मी ऐकलेले मेहदी हसन

Submitted by जयन्ता५२ on 14 June, 2012 - 04:55

मी ऐकलेले मेहदी हसन

सुदैवाने १९७४-७५ साली मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात मेहदी हसन याचीप्रत्यक्ष मैफल एकण्याचा योग मला आला. या कार्यक्रमाला मा. गुलजार प्रमुख पाहुणे होते.
आजही त्यांचे मधाळ,भान विसरायला लावणारे सूर कानात घोळत आहेत व आज ते जास्तच आर्त वाटत आहेत.त्यांनी अनेक लोकप्रिय व काही अनवट गझला पेश केल्या. त्यात 'रंजिश ही सही' गातांना काही नवीन शेर सादर केले. मध्येच थांबून ते म्हणाले " आज इस गझल के कुछ नये शेर पेशे खिदमत है.. जो आप की 'टेपो'मे नही हो.. ". असे म्हणून त्यांनी 'कुछ तो मेरे पिंदारे मुहब्ब्त का भरम रख" या मिसऱ्याचा शेर व आणखी एक शेर ऐकवला. त्यांचं बोलणं अत्यंत आदबशीर व मृदू होतं.

गझलेला सुरवात करण्याआधी ते गझल ज्या रागात बांधली असेल त्या रागात बहारदार आलापी करत व तिथेच टाळ्या घेत.अनेकदा त्यांनी त्या रागाची बंदीश किंवा खयालच ऐकवावा असे वाटत राही. (नंतर अनपेक्षितपणे ही इच्छाही त्यांनी छोटीशी एक बंदीश गाऊन पूर्ण केली.) त्यांच्या गायकीत त्यांचा रियाज व सूरांवरची हुकुमत पदोपदी जाणवत असे. प्रत्यक्ष गझल गातांना मध्येच,त्या गझलेचा मूळ रागाबरोबरच, इतर रागातून लीलया व हळूवारपणे फिरून येत. कधी कधी तर पेटीवरील त्यांच्या बोटांतून निघणारी सुरावटच दाद घेऊन जाई.

'ये धुआं कहासे उठता है' ही गझल गातांना तो वळणे घेत घेत ("स्पायरल की तरह") वर जातो असे सांगत त्यांनी 'धुआं' या शब्दावर अशा काही 'गिरक्या' घेत आलापी केली की आठवून आज मन व डोळे भरून येतात‌. त्या दिवशी शेवटी त्यांनी ऐकवलेल्या गझलचे शब्द आठवतात.....

"आखिर क्या मुझको परखने का नतीजा निकला
दर्दे दिल आप की नजरोंसे भी गहरा निकला
तिशनगी* जमीं रही मेरे ओठोपर पत्थर की तरहा
डूबकर भी तेरे दरियामें मै प्यासा निकला"

सच है, मेहदी साब, आप निकल गये और हम प्यासेही रह गये......

--- जयन्ता५२

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

OMG!!! हा कार्यक्रम ७७-७८ मधे झाला होता नं?.. कारण आम्हीही तिथे उपस्थित होतो.. आता साल नक्की मलाही आठवत नाहीये.. आठवतात फक्त मेहदी हसन..
हा कार्यक्रम संपल्यावरआम्ही सर्वच भारावलेल्या ,संमोहिते अवस्थेत बाहेर पडताना गर्दीतून कुणीतरी म्हटले,' कश्मीर ले लो और बदलेमे हमे मेहदी हसन दे दो'!!! Happy

त्यांची आत्ताची तब्येत इतकी वाईट झाली होती कि ते आपल्या आसपासच्या लोकांना नक्कीच म्हणाले असतील,' शोला था जल चुका हूं,हवाएं मुझे न दो, मै कब का जा चुका हूं, सदाएं मुझे न दो'... Sad

OMG!!! हा कार्यक्रम ७७-७८ मधे झाला होता नं

शक्य आहे.आता ३३-३४ वर्ष झाली त्यामुळे माझी चूक झाली असावी. बहुतेक हा कार्यक्रम ७७-७८ मधे झाला होता.
चू भू दे घे.
धन्यवाद
जयन्ता५२