एक रात्र सरपटलेली ~‘~‘~‘ ...!!

Submitted by तुमचा अभिषेक on 25 April, 2012 - 14:35

एक रात्र सरपटलेली ~‘~‘~‘ ...!!
.
.
.

संध्याकाळी नेहमीप्रमाणे गावभर भटकून मावळल्यावर मी घराकडे कूच केली. अरुंद जिन्यातून वर माझ्या रूमकडे जाताना आजूबाजुला दिसनार्या सरपटणार्या प्राण्यांवर एक बारीक नजर होतीच. इथे आल्यापासून जीने माझे जिने हराम केले होते ती जिन्याच्या डाव्या भिंतीवर फतकल मारून बसलेली (की झोपलेली) होतीच. तिला चुकवून उजव्या बाजूने सटकलो. कुलुप उघडून आत रूममध्ये शिरलो. रूम म्हणजे एक भलीमोठी खोली आणि तिला जोडूनच एक बाथरूम. माझ्या घरासमोरचे आंगण म्हणजेच घरमालकाचे टेरेस, या हिशोबाने हवे तर आपण त्याला टेरेस फ्लॅटही बोलू शकतो. रूमच्या पुर्वेला एक खिडकी होती जी रात्रीची मी कायम बंदच ठेवायचो. पण त्या खिडकीच्या वर एक छोटासा झरोका होता, त्याला मात्र बंद करायला दारच नव्हते. सारी फसाद का जड हा झरोकाच होता. रूममध्ये शिरल्यशिरल्या मी त्या झरोक्यावर नजर टाकली. पण तिथे कोणीच नव्हते. मग एक नजर सार्‍या घरभर फिरवली. कुठेच काही नाही हे बघून जरा निश्चिंत झालो. कपडे काढून खुंटीला अडकवले. घड्याळ अन पाकीट काढून फडताळावर ठेवले आणि स्वताला दिले खाटेवर झोकून. मनोरंजनाची जी एकच गोष्ट होती माझ्याकडे त्या ईडीयट बॉक्सलाही चालू केले. सगळे चॅनेल फिरून काही बघण्यासारखे सापडले नाही म्हणून गाण्यांचा कुठलासा चॅनेल लाऊन बिछान्यावर पडल्यापडल्याच वाचायला म्हणून वर्तमानपत्र घेतले. अधूनमधून एक नजर पुन्हा पुन्हा त्या झरोक्यावर टाकत होतोच. टीव्हीवर लागलेली जुनीपुरानी ब्लॅक अ‍ॅंड व्हाईट गाणी, पार्श्वभूमीला तेवढ्याच ताकदीचा पंख्याचा गर्र्गर् गर्रगर आवाज आणि तो भकास झरोका. आतापर्यंत सारे काही आलबेल होते..!

हातातल्या घड्याळावर एक नजर टाकली तर साडेसात वाजले होते. खरे तर मला असे सारखे घड्याळ बघणे आवडत नाही पण इथे आल्यापासून वेळ हा काही सरकतच नव्हता. दिवसा ऑफिसमध्ये असेपर्यंत कसेबसे चार वाजायचे. पण त्यानंतर रात्री झोपेपर्यंत करायचे काय हा प्रश्नच असायचा. सहा-सात वाजेपर्यंत गुरे उंडारल्यागत इथेतिथे फिरायचो आणि मावळल्यावर गपगुमान आपल्या गोठ्यात यायचो. त्यानंतर साडेआठ वाजता चौकातल्या हॉटेलमध्ये जेवण करून साडेनऊला परत रूमवर आणि आवडो न आवडो टी.व्ही. वर लागेल तो सिनेमा बघून बाराला झोपायचो. माझ्यासारखा फूल टू बम्बैय्या स्टाईल जगणारा मुलगा असा दूरदेशी एका दुर्गम भागात कसा काय राहत होता हे माझे मलाच माहीत. एकांत हा सुरुवातीला मला खायला उठायचा पण हल्ली तोच सोबती वाटू लागला होता. गेले चार-पाच दिवस एक अनाहूत पाहुणी जे घरात घुसू पाहत होती. तिची आठवण होताच परत त्या झरोक्याकडे नजर टाकली. आणि या सुमारास ती तिथे दिसायची शक्यता होती हे माहीत असूनही तिला पाहून दचकलोच. कारण आज तिने मर्यादा किंचित पार केली होती. गेले चार दिवस ती नुसतीच झरोक्याच्या तोंडावर येऊन माझ्याकडे बघत बसायची आणि मी जरा शुकशुक केले किंवा लांबूनच हाताची हालचाल केली तरी पळून जायची. पण दहा-एक मिनिटांतच स्वारी परत हजर व्हायची. असा तास-दोन तास खेळ झाल्यावर मग कुठेतरी गायब व्हायची. पण काल मात्र ती माझ्या शुकशुकला जुमानत नव्हती. तिला हाकलवण्यासाठी मला उठून झाडू हातात घ्यावी लागली होती. रात्रीही बरेच उशीरापर्यंत आमचा हा खेळ चालू होता. तेव्हाच मी ताडले होते की हिचा आगाऊपणा दिवसेंदिवस वाढतोय आणि उद्या परवा ही घरात यायलाही कमी करणार नाही.

आज नेमके तेच होत होते. त्या झरोक्याला आपले घरटे समजून ती इथे तिथे फिरत होती. तिचे ते फिरणे म्हणजे घरात घुसायच्या आधी करत असलेली टंगळमंगळ होती हे न समजण्याएवढा मी दुधखुळा नव्हतो. संभाव्य धोका टाळण्यासाठी आता लवकर पावले उचलावी लागणार हे मी समजून चुकलो होतो. कालची झाडू जवळच होती. आता शुकशुक नाही तर सरळ फटकाच मारायचे विचार डोक्यात येऊ लागले. पण त्याचबरोबर असा कायदा हातात घेणे कितपत योग्य आहे असाही एक विचार डोक्यात घोळत होता. आणि मन.. ते तर काही वेगळेच सांगत होते. "मुक्या प्राण्यांवर दया करा, मुक्या प्राण्यांवर प्रेम करा." नक्की कोणाचे ऐकायचे समजेनासे झाले. इतक्यात तिने आपला खास "चक् चक् चक" असा आवाज काढला आणि त्याच क्षणाला हा प्राणी मुका नाही असे मी माझ्या बेसावध मनाला बजावून झाडू हाणलीच.

चार कांड्या हवेत उडाल्या, झरोक्याजवळची जळमटे अस्तव्यस्त झाली आणि या सार्याचा धुरळा खाली बसेपर्यंत ती तिथून गायब झाली. खरे तर जोरदार फटका बसायची शक्यता अशी नव्हतीच. कारण झरोका बर्यापैकी उंचीवर होता आणि झाडू तेवढीच लसपशीत. खाली पडलेल्या कांड्याच्या कचर्यात कुठे तिची शेपटी दिसते का हे चेक केले पण तितकेही यश नशिबी नव्हते. थोडावेळ झाडू घेऊन तसाच उभा राहिलो. मग झरोक्यावर नजर ठेऊनच उलट्या पावली खाटेवर जाऊन बसलो. अर्थात झाडू जवळच होती. जवळपास अर्धा तास झाला, पण तिचा काही पत्ता नव्हता. कालपर्यंत मी तिला चुचकारत होतो तर त्याचा आपल्या सोयीने अर्थ काढून ती माझ्याशी पाठशिवणीचा खेळ खेळत होती. एक दीड दमडीची सरपटणारी निशाचर, जी स्वताच्या पायावर साधे उभीही राहू शकत नाही, घरात पाळणे तर दूरची गोष्ट, पण जिला ना कुणाला चुचकारावेसे वाटते, ना गोंजारावेसे वाटते, ती.. अशी ती, माझी मैत्रीण बनू पाहत होती. मला एकटे बघून सोबत देऊ पाहत होती. पण आज मात्र मी तिला माझे खरे रूप दाखवले तेव्हा तिला नक्कीच आपली पायरी समजली असणार.

पण हा माझा केवळ भ्रम होता. कारण अजून मी तिचे खरे रूप पाहिले नव्हते. नागाच्या शेपटीवर पाय देऊ नये ही म्हण आपल्यात प्रचलित आहे. पण ज्याने कोणी ही म्हण बनवली त्याने कदाचित कधी "या" प्रजातीचा अनुभव घेतला नसावा. साधारण तासाभराने ती परत आली. मी जेवायला जायची तयारी करत होतो. कपडे करून निघण्याआधी सवयीप्रमाणे नजर टाकली तर ती होती तिथे. हो तिच्या नेहमीच्या जागेवरच होती. पण आताचे तिचे हे रूप मला नवीन होते. नाग जसा फणा काढतो तसे डोके किंचित वर उचलून माझ्याच रोखाने बघत होती. डोळे लाल तर्राट दिसत होते. किंबहुना आधी कधी तिचे डोळ्यांचे निरीक्षण असे मी केलेच नव्हते. पण आज मात्र ते निखार्‍यासारखे फुलून उठले होते. काय होते त्या डोळ्यांत.. बदले की आग..?? नाही म्हणालो तरी मी जरा चरकलोच. आधीच मला या प्राण्याची किळस यायची. आज त्याची जागा भितीने घेतली होती. नशीब झाडू जवळच होती. पण ती उचलतानाही मला अशी भिती वाटत होती की ही कधीही आपल्या अंगावर झेप घेईल. कसेबसे उसने अवसान आणल्यागत मी लांबूनच तिला झाडू दाखवली. "ये आता तू परत आत, मारतोच तुला" असे भाव चेहर्यावर ठेवायचा जमेल तितका केविलवाणा प्रयत्न केला. पण ती काही जुमानली नाही. शुकशुक करत मी झाडू हवेत वेडीवाकडी नाचवली. पण ती तशीच ढिम्म होती. शेवटी त्या मुक्या प्राण्यालाच माझी दया आली असावी. माझ्याकडे बघतच ती संथपणे मागे सरकली. आणि तेवढ्याच सावचितपणे यु टर्न घेऊन निघून गेली.

हा केवळ एक इशारा होता जी ती मला देऊन गेली. संभाव्य हल्ल्याचा धोका तसाच कायम होता. उद्याच या झरोक्याला बंद करायचे असे ठरवून मी जेवायला बाहेर पडलो. पण आज रात्री ती परत आली तर काय हा प्रश्न होताच. रात्र जशी जशी वाढत जाते तशी या निशाचरांची ताकद थेट प्रमाणात वाढत जाते आणि आपली मात्र व्यस्त प्रमाणानुसार कमी कमी होते, एवढे शास्त्राचे ज्ञान मला होते. म्हणून आजची ही वैर्‍याची रात्र कशीबशी काढणे गरजेचे होते. जेवण झाल्यावर परत रूमवर जायची खरे तर इच्छाच होत नव्हती. किंवा प्रामाणिकपणे सांगायचे तर भितीच वाटत होती म्हणा ना. तरी दुसरा काही पर्याय माझ्याकडे नव्हता. नवीनच होतो या भागात, कोणाशी फारशी ओळखही अशी झाली नव्हती की निदान आजच्या एका रात्रीच्या निवार्‍याची सोय व्हावी. अश्यावेळी मग साहजिकच घरची आठवण झाली. आईला फोन लाऊन तिला आज काय घडले ते सांगू लागलो. गेले चार-पाच दिवस मी "ती"चे अपडेट्स आईला न चुकता देत होतो. त्यामुळे आईनेही वैतागून काय हे रोजरोज पाल-पुद लावले आहे असे बोलून विषयच कट केला. देवा कसले हे पाल’क मला दिलेस असे बोलून स्वताच्याच नशीबाला दोष देऊन मी गप्प बसलो.

मोठ्या धैर्याने मी रूमवर परतण्याचा निर्णय घेतला. त्या अरुंद जिन्याने चढताना आजूबाजुला नजर टाकायची हिंमतच होत नव्हती. अंग चोरून पटपट चढलो. टेरेसवर आलो, वाटले आज इथे उघड्यावरच चटई टाकून झोपावे. पण बाहेर अंधारात झोपण्यातही भिती होतीच, आणि मच्छर चावतील ते वेगळेच. थोडावेळ बाहेरच उभा राहून मस्त थंड हवा खाल्ली. थोडी तरतरी आली. डोक्यात सकारात्मक विचार ठेऊनच घराचे टाळे उघडले. दरवाजा ढकलून दारातूनच झरोक्यावर नजर टाकली. घरभर नजर भरभर फिरली. काहीच नव्हते. कोणीच नव्हते. खात्री करायला पुन्हा एकदा आत शिरून मध्यभागी उभा राहून चारही दिशांना व्यवस्थित पाहिले. रिलॅक्स झालो तसे हळूहळू डोक्यावरच्या पंख्याची हवा जाणवू लागली. टीवी चालू केला आणि समोरच्या बेडवर पाय पसरून भिंतीला टेकून बसलो. सवयीप्रमाणे बातम्या बघून झाल्या आणि गाण्यांचा चॅनेल लावला. अधूनमधून नजर झरोक्यावर टाकतच होतो. पण आवडीची काही गाणी लागली आणि समोरच हरवून गेलो. अर्थात ही आवडीची गाणी म्हणजे श्रवणीय नाही तर प्रेक्षणीय या कॅटेगरीतील, कॅटरीना कैफची.. माय नेम इझ शीला.. अन शीला की जवानी.. पण अचानक.. कानामागे कसलीशी हालचाल जाणवली. चित्त समोर लागले असल्याने मान न वळवताच अंदाज घ्यायचा प्रयत्न केला, तसे पुन्हा काहीतरी हलल्यासारखे वाटले. काय असेल, असू शकेल, याची एकाएकी कल्पना आली आणि क्षणभरासाठी सार्‍या जाणिवाच थंड पडल्या. दुसर्‍याच क्षणी ताडकन उठलो आणि त्वरेने मागे वळून पाहिले तर तीच ती सळसळत भिंतीच्या वरच्या बाजूला गेली. हो, ती तीच होती. वर जाऊन पलटली आणि नजर माझ्यावरच रोखली. म्हणजे थोड्यावेळापूर्वी ती माझ्याजवळ काही ठराविक उद्देशानेच आली होती, हे जाणवले तसे डोक्यातून एक थंडगार सणक गेली. पण लगेच कमकुवत पडत चाललेल्या मनाला बजावले की, एवढासाच तर जीव तो, काय वाकडे करणार आहे तुझे..? उचल ती झाडू आणि हाण तिच्या पेकाटात. असे म्हणून झाडू उचलायला गेलो, उचलायला हात लावला तसे त्या खराट्यापाठून आणखी एक सळसळत वर छताकडे पळाली. मी शॉक लागल्यासारखाच मागे फिरलो. ही आकाराने तिच्यापेक्षाही मोठी होती. आता मात्र मी खरेच घाबरलो. हे प्रकरण वाटते तेवढे सोपे नव्हते. ती एकटी नव्हती आली तर आपल्याबरोबर आपली साथीदारणीही घेऊन आली होती. कोण होती ही नवी पाहुणी? तिची मैत्रीण की तिच्या एरीयातील भाई? की आपले बहेन? का तिची आई होती? मग बापही आला असेल तिचा? मनात विचार येताच दचकलो. पुन्हा पाठीमागे काहीतरी सळसळल्यासारखे वाटले. की भासच होता तो..?? दबकतच मागे पाहिले. जणू काही मी वळताच कोणीतरी माझ्यावर झडप घालणार होता. पण सुदैवाने तसे काही दिसले नाही. तरीही समाधानासाठी पुर्ण भिंतीवर वरखाली नजर फिरवली. ट्यूबलाईटजवळ येताच नजर थोडीशी रेंगाळली. ट्यूबच्या खाली पडलेली तिचीच सावली एका ठिकाणी जरा जास्तच गडद भासली म्हणून निरखून पाहू लागलो तशी ती सावली अचानक हलली. "ओये..", करत किंचाळतच मी मागे सरकलो तशी ती सळसळतच बाहेर आली आणि ती देखील भिंतीच्या एका कोपर्‍यात जाऊन स्थानापन्न झाली.

आता मात्र माझा धीर खरेच सुटला होता. संकट येते तेव्हा चारही दिशांनी येते असे म्हणतात. आतापर्यंत त्यांनी तीन दिशा व्यापल्या होत्या. आणि मी स्वताच्या नकळतच चौथ्या दिशेला सरकलो होतो. त्याच दिशेला दरवाजा होता. तोच उघडून यांना शुकशुक करून हाकलावे तरी या काही अश्या सहजासहजी जाणार्‍या नव्हत्या. उलट यांच्या आणखी दोन-तीन साथीदारणी घरात शिरण्याची शक्यताच जास्त होती. खिडकी उघडावे म्हटले तरी तोच प्रॉब्लेम. ज्या झरोक्यातून या आत आल्या होत्या त्यातूनच यांना पळवावे लागणार होते. पण तरी पुढे काय?? झरोक्याला कडीकोयंडा नावाचा प्रकारच नव्हता. जरी आता यांना पळवून लावले तरी मध्यरात्री पुन्हा प्रकट व्हायच्या, ही शक्यताही होतीच होती. म्हणजे आता "आर या पार"चीच लढाई लढायची होती.

सर्वात आधी मी ज्या कोपर्‍यात उभा होतो त्याला आधी न्याहाळून घेतले. शत्रू किंवा त्याचा आणखी एखादा साथीदार आपल्या जवळ तर नाही ना याची खात्री करून घेतली. त्यानंतर आधी तिच्याकडे पाहिले.. तसा चरकलो.. अजूनही ती माझ्यावरच नजर रोखून होती. पण तिचे साथीदार मात्र माझ्यादिशेने बघत नव्हते हे पाहून हायसे वाटले. गाफिल शत्रूला मारणे सोपे असते. आधी मी त्यांचाच काटा काढायचे ठरवले. झाडू बरोबर माझ्या समोरच्या कोपर्‍यात होती आणि वर भिंतीवर तिची आई(??). पण तिच्या आईचे लक्ष माझ्यावर नव्हते. ना झाडूवर होते. पण ती मात्र माझ्यावर नजर रोखून होती. कसेही करून ती झाडू मिळवणे गरजेचे होते कारण मुष्ठीयुद्ध हा काही त्यांना चीत करायचा पर्याय नव्हता. झाडू आणि माझ्यामध्ये सात-आठ पावलांचे अंतर होते. चपळाई दाखवली तर निमिषार्धात ती घेऊन परत आपल्या कोपर्‍यात येऊ शकत होतो. पण जर हा शहाणपणा नडला असता आणि तशीच चपळाई तिने दाखवली असती तर ती त्याच्या आधीच माझ्या अंगावर झेप घेऊ शकत होती. आणि त्या परिस्थितीत तिचे साथीदारही सावध झाले असते. म्हणून मी शांत डोक्याने वागायचे ठरवले.

तिच्याकडे तिरप्या नजरेने बघत, एकेक पाऊल हळूहळू झाडूच्या दिशेने टाकू लागलो. तसे ती देखील हळूहळू जमिनीच्या दिशेने सरकू लागली. निम्मे अंतर चालून गेलो तसे तिच्या लक्षात आले असावे की माझ्या डोक्यात काय चालू आहे, कारण ती देखील पटकन उजव्या दिशेला वळली आणि तिनेही आपली नजर झाडूवर रोखली. तिला माझ्या मनात काय चालू आहे हे समजले तरी मला मात्र समजत नव्हते की तिच्या डोक्यात काय चालू आहे. कदाचित मी झाडूला हात लावताच ती पटकन येऊन माझ्या हाताचा चावा घ्यायच्या विचारात असावी. या विषारी असतात हे मी ऐकून होतो. पण दंश करतात की नाही याबद्दल खात्री नव्हती. आता विषाची परीक्षा कोण घेणार? काहीतरी वेगळा विचार करायची गरज होती. शेवटी मी एक मनुष्य होतो. जगातला सर्वात बुद्धीमान प्राणी. प्लॅन "ए" काम करायची शाश्वती नाही हे पाहून मी प्लॅन "बी" वापरायचे ठरवले. एक पाऊल मागे टाकून मग पटकन चार पावले पुढे टाकायचे ठरवले. पण माझे पाऊल मागे जाताना बघूनही ती मात्र जागची जराही हलली नाही. तशीच ढिम्म होती. हा ही प्लॅन फसला होता. आता मीच झाडूपासून लांब गेलो होतो. अचानक काही सुचले, आजूबाजूला पाहिले, आणि खाली जवळच पडलेला एक न्यूज पेपरचा तुकडा पटकन उचलला आणि बोळा करून तिच्या दिशेने भिरकावला तशी ती मागे सरकली आणि मी पुढे.. बटाटेशर्यतीत जसा बटाटा उचलून मागे फिरतात अगदी तसेच चपळाईने झाडूवर झडप घालून, तिला घेऊनच परत आपल्या जागी आलो. पण पाहतो तर सारी परिस्थिती पलटली होती. पटावरचे सारे प्यादे इथेतिथे सरकले होते. माझ्या झाडू घेण्याने ती तर चवताळली होतीच पण तिचे साथीदारही सैरभैर झाल्यासारखे वाटत होते. ती झाडूच्या कोपर्‍यात येऊन थयथयाट करत होती. कदाचित मला झाडू घेण्यापासून अडवता न आल्याचा राग व्यक्त करत होती. तर आधीच त्या कोपर्‍यात असलेली तिची आई(?) माझ्या समोरच्या भिंतीवर फिरत होती. डावीकडच्या कोपर्‍यात असलेल्या तिच्या दुसर्‍या साथीदाराने उजवीकडे मुसंडी मारून माझा कोपरा पटकावला होता. परीणामी माझ्या हातात झाडू आली असली तरी मी माझी पोजिशन गमावली होती. आता मी मध्यभागी, गरगर फिरणार्‍या पंख्याखाली उभा होतो आणि क्षणाक्षणाला इथेतिथे पलटत त्या तिघींच्या पोजिशनचा अंदाज घ्यायचा प्रयत्न करत होतो.

तिघीजणी आता आपल्या नवीन जागी स्थिरस्थावर झाल्या होत्या. दोघींचे लक्ष्य माझ्यावर होते तर एक मात्र अजूनही आपल्याच धुंदीत होती. आता माझे पहिले लक्ष्य तीच होती. तरीही मला गोलगोल फिरत तिघींवर लक्ष ठेवावे लागत होते. छातीतली धडधड क्षणाक्षणाला वाढत होती. वर पंखा गरगर फिरत असूनही कानाच्या मागे मानेवर कुठेतरी पाणी जमले होते. एवढे दडपण घेऊन जास्त वेळ उभे राहणे शक्य नव्हते. त्यापेक्षा आता सरळ... पुढचा मागचा विचार न करता जी गाफील होती तिच्यावरच एक जोरदार झाडूचा फटका मारला. डोक्यात एकच होते की बंदुकीत गोळ्या तीन आणि दुश्मनही तीन असताना जसा प्रत्येक नेम निशाण्यावरच लागला पाहिजे तसाच आताही एकही वार खाली जाऊ द्यायचा नाही. अन्यथा जर त्यातून ते बचावले तर मात्र पलटवार करो न करो पण घरभर धिंगाणा जरूर घालणार. आणि तेच झाले. माझा पहिला वार वर्मी बसला की नाही हे काही लगेच समजले नाही, पण झाडू मारताच अचानक इतर दोघीही सैरावैरा पळू लागल्या. आणि त्यापेक्षाही भयानक असे त्यांचे चिक-चिक करून चित्कारणे. ते घाबरून ओरडणे होते की चिडून सोडलेले फुत्कार, की "पाली" भाषेत एकमेकींशी काही बोलत होत्या काही कल्पना येत नव्हती. पण मी एकदा हिच्याकडे तर एकदा तिच्याकडे बघत जागच्या जागी तडतड उड्या मारत होतो. थोड्यावेळाने त्यांचा आवाज शांत झाला आणि त्याही एका जागी येऊन थांबल्या. मी फटका जिला मारला होता तिच्याकडे पाहिले तर त्या भिंतीच्या खाली तिची शेपटी वळवळ करत पडली होती आणि ती जवळच्या एका कोपर्‍यात निष्प्राण... की होता जीव थोडासा. अर्थात हा माझा अंदाज होता अन्यथा ती नक्कीच वर भिंतीवर पळाली असती. नीट निरखून पाहिले तर तिचे डोळ्यांचे बुभुळही किंचित वर आणि खोबणीतून बाहेर आल्यासारखे वाटले. नावालाच हालचाल होत होती. याचा अर्थ जरी ती ठार मेली नसली तरी निरुपद्रवी तरी नक्की झाली होती.

एका फटक्यात मी एक जीव घेऊ शकतो हे बघून मलाही आता किंचित स्फुरण चढले होते. एक तर गेल्यातच जमा होती. दोन बाकी होत्या. दुसरे लक्ष्य तिच्या साथीदारणीला करण्याऐवजी मी तिलाच करायचे ठरवले. पण ती मात्र वर छताजवळ पोहोचली होती. म्हणून मी माझा मोर्चा साथीदाराकडेच वळवला. तिची साथीदार ट्यूबलाईटच्या आडोश्याला फतकल मारून बसली होती. म्हणजे ती देखील बर्‍यापैकी उंचीवर होती आणि ट्यूबलाईट जवळ असल्याने तिला थेट फटका मारणे शक्य नव्हते. तिथून कधी हलते याची वाट पाहणे म्हणजे मुर्खपणा होता. बर्‍याच वेळाने पहिल्यांदा घड्याळावर नजर टाकली तर पावणेबारा वाजले होते. मी जेवून साधारण सव्वादहाला आलो असावो. त्यानंतर अर्धा-पाऊण तास टी.वी. बघत होतो. म्हणजे अकराच्या सुमारास या धुमश्चक्रीला सुरुवात झाली होती आणि तब्बल पाउण तासाने मी एकीला धारातिर्थी पाडण्यात यश मिळवले होते. पाऊण तास कसा गेला हे समजलेच नव्हते. पण आता मात्र तसेच हातात झाडू घेऊन उभे राहणे आणि त्या खाली कधी येतात याची वाट बघणे म्हणजे एकेक मिनिट युगासारखे भासत होते. थोड्याच वेळात मी वैतागून त्या ट्यूबलाईटवालीला हलकेच शुकशुक करण्यास सुरुवात केली. जमेल तितकी झाडू जवळ नेऊन तिला डिवचायला लागलो. असे करतानाही झाडूने हलकेच तिच्या आजूबाजूच्या भिंतीला स्पर्श करत होतो, जणू काही माझ्या झाडूला पकडून तिचा शिडीसारखा वापर करून ती त्यावरून सळसळत माझ्या अंगावरच येणार होती. पण तिच्यावर काही फरक पडत नव्हता तसे मी मग तोंडाने चित्रविचित्र आवाज काढू लागलो, सोबतीला एक पाय जमिनीवर दाणकन आपटून आवाजनिर्मिती करू लागलो. नक्की याचा परीणाम झाला की झाडूची एखादी कांडी तिच्या नाकात वगैरे शिरली माहीत नाही, पण एकदाची ती हलली. आता तिचे तोंड वरच्या बाजूला होते. म्हणजे आता मी तिला अजून ढोमसले तर ती आणखी वरच्या बाजूला जाईल म्हणून मी थोडावेळ शांत राहिलो. सुदैवाने ती हळूहळू उलट्या दिशेने वळली. आणि पुन्हा थांबली. तसे मी माझे शुकशुक, झाडू हलवणे, पाय दणादण आणि या सार्‍यातून मगासची वातावरणनिर्मिती पुन्हा सुरू केली. आणि अचानक वेगाने ती सरपटत खालच्या दिशेने आली.

माझ्या समोरच्याच भिंतीवर आणि माझ्या आवाक्यात होती. फक्त एक पाय पुढे टाकून तिला जोरकस फटका मारायची खोटी की तिचेही राम नाम सत्य झाले असते. पण मी जसा पाय पुढे टाकला तसे तिलाही तिच्यावर येणार्‍या संकटाची जाणीव झाली. अर्थात आधीच मला अश्याप्रकारे एक जीव घेताना तिने पाहिले होते. मी झाडू वर उचलली तशी ती उलटी वळून सरसर मागे जाऊ लागली. पण सुदैवाने वरच्या दिशेने जात नव्हती. म्हणून मी संधी न दवडता फटका मारलाच. अंदाज चुकला, फटकाही हुकला. ती सरसर पुढे जातच होती. मी निशाणा न धरताच सटासट दोन-तीन आणखी वार केले. शेवटचे तिला खाटेच्या मागे जाताना पहिले. माझी छाती पुढचे दोन मिनिटे धडधडत होती. फटका बसतो की चुकतो, ती मरते की जगते, की सटकून जाते या धाकधुकीत फटकेबाजी केल्याने स्वतावरच दडपण ओढवून घेतले होते. झाडूच्याही बर्‍याच कांड्या या नादात धारातिर्थी पडल्या होत्या. पण सुदैवाने काही कांड्यांच्या जाण्याने झाडू तितकी लसपशीत झाली नव्हती. धडधड कमी झाली तसे भिंतीवर एक नजर टाकली तर एके ठिकाणी रक्तासारखे लालसर डाग दिसले जे खाटेच्या दिशेने जात होते. म्हणजे एखादा फटका वर्मी बसला होता तर. आणि आता कदाचित ती अर्धमेल्या किंवा मरनोण्मुख अवस्थेत तिथे पडली असावी. खाटेच्या पायावर दोनतीन लाथा मारल्या. हाताने हलवून पाहिले. पण ती काही बाहेर आली नाही. मग खाट अलगद सरकवून भिंतीला डोके चिकटवून आत नजर टाकली. अंगाचे मुटकुळे करून निपचित पडली होती. तरी मी त्या खाचेत झाडू घुसवून तिला दोनतीन झाडूचे फटके मारले. शेवटचे काही आचके सोडले तिने. त्यानंतर काहीच हालचाल नाही. एक फुल्ल मर्डर केला होता मी आणि चेहर्‍यावर समाधान झळकत होते. आसुरी आनंद बहुधा यालाच म्हणत असावेत.

आता ती सुद्धा एकटी होती आणि मी सुद्धा. पण माझ्या खात्यात दोन बळी होते. तिसराही घेऊ शकतो हा विश्वास होता. जराही न घाबरता आणि जराही वेळ न दवडता आता मी माझा रोख तिच्याकडे वळवला. अजूनही ती तशीच होती. माझ्यावर नजर रोखून. पण मी बिनधास्त पुढे सरकलो आणि झाडू तिच्या दिशेने उगारली. तशी ती पळाली. पण आता तिच्या पाठी धावताना माझी धांदल उडत नव्हती. एखादा फटका निशाण्यावर बसला की बस्स, तिचा खेळ खल्लास हे अनुभवावरून समजले होते. पण हीच माझी चूक झाली. अतिआत्मविश्वासात जरा गाफील राहिलो आणि ती सर्ररकन कपाटाच्या मागे शिरली. कपाट म्हणजे भिंतीला चिकटवलेलाच एक लाकडी ठोकळा होता ज्याला हलवणेही शक्य नव्हते, सरकवणे तर दूरची गोष्ट. थाड थाड करून त्याला दोनचार लाथा गुद्दे मारले, मागे फटीतून झाडू आतवर जाते का हे पाहिले पण काही फायदा झाला नाही. उगाच त्या नादात झाडू वेडीवाकडी झाली. आता वाट बघण्याशिवाय पर्याय नव्हता. दर मिनिट-दोन मिनिटांनी माझे त्या कपाटावर थडथड करने चालूच होते. थोड्यावेळातच वैतागलो. मग स्ट्रॅटेजी बदलायचे ठरवले. थोडावेळ वाट पाहायचे ठरवले. थडथड न करता, शांतपणे. रात्रभर तर ती तिथे आत राहणार नव्हती. तसे झाले तर कल्पनाही करवत नव्हती. मलाही रात्रभर तसेच जागे राहावे लागले असते. ताटकळत आणि झाडू हातात धरून. पाच-दहा मिनिटेच झाली असतील पण वेळ सरकत नाही असे वाटत होते. काहीतरी मनोरंजन म्हणून पुन्हा टी.वी लावला. रात्रीच्या वेळी काय बघणार. कसला तरी गाण्यांचा चॅनेल लाऊन ठेवला आणि थोडासा रीलॅक्स व्हायला समोर बेडवर बसलो. गाणी जरी कानावर पडत असली तरी नजर मात्र काण्या डोळ्याने कपाटावरच लागली होती. दोन-तीन-चार-सहा किती गाणी ऐकली माहीत नाही पण अचानक नजरेच्या कडेला काही जाणवले तसे तडक उठलो आणि झाडू फटकावली. ती बर्‍यापैकी बाहेर आली होती, पण मला उठताना पाहून पुन्हा मागे वळली. मी जराही वेळ न दवडता झाडू उगारली होती पण माझा फटका बसेबसेपर्यंत ती पुन्हा आत गेली होती. नक्की ती मला घाबरत होती की मी तिला घाबरत होतो की आम्ही दोघे एकमेकांना माहीत नाही, पण तिचा मात्र खेळ होत होता आणि माझा जीव जात होता. आणि आता हा खेळ तिचा जीव घेऊनच संपणार होता.

तिला फटकवण्याची मी एक संधी गमावली म्हणून मी माझ्या नशीबाला दोष देत पुन्हा जागेवर बसलो. माझ्या आतापर्यंतच्या यांच्या अनुभवावरून आता काय ही बया लगेच परत बाहेर येणार नव्हती. पण अचानक... या परीस्थितीत जे वाईटात वाईट घडू शकत होते, खरे तर जे घडायची शक्यता होतीच पण असे काही नेमके आताच घडेल हे माझ्या मनातही नव्हते अखेर तेच घडले. समोरचा टी.वी. फट करून बंद झाला आणि दुसर्‍याच क्षणाला काळोखाने सारे घर व्यापले. लोडशेडींगचा यापेक्षा मोठा फटका कधी कोणाला बसला नसावा. अचानक सामन्याचे पारडे बदलावे तसे झाले. आता मी बॅकफूटला गेलो होतो. समोरचे कपाट, त्यामागची भिंत, सारे काही अंधारात एकजीव झाले होते. पण मला मात्र त्यामागे दडलेल्या जीवाने टेंशन दिले होते. तरी त्या स्थितीतही देवाचे आभार मानले की त्या तिघी तिघी फुल फॉर्म मध्ये असताना तुला हे असले काही सुचले नाही हे नशीब, नाहीतर आणखी तारांबळ उडाली असती.

झाडू एका हातात घट्ट पकडून दुसर्‍या हाताने चाचपडून बघत मी बेडवरचा मोबाईल शोधला. हाताला लागला तसे खचकन त्याची सारी बटणे एकत्रच दाबली. तरी जेमतेम उजेड पडला. उजेडापेक्षा सावल्याच जास्त पडल्या. त्यामुळे वातावरण किंचित भयाण वाटत होते. मी प्रकाशाचा रोख कपाटाच्या दिशेनेच ठेवला होता, जेणे करून ती बाहेर आली तर समजेल आणि तिथेच तिचा खेळ खतम करता येईल. पण जर का ती वेगात बाहेर आली आणि सटकली किंवा दुसर्‍या कुठच्या मार्गाने बाहेर पडली आणि अंधारात गडप झाली तर.... असे होण्याचे चान्सेसही जास्त होते कारण मोबाईल सांभाळून झाडूचा वापर करणे हे तितकेसे सोपे नव्हते. आणि तेच घडले. अंधाराचा फायदा घेऊन ती सर्रकन बाहेर आली आणि मिळेल ती वाट धरून पळत सुटली. ती जिवाच्या आकांताने पळत होती पण अंधारात तिचा होणारा तो मुक्त वावर माझाही थरकाप उडवत होता. झाडू मारायचा प्रश्नच येत नव्हता. ती पळेल त्या दिशेने मी मोबाईलचा प्रकाश फेकत होतो. पण अखेर ती त्या स्पॉटलाईटमधून निसटलीच. आता मी रूमच्या मध्यभागी उभा राहून एकेक करून चारही दिशा उजळवून बघत होतो पण तिचा कुठेच पत्ता नव्हता. "उसे जमीन खा गयी या आसमान निगल गया", या सारखे "उसे दीवार ने समा लिया या छत ने छुपा दिया" असे मला वाटू लागले. लाईट गेल्यामुळे पंखा केव्हाचाच बंद झाला होता. त्यामुळे शरीरातून पाण्याच्या धारा वाहू लागल्या होत्या. कुठूनतरी वार्‍याची झुळूक आली आणि पंखा हलल्याचा आवाज झाला म्हणून काय ते बघायला प्रकाश वर फेकला तर छतावर पडलेल्या पंख्याच्या पात्यांच्या किंचित हलणार्‍या सावल्या आणखी दचकवून गेल्या. नकोच ते म्हणून मोबाईल परत खालच्या दिशेने आणला आणि समोर जमिनीवर दोन डोळे लुकलुकताना दिसले.

आतापर्यंत यांची कितीही भिती वाटले तरी यांचे कार्यक्षेत्र भिंतीपुरते मर्यादीत असते हे कुठेतरी डोक्यात असल्याने रूमच्या मध्यावर मी स्वताला सुरक्षित समजत होतो. पण आता जमिनीवर उतरूनही हल्ला होणार असेल तर खैर नव्हती. मधल्या काळात मी वेड्यासारखा झाडू डाव्या हातात आणि मोबाईल उजव्या हातात घेतला होता. फटका मारायचा म्हणजे आधी हातातल्या वस्तूंची अदलाबदल करणे गरजेचे होते. पण आता कोणतीही हालचाल करने म्हणजे.... मी तसाच उभा राहिलो. पण क्षणभरच... दुसर्‍याच क्षणी सारे घर उजळून गेले. पार्श्वभूमीला कसलेसे गाणे वाजू लागले. पंखा हळूहळू वेग पकडू लागला. लाईट परत आली होती आणि माझा आत्मविश्वासही. मोबाईलच्या उजेडाची आता गरज नव्हती. झाडूही सहजपणे डाव्या हातातून उजव्या हातात आली होती. दोन की तीन तास चाललेल्या थरारनाट्याचा क्लायमॅक्स आता जवळ आला होता. आता फक्त एका फटक्याचा खेळ शिल्लक होता. पण तो मारणार इतक्यात ती मागे फिरली, माझ्या कल्पनेपेक्षाही जास्त वेगात, आणि मागच्या भिंतीवर तिने अशी काही उडी घेतली की जणू काही हवेतच उडत आहे. अशी भरारी घेणार्‍यांना सरपटणारे प्राणी म्हणावे... पण ही थक्क व्हायची वेळ नव्हती. तिने जास्त उंची गाठायच्या अगोदरच तिला अडवणे गरजेचे होते. फारसा काही नेम न धरता मी दोनतीन फटके मारले. अखेर ती खाली पडली. पण आता ती अंगावर येतेय की काय या भितीने दचकून मी मागे सरकलो. ती मात्र परत मागे वळून भिंतीवर चढू लागली होती. पण आता तिचा वेग मंदावला होता. ही संधी साधून मी तिला नेम धरून एक जोरकस फटका मारला तशी ती खाली पडली. यावेळी मात्र उपडी पडली. बस्स.. मी एकामागोमाग एक फटके मारतच गेलो जोपर्यंत तिच्या पांढर्‍या पोटावर एक लाल लकेर नाही उमटली.

कितीतरी वेळाने मी रीलॅक्स मूडमध्ये बेडवर बसलो होतो. पंख्याचा वारा आता कुठे जरा जरा जाणवू लागला होता. टी.वी. वरची गाणी केव्हाच संपून तिथे काहीतरी टेलीशॉपिंगचा कार्यक्रम लागला होता. पण मला त्याच्याशी काही घेणेदेणे नव्हते. आता फक्त त्या तीन मृतदेहांची विल्हेवाट लावणे बाकी होते. हाताबरोबर हे ही काम निपटवून टाकू म्हणून मी उठलो. झाडू बरोबर होतीच. दाराजवळचे सुपडे घेतले. पहिले त्यांच्या राणीवरच झाडू रुतवून तिला अलगद सुपड्यात ढकलले. जराही हालचाल नव्हती. शंभर टक्के खात्री होती की ती मृतावस्थेत होती तरी सुपडे शरीरापासून जरा दूरवरच धरले. ती भिती होती की किळस की दोन्ही थोडेथोडे, सांगता येणार नाही. दुसरीलाही तसेच ढकलत ढकलत खाटेमागून बाहेर काढले आणि सुपड्यात जमा केले. छोटेसेच सुपडे ते, एकदम भरल्यासारखे वाटले. पण अजून तिसरीसाठी यातच जागा बनवायची होती. तिला मी सर्वात पहिला मारले होते. एकाच फटक्यात गार झाली होती. तशी तेव्हा थोडी धग दिसत होती तिच्या अंगात, पण एव्हाना ती ही थंड पडली असावी. आणि नसेल तरी आणखी एका फटक्याचा तर खेळ होता. आता तर मी यात एक्सपर्ट झालो होतो. जीवघेणा फटका हा नेमका कुठे आणि कसा मारायचा हे तंत्र मला उमगले होते. आणि बहुधा याचा अजून एकदा वापर करणे बाकी होते, कारण जिथे मी तिला मारले होते त्या कोपर्‍यात ती आता मला दिसली नाही. मी नक्की घाबरलो कि वैतागलो माहित नाही पण त्रासून मी त्या कोपर्‍याचा कोपरा न कोपरा शोधून काढला. कुठे दिसली नाही म्हणून मग स्वतावरच चिडलो. मगाशीच तिला का ठार मारले नाही याचा पश्चाताप होऊ लागला. तेव्हापासून आतापर्यंत बराच वेळ झाला होता. मध्यंतरी लाईटही गेली होती. जर फारशी अर्धमेली झाली नसेल तर घराच्या या कोपर्‍यापासून त्या कोपर्‍यापर्यंत कुठेही जाऊन दडली असण्याची शक्यता होती. तिला लवकरात लवकर शोधणे गरजेचे होते. परत लाईट गेली तर शोधकामाला ब्रेक बसायचा. इतक्यात टीवीच्या रिकाम्या खोक्यातून खुडबुडीचा आवाज ऐकू आला. पायाने खोका हलवला तसा आवाजही वाढला. याचा अर्थ ती नक्कीच आत गेली होती, पण आता बाहेर सुटकेचा मार्ग मिळत नव्हता. तसेही बाहेर तिची मौतच तिची वाट बघत होती. पण तिला याची कुठून कल्पना असणार. आवाज तर बर्‍यापैकी मोठा येत होता, म्हणजे अजून बरीच जान बाकी असावी तिच्या अंगात. बाहेर पडल्यावर ती किती वेगाने आणि सुसाट पळू शकते याची खात्री नव्हती. त्यामुळे जरासे घाबरतच, पायानेच मी कसेबसे खोक्याचे कवर एका बाजूने थोडेसे उचकटून फट निर्माण केली आणि खोक्यावर पुन्हा एकदोन हलकेच लाथा मारून मागे सरकलो. माझ्या अंदाजानुसार दुसर्‍याच क्षणी ती बाहेर आली. इथे तिथे कुठेही न पळता लडखडतच ती समोर म्हणजे माझ्याच दिशेने येऊ लागली. मला वाटले होते तेवढा जीव नव्हता तिच्या अंगात. डोळ्याकडचा भाग सुजून वर आला होता. कदाचित आंधळीही झाली असावी. तसेही या प्राण्याची मला नेहमी किळसच वाटत आली होती, पण आता तर ती जरा जास्तच कुरूप दिसत होती. आता नकोच तिचे ते जास्त जवळ येणे याच विचारात चिडून मी जरा जोरातच फटका मारला. जागेवरच थांबली. तिथल्या तिथे खेळ खल्लास..!

रीतसर तिलाही मी उचलून सुपड्यात टाकले. आता यांना कुठे फेकावे हा प्रश्न होता. दार उघडून घराच्या जवळच फेकणे बरोबर नव्हते. या रात्रीच्या वेळी लांबवर जायचे म्हणजे रस्त्यानेही अंधारच. काळोख्या रात्री या तिघींना असे घेऊन जाताना आणखी यांच्या कोणी नातलगांनी पाहिले तर... तसेही नुसते दार किंवा खिडकी उघडायलाही मला आता भिती वाटत होती. मगासपासून यांनी जे आतमध्ये थैमान घातले होते, जी यांची चिक-चिक चिक-चिक चालू होती, ती ऐकून कदाचित काही जणी दाराशीही जमल्या असण्याची शक्यता होती. त्यापेक्षा सरळ कागदात गुंडाळून, एक बोळा करून त्याच झरोक्यातून यांना बाहेर भिरकावून द्यावे जिथून या आल्या होत्या. विचार मनात येताच झरोक्याच्या लांबीरुंदी उंचीचा अंदाज घ्यायला म्हणून वर नजर टाकली आणि... आणि मटकन खालीच बसलो.. ती तिथेच होती.. त्याच झरोक्यावर.. तशीच एक.. अजून एक.. तेच ते किळसवाणे रूप आणि रोखलेले डोळे.. माझ्यावरच खिळलेले.. माझी नजरही शून्यात फिरून येऊन पुन्हा त्याच झरोक्यावर खिळून राहिली.. अजूनही झुंज बाकी होती... अजूनही बरीच रात्र बाकी होती...!

...........................................................................................................

- स मा प्त -

काही महत्वाचे मुद्दे -

१) हि कथा पुर्णपणे काल्पनिक असून लेखकाने कधीही अश्या निर्घूनपणे कोणत्याही प्राणी-पक्षी-किटकाचा जीव घेतला नाही याची सर्व प्राणिमित्रांनी नोंद घ्यावी.

२) कथेतील निशाचर कोणाच्या आवडीचा असल्यास त्याच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत याची खबरदारी म्हणून कथेत कुठेही त्याच्या नावाचा प्रत्यक्षपणे उल्लेख नाहिये.

३) कथेच्या शेवटावरून काही चाणाक्ष वाचकांना अंदाज आला असेल की लेखकाने याचा दुसरा भाग काढायची तजवीज केली आहे, पण कथा कितीही आवडली तरी अशी भयानक आणि किळसवाणी अपेक्षा माझ्याकडून कोणी ठेऊ नये.

धन्यवाद,
तुमचा अभिषेक

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

अभिषेकराव...... जमली आहे........ मस्त अगदी...... जे तुम्हाला हवे होते ते बरोब्बर साध्य झालेले आहे...... वाचताना एकदा जरी अंगावर काटा आला(किळस्/थरार यापैकी कशानेही) तरी कथा जमली असे म्हणायला हरकत नाही. वातावरणनिर्मिती झकासच.

बाप्रे
मस्त मस्त आणि मस्तच
अस वाटत होतं की हे सगळं माझ्यासमोर चालू आहे
नेहमीप्रमाणेच जमली आहे Happy
आता मला जेंव्हा केंव्हा ती दिसेल ना तेंव्हा हिच झुंज आठवणार बघ Happy

झक्कासच... या कथेचा काही भाग मी जगलो आहे चक्क. अश्या घुसखोरांना पळवून लावण्यासाठी काही उपायही केले त्या सगळ्याची आठवण झाली.

प्रचंड भितीदायक कथा... कशाला मी असल्या गोष्टी वाचते कोण जाने.. एव्हड्यात कुठे मी विसरायला लागले होते असल्या प्राण्यांना.. आमच्या रुममधे हे प्राणी असले की आम्ही रुमच्या बाहेर असायचो.. आणि आम्ही दुसर्‍यांच्या रुममधे आश्रय घेउ नये म्हणुन दुसर्‍या रुममधल्या शुरवीर मुली हे घुसखोर बाहेर काढायचे...

या निमित्ताने बर्‍याच किळसवाण्या प्रकारांची आठवण झाली.. Sad

प्रचंड भिती वाटत असुनही मी कथा शेवटपर्यंत वाचली... का वाचली पण?? Happy

हा हा हा... आतापर्यंत आलेल्या सर्व प्रतिक्रिया आवडल्या.. मी स्वता प्रामाणिकपणे कबूल करतो की यांची किळस येणे हे कारण जरी देत असलो तरी मी घाबरतोच यार यांना.. आधीही एका कथेत यांचा ओझरता उल्लेख केला होता, तेव्हाच डोक्यात आले होते की यांच्यावर तर एक कथा बनलीच पाहिजे.. बायकोही आधी हसली, म्हणाली काहीही काय लिहितोस.. पण अर्धी लिहून तिला दाखवली, आणि खूश झाली, म्हणाली मस्त वाटतेय वाचायला, आणि म्हणूनच मग पुर्ण करून इथे टाकायची हिंमत केली, माझ्या या हिंमतीला दाद देणार्या आतापर्यंत आलेल्या सार्या प्रतिक्रियांचे आभार.. Happy

आधीच्या कथेत म्हणजे त्या भुताच्या कथेत होता उल्लेख, मोठ्या मोठ्या एकाजागी राहणार्‍या पाली... यक्स्स्स्स्स...

हो ग्ग चिमुरे.. तशी ती पुर्ण काल्पनिक कथा होती, पण त्या गडचिरोलीच्या अनुभवमध्येही होता उल्लेख, तो मात्र खराखुरा होता.

गडचिरोलीच्या अनुभवमध्येही होता उल्लेख, तो मात्र खराखुरा होता.>>>>>> हा आठवत नाहिये.. जाउ दे पण, आवर्जुन जाउन आता वाचणार नाहिये... भयंकर किळसवाणा प्राणी आहे हा.. आता इतकी चर्चा केल्यावर माझ्या स्वप्नात येउ नये म्हनजे मिळवलं...

हा हा... नको वाचूस.. बाकी काल रात्री कथा टाकून झोपलो आणि माझ्या स्वप्नात या तर नाही आल्या.. पण लोकांचे घाणेरडे - शिव्या शाप देणारे प्रतिसाद मात्र नक्की आले.. Happy

नशीब मी रात्री कथा वाचली नाही... नाहीतर घाणेरडे - शिव्या शाप देणारे प्रतिसाद स्वप्नात येण्याऐवजी खरे खुरे इथेच आले असते Wink

थरारक ! एव्हढा तर मी आयुष्यात पहिला ईंग्लीश हॉरर बघीतला तेव्हाही घाबरलो नव्हतो ! मी हे सगळे प्रसंग दरवर्षी मार्च-एप्रील-मे-अर्धा जुन या महिन्यामधे जसेच्या तसे अनुभवतो ! मी आणि माझे कुटुंब या एकाच प्राण्याला भयंकर घाबरतात. त्यात आमचे घर तळमजल्यावर आणि बाहेर नेहमीच गवत/झाडे असतात. त्यामुळे या त्यामानाने अतिशय छोट्या जिवाचा खुप मोठा मनःस्ताप दरवर्षी अनुभवतो. त्या शिकार्‍यांच्या कथांमधे कसा "माझा पहिला वाघ / माझा विसावा पँथर" अशा प्रकारची शिर्षकं देऊन एकाच प्रकारची कथा रिपीट केलेली असते - अगदी तस्संच तिच कथा दरवर्षी माझ्या घरात घडते. अगदी ताजी कथा तिन दिवसापुर्वीच घडलीये. धन्यवाद मित्रा ! Happy

टवाळभाऊ, धन्यवाद..?? नको त्या आठवणी जाग्या केल्याबद्दलही धन्यवाद दिलेत त्याबद्दल आभारी आहे.. Happy
प्रतिसाद आवडला आपला.. Happy

नको त्या आठवणी जाग्या केल्याबद्दलही धन्यवाद दिलेत त्याबद्दल आभारी आहे..

तो तर जिवनाचा अविभाज्य भाग असल्याने आणि मनात भिती असल्याने न टाळता येण्याजोगा आहे. भारतातले वातावरण या जिवा साठी सर्वात योग्य आणि त्यातही हे उन्हाळ्याचे महिने जास्त. त्यामुळे जसं ढेकणांच्या त्रासाला कंटाळून घर जाळू शकत नाही तसंच या त्रासामुळे घर सोडूही शकत नाही. भारत सोडणे हाच एकमेव पर्याय बहुधा असेल. तेही सध्या शक्य नाही. Happy
धन्यवाद दिले ते तुझ्या लिखाणाला ! आपला अनुभव पण कधी-कधी दुसर्‍याच्या शब्दात वाचायला छान वाटतं ! लेखनशैली छानच आहे तुझी ! Happy

आपला अनुभव पण कधी-कधी दुसर्‍याच्या शब्दात वाचायला छान वाटतं.

+११११

बर्याचदा लिहिताना हेच डोक्यात असते की आपला अनुभव लोकांना सांगण्यापेक्षा लोकांचा स्वताचा अनुभव याच्याशी रीलेट झाला तर खरी कथा सार्थकी लागली.

अभिषेक, अतिशय सुंदर मनोरंजनात्मक कथा शेवट पर्यंत खिळवुन ठेवले.

सुरुवात वाचुन.....

ती जिन्याच्या डाव्या भिंतीवर फतकल मारून बसलेली (की झोपलेली) होतीच. >>> कोण????

<घड्याळ अन पाकीट काढून फडताळावर ठेवले>

<हातातल्या घड्याळावर एक नजर टाकली तर साडेसात वाजले होते>

फडताळावर ठेवलेले????

<घड्याळ अन पाकीट काढून फडताळावर ठेवले>

<हातातल्या घड्याळावर एक नजर टाकली तर साडेसात वाजले होते>

फडताळावर ठेवलेले????

>>>>>>>>>>>>>>>>>

चातका, मला दोन हात आहेत रे?
तर घड्याळ दोन नसू शकतात का?
Lol

बाकी कथा वाचत होतास की पेपर चेक करत होतास.. Proud

अवांतर - या चेटकीणीच असतात रे.. रंग बदलणार्‍या.. Happy

काल्पनिक ? :O

अरे माझे आत्मचरित्रच लिहायला घेतलेस तू ! Proud

बाकी सगळ्या गोष्टी तंतोतंत जुळत असल्या तरी मी पालींना मारून टाकत नाही बरं.
मी त्यांना मस्त आंघोळ घालतो, काला हिटने.