बापाच्या, गुंतागुंतीच्या व्यक्तिरेखेला दिग्दर्शक राम गोपाल वर्माने सुरेख खुलवलं यात वाद नाही. 'वक्त', 'बगावत', 'कभी खुशी कभी गम' अशा सिनेमातले बाप अमिताभने आपल्या सेकंड इनिंगमधे ताकदीने साकारले. पण 'सरकार' मधला त्याचा बाप आख्खा सिनेमा तोलून धरणारा होता. कुटुंबावर प्रेम करणारा, पोटच्या मुलाच्या कारवायांमुळे हैराण झालेला, तोच आपल्या जीवावर उठला हे जाणवल्यावर हादरलेला, थंड रक्ताने नंतरच्या घटनांना सामोरा जाणारा राजकारणी बाप अमिताभच साकारु शकतो.

याव्यतिरिक्तही काही बापांचे वेगळे उल्लेख करावेसे वाटतात.

'काबुलीवाला' मधला बलराज सहानीचा अफगाणी बाप. आपल्या लहान मुलीला मायदेशी सोडून तो कुटुंबाकरता पैसे मिळवायला परदेशी आला आहे. त्या लहानग्या मुलीच्या हाताचा ठसा असणारा एक चुरगाळलेला कागद जीवाच्या पलिकडे जपत तो रहातो आहे. परक्या देशातल्या आपल्या मुलीच्याच वयाच्या दुसर्‍या मुलीवर आपलेपणाने जीव लावतो. या पूर्ण चित्रपटभर एका कातर, हळव्या मनस्थितीची झालर आहे.

रविन्द्रनाथांच्या अभिजात लेखणीतून उतरलेला, बलराज सहानींनी रंगवलेला हा बाप वैश्विक आहे, त्याला उदास करणारा आपल्या अपत्याचा विरह जगातल्या कुठल्याही बापाच्या काळजाला स्पर्श करुन जाणारा आहे.

गुलझारच्या 'मौसम' सिनेमामधला संजीव कुमारचा बापही रुढ बापांपेक्षा वेगळ्या रितीने सामोरा येतो. आपल्या हातून नकळत घडलेल्या अपराधाची भरपाई त्याला करायची आहे. माणुसकीवरचा, भलाईवरचा विश्वास उडालेल्या आपल्या मुलीच्या मनात पुन्हा विश्वास जागवून तिला एक सन्मानाचे जीवन बहाल करायचे आहे. आपली मुलगी आपल्याकडे एक ’गिर्‍हाईक’ म्हणून पहाते आहे यातली वेदना, तिला सत्य सांगता येत नाहीये यातली अगतिकता संजीवकुमारच्या चेहर्‍यावर स्पष्ट वाचता आली.

अजून एक वेगळा, लोभस बाप म्हणजे रमेश सिप्पींच्या 'अंदाज' सिनेमामधे शम्मी कपूरने रंगवलेला विधुर बाप. मुलीवर जिवापाड प्रेम करणारा, पत्नीला विसरु न शकलेला आणि तरीही पुन्हा प्रेमात पडू पहाणारा बाप हिंदी सिनेमांमधे आधी किंवा नंतरही काहींनी रंगवला असू शकेल पण शम्मी कपूरने आपल्या सदाबहार अभिनयाने त्यात जे रंग भरले ते आगळेच. आपली जंगली, जानवर इमेज दूर सारत शम्मी कपूरने पहिल्यांदाच आणि तेही करिअरच्या शेवटी असा मॅच्युअर्ड अभिनय केला. अर्थात त्याही आधी त्याने 'ब्रह्मचारी' मधे अनेक अनाथ मुलांचा प्रेमाने सांभाळ करणारा, त्यांच्याकरता कष्ट उपसणारा बाप रंगवला होता.

आणि शेवटी ’सारांश’ मधला अनुपम खेरचा बाप. आपला मुलगा आता कधीही परत येणार नाहीये हे सत्य पचवताना, त्याच्यावाचून जगायला शिकताना, आपल्या पत्नीला पुन्हा उभं रहायला मदत करणारा, आणि जीवनात अजूनही काही सत्य आहेत ज्यांचा वेध आपल्याला घ्यायला हवा आहे याची जाणीव होत जाणारा यातला बाप ज्यांनी अजूनही पाहिला नसेल त्यांनी खूप काही मिस केलं आहे.

अजूनही काही बाप रहातातच. जसे की 'खामोशी'मधला नाना पाटेकरचा मुका, हट्टी बाप.

हिंदी सिनेमांमधले बाप एकसुरी नक्कीच नाहीत, मात्र त्यांच्यात व्यक्तिमत्वातला सखोलपणा फार कमी दिसला. बापच मध्यवर्ती भूमिकेत असणारे सशक्त कथानक कदाचित हिंदी सिनेमाच्या, हिरो-हिरॉइनच्या प्रेमकहाणीभोवतीच सतत फिरत रहाणार्‍या प्रेक्षकाला पेलवणार नाही या अनाठायी काळजीनेही असेल, पण असे बाप अभावानेच दिसले हे मात्र खरे.

नव्या दिग्दर्शकांनी वास्तव आयुष्यात आजूबाजूला कुठेही दिसू शकतील असे बाप आपल्या सिनेमांमधून दाखवायला सुरुवात केली, जसे 'खोसला का घोसला' किंवा 'दो दुनी चार' मधले मध्यमवर्गीय बाप. त्यावेळी मात्र दिलासा मिळाला. 'उडान' मधला बापही हिंदी सिनेमांच्या रुढ पठडीतला नव्हता पण त्याचा सायकिक छळवाद आजूबाजूच्या आजच्या जगात दिसू शकतो.

हिंदी सिनेमांमधून मुलीच्या प्रेमामुळे, तिच्या वियोगामुळे हळवा झालेला बाप अनेकदा दिसला मात्र एखाद्या कर्तबगार मुलीच्या मागे, तिच्या संघर्षात तिची साथ देत ठामपणे उभा रहाणारा बाप मात्र कधीच दिसला नाही. कदाचित अशा मुलीची व्यक्तिरेखाही हिंदी सिनेमांमधल्या बापांच्या पोटी अजून जन्मायची आहे.
'जो जिता वही सिकंदर' मधला कुलभुषणचा मुलाला सायकल-रेसमधे विजेता करायचंच या जिद्दीने त्याच्या मागे उभा रहाणारा बाप बघताना हे जाणवून गेलं.

लेखमर्यादेमुळे इथे इंग्रजी किंवा जागतिक सिनेमांमधल्या बापांचा उल्लेख अजिबातच करायचा नाही असं ठरवलं होतं. पण त्याला अपवाद निदान शेवटी तरी करायलाच हवा. तो बाप म्हणजे 'पोस्टमन इन द माउंटन्स' मधला.

दुर्गम, खडकाळ पर्वतराजींमधून टपाल वाटण्याचे आयुष्यभर काम केलेला हा पोस्टमन. पत्र पोचवणे हे त्याच्याकरता फक्त एक काम नाही. अतिशय जिव्हाळ्याने तो पत्र वाटतो, लोकांच्या खडतर जगण्यात आपल्यामुळे जरा तरी आनंद मिळावा अशी त्याची मनापासून इच्छा आहे. कितीही अडचणी आल्या तरी संदेश पोचलाच पाहीजे. पण आता तो थकला आहे. ही खेप त्याची शेवटची. यावेळी त्याच्यासोबत त्याचा तरुण मुलगा आहे. आपलं हे काम मुलानेही त्याच आपुलकीने करावं असं त्याला वाटतय. मुलगा मात्र काहीशा नाईलाजानेच त्याच्या सोबत आलेला आहे. त्याला फारशी आस्था नाहीये बापाच्या या समाजकार्याबद्दल. उलट आपल्या आईकडे, आपल्याकडे त्याचे या कामामुळे आयुष्यभर दुर्लक्षच झालेले आहे म्हणून तो नाराज आहे.

बापामागोमाग तो एकेक वळण पार करत, एकेक चढ चढत, दरी ओलांडत जात रहातो. आयुष्यभर घडू न शकलेला संवाद या प्रवासात शक्य होतो. बापाचं काम शिकता शिकता तो त्याची आयुष्यभर जोपासलेली तत्त्वही शिकतो, पावलांवर पाऊल ठेवताना आपल्या वृद्ध बापाच्या खडबडीत तळव्यांना तो निरखतो. आपला बापाची त्याला पहिल्यांदाच खरीखुरी ओळख होते. प्रवास संपवून दोघे परततात तेव्हा आता तो असंमजस मुलगा राहीलेला नसतो. एक जबाबदार, कर्तव्याची जाणीव झालेला माणूस असतो. त्याच्या बापासारखाच. खूप कमी संवादांतून, अत्यंत संवेदनशीलतेने यातला बाप आपल्या मुलाला इथवर आणून सोडतो. आपलं कर्तव्य तो पूर्ण करतो.

जगातले सगळे बाप हेच करायला तर आयुष्यभर धडपडत असतात. मग ते सिनेमांमधले असोत किंवा प्रत्यक्षातले.

- शर्मिला फडके

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा लेख म्हणजे कलाकारांच्या त्या रोलमधील नावांची जंत्री नसून प्रत्येकाचे वैशिष्ठ्य इतक्या दमदारपणे रेखाटले आहे लेखिकेने की लेखातील प्रत्येक पात्र त्या त्या पेहरावात आणि अभिनयाने समोर झटदिशी येऊन ठाकते. उदा. 'आशीर्वाद' मधील जोगी ठाकूरच्या भूमिकेतील अशोककुमार (एकमेव 'बाप' की ज्याला त्या वर्षीची फिल्मफेअर उत्कृष्ट अभिनेत्याची ट्रॉफी मिळाली होती; तीही 'आराधना', 'इत्तेफाक' मधील राजेश खन्नाला मागे टाकून). नववधूच्या पोशाखात नटलेल्या आपल्या मुलीला पाहण्यासाठी कासावीस झालेला बाप अशोककुमारनी असा काही रंगविला होता की ते दृष्य डोळ्यात पाणी उभे करत असे.

आशा पारेखसारख्या गावभर उनाडक्या करणार्‍या पोरीला एका शब्दानेही न विचारणारा, पण तिला एकटीला सिमला, मनाली, नैनितालला जाण्यासाठी दिलखुलास परवानगी देणारा पेटंट बाप राज मेहरा, घरच्या गरीबीला कंटाळून पोराबाळांसाठी प्रसंगी जीव द्यायला तयार होणारे हतबल बाप म्हणजे नाना पळशीकर आणि ए.के.हंगल; तर मुलाच्या दुर्गुणाकडे दुर्लक्ष करून चित्रपटाची हिरवीण त्यालाच कशी मिळेल हे पाहणारे बाप म्हणजे जयंत, सप्रू.

लेखिकेने जाताजाता (न राहवून) एका अप्रतिम इंग्रजी चित्रपटाचाही उल्लेख केला आहेच या संदर्भात, तर त्याच अनुषंगाने मला या क्षणी आठवणारा परकीय भाषेतील (इटालियन) बाप म्हणजे विट्टोरिओ डी सिकाचा "बायसिकल थीफ" मधील सायकल चोराच्या शोधार्थ मुलासोबत गावभर व्याकूळ होऊन भटकणारा बाप अँटोनिओ रिक्की, तर इराणी सिनेमातील एक प्रतिभाशाली नाव म्हणजे माजिद माजिदी यांच्या कुशल दिग्दर्शनाखाली तयार झालेला 'सॉन्ग ऑफ दी स्पॅरो' मधील संसार आणि मुलाबाळाच्या काळजीत खंगलेला 'करीम' नामक बाप. दोन्ही चित्रपटांतील 'बापां'नी जगभराच्या प्रेक्षकांच्या काळजात घर केले आहे.

मराठी चित्रपटाच्या इतिहासात 'मोलकरीण' मधील परशुराम सामंत यांनी रंगविलेला 'बाप' असाच अविस्मरणीय. विशेषतः कलेक्टर झालेला मुलगा, त्याच्या बंगल्यात खेड्यातून आलेल्या बापाने प्रवेश केल्यावर शरमलेला कलेक्टर तसल्या तुटक्याफाटक्या बापाची ओळख आपल्या सभोवती जमलेल्या हाय सोसायटीतील बॉस लोकांशी करून देत तर नाहीच पण बापाला 'बाबा' ही म्हणत नाही, आपली अब्रू जाईल या विचाराने ओळखही दाखवित नाही. मुलाने केलेले बापाचे असले स्वागत पाहून दु:खाच्या धक्क्याने हृदय फाटून गेलेला बाप सामंतानी त्या प्रसंगी पडद्यावर एकही वाक्य न उच्चारता जो अप्रतिम अभिनय केला आहे तो पाहून प्रेक्षकांचे डोळे पाणावतात.

असो. लिहिल तितके कमीच पडेल इतका सुंदर लेख शर्मिला फडके यानी दिला आहे.

अशोक पाटील

खुपच छान कल्पना.
नेहमीप्रमाणेच लेखही छानच. Happy

नेहमीप्रमाणेच मस्त. बाकीच्यांच्या आठवणीतले बाप पण आवडले. शशीकपुर दिलखुलास बाप मस्त रंगवायचा. आलोकनाथ कधीच न आवडलेला बाप.

मस्त. खूप आवडला लेख. चित्रांवर असोत किंवा चित्रपटांवर तुमचे लेख फार आवडतात.
रच्याकने, तुम्ही 'क्रुषिवल' मधे सदर लिहीता का? गेल्या आठवड्यात तुमचा एक लेख वाचला "चित्र कशी बघावीत'' या विषयावरचा. लेख आवडला आणि खाली तुमचे नाव बघून तर प्रश्नच मिटला.

लेख खूप आवडला. प्रतिक्रियापण!
एक डाव धोबी पछाडमधला अशोक सराफनं रंगवलेले मुक्ताचे वडीलपण सहीच! त्यानं खूप कमी वेळा त्याला न्याय देणार्‍या भुमिका केल्या. आपली माणसं मधे ही तो आवडला होता.

Pages