व्यक्ती आणि वल्ली - १ ..... "खुफियापंक्ती"

Submitted by तुमचा अभिषेक on 1 June, 2012 - 12:23

व्यक्ती आणि वल्ली - १ ..... "खुफियापंक्ती"

स्थळ - आमची मुंबई लोकल ट्रेन
वेळ - थोड्याफार गर्दीची.
प्रमुख कलाकार - दोन निरागस(?) मुले. एक किडकिडीत शरीरयष्टीचा, तर दुसरा अगदी त्याच्या उलट.. आणि त्यांच्या सोबतीला एक सुंदरशी मुलगी.

आणि मी??

नाही हो, मी आपला फक्त निवेदक..

चला, तर मग घटनास्थळीच घेऊन जातो तुम्हाला.

....................................................................................................
....................................................................................................

मुलाच्या कॉलेजच्या अ‍ॅडमिशनचे काम आटोपून मी वडाळ्यावरून घरी परतत होतो. ट्रेन बदलायला नको म्हणून थेट बोरीवलीच पकडली. ट्रेन तशी खाली होती पण चढणारेही बरेच असल्याने वडाळ्यालाच भरली. तरी या वयातही चपळाईने चढलो असल्याने बसायला जागा मिळाली. यापेक्षा जास्त चपळाई दाखवून माझ्या समोरच दोन कॉलेजच्या मुलांनी देखील तीन जागा आधीच अडवल्या होत्या. त्यांनी दोघांमध्ये मिळून तीन जागा अडवल्या म्हणून बसायला न मिळालेल्या दोन-चार जणांचे चेहरे त्रासलेले दिसले... पण थोडावेळच... त्या अडवलेल्या जागेवर आरामात गर्दी बाजूला सारत त्यांची मैत्रीण येऊन स्थानापन्न झाली आणि तिच्याकडे पाहून ते धुसमसणारे चेहरे निवळले. तिथपासून या तीन पात्रांची बडबड कंपार्टमेंटमधील सार्‍यांचे लक्ष वेधून घेत होती. ती मुलगी अगदी हिरोईन कॅटेगरीत मोडत नसली तरी बर्‍यापैकी सुंदर, चारचौघात उठून दिसणारी आणि पुरुषांच्या डब्यात जरा जास्तच उठून दिसणारी असल्याने लोकांच्या वेधलेल्या नजरा खिळूनही राहत होत्या. आता याची त्या मुलीबरोबर असलेल्या दोन मुलांनाही कल्पना होती. पण त्यांना याची फिकीर नव्हती. कदाचित सवयीने असावे, पण ते मस्त गप्पा मारत मारत बरोबर घेतलेल्या भेळीचा समाचार घेत होते.

दिसायला तिघेही चांगल्या घरातील होते. आता, ईंजिनीअरींगच्या गप्पा मारणारी मुले निदान चांगले शिक्षण घेणारी तरी असणारच नाही का. पण त्यांच्यातही तो बारक्याच जरा जास्त फॉर्मला होता. भेळ खात कमी होता आणि सांडवत जास्त होता. सोबतीला तोंडाची टकळी चालूच होती. ती मुलगी त्याला अधूनमधून एटीकेट्स आणि मॅनर्सचे लेक्चर देत होती. पण बारक्या काही तिला जुमानत नव्हता. जाड्या मात्र नुसताच गालातल्या गालात हसत होता. त्यामुळे नकळतच माझ्यासह ट्रेनमधील बर्‍याच प्रवाशांचा फोकस हळूहळू त्या मुलीवरून बारक्यावर शिफ्ट झाला होता.

थोड्याच वेळात त्यांची भेळ खाऊन संपली. त्या मुलीने आणि जाड्याने आपले कागद चुरंगळी करून ट्रेनच्या खिडकीच्या गजातून बाहेर फेकले. पण बारक्याची भेळ खायची हौस मात्र अजून फिटली नव्हती. त्याने भेळेच्या कागदाची पुरचुंडी उलगडली आणि कागदावरची उरलीसुरली भेळ खाऊ लागला. बरेच जण असे करतात, त्यामुळे यात काही विशेष वाटण्यासारखे नव्हते. पण चार-पाच मिनिटे झाली याचे भेळ खाणे चालून होते. ट्रेनमधल्या लोकांचे हळूहळू त्याच्याकडे लक्ष जाऊ लागले, तर हा चक्क कागदाला चिकटलेला शेव-कुरमुर्‍याचा कण, कांद्याची पात, कोथिंबीर नावाचा पाला सुद्धा एक एक करून वेचून खात होता. चेहर्‍यावर जमेल तेवढा हावरटपणा आणि त्याच जोडीला एकाग्रताही. जणू पुर्ण कागद साफ केल्याशिवाय त्याचे पोट तरी भरणार नव्हते किंवा भेळीचे पैसे तरी वसूल होणार नव्हते. मला तर त्याच्यावर हसावे की रडावे हे समजत नव्हते. आठ-दहा मिनिटांच्या अथक परीश्रमानंतर शेवटचा शेवेचा कण न कण उचकटून त्याचा भेळीचा कागद पुर्ण साफ करून झाला तसे ट्रेनच्या बघ्या प्रवाश्यांना झाले बाबा एकदाचे असे वाटले असावे. पण त्याने मात्र तो कागद मांडीवर ठेऊन त्यावर हात फिरवत इस्त्री केल्यासारखे केले आणि तो हातात धरून त्यात लिहिलेले वाचू लागला. कुठल्यातरी इंग्रजी मासिकाचे पान असावे. बर्‍यापैकी मोठ्याने वाचत असल्याने सार्‍या कंपार्टमेंटला ऐकू जात होते. आता ट्रेनमध्ये ईंग्लिश कोणाला किती समजत असावे हा ज्याचा त्याचा प्रश्न. पण एवढा वेळ त्याला एटीकेटस शिकवणारी मुलगी मात्र आता आपली हार मानून गप्प बसली होती आणि जाड्या मात्र अजूनही गालातल्या गालात हसत होता.

अचानक वाचता वाचता त्याचा बोलायचा टोन बदलला. आधी धीरगंभीर, मग उतावीळ आणि शेवटी ‘युरेका युरेका’ तेवढे करायचे बाकी ठेवले होते. मोठ्या हर्षोत्साहानेच त्याने त्या कागदात लिहिलेले जाड्याला दाखवले आणि रीतसर टाळी वगैरे दिली. ट्रेनमधील लोकांच्यातही अचानक खूप उत्सुकता निर्माण झाली. काही वेड्यांना त्याच्याबद्दल मनात आदर उत्पन्न झाला तर काही शहाण्यांना तो वेडा वाटला. पण ज्याच्याबरोबर एवढी सुंदर आणि सोफेस्टीकेटेड मुलगी बसली आहे तो वेडा खचितच नसणार हे मी मात्र जाणून होतो. सर्वांनाच आता कुतूहल लागून राहिले होते की आता हा हिरो पुढे करतो काय...

त्याने त्या भेळेच्या कागदाची व्यवस्थित घडी करून तो बॅगेच्या एका कप्प्यात ठेवला. त्यानंतर मग दुसर्‍या कप्प्यात हात घालून पाण्याची बाटली काढली. बाटलीचे बूच उघडले. बूचात पाणी ओतले. आणि ते प्यायला.. हो.., ते बूचच होते, ते ही अरुंद तोंडाच्या बाटलीचे, ज्यात अर्धा घोटच काय जेमेतेम चिमूटभर पाणी मावत नसावे ज्यातून तो पाणी प्यायला... आणि त्यानंतर मग एकापाठोपाठ एक असे बूच बूच भर पाण्याचे घोट घेणे त्याने चालू केले. लोकांचे त्याच्याबद्दलचे कुतूहल आणखी वाढू लागले होते. पण त्याचे काम मात्र इमान इतबारे चालूच होते. कोणाला तो मद्याचे पेग बनवत रिचवत असल्यासारखे वाटत होते तर कोणाला औषधाचे डोस.. ती सुंदरशी मुलगी मी यांच्या गावची नसल्यासारखी खिडकीतून बाहेर नजर लाऊन होती आणि जाड्या मात्र मोठ्या कौतुकाने याचे जलप्राशन एंजॉय करत होता. असे वीस-बावीस बूच मारून झाल्यावर त्याने एक बूचभर पाणी जाड्याला पाजायला त्याच्या तोंडाजवळ नेले. सार्‍यांना वाटले की आता जाड्या वैतागेल, चिडेल.. पण त्याने मात्र ते पाणी पिऊन त्या बारक्याला चक्क थॅंक्यू म्हटले. असे तीन-चार घोट जाड्याला पाजल्यावर त्याने आपला मोर्चा आता त्या सुंदरीकडे वळवला. आता ती कशी यावर रीअ‍ॅक्ट करते याकडे माझे लक्ष लागून राहिले. आणि कदाचित ट्रेनमधील सार्‍यांचेच... जसे त्याने पाण्याने काठोकाठ भरलेले बूच तिच्या तोंडाजवळ नेले तसे ती लटक्या रागातच त्याला पुटपुटली, "अभि स्टॉप ईट... उद्या पासून मी खरेच तुमच्याबरोबर येणार नाही.." मी त्यांच्या जवळच बसलो असल्याने मला हे ऐकू गेले. कदाचित ती त्याला वैतागून हे रोजच बोलत असावी. पण तरीही रोजच त्याच्याबरोबरच प्रवास करत असावी. असो, पण त्या अभि’ने काही हट्ट सोडला नाही. शेवटी नाईलाजाने तिनेच पुन्हा आपली हार मानून ते बूच तोंडाला लावले. तसे अभि’च्या निरागस चेहर्‍यावर तेवढेच मोहक हास्य पसरले. बरे वाटले बघायला. त्यानंतर त्याने अजून एक बूच पाणी तिला ऑफर केले, पण यावेळी तिने नकार देताच शहाण्या बाळासारखे ते स्वताच पिऊन, बूच बाटलीला लाऊन, बाटली आत बॅगेत ठेवली. आता हे शहाणे बाळ पुढे काय करते याची मी वाट पाहू लागलो.

दोन-चार मिनिटे शांततेत गेली आणि मला करमेनासे झाले. अजून काहीतरी मनोरंजन घडावे अशी अपेक्षा मी आता त्याच्याकडून ठेऊन होतो... आणि त्याने मला फार वेळेसाठी निराश नाही ठेवले.

गाडीने बांद्रा स्टेशन सोडले आणि अचानकपणे.... ट्रींग ट्रींग.. ट्रींग ट्रींग.. फोनची टिपिकल रींग वाजू लागली. आवाज त्याच्याच बॅगेतून येत होता. बॅगेत हात घालून आतल्याआतच त्याने फोन रीसीव केला आणि बाहेर काढून कानाला लावला, "हा मोटा भाई, बोलो... क्या हाल है मार्केटका..?" अशी सुरुवात करून त्याने शेअरमार्केट मधील उलाढालींवर समोरच्याशी चर्चा करायला सुरुवात केली.

माझे शेअर मार्केटबाबतचे ज्ञान एखाद्या मध्यमवर्गीय मराठी माणसासारखेच जेमतेम.. तरी या पोराला जमतेय तर मलाही काही समजेल म्हणून कान लाऊन ऐकू लागलो.

"गिरता है तो गिरने दो, आज पचास हजार का घाटा हुआ है तो कल पाच-पचास लाख कमा भी लेंगे.. डालो और पचास हजार जय श्री कृष्णा बोलके..." त्याच्या मोठमोठ्या बाता मी किंचित अविश्वासानेच ऐकत होतो. इतने ले लो, उतने बेच दो, पाच पचास हजार से कुछ फरक नही पडता... आणि सहजच माझी नजर त्याने कानाला लावलेल्या मोबाईलवर गेली... आणि.......... मला धक्काच बसला. तो मोबाईल नसून चक्क कॅलक्युलेटर होता... सायंटीफिक कॅलक्युलेटर असल्याने बटने किंचित जास्त होती, पण नक्कीच तो कॅलक्युलेटर होता. गेल्याच आठवड्यात असलाच एक मी माझ्या मुलासाठी घेतला होता, त्यामुळे मला ओळखणे फारसे जड गेले नाही. पण याचाच अर्थ त्याच्या पलीकडे कोणीही मोटाभाई छोटाभाई बोलत नव्हता. पण मगाशी त्याच्या बॅगच्या आत रींग कसली वाजली असावी.. कदाचित तो खरा मोबाईल फोन असावा जो याने कट करून बाहेर मात्र कॅलक्युलेटर काढला असावा.. काही का असेना.. पोरगा पक्का डॅंबिस होता.. मला खरे काय ते कळले तसे आता मी आजूबाजुच्या लोकांना न्याहाळू लागलो. सर्वांची त्याच्याबद्दल असलेली उत्सुकता अजूनही कायम होती.. म्हणून त्याचा शब्द न शब्द ऐकला जात होता.. जाड्या अजूनही गालातल्या गालात हसत होता.. आणि ती मुलगी मात्र आता खिडकीच्या बाहेर न बघता त्याच्याकडे कौतुकाने बघत होती..

बोलता बोलता मध्येच त्याने मोटाभाईला थांबायला सांगितले आणि फोन(?) कट करून त्याच कॅलक्युलेटर(??)वर आकडेमोड सुरू केली. दोनचार आकडे, जे अर्थातच लाखांमध्ये होते ते उच्चारून जाड्याशी काहीतरी डिस्कस केले आणि त्याच कॅलक्युलेटरची बटणे दाबून पुन्हा मोटाभाईला फोन लावला.

एव्हाना मी त्याला पुरता ओळखून गेलो होतो. पण इतरांचे भाव टिपण्यासाठी पुन्हा एकदा सहप्रवाश्यांवर नजर फिरवली. काही जण त्याच्याकडे कौतुकाने बघत होते, तर काही गपचूप हसत होते, पण बरेचसे चेहरे गोंधळलेलेच होते. ज्यांना कल्पनाही नव्हती की कॅलक्युलेटर नावाचाही काही प्रकार असतो ते इमान इतबारे त्याचे बोलणे ऐकत होते. पण ज्यांना पुसटशी कल्पना होती ते मात्र खरे या कन्फ्यूजनमध्ये दिसत होते की हे मोबाईलचे नवीन मॉडेल आहे की कॅलक्यूलेटरचे नवीन वर्जन... पण जो हे सारे घडवणारा होता त्या प्राण्याची मात्र या सार्‍याची पर्वा न करता फेकम-फाक चालूच होती. फक्त आता फोनवरची समोरची व्यक्ती तेवढी बदलली होती. अविश्वसनीय गोष्टीही एखाद्याला खर्‍या वाटाव्यात इतक्या सहजतेने फेकत होता की मनातल्या मनात त्याच्या अभिनय आणि संवाद कौशल्याला दाद दिल्यावाचून राहवले नाही. एक दोनदा मलाच पुन्हा निरखून याची खात्री करून घ्यावी लागली की त्याच्या हातात खरेच कॅलक्युलेटरच आहे.. अंधेरी येईपर्यंत त्याची नॉनस्टॉप नॉनसेन्स बडबड चालूच होती पण सारेच विषय ईंटरेस्टींग होते. या एवढ्या वेळात त्याने शेअरमार्केटमध्ये हजारोंची गुंतवणूक केली होती, मित्रांबरोबर युरोप टूरला जाण्याचा प्लॅन बनवला होता, एका मैत्रीणीच्या सौंदर्याची भरभरून तारीफ केली होती, आणि असे बरेच काहीसे केले होते जे ऐकून एखाद्याच्या मनात त्याच्याबद्दल प्रचंड कुतूहल निर्माण व्हावे आणि पुढचे चार दिवस तरी तो त्याचाच विचार करावा....... आणि कदाचित हे सारे करण्यामागे त्याचा हाच एक विशुद्ध हेतू असावा.

अंधेरीला जेव्हा ते तिघे ट्रेनमधून उतरले तेव्हा त्याच्या शेवटच्या शब्दांवरून एवढेच समजले की त्याचा कोणीतरी भाऊ स्टेशनच्या बाहेर एक महागडी कार घेऊन त्याची वाट बघतोय. तो ट्रेनमधून उतरला तसे आतापर्यंत त्याच्याबद्दल मनात जे तरंग उमटले होते त्यांना वाट करून देण्यासाठी मला कोणाशीतरी बोलावेसे वाटले. आजूबाजुला नजर टाकली तर माझ्या बाजूलाच बसलेला एकजण माझ्याशी बोलण्यास उत्सुक दिसला.. कदाचित याच विषयावर असावे.. मी त्याच्याकडे पाहून हलकेसे स्मित करून त्याला ग्रीन सिग्नल दिला तसे तो सुरू झाला..

"खूप अवली मुलगा आहे ना.."

"आं.. " मला अवली या शब्दाचा अर्थ काही झेपला नाही..

"म्हणजे खूप अतरंगी आहे ना.."

"अं, हो.. प्रथमदर्शनी वेडा वाटला.. पण थोड्याच वेळात समजून चुकलो की तोच इतरांना वेड्यात काढत होता.", मी म्हणालो.

"आणि लोक फसतातही हो.. आता आम्ही रोजचे काही या ट्रेनला असतो त्यांना कल्पना असते पण नवीन माणसे मात्र हमखास गंडतात. त्यामुळे त्यांची मजा बघत आमचेही मनोरंजन होते."

"छानच की, रोजची तेवढीच करमणूक"

"तेवढीच नाही हो, रोज काहीबाही वेगळेच चालू असते.. भेळ तेवढी मात्र रोज तशीच खातो, आणि ते बूच बूच पाणी पिणेही तसेच.. पण ते फोनकॉल मात्र रोज नवीन नवीन माणसांना लागत असतात, रोज नवीन नवीन संवाद ऐकायला मिळतात की तेच तेच ऐकून आम्हालाही बोर होत नाही.. कधी मित्रांना फोन लावतो तर कधी नोकरांना फोन लावतो.. कधी त्याच्या आईशी बोलत असतो तर कधी एखादी मैत्रीण असते समोर. एक दिवस तर कमालच झाली. त्याला इंडियन आयडॉल या गाण्याच्या कार्यक्रमामधून फोन आला आणि त्याचे अंतिम दहात सिलेक्शन झाल्याचे समजले. याच आनंदात त्याने ट्रेनमधील प्रवाशांसाठी एक गाणे म्हटले आणि गाणेही कुठले तर शिर्डीवाले साईबाबा... एवढेच नाही तर एकाने त्यावर खुश होऊन त्याला चक्क पन्नास रुपयांचे बक्षीस दिले आणि वर ईंडीयन आयडॉल झाल्यावर मला विसरू नको असेही बजावले, आता बोला.."

"काय बोलू... म्हणजे आता काय बोलणार या प्रकाराला..?" मी हसतच म्हणालो.

"खुफियापंक्ती.."

"खुफियापंक्ती...??"

"हो, त्याच्याच भाषेत सांगायचे तर तो याला खुफियापंक्ती बोलतो.. उर्दूमध्ये खुफियाचा अर्थ गूढ, रहस्यमय असा होतो.. त्या हिशोबाने हे इतरांना चक्रावून टाकणारे प्रकार म्हणजे त्याची खुफियापंक्ती.."

याबाबत मात्र आम्ही दोघेही सहमत झालो..

पुढे बोरीवली येईपर्यंत मी त्याच्या या खुफियापंक्तीचेच इतर किस्से ऐकत होतो. घरी पोहोचल्यावर बायकोशी देखील आजचा अनुभव शेअर केला. तिलाही खूप कौतुकच वाटले हे सारे ऐकून. ती रात्र आमचे कॉलेजचे दिवस आठवण्यातच गेली. तसा आमचा प्रेमविवाहच, कॉलेजच्या जमान्यापासून चालत आलेले प्रेमप्रकरण. तेव्हा कॉलेजमध्ये असताना आम्ही देखील अशीच धमालमस्ती केली होती. ती माझ्यापेक्षा एक वर्ष ज्युनिअर होती. लेक्चर बुडवून मी तिच्या मागे मागे फिरायचो. पण ती मात्र मी लेक्चर बुडवलेला बघून देशपांडे सरांचा लेक्चर कितीही बोअर असला तरी मुद्दाम बसायची. मग मी देखील बिनधास्त त्यांच्याच वर्गातला असल्यासारखा तिच्या वर्गात शिरायचो. देशपांडे सरांनी एकदा पकडले देखील होते. तेव्हा वेळ मारून न्यायला त्यांना मी नापास झालो मागच्या वर्षी असे सांगितले आणि त्यांचा यावर चक्क विश्वासही बसला. त्यानंतर मग हाच फॉर्म्युला वापरून जिथे तिथे तिच्या मागे जायचा धडाकाच लावला होता. अर्थात हे कदाचित खुफियापंक्तीच्या प्रकारात मोडणारे नसावे पण सर्वांनी एकत्र प्रॅक्टीकल बुडवून सिनेमाला जाणे किंवा आपसात क्रिकेटची मॅच घेणे, लायब्ररीमध्ये जाऊन आपल्या आवडत्या मुलीच्या समोर बसणे आणि उगाच खोटे खोटे अभ्यासाचे नाटक करणे, रंगपंचमीच्या आदल्या दिवशी कॉलेजला लपवून रंग आणने आणि एकेकीला गाठून होळीच्या शुभेच्छा देण्याच्या बहाण्याने अचानक ते रंग बाहेर काढून रंगवणे, वार्षिक स्नेहसंमेलनात कॉलेजच्या शिपायांना न जुमानता स्टेजवर चढून कशाचीही तमा न बाळगता नृत्याच्या नावावर धिंगाणा घालणे.. हे आणि असे बरेच काही.. आम्हा दोघांच्या डोळ्यासमोर तरळू लागले. त्या रात्री या सार्‍या आठवणींना उजाळा दिल्याबद्दल अभीला धन्यवाद देतच आम्ही झोपलो.

.
.
---------------------------------------------------------------------------------------------------
---------------------------------------------------------------------------------------------------
.
.

आज हे सारे आठवायचे कारण म्हणजे आज तो पुन्हा दिसला होता. मुलाच्या कॉलेजच्या कामाच्या संदर्भातच वडाळ्याला जाणे झाले होते. काम आटोपले तसे जवळच्या उपहारगृहात नाश्ता करायला म्हणून गेलो. बाहेर कॉलेजच्या मुलांचा गोंगाट चालू होता. या परीसरात ३-४ कॉलेजेस असल्याने, आणि ही नेमकी मोक्याची जागा असल्याने इथे कॉलेजयुवकांचा वावर तसा जास्तच असायचा. माझी पेटपूजा संपवून सवयीप्रमाणे धूम्रपान करायला म्हणून मी हॉटेलबाहेरच्याच टपरीवर गेलो. एक विल्स शिलगावली आणि आजूबाजुच्या युवावर्गाला न्याहाळू लागलो. समोरच एक मुलांचा ग्रूप दिसला. सुरुवातीला थोडावेळ त्यांचे काय चालू होते ते समजले नाही, पण जे काही चालू होते ते काय चालू आहे हे जाणून घ्यायची उत्सुकता वाढवणारे मात्र नक्की होते.

एका दगडाभोवती सारे जमले होते. दगड दिसायला साधासुधाच होता. नाही म्हणायला आकार गोल गरगरीत होता. शेंड्याचा भाग जरा चपटा होता आणि त्याच जागी गुलाल, हळद-कुंकू वगैरे शिंपडलेले होते. हे ही काय कमी म्हणून त्याच्या बरोबर मधोमध एक टाचण्या टोचलेले लिंबू ठेवले होते. पूजा करत होते की चेटूक-करणी काही समजायला वाव नव्हता पण सारे भक्तीभावाने त्या दगडासमोर गुडघ्यावर बसून काहीतरी मंत्र पुटपुटत होते. जे काही होते ते आजूबाजुच्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी पुरेसे होते एवढे नक्की आणि मी देखील त्याला अपवाद नव्हतो. खरेच मंत्रपठण करत आहेत की असेच काहीतरी बडबडत आहेत हे बघण्यासाठी म्हणून मी त्यांचे चेहरे निरखून पाहू लागलो आणि.... आधी तो दिसला... आणि बाजूलाच त्याचा जाड्या मित्र... त्यांच्याबरोबरची मुलगी मात्र तिथे जवळपास कुठे दिसत नव्हती. पण हा अभीच होता.. आणि क्षणार्धातच माझी ट्यूब पेटली की त्यांचे नक्की काय चालू असावे. हा नक्कीच खुफियापंक्तीचाच एक प्रकार होता.

आता मी औत्सुक्याने आजूबाजुंच्या बघ्यांचे चेहरे न्याहाळू लागलो. यावेळी त्यांचा टारगेट ग्रूप होता तो जवळच्या झेरॉक्स सेंटरवर जमलेल्या पोरी.. चेहर्‍यावरून आणि पेहरावावरून सार्‍याजणी हायफंडू वाटत होत्या. त्यांची नक्की आपसात काय खुसफूस चालू होती कल्पना नाही पण नक्कीच या मुलांकडे बघून आणि कदाचित यांच्याबद्दलच बोलत असाव्यात. अभी आणि त्याच्या ग्रूपचे लक्ष्य नक्कीच त्यांना इंम्प्रेस करणे नसून केवळ त्यांचे लक्ष वेधून घेणे एवढेच असावे आणि आतापर्यंत तरी ते त्यात यशस्वी झाले होते. आता ते पुढे काय करतात याची मी पुन्हा एकदा उत्सुकतेने वाट पाहू लागलो. कारण एवढ्यावरच थांबेल तो अभी कसला याची मला खात्री होती.

थोड्यावेळातच त्यांचा मंत्रजाप संपला आणि अभीने पुढची सारी सुत्रे आपल्या हाती घेतली. खिशातून हळदीची पुडी काढून त्याने प्रत्येकाच्या माथ्यावरून हळदीची बोटे फिरवायला सुरुवात केली. स्वताच्याही लाऊन घेतली. त्यांच्यातल्या एकाने मग जवळपासच्या दुकानातून एक नारळ आणला आणि एकाच फटक्यात त्याच दगडावर खाड करून फोडला. त्या नारळातील पाणी आधी दगडावर आणि नंतर आजूबाजुच्या आपल्या मित्रांवर शिंपडून, खिशातून कटर काढून खोबर्‍याचे तुकडे करायला घेतले. अभीने ते सारे तुकडे एका थाळीत जमवून प्रसाद म्हणून सर्वांना वाटले. प्रत्येक जण ते प्रसादाचे खोबरे खाण्याआधी डोक्याला लाऊन, "जय मा भद्रकाली", "बम बम भोले" असे काही ना काही ओरडत होता. थोडक्यात पुरेशी वातावरण निर्मिती झाली होती.

अजूनही काही खोबर्‍याचे तुकडे त्या थाळीत शिल्लक होते. साथीला हळदही होतीच. त्यात अभीने कसलासा फोटो ठेवला आणि ती थाळी घेऊन आपला मोर्चा त्या मुलींच्या ग्रूपकडे वळवला. मनात आले की त्या मुलींना कदाचित माहीतही नसेल की किती गोड संकट त्यांच्या दिशेने चालून येत आहेत. त्यातील सर्वात सुंदर आणि स्मार्ट मुलीच्या समोर जाऊन तो उभा ठाकला..

बर्‍याचदा ग्रूपमधील सर्वात सुंदर मुलगी त्या ग्रूपची लीडर असते या तर्काने अभीने तिला टारगेट केले होते की त्याला ती आवडली होती हे त्याचे त्यालाच ठाऊक. पण त्याने अगदी साळसूदपणे आपल्या हातातील थाळी तिच्या समोर धरली आणि तिला प्रसाद घेण्यास सांगितले. तशी ती मुलगी तयार नाही झाली. साहजिकच होते म्हणा.. एवढा वेळ तिने यांची पूजा पाहिली होती. ती देखील इतक्या विचित्र पद्धतीची. गुलाल-कुंकू, टाचणी टोचलेले लिंबू, नको नको त्या आवाजात उच्चारलेले मंत्र... बस एखादे कोंबडे वगैरे कापायचे शिल्लक ठेवले होते.. तर, तिने तो प्रसाद स्विकारण्याचा प्रश्नच नव्हता. तसा अभी मागे वळून ओरडला, "ये बाब्बो, पोट्टी प्रसाद घेत नाय रं...." त्याची ती भाषा आणि तो हेल ऐकून मला खुदकन हसायलाच आले.

पण बाब्बो की बाब्या मात्र तिथून ओरडला... ओरडला कसला खेकसलाच... "कसं नाय घेणार बा.. दगडूबाचा प्रसाद न्हव का तो.. उगा त्यांना भी पाप लागल अन आपल्याला भी लागल ना भौव..."

"ओ अभ्याव, इनंती कर त्यांना इनंती.." बाब्याचा आदेश मिळताच अभ्याने म्हणजे आपल्या अभीने त्या मुलीच्या समोर गुडघे टेकून अक्षरश: लोटांगणच घातले. फक्त नाक घासायचे तेवढे बाकी होते. एका हातात प्रसादाची थाळी नसती तर ते देखील केले असते. जणू काही त्याची मोठी चूक झाली आहे आणि त्याबद्दल माफी मागून तो गयावया करत आहे. लांबून पाहणार्‍याला असेच वाटले असते. पण त्या मुलीला मात्र आपलीच चूक झाली जे आपण या वेळी इथे आलो असे वाटत असणार हे नक्की. पण अजूनही ती दाद देत नव्हती हे पाहून अभी’ने आपला मोर्चा इतर मुलींकडे वळवला. तशी त्यांची एकच धांदल उडली. "हे स्टॉप इट.. आर यू क्रेझी... हेय, सम वन टेल हिम टू स्टॉप धिस नॉनसेन्स.. ओह गॉड.. ओके, चिल चिल चिल.. लेती हू मै प्रसाद.. प्लीज गेट अप.. एन स्टॉप धिस..." असे बोलून तिने अभीला उठवले आणि त्याच्या थाळीतला प्रसाद घेतला. तसे अभीने तिला हाताच्या इशार्‍यानेच तो माथ्याला लाऊन खाण्यास सांगितला. तिने तो प्रकार मगाशी पाहिला होता आणि तिनेही तो चक्क तसेच "जय बाप्पा" करत खाल्ला. पाठोपाठ तिच्या मैत्रीणींनीही तिचे अनुकरण केले. काय दहशत निर्माण केली होती पोराने. उगाचच त्याचे कौतुक वाटले.

त्यानंतर त्याने तीच थाळी समोर करून त्या पहिल्यावाल्या मुलीकडे दक्षिणेची मागणी केली.
"अब क्या पैसे भी देणे है..??" तिने वैतागतच विचारले.
तसे अभीने काही न बोलता थाळीतल्या फोटोकडे बोट दाखवले. जणू काही पैसे आम्हाला नको तर देवासाठी हवे आहेत हे सुचवायचे होते.
यावेळी तिने जास्त वाद न घालता दोनेक रुपयांचे नाणे थाळीत टाकले. अभी’ने ते हातात उचलून उलटसुलट करून नापसंती व्यक्त करत पाहिले आणि परत मागे वळून बाबूलाही ते नाणे हातात धरून नाचवून दाखवले. आता बाबू पुन्हा काही बोलणार आणि हा परत गोंधळ घालणार याची कल्पना येऊन त्या पोरींनी आपापसात काहीतरी सल्लामसलत केली आणि त्या मुलीने पटकन पर्समधून एक दहाची नोट काढून त्याच्या थाळीत टाकली. अभी’ने आनंदानेच त्याचा स्विकार करून थाळी पुढच्या मुलीकडे सरकावली. मला वाटले इथूनच ओरडावे, अरे बाबा पुरे झाले आता, किती छळशील अजून त्यांना... पण त्या आधीच त्या मुलीने त्याला हटकले, "मैने दे दिया ना.. बस हो गया.. हम सब साथ मे ही है.." पण अभी मात्र तिच्या बोलण्याकडे लक्ष न देता आपली थाळी पुढे पुढे सरकवतच होता. बघता बघता अजून दोघीतिघींनी दोन-पाच रुपये त्यात टाकलेच.

आजवर आयुष्यात बसच्या रांगेत, ट्रेनच्या डब्यात, मंदीराच्या बाहेर भिकार्‍यांचे बरेच अनुभव घेतले होते, पण हा मुलगा मात्र स्वता भीक मागण्याचा अनुभव घेत होता. याबद्दल खरेच त्याचे कौतुक करावे की आणखी काय हे समजत नव्हते. असे बरेच किस्से त्याच्या आयुष्यात घडत असणार जे जाणून घ्यायची इच्छा माझ्या मनात निर्माण झाली.

जवळपास २०-२२ रुपयांची दक्षिणारुपी कमाई करून अभी परतला. त्या मुलीही जराही वेळ न दवडता आपले काम आटोपून निघून गेल्या. आजूबाजूच्या एक-दोन दुकानदारांनी अंमळ कौतुकानेच त्याला एकदोन शिव्या हासडल्या. कदाचित त्यांच्यासाठी ही नेहमीची करमणूक असावी. अभीने थाळी एका मित्राच्या हातात दिली आणि नारळाचे पैसे चुकते करून उरलेल्याच्या सिगारेटी आणायला सांगितल्या. एकेक झुरका मारुन सारे पांगले आणि अभी व त्याचा जाड्या मित्र हे दोघेच उरले. उपहारगृहाच्या समोरच्याच कट्ट्यावर दोघेजण कटींग चहा पित बसले होते. एक चहा मी देखील मागवली आणि त्यांना जॉईन झालो. काहीतरी सुरुवात म्हणून त्यांच्याकडे बघून ओळखीचे हसलो. पण त्यांनी मला ओळखणे तसे शक्यच नव्हते, आणि माझी अपेक्षाही नव्हती. तसे मग मीच म्हणालो, "तू तोच ना तो ट्रेनमध्ये निवडून चिवडून भेळ खाणारा आणि कॅलक्युलेटरवर फोन लावणारा.."

"आं.. हो.." तो ओशाळल्यागत हसला. पण त्यातही आपण करत असलेले हे कारनामे आणि त्यावरून कोणीतरी आपल्याला ओळखते याचे अभिमानास्पद कौतुक त्याच्या चेहर्‍यावर झळकत होते.

"आणि तू ही त्याचाच जोडीदार नाही का?" त्याच्या जाड्या मित्राकडे बघत मी त्यालाही संभाषणात ओढले.

"बरं, नावं काय तुमची?"

"...........??"

"अरे लाजताहात की घाबरत आहात, मी काही पोलिस किंवा पत्रकार नाही रे बाबा.. उलट आपल्याला आवडला हा तुमचा सारा टाईमपास." असे मी म्हणालो तसे ते जरा खुलले.
अभीचे नाव मला आधीच माहीत होते. त्याच्या मित्राचे नाव अंकुश होते हे देखील समजले. जवळच्याच वीजेटीआय कॉलेजमध्ये शिकायला होते. ईंजिनीअरींगच्या टॉपच्या कॉलेजेसपैकी एक.. हे मला अंकुशकडूनच समजले.

"अरे वा.. म्हणजे नुसते मस्तीतच नाही तर अभ्यासातही हुशार दिसता", मी कौतुकाने म्हणालो.

"हा, तसे आपण बोलू शकता.. अजूनपर्यंत मला के.टी कधी लागली नाही, आणि हा अभी तर आमच्या क्लासचा टॉपर आहे.." अभीपेक्षा जास्त त्याचा मित्रच बोलत होता. अभीसाठी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देखील तोच देत होता. मला थोडेसे नवलच वाटले. अनोळखी लोकांसमोर, चारचौघात कसलीही तमा न बाळगता बिनधास्त वागणारा हा मुलगा प्रत्यक्षात मात्र बर्‍यापैकी लाजरा होता. पण बुजरा नक्कीच नव्हता. त्याला बोलते करायला थोडा वेळ जाऊ देणे गरजेचे होते. मला त्याच्याबद्दल, त्याच्या फॅमिलीबद्दल, त्याच्या खुफियापंक्तीबद्दल बरेच काही ऐकायचे होते पण आज त्याच्या तोंडून काही बाहेर पडेल असे वाटत नव्हते.

इतक्यात अंकुश सिगारेट आणायला म्हणून उठला. इतरवेळी मी वडीलधारी माणसाचा आव आणत, "बस रे, जास्त सिगारेट पिणे चांगले नसते" असे नक्की म्हणालो असतो.. पण आता मात्र काही न बोलता त्याला जाऊ दिले. आता तिथे मी आणि अभी, दोघेच उरलो होतो. मी अभीकडे पाहून हसलो तसे त्यानेही हलकेच हसून प्रतिसाद दिला पण चेहर्‍यावरील संकोच स्पष्ट जाणवत होता. "कुठे राहतोस? काय करतोस?? घरी कोण असते??" त्याच्या आवडी निवडी वगैरे बरेच काही प्रश्न तोंडात आले होते पण समोरून खुलून उत्तरे आली नसती याची खात्री होती. म्हणून मग मी त्याच्या आवडीचा विषय काढला..

"काय मग, हा पण खुफियापंक्तीचाच प्रकार होता का?" तसा तो खुलला.. आपला खुफियापंक्ती हा शब्द समोरच्या माणसाला माहीत आहे आणि त्याला याचे कौतुकही आहे हे बघून त्याला बरे वाटले.

"अं.. हो.. ते आपले असेच.. शेजारच्याच कॉलेजच्या मुली होत्या.. नवीन असाव्यात.. या आधी कधी दिसल्या नाहीत.. म्हणून जरा.."

"अरे वा.. शेजारच्या कॉलेजच्या मुलींची देखील बरेच खबर ठेवता रे.." असे मी म्हणताच जरासा लाजला.

"बरं मग.." मी त्याला पुढे बोलता करायला विचारले.

"काही नाही बस्स.. जराशी रॅगिंग घेत होतो.."

"रॅगिंग नको म्हणून रे, तुझ्या तोंडी तो शब्द बरोबर नाही वाटत. मला तरी कुठल्याही प्रकारची रॅगिंग नाही वाटली ती. उलट छान मजा आली. त्या मुलीही नंतर हा किस्सा आठवून एकेकाला रंगवून सांगतील हे नक्की.. मागे तुझे ट्रेनमधील सारे किस्से मी माझ्या बायकोलाही सांगितले होते. आम्हाला आमचे कॉलेजचे दिवस आठवले. आता तुला यात काय मजा येते ते तुझे तुलाच ठाऊक, पण आमच्यासाठी तरी हा निखळ आनंदाचा अनुभव असतो.." एका दमात अभीचे बरेच कौतुक केले होते मी.

"बस जेवढे आयुष्य उरलेय त्याचा स्वताही आनंद लुटतोय आणि इतरांनाही खुश ठेवायचा प्रयत्न करतोय." त्याने हसतच एक बॉंम्ब टाकला... जो माझ्या डोक्यात फुटायला बराच वेळ लागला..

"का रे बाबा.. आतासा वीस-बावीस वर्षांचा असशील फार तर.. अजून चांगले सत्तर-ऐंशी वर्षे जगशील.."

"पण डॉक्टरांनी तर अजून फक्त सहा महिने सांगितले आहेत..." डोक्यात खळकन बल्ब फुटून अंधार व्हावा तसे त्या दोन्ही वाक्यांचा अर्थ एकदम लागल्यावर झाले.

"..........??"

"...........!!!"

"काय झाले आले तुला..?" किंचित अविश्वासानेच मी त्याला विचारले.

"कॅन्सर आहे म्हणतात कसलातरी... सायंटीफिक नाव बरेच लांबलचक आहे.. स्पेलिंग पाठ करण्यातच उरलेले आयुष्य संपायचे.." तो हसतच उत्तरला..

मी तसाच त्याच्याकडे बुध बनून बघत बसलो होतो. या हसर्‍या निरागस चेहर्‍यामागे एवढे भीषण वास्तव असू शकते हे पचवायला जडच जात होते. अजूनही मला वाटत होते की यामागेही नक्कीच काहीतरी मस्करी असणार याची. अजूनही त्याच्या चेहर्‍यावर हास्यच होते.. फक्त डोळे तेवढे काहीतरी वेगळे भाव व्यक्त करत होते. मी त्याच्या नजरेत बघून त्यामागील खरेखोटे जाणून घ्यायचा प्रयत्न करू लागलो तसे त्याने भुवया उंचावून डोळे ताणून धरले, जणू काही स्वत:च्याही नकळत आपल्या अश्रूंच्या बांध तर फुटणार नाही ना याची त्याला भिती वाटत होती, आपला रडवेला चेहरा लोकांना दिसू नये याची तो काळजी घेत होता. आणि ही काळजी तो नक्की कोणासाठी घेत होता.. स्वतासाठी.. की त्याच्यावर प्रेम करणार्‍यासांठी.. की ज्यांच्यावर तो प्रेम करत होता त्यांच्यासाठी... कधी कधी आयुष्यात असे क्षण येतात की जगात देव आहे की नाही यावर विश्वास ठेवणे कठीण होऊन बसते.. माझेही तसेच झाले होते.. माझे स्वताचे वय पंचेचाळीस होते.. ना कसला रोग, ना कसला आजार.. कोणाची दृष्ट नाही लागली तर सहज अजून वीस-पंचवीस वर्षे जातील असा मी.. आणि हा मात्र.... मला त्याच्या नजरेत फार वेळ बघवले नाही. त्याच्या आधी मीच खचलो आणि माझी नजर फिरवली.... आणि.... आणि तो चक्क खळखळून हसायला लागला.

थोड्याच वेळापूर्वी मी मनोमन प्रार्थना केली होती की देव करो आणि हा मला फसवत असो.. पण आता मात्र त्याचे हसणे मला जिव्हारी लागत होते. मला तो चिडवतोय, माझ्या भावनांची टींगल उडवतोय असे वाटू लागले.
"गंमत केली हो.. फारसे मनावर घेऊ नका.."

.... "गंमत??" .. ही असली गंमत.. ही हसण्यासारखी गंमत नव्हती असे मला ठणकावून सांगावेसे वाटले.. पण त्याच्या या जीवघेण्या थट्टेचा मला त्रास झाला होता तो देखील याच मुळे की दोनच भेटीत कुठेतरी माझ्या मनात त्याने घर केले होते. आणि हे आता या क्षणी मला त्याच्यासमोर कबूल करायचे नव्हते..

"ही मस्करी होती तर..." थोड्याश्या उपरोधिक स्वरातच मी त्याला विचारले.

"नाही तर काय... सहा महिने कसले.. वर्ष निघेल आरामात......." मला आणखी एक धोबीपछाड देऊनच तो हसत चहाचे पैसे देण्यासाठी म्हणून उठला.

मला गोंधळलेल्या अवस्थेत सोडून तो निघून गेला आणि अंकुश तिथे आला. अभी’ला हसत जाताना पाहून सहजच मला म्हणाला, "खूप हसवतो ना हा.."

"हम्म... खरेच खूप हसवतो." मी काहीतरी बोलायचे म्हणून बोललो.

"पण जाताना खूप रडवून जाणार आहे....." पुन्हा एकदा काळजात काहीतरी तुटल्यासारखे वाटले..

सिगारेटच्या धुरातही अंकुशच्या भिजलेल्या पापण्या लपत नव्हत्या. पण माझे लक्ष कुठे होते तिथे. मी तर देवाने केलेली सर्वात मोठी खुफियापंक्ती बघत होतो, जी मला या क्षणी पाठमोरी दिसत असूनही तिच्या चेहर्‍यावरील बेफिकीर भाव जाणवत होते.

...तुमचा अभिषेक

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

चिमुरी.. धन्स.. माझे खाते खोलायला तू असतेसच.. Happy

निलिमा ... अहो, कथा सांगणारा .. आपले सांगणारे ४५ वर्षांचे ज्येष्ठ नागरीक आहेत हो.. मी नाहीये.. बाकी खरे खोटे देव जाणे.. माझ्यापर्यंत जे आले ते मी तुमच्यासमोर मांडले.. Happy

अभिषेक,
कथा काही प्रमाणात 'स्टिरीओटाइप' वाटली. एका सरळ अंगाने जाणारी. शेवटसुद्धा तसाच वाटला. एका वल्लीबद्दल वाचायला मिळेल असे वाटेपर्यंत एकदम अपेक्षित वळणे घेत कथा संपल्यासारखे वाटले.
हेमावैम.

बाकी तुझी कथाशैली फारच झकास असते. कथेची मांडणीसुद्धा उत्तम. सुरुवातीच्या कथांपासूनच तू एकदम मस्त मांडतोस कथा. तेच इथेपण जाणवले. Happy
पुलेशु.

masttt

.

उदय .. धन्स...

निशदे.. (उर्फ.. निखिल ना..) धन्यवाद रे.. Happy
कथाबीज तेवढेच होते रे.. म्हणजे खरे तर नुसते खुफियापंक्ती हे शीर्षक ठेऊनच कथा मांडायची होती.. किस्से स्वरुपात.. पण झाले काय ना, अचानक आणखी डोक्यात काहीतरी सुचले जे व्यक्तीचित्रण होते.. (जे आता यानंतर लिहायला घेतोच आहे) पण म्हणून मग यालाही व्यक्तीचित्रणाच्या सदरात घातले.. जे मुळात कथा सुरुवात करताना डोक्यात नव्हते..

छान

आणखी एक सुंदर नायक प्रधान कथा.
खुप आवडली
अरे तु नायिकाप्रधान कथा कधी लिहिणार आहेस की नाही??:अओ:

धन्यवाद मित.. Happy

जगावेगळी.. ह्म्म.. हा विचार कधी केलाच नाही.. लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद.. एखादी नायिकाप्रधान लिहायचा नक्की विचार करेन.. Happy

छान. ह्या आधीच्या सर्व कथा वाचल्या आहेत. पण प्रतिसाद आज पहिल्यांदाच देत आहे. छान लिहिता तुम्ही. अजून असेच लिहित राहा.

रेनू.. धन्यवाद.. या प्रतिसादाबद्दल आणि आधीच्या वाचल्याबद्दल.. Happy

रीयाडी.. पुढचे पण तुलाच पहिला.. Happy

व्वा! छान लिहीले आहे, मी नेहमी तुझ्या लिखाणाच्या प्रतिक्षेत असतो. पण या लेखाच्या शिर्षकात मला वाटते योग्य शब्द "खुफियापंक्ती" हा नसुन "खुफियापनती" हा असावा.

चाफ्या.. रचू.. मयुरी .. श्रीमत.. सार्‍यांचेच.. धन्यवाद.. Happy

...................................................................

मानसी.. वडाळ्यावरून बांद्रा अंधेरी ट्रेन आहेतचे की.. पण दिवसाला केवळ १ की दोन ट्रेन आहेत अश्या ज्या जातात थेट बोरीवली.. कथानकात अभी उतरल्यानंतरही काकांचा प्रवास दाखवायचा होता म्हणून ती ट्रेन वापरली.. बाकी हवे असल्यास मी इथे पुरावा म्हणून ट्रेनचे टाईमटेबल टाकू का.. Happy

...................................................................

आजम.. पहिले तर लिखाण आवडते या प्रतिसादाबद्दल धन्यवाद,
आणि हो, कदाचित पनती हे असावे.. जसे शहाणपनती वगैरे.. पण तसेही मला वाटते खुफियापनती असो वा पंक्ती असो हा मूळ शब्द नसावा.. तसे असेल तर आपण हवे ते स्वातंत्र्य घेऊ शकतो ना.. Happy

धन्यवाद कल्पुजी..
आणि हो शेवट थोडासा फिल्मी होता खरे.. पण म्हणून मी तो फारसे सेंटी डायलॉग न मारता थोडक्यात आटपायचा प्रयत्न केला, जेणे करून खुफियापंक्तीचे किस्से कथेच्या मध्यभागी राहतील..

या कथेतल्या त्या अतरंगी अभी ला मरायला कशाला टेकवलेस? नुस्तेच त्याचे खुफियापन्ती किस्से मस्त वाटत होते वाचायला, अशी पात्र असतातच आपल्या अवतीभवती पण निरिक्षणाने त्याच्यात कथाबीज शोधणे आणि लोकांना न कंटाळा येऊ देता त्यात इंटरेस्ट निर्माण करणे ही पण एक कलाच आहे जी तुला चांगली अवगत आहे Happy

अभिषेक, कथा चांगली फुलवतोस फक्त शेवट करताना स्टिरिओटाइप करतोस, त्याचं कर रे काहीतरी Happy

अमृता अन अमित... धन्यवाद.. Happy

मंसोजी.. लवकरच मी एक कथा लिहून ती इथे उलट्या क्रमाने प्रकाशित करायच्या विचारात आहे.. Happy
सूचनेचा नक्कीच विचार चालूय.. Happy

Pages