सह्याद्री आणि दुर्ग

Submitted by चिन्मय कीर्तने on 15 June, 2012 - 16:41

"सह्याद्री नामा नग हा प्रचंड
हा दक्षिणेचा अभिमानदंड।
हाती झळाळे परशु जयाच्या..
स्कंधावरी दुर्गम दुर्ग तयाच्या...॥"

खरच सह्याद्री आणि दुर्ग ह्यांचे खर्‍या अर्थाने अद्वैत अत्यंत पुरातन काळापासून साधले गेले आहे. सह्याद्री म्हणजे दख्खन पठाराचा जणु कणाच आहे. उत्तरेला नर्मदा नदीपासुन थेट कन्याकुमारीपर्यंत ह्याचा दक्षिणोत्तर विस्तार आहे. महाराष्ट्रापुरता बोलायचे झाले तर पूर्वेला विस्तीर्ण असे दख्खनचे पठार आणि पश्चिमेला सह्याद्रीची मुख्य रांग! सह्यरांग आणि पश्चिमेचा अरबी समुद्र ह्यामधील अरुंद जागेत वसलेले कोकण तसेच ह्या दोन्ही भागांमधे असलेला सरासरी १०००मीटर उंचीचा फरक अशी अत्यंत वैविध्यपूर्ण भौगोलिक संरचना सह्यपर्वतरांगांमुळे तयार झाली आहे. ह्या अत्यंत विशिष्ट रचनेमुळे महाराष्ट्रातील प्राचीन,मध्ययुगीन सर्व सत्ताधीशांचा भू-राजनैतीक इतिहासावर सह्याद्रीचा दूरगामी परिणाम झाला आहे.
"आक्रमणाय दुष्कर:, दुर्गम: इति दुर्ग" अशी सार्थ व्याख्या दुर्गांची केली जाते. दुर्ग हा प्राचीन,मध्ययुगीन राजव्य्वस्थेचा एक अविभाज्य भाग आहे. दुर्गांचे अतिप्राचीन अवशेष सापडतात ते "हडप्पा" संस्कृतीच्या अवशेषांमधे. हडप्पा नगराला ५४० बुरुज तसेच ८४ प्रवेशदरवाजे असलेल्या कोटाचे अवशेष सापडले आहेत.स्थलदुर्ग,जलदुर्ग,वनदुर्ग,मिश्रदुर्ग असे अनेक दुर्गांचे प्रकार असतानाही "गिरीदुर्ग" हे त्यांच्या अनेक गुणांमुळे सर्वश्रेष्ठ ठरतात. सह्यगिरीमधे तर दर दोन-चार शिखरांआड आपल्याला एक दुर्ग दिसतो. प्राचीन काळी सह्याद्रीच्या उंच शिखरांवर अनेक लेणी,गुहा ह्यांची खोदकामे झाली. असे अवशेष तर सह्यमंडळामधे ठायीठायी सापडतात उदा.कार्ले-भाजे लेणी,कोंडाणे लेणी(राजमाची किल्याजवळ) ह्यांचा उपयोग बहुतांशी बौद्ध तसेच वैदिक संप्रदायांनी आपल्या धार्मिक उपासना तसेच इतर सांस्कृतिक कारणांसाठी केला. पुढे ह्याच लेण्यांच्या परिसरामधे सातवाहन राजवटीपासुन दुर्गबांधणी सुरु झाली.(ई.स.पु २५० ते ई.स.२५०). सातवाहन हे सह्याद्रीमधे दुर्गांची निर्मिती करणारे सर्वात आद्य ञात राजकुल.
त्यांनी कोकणातील व्यापारी बंदरे( उदा शुर्पारक) आणि घाटमाथ्यावरील बाजारपेठा ह्यांना जोडणारे घाटमार्ग निर्मिले( उद. नाणेघाट) तसेच ह्या घाटमार्गावरील व्यापारी तांड्याचे रक्षण करण्यास तसेच जकात गोळा करण्यास घाटमाथ्याच्या पायथ्याशी तसेच घाटमाथ्यावर अनेक दुर्गांची शृंखलाच तयार केली.(उदा.नाणेघाटावर नियंत्रण ठेवणारा जीवधन किल्ला,बोरघाटावर नियंत्रण ठेवणारे राजमाची,लोहगड,विसापुर किल्ले) हे होते किल्ल्यांचे आद्यतम स्वरुप.
त्यानंतर सह्याद्री आणि दुर्गांचा घनिष्ठ संबंध आढळतो बाराव्या-तेराव्या शतकामधे "शिलाहार" राजवटीमधे. कोल्हापूर प्रांतावरील सत्ताधीश शिलाहार राजा भोज(दुसरा) ह्याची राजधानी "पर्णालदुर्ग" म्ह्णजेच आजच्या प्रसिद्ध पन्हाळगडावर होती.त्याने कोल्हापूर प्रांतामधे पर्णालदुर्ग,खेळणा,सामानगड ई.सुमारे १२ किल्ले वसवल्याच्या उल्लेख एका जुन्या ताम्रपटामधे आढळतो. यादव साम्राज्याचा अंतानंतर बहमनी साम्राज्या पुढे त्याची शकले होउन स्थापन झालेल्या ५ शाह्यांनी( आदिलशाही,निजामशाही,कुतुबशाही,बरीदशाही,ईमादशाही) आपली प्रमुख केंद्रे दख्खनच्या सपाटीच्या प्रदेशामधे नेल्यामुळे सह्याद्रीतील दुर्गांवर त्यांचे दुर्लक्ष झाले. परिणामी सह्याद्रीमधील अनेक दुर्ग स्थानिक मांडलीक सत्ताधार्‍यांच्या ताब्यात राहीले. ह्या ३०० वर्षांच्या अंधकारमय काळांनतर सह्याद्रिचे भाग्य उजळवले ते शिवाजी महाराजांनी. त्यांनी ह्या अजिंक्य सह्याद्रीच्या आश्रयाने राजगड,तोरणा,प्रतापगड असे बळीवंत दुर्ग बांधुन स्वराज्याची मुहुर्तमेढ रोवली. पुढे औरंगझेबाचा तब्ब्ल २५ वर्ष अंत ह्याच "मेजर सह्याद्रीच्या" साह्याने मराठ्यांनी पाहीला. पेशवाईमधे स्वराज्याचे मराठी साम्राज्यामधे रुपांतर झाल्याने किल्ल्यांकडे महत्व थोडे ऊणावले. दिवे घाटावरील सोनोरी उर्फ "मल्हारगड" हा सह्याद्रीमधे बांधला गेलेला शेवटचा गिरिदुर्ग. पण पेशवाईच्या शेवटी इंग्रजांविरुद्धच्या अखेरच्या संग्राममधे मराठी साम्राज्याला वाचवण्याची शेवटची पराकाष्ठा केली ती ह्याच दुर्गांनी.

तर असा हा मेजर सह्याद्री दक्षिणोत्तर ११०० मैल अभंगपणे पसरला (अपवाद दक्षिणेकडे पालघाट येथे सह्याद्री जवळ्जवळ ३२ किमी खंडित)आहे. भौगोलिकदृष्ट्या त्याला "पश्चिम घाट" म्हणतात. घाटमाथ्याजवळ सह्याद्रीची उंची जास्त म्हणजे जवजव्ळ १०००मी आहे तर पूर्वेकडे उंचीचे वितरण कमी होत जाते.(२००-४००मी) महाराष्ट्र राज्यामधे मुख्य दक्षिणोत्तर सह्याद्रीला काटकोनात असलेले पूर्व दिशेला जाणारे ३ मुख्य फाटे फुटलेल आहेत आणि त्यामधे अनेक मह्त्वाचे दुर्ग वसलेले आहेत.

१)सातमाळा डोंगररांग :

ही सर्वात उत्तरेला असणारी डोंगररांग आहे. हिच्या उत्तरेला तापी तर दक्षिणेला गोदावरी नदीचे खोरे आहे. ह्या रांगेमधे पहिला किल्ला आहे तो हातगड. हातगड,अचला,अहिवंत,सप्तशृंग,रवळा-जवळा,कण्हेरा,धोडप कांचना ई किल्ले येतात. हा प्रांत नाशिक मधील बागलाण प्रांतामधे येतो. धोडप किल्ल्याची कातळभिंत (DYKE) लक्षणीय आहे. ह्या प्रांतातील किल्ल्यांची सरासरी उंची जास्त आहे. आरोहण मार्ग सुद्धा तुलनेन दुष्कर आहेत. उत्तरेकडून येण्यार्‍या आक्रमकांना दख्खनच्या पठारावर येण्यास रोखणारी संरक्षणाची पहिली फळी म्हणून ह्या रांगेचे विशेष महत्व आहे.

२)बालाघाट डोंगररांग:

सातमाळ्याच्या दक्षिणेला ही रांग आहे. उत्तरेचे गोदावरी आणि दक्षिणेचे भीमा नदीचे खोरे ही रांग अलग करते. ह्या रांगेत रायरेश्वर पठार, रोहीडा,केंजळगड,पुरंदर,वज्रगड पासून थेट भुपाळगडपर्यंत किल्ले समाविष्ट होतात.

३)शंभु-महादेव डॊंगररांग:

बालाघाट रांगेच्या दक्षिणेला ही रांग आहे. हिच्या उत्तरेला भीम तर दक्षिणेला कृष्णा नदीचे खोरे आहे.महिमानगड,वारुगड,संतोषगड,वर्धनगड,सज्जनगड इ. किल्ल्यांचा ह्या रांगेमधे समावेश होतो.

ह्या खेरीज सातमाळा आणि बालाघाट ह्या रांगाच्या मधे असलेल्या अनेक लहान लहान नद्यांची खोरी तयार झालेली आहेत त्यांना "मावळ" असे म्ह्णतात. पुण्याजवळ १२ मावळ आहेत. सर्वात उत्तरेचे आंद्रा नदीच्या खोर्‍यातील आंदरमावळ ज्यात राजमाची किल्ला येतो. त्यानंतर नाणेमावळ(लोहगड-विसापूर),पवनमावळ(तुंग-तिकोना),कोरबारस मावळ( कोरीगड),कर्यातमावळ(सिंहगड),गुंजवणी नदीच्या खोर्‍यातील गुंजण मावळ(राजगड),कानंदी नदीचे कानद खोरे(तोरणा किल्ला) ,हिरडस मावळ(मोहनगड) इ. प्रमुख मावळांचा समावेश होतो.(ह्यांच्या अचूक सीमारेखांसाठी पहा- राजा शिवछत्रपती-गजानन मेहेंदळॆ) हेच शिवाजी महाराजांच्या राज्याचे हृदय होते. ह्याखरीज जुन्नरजवळ देखील अशीच मावळे आहेत.

कोकणप्रांत:

सह्याद्रीच्या पश्चिमेला पूर्वेसारख्या लक्षवेधी रांगा नाहीत अपवाद फक्त माथेरान डोंगर रांगेचा! ह्या रांगेमधे चंदेरी-विकटगड-प्रबळगड-इरशाळगड ह्या किल्ल्यांचा समावेश होतो.
कोकणात जिथे समुद्राला नद्या मिळतात त्या खाडीच्या मुखाशी अनेक प्राचीन काळपासुन बंदरे होती त्यांच्या रक्षणासाठी किल्ल्यांची प्रामुख्याने कोकणामधे बांधणी झालेली दिसते.
जसे की अर्नाळा किल्ला वैतरणा खाडीच्या मुखाशी आहे. तळेगड-घोसाळेगड मांदाडची खाडी नियंत्रणासाठी मह्त्वाचे आहेत. धरमतरच्या खाडीवर लक्ष ठेवणारा द्रोणगिरी किल्ला आहे.
ह्याखेरीज काही किल्ले ऐन सह्याद्रीच्या कण्यावर अत्यंत मह्त्वाच्या जागी वसलेले आहेत जसे की विशाळगड किल्ला आंबा आणि अणुस्कुरा घाटाच्या बरोब्बर दरम्यान अतिदुर्गम जागी वसलाय. कुर्डुगड(विश्रामगड),प्रचितगड हे सुद्धा सह्याद्रीच्या ऐन धारेवर वसलेले मोकयाचे किल्ले आहेत. ह्याशिवाय रायगड हा किल्ला अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्याचा आकार चौरंगासारखा आहे. तो सह्याद्रीच्या मुख्य रांगे पासून पुर्ण सुटावलेला एकांडा शिलेदार आहे!

उपसंहार:

सह्याद्रि इतकी किल्ल्यांची विविधता जगामधे इतरत्र कॊठेही नसेल! घाटमाथ्यावरील किल्ले, खाडीच्या मुखावरील किल्ले, ऐन सह्यकण्यावरील किल्ले..सह्यपठारवरील किल्ले..सह्याद्रीच्या उपरांगांवरील किल्ले इतकी विपुलता आहे महाराष्ट्राच्या दुर्गसंपत्तीमधे ! ह्या इतका अवघड प्रदेशाचे खरे अंतरंग इतक्या शतकांनुशतकांनंतर शिवछत्रपतींनी ओळखुन सर्व प्रदेश बळकट किल्ल्यांनी बांधून अजिंक्य करुन टाकला. दुर्ग आणि सह्याद्री हे अद्वैत दृढ झाले ते खर्‍या अर्थाने शिवकाळामधे. म्हणुन सह्याद्री हा नुसता दगड नाही राहिला तर तो शतकानुशतके आपल्या अंगाखांद्यावर अभिमानाची ही दुर्गबिरुदे मिरवत सार्थपणे दुर्गराज आणि स्वातंत्र्यात्मा बनला आहे.. !

गुलमोहर: 

छान.. Happy लिखाणासाठी संदर्भ कोणते घेतलेत हे लिहिले तर आवडेल.

हे असे हवयं...

सह्याद्री नामा नग हा प्रचंड
हा दक्षिणेचा अभिमानदंड।
स्कंधावरी दुर्गम दुर्ग तयाच्या
हाती झळाळे परशु जयाच्या..

... सह्याद्री ग्रंथातुन साभार...

घेतलेले संदर्भ :
१)डोंगरयात्रा - आनंद पाळंदे
२)भारत इतिहास संशोधक मंडळामधे श्री. सचिन जोशी ह्यांनी ह्या विषयावर दिलेले व्याख्यान.
३)आंतरजाल

छान Happy