मेनोपॉज- ४ : शरीराला होणारे धोके - हृदयविकार

Submitted by रुणुझुणू on 19 June, 2012 - 03:11

.

भारतात (आणि संपूर्ण जगातच) आजच्या घडीला स्त्री आणि पुरूष दोघांमध्येही हृदयविकार हे मृत्युचे सगळ्यांत अग्रेसर कारण आहे !

अयोग्य जीवनशैली आणि मधुमेहाचे वाढते प्रमाण ह्यामुळे हृद्यविकाराच्या प्रमाणात दिवसेंदिवस आणखीनच वाढ होत आहे.

मेनोपॉजच्या वयापर्यंत स्त्रियांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण पुरूषांच्या तुलनेत बरेच कमी असते.
मेनोपॉजनंतर मात्र हे प्रमाण झपाट्याने वाढत जाते.

साधारण ६० व्या वर्षात स्त्री आणि पुरूष दोघांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण सारखे असते !

असे का घडते ?

उत्तर पुन्हा तेच.....इस्ट्रोजेनची कमतरता !

रक्तातील चांगल्या चरबीची( HDL cholesterol ) पातळी जास्त आणि घातक चरबीची ( LDL cholesterol ) पातळी कमी ठेवण्याचे महत्वाचे काम इस्ट्रोजेन करत असते.
ह्या चरबीचे संतुलन बिघडल्यास रक्तवाहिनीमध्ये चरबीची गुठळी तयार होते.
तिचा आकार वाढत जाऊन रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होतो.

Coronary artery disease.jpg

ह्याशिवाय रक्तवाहिन्यांच्या स्नायूंची कार्यक्षमता, शरीरातील कर्बोदकांचे संतुलन, रक्ताचा प्रवाहीपणा ह्या गोष्टींवरही इस्ट्रोजेन नसल्याने विपरीत परिणाम होतात.

स्त्री आणि पुरूष दोघांमध्ये ६० व्या वर्षाच्या सुमारास ह्या आजाराचे प्रमाण सारखे असले तरी ह्या आजारामुळे येणार्‍या मृत्यूचे प्रमाण पुरूषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त आहे.

असे का ?

१. पुरूषांमध्ये मधुमेहामुळे हृदयविकाराच्या प्रमाणात दुपटीने वाढ होते. पण स्त्रियांमध्ये मात्र मधुमेहामुळे होणारी ही वाढ तिप्पट असते, असे आढळून आले आहे.

मेनोपॉजपूर्वी इतर स्त्रियांना मिळणार्‍या इस्ट्रोजेनच्या संरक्षक कवचाचा लाभ मधुमेह असणार्‍या स्त्रियांना मिळत नाही.
म्हणजेच मधुमेह असणार्‍या स्त्रियांमध्ये मेनोपॉजपूर्वीसुद्धा हृदयविकाराचा धोका पुरूषांइतकाच असतो !

२. आपल्यालाही हृद्यविकार होऊ शकतो, ह्या बाबतीत बर्‍याच स्त्रियांमध्ये अज्ञान असते.
हा मुख्यतः पुरूषांचाच आजार आहे असा सर्वसाधारण समज आहे. त्यामुळे लक्षणांकडे खूपदा दुर्लक्ष केलं जातं,
आणि वैद्यकीय मदत घेण्यात हलगर्जीपणा केला जातो.

३. हृदयविकाराची लक्षणे स्त्रियांमध्ये थोड्या वेगळ्या पद्धतीने जाणवू शकतात.
म्हणजे छातीत दुखून येण्याऐवजी मान दुखणे, खांदा दुखणे, डाव्या बाजूला जठराच्या जागी दुखणे, धाप लागणे, मळमळल्यासारखे वाटून उलटी होणे, नेहमीपेक्षा लवकर आणि जास्त थकवा येणे इत्यादी.
त्यामुळे ह्या किरकोळ तक्रारी असल्याची शक्यता वाटून दुर्लक्ष केलं जातं.

४.दुर्दैवाने काहीवेळा डॉक्टरांकडूनही वरील लक्षणांकडे कानाडोळा केला जाऊ शकतो.

५. मोठ्या रक्तवाहिन्यांमध्ये चरबीच्या गुठळीमुळे अडथळा निर्माण होण्याबरोबरच लहान रक्तवाहिन्यांमध्ये होणारा "मायक्रोवॅस्क्युलर डिसीज" ( Microvascular disease ) प्रामुख्याने स्त्रियांमध्ये आढळून येतो.
त्यामुळे हृद्यविकाराच्या उपचारांसाठी वापरण्यात येणारी नेहमीची औषधे स्त्रियांमध्ये पुरूषांइतक्याच प्रभावीपणे काम करतात किंवा नाही ह्याबाबत साशंकता आहे.

Microvascular disease.jpg

६. भारतामध्ये अजूनही बर्‍याच घरांमध्ये स्त्रियांना "दुय्यम नागरिकाचा" दर्जा दिला जातो. बर्‍याचदा स्त्री स्वतः आर्थिकदृष्ट्या स्वतंत्रही नसते. त्यामुळे हृदयविकाराच्या अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी सारख्या खर्चिक तपासण्या आणि उपचार करण्याची टाळाटाळ केली जाते.

७. स्त्रियांमध्येही हृदयविकार होऊ शकतो ह्या शास्त्रीय सत्याबाबत जेवढी जनजागृती व्हायला हवी तितकी झालेली दिसून येत नाही.

हृदयविकार म्हणजे नेमकं काय ?

( इथे हृदयविकार हा शब्द फक्त - "करोनरी आर्टरी डिसीज" - म्हणजेच हृदयाला रक्तपुरवठा करणार्‍या रक्तवाहिन्यांमध्ये चरबीची गाठ होऊन अडथळा निर्माण झाल्याने होणार्‍या आजारांसाठी वापरला आहे.
हृदयविकाराची इतर कारणेही असू शकतात. उदा.- हृदयात व्यंग असणे, हृदयाच्या झडपांमधील बिघाड )

आपल्या शरीरात असंख्य रक्तवाहिन्यांचं जाळं पसरलेलं आहे. प्रत्येक अवयवाला पुरवठा करणार्‍या वाहिन्या आहेत. आणि ह्या वाहिन्यांमध्ये रक्त भरणारा पंप म्हणजे हृदय. हा हृदयाचा पंप चालू राहण्यासाठी त्याला स्वतःलाही रक्तपुरवठ्याची गरज आहेच ना.

हृदयाच्या स्नायुंना रक्त पुरवणार्‍या वाहिन्यांना करोनरी व्हेसल्स म्हणतात.

जेव्हा ह्या करोनरी व्हेसल्समध्ये चरबीच्या गाठीमुळे अडथळा तयार होतो तेव्हा त्यांच्यामधून हृदयाला होणारा रक्तपुरवठा मंदावतो. परिणामी हृदयाच्या स्नायुंची कार्यक्षमता कमी होते. वाहिन्यांमधला अडथळा जर मोठा असेल तर तेवढ्या भागातले स्नायू हळुहळू मृत होऊ लागतात. वैद्यकीय भाषेत ह्याला मायोकार्डिअल इन्फार्क्शन ( Myocardial infarction ) म्हणतात. म्हणजेच MI किंवा हृदयविकाराचा झटका !

हृदयविकार का होतो ?

ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी अनेक संशोधनं झाली आहेत....होत आहेत.

ह्या अभ्यासातून अनेक कारणं समोर आली आहेत. ढोबळ मानाने वर्गीकरण करायचं झालं तर --

अ. बदलता न येणारी कारणे ( Fixed risk factors )
ब. (काही अंशी) बदलता येऊ शकणारी करणे (Modifiable risk factors )
अशा पद्धतीने विचार करता येईल.

अ. बदलता न येणारी कारणे ( Fixed risk factors ) ----

१. अनुवंशिकता- ह्याचा संबंध गुणसूत्रांशी तसेच आरोग्यविषयक ( आहार, व्यायाम) समान सवयींशी आहे.

२. लिंग- ४५-५० वर्षे वयाच्या आतल्या स्त्रियांना हृदयविकारापासून नैसर्गिकपणे अंशतः संरक्षण असतं.
मेनोपॉजनंतर मात्र हृदयविकाराच्या धोक्याचं प्रमाण स्त्री आणि पुरूष दोघांमध्ये सारखंच असतं.
(ह्याचे कारण वर लिहिलेच आहे.)

३. वय- पूर्वीच्या काळी पन्नाशीनंतर आढळून येणारा हा आजार आता अगदी तिशीच्या आतल्या
तरूणांमध्येही दिसायला लागला आहे.

ब. बदलता येऊ शकणारी कारणे ( Modifiable risk factors ) ----

१. सिगारेट ओढणे
२. उच्च रक्तदाब
३. मधुमेह - विशेषतः आटोक्यात नसलेला मधुमेह.
४. स्थूलपणा
५. घातक कोलेस्टरॉलची ( LDL cholesterol ) वाढलेली पातळी
६. अतिरिक्त मद्यपान
७. बैठी जीवनशैली अर्थात व्यायामाचा अभाव
८. टाईप-ए बिहेविअर पर्सनॅलिटी TABP-- ह्या लोकांना CHD चा धोका जास्त असतो, असं काही अभ्यासांमध्ये आढळून आलं आहे. टाईप-ए म्हणजे काय ह्यावरचा एक परिच्छेद विकिपिडियावरून इथे देतेय.
( इंग्रजीतून देते आहे कारण ह्यातल्या काही विशेषणांचे प्रतिशब्द मला माहीत नाहीत.)

The theory describes a Type A individual as ambitious, aggressive, business-like, controlling, highly competitive, impatient, preoccupied with his or her status, time-conscious, and tightly-wound. People with Type A personalities are often high-achieving "workaholics" who multi-task, push themselves with deadlines, and hate both delays and ambivalence.

हृदयविकाराची लक्षणे-

१. छातीत जडपणा वाटणे, दाब आल्यासारखा वाटणे
२. डाव्या दंडात, जबड्यात, पाठीत , किंवा जठराच्या जागेवर दुखल्यासारखे वाटणे किंवा जडपणा येणे, उलटी होणे
३. नेहमीची कामे केल्यावरही चटकन थकवा येणे, धाप लागणे

मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये छातीत दुखण्यापेक्षा धाप लागणे, थकवा येणे ही लक्षणे प्रामुख्याने आढळतात.
वरील लक्षणे वाचली तर असं लक्षात येईल ही लक्षणे बाकीच्या काही आजारांतही दिसून येतात. बर्‍याचदा अॅसिडिटी झाली असेल म्हणून दुर्लक्ष केलं जातं.

( ह्याउलट आपल्याला हृदयविकाराचाच झटका आला आहे, अशा खात्रीने आलेला रुग्ण केवळ अॅसिडिटीच्या औषधांनी बरा होतो ! Happy )

पण वर उल्लेख केलेले हाय रिस्क फॅक्टर्स असतील तर थोडं जास्त सावध राहिलेलं केव्हाही चांगलं.

तपासण्या-

तुम्हाला हृदयविकार आहे अशी शंका डॉक्टरांना आली तर सर्वसाधारणपणे खालील तपासण्या करायला सांगितलं जातं-
१. रक्ताच्या काही मूलभूत चाचण्या उदा.- हिमोग्लोबिन, रक्तशर्करा, कोलेस्टेरॉल
२. हृदयाचा आलेख- ECG ( Electrocardiogram )

ECG.jpg

३. हृदयाच्या कार्यक्षमतेची चाचणी- 2-D Echocardiogram

2 D echocardiograph.jpg

४. स्ट्रेस टेस्ट

stress_test.jpg

५. करोनरी अँजिओग्राफी

Coronary angiography.jpg

६. सीटी अँजिओग्राफी
७.न्युक्लिअर स्कॅन

Nuclear scan for coronary disease.jpg
हृदयविकारावरील उपचार-

ह्यात औषधे आणि शस्त्रक्रिया असे दोन मार्ग असतात.
( हृदयविकारावरील उपचारांसाठी अॅलोपथी सोडून बाकीच्या औषधशाखांमध्येही बरेच प्रयोग होत आहेत. अनेकांना त्याने खूप फायदादेखील झाला आहे. माझा स्वतःचा त्या शाखांचा अभ्यास नाही म्हणून मी इथे फक्त अॅलोपथीच्या औषधांचा उल्लेख केला आहे. )

हृदयविकारावरील प्रमुख औषधे - Medical line of treatment

१. रक्तदाब आटोक्यात ठेवणारी
२. हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा वाढवणारी
२. रक्तातील घातक कोलेस्टरॉलची पातळी कमी करणारी / ताब्यात ठेवणारी
४. रक्तात गुठळ्या होण्याचं प्रमाण कमी करणारी

हृदयविकारावरील शस्त्रक्रिया -

१. अँजिओप्लास्टी - ह्यामध्ये अडथळा निर्माण झालेल्या रक्तवाहिन्यांमध्ये स्टेण्ट बसवून रक्तपुरवठा सुरळीत केला जातो.

Coronary angioplasty.gif

२. करोनरी आर्टरी बायपास सर्जरी - ह्यामध्ये अडथळा निर्माण झालेल्या रक्तवाहिनीला ' बायपास ' करून, दुसर्‍या वाहिन्या जोडून हृदयाचा रक्तपुरवठा ( आणि पर्यायाने प्राणवायूचा पुरवठा ) सुरळीत ठेवला जातो.
ह्यासाठी पेशंटच्या पायातील वाहिनी ( Saphenous vein ) किंवा छातीतील दुसरी वाहिनी ( Internal mammary artery ) वापरली जाते.

Coronary bypass.jpg

३. मिनिमली इन्वेजिव बायपास सर्जरी - ह्यामध्ये वरील ऑपरेशनसाठी केली जाणारी जखम ( इन्सिजन) , तिची जागा ह्यात फरक असतो.

**वरीलपैकी कुठल्याही शस्त्रक्रियेने आजाराची प्रक्रिया थांबू शकत नाही.

त्यामुळे रक्तवाहिन्यांतील अडथळा पुन्हा होऊ नये म्हणून आहार-विहारातील बदल हे अतिशय आवश्यक आहेत.

हृदयविकार टाळण्यासाठी खबरदारीचे उपाय -

वर सांगितल्याप्रमाणे काही कारणे ( वय , लिंग , अनुवंशिकता ) ही आपल्या हाताबाहेरची असतात.
पण ज्या गोष्टी आपण बदलू / टाळू शकतो त्या बदलायचा प्रत्येकाने नक्कीच प्रयत्न केला पाहिजे.

१. हळूहळू कमी करत करत धुम्रपान पूर्णपणे बंद करा. ह्यामध्ये पॅसिव स्मोकिंगही आलं. म्हणजेच तुमच्या आजूबाजूला कोणी धुम्रपान करून त्या धुराची भेट तुम्हाला देत असेल तर स्पष्ट शब्दांत त्याला समज द्या !

२. नियमित व्यायाम करा.
** ज्या व्यक्तीचं वजन योग्य आहे तिने दररोज किमान अर्धा तास आणि ज्या व्यक्तीचं वजन अनुकूलपेक्षा जास्त आहे तिने दररोज एक ते दीड तास शारीरिक व्यायाम करावा, असा सल्ला दिला जातो.

३.भरपूर फळे आणि भाज्या असलेला आणि कमी फॅटस् असलेला आहार घ्या.

४.वरचेवर रक्तदाब तपासून घ्या आणि तो जास्त असेल तर आटोक्यात ठेवण्यासाठी योग्य सल्ला घेऊन उपाय करा.

५.मधुमेही व्यक्तींनी रक्तातील साखरेचं प्रमाण योग्य पातळीत ठेवण्यासाठी प्रयत्न करा.

६.ज्या स्त्रियांना गर्भावस्थेत मधुमेह झाला असेल किंवा पॉलिसिस्टीक ओवरी सिन्ड्रोम असेल त्यांनी वर्षातून किमान एकदा रक्तातील साखर आणि रक्तदाब तपासून घेणे आवश्यक आहे.

७. डॉक्टरांनी दिलेली औषधे कधीच एकदम बंद करू नका.त्यामुळे आजार बळावून हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. शंका असल्यास सेकंड ओपिनियन म्हणून दुसर्‍या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

८.सर्वात महत्वाचे म्हणजे....तणावरहित जीवन जगण्याचा प्रयत्न करायला हवा.

बाकी मेनोपॉजशी संबंधित उपचारांबद्दल नंतरच्या लेखांमध्ये सविस्तर येईलच.

ह्या दोन (ऑस्टिओपोरॉसिस आणि हृदयविकार) आजारांव्यतिरिक्त युरिनरी इनकॉन्टिनन्स हा जो तिसरा महत्वाचा आजार आहे, त्याबद्दल पुढच्या लेखात पाहू या.

- रुणुझुणु (स्त्रीरोगतज्ञ)

*********************************************************************************************************************

- सर्व प्रचि जालावरून साभार.
- डिस्क्लेमर :
सदरहू लेखाचा उद्देश मेनोपॉज आणि त्यासंबित आजार ह्या विषयावरील माहिती देणे हा असून त्या संदर्भातील काही सल्ला-उपचार इत्यादी असतील ते तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच करावेत.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

या सगळ्या लेखमालेचे संकलन करून ते पीडीएफ स्वरूपात प्रसिद्ध करावे ही नम्र विनंती.
अतीशय माहीतीपूर्ण लिखाण आहे.

धन्यवाद इब्लिस.
आणि हो, विनंती नका करू. तुम्ही नक्कीच माझ्यापेक्षा वयाने आणि अनुभवाने मोठे आहात. Happy
काही चुका दिसल्या तर नक्की सांगा.

या मालिकेतून अतिशय महत्वाची माहिती सोप्या शब्दांत पोहोचवण्यात आलेली आहे.
( पुरूष आयड्यांची उदासीनता अनाकलनीय आहे Sad )

सगळ्यांना धन्यवाद. Happy

<< पुरूष आयड्यांची उदासीनता अनाकलनीय आहे>> हम्म्म Happy

<< रुणुझुणू , हॅट्स ऑफ! अमेझिंग लिहीत आहेस तू!>> Blush

<< प्रिंटाऔट घेतलेत सावकाश वाचायला. चालेल ना?>> हो. चालेल. काहीच प्रॉब्लेम नाही.

लेख फार मोठ्ठा होत होता, म्हणून तपासण्यांबद्दल फार खोलात जाऊन लिहिलं नाहीये. तसंही ती माझी शाखा नाही. पण कोणाला काही अतिरिक्त माहिती असल्यास देऊ शकेन. अर्थात ह्या तपासण्यांबद्दल साती जास्त छान सांगू शकेल .

आज हा लेख वाचला आणि आधीचे चाळले. शास्त्रिय माहिती खूप सोप्या शब्दांत सांगितली आहे !

हे वाचून एक प्रश्न पडला.. कदाचित फारच बाळबोध असेल.. पण विचारतोच.
जर स्त्रियांच्या शरिरात इस्ट्रोजेनचं एव्हडं महत्त्व असतं, तर मेनोपॉज नंतर इस्ट्रोजेनची कमतरता काही प्रमाणात भरून काढण्यासाठी काही औषधं किंवा एक्सर्टनल हार्मोन्स वगैरे देता येत नाहीत का? ( म्हणजे जसं कॅल्शियमची कमतरता भासते तेव्हा कॅल्शियमच्या गोळ्या देतात किंवा आहारात कॅल्शियम कंटेट वाढवतात तसं. )

@ पराग,
<< हे वाचून एक प्रश्न पडला.. कदाचित फारच बाळबोध असेल.. पण विचारतोच.
जर स्त्रियांच्या शरिरात इस्ट्रोजेनचं एव्हडं महत्त्व असतं, तर मेनोपॉज नंतर इस्ट्रोजेनची कमतरता काही प्रमाणात भरून काढण्यासाठी काही औषधं किंवा एक्सर्टनल हार्मोन्स वगैरे देता येत नाहीत का? >>

हा प्रश्न बाळबोध मुळीच नाही. सगळ्या वैद्यकशाखेला चक्रावून टाकणारं प्रकरण आहे हे.:)

तुम्ही म्हणत आहात तशी एक्टर्नल हॉर्मोन्स दिली जातात. त्याला हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी म्हणतात.
पण गर्भनिरोधक गोळ्यांप्रमाणेच ही HRT (Hormone replacement therapy) वरचेवर वादाच्या भोवर्‍यात सापडत असते.
कारण त्याचे चांगल्याबरोबरच काही वाईट परिणामही होतात.
महत्वाचा विषय असल्याने ह्यावर एक स्वतंत्र आणि सविस्तर लेख (बहुतेक सातवा क्रमांक) लिहिणार आहे.

रुणुझुणू, सगळे लेख फारच आवडले. खूपच सविस्तर आणि नॉन मेडिकल फील्ड मधल्या लोकांना (म्हणजे माझ्यासारख्या) पटकन समजतील अशा भाषेत लिहिले आहेत. सोपं लिहिणं अवघड असतं. ही मालिका अशीच येत राहू दे.

बस्केला अनुमोदन.

पुढील लेखांची वाट बघत आहे.

खूप जबरदस्त लेख.
अजूनही बर्‍याच जणांना अटॅक आणि खांदे/डावा दंड दुखी चे असोसिएशन माहित नसते, आमच्या इथले एक आजोबा कोणा नातेवाईकाच्या कार्यात एटॅक ने वारले. खांदे दुखी इ. लक्षणे होती पण त्याकडे लग्नाचा थकवा समजून दुर्लक्ष झाले.

उपयुक्त माहीती.
व्यायामाची सवय नसताना जमा झालेल्या कोलेस्टेरॉलचं गुठळीच) योग्य त्या प्रमाणात व्यायाम सुरू केल्यानंतर काय होतं ?