वंध्यत्व-२. स्त्रीयांमधील वंध्यत्व आणि मासिकपाळीचे सामान्य चक्र.

Submitted by साती on 24 April, 2012 - 15:24

यापूर्वी वाचा -
भाग १. प्राथमिक माहिती आणि पुरूषांमधील वंध्यत्व.

भाग२. स्त्रीयांमधले वंध्यत्व आणि मासिकपाळीचे सामान्य चक्र.

............. पुरूषांमधील वंध्यत्वाविषयी चर्चा करणे जेवढे सोपे होते,तेवढेच स्त्रीयांबद्दल चर्चा करणे कठिण. कारण बाळाच्या जन्मामध्ये तिचा हिस्सा मोठा. स्त्री-पुंबीज मिलनापासून ते बाळ गर्भाशायात वाढून , जन्माला येपर्यंतच्या सगळ्याच गोष्टी स्त्रीच्या शरीरात घडतात. त्यामुळे अपत्य जन्मापूर्वीच्या प्रत्येक पायरीतील चूक स्त्रीयांमध्ये वंध्यत्वाचा दोष निर्माण करू शकते.

स्त्रीयांमधील वंध्यत्वाची मुख्य कारणे खालीलप्रमाणे-

  • १.बीज तयार होऊन बीजांडातून बाहेर पडण्याच्या प्रक्रियेतील दोष (disorders of follicle maturation and ovulation) - जवळजवळ ४०% दोष या प्रकारचे. यात बीजांडातील दोषांबरोबरच मुख्य प्रजनन संस्थेबाहेर असणाया अंतर्स्त्रावी(endocrine glands) ग्रंथींचा उदा. हायपोथॅलॅमस, पिच्युटरी, थायरॉईड यांचा मोठा प्रभाव असतो
  • २.बीजनलिकेतील दोष (disorders of fallopian tubes) - बीजांडापासून सुटणारे बीज आपल्या बोटांसारख्या फ़िंब्रिआंनी (fimbriae) पकडून त्यांना गर्भाशयापर्यंत आणायचे काम या बीजनलिका करतात. जन्मत:च त्या बंद असू शकतात (stenosis) किंवा काहीवेळा जंतूसंसर्गामुळे किंवा इतर काही कारणांनी बंद होतात.
  • ३.एंडोमेट्रिऑसिस (endometriosis)
  • - सर्वसाधारणतः गर्भाशयाच्या आत असणार्‍या आवरणाच्या पेशी (एंडोमेट्रियम) ओवरी,गर्भनलिका किंवा ओटीपोटात इतरत्र आढळणे. ज्यामुळे चुकीच्या ठिकाणी ब्लॉकेजेस किंवा रक्तस्त्राव होउन पाळीच्या काळात अतिशय वेदना होतात आणि नंतर राहिलेल्या ब्लॉकेजेसमुळे (scaring and stenosis) वंध्यत्व येते.

  • ४.गर्भग्रीवेचे /गर्भाशयमुखाचे दोष (disorders of cervix)-चुकीच्या पद्धतीने तयार होणारा सर्वायकल म्युकस(गर्भग्रीवा स्त्राव), स्टिनोसिस.(गर्भग्रीवेतून गर्भाशयात जाणारा मार्ग काही कारणांनी बंद असणे.
  • ५.इतर (multiple or unknown causes) - जवळपास २०% स्त्रीयांमध्ये नेमके कुठले दोष आहेत हे कळूनच येत नाही किंवा वरिलपैकी विविध प्रकारचे दोष एकत्र असू शकतात

.

स्त्रीयांमधल्या वंध्यत्वाचा विचार करण्यापुर्वी आपल्याला स्त्री प्रजनन संस्थेची प्राथमिक ओळख करून घ्यावी लागेल. आजकाल हाताशी नेट असल्याने आपण ही माहिती कधीही मिळवू शकतो म्हणा. पण पुढे कारणांची आणि उपायांची चर्चा करण्यापूवी सगळे संदर्भ एकत्र असावेत म्हणून इथे सुरुवातीसच थोडक्यात माहिती देत आहे.

निसर्गाने स्त्री शरीराची रचना बरिच गुंतागुंतीची केली आहे. स्त्रीला केवळ अपत्य प्राप्ती होण्यासाठीच नव्हे तर स्त्री म्हणून योग्य शारिरीक विकास साधण्यासाठीही विविध प्रकारच्या अवयवांचे, आंतर्स्त्रावी ग्रंथींचे(हॉर्मोन्स), मेंदू आणि मज्जासंस्थेचे योग्य आणि नियमित कार्य असणे हे गरजेचे आहे.

overview.gif

स्त्री भ्रूणाच्या आईच्या पोटातील आयुष्याच्या बाराव्या आठवड्यातच तिच्या बीजांडात जवळजवळ ६० ते ७० लाख बीजे अर्धपक्व अवस्थेत असतात. मुलगी जन्मताना त्यातील किमान २० लाख बीजे शिल्लक राहतात. तिच्या पहिल्या पाळीच्या वेळी फ़क्त ५ लाख बीजे दोन्ही बीजांडात मिळून शिल्लक असतात. उरलेली बीजे बीजांडाच्या (ओवरीच्या) आतच नष्ट होतात. या जवळपास ४-५ लाख बीजांतून केवळ एकच बीज दर महिन्याला पूर्ण पक्व अवस्थेत बीजनलिकेत येणं ही निसर्गाची अफ़ाट किमया आहे.

coronal section.jpg
होतं काय की दर महिन्याला एखादी स्पर्धा असल्याप्रमाणे ४०-५० बीजांचा समूह परिपक्व व्हायच्या तयारीला लागतो. प्रायमरी फॉलिकल आणि सेकंडरी फॉलिकल या दोन पायर्‍या बीजांडातच होतात. पण या सेकंडरी फॉलिकलचं परिपक्व / मिलनोत्सुक स्त्रीबीज बनवण्यात मात्र प्रजनन संस्थेच्या बाहेर असणार्‍या बाकीच्या घटकांचा प्रभाव असतो.
यातील मुख्य अवयव आहे हायपोथॅलॅमस ग्रंथी (Hypothalamic gland) आणि तिच्या हुकुमाबरोबर वागणारी पिच्युटरी ग्रंथी (Pituitary gland). मासिकपाळीच्या पहिल्या दिवशी ही हायपोथॅलॅमिक ग्रंथी जीएन.आर.एच. (GnRH) नावाचे हॉर्मोन सोडते. हे हॉर्मोन जवळच असणार्‍या पिच्युटरी ग्रंथीला अजून दोन प्रकारची हॉर्मोन तयार करायला लावते. पैकी एक म्हणजे एफएसएच (FSH-Folicle stimulating hormone) आणि
दुसरे एलएच (LH- leutinizing hormone). यांपैकी FSH लगेच रक्तात सोडले जाते तर LH काही काळाकरिता पिच्युटरितच साठवून योग्य वेळ येताच रक्तात सोडले जाते.

१.मासिक पाळीची फॉलिक्युलर फेज- रक्तात मिसळलेले FSH ओवरीत पोचताच एका किंवा दोन्ही ओवरीतील मिळून ७-८ फॉलिकल्स मोठी होऊ लागतात आणि इस्ट्रोजेन (estrogen) तयार करतात. हे इस्ट्रोजेन रक्तात मिसळते. काही नैसर्गिक संकेत मिळून या इस्ट्रोजनमुळे या सात आठपैकी बाकीची फॉलिकल वाढायची थांबतात व एकच फॉलिकल वाढते ज्याला डोमिनंट फॉलिकल म्हणतात. हे अधिकाधिक इस्ट्रोजेन तयार करत जाते. सुरूवातीला यामुळे रक्तात मिसळणारे इस्ट्रोजेन पिच्युटरीला निगेटिव फीडबॅक देवून आणखी FSH तयार करण्याचे प्रमाण कमी करते मात्र शेवटीशेवटी इस्ट्रोजेन इतके वाढते की पिच्युटरिला पॉजिटिव्ह फीडबॅक मिळून FSH चा शेवटचा मोठा स्त्राव होतो. इस्ट्रोजनमुळे गर्भाशयाचे आतले अस्तर जाड होते आणि त्यात रक्तवाहिन्या वाढतात.

२. ओव्युलेशन फेज- पिच्युटरी जीएनारएचला जास्तच सेंसिटिव्ह होऊन पूर्वी साठवलेले LH रक्तात मिसळायला सुरूवात होते. हे LH रक्तातून ओवरिकडे येऊन डॉमिनंट फॉलिकलला बीज मुक्त करण्यास (ओव्युलेशन) भाग पाडते. ओवुलेशन प्रेडिक्शन किट हे एलेच सर्ज (LH SURGE))द दाखवतात. (एल एच सगळ्यात जास्त प्रमाणात र्क्तात मिसळले गेल्याचा दिवस)तर एल एच सर्जच्या दिवशी सर्वायकल म्युकस सगळात जाड आणि योग्य (स्वागतोत्सुक गर्भग्रीवा स्त्राव- fertile mucus) होतो, गर्भग्रीवा (cervix)गर्भाशयाजवळ म्हणजे वर सरकते आणि मऊ पडून थोडिशी उघडते. थोडक्यात ज्यामुळे वीर्यातील शुक्रजंतूंचा स्त्री शरिरातील प्रवास निर्धोकपणे पार पडेल अशा सगळ्या गोष्टी घडतात. स्त्रीयांमध्ये या काळात शरिरसुखाची आसक्तीही वाढलेली असते.
तर या एलेच सर्जनंतर एक (किंवा क्वचित दोन बीजे)ओवरीतून मुक्त होतात.

बीजांडातील (ओवरीतील) स्रीबीजाची वाढ दाखवणारी ही एक आकृती बघा.

ovary-adam.jpg

३.ल्युटिअल फेज- पाळीच्या साधारण १४ व्या दिवशी हे ओव्युलेशन होऊन मग ल्युटिअल फेज चालू होते. मुक्त ओवम २४ तास योग्य शुक्रजंतूची वाट बघत फॅलोपिअन ट्यूबमध्ये जीवंत राहाते. गर्भशयात बीजाच्या वाढितिल शिल्लक राहिलेल्या भागाला कॉर्पस ल्युटिअम असे म्हणतात. ओव्युलेशननंतरच्या काळात LH कॉर्पस ल्युटिअमला अधिकाधिक इस्ट्रोजेन आणि एक नविन हार्मोन प्रोजेस्टरॉन तयार करण्यास भाग पाडते. या प्रोजेस्टरॉनमुळे शरिराचे तापमान ( बेजल बॉडी टेंपरेचर) वाढते. तसेच गर्भाशयाच्या आतील पेशींचे आवरण (एंडोमेट्रियम)मधे रक्तप्रवाह वाढतो आणि ते तयार बाळाचे संगोपन करण्यास अधिकाधिक सक्षम बनते. प्रेग्नन्सीच्या किंवा ल्युटिनायजिंग फेजच्या काळात येणारे इमॅजिनरी प्रेग्नन्सी सिम्टमही प्रोजेस्टरोन घडवते. जर ओवम फलित झाले तर त्यापासून तयार होणारे HCG-Human Chorionic Gonadotropin ओवरीत शिल्लक असलेल्या कॉर्पस ल्युटिअमला LH प्रमाणेच अधिकाधिक इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन तयार करणास भाग पाडते. मात्र जर ओवम फलित झाले नाही तर हे कॉर्पस ल्युटिअम पाळीच्या तीन दिवस आधी नष्ट होते. इस्ट्रोजेन प्रोजेस्ट्रॉन कमी झाल्याने बाहेर पडलेले ओवम व गर्भाशयाने केलेली गर्भरपणाची तयारीही हळुहळू नष्ट होत नविन मासिक स्त्रावाच्या रुपाने गर्भाशयाबाहेर पडते. यालाच आपण पुढच्या पाळीचा पहिला दिवस म्हणतो आणि चक्रनेमीक्रमे स्त्रीशरीर परत पहिल्यापासून हा सगळा कार्यक्रम परत सुरू करते.

ह्या खालच्या चित्रातून आंतर्स्त्रावी ग्रंथींच्या प्रभावाची माहिती मिळेल.

Menstrual.jpg

याला स्त्रीयांचे हायपोथॅलॅमिक-पिच्युटरी-गोनॅडल अ‍ॅक्सिस असे म्हणतात.

हुश्श! एवढं लिहितानाच थकून गेले मी तर निसर्ग हा चमत्कार कसा घडवुन आणत असेल कुणास ठाऊक. त्यात हे सगळे घडत असताना शरीरातिल साखरेचे प्रमाण योग्य हवे, थायरॉईड हार्मोन्सचे प्रमाण योग्य हवे, नाहीतर स्त्रीबीजाची वाढच होणार नाही किंवा अपेक्षित वाढ होणार नाही.

या वरच्या चर्चेवरुन ओवुलेशन प्रेडिक्क्षनकरिता
१. बेजल बॉडी टेंपरेचर मेथड
२. सर्वायकल म्युकस सेल्फ एक्जामिनेशन मेथड
३. ओव्युलेशन कीट मेथड

हे कसे वापरतात हे कळले असेल अशी आशा आहे. अर्थात वंध्यत्वनिवारण या ४थ्या भागात आपण त्या विषयी चर्चा करू. तर यापुढिल तिसर्‍या भागात स्त्रीयांमधील वंध्यत्वाच्या काही विशिष्ट महत्त्वाच्या कारणांवर चर्चा करू.

फॉलिक्युलर स्टडी या प्रकारात साधारणपणे पाळीच्या नवव्या दहाव्या दिवसापासून पुढे ६-७ दिवस पोटावरून (transabdominal) किंवा योनीत (transvaginal) सोनोग्राफिचा प्रोब घालून त्याद्वारे फॉलिकल योग्य प्रकारे तयार होते की नाही हे बघितले जाते.

*****************************************************************************************************

१.इतका किचकट भाग सोप्या भाषेत समजावून सांगायच्या प्रयत्नात माझी फॅफॅ उडालेली आहे तरी कुणाला समजण्यात काही अडथळा असेल तर कळवावे, पुन्हा एकदा प्रयत्न करेन. Happy
२. हा भाग समजल्याखेरिज पुढच्या असंख्य चाचण्या आणि उपचार कळणे शक्य नाही त्यामुळे थोडंफार डिटेलात लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.
३. शक्यतो मुख्य इंग्रजी शब्द तसेच ठेवले आहेत. त्यामुळे भाषांतर उगाच पुस्तकी किंवा क्लिष्ट होणार नाही. तसेच आपल्या डॉक्टरशी चर्चा करताना आपल्याला भाषेचा/शब्दांचा अडथळा येणार नाही. तसेच नेटवरून इंग्रजी संकेतस्थळावर संदर्भ शोधणे सोप्पे होईल.
४.माझ्या ज्ञानाला मर्यादा आहेत किंवा मला जे माहिती आहे ते सगळेच इथे लिहिणे शक्य नाही तेव्हा योग्य संदर्भ मिळवून सखोल माहिती पाहिजे असल्यास ती मिळवायला हे प्राथमिक ज्ञान म्हणून उपयोगी पडेल. बाकी बाबतीत आपले डॉक्टर आपल्याला मदत करतीलच.
५. माझी ही माहिती पुरवायची धडपड आणि कष्ट Happy लक्षात घेता कुणी ही माहिती कॉपी पेस्ट करुन वापरल्यास/ फॉर्वर्ड केल्यास कृपया "मायबोलीवरिल डॉ. साती " या आयडीला थोडंसं क्रेडिट द्यायला विसरु नका. Happy
६. कृपया मुद्रितशोधनातील चुका कळवा, मला वेळ मिळताच योय तो बदल करेन.
७. सर्व आकृत्या आणि चित्रे नेटवरून साभार. संदर्भ पाहिजे असल्यास देईन.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साती खुप छान आणि उपयुक्त माहीती दिलीत दोन्ही लेखात
पालकहो,
चालणार असेल तर तरुण मुलामुलींना वाचायला सांगणे.>>>>>>>>>>>>>> रैना अगदी बरोबर ++

साती.. खुपच मस्त लेख.. क्लीष्ट विषय अत्यंत सोप्या शब्दात लिहला आहे.. हॅट्स ऑफ.. Happy

खूपच माहितीपूर्ण लेख....धन्यवाद !

अजुनही सो-कॉल्ड सुशिक्षित माणसांमध्ये ही याबाबत गैरसमज आहेत.
माझ्या एका जावेला लहानपणापासून अनियमीत पाळीचा त्रास होता. तिची आई पुण्यासारख्या शहरात राहूनही तिला एका वैद्यांकडे घेऊन गेली.त्या बाबाने काय औषधे दिली माहित नाही पण भयानक उष्णतेचा त्रास झाल्यावर बंद केली. दुर्दैवाने मूळ कारण शोधण्याचा कधी प्रयत्नच झाला नाही.
त्याहून दुर्दैव हे कि लग्न ठरविताना त्यांनी माझ्या दिराला याबद्दल काही सांगितले नाही.पहिल्या वर्षात काही कळले नाही. कारण ती birth control pills घेत होती म्हणे. एक वर्षाने मेंदूत रक्ताची गाठ झाल्यामुळे (precisely pitutary gland) तिचे ऑपरेशन करावे लागले. ती गाठ आवश्यकता नसताना पिल्स घेतल्यामुळे आणि चुकीची औषधे घेतल्यामुळे आली असे बोलले गेले. नक्की काय ते उमगले नाही...पण त्यानंतर ना तिने कधी पिल्स घेतल्या ना तिची कधी पाळी आली.
अवांतर - माझ्या दिराने यात खूपच समजुतदारपणा दाखविला.तिला अंतर दिले नाही. पण फसवणुकीची जखम आहेच.

साती,खुपच छान सविस्तर माहिती ,सुयोग्य चित्रांद्वारे देण्याचा तुझा मानस खुपच छान आहे.मुळ माहिती सोप्या भाषेत मांडता आली आहे्. त्याबद्दल तुझे खास अभिनंदन.

बारावीला Reproduction हा धडा होता. पण आमच्या सरांनी तो गुंडाळला. त्यामुळे मी फक्त रट्टा मराला होता.
लग्न ठरल्यावर मात्र डॉ कडे जाऊन ही माहिती समजून घेतली होती.
सोप्या भाषेत माहिती दिल्याबद्द्ल धन्यवाद.

माहीतीतर खरोखरच छान, आणि उपयुक्त आहे. पण या माहीतीची खरी गरज आज जालविश्वात वावरणार्‍या स्त्रिंयापेक्षा, ग्रामीण भागातील स्त्रिंयांना मिळणे अधिक आवश्यक आहे. त्या अनुशंघाने काहीतरी होण्याची गरज आहे. कारण तिथे असलेली निरक्षरता आणि जुनाट प्रथांमुळे वर गीता यांनी उल्लेख केलेल्या घटनेसारख्या अनेक घटना होत असतात.

साती,
दोन्ही लेख अतिशय सुंदर. खूप सोप्या भाषेत व उपयुक्त माहिती. एवढया कळ्कळीने ही माहिती लिहिल्याबद्दल आभार. पुढील लेखनाला शुभेच्छा. बाकी जंगलातल्या कोल्हेकुईकडे दुर्लक्ष करावे हे उत्तम.

साती,

आता मुद्द्याचं बोलू.

>> स्त्री अर्भकाच्या आयुष्याच्या बाराव्या आठवड्यातच तिच्या बीजांडात
>> जवळजवळ ६० ते ७० लाख बीजे अर्धपक्व अवस्थेत असतात.

इथे गर्भाच्या असं हवं होतं ना?

माहिती खरच चांगली आहे. एकदा वाचली. खूप गुंतागुंतीची वाटते. परत सावकाशीने वाचेन. लेखाबद्दल आभार! Happy

आ.न.,
-गा.पै.

साती, लेखमालिकेतला हा आणि आधीचा भागही उत्तम लिहिलाय! ही सगळी माहिती मराठीत, सगळ्यांना समजेल अशा सोप्या भाषेत लिहिणं भारी काम आहे!

लेख आवडला. असे सोप्या भाषेत सांगणे अवघडच. माझा मुलगा प्रीटीन मध्ये आहे आणि त्याच्या प्रश्नांची उत्तरे शक्य तितक्या सोप्या प्रकारे देताना त्रेधातिरपीट असतेच.;) पुस्तकांचा आधार वाटतो.

साती, उत्तम माहिती आहे!
हे सगळं मराठीत लिहीणे खरेच अवघड आहे.
फक्त दोन मुद्दे अजून हवे होते-
१] फिमेल रिप्रो. सिस्टीममधे शुक्राणू ३ दिवसापर्यंत जिवंत राहू शकतात, आणि तू लिहील्याप्रमाणे ओव्हम फक्त २४ तासच व्हायेबल असते. या दोन्ही टाईमस्पॅनचा वापर योग्य रित्या केला तरच गर्भधारणेची शक्यता वाढेल.
२] अनियमित पाळीची सर्वात सामान्य कारणे.

अतिशय उत्तम माहिती व उत्तम उपक्रम साती! तुझे कौतुक वाटते. ज्या कष्टाने व तळमळीतून तू इथे लिहिले आहेस त्याचा अनेक स्त्रियांना व त्यांच्याबरोबरच त्यांचे भावी पती/ पिता वा पुत्रांना लाभ होईल हे नक्की आहे.

अतिशय चांगली माहिती सोप्या शब्दात दिली आहे त्याबद्दल धन्यवाद. अनेक स्त्रियांना व त्यांच्या पतींना याचा लाभ होईल हे नक्की आहे.

थोडं अवांतर, इथे अमेरिकेत १८ वयानंतर सर्व मुलींना ob/gyn कडे जाऊन physical/pap test करावी ही शिफारस करतात. गर्भाशयात/ गर्भनलिकेत काही दोष असतील किंवा पाळी अनियमित असेल तर त्याची चौकशी तेव्हा केली जाते. मला वाटतं, भारतात बरयाच मुली लग्नानंतरच ob/gyn कडे पहिल्यांदा जातात. नुसता चेक अप करून घेण्यासाठी बहुतेक कोणी जात नाही. कदाचित हे चित्र बदलू शकलं तर पुढे येण्यारया समस्यांचे प्रमाण कमी होईल असं मला वाटतं.

सगळ्या प्रतिसादकांचे धन्यवाद.
गामा पैलवान अगदी खरंय. स्त्री भ्रूणाच्या किंवा स्त्री गर्भाच्या असं असायला पाहिजे ते.
योग्य बदल करत आहे.

मंदार, हो. संपर्कातून किंवा फोनवरून विचारलेल्या प्रश्नांबद्दल आपले म्हणणे योग्य आहे. मी विचारणार्‍याचे नांव वगळून प्रश्न इथे वेगळा प्रश्नोत्तराचा धागा काढून लिहिणार आहे.

बागेश्री, आगाऊ आणि इतर यांनी इथे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पुढे-पुढे येणार आहेत.

दीपा,खरे तर मुलीने पहिली पाळी (मिनार्की) गाठायच्या आसपास एकदा गायनॅक कंसल्टेशन होणे अगदी जरूरी आहे.

अतिशय माहीतीपूर्ण लेख साती.
हॉर्मोनल चढ उतार विशेशत: स्त्रीयांमधे टेस्टोस्टेरॉन वाढणे,पीसीओडी बद्दलही जरा प्रकाश टाक जमल्यास- ही विनंती!>> खरच

साती उत्तम लेख. सोपी भाषा आणि उगाच मराठीकरणाचा अट्टाहास न बाळगता सर्वाना कळेलसे लिहिले आहेत..
एक सुचना: हा दुसरा भाग लेख विभागात आलाय त्यामुळे तो नंतर कुणाला हवा असेल तर सापडायला अडचण होईल म्हणुन कृपया तो आरोग्यम धनसंपदा विभागात हलवता का?

साती, तूम्ही अतीशय चांगले काम करत आहात. हे काम चालु राहू द्या.
खूपवेळा माहीती नसल्याने लोक चूकीच्या मार्गाने जावू शकतात. तूमच्या लेखाने कदाचीत काही जणांन योग्य मार्ग तरी सापडेल.

साती
खुपच उत्तम लेख!
मला वाचता वाचताच हुश्श झालं! Happy तुम्ही लिहिताना किती कष्ट घेतले असतील ते कळले!

मृनिश, टप्प्याटप्प्याने लिहिता यावा म्हणून गुलमोहरात लिहिलाय लेख.
आता हा इतक्या प्रतिसादांसह आरोग्य धनसंपदात कसा हलवायचा काही कळत नाही.

३-१४, पहिल्या भागाची लिंक दिली आहे.

गीता, तुमच्या जाऊबाईंसारख्या बर्‍याच माझ्या पेशंट आहेत. मुख्यतः पीसीओडीच्या.
लग्न ठरवताना कुणी हल्ली पाळी-बिळी रेग्युलर येत का अश्या चौकश्या करत नाहीत. हे योग्य की अयोग्य हा नैतिकतेचा भाग झाला म्हणा. पण कुणाची जाणून बुजून फसवणूक होऊ नये हे खरंय.

विजय आंग्रे, हा लेख वंध्यत्व सिरीजमधलाच एक भाग आहे. नेट वापरणार्‍या शहरी मुलींना पडणार्‍या प्रश्नांकदे पाहूनच हे लेख लिहिणे सुरू केलेय.

बाकी आमच्या जिल्ह्यात काही गायनॅक डॉक्टर्स दर महिन्यात एकदा गावागावातल्या शाळांत जाऊन
९ वी-१० वीच्या मुलींना मासिक पाळी,प्राथमिक स्वच्छता इ. माहिती स्लाईड शो वैगेरे द्वारा पुरवतात.

मी गायनॅकॉलॉजिस्ट नाही त्यामुळे इथल्या या उपक्रमाचा मी भाग नाही. तशीही हा कीचकट विषय कानडीतून समजावण्याइतकी कानडी मला येत नाही.
माझ्या क्षेत्रातले (इंटर्नल मेडिसीन) प्रश्न डिस्कस करण्यापूरतीच कानडी मला येते. Happy

वरदा आणि इतर, अ‍ॅडमिनशी केलेल्या चर्चेबद्दल धन्यवाद.

हे तुझे सुटे सुटे लेख न दिसता लेखमाला म्हणून दिसले तर जास्त उपयोग होईल. अ‍ॅडमिनला तशी विनंती करते.
दोन्ही लेख एकाच विभागात/ ग्रुपमधे येण्यासाठी संपादन मधे जा आणि दोन्ही सगळे ऑप्शन्स एकसारखे कर.

Pages