महाराष्ट्राची लोकधारा

Submitted by विशाल कुलकर्णी on 29 May, 2012 - 11:34

काही दिवसांपूर्वी धाकट्या बहिणीच्या पिल्लांना घेवून गणेश कला क्रिडा मंचावर भरलेल्या बालजत्रेला जायचा योग आला. लहान मुलांना भुलावून घेतील, मोहवतील अशा अनेक गोष्ट होती. आमच्या सौ., बहिण, तिची पिल्लं मस्त रमली तिथे. पण माझ्या मनात भरलं एक छोटंसं शिल्पकलेचं प्रदर्शन. बहुदा शाडु किंवा प्लास्टर ऑफ पॅरीसपासून बनवलेल्या काही मोजक्याच सुबक मुर्ती. पण केवळ शिल्पकला एवढीच त्या प्रदर्शनाची ओळख नव्हती. त्याचं वैशिष्ठ्य होतं त्यातल्या महाराष्ट्राच्या लोकधारेतील काही महत्त्वाच्या आणि आजकाल अस्तंगत होत चाललेल्या घटकांचं, परंपरांचं चित्रण ! मुर्ती काही फार सुबक वगैरे नव्हत्या पण जे काही होतं ते विलक्षण सुखावणारं, त्याहीपेक्षा आपल्या संस्कृतीची, तिच्या काही घटकांची ओळख करुन देणारं होतं. श्री. विनोद येलारपुरकर यांच्या 'व्यक्तीशृंखला' नावाच्या या प्रदर्शनाची एक झलक मायबोलीकरांसाठी....

वासुदेव :
आजही खेड्यापाड्यातून सकाळच्या प्रहरी मोराची टोपी घातलेला एक माणुस येतो . हरिनाम बोला हो वासुदेव बोला म्हणत लोकांमध्ये धर्मभावना जागृत करण्याचं, दिवसाची सुंदर , पवित्र सुरुवात करुन देण्याचं काम हा 'वासुदेव' इमाने इतबारे करत असतो. कुणी मावल्या मग त्याच्या झोळीत पसाभर धान्य टाकतात आणि तो संतुष्ट होवून 'वासुदेव बोला, हरिनाम बोला' करत पुढच्या दाराकडे वळतो. डोक्यावर मोरपिसांची किंवा निमुळती होत गेलेली कपड्यांची लांब टोपी, गळ्यात कवड्याच्या माळा, घोळदार अंगरखा,त्याखाली धोतर, कमरेला शेला, त्यात रोवलेली बासरी, पायात चाळ, एका हातात पितळी टाळ तर दुसर्‍या हातात चिपळ्या आणि मुखात अखंड हरिनाम घेत दिवसाची प्रसन्न सुरूवात करुन देणारा वासुदेव आजकाल तसा दुर्मिळच होत चालला आहे. खेडोपाडी अवचित दिसतो तरी, शहरांतून मात्र तो कधीच अदृष्य झाला आहे. मुळातच कृष्णभक्ती हा त्याच्या आयुष्याचा पाया असल्याने त्याच्या मुखात शक्यतो कृष्णलीला वर्णन करणारीच गाणी असतात. खरेतर वासुदेव ही समाज प्रबोधन करणारी एक संस्थाच आहे, होती असे म्हणायला हरकत नाही. अर्थात 'वासुदेव' या परंपरेची सुरुवात नक्की कधी झाली कुणास ठाऊक पण ती किमान १०००-१२०० वर्षापुर्वीची तरी नक्कीच असावी. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव यांनी' वासुदेवावर' लिहीलेली रुपके आजही उपलब्ध आहेत.

मुरळी :
देवदासी, भाविणी, जोगतिणी यांच्याच पंथातील अजुन एक मुख्य व्यक्तित्व म्हणजे मुरळी. श्री खंडोबाच्या सेवेत आपले सर्व आयुष्य वाहणार्‍या वाघ्याची सखी, जोडीदारीण. महाराष्ट्रातील अनेक प्रथा - परंपरांप्रमाणे ही एक प्रथा. कायद्याने बहुदा आज या प्रथेवर बंदी आहे. तरीही आजही महाराष्ट्रात, गोव्यात भाविणी, जोगतिणी, देवदासी आणि मुरळ्या आढळतातच. प्रथेनुसार यांचे देवाशीच लग्न लागलेले असते. आयुष्यभर देवाच्या सेवेत आपले सर्वस्व वाहून सेवा करत राहायचे हे यांचे जीवनमान. (अर्थात या प्रथा परंपरांचा तत्कालिन समाजाच्या अर्ध्वयुंकडून बर्‍याच प्रमाणात गैरफायदाही घेतला गेला, घेतला जातो) असो. ओचे न सोडता नेसलेले नऊवारी लुगडे, गळ्यात कवड्यांच्या माळा आणि लल्लाटी भंडार म्हणजेच भंडार्‍याने माखलेले कपाळ, एका हाताने घोळ (म्हणजे एक प्रकारचे घंटावाद्य) वाजवत, नाचत देवाचे नाव घेणारी मुरळी. पुर्वी अपत्यप्राप्तीसाठी केलेला नवस फेडण्यासाठी आपले पहीले मुल देवाच्या चरणी वाहीले जाण्याची एक प्रथा होती. त्यांनी देवाच्या सेवेत आपले आयुष्य व्यतित करायचे असा संकेत असे. हेच वाघ्या आणि मुरळी.आपल्याकडे महात्मा फुले आणि त्यांच्यासारख्या इतर काही समाज सुधारकांनी समाज प्रबोधन करुन या प्रथेवर कायद्याने बंदी आणली तेव्हापासून वाघ्या-मुरळीची ही प्रथा बंद करण्यात आली. तरीदेखील आजही काही भागात वाघ्या - मुरळी आढळतातच.

वारकरी :
'विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल' किंवा 'ग्यानबा तुकारम' च्या गजरात हातातल्या टाळ चिपळ्या वाजवत बेभान होत त्या सावळ्या विठुची आळवणी करणारे वारकरी कुणाला माहीत नाहीत? वारकरी संप्रदायाची सुरुवात बहुदा ८०० वर्षापुर्वी झाली असावी. ज्ञाना - नामा - चोख्याच्या कालखंडादरम्यान. दरवर्षी पंढरपूरात चैत्र, आषाढ, माघ आणि कार्तिक महिन्यात भरणार्‍या यात्रेत आजही दर वर्षी भक्तजनांची संख्या वाढतेच आहे. या यात्रेला जावून, विठुच्या पायी मस्त्क टेकवून, त्याचे सावळे मनोहर रुप डोळ्यात ठसवत घरी परत येणे याला वारी असे म्हटले जाते. आणि अशा वारीला नियमीतपणे हजेरी लावणारा, विठुच्या भक्तीत लीन होणारा, त्याच्या सावळ्या वर्णात आकाशाची निळाई शोधणारा भक्त म्हणजे वारकरी. साधा सदरा, धोतर, पायी चपला हातात टाळ् - चिपळ्या कधी मृदंग तर कधी पखवाज, डोक्याला टोपी किंवा पागोटं असं वारकर्‍यांचं सर्वसाधारण रुप असतं. स्त्रीयांही मागे नाहीत बरं का. आळंदीपासून डोईवर तुळशी वृंदावन घेवून पंढरपूरापर्यंत चालत वारी करणार्‍या स्त्रीयांची संख्या पुरुषांच्या बरोबरीने असते बरं. आजकाल देशातल्या सुशिक्षीत, शर्ट - पँट, बुट घालणार्‍या तरुणाईलाही त्या विठुचं वेड लागलेलं दिसून येतं. त्यामुळे एखाद्या वारीतल्या मुक्कामी आपला लॅपटॉप उघडून बसलेला वारकरी दिसला तर नवल करु नका. राज्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणाहुन हे वारकरी बहुतांशी चालतच विठुमाऊलीच्या भेटीची ओढ मनात घेवून निघतात. ओठात कधी ज्ञानबाच्या ओव्या, कधी तुकोबा - चोखोबांचे अभंग, कधी नामयाची भारुडे अगदीच काही नाही तर अखंड विठुनामाचा गजर करत ही भाविक मंडळी आपल्या विठुमाऊलीच्या दर्शनाला निघतात. एकदा वारीत उतरलात की तिथे लहान, मोठा, गरीब, श्रीमंत, काळा गोरा असले कुठलेही भेद राहत नाहीत. तिथे प्रत्येक जण फक्त विठुचा भक्त असतो. एवढेच काय तर वारीत एकमेकांशी बोलताना देखील एकमेकांना 'माऊली' म्हणूनच संबोधायची पद्धत आहे. आयुष्यात एकदातरी हा अनुभव घ्यायलाच हवा प्रत्येकाने. मुक्कामाच्या ठिकाणी मग वारकरी कधी भजन, प्रवचन, किर्तन करुन तर कधी रिंगण, चक्रीभजन यासारखे खेळ खेळून दिवसभराचा शिणवटा घालवतात. रात्रभर कुठल्यातरी गावात मुक्काम करुन सकाळी परत पुढच्या प्रवासाला निघतात. अशा वेळी मुक्कामाच्या ठिकाणी त्या त्या गावातील लोक वारकर्‍यांच्या राहंण्याची, भोजनाची सोय करतात. त्यातुनही वारी केल्याचे पुण्य मिळते असा समज आहे. अशा वेळी खेडेगावातील घरा घरांमधुन वारकर्‍यांना आपल्या घरी मुक्कामाला, जेवायला घेवून जाण्यासाठी लोकांची चढाओढ लागते.

पिंगळा :
पिंगळा किंवा पांगुळ ही एक भिक्षेकर्‍यांची जात आहे. सुर्यदेवाचा शरीराने पांगळा असलेला सारथी 'अरुण' याचे प्रतिनिधी म्हणून हे पिंगळे ओळखले जातात. अरुणाचे प्रतिनिधी म्हणून ते अरुणोदयाच्या आधीच दारात येतात आणि 'धर्म जागो' अशी शुभकामना व्यक्त करुन दान मागतात. देवाला वाहीलेल्या पांगळ्या मनुष्यापासुन, अरुणापासून त्यांची उत्पती झाली म्हणुनही त्यांना पांगुळ म्हटले जात असावे. शक्यतो हे पांगुळ पहाटेच्या वेळी झाडावर किंवा भिंतीवर बसून येणार्‍या जाणार्‍यांकडून दान मागतात. खांद्यावर घोंगडी, धोतर, डोक्यावर रंगीबेरंगी गोधड्यापासून बनवलेली टोपी, काखेला झोळी, हातात घुंघराची काठी आणि कंदिल असा त्यांचा पोषाख असतो. महानुभावांच्या लीळाचरित्रात, तसेव नामदेव्-ज्ञानदेवांच्या साहित्यात पांगुळांचे उल्लेख आढळतात. हे 'पांगुळ' मुख्यत्वेकरुन दक्षीण महाराष्ट्रात आढळतात. त्यांच्या बायका गोधड्या शिवतात, घोंगड्या तुणतात व त्या विकुन तसेच पांगुळांनी मागुन आणलेल्या भिक्षेवर, दानावर त्यांची गुजराण चालते.

फकिर :
स्वत; भणंग राहून, भिक्षा मागुन मोहम्मद पैगंबरांची शिकवण समाजात रुजवण्याचे महत्कार्य करणारा हा एक पंथ. अल्लाचे सच्चे उपासक असलेले फकिर हजरत पैगंबरांच्या शिकवणीनुसार संन्यस्त वृत्तीने, निरपेक्षपणे आपले काम काम करत असतात. अंगात हिरवी किंवा काळी कफनी, डोक्यावर रुमाल बांधलेला, गळ्यात रंगी बेरंगी काचमण्यांच्या माळा, हातात मोरपीसांचा गुच्छ, धुपदाणी, खांद्याला अडकवलेली भिक्षेची झोळी आणि मुखी अल्लाहतालाचे पवित्र नाम असे फकिरांचे सर्वसाधारण स्वरुप असते. डोक्यावर केस आणि दाढी कायम राखलेली असते. भारतासह अनेक राष्ट्रांमध्ये पसरलेल्या मुस्लिम संप्रदायाबरोबरच हे फकिरही जगभर पदरलेले असतात.

आराधी आणि गोंधळी :
गोंधळी, आराधी, भोप्ये किंवा भुत्ये हे तसे तुळजापूरची भवानी आणि माहुरची रेणुकामाता यांचे भक्त. त्यामुळे त्यांच्या गीतांमध्ये तुळजाभवानी आणि रेणुकामाता या दोन्ही देवतांचे एकात्मक रुप आढळते. भुत्या किंवा गोंधळींप्रमाणे आराधीही देवीचा गोंधळ घालायचे काम करतात. बहुतांशी वेगवेगळ्या देव देवतांच्या किंवा तत्कालिन सामाजाशी संबंधित असलेल्या छोट्या छोट्या कथा, गाणी हे आराधींच्या वांड़मयामध्ये प्रामुख्याने आढळतात. तुळजापुराच्या भवानीमातेच्या पुजा-उपासनेमध्ये आराधींना खुपच महत्व आहे. देवीच्या बिछान्याच्या वेळी हातात पोत घेइन देवीच्या समोर नाचण्याचा पहिला मान आराध्यांचा असतो. नवरात्रात देवीच्या घटांमध्ये जमा झालेला पैसा या आराध्यांना देण्याची पद्धत आहे. (सद्ध्या मात्र हा सगळा पैसा देवीच्या पुजार्‍यांच्याच घशात जातो)

पोतराज आणि कडकलक्ष्मी :
'दार उघड बया आता दार उघड' असं आई मरिआईला आवाहन करत हातातल्या कोरड्यानं (चाबुक) स्वतःच्याच शरीरावर प्रहार करत स्त्री वेशात दारी येणारा पोतराज. जटा वाढवून मोकळे सोडलेले केस किंवा कधी अंबाडा घातलेला, कपाळभर हळदी-कुंकवाचा मळवट भरलेला, कंबरेला अनेक चिंध्यांपासून तयार झालेले घागरावजा वस्त्र पांघरलेले आणि हातात 'कोरडा', गळ्यात मण्यांच्या माळा, कंबरेला सैलसर घुंघराची माळ बांधलेली आनि पायात खुळखुळ्या घातलेला हा पोतराज लहान मुलांमध्ये भीतीचे ठिकाण ठरतो. आपल्या हातातील कोरड्याचे कधी स्वतःच्याच शरीरावर प्रहार करीत तर कधी नुसतेच हवेत 'सट सट' आवाज काढीत तो मरिआईच्या नावाने दान मागतो.

पोतराजाबरोबर बहुतांशी त्याची जोडीदारीण म्हणजे पत्नीही असते. गुडघ्यापर्यंत नेसलेली नऊवारी साडी, हळदी कुंकवाचा मळवट भरलेला, गळ्यात कवड्यांच्या माळा आणि हातामध्ये टिमकी अथवा मृदंगासारखे एखादे चर्मवाद्य आणि डोइवर मरिआईचा पेटारा (बहुदा लक्ष्मीचे उग्र रुप म्हणून मरिआईला कडकलक्ष्मी असेही म्हटले जाते.) घेवुन ते वाजवत, बेभान होवून नाचणार्‍या पोतराजाबरोबर तीही त्याची साथ देत असते. पोतराज आपल्या वैविद्ध्यपुर्ण नृत्याने आणि हातातल्या 'कोरड्याच्या' फटकाराने पोतराज देवीची अवकृपा तसेच संकटे, विपत्ती दूर करतो असे मानले जाते.

आणि या प्रदर्शनातले हे शेवटचे शिल्प. याबद्दल काहीच सांगण्याची गरज नाही. आजपर्यंत मायबोलीवर यांच्याबद्दल इतके काही बरेवाईट लिहीले गेले आहे की त्याबद्दल काही भाष्य करण्याची गरज आहे असे मलातरी वाटत नाही.

विशाल कुलकर्णी

गुलमोहर: 

विशालदा नेहमीप्रमाने मस्तच
मी याची एक प्रिंट काढुन आईच्या शाळेत लावायला देऊ का?
(अर्थातच तुझ्या नावासकट)
म्हणजे तिच्या विद्यार्थ्यांना ही याचा उपयोग होईल?

विशल्या

यातल्या प्रत्येकावर एकेक स्वतंत्र लेख होईल. आज कित्येकांना ही पात्रं माहीतही नसतील. खेडेगावात आजही दिसतात म्हणायला. तिथूनही नामशेष व्हायला खूप कमी कालावधी राहीलेला आहे. हे व्यवसाय आज कोण करणार ?

पुरोहितांना बरे पैसे मिळतात ते समाजाकडे पैसे आले म्हणून. ब्राह्मणांवर टीका होते हे बरोबर. खरं तर माधुकरीची प्रथा, चटकन बदल आत्मसात करण्याची वृत्ती ( अग्नीसंस्कार इलेक्ट्रिक भट्टीत करणे वगैरे) यामुळे हा समाज आघाडीवर आहे. माधुकरीची बरोबरी थेट राजस्थानी सोमवंशीय क्षत्रिय समाजाशी होईल. त्या समाजात गावाकडून एक मुलगा आणला जातो आणि मोठा झाल्यावर समाज त्याला दोन लाखाचं भांडवल आणि मालक तितकेच पैसे देतो. हे ऋण तो गावाकडून एक मुलगा आणून फेडतो.

या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. म्हणूनच तुझ्या लेखाचं कौतुक

विशाल,
शिल्पे चांगली आहेत पण तपशील जरा गोंधळाचे वाटतात.
पोतराज लिहिलेली खरंतर कडकलक्ष्मी आहे. पोतराजाच्या हातात देवीचा जळता पोत असायला हवा ना.
गोंधळ्याचा जो वेष दाखवलाय तश्याच प्रकारचा वेष असतो पोतराजाचा.
पिंगळा/ पांगुळ... कपडे अजिबातच पारंपारीक नाहीत. लंगोट, डोक्याला टापशी, गळ्यात माळ, घुंगराची काठी, खांद्याला झोळी, पायात वाजणारं कडं असा साधारण पांगुळ/ पिंगळाचा वेष असतो.

यातल्या प्रत्येकावर एकेक स्वतंत्र लेख होईल. >>> माझा त्याच दृष्टीने अभ्यास चालु आहे रे. लिहीन निवांतपणे, पण नक्की लिहीन Happy

नीरजा, तू म्हणतेस तसा तपशिलात गोंधळ असण्याची शक्यता आहे. कारण सद्ध्यातरी ही माहिती मी आंतरजालावरुनच मिळवलेली आहे. पण पोतराजाबद्दल मात्र मला खात्री आहे. आम्ही लहानपणापासुन त्याला पोतराजच म्हणत आलो आहे.

हातात जळता पोत घेऊन, गळ्यात कवड्याच्या माळा घालून नाचणारे कोण असतात? तेच पोतराज असं मलातरी माहित होतं. Happy

पोतराज आणि कडकलक्ष्मी बरोबर आहे. हडपसरला वैदुवाडी जवळ पोतराजही आहेत आणि जागरण गोंधळ घालणारेही ( वाघ्या मुरळी ). इथंच कुठेतरी पिंगळा, जागल्या, गोंधळी इ चं प्रशिक्षण देणारी संस्थाही आहे. माझ्या मित्र रोहीत नागभिडे याने टिंग्याच्या गाण्यासाठी इथूनच एक गायक आणला होता. बाळू शिंदे नाव असावं बहुधा त्याचं.. तो टिपेला गेलेला आवाज त्याचाच.

नीधप +१
विशाल, रा.चिं. ढेरे यांचं वासुदेव, पोतराज इ. वर एक पुस्तक आहे छोटंसं. आत्ता नाव आठवत नाहीये. पण जरूर वाच. Happy

विशाल, यातली बहुतेक माणसे, आजही भेटतील. माहिती छानच.
काही घराण्यात लग्नानंतर गोंधळ घालावाच लागतो. त्यासाठी हे कलाकार लागतातच,

नीरजा, त्याच्याच एका हातात कोरडा आणि दुसर्‍या हातात पोत असतो. कडकलक्ष्मी म्हणजे मरिआईचा पिटारा आपल्या डोक्यावर घेवून त्याच्यासोबत असणारी त्याची स्त्री ! खरेतर मरिआईलाच कडकलक्ष्मी म्हटले जाते. पण इथे मरिआईच्या पेटार्‍यासहीत ते वाहणारी स्त्री' या पुर्ण काँबिनेशनला कडकलक्ष्मी असे म्हणण्याची पद्धत आहे. कडकलक्ष्मीच्या आगमनाची वार्ता घेवून येणारा तिचा सेवक म्हणजे पोतराज !

https://www.manase.org/en/maharashtra.php?mid=68&smid=21&did=0&dsid=0&pm...

गुगलवर पोतराज म्हणून एक सर्च देवून बघा म्हणजे मिळणारे फोटो बघून लक्षात येइल.
ही घ्या पोतराज आणि कडकलक्ष्मीची जोडी..

DSCN5954.jpg

विशाल, मस्त लिहिला आहेस लेख. यातल्या सगळ्यांनाच कुठे न कुठे पाहिलं होतं, पण नावं आणि त्यांची पार्श्वभुमी माहित नव्हती. आज ती पुर्ण झाली.

पुर्वी एक पिंगळा 'डहाणुकर'मधे यायचा. पहाटे पहाटे त्याच्या भरदार आवाजात ( कि खडा पहाडी आवाज म्हणायचं त्याला?) कोणतीतरी गाणी म्हणायचा. त्यातलं एखादं देवाचं नाव सोडलं तर बाकी काहीही कळायचं नाही, पण पहाटेच्या वेळेस ते ऐकायला फार छान वाटायचं. हा वासुदेव नाही हे माहित होंतं, पण मग कोण? ते काही कळलं नव्हतं. आज इतक्या वर्षांनी तो सध्य मला इकडे कॅम्पसारख्या भागात परत ऐकु येतो आहे. तुझ्यामुळे इतक्या वर्षांनी त्याचं नाव कळलं.

मस्त माहिती विशाल...:)

मी अंधेरीत अगदी ९६-९७ पर्यंत वासुदेव आणि दिवाळीत वेगवेगळी सोंगं घेऊन फिरणारा पाहिला आहे...बोरीवलीत तर अगदी मागच्या मायदेशवारीत पण वासुदेव सकाळी ऐकला आणि पाहिला आहे...आईच्या सोसायटीत आणि आसपास मराठी लोक आहेत निदान तिथे तरी त्याचं नेहमी येणं असतं असं ऐकलंय....:)

मस्त माहीती विशाल्...........खरेच आज आपल्या मुलांना याबद्दल माहीती देणे गरजेचे वाटते मला तरी..........मुलाला घरी जाऊन दाखवेन आणि माहिती देईन त्याला कळणार्या विंग्लीश मधुन Wink ..... Happy

<< दिवाळीत वेगवेगळी सोंगं घेऊन फिरणारा पाहिला आहे.>>> वेका, तो बहुरुपी ! शक्यतो पोलीसाच्या वेशात फिरतात हे लोक.

धन्यवाद मंडळी Happy

या लेखाबद्दल विशाल तुझे मनःपूर्वक आभार मानताना त्याचबरोबर जोडीने श्री. विनोद येलारपुरकर यांचेही आभार, ज्यानी प्रसंगी खिशाला खार लावून महाराष्ट्राची लोकधारा जतन करण्याचा प्रयत्न केला आहे. काळाच्या प्रवाहात हळुहळू ही धारा लुप्त होईल की काय अशी सार्थ भीती वाटत असतानाच कुठेतरी या परंपरा अखंडपणे, प्रदर्शनाच्या निमित्ताने का होईना, जागृत ठेवीत आहे ही अत्यंत समाधानाची गोष्ट आहे.

कोल्हापूर, निपाणी, बेळगांव भागात 'पोतराज' ला थेट कडकलक्ष्मीच म्हणतात तर 'भुत्या' मात्र जळती मशाल घेऊन शंभू महादेवाचे गुणगाण करीत असतो. शिखर शिंगणापूरच्या महादेवाच्या अभिषेकाची पहिली कावड असते ती अशा 'भुत्या'चीच, इतका मान त्याला दिला जातो.

विशालने ओळख करून दिलेल्या प्रदर्शनात (तेथील जागेअभावी) तेवढीच शिल्पे लोकधारांसंदर्भात असावीत असे वाटते, तरीही वाघे, नंदीबैलवाले, चित्रकथी, बहुरुपी यांचाही कधीतरी तिथे समावेश झाल्यास प्रदर्शनाला पूर्णत्व येईल....अर्थात ही सदिच्छा आहे.

काहीसे अवांतर :

"मुरळी" बाबत लिहिताना विशालने "अर्थात या प्रथा परंपरांचा तत्कालिन समाजाच्या अर्ध्वयुंकडून बर्‍याच प्रमाणात गैरफायदाही घेतला गेला, घेतला जातो"....असा एक शेरा दिला आहे. तो काहीसा दिशाभूल करणारा आहे असे मला वाटते. सीमावर्तीय भाग तसेच कोल्हापूर/सोलापूर भागात 'मुरळी' प्रथा प्रामुख्याने होती. त्या जमातीतील प्रथेनुसार (मग त्या चांगल्या की वाईट ही चर्चा इथे अपेक्षित नाही....) 'मुरळी' ला लग्नाचा अधिकार नाही....तसे निपाणी भागातील 'देवदासी'ही मानतात, पाळतात. जो पर्यंत तारुण्य आहे तोपर्यंतच पुढील भविष्याचा विचार करून ह्या मुरळी आपला "घरोबा" एखाद्या तालेवाराशी पक्का करतात....त्याच्याशी इमानदारीने राहतातही. त्यामुळे 'यजमाना'ला खलनायक समजण्यात अर्थ नाही. ही प्रथा अगदी शेकडो वर्षाची असल्याने ज्याच्याकडे ती राहते त्या जमिनदाराची तशी ऐपत असल्याने त्याच्याही अधिकृत कुटुंबातून त्याला विरोध होत नाही. मुरळीपासून होणार्‍या अपत्यांना जमीनदाराच्या इस्टेटीवर हक्कही सांगता येत नाही. मात्र त्यांच्यासाठी काही प्रमाणात का होईना जमीनजुमल्याची व्यवस्था मुरळीचा यजमान करीत असे. शिवाय मुरळीची व्यवस्थाही वाड्यापासून दूर अंतरावर केली असल्याने गृहकलहही होत नसत.

थोडक्यात या अशा मुरळी 'ठेवण्याला' ठेवणार्‍याने गैरफायदा घेतला असे म्हणणे त्याच्यावर अन्यायकारक होईल कारण दोन्ही बाजूनी तो सर्वमान्य प्रघात होता....आजही तुरळक प्रमाणात का होईना तो चालू आहेच.

अशा रितीवर श्री.किशोर शांताबाई काळे यांच्या 'कोल्हाट्याचं पोर' मध्ये सविस्तर लिहिले गेले आहे.

अशोक पाटील

अशोककाका, सविस्तर प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार !
गैरफायदा या शब्दाबद्दल मी अजुनही ठाम आहे. तुम्ही म्हणता ते मला मान्य आहे. पण सगळ्यांच मुरळ्यांच्या वाट्याला अशीच परिस्थिती येइल असे नाही. एखाद्याच तालेवाराशी संबंध ठेवणं इतपत मान्य (खरंतर आजच्या काळात तेही पटू नये) पण देवालाच वाहीलेली आहे म्हणजे सार्वजनिक मालमत्ता असा समज बहुतेक वेळा करुन घेतला जात असे त्यांच्या बाबतीत. मग गावातले वतनदार, पाटील, गुंड-गारदी यांच्या मुजोरपणाचं भक्ष्य बनणं हे त्यांच्या नशिबी कायम असे. त्यातल्या त्यात गोव्यातल्या भाविणी जरा जास्त नशिबवान ! Happy

धन्यवाद विशालजी!
मी माबो वर नविन आहे. पण तुमचे बरेचसे लिखाण सभासद होण्याआधी वाचले आहे. नेहमी प्रमाणे हा ही लेख छानच आहे! माझ्या माहेरी (कोथरुडला) एक जण पहाटे यायचा. तुम्ही वर्णन केलेल्या "पिंगळा" सारखाच हातात कंदील घेतलेला. पण आम्ही त्यास "गुडगुडीवाला" म्हणायचो.

पिढ्यानपिढ्या घराण्यांचे रेकॉर्ड वा इतिहास जतन करणारी ती जमात 'हळबी' नावाने ओळखली जाते. हळबा, हळबे, हळवी अशीही उपनामे असतात याना. हे लोक गावातील लोकांच्या घराण्याच्या चढउताराचा, पिढीचा, जमीनजुमल्यांचा, शेतीवाडीचा [इतकेच काय अमुक एकाने अमुक एका वर्षी कोणते उत्पादन शेतात घेतले] इत्थंभूत हिशोबठिशोब ठेवीत. हे करण्यासाठी त्याना त्या त्या जमिनीच्या मालकाने "असाईन्" केलेलेच असते असे नाही. जमातीचा मुखिया आपल्या पोरांना 'तू अमुक एका गल्लीकडे बघ" अशी सूचना देई, म्हणजे ती स्वीकारणारा पुढील कार्यवाही करण्यास सुरू करे. तो एक प्रघात अगदी ब्रिटिशांच्या काळापासून ते ते गाव जपत आले होते. म्हणजे घरातील कर्ता मागील लोकांबाबत काही ठोस तरतूद न करताच स्वर्गवासी झाला आणि मग जमीन वाटपाचे खटले सख्ख्या आणि चुलतभावंडात उपटले तर गावकामगार पाटील या हळब्या लोकांच्या पोतडीतील नोंदीवर विश्वास ठेवीत आणि त्या नुसार न्यायनिवाडा. बहुतांशी प्रसंगी तसे निर्णय दोन्ही पक्षी मान्य होत असत अन् मग त्याच्या बदल्यात त्या हळब्याला वर्षभराचा शिधाही त्या त्या कुटुंबाकडून दिला जाई. अर्थात वाद राहिलाच तर मग नाईलाजास्तव ते ठरलेले नित्याचे कोर्टकचेर्‍यांचे झेंगट उभे राही आणि मग 'दे तारीख पे तारीख' या घोषावर तीच नव्हे तर पुढील पिढीही अक्षरशः भिकेला लागे.

या हळब्यांनी कुठे फॉर्मल शिक्षण घेतलेले नसते. पण अगदी लहानपणी पाहिलेल्या एखाद्या "बाळ्या"स तो मुंबईला जाऊन "बाळासाहेब" बनला तरी म्हाईला परतल्यावर हेच हेळबी त्याला लागलीच ओळखत आणि त्याच्याबरोबर नोकरीनिमित्य मुंबईला गेलेल्या अन्य बाब्यांची नावानिशी चौकशीही करीत.

अशोक पाटील

या यादीत ब्राह्मण का आहे? त्याऐवजी कीर्तनकार असायला हवा होता. ( जो कोणत्याही जातीतला असु शकतो.)

या यादीत ब्राह्मण का आहे?>>>> काही समस्या आहे का तुम्हाला? अर्थात त्या प्रदर्शनात कुठल्या मुर्ती मांडायच्या हे त्या शिल्पकाराचं स्वातंत्र्य आहे? ते ठरवणारे तुम्ही-आम्ही कोण?

विशालजी वा छान महाराष्ट्राची लोकधारा आवडली. Happy
आशोकजी - सविस्तर माहीती मस्त आहे.

विरारला ही अधेमधे वासुदेव येतच असतात पहाटे त्यांच्या भुपाळ्या ( या गाण्यांना नक्की काय म्हणतात ) फारच आल्हाददायक असतात.

@ ईनमीन तीन ~

वासुदेव म्हणतो त्याला भूपाळी म्हणता येणार नाही. भूपाळी ही एक प्रकारे देवाला दिलेली हाक आहे, जी प्रामुख्याने पहाटे गाईली जाते. अमुक एक पंथच भूपाळी म्हणत नसून थोरापासून लहानापर्यंत आणि सर्ववर्णीयांना ती गायचा अधिकार असतो.

मग ती रामाची
"उठोनियां प्रात:काळीं । जपा रामनामावळी।
स्वयें घ्यातो चंद्रमौळी। शैलबाळीसमवेत ।।"
अशी असो वा :

"घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला..."
अशी कृष्णाची असो.

वासुदेव हा गावचा 'जागल्या' असून त्याला इंग्रजीमध्ये आपण "वेकअप मॅन" म्हणू शकतो. त्याचे वर्णन :

"उजुन आलं आभाळ रामाच्या पारी, अन् गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी....."

हा वासुदेव 'दान पावलं' आळवित गल्लीगल्लीतून जातो आणि मिळेल ती भिक्षा स्वीकारतो. सर्वसामान्यतः याच्या गायनाला/पुकार्‍याला त्यामुळे 'दान पावलं' हेच विशेषनाम प्राप्त झाले.

अशोक पाटील

वाह अशोककाका, माझं काम सोपं केलत. हेच लिहायला आलो होतो. मी दोन ओळीत आटोपलं असतं, तुम्ही अगदी सविस्तर लिहीलंत. मनःपूर्वक आभार !

Pages