मेनोपॉज-३ : शरीराला होणारे धोके - हाडांची झीज (ऑस्टिओपोरॉसिस)

Submitted by रुणुझुणू on 12 June, 2012 - 06:49

इस्ट्रोजेनच्या कमतरतेमुळे शरीरावर होणारे परिणाम आणि त्याची लक्षणे मागच्या लेखात आपण पाहिली.

शरीरातील काही अतिशय महत्वाच्या संस्थांवर इस्ट्रोजेनच्या अभावाचे दूरगामी परिणाम होतात आणि त्यामुळे गंभीर आजार उद्भवू शकतात.

मेनोपॉजमुळे शरीराला कोणते धोके निर्माण होऊ शकतात ?

१. ऑस्टिओपोरॉसिस (Osteoporosis) म्हणजेच हाडे ठिसूळ होणे
२. हृदयविकार
३. युरिनरी इनकॉन्टिनन्स (Urinary incontinence) म्हणजे आपोआप लघवी होणे

ह्या लेखामध्ये ऑस्टिओपोरॉसिसबद्दल आपण जरा विस्ताराने पाहू या.

ऑस्टिओपोरॉसिस (Osteoporosis) म्हणजेच हाडे ठिसूळ होणे

भारतात हाडे ठिसूळ होऊन मोडण्याचे प्रमाण दर पाच स्त्रियांमागे एक इतके जास्त आहे. आणि हा धोका मुख्यत्वे मेनोपॉजनंतर वाढतो.

bone-mass-graph.gif

Osteoporosis शब्दातील Osteo म्हणजे हाड आणि porosis म्हणजे चाळणीसारखं सच्छिद्र होणे.

आपल्या शरीरातील हाडे ह्या जिवंत पेशी असतात. त्यांची वाढ होत असते, झीज होत असते.
ह्याला "बोन रिमॉडेलिंग (Bone remodelling)" असे म्हणतात.

ज्या पेशी हाडांच्या वाढीसाठी कारणीभूत असतात त्यांना ऑस्टिओब्लास्टस (Osteoblasts) असे म्हणतात. आणि ज्या पेशी हाडांच्या जीर्ण झालेल्या थरांना काढून टाकतात त्यांना ऑस्टिओक्लास्टस (Osteoclasts) असे म्हणतात.

हाडे मजबूत राहण्यासाठी ह्या दोन पकारच्या पेशींच्या कार्यामध्ये समतोल राहणं अतिशय आवश्यक असतं.

शरीरातील जास्तीतजास्त (सुमारे ९९%) कॅल्शिअम हाडांमध्ये साठवलेलं असलं तरी त्याची रक्तासोबत देवाणघेवाण होत असते.

असं समजूया की, हाडे ही कॅल्शिअमची बँक आहेत.
जेव्हा रक्तामध्ये इतर पेशींच्या गरजेपेक्षा जास्त कॅल्शिअम येतं, तेव्हा ते हाडांमध्ये जमा केलं जातं....
"फिक्स्ड डिपॉझिट" .....ज्यावेळी रक्तामध्ये कॅल्शिअमचं प्रमाण कमी होतं तेव्हा मात्र हे फिक्स्ड डिपॉझिट मोडावं लागतं.
आणि शरीराने खात्यात काही जमा न करता फक्त डिपॉझिट मोडण्याचा सपाटा चालू ठेवला तर.....अर्थातच बँकेचं दिवाळं निघेल !

पण हाडे आणि दात ह्याव्यतिरिक्त शरीराला कॅल्शिअम लागतंच कशाला ?

कॅल्शिअम हा आपल्या शरीराच्या होमिओस्टॅसिस (Homeostasis) ( मराठी प्रतिशब्द ?) मध्ये लागणारा अत्यंत महत्वाचा घटक आहे.
स्नायूंच्या आकुंचनासाठीसुद्धा कॅल्शिअम लागतं.
उदा.- हृदयाच्या स्नायूंना कॅल्शिअम मिळालं नाही तर हृदयाचा पंप बंद पडू शकतो !
रक्तवाहिन्यांमध्येही स्नायू असतात. त्यांच्या आकुंचन-प्रसरणामुळे रक्तदाब योग्य पातळीत ठेवला जातो. आणि ह्यासाठी कॅल्शिअम हवंच.

..... मुलांच्या शिक्षणासाठी तुम्ही बँकेत एफ डी केली....पण जर घरातल्या एखाद्या व्यक्तीला काही गंभीर आजार निघाला, आणि त्यासाठी मोठी रक्कम लागणार असेल तर तुम्ही मागचापुढचा कसलाही विचार न करता शिक्षणासाठी ठेवलेली एफ डी मोडाल की नाही ?
शिक्षण महत्वाचे आहेच...पण जीव वाचवणे जास्त महत्वाचे !

शरीरातही अगदी असंच होतं.
कॅल्शिअम हाडांच्या मजबूतीसाठी आवश्यक आहे, ते कमी झालं तर हाडे कमकुवत होऊन मोडतील ........मान्य....पण जर कॅल्शिअमच्या अभावी रक्तवाहिन्या, हृदय ह्यांचं काम ठप्प झालं तर ??

शरीर हा धोका स्वीकारत नाही.
रक्तातील कमतरता हाडांमधून कॅल्शिअम काढून पूर्ण केली जाते. आणि परिणामी हाडे ठिसूळ बनतात !

porous bones in osteoporosis.jpgपण मग ह्या सगळ्याचा इस्ट्रोजेनशी काय संबंध ?

आत्तापर्यंत तुमच्या लक्षात आलंच असेल की, इस्ट्रोजेन हे पुलंच्या "नारायणा" सारखं सगळा मंडप स्वतःच्या खांद्यावर वागवत असतं...

इस्ट्रोजेन हाडांमध्ये जास्तीत जास्त कॅल्शिअम साठवून ठेवण्यासाठी मदत करतं....अर्थातच मेनोपॉजनंतर इस्ट्रोजेनची पातळी कमी झाल्याने हाडांना असलेलं हे संरक्षण जातं. आणि हाडं ठिसूळ होतात.

estrogen & osteoporosis.jpg

स्त्रीपुरूष दोघांनाही ऑस्टिओपोरॉसिसचा धोका असतो. पण स्त्रियांमध्ये इस्ट्रोजेनचं संरक्षक कवच गेल्याने त्यांच्यामध्ये ह्या आजाराचे प्रमाण जास्त आढळून येते.

हा आजार होण्याची शक्यता वाढवणारे इतर घटक (Risk factors) :
१. स्त्री असणं
२. वयाच्या ४० व्या वर्षाच्या आत मेनोपॉज येणं
३. आई, वडील, भाऊ, बहीण ह्यापैकी कुणाला ऑस्टिओपोरॉसिस असणं किवा आईवडिलांपैकी कुणाचं खुब्याचं अथवा मणक्याचं हाड मोडलेलं असणं
४. वजन खूप कमी असणं ( Underweight - म्हणजे BMI १९ पेक्षा कमी )
५. मेनोपॉजच्या आधी ६ महिन्यांपेक्षा जास्त काळ पाळी न येणे - प्रमाणाबाहेर व्यायाम किंवा डाएटिंगमुळे असं होऊ शकतं
६. उतारवय - ५० वर्षांपेक्षा जास्त
७. व्यायामाचा अभाव
८. कॅल्शिअम आणि 'ड' जीवनसत्वाचे अपुर्‍या प्रमाणात सेवन
९. अतिरिक्त मद्यपान
१०. धूम्रपान
११. हायपरथायरॉइड, किडनी फेल्युअर ह्यासारखे आजार.
१२. स्टिरॉइअडच्या औषधांचे अतिरिक्त सेवन - ही औषधे बर्‍याचदा दम्याच्या उपचारांमध्ये वापरली जातात
१३. कर्करोगासाठी घेतलेली किमोथेरपी

ह्या आजाराची लक्षणे काय ?
दुर्दैवाने ह्या आजाराची लक्षणे लवकर जाणवत नाहीत.
जवळजवळ सगळ्या केसेस मध्ये, अगदी किरकोळशा धक्क्याने शरीरातील एखादं हाड मोडल्यानंतरच ह्या आजाराचं निदान होतं.

ऑस्टिओपोरॉसिस मुळे होणारी फ्रॅक्चर्स ही मुख्यत्वे मणक्याची हाडे, खुब्याचे हाड किंवा मनगटाच्या हाडांमध्ये आढळून येतात.

मणक्याच्या हाडांमध्ये Compression फ्रॅक्चर्स होत गेल्याने असह्य पाठदुखी होते आणि मणक्याला बाक येतो.

Spine changes with osteoporosis.jpg

उतारवयात झालेल्या ह्या आजारपणामुळे अनेकदा परावलंबित्व येतं.
मोडलेली हाडे लवकर भरून न येणं, जंतुसंसर्ग होणं असे अनेक धोके उत्पन्न होतात.
आणि एकूणच शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर तसेच जगण्याच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होतो.

ऑस्टिओपोरॉसिसच्या निदानासाठी उपलब्ध असलेल्या तपासण्या :

हाडे किती मजबूत आहेत हे पाहण्यासाठी त्यांची घनता तपासतात. त्यालाच बोन मिनरल डेन्सिटी (BMD) असे म्हणतात.
साधारणपणे वयाच्या ३० व्या वर्षी हाडांची घनता ही सर्वाधिक असते. त्यानंतर ती हळूहळू कमी होत जाते.

हाडांची घनता मोजण्याच्या तपासणीला डेक्सा स्कॅन (DEXA scan) असे म्हणतात.

आजकाल संपूर्ण शरीराची तपासणी करण्याचे जे 'पॅकेजेस' असतात, त्यामध्ये बर्‍याचदा डेक्सा स्कॅनही केला जातो.

(इतर काही तपासण्यांच्या मदतीने सुद्धा हाडांची घनता मोजता येते. जसे की अल्ट्रासोनोग्राफी, क्वांटिटेटिव्ह कॉम्प्युटेड टोमोग्राफी (QCT). पण बहुतांश ठिकाणी डेक्सा स्कॅनचा वापर केला जातो. म्हणून इथे त्याबद्दल थोडं विस्ताराने देत आहे.)

DEXA म्हणजे Dual Energy X-ray Absorptiometry.
डेक्सा स्कॅनरमध्ये दोन वेगवेगळ्या क्षमतेच्या क्ष-किरणलहरी वापरल्या जातात ( म्हणूनच Dual Energy !)
जास्त क्षमतेच्या लहरी आणि कमी क्षमतेच्या लहरींमधील फरकाच्या मदतीने हाडांची घनता मोजली जाते.
ह्यातून होणारा क्ष-किरणांचा मारा छातीचा एक्सरे काढताना होणार्‍या मार्‍यापेक्षाही कमी असतो, त्यामुळे ह्या तपासणीमधील धोके कमी आहेत.

DEXA_Scanner.gif

संपूर्ण तपासणीला साधारणपणे १५ ते २० मिनिटे लागू शकतात.
ही तपासणी वेदनारहित असते. ह्यामध्ये कुठलंही इंजेक्शन किंवा सलाईन वापरावे लागत नाही.
तपासणीआधी नेहमीचे जेवण घेतले तरी चालते. मात्र साधारण २४ तास आधीपासून कॅल्शिअमची पूरक औषधे बंद ठेवावी लागतात.

खुब्याचे हाड आणि मणका ह्या दोन ठिकाणची घनता तपासून त्याच्या सहाय्याने शरीरातील इतर हाडांना असणार्‍या फ्रॅक्चरच्या धोक्याचा अंदाज वर्तविला जातो.

३० वर्षे वयाच्या निरोगी व्यक्तीच्या हाडांच्या घनतेशी रूग्णाच्या हाडांच्या घनतेची तुलना करून रुग्णाचा टी-स्कोअर काढला जातो.
जागतिक आरोग्य संस्थेने ऑस्टिओपोरॉसिसच्या निदानासाठी काही व्याख्या बनवल्या आहेत.

नॉर्मल टी स्कोअर ----> ० ते -१ ह्या दरम्यान
ऑस्टिओपिनीआ (काही प्रमाणात ठिसूळ झालेली हाडे) ----> -१ ते -२.५ मधील टी-स्कोअर
ऑस्टिओपोरॉसिस ( ठिसूळ हाडे ) ---> -२.५ किंवा त्याहून कमी असलेला टी-स्कोअर

तुमचा टी-स्कोअर ऑस्टिओपिनीआ ह्या वर्गात असेल तर हाडे ठिसूळ होऊन होणार्‍या फ्रॅक्चर्सचा धोका २ ते ३ पटीने अधिक असू शकतो आणि टी-स्कोअर जर ऑस्टिओपोरॉसिस ह्या वर्गात असेल तर असा धोका ५ पटीने अधिक असू शकतो !

Osteoporosis-Graph.jpgडेक्सा स्कॅन कोणी करावा ?
- ६५ वर्षे वयाच्या पुढील स्त्रिया,
- वर उल्लेख केलेले रिस्क फॅक्टर्स असणार्‍या ६५ वर्षे वयाच्या आतील स्त्रिया
- वर उल्लेख केलेले रिस्क फॅक्टर्स असणारे पुरूष
- अस्थिरोगतज्ञांनी सल्ला दिला असल्यास.

असे म्हणतात की, "Osteoporosis is a disease of childhood which manifests in adult age !"
म्हणजेच हा प्रौढावस्थेत लक्षणे दाखवणारा, पण लहान वयापासूनच उद्भवलेला आजार आहे.
त्यावर उपाय आहेत. पण नंतर उपचार करण्यापेक्षा आधीपासूनच हा आजार होऊ नये म्हणून काळजी घेणे जास्त हितावह आहे.

- रुणुझुणू (स्त्रीरोगतज्ञ)

********************************************************************************************************************
- सर्व चित्रे जालावरून साभार.
- डिस्क्लेमर :
सदरहू लेखाचा उद्देश मेनोपॉज ह्या विषयावरील माहिती देणे हा असून त्या संदर्भातील काही सल्ला-उपचार इत्यादी असतील ते तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच करावेत.
- लेखात जागोजागी आलेल्या इंग्रजी शब्दांसाठी क्षमस्व. पण काही शब्दांचे मराठी प्रतिशब्द माहीत नाहीत आणि काहींचे माहीत असले तरी ते दुर्बोध वाटले म्हणून लिहिले नाहीत. सोपे आणि समर्पक शब्द सुचवले तर योग्य तिथे बदल करीन.

********************************************************************************************************************

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रुणुझुणू कौतुक करावे तेवढे थोडे. अतीशय उपयुक्त सदर सुरु केलेत तुम्ही. ( calcium ) वाढवण्याकरता स्त्रियांनी दूध, दही, बदाम, केळी, नाचणी, राजगीरा आहारात ठेवलाच पाहिजे हे तज्ञ डाँचे मत आहे, मी माझी ( calcium ) तपासणी केली तेव्हा डाँनी हे सांगीतले.

खुप आवडली माहिती रुणु!
<<१. स्त्री असणं
२. वयाच्या ४० व्या वर्षाच्या आत मेनोपॉज येणं<<

मला वयाच्या ३६ वर्षीच मेनोपॉज आलाय. Sad .
काय करावं लागेल सांगशील का? Uhoh

सगळ्यांना धन्यवाद. Happy
साती, << इस्ट्रोजेन म्हणजे नारायण हे भारीच आवडलं >> मग काय गं. किती उपद्व्याप करतात हे हॉर्मोन्स आणि नाहीसे झाले की तारांबळ.

<< या बरोबरच हे होउ नये म्हणुन किंवा झालेच तर काय करावे हे ही लिहिता येइल का?>>
मृनिश, चिन्नु, ह्याबद्दलही लिहिणार आहे. पहिल्या लेखामध्ये पुढील लेखांचा क्रम लिहिला आहे.
ह्याच लेखात उपाययोजनांबद्दलही लिहिणार होते. पण लेखाची लांबी खूपच वाढत होती. वाचताना कंटाळा येऊन, नेमकं उपाययोजनेच्या महत्वाच्या भागापर्यंत आल्यावर लक्ष उडू नये, म्हणून ते सगळं वेगळ्या लेखात लिहावं असं ठरवलंय.

<< पण थोडी भिती वाटायला लागलीये गं >> जयुताई, चिलॅक्स ! Happy अजिबात घाबरू नका.
ही भिती जावी म्हणूनच एवढ्या मोठ्या लेखमालिकेचा प्रपंच केला आहे. आपण जेव्हा शेवटच्या लेखांपर्यंत पोहोचू, तोवर सगळ्याजणी ह्या विषयाबाबत एकदम आत्मविश्वासपूर्वक सकारात्मक विचार करू शकतील, असं मला वाटतं.
( म्हणजे माझा तसा प्रयत्न आहे. कितपत जमतंय बघू या.)

टुनटुन, तुम्ही लिहिलेलं बरोबर आहे. आहारातील बदल आणि पूरक औषधे हा ह्यावरील उपाययोजनेचा पाया आहे. आणखीही काही उपाय आहेत, त्याबद्दल पुढच्या लेखांमध्ये सविस्तर लिहिते.

<< मला वयाच्या ३६ वर्षीच मेनोपॉज आलाय. Sad >> आर्या, निळी बाहुली पुसून टाक. Happy घाबरू नकोस.
जे घडलंय ते चक्र उलटं फिरवणं आपल्या हाताबाहेरचं आहे. ह्याला प्रिमॅच्युअर मेनोपॉज म्हणतात. साधारणपणे १ % स्त्रियांना असं होऊ शकतं.
तू डेक्सा स्कॅन करून घेशील का ? ( आधी केला नसेल तर )
शिवाय तुझ्या जवळच्या स्त्रीरोगतज्ञांची भेट घेऊन हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपीबद्दलपण चर्चा कर.
मी लिहिणार आहेच ह्याबद्दल. पण एकंदरीत हे प्रकरण मारूतीच्या शेपटासारखं लांबत चाललंय. त्यामुळे थोडा वेळ लागू शकेल.

रुणु, किती सहज शब्दात सांगतियेस हे सगळ, आधीचे लेखही वाचले आहे वाचते आहे, खरच मनापासून धन्यवाद तुझ्या या उपक्रमासाठी Happy

अतिशय चांगला लेख!
धन्यवाद रुणुझुणू.

बोन मिनरल डेन्सिटी ही टेस्ट ही कितपत खात्रीची असते? म्हणजे त्यात कळणारं हाडांच्या घनतेचं प्रमाण हे प्राथमिक स्वरुपातलं असतं का? आणि डेक्सा स्कॅन ही टेस्ट डिटेल मध्ये रिडींग दाखवते का?
Uhoh फारच बाळबोध विचारलयं का मी?

>>>>५. मेनोपॉजच्या आधी ६ महिन्यांपेक्षा जास्त काळ पाळी न येणे - >>>>>>
रुणुझुणु, याचा आणि हाडाच्या घनतेचा संबंध काय ? जरा समजावून सांगशील का?

छान माहिती रुणुझुणू.
आहारातील बदल आणि पूरक औषधे हा ह्यावरील उपाययोजनेचा पाया आहे. आणखीही काही उपाय आहेत, त्याबद्दल पुढच्या लेखांमध्ये सविस्तर लिहिते. >> पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत...

@ के अंजली,
<<बोन मिनरल डेन्सिटी ही टेस्ट ही कितपत खात्रीची असते? म्हणजे त्यात कळणारं हाडांच्या घनतेचं प्रमाण हे प्राथमिक स्वरुपातलं असतं का? >>
हो, हे प्रमाण प्राथमिक स्वरूपातील असतं.
तपासणीमध्ये दाखवलेली घनता आणि तुमच्या शरीरातील हाडांची वास्तविक घनता हे तंतोतंत सारखे नसतात.

वाढलेल्या ब्लड प्रेशरवरून तुम्हाला स्ट्रोक (मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने अर्धांगवायू) होण्याच्या धोक्याची शक्यता डॉक्टर सांगतात त्याचप्रमाणे डेक्सा स्कॅन ही तुम्हाला होऊ शकणार्‍या फ्रॅक्चर्सची शक्यता दाखवते.

सध्या उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानामध्ये, डेक्सा स्कॅन ही हाडांची घनता मोजण्यासाठी जास्त वापरली जाणारी आणि जास्त विश्वासार्ह तपासणी आहे असं मानलं जातं.
(प्रत्येक शाखांमध्ये खूप झपाट्याने प्रगती होते आहे. त्यामुळे ह्यापेक्षा वेगळं, आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध झाले असेल तर त्याविषयी अस्थिरोगतज्ञ जास्त चांगल्या प्रकारे माहिती देऊ शकतील! )

डेक्सा स्कॅनमध्ये कळणार्‍या बोन डेन्सिटीवरून - फ्रॅक्चर्स होतीलच किंवा होणारच नाहीत - असं छातीठोकपणे सांगता येत नाही.

कमी डेन्सिटी असलेल्या एखाद्या व्यक्तीला कधीच फ्रॅक्चर होत नाही. ह्याउलट सर्वसाधारण डेन्सिटी असलेल्या व्यक्तीला फ्रॅक्चर्स होऊ शकतात. कारण वय, जेण्डर, पडल्याची हिस्टरी असे इतरही घटक ह्यावर प्रभाव टाकत असतात.
सगळे घटक आणि तुमचा टी-स्कोअर ह्या सगळ्यांचा विचार करून तुम्हाला उपचारांची गरज आहे किंवा नाही हे तुमचे डॉक्टर ठरवू शकतात.

मणक्याचे फ्रॅक्चर्स झालेल्या, पाठीला बाक असलेल्या, किंवा ऑस्टिओ-आर्थरायटिस असलेल्या व्यक्तींमध्ये टी-स्कोअरचे इंटरप्रीटेशन बर्‍याचदा अवघड जाते.

<< फारच बाळबोध विचारलयं का मी?>> अजिबात नाही. Happy

@ अवनी,
>>>>५. मेनोपॉजच्या आधी ६ महिन्यांपेक्षा जास्त काळ पाळी न येणे - >>>>>>
रुणुझुणु, याचा आणि हाडाच्या घनतेचा संबंध काय ? जरा समजावून सांगशील का?

अतिप्रमाणात व्यायाम किंवा डाएटिंगच्या परिणामाने (बर्‍याचदा स्त्रीखेळाडूंमध्ये असं होऊ शकतं) किंवा इतर काही कारणांनी झालेल्या हॉर्मोन्सच्या असंतुलनामुळे मेनोपॉजच्या आधी पाळीमध्ये फार मोठे गॅप्स असू शकतात. अशा गॅप्समुळे शरीरामध्ये इस्ट्रोजेनच्या कमतरतेचे प्रसंग वारंवार उद्भवतात. (आणि इस्ट्रोजेन हाडांचं संरक्षण करतं हे आपण पाहिलंच.)
हे वाचा. http://en.wikipedia.org/wiki/Female_athlete_triad

बर्‍याच स्त्रियामध्ये पॉलिसिस्टिक ओव्हरीजमुळे पाळीमध्ये मोठे गॅप्स पडतात. पण ह्याचे कारण अतिरिक्त प्रमाणातील अ‍ॅन्ड्रोजेन्स (पुरूषांमधील हॉर्मोन्स) हे असते. पीसीओएसचा हाडांच्या घनतेवर विपरीत परिणाम होतो किंवा नाही ह्यावर वाद-प्रतिवाद आहेत.

नेहमीप्रमाणेच अप्रतिम Happy उपचार आणि उपायांबद्दल लवकरात लवकर लिहि . माझ्या आई बाबा दोघांना कॅल्शियम डेफिशियन्सी आहे. वडिलांच्म knee replacement operation ही झालंय आणि आईच्या L4-L5 मध्ये प्रचंड जवळीक (?) निर्माण झालीय. या पार्श्वभूमीवर आपलं काय होणार? ही चिंता मला सतत भेडसावत असते. पण तुझी ही लेखमाला सुरु झाल्यापासून खूप आशा वाटायला लागलीय मला Happy धन्यवाद

व्हिटेमिन डी आणि बी १२डेफिशियन्स१२चा हाडा.न्च्या प्रॉब्लेम्शी काही स.म्बम्ध असतो का?

रुणू, जी माहिती प्रतिसादांत दिली आहेस ती शक्य झाल्यास आवश्यकतेनुसार मुख्य लेखात घालू शकशील का?

Pages