त्यांच्या चष्म्यातून- भाग १. - कुरुंदकरांचा अकबर

Submitted by डॉ. अभिराम दीक्षित on 12 June, 2012 - 07:29

त्यांच्या चष्म्यातून

माझ्या लहानपणी मिस्टर इंडिया नावाचा एक सिनेमा आला होता. हातात वैज्ञानिक जादूचे घड्याळ बांधून अनिल कपूर अद्रुष्य व्हायचा. काहि केल्या तो मोगँबोला दिसायचा नाही. मग मोगँबो लाल काचेच्या चश्म्यातून बघायचा. अनिल कपूर दिसायचा. आपण चश्म्याचा रंग बदलला की नजरेसमोरचे दृष्य बदलते. कविळ झालेल्याला पिवळे दिसते म्हणतात. परकाया प्रवेश करून - दुसर्‍याच्या नजरेतून तिसर्‍याकडे पहाण्याची तर मजाच काही और आहे. असे करताना लेखकाने लिहिलेल्या शेकडो पानातून त्याचा द्रुष्टीकोन समजून थोडक्यात मांडणे आणी मूळ लेखकाच्या / विचारवंताच्या खुसखुशीत शैलीला धक्का लागू न देणे; ह्या दोन्ही जवाबदार्‍या पार पाडण्याचा आमचा मानस आहे.
**********************************************************************************************************

त्यांच्या चश्म्यातून - भाग १. - कुरुंदकरांचा अकबर
(संदर्भ : आकलन, जागर, शिवरात्र)

धर्मवेडा तुर्की बाबर पनिपताची पहिली लढाई जिंकला. संग्रामसिंग विरुद्धच्या या लढाईला तो जिहाद म्हणत असे. आपला इस्लाम धर्म इतरांच्यावर लादणे हा त्याला आपला हक्क वाटत असे. हिदुस्थानचा हा पहिला तुर्की राजा. त्यामागे त्याचे बावळट पोर हुमायुन गादीवर बसले. राज्य संभाळता न आल्याने ते आपला जिव वाचवत पळत होते. त्या धवपळीच्या कालखंडात १५४२ साली त्याला मुलगा झाला. अबुल मुताह जलालुद्दीन महमद अकबर.

या परदेशी रक्ताच्या अकबराचे अनघा नावाच्या भारतीय दाईने संगोपन केल्याची नोंद आहे. १३ व्या वर्षी तो राजा झाला. पण राजधानीच न्हवती. दिल्लीचा ताबा त्यावेळी हिमू या पराक्रमी हिंदू राजाकडे होता. तो स्वत:ला विक्रमादित्य म्हणवून घेत असे. त्याने स्वतःचे हिंदू राज्य निर्माण केले होते. अकबराचा आणि त्याचा संघर्ष अटळ होता. पनिपतचे दुसरे युद्ध झाले. केवळ दैवयोगाने अकबराने ही लढाई जिंकली. हीमू काफराचे स्वतःच्या हाताने मुंडके उडवले. काफिरांना ठार करणारा धर्मयोद्धा म्हणून - गाझी - ही इस्लामी धर्मशास्त्रातली पदवी स्वतःला लावून घेतली. त्यावेळी अकबराचा मार्गदर्शक होता. - बहरामखान.

अकबर हा काही दयाळू संत न्हवे. सदगुणांचा पुतळा ही न्हवे. तो मध्ययुगातला विचारी राजा आहे. आणी नव्या अनुभवानी.... नव्या विचारानी माणसे बदलतात.... याचे उदाहरण आहे. पुढे मार्गदर्शक बहरामखानाशी अकबराचे वाजले. मग बहरामखानाची हकालपट्टी झाली. १५६२ सालपासून - वीस वर्षांच्या अकबराच्या स्वतंत्र कार्यकर्तुत्वाला आरंभ होतो. त्यावेळी तो पुत्रप्राप्तीसाठी आतुर होता. दरसाल अजमेरची यात्रा करत होता. पुत्रप्राप्तीसाठी यात्रा - जत्रा हा काही मोठा पुरोगामी द्रुष्टीकोन न्हवे ; पण अशा प्रकारची तर्कातीत धर्मश्रद्धा त्यावेळी सार्वत्रिक होती. अशाच यात्रेत राजा बिहारीमलची कन्या जोधाबाईशी अकबर लग्न करतो. त्याआधी तिला मुसलमान करून घेतो. हेही पुरोगामीपणाचे द्योतक न्हवे. तुर्की रक्ताचा अभिमान गळून पडलेला आहे पण विशीतला अकबर अजूनही धर्मनिष्ठ मुसलमान आहे. उदारमतवादी मुसलमान व्हायचे की धर्मपिसाट मुसलमान व्हायचे हे दोनच पर्याय अकबरापाशी आहेत. जोधाबाईशी झालेल्या लग्नानंतर अकबर पहिला पर्याय निवडतो.

राजपूत विषयक अकबराच्या धोरणातला बदल इथपासून सुरू होतो. राजपूतांना सन्मानाने वागवणे. त्यांना मुसलमानांपेक्षा वरच्या हुद्द्यावरच्या जागा देणे वगैरे गोष्टी सुरू होतात. त्यावेळच्या काळाचा विचार करता ह्याला थोडाबहुत पुरोगामीपणाच म्हणावे लागते. त्याकाळात गोव्यातले पोर्तुगीज रक्तरंजित इन्विझिशन मधे मग्न आहेत. राणी एलिझाबेथ च्या इंग्लंडमधे - चर्चमधे उपस्थित राहण्यासाठी आयरिशांना कर द्यावा लागतो आहे. हिंदू धर्मपंडितात एकाहून एक कर्मठ भूमिका घेण्याची चढाओढ आहे. त्या काळातला अकबराचा हा मर्यादित उदारमतवाद आहे.

नंतर अकबर पुढचे पाउल टाकतो; आणि मुल्लामौलवी बिथरतात. "युद्धात जिंकलेल्या हिंदूना सक्तीने मुसलमान करण्यात येणार नाही" असा सरकारी आदेश अकबर काढतो. या आज्ञेने मौलवी चिडणे स्वाभाविक होते. मुस्लिम धर्मशास्त्रानुसार मुसलमान फक्त दोन कारणांसाठी लढतो. एकतर काफिरांनी त्रास दिल्यास करायचा जिहाद किंवा भविष्यात त्यांचा त्रास होउ नये म्हणून आधीच केलेला जिहादी हल्ला. हा हल्ला करताना; एकमेव सत्यधर्माचा - इस्लामचा प्रचार जगभर करण्याचे ध्येय ह्रुदयात बाळगायचे असते. बिगर मुस्लिमांशी होणारे प्रत्येक युद्ध हे धर्मयुद्ध - जिहाद मानले जावे असा मौलवींचा कायम आग्रह असतो. दोन मुसलमान राजे आपापसात भांडले तरच ते खाजगी भांडण मानले जाते. अकबर म्हणतो - की माझ्या हिंदूंशी झालेल्या लढायांचा आणी इस्लाम धर्माचा काही संबंध नाही. लढाई ही खाजगी गोष्ट आहे.

हा इस्लामी धर्मशास्त्रात उघड हस्तक्षेप आहे. १५६२ साली त्याने अजून एक सरकारी आदेश काढून सदर उल सदरचे - इस्लामी धर्मपीठाचे अधिकार कमी केले. पण अकबर इतके करून थांबला नाही १५६३ साली त्यानी हिंदूंवर असलेला धार्मिक यात्राकर रद्द केला. त्यापुढे जाउन १५६४ साली झिजिया कर रद्द केला. हिंदूंच्यावर झिजिया कर लावावा का ? हा इस्लामी पंडितातला एक विवादास्पद मुद्दा होता.

जो इस्लामी देश आहे तो दार उल इस्लाम (शांतताभूमी) आहे. जो देश मुस्लीमांचा नाही तो दार उल हर्ब (युद्धभूमी) आहे. इस्लाम हा एकमेव सत्यधर्म असल्याने त्याचा प्रचार आवश्यकच. त्यासाठी दार उल हर्ब ला दार उल इस्लाम बनवण्यासाठी लेखणी; वाणी आणी तलवारीने जिहाद करणे हे प्रत्येक इमानदार मुस्लिमाचे कर्तव्य आहे. दार उल हर्ब मधले लोक ज्यू किंवा ख्रिस्ती असतील तर ते अहले किताबी होत. एकेश्वरवादी होत. त्यांना जमल्यास मुसलमान करावे किंवा सूट म्हणून त्यांवर झिजिया कर लावला पाहिजे. पारशी वगैरे अग्निपूजक काफिरांना ठार मारले पाहिजे अथवा मुस्लिम केले पाहिजे. इथपर्यंत मौलवींत एकमत होते. प्रश्न हिंदूंचा होता. मुहम्मदाला हे लोक माहित नसल्याने त्यांबद्दल कुराणात स्पष्ट उल्लेख नाही. पण हे लोक मूर्तिपूजक असल्याने त्यांना मारावे किंवा अल्लाच्या एकमेव सत्यधर्मात आणावे असे एक गट म्हणत असे. मौलवींचा दुसरा गट हिंदूंची मूर्तीपूजा वरवरची असून ते मूलतः एकेश्ववरवादी असल्याने त्यांना झिजियाची सवलत दिली पाहिजे असे प्रतिपादित करे. अकबराने दोघांचा गाशा गूंडाळला. इस्लाम धर्माची मूळची भूमिका शांतीचीच आहे असे तो म्हणू लागला. झिजिया सरळ माफ केला. अजून अकबर स्वतःला धर्मनिष्ठ मुस्लिम समजत असे.

तो नवा विचार करू पहात होता पण काळाच्या सर्व मर्यादा त्यालाही होत्या. १५६६ साली त्याने दुर्गावती राणीला युद्धात मारले. तिच्या सुनेला आणि बहिणीला पकडून स्वतःच्या जनानखान्यात टाकले. अकबराच्या अंतःपुरात ५००० स्त्रीया असल्याची नोंद आहे. तत्कालीन हिंदू राजांतही बहुपत्नित्व होतेच. महाराणा प्रतापाला ११ बायका होत्या. जितांच्या स्त्रिया जनानखान्यात घालण्याची प्रथा हिंदूतही होती. अकबर त्याच्या आज्या प्रमाणे विपुल प्रमाणात दारू पित असे. बापाप्रमाणे अफू घेत असे. आणी स्वतःचे वेगळे वैशिष्ट्य म्हणून सर्व मादकद्रव्ये एकत्र करून "सबरस" नावाचे पेय बनवून पीत असे. अकबराचा मोठेपणा सांगत असताना त्याची चैन, भोग, अतिरिक्त विलास नाकारण्याचे काहिच कारण नाही. १५६८ ला अकबराने चितोड जिंकले. हा आनंद साजरा करण्यासाठी पकडलेले ८००० राजपूत सैनिक मारले. त्यानंतर ३०,००० निरपराध नागरिकांची कत्तल केली. पण युद्धाला धार्मिक रंग येवू दिला नाही.

१५६३ ते १५६७ ह्या काळात अकबराच्या सन्निध्यात वेगवेगळे विद्वान आलेले दिसतात. प्रथम विरवर जो बिरबल या नावाने विख्यात आहे. राजा तोरडमल, राजा मानसिंग आणी वीरवर ह्या हिंदू मित्रांच्या सानिद्ध्यात एक वेगळाच अकबर आकारू लागला. अकबर स्वतः सुन्नी मुस्लिम असला तरी त्याचा लहानपण पासूनचा शिक्षक लतीफ कझवानी हा शिया मुस्लिम होता - त्याची धार्मिक भूमिका "सुलह ई कुल" या नावाने ओळखली जाते. साधारणपणे सर्वधर्म समभावाच्या जवळ जाणारी ही भूमिका आहे. अकबराच्या अंतःपुरातील हिंदू स्त्रियांचाही त्यावर प्रभाव पडत होता. मुख्य म्हणजे नव्या अनुभवातून नवे शिकण्याची.... स्वतःची मते बदलण्याची एक विलक्षण शक्ती अकबराजवळ होती. त्याकाळी ती दुर्मीळ होती.

१५७३ साली तो गुजराथला गेला. त्यावेळी एका पारशी धर्मपंडिताशी त्याची भेट झाली. मूळचे इराणचे पारशी अग्निपूजक असतात. सैतान हा अग्नीपासून बनलेला आहे असे कुराणात लिहिलेले आहे. अरबांनी इराण जिंक्ल्यानंतर सर्व देश मुसलमान करण्यात आला. धर्मासाठी जिव घेवून भारतात पळालेले लोक म्हणजे पारशी. दस्तूर मेहराजी राणा या पारशी धर्मपंडिताशी चर्चा केल्यानंतर अकबराने म्हटले - पारशी हा देखील एक इश्वरी धर्म आहे !

शीख धर्माकडेही अकबराचे लक्ष होते. गुरू अर्जुनसिंग यांच्याशी अकबराने अनेकदा चर्चा केली. गुरु ग्रंथसाहेब हाही एक दैवी धर्मग्रंथ आहे असे अकबर मानू लागला. धार्मिक विषयांवर चर्चा करण्याचा छंद अकबराला लागला आणि इबादतखान्याचा जन्म झाला. शिया, सुनी, पारशी, शीख, जैन, बौद्ध, वैष्णव, शैव असे वेगवेळ्या पंथांचे पंडित बोलावून इबादतखान्यात अकबर त्यांच्याशी चर्चा करू लागला. येथे चार्वाकाचे अनुयायी येवून गेल्याचे नोंद आहे. या चर्चात परस्पर मतांचे मंडन , खंडन होत असे. कफिरांना कुराणचे खंडन करायचा अधिकार देणे मौलवींना पटण्याजोगे न्हवते. हळूहळू सर्वच धर्म खरे आहेत अशा भुमिकेवर अकबर येवून पोचला.

सैन्याच्या हालचालींमुळे शेते तुडवली गेल्यास; नुकसानभरपाइ देण्याचा हुकुम अकबराने याच काळात काढला. पुढे मुस्लिम धर्मगुरूंचा ब्लास्फेमीचा अधिकार अकबराने काढून घेतला. इस्लामचे प्रेषीत मुहम्मद पैगंबर यांवर कुणी टीका केली तर मुसलमान ते सहन करू शकत नाहीत. अशी टीका करणार्यांचा छळ करण्याचा अधिकार मुस्लिम धर्मगुरूंकडे असतो. आजही सर्व मुस्लीम देशात हा कायदा आहे. १५७९ साली अकबराने हा कायदा रद्द केला.

राजा मानसिंग हा श्रद्धाळू वैष्णव होता. त्याने अकबराची वल्लभ संप्रदायाच्या संतांशी भेट घडवून आणली. भेटीनंतर अकबराने वृंदावनाच्या परिसरातले सर्व कर माफ करून टाकले. त्या परिसरात गोहत्याबंदीचा कायदा केला. १५८० साली अकबराने कायदा केला की - आजपर्यंत ज्याना जबरदस्तीने मुस्लिम करण्यात आले आहे - ते सर्व त्यांच्या मूळच्या धर्मात परत जाउ शकतात.

सुनी धर्ममतावर अकबराची फारशी श्रद्धा नाही असे शिया मुस्लिमांना वाटले. त्यांनी अकबराला शिया करण्याचा असफल प्रयत्न करून पाहिला. १५८० सालीच अकबराने ज्येसुईट मिशनर्यांना चर्चेसाठी बोलावले होते. अकबराला त्यांची स्वेच्छेने दरिद्री राहून आयुश्यभर जनसेवा करण्याची मिशनरी व्रुत्ती आवडली. पण मिशनर्यांचा प्रयत्न अकबराला ख्रिश्चन करण्याचा होता. त्याला मात्र अकबर बधेना. मिशनरी लिहितात - " अकबर हिंदूसारखा मिश्या ठेवतो. दाढी ठेवत नाही. तो सूर्याची पूजा करतो. तो नास्तिक आणी पाखंडी आहे. फाजील जिज्ञासा हे त्याचे वैशिष्ट्य आहे."

अकबराने ब्लास्फेमीचा कायदा रद्द केल्यामुळे मौलवी चिडले. त्यांनी अकबराविरुद्ध बंड केले. कलक्त्त्याला मोठे बंड झाले. अकबराचा पाडाव झाल्याशिवाय भारतात इस्लामला भविष्य नाही असे मौलवींना वाटत होते. त्यांनी अकबराला काफर म्हणून जाहीर केले आणी अकबराविरुद्ध जिहाद पुकारला. अकबराने उलेमा आणी मौलवींचे बंड क्रूरपणे चिरडले. अनेक शेख आणी फकीर हद्दपार केले. अनेकांना कंदाहरच्या बाजारात विकले. त्यांच्या दर्गे आणी मशीदिंच्या जमिनी जप्त केल्या. राजकीय गोंधळ घातल्यास वक्फ च्या जमिनी जप्त करणारा आणी इस्लामी धर्मवेड्यांना गुलाम करून कंदाहरच्या बाजारात विकणारा, अकबर हा पहिला आणी शेवटचा भारतीय.

अकबराला सुन्नी रहाण्यात रस राहिला न्हवता. त्याला शिया व्हायचे न्हवते. त्याला ख्रिश्चन बनवण्याचे मिशनर्यांचे सर्व प्रयत्न फसले होते. हिंदूत धर्मप्रसाराची सोयच न्हवती ! अकबराच्या डोक्यात वेगळीच चक्रे फिरत होती. त्याने सगळ्या धर्मचर्चा ऐकल्या होत्या. बर्या वाइट गोष्टी सगळ्याच धर्मात असतात असे त्याला वाटू लागले. वाईट गोष्टी टाळून सगळ्याच धर्मातल्या चांगुलपणा एकत्र केला तर ? दीने इलाही चा जन्म होत होता.

(या इलाही इलिल्लाही; मुहम्मद रसूलिल्लाहि.) अल्लाह एकच आहे. आणी मुहम्मद हा त्याचा शेवटचा प्रेषीत आहे हा इस्लामचा मूलभूत नियम आहे. अकबराने हा नियम मोडला आणी स्वतःलाच पुढचा प्रेषीत जाहीर केले. वेद; रामायण महाभारत यांची फारसीत भाषांतरे करून तो अभ्यासू लागला. त्याला आता एक परिपूर्ण आणी नवा असा धर्म - दीने इलाही बनवायचा होता.

मुस्लिमांच्या शाळातून, मदरशातून त्यावेळी प्रथम अरबी भाषा आणी नंतर धर्मशास्त्रांचा अभ्यास होत असे. अकबराने अशी भूमिका घेतली की या फालतू अभ्यासात काय अर्थ आहे ? शाळातून इतिहास, तत्त्वज्ञान, गणीत, वैद्यक, ज्योतिष याचा अभ्यास झाला पाहिजे. एका अर्थाने आधुनिक अभ्यासक्रमाची भूमिका आहे.

१५८४ नंतर अकबर अश्रद्ध बनत चालला. कुराणात लिहिलेले सर्व चमत्कार खोटे आहेत असे म्हणू लागला. एका स्त्री चा चेहरा आणी मोराचे पंख असलेल्या घोड्यावर बसून प्रेषीत मुहम्मद स्वर्गात जावून अल्लाहशी बोलले असा उल्लेख कुराणात आहे. अकबराला हा चमत्कार अमान्य होता. ख्रिस्ती मिशनर्यांसमोरच्या चर्चेत अकबराने ही भाकडकथा आहे असे म्हटले. पण हेच नियम अकबर बायबल मधल्या चम्त्काराना लावू लागला तेंव्हा मिशनर्यांनी त्याला पाखंडी ठरवले. त्यापुढे जावून त्याने सर्वच धर्मातले सर्वच चमत्कार खोटे आहेत अशी भुमिका घेतली. पुढे जावून तो म्हणू लागला सर्वच धर्म मानवाने निर्माण केलेले आहेत. म्हणून काळानुसार धर्मात बदल केले पाहिजेत. त्याने नियम केला की पती पत्नीत १२ वर्षापेक्षा अधिक अंतर असता कामा नये. हा नियम खुद्द प्रेषितांच्या लग्नांच्या विरोधात होता. त्यांची एक पत्नी पंचेचाळीस वर्षानी लहान होती.अनेक लग्ने केलेल्या अकबराला आता एकपत्नित्व हवे होते. १५८२ नंतर त्याने आणखी लग्ने केली नाहीत. हिंदू आणी मुसलमान अशा दोघांनाही समान नागरी कायदा - एकपत्नित्वाचा कायदा लागू केला. हा तत्कालीन हिंदू आणी मुसलमान अशा दोन्ही धर्मातला हस्तक्षेप होता. त्याने स्क्तीने सती जाण्यावर बंदी घातली. विधवांना पुनर्विवाहाची परवानगी असावी असे त्याला वाटत होते. मुलगा १२ व्या वर्षी सज्ञान होतो; तेंव्हा त्याच्या परवानगीनेच त्याची सुंता १२ वर्षी करावी असा कायदा तो आणू पहात होता.

दिने इलाहीच्या स्थापने बरोबरच अकबराने जाहिर केले - समाजाच्या भल्यासाठी धर्मात हस्तक्षेप करणे हा राजाचा अधिकार आहे.

त्याने जनतेचे भले करणारे कायदे त्याने धर्मात हस्त्क्षेप करून लादले. अकबराच्या दिने इलाही या नव्या धर्माला पंचवीस हून कमी अनुयायी मिळाले. त्याने त्याचा नवा धर्म कोणावरही लादला नाही. मुल्ला मौलवींना कंदाहरच्या बाजारात विकणार्‍या अकबराला ते अवघड न्हवते. . हा एकप्रकारचा चमत्कार होता. सेक्युलर हा शब्द जन्मण्या आधी हे घडत होते. फ्रेंच राज्यक्रांती घडायला अजून २०० वर्षांचा अवकाश होता.

गुलमोहर: 

मायबोलीवर स्वागत.
लेख आवडला.
ऊगाच अमूक एका धर्मात जन्म झालाय म्हणून त्या धर्माचा व्यर्थ अभिमान बाळगणार्या आजच्या मॉडर्न पिढीपेक्षाही स्वानुभवाने धार्मिक मते बनवणारा अकबर काळाच्या पुढे होता असे वाटते.

(ती लवजिहादची क्रमशः गोष्ट पूर्ण करा ना ! )

दीने इलाही अजूनही अस्तित्वात आहे काय? >> अकबरासोबतच संपला. त्याला प्रेषित म्हणून म्हणवून घ्यायचे वेड होते.

अकबरला हे उमगले होते की राजपूतांना धरून राहिले तरच त्याचे राज्य राहील अन्यथा नाही. ह्या आणि नेमक्या ह्याच राजकीय कारणामुळे त्याला नमते घेणे आवश्यकच होते. (औरंगजेबापर्यंत सगळे बदलले) त्यामुळे त्याच्या दरबारात (अन पुढेही) राजपूत असत. पण त्यामुळे झाले काय की महत्वाचे मांडलिक पद असल्यामुळे कुठल्याही राजपुताला ( एक राणा प्रताप) सोडून आपले राज्य स्वतंत्र ठेवावे असे औरंगजेबाची पिढी येईपर्यंत वाटेनासे लागले.

पूर्वीची हिंदू मुस्लीम युद्ध ही केवळ युद्ध म्हणून मुस्लीम सत्ताधारी पाहत नसत तर धर्मप्रसार म्हणून पाहत असत. हे कुरूंदकरांनीपण (कारण ते आजच्या भाषेत हिंदूत्ववादी नव्हते) अनेकदा नमूद केले आहे.

शिवरायांचा आठवावा प्रताप हे त्यांचे पुस्तक अन अर्थातच श्रीमान योगीची प्रस्तावना वाचली तरी त्यांची इतिहासातील झेप लक्षात येऊ शकते.

मुख्य म्हणजे नव्या अनुभवातून नवे शिकण्याची.... स्वतःची मते बदलण्याची एक विलक्षण शक्ती अकबराजवळ होती. त्याकाळी ती दुर्मीळ होती.>>> अचूक!
तो नवा विचार करू पहात होता पण काळाच्या सर्व मर्यादा त्यालाही होत्या.>>> हे अत्यंत महत्वाचे वाक्य आहे. सर्वच ऐतिहासिक व्यक्तिंबद्दल एवढे जरी लक्षात ठेवले तर अभिनिवेशविरहीत विचार करता येईल.
उत्तम लेख!
सातीला अनुमोदन!

अभिरामजी,
अकबराबद्दल नरहर कुरुंदकरांनी लिहिलेल्या माहितीचे उत्तम संकलन करून माहिती दिल्याबद्दल हार्दिक धन्यवाद!
या माहितीवरून तुर्कस्तानच्या केमाल पाशाची आठवण आली.
पण सध्याचे पुरोगामी, समाजवादी, सेक्युलरवाद्यांना अकबराने सुधारणांसाठी धर्मात केलेल्या हस्तक्षेपाची आठवण कधी होतांना दिसत नाही याचे आश्चर्य वाटते. समाजवादी कुरुंदकरांना ती झाली हा अपवाद!

फार छान माहिती. घडामोडी सगळ्या माहित होत्या पण अकबराची भूमिका कळण्यास खूप मदत झाली.
अकबराएवढे चक्रवर्ती, प्रजेचा कैवार घेणारे आणि धर्म व मानवतेचा वैचारिक अंगाने विचार करणारे म्हणून प्रसिद्ध नसले तरी टिपू आणि सिराजऊदौला बद्दलही वाचायला आवडेल.

ह्म्म्म त्या सर्व मुसलमानी राजवटीच्या माळेत अकबर हा एक मणी वेगळा होता खरा. त्याची बरीचशी माहिती मिळाली या लेखातुन. धन्यवाद !
जरी धर्माभ्यासाची कितीही आवड असली तरी तो एक जुलमी राज्यकर्ता होता हे विसरू नका.

अभिराम, छान लिहिलंय Happy

आगाऊ +१, कुरुंदकरांनी हेच वाक्य शिवाजीचं विश्लेषण करतानाही वापरलंय. इतिहासचिकित्सेमधला हा एक सर्वमान्य मूलभूत मापदंड आहे. दुर्दैवाने महाराष्ट्रात राजवाड्यांनंतरच्या/ स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासकारांनी इतिहाससंशोधनाच्या कार्यपद्धतीवर (मेथडॉलॉजी) फार कमी भाष्य केलंय. त्यामुळे सर्वसामान्यांपर्यंत या विश्लेषणाच्या चौकटी/ परिमाणं पोचतच नाहीत....

>>१५८४ नंतर अकबर अश्रद्ध बनत चालला. कुराणात लिहिलेले सर्व चमत्कार खोटे आहेत असे म्हणू लागला. एका स्त्री चा चेहरा आणी मोराचे पंख असलेल्या घोड्यावर बसून प्रेषीत मुहम्मद स्वर्गात जावून अल्लाहशी बोलले असा उल्लेख कुराणात आहे. अकबराला हा चमत्कार अमान्य होता. ख्रिस्ती मिशनर्यांसमोरच्या चर्चेत अकबराने ही भाकडकथा आहे असे म्हटले. पण हेच नियम अकबर बायबल मधल्या चम्त्काराना लावू लागला तेंव्हा मिशनर्यांनी त्याला पाखंडी ठरवले. त्यापुढे जावून त्याने सर्वच धर्मातले सर्वच चमत्कार खोटे आहेत अशी भुमिका घेतली. पुढे जावून तो म्हणू लागला सर्वच धर्म मानवाने निर्माण केलेले आहेत. म्हणून काळानुसार धर्मात बदल केले पाहिजेत. <<

अकबराचा सेक्युलरवाद मुसलमानांनी तर नाकारलाच पण आजच्या स्वयंघोषित तथाकथित पुरोगामी इ. लोकांना पण पचलेला दिसत नाही. त्यांचे तोंडी अकबर सहसा असत नाही.
याउलट याबाबतीत सावरकरांचे विचार आणि अकबराचे वरील विचारात विलक्षण साम्य दिसते. दीर्घकाळ राजा असूनही त्याला त्याचे हे विचार रुजवता आले नाहीत हे दुर्दैवच!

अभिरामजी,
आपला मायबोलीवरील हा पहिलाच लेख असावा.
खूप आवडला.
लेखाच्या शीर्षकातील 'चश्म्या' ऐवजी 'संपादन' करून 'चष्म्या' करता आल्यास पाहावे.

Pages