अरुणाचलप्रदेश १......."ईशान्यभारत - भारताचा एक दुर्लक्षित भाग"

Submitted by Prasad Chikshe on 22 April, 2012 - 05:10

अरुणाचल ......उगवत्या सूर्याचा प्रदेश. भारताच्या ईशान्येकडील अचंबित करणारे देखणे सौंदर्य. दर दहा कोसाला भाषा बदलते हे जर आजच्या जगात अनुभवायचे असेल तर नक्कीच अरुणाचलला गेले पाहिजे. भाषा, वेशभूषा, परम्परा, रीति यांमध्ये प्रचंड वैविध्य आपल्याला आजच्या युनिकोडच्या जगात पाहायला मिळते. उंच हिमालयाच्या कुशीत,घनदाट जंगलाचे पांघरून घेऊन सर्वदूर असलेल्या शांततेत मधुर संगीत निर्माण करत वाहणाऱ्या सरिता, जंगलातील जैविक संपत्तीबरोबर भूगर्भात दडलेले अपार भांडार, जलस्त्रोतांपासून हजारो मेगावॅट विद्युत निर्माण करण्याची क्षमता, इथल्या उंच पर्वतांमुळे संरक्षण दृष्ट्या अतिमहत्वाचा हा प्रदेश. एकूणच

ईशान्य भारत सर्वच दृष्टीने खूप महत्वाचा. या भागाची ९६% सीमा ही पाच देशांना लागून असलेली आंतरराष्ट्रीय सीमा. ३२ किमीच्या चिंचोळ्या भूभागाने तो आपल्या मातेशी जोडलेला. मग बलशाली ड्रॅगनची वाईट नजर नेहमीच त्याच्यावर असणार. १९६२ मध्ये या भागाच्या अर्ध्याच्या अधिक भूप्रदेशावर त्यांनी कब्जा केला. पण अतिप्राचीन परंपरेशी व संस्कृतीशी अतूट नाळ असलेल्या येथील लोकजीवनावर झालेल्या राष्ट्रप्रेमाच्या संस्कारामुळे,महामेरू हिमराजामुळे व महाविस्तीर्ण ब्रम्ह-पुत्रमुळे माओच्या पुत्रांना इथून जावे लागले.

दांगेरीया बाबांची( शंकराची ),किरीतांची,हिडींबा,घटोत्कच, भीष्मक व रुक्मिणीची ही भूमी.. गुवाहाटीची कामाख्या ही कांचीकामकोटीच्या शंकराचार्यांची कुलदेवता. लाचीत बोर्फुकन (Lachit Borphukan) हा मुघलांशी मराठ्यांच्या छाव्यासारखा लढला.

अरुणाचलची राज्यभाषा हिंदी. आजही जुने लोक एकमेकांना भेटल्यावर जय हिंद म्हणून वंदन करतात. इतिहासातील काही अक्षम्य चुकांमुळे शापित नंदनवनापेक्षा ह्या सप्त भगिनीच्या प्रदेशात आपल्या बांधवांना जास्त जीव द्यावे लागले.

विवेकानंद केंद्राचे एक वर्षांचे कन्याकुमारीत प्रशिक्षण घेऊन मला अरुणाचलमधील अरुणज्योती प्रकल्पा साठी नियुक्त केले. मुंबईहून कोलकत्ता मग गुवाहटी व तेजपूर तेथून दिब्रुगड असा ७० तासांचा प्रवास करून केंद्राच्या “ब्रिझी मेडोझ” या वास्तुत पोहोंचलो. स्वामी विवेकानंदांना अमेरिकेत ज्या पहिल्या घरात प्रवेश मिळाला त्याचे नाव होते “ब्रिझी मेडोझ”. केंद्राच्या अरुणाचल प्रदेशाचे प्रवेशद्वार म्हणजे हे कार्यालय. काही कारणास्तव मला अरुणाचलात जाण्यासाठी दीड महिना वाट पहावी लागली. पहिला प्रवास होता तेजूसाठीचा. प्रचंड पाऊस त्यात नदीतून केलेला अनोखा प्रवास. दिगारू,लोहितचे अजब पात्र. प्रीतम मारो, याबी, याकब, मालार दिग्ली असे अनेक अरुणाचलचे अप्पर सुभांशिरीन जिल्ह्यातील नव्या मित्रांबरोबर एक वेगळेच नाते जुळले.

“A” for अमेरिका ते “A” for अरुणाचल हा बद्दल घडला ते “A” for अण्णा एक ज्ञानप्रबोधिनीचे द्वितीय संचालक श्री अण्णा ताम्हणकर व दुसरे अण्णा हजारे यांच्यामुळे. पण हा विवेक माझ्यात आला ते माझ्या विवेक कुलकर्णी सरांसोबतच्या “प्रचीती” मुळे. “A” for अंबाजोगाईचा मी ३००० किमी च्या दापोरीजो गावात केंद्राच्या कामासाठी पोहोंचलो मे महिन्यात. दापोरीजो हे अप्पर सुभांशिरीन जिल्ह्याचे मुख्यालय. कुपोरीजो हे दापोरीजो पासून रस्त्याने दहा किलोमीटरवर. दोन्ही गावांमधून वाहते सुभांशिरीन. कुपोरीजोला केंद्राची प्राथमिक शाळा, त्यात पहिले काही दिवस राहिलो. कृष्णकुमार हा मूळ केरळचा शिक्षक तिथे अरुणज्योतीचे काम करायचा. त्याच्या सोबत कामाचा अभ्यास सुरु झाला.

पहिल्या एक दोन दिवसानंतर शाळेपाठीमागच्या दुगी बस्तीत गावच्या प्रमुखाच्या (गाव बुढा) मुलाच्या लग्नानंतरच्या शुभेच्छा समारंभासाठी शाळेतील सर्व शिक्षकांना जेवणासाठी बोलावले होते. मी सर्वांसोबत गेलो. अरुणाचली घर बांबू व जंगलात मिळणाऱ्या तोकु पत्त्याची (पानांची )बनवलेली असतात. घराच्या मध्यभागी चूल असते. त्याच्या भोवती बसून पंगत चालते. मला पहिल्या सहा महिन्यात एकदा पण मानवनिर्मित विजेचे दर्शन काही झाले नाही.

आमची पंगत मस्त सुरु झाली. पहिल्यांदा “अपांग” म्हणजे Rice Beer, आपल्याकडे चहा जसा आतिथ्याचे प्रतीक आहे तसे सगळ्या अरुणाचल मध्ये “अपांग”. “अपांग” विशिष्ट पद्धतीने घेतली की ती चढत नाही. माझा “अपांग” पिण्याचा पहिलाच प्रसंग. मी “अपांग” बद्दल बरेच ऐकून होतो. जर्मनच्या जगमध्ये किंचित काळसर “अपांग” मला दिली गेली. पहिला घोट घेतला थोडी आंबूसचव. पहिले काही घोट घेतल्यावर मला चढल्यासारखे वाटू लागले. “अपांग” पिण्याचा बराच आग्रह होतो. पुढे मी पट्टीचा “अपांग” पिणारा झालो.

“अपांग” नंतर जेवणाला सुरुवात झाली. भात, उकडलेली रस्साभाजी व मीठ असा मेनू. मस्त पोटभर जेवण झाल्यावर आम्ही दुगी परिवाराचा सस्नेह निरोप घेतला. कीर्र अंधारातून आम्ही चालत परत शाळेत निघालो. रातकिड्यांच्या आवाजाने आसमंत थोडे भय निर्माण करणारा होता. सोबत विजेरी गरजेची कारण पायामध्ये कोणते जंगली मित्र (साप, नाग, विंचू,इत्यादी ) येतील याची शाश्वती नाही. शेवटी आम्ही त्यांच्याच विश्वात राहत होतो. जाताना गप्पा चांगल्याच रंगल्या.

“क्यूं प्रसादजी कैसी लगी “अपांग” ?” एका शिक्षकाने विचारले.

“ठीक रही” मी उत्तर दिले.

“घुम रहा है क्या ?”

“नही तो” मी थोडे अधिकच विश्वासाने बोललो.

“आपने जो आज सब्जी खाई वो कैसी लगी ?”

“ठीक थी”

“पहले खाई है कभी ?”

“हां,बहुत बार खाई है”

“आपको समझा क्या, किसकी सब्जी थी ?”

“सोयाबीन चंक्स की थी”

“अरे सर, आपको थोडी गलतफहमी हुई ऐसा लगता है” शिक्षकाने थोडे हसतच उत्तरं दिले.

“क्यू क्या हुआ ?”

“अरे प्रसादजी वो सुअर के मास की सब्जी थी” शिक्षक हसत बोलला. त्याच्या बरोबर सगळे शिक्षक हसले.

मला मात्र अंबाजोगाईतील रस्त्यावर,गटारात असलेले डुकरे डोळ्यासमोर दिसत होती. मी एकदम शांत पणे माझ्या निवासस्थानी गेलो. पण मनातून आपण काय खाल्ले आहे हे काही जात नव्हते. नकळत मनातले तोंडात अवतरले. मळमळ सुरु झाली. दार उघडून आत सरळ स्वच्छता गृहात गेलो. एका पाठोपाठ एक अशा अनेक उलट्या झाल्या. पोटातले सगळे बाहेर पडले पण मनातले कसे निघणार ? खूप थकल्याने झोप लवकर लागली.
सकाळचे चार वाजले असतील. पक्ष्यांचा चिवचिवाट सुरु झाला. मला मात्र घडयाळ बंद पडले असे वाटले.

सकाळच्या प्रात:स्मरणासाठी गेलो. शंकराचार्यांच्या स्तोत्राने एक स्फूर्ती मिळाली. मनातील किंतु परंतु निघून गेले. त्यानंतर मी पुढील चार वर्षं जे समोर येईल ते ब्रह्मार्पणम् म्हणून सेवन केले. त्यातून फक्त पोटाचा आयुष्यभराचा विकार जडला पण सूर्याला आई मानणाऱ्या अरुणाचलच्या बंधूंशी व भूमीशी एक अतूट नाते जुळले.

काही दिवस कृष्णकुमारबरोबर कुपोरीजोत राहून काम केले. मला लोकांमध्ये राहून काम करायचे होते. दापोरीजो येथील श्री.दाक्पे यांच्या घरी अरुण-ज्योतीचे कार्यालय होते तिथे मुक्काम हलवला. जानिया सोकी सारखे मस्त सहकारी भेटले. एका जोशात काम करत होतो.

अरुणाचलमध्ये घराच्या अगदी मध्यभागी चूल असते व ती कायमची प्रज्वलित असते. त्यामुळे घरात बरेच धुराचे साम्राज्य. यामुळे फार लवकर डोळ्याचे विकार व वृद्ध लोकांमध्ये मोतीबिंदूचे प्रमाण खूप पहावयास मिळते. विवेकानंद केंद्रांनी नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रियेचे अभियान अरुणाचलभर सुरु केले. आम्ही दापोरीजो मध्ये जिल्ह्यातील लोकांसाठी नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन केले. जिल्ह्याची लोकसंख्या चाळीस हजाराच्या आसपास. आयोजनासाठी बऱ्यापैकी खर्च येणार होता. काय करणार? आमच्या समोर मोठा प्रश्न होता.

केंद्राचे संस्थापक आ. एकनाथजींनी विवेकानंद शिलास्मारक उभे करताना मानसी एक रुपया स्मारकासाठी अशी योजना केली व त्यातून चार कोटी रुपये जमा झाली. आम्हाला चाळीस हजार पाहिजे होते. मी ज्या भागात होतो तेथे तागीन,आदी व हिल्समिरी जनजातीचे लोक होते. त्यांच्यात आजीला आने व आजोबाला आतो म्हणतात. आम्ही शाळेतून, महविद्यालयातून, शासकीय कार्यालयातून आवाहन केले की एका आने किंवा आतोच्या शस्त्रक्रियेसाठीचे एक हजार रुपये जमा करून त्यांनी एका आजी आजोबांना दत्तक घ्यावे. हे भावनिक आवाहन भावूक अरुणाचली बंधूंच्या हृदयाला भिडले. काही दिवसातच जिल्हाभरातून ४५ हजार रुपये जमले.

नेत्र शिबिराचा व्याप फारच मोठा होता. आधी सर्व जिल्हाभर प्रचार मग दापोरीजो येथे नेत्र तपासणी. त्यातून मोतीबिंदू असणारे रुग्ण सापडणे व त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून पुढे सात दिवस त्यांची सगळी काळजी घेणे. खूप मनुष्यबळ व रचनाबांधणी आवश्यक होती. केंद्राचे अनेक ज्येष्ठ जीवनवृत्ती दापोरीजो मध्ये दाखल झाले. शिबिराच्या दिवशी जवळपास हजारच्यावर रुग्णांची तपासणी करण्यात आली व त्यातून ४७ जणांची मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करायचे ठरले. महाविद्यालय व शाळेतील अनेक तरुण लोक मदतीला होती. आम्ही पूर्ण जिल्हारूग्णालयच ताब्यात घेतले. त्याचा पूर्ण कायापालट केला. एकदम टाप टीप झाले सगळे. दुसऱ्या दिवशी शस्त्रक्रिया सुरु झाल्या. त्यानंतर आने व आतोंची काळजी घेणे फार महत्वाचे होते.

जेवण, डोळ्यात औषध टाकणे, स्वच्छता इत्यादि २४ ‍‍‌‍बाय ७ असे कामाचे नियोजन करावे लागले. रात्री सर्व काम झाल्यावर गप्पा रंगत.

सगळे कार्यकर्ते व अरुणाचली बंधू अगदी कुठलाही आड पडदा न ठेवता गप्पा मारत. तसे त्यांच्यात आणि आपल्यात त्यांनी कधीच पडदा निर्माण केला नाही पण आपल्याच अज्ञानामुळे आपण कधी नकळत तर कधी
राज्यकर्त्यांच्या अक्षम्य चुकांमुळे पडदा निर्माण केला.

चर्चेचा सूर होता .....

“सर हम तो भारतीय ही नही है न ? जब भी हम लोग दुसरे राज्य मे जाते है तो लोग हमे चीनी, नेपाली,जपानी कहते है.... हम लोग तो बरसोंसे यही सुनते आये है. अगर बतायेंगे की हम लोग नॉर्थईस्ट से आये है तो वो कहते है, कहा है नॉर्थईस्ट? .....बहोत सारे लोगोंको यहा के राज्य के नाम भी मालूम नही है. राज्योंकी राजधानी तो दूर की बात. हमारे लोगोंकी भाषा, परंपरा, सभ्यता के बारेमे तो बहोत थोडे लोगोंको मालूम है. अरुणाचल से जादा तो सबको अमरीका के बारेमे मालूम है. बडे बडे लोगोंको भी बहोत साधारणसी बाते मालूम नही है न! सर, फिर बताओ हम कैसे भारतीय है? अपने घर के लोगोंकी तो पहचान नही ऐसा तो नही होता है न सर?”

मी शांतपणे सगळे ऐकत होतो. काय बोलणार यावर? हे बऱ्यापेकी सत्य होते.

“फिर हमारे बच्चे ये सुनकर बिथर जाते है ....और गलत रास्ते पे जाते है. बंदूक और खून बहानेसे कूछभी नही होने वाला यह तो हम लोग भी जानते है. बाहर के देशके लोग तो उनको भडकाते रहते है.”

आज ईशान्य भारतात ६०च्या वर अतिरेकी संघटना आहेत. एक कोटीच्या वर २५च्या आत येथे तरुण वर्ग आहे. तो अंमलीपदार्थांच्या सेवनांमुळे पोखरला जात आहे. आपल्या घरातील आपल्या मुलांची बरबादी आपण उघड्या डोळ्यांनी पाहणार का ? माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत होते. आपले देशाबद्दलचे अज्ञान, एक मोठं राष्ट्रीय पापच नाही का? एक काळ असा होता की शत्रू दूर होता व आपल्याजवळ लांब पल्ल्याची अग्नी सारखे क्षेपणास्त्र नव्हती. आता ती आपण आपल्या ज्ञानाने निर्माण केली पण त्याबरोबर आपल्या अज्ञानामुळे घरातूनच शत्रू निर्माण होत आहेत.

अस्वस्थ करणाऱ्या चर्चेने मन अस्थिर होई पण शरीर खूप थकलेले असल्याने कधी उष:काळ होई ते समजत नसे. मग परत नवीन प्राण व नवीन राग.

सात दिवस कसे गेले ते समजले नाही. पण खूप काही शिकवून गेले. माझ्या सात पिढ्यांनी सुद्धा जे समजून घेतले नव्हते त्याची प्रत्यक्ष अनुभूती या सात दिवसात झाली. आजी आजोबांचा निरोप घेताना मन दाटून येत होते. पुढील काही दिवसांनी ते चष्मे घेण्यासाठी येणार होते.

आज सकाळपासूनच आमची लगबग सुरु झाली. सगळे कार्यकर्ते आजी आजोबांची वाट पहात होती. जिल्हा रुग्णालयात आम्ही दाखल झालो. सर्व व्यवस्था केली. चष्मा देणारा पण दिब्रुगडहून आला होता. अकरा वाजेपर्यंत बरेच आजी आजोबा आले. त्यांचे डोळे तपासून त्यांना चष्मा आम्ही देत होतो. प्रत्येक जण आता पाहू शकत होते. एक आजोबा तर उड्या मारत म्हणत होते,

“कापा दो ! कापा दो ! कापा दो !” (म्हणजे मला दिसतय).

काही आजींच्या डोळ्यातून पाणी येत होते. काही खूप खुश तर काही खूप शांत.

माझ्या मनात मात्र त्या विलोभनीय दर्शनामुळे निर्माण झालेल्या सार्थकतेची प्रसन्न शांतता होती...आतापर्यंत फार कमी अनुभवली होती मी ती!

आज मात्र सगळेजण हसत हसत आपल्या घरी गेले.

बरोबर १७ दिवसानंतर रात्रीच्या जागरणामुळे मी थोडं जास्त वेळ व गुलाबी थंडीत उबदार रजईत निद्रा देवतेच्या संपूर्ण अधीन झालो होतो.

खड खड खड खड कुणी तरी दरवाजा वाजवत असल्याच्या आवाज आला. मी बघतो तो चांगलेच उजाडले होते. मी दरवाजा उघडला तो समोर एक चष्म्यातल्या आजीबाई उभ्या. चेहऱ्यावर खूप सुरुकुत्या, अंगावर पारंपारिक तागीन कपडे.

मी आजीला नमस्कार केला व म्हटले,

“नो आने दोद्के” (आजी या बसा )

तो पर्यंत जानिया सोकी उठला होता. त्याने आजीची विचारपूस केली. आजी दहा किलोमीटर वरून चालत आलेली होती. त्याने तिला हालहवाल विचारले व येण्याचे कारण पण.

आजी आपल्या भाषेत माझ्याकडे म्हणाली, “लेका, तुमच्या मुळे मला आता दिसायला लागले. फार अवघड झालं होत. बाहेरच पडता येत नव्हत. सगळ आयुष्य परस्वाधीन पण आत्ता मला माझे सगळे काही करता येते. तुम्ही माझी सेवा केली एक रुपया पण घेतला नाही.” जानिया मला ती बोलत असलेली वाक्य डोळ्यात पाणी आणून सांगत होता. तो खुपच भावूक होता. लहानपणीच आई गेल्याने तो बराच हळवा होता.

“जानिया सामाजिक कामोमें इतनी भावूता नही चलेगी.” मी बऱ्याच वेळी त्याला हे पालूपद सांगत असे.

आजी उठली व तिने आपल्या जवळच्या कपड्यातून एक केळीच्या पानाची पुडी काढली व माझ्या हातावर ठेवत ती म्हणाली,

“मी तुला काही फार मोठ देऊ शकत नाही पण आज तुझी आठवण झाली म्हणून हे तुझ्यासाठी घेऊन आले.” जानियानी मला तिच्या भावना सांगितल्या.

मी केळीच्या पानाची पुडी उघडली. त्यात एक उकडलेले अंडे होते.
आज आठवण झाली म्हणून सकाळीच दहा किलोमीटरचा प्रवास करून आलेल्या आजीच्या चेहऱ्याकडे मी पहात होतो. माझ्या डोळ्यातून अश्रूचा निर्झर वाहत होता .........

भारतरत्न राष्ट्रपतीच्या हाताने घेताना कोणत्या भावना असतात याचा अनुभव मला कधीही येणार नही. पण माझ्यासाठी ते अंडे भारतरत्नाच्या पदका पेक्षाही श्रेष्ठ होते ....!!!!
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
@इथे छायाचित्रे कसे जोडायची ते मला माहित नाही .....पण वरील लेख छायाचित्रांबरोबर वाचला तर अधिक समजेल त्यासाठी जर आपल्या कडे वेळ असेल तर नक्की माझ्या ब्लॉगवर आपल्याला ते समजून घेता येईल...
http://prasadchikshe.blogspot.in/2012/04/blog-post_22.html

गुलमोहर: 

प्रसाद चिक्षे,

आपल्याला आणि आपल्या कार्याला शतवार मानाचा मुजरा! तुमच्यासारखी लोकं भेटणं हे आमचं परमभाग्य! Happy

आ.न.,
-गा.पै.

सुंदर अनुभव. अश्या ठिकाणी जाऊन काम करणे खूपच जिकीरीचे असते. मी २००२ साली राष्ट्रीय छात्र सेनेत असताना एका कॅम्पसाठी ८ दिवसांकरीता बॉमडिला येथे गेलो होतो.

Seven Sisters of India असे एक पुस्तक आहे त्यात ह्या ७ राज्यांबद्दल अतिशय सविस्तरपणे माहिती दिली आहे.:)

सेनापती, Seven Sisters of India या पुस्तकाचे मराठी भाषांतर आहे काय ?

छान लिहीलं आहे. अत्यंत दुर्लक्षित प्रांत. तिथल्या इतिहास व ऐतिहासिक थोर पुरुषांबद्दल वाचायला नक्कीच आवडेल. अशी काही पुस्तके आपण सुचवू शकाल काय?

बाकी राज्यकर्त्यांच्या दुर्लक्षाचा फायदा चीन (हा तुमचा देश नाही असे सांगत) व चर्च (धर्मांतर करत) घेत आहेतच.

भारतरत्न राष्ट्रपतीच्या हाताने घेताना कोणत्या भावना असतात याचा अनुभव मला कधीही येणार नही. पण माझ्यासाठी ते अंडे भारतरत्नाच्या पदका पेक्षाही श्रेष्ठ होते ....!!!!>>>>>>>> सलाम रे मित्रा.....
अप्रतिम लेख....... माझी मेव्हणीही काही काळ तिकडे - अरुणाचल प्रदेश, आसाममधे सेवाव्रती म्हणून होती - तुझ्या विचारपूसमधे लिहितो बाकीचे....
कृपया अजून लिहिणे.....
आपल्याला आणि आपल्या कार्याला शतवार मानाचा मुजरा! तुमच्यासारखी लोकं भेटणं हे आमचं परमभाग्य!>>>> अनुमोदन.....

गामा पैलवान धन्यवाद .....
मी साधा कार्यकर्ता आहे .....अजून खूप काम करायचे आहे .....मुजरा आत्ताच नाही घेतायेणार ...शेवटच्या स्वासा पर्यंत काम केलं तर लायक राहील .

या भागाबद्दल अनेक गोष्टी लिहिण्यासारख्या आहेत. तूम्हाला भेटलेली माणसे, भेट
दिलेली गावे व शहरे, त्या गावातले अनुभव.. कुठलाही क्रम न देता लिहा.
बातम्यात सुद्धा त्या राज्यांबद्दल फार काही नसते. मूळात पत्रकार तिथे जात नसतील
असेच वाटते.

अजून खूप काम करायचे आहे .....मुजरा आत्ताच नाही घेतायेणार ...
----- विचार करायचा हा दृष्टिकोन ( attitude) आवडला.... पुढील कार्यासाठी शुभेच्छा.

दिनेशदा धन्यवाद मी थोडे स्वान्तसुखाय लिहितो आपल्या मार्गदर्शनाने थोडा आत्मविश्वास वाढला आता सहज लिहिता येईल....
पत्रकार आहेत .....पण आपल्या मराठी वर्तमान पत्रात जागानसते यासाठी....

>>> Seven Sisters of India असे एक पुस्तक आहे त्यात ह्या ७ राज्यांबद्दल अतिशय सविस्तरपणे माहिती दिली आहे.

सिक्कीमचा समावेश करून ईशान्य भारतात एकूण ८ राज्ये होतात ना? (उरलेली ७ - आसाम, अरूणाचल प्रदेश, नागालॅण्ड, मिझोराम, मेघालय, मणिपूर आणि त्रिपुरा)

छान, मनापासुन लिहीलंय..लेख खूप आवडला.
ईशान्य भारत.अगदीच दुर्लक्षित भाग.. धर्मांतर, अतिरेकी संघटना, निर्वासितांचा लोंढा..एक दिवस याची संपुर्ण देशाला मोठी किंमत मोजावी लागेल असे वाटत राहते. Sad

शीर्षक वाचुन मला वाटलेलं कोणतातरी नेहमीसारखा भांडणे लावणारा धागा असेल.. बरं झालं डोकावुन बघायला आले नाहीतर लेख मिसला असता. Happy

"ईशान्यभारत - भारताचा एक दुर्लक्षित भाग" हा बद्दल मी केला आहे. तो सुचवला पुरंदरे शशांक याने. एखादी रचना किवा लेखन ज्यावेळी आपण समाजार्पण करतो त्यावेळी तो कुण्याएकट्याचा लेख किवा रचना रहात नाही. जोपर्यंत आपण मालकी हक्क सोडत नाहीत तोपर्यंत आपला पण विकास होत नाही असे विनोबा म्हणतात.
ज्यादिवशी मी हा लेख लिहिला व इथे ठेवला त्यावेळी तो मायबोलीचा झाला. म्हणजे आपल्या सगळ्यांचा ....त्यामुळे तो सजवणे, विकसित करणे आपल्या सर्वांचेच असते. धन्यवाद शशांक !!!:)

मी साधा कार्यकर्ता आहे .....अजून खूप काम करायचे आहे .....मुजरा आत्ताच नाही घेतायेणार ...शेवटच्या स्वासा पर्यंत काम केलं तर लायक राहील .>>>>> तू खराखुरा विनोबांचा अनुयायी शोभतोस........
आता शीर्षक छान वाटत आहे - मनापासून धन्यवाद.........

सुंदर लेख , आजुन खुप वाचायला आवडेल Happy या कार्या बद्दल >> आपल्याला आणि आपल्या कार्याला शतवार मानाचा मुजरा! तुमच्यासारखी लोकं भेटणं हे आमचं परमभाग्य!>>>> अनुमोदन.....

हृद्य अनुभव!! ईशान्य भारताबद्दल खरोखरी अधिक प्रमाणात जाणून घ्यायला हवे आहे. तिथल्या लोकांनाही भारत ''माझा देश'' वाटावा असे चित्र निर्माण होण्याची निकड आहे.

दोनच आठवड्यांपुर्वी मी अरुणाचल मधे होते. सह्याद्रीशी मैत्री करु बघणार्‍या आम्हाला हा प्रदेश अतिशय आवडला. परत नक्कीच जाणार

३२ शाळा ह्या प्रदेशात विवेकानंद केन्द्राच्या आहेत अशी माहिती आम्हाला गुवाह्टीच्या केन्द्रातील श्री. विजय जोशी यांनी दिली होती, आणि एखाद्या तरी शाळेला भेट द्यायचे ठरवले होते पण सतत ५ दिवस बर्फ पडत असल्याने बाहेरच पडता आले नाही. Sad

अरुणाचलाला भेट दिल्यामुळे तेथील हवामान आणि लोक, संस्कॄती ह्या आठवणी अगदी ताज्या आणि कायम लक्षात रहाण्या सारखच आहे. आणि लक्षात रहाण्यासारखे आले ते आदरातिथ्य Happy

आज ईशान्य भारतात ६०च्या वर अतिरेकी संघटना आहेत. एक कोटीच्या वर २५च्या आत येथे तरुण वर्ग आहे. तो अंमलीपदार्थांच्या सेवनांमुळे पोखरला जात आहे. आपल्या घरातील आपल्या मुलांची बरबादी आपण उघड्या डोळ्यांनी पाहणार का ? माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत होते >>>>> ह्यावर तोडगा म्हणून "आनंदालय" अशी नवीन योजना चालू करताहेत ना? डे केअर सेंटरच्या धर्तीवर? ह्या योजने साठी निधीही जमवयचा आहे. आम्ही खारीचा वाटा उचलून आलेय पण मला वाटते ह्या मायबोलीच्या माध्यमातुन तुम्हाला हे शक्य होईल अर्थात तशी पुर्व परवानगी घ्यावी लागेल बहुतेक

किमान ह्या आणि अश्याच अनेक योजनांविषयी आपण येथे जरुर लिहावेत --- निधी जमवयचा की नाही हे नंतर ठरवता येईल Happy

१९३१ सालापासुन असेच काम रामकॄष्ण मिशन - चेरापुंजी मेघालयलाही करते आहे. त्या बद्द्लही काही माहिती असल्यास जरुर लिहावी ही विनंती

आपल्या लेखनात ही ताकद आहे.

आपल्या लेखनास आणि कार्यास मनःपुर्वक शुभेच्छा Happy Happy Happy

प्रसादः
अप्रतिम माहिती आणि खूप छान मांडली आहेत. या लेखाच्या निमित्ताने ५ वर्षांपूर्वी घडलेला एक प्रसंग आठवला.
मुलांची पियानो रिसायटल एका चर्च मध्ये आयोजित केली होती. आम्ही जरा लवकर पोहचलो म्हणून त्यांचे बुलेटीन बोर्ड वाचत होतो. एका बोर्डावर भारतातल्या लोकांचे फोटो दिसले म्हणून माहिती कुतुहलाने वाचू लागलो तर तो आंध्रा मधल्या एका खेडेगावाचा "प्रोग्रेस रिपोर्ट" होता. एकंदरीत बाप्टिस्मा द्यायला कशी सुरवात करावी, उपाय-योजना, काय बोलाव, काय द्याव, काय कराव (स्थानिक मुलिशी लग्न हा टॉप उपाय होता). नवर्‍याची तार सरकायला लागली होती. तेवढ्यात शेजारच्या बोर्डावर असाच "चायनिज रिपोर्ट" दिसला. आँ.. चायनात पण हे मिशनरी घुसले? बारकाईने वाचू लागलो तर उडालोच. तो अहवाल अरुणाचल प्रदेशाचा होता. जास्तच डिप्रेसिंग कारण त्यात चक्क लिहल होत कि "भारतीय लोक आणि सरकार ह्यांना भारतीय मानत नाहीत त्यामुळे स्थानिकांमध्ये खूप असुरक्षिततेची भावना आहे.. त्याचा फायदा घ्या".

तुमच्या ह्या लेखामुळे छान माहिती मिळाली आणि "चांगली संस्था जर काम करत असेल तर त्याला मदत करायला खूप आवडेल" हा आता नुसता विचार राहणार नाही. कृती करण्यास तयार आहोत तेव्हा जरुर लिहा की कशी मदत करु शकू.

अरुंधती कुलकर्णी |आपण म्हणताय त्या पेक्षा मला थोडं वेगळ वाटतय.....त्यांना भारत आपला वाटण्या पेक्षा आपल्याला ते आपले वाटावेत हे पहिल्यांदा व्हावे लागेल.

Pages