खरेमास्तर - ले. मालतीबाई बेडेकर : वाचावेच असे एक पुस्तक

Submitted by दामोदरसुत on 20 April, 2012 - 05:55

खरेमास्तर - ले. मालतीबाई बेडेकर (विभावरी शिरूरकर) - वाचावेच असे एक पुस्तक.
वडिल विकलांग अवस्थेत मृत्युशय्येवर शेवटची घटिका मोजत असतांना लेखिका त्यांना म्हणाली, " अण्णा, तुम्ही आयुष्यभर किति केलं आमच्यासाठी !" यावर उसने बळ आणून अण्णांनी विचारले, "तुम्हाला अगदी खरंच असं वाटतं का गं?" सर्व भावंडांना(८) वडिलांबद्दल खूप कांही वाटत असूनही हवे ते शब्द योग्य वेळी न उच्चारण्याने ’ आपल्या कष्टांची उपेक्षा झाली ’ असे तर वडिलांना वाटत नव्हते ना अशी खंत लेखिकेला वाटू लागली आणि म्हणूनच खरे तर 'सुधारकी' विचाराचे आणि आचाराचे ’खरेमास्तर’ आपल्यापर्यंत पोचले. अशी कांही भारलेली व्यक्तिमत्वेच समाजव्यवस्था सुधारण्यास मोठा हातभार लावीत असतात. अलिकडे नरेंद्र जाधवांनी लिहिलेले 'आम्ही आणि आमचा बाप' या पुस्तकाची हे पुस्तक वाचतांना आठवण झाली.
शिक्षित स्त्रियांच्या पहिल्या पिढीतील, सुप्रसिद्ध लेखिका मालतीबाई बेडेकर यांनी आपले वडिल अनंत खरे यांचे सुमारे २० वर्षांपूर्वी लिहिलेले हे चरित्र वाचल्यावर, सामाजिक स्थित्यंतराचा (१८८५ ते १९४७ चा काळ असावा) सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यावर होणारा परिणाम कसा असतो याचे दर्शन घडवणारे हे चित्रण. या विषयात रस असणाऱ्या प्रत्येकाने वाचले पाहिजे असे वाटल्याने हा पुस्तक परिचय देतो आहे.
खुद्द वडिलांनी स्वत:च्या विवाह ठरेपर्यंतच्या आयुष्याबद्दल लिहिले होते. हे खरे गुहागरचे! बेताची परिस्थिती. आठव्या वर्षी वडिल गेले. चौथीपर्यंत शिकल्यावर मुंबईला कोठल्याच आधारा विना गेले. पुढे शिंपीकाम व चित्रकला शिकले. आईला व भावाला मुंबईत आणले. विवाह झाला. सुधारकी विचारांच्या लोकांमध्ये राहाण्याची संधी मिळाल्याने त्या विचारांचा पगडा बसला. पुढे प्लेगची साथ आल्याने घोडनदी(शिरूर) येथिल मिशनरी शाळेत चित्रकला शिक्षक झाले. पहिल्या दोन मुली, मग मुलगा, पुन्हा मुलगी असा संसार वाढत गेला. पण मुलींना शिकवायचेच या जिद्दीने पाची मुलींनाही मोठ्या जिद्दीने शिकविले. या सर्व काळात त्या काळातील स्वातंत्र्यचळवळ, पहिले महायुद्ध, पंचम जॉर्जचे राज्यारोहण, महर्षी कर्वे यांची भेट, मिशनरी लोकांची वागणूक आणि मनमानी, ’भस्म करून टाकीन’ अशी धमकी देणाऱ्या एका प्रसिद्ध महाराजांची खरेमास्तरांनी केलेली फजिती, घोडनदी-पुणे पहिली मोटार सर्विस, दुष्काळातील अनुभव, गोपालक मुसलमान शेजारी, दुधाचा धंदा अशा प्रसंगांच्या मालिकेतून समाजस्थिती व त्यात होत जाणारे बदल फार उत्तम प्रकारे समजून येतात. त्यातले कांही देण्याचा मोह आवरला कारण संपूर्ण पुस्तकच फार वाचनीय आहे.
लेखिकेने वडिलांचे व्यक्तिचित्रण प्रामाणिकपणे आणी नि:संकोचपणे केले आहे. त्यांच्या असामान्यत्वाप्रमाणेच त्यांच्या कमकुवत बाजूही स्पष्टपणे मांडल्या आहेत. मुले मार्गी लागल्यावर संसारात असूनही निरनिराळ्या कारणांनी त्यांना आलेल्या एकटेपणाचे चित्रण पाहिल्यावर आजही अशी कितितरी माणसे आपल्याला आसपास असल्याचे जाणवेल. जुन्या मोठ्या ग्रंथालयांमधून हे पुस्तक असू शकेल. नव्यांमध्ये जरा कठीण वाटते. खऱ्यांपैकी कोणीतरी याचे ई-बुक केले तर नव्याचे उत्साहाने स्वागत करणाऱ्या आपल्या या पूर्वजाला श्रद्धांजली वाहिल्याचे समाधान त्यांना मिळू शकेल.
माझ्या हाती लागलेल्या पुस्तकाचा तपशिल असा :
खरेमास्तर- विभावरी शिरूरकर (१३० पाने)
पॉप्युलर प्रकाशन, मुंबई
प्रथम आवृत्ती १९९३/९४

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगल्या पुस्तकाचा थोडक्यात पण उत्कंठावर्धक परिचय करुन दिलात.
आमच्या लायब्ररी ऑफ कॉन्ग्रेस मधे आहे का पहावे लागेल.

अवांतर कॉंग्रेस म्हणजे राजकीय पक्ष किंवा तण हे दोनच अनेक वर्षे माहित असलेल्या माझ्या मनाला जगभरच्या भाषांमधली कोट्यावधी पुस्तके असलेल्या, ऑनलाईन कॅटलॉग असलेल्या, संयुक्त राज्यातल्या कुठल्याही लायब्ररीला पुस्तके लोनवर देणार्‍या लायब्ररीला लायब्ररी ऑफ कॉन्ग्रेस म्हणताना दरवेळेस कसंसच होतं अगदी Happy

<<मुले मार्गी लागल्यावर संसारात असूनही निरनिराळ्या कारणांनी त्यांना आलेल्या एकटेपणाचे चित्रण पाहिल्यावर आजही अशी कितितरी माणसे आपल्याला आसपास असल्याचे जाणवेल<< खरय अगदी.

<<यावर उसने बळ आणून अण्णांनी विचारले, "तुम्हाला अगदी खरंच असं वाटतं का गं?" सर्व भावंडांना(८) वडिलांबद्दल खूप कांही वाटत असूनही हवे ते शब्द योग्य वेळी न उच्चारण्याने ’ आपल्या कष्टांची उपेक्षा झाली ’ असे तर वडिलांना वाटत नव्हते ना अशी खंत लेखिकेला वाटू लागली<<

अंतर्बाह्य थरारले मन...रुखरुख लागली हे वाचुन... आपल्याही काही गोष्टी करायच्या राहुन गेल्यात हे उमजलं! Sad

बघते... कुठे मिळते का हे पुस्तक!

छान ओळख. या पुस्तकाबद्दल खुप वाचले आहे पण पुस्तक अजून वाचलेले नाही.
मराठीतील अनेक पुस्तकांच्या आता इलेक्ट्रॉनिक आवृत्त्या निघायला पाहिजेत. परत
छापली जाणे, अशक्यच आहेत. निदान अशा रुपात तरी वाचली जातील.

या विशेष पुस्तकाची इथे सदस्यांना ओळख करून दिल्याबद्दल श्री.दामोदरसुत निश्चितच अभिनंदनास पात्र आहेत. मुलींच्याबाबतीत काही लोक काळाच्या पुढे जाऊन कसा विचार करत असत याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे अनंतराव खरे [आणि त्यांच्या हरेक प्रयत्नाला साथ देणार्‍या इंदिराबाई, त्यांच्या पत्नी]. १०० वर्षापूर्वी आपल्या मुलीनी सायकल शिकली पाहिजे, त्याना नदीतच काय पण समुद्रातही पोहता आले पाहिजे, त्यानी प्राथमिक शिक्षण झाल्यानंतरही पुढे हायस्कूल व कॉलेजचे शिक्षण घेतले पाहिजे असे विचार मांडून ते प्रत्यक्ष अंमलात आणणे किती धाडसाचे होते हे या काळातील पिढी जाणू शकत नाही.

मुलींच्या शिक्षणाला साक्षात लोकमान्य टिळकांसारखी पहाडव्यक्ती विरोध करीत असतानाही पुण्यात आपल्या मुलीनी शिकले पाहिजे ही आग्रहाची भूमिका मांडणारे खरे मास्तर सर्वार्थाने वंदनीय म्हटले पाहिजेत.

मालती बेडेकर यानीही आपल्या वडिलांच्या त्या इच्छेला मान देऊन हिंगण्यातून पदवी घेतली आणि स्वत:ला शिक्षणक्षेत्राशीच जोडून घेतले. विश्राम बेडेकरांसारख्या अवलियाशी संसार करूनही त्यानी घर आणि आपले सामाजिक कार्य नेटाने पुढे नेले, त्याला सर्वस्वी कारण म्हणजे 'खरेमास्तरां'चे त्यांच्यावर असलेले संस्कार.

वाचले आहे मी हे पुस्तक शशिकांतजी. पण तुम्ही याची इथे ओळख देताना :
"सुप्रसिद्ध लेखिका मालतीबाई बेडेकर यांनी आपले वडिल अनंत खरे यांचे सुमारे २० वर्षांपूर्वी लिहिलेले हे चरित्र वाचल्यावर....." ~ असे म्हटले आहे, शिवाय तळटीपेत प्रथम आवृत्ती १९९३/९४ असाही उल्लेख केला आहे. यात कुठेतरी गल्लत होतेय अशी मला दाट शंका आहे. कारण माझ्या स्मृतीप्रमाणे मी हे पुस्तक १९७५ ते १९७८ या दरम्यान वाचले आहे; तेही करवीर नगरवाचन मंदिराच्या जुन्या पुस्तकांच्या कपाटातून काढून घेऊन [तिथे कायम सदस्यांना ती सवलत आहे]. म्हणजे 'खरेमास्तर' ची प्रथम आवृत्ती १९५५ च्या अगोदरची असली पाहिजे. तुमच्याकडे असलेल्या आवृत्तीवर 'प्रथम प्रकाशन' असे पॉप्युलरने छापले आहे ?

पुढे असेही वाचनात आले होते की, 'खरेमास्तर' ची इंग्रजी आवृत्ती प्रकाशित झाली. त्याचे भाषांतर कुणी केले हे समजले नाही.

अशोक पाटील

वा! खूपच कमी शब्दात खूप छान पुस्तक परिचय करुन दिला. मी विभावरी शिरुरकर उर्फ मालतीबाई बेडेकर ह्यांचे कळ्यांचे नि:श्वास हे एकच पुस्तक वाचले आहे आणि मला ते त्यावेळी नितांत आवडले होते.

नमस्कार अशोक,
आपला अधिक माहिती देणारा सविस्तर प्रतिसाद वाचून मी दिलेल्या पुस्तक-परिचयाचे सार्थक झाले असे वाटले. मी वाचली त्या प्रतीत " पहिली आवृत्ती १९९३/१९१४ असे छापलेले आहे. १९१४ हा मुद्रणदोष असावा कारण त्यावेळी तर त्या अजून शिकत असतील. त्यामुळे मी सुमारे २० वर्षांपूर्वी लिहिलेली असा उल्लेख केला आहे. मुखपृष्ठावर लेखिकेचे नाव 'विभावरी शिरूरकर' दिले असले तरी आतील प्रास्ताविक मालती बेडेकर नावाने आहे आणि त्यावरूनही हे पहिलेच प्रकाशन असल्याप्रमाणेच मजकूर आहे.
पुस्तकात मला भासलेली अडचण म्हणजे दिनांक वा वर्ष यांचे उल्लेख अगदी क्वचित! तत्कालीन ठळक घटनांच्या उल्लेखावरून वरून अंदाज करावा लागतो. पण त्यामुळे एकूण प्रभावात कांहीच फरक पडत नाही. इंग्रजी आवृत्ती निघाली असेल तर चांगलेच आहे. पण मला मराठी आवृत्तीच इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये होणेही आवश्यक वाटते.
इतर सर्व रसिकांच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद! त्यांनी हे पुस्तक वाचून पुन्हा प्रतिस्आद नोंदवल्यास आनंद वाटेल.

उत्तम परिचय,
प्रवाहाविरुद्ध जाणार्‍या अशा अनेक सामान्य व्यक्तिंच्या छोट्या-छोट्या प्रयत्नातूनच समाज हळूहळू बदलत इथपर्यंत पोहोचला आहे. महान व्यक्तिमत्वांची माहिती सहज मिळते पण या पुस्तकासारखे डॉक्युमेंटेशन जास्त महत्वाचे आहे.
एक सूचना- दोन परिच्छेदांमधे एक मोकळी ओळ सोडली तर वाचायला सोपे जाईल.

नमस्कार दामोदरसुत....

रात्री मी या तारखेच्या गोंधळाविषयी एका ज्येष्ठ प्राध्यापक मित्राशीही बोललो. त्याने तर 'हिंदोळ्यावर' हे विभावरी शिरुरकरांचे पुस्तक बी.ए.च्या विद्यार्थ्याना शिकविले होते आणि त्या अनुषंगाने मालतीबाईंच्या अन्य पुस्तकांचाही ओघाने उल्लेख करीत होतेच, तेव्हा 'खरेमास्तर' तिथे येणे क्रमप्राप्त होतेच.

आज सकाळी मालती बेडेकरांच्या साहित्यसंपदेविषयी खालील माहिती मिळाली :

मालती बेडेकर [विभावरी शिरुरकर]

(कळ्यांचे निश्वास) (1933)
(हिंदोळ्यावर) (1933)
(बळी) (1950)
(विरलेले स्वप्न)
(खरेमास्तर) (1953).
(शबरी) (1956)
(पारध) (A play)
(वहिनी आली) (A play)
(घराला मुकलेल्या स्त्रिया)
(अलंकार-मंजूषा)
(हिंदुव्यवहार धर्मशास्त्र) (coauthored with K. N. Kelkar)
(साखरपुडा)

A translation of Kharemaster (खरेमास्तर) was later published in English.

[वर 'खरेमास्तर' प्रसिद्धीचे साल १९५३ असेच आहे]

पॉप्युलर १९९३-९४ प्रथम आवृत्ती म्हणत असेल तर गोंधळ असा आहे की त्या साली मालतीबाई ९० वर्षाच्या होत्या व माझ्या माहितीप्रमाणे वयाच्या ८६ वर्षी त्यांना स्मृतीभ्रंश झाला होता....पुढे त्यातच त्याना २००१ मध्ये देवाज्ञा झाली. असे असताना 'खरेमास्तर' १९९४ मध्ये कशी प्रसिद्ध होऊ शकते ?

असो. तारखेच्या रहस्यामुळे पुस्तकाच्या गाभ्याला काही न्यूनता येते असे कुणी समजणार नाही कारण मुळात पुस्तक बाजारात आले आहे हेच विशेष.

अशोक पाटील

नमस्कार अशोक,
यावरून आपल्या अंदाजाप्रमाणे मूळ पुस्तक १९५५ च्या आधीचेच म्हणजे १९५३ चे असेल. ज्या मित्राच्या सततच्या आग्रहावरून हे पुस्तक येथील एका ग्रंथालयात आढळताच मी आणून वाचले त्या मित्राकडे त्याची एक प्रत असेल असे वाटते. ती केव्हांची आहे ते विचारीन. अर्थात हा प्रकाशनाचे अधिकार वगैरेचा माम्ला असावा.

हो..... प्रकाशकाने 'स्वतः' प्रकाशित केलेले साल 'प्रथम' म्हणून घेतले असण्याची दाट शक्यता आहे. पण तरीही एक 'एथिक्स' म्हणून कुठेतरी प्रस्तावनेत का होईना "सदर पुस्तक अमुक एका साली संकीर्ण स्वरूपात तमुक एका प्रकाशकाने प्रसिद्ध केले होते, आताची ही आवृत्ती पूर्ण स्वरूपात वाचकांच्या समोर आणीत आहोत..." असा उल्लेख करण्याचा प्रघात आहे....बरेच प्रकाशक तो पाळतातही.

मीही सदरची १९५३ ची आवृत्ती शोधण्याचा प्रयत्न करतो.

खूप वर्ष झाली पुस्तक वाचून

माझी लेक आठवी नववीत असताना तिला जाणीवपूर्वक जी मराठी पुस्तकं वाचायला दिली त्यात होतं हे पुस्तक

>>>>वडिलांबद्दल खूप कांही वाटत असूनही हवे ते शब्द योग्य वेळी न उच्चारण्याने ’ आपल्या कष्टांची उपेक्षा झाली ’ असे तर वडिलांना वाटत नव्हते ना<<<<<<<< आजही या विचारानी डोळे पाणावतात

अशोक,
इंग्रजीत भाषांतर झाल्याबद्दल पुढील माहिती नेटवर मिळाली.
Kharemaster / Vibhavari Shirurkar ; translated from the Marathi by Yashodhara Maitra.
Published: Calcutta : Stree ; c1998.

धन्यवाद दामोदरसुत....

खरं सांगायचं म्हणजे मला ह्या अनुवादक लेखिकेचे नाव आठवायला हवे होते कारण यशोधरा मैत्र यांनीच पूर्वी विश्राम बेडेकर यांच्या "रणांगण" चा "बॅटलग्राऊंड" या शीर्षकाने इंग्रजी अनुवाद केला होता, जो मी पाहिला/वाचला आहे. पण 'खरेमास्तर' यांच्या संदर्भात हे नाव हुकले खरे. असो.

यशोधरा मैत्र या पूर्वाश्रमीच्या यशोधरा देशपांडे. हल्ली त्या अमेरिकेत रोचेस्टर इथे असतात. शिवाय कर्णबधीरांच्या शालेय शिक्षणामध्येही त्यांचा लक्षणीय असा सहभाग आहे.

अशोक , नमस्कार.
आपल्या चौफेर वाचनाचे आणि संबंधित माहिती देण्याचे मला फार कौतुक वाटते. अमेरिकेतच असल्याने या लेखिकेनेच कदाचित 'खरेमास्तर'चे ई-बुक देखील केले असेल.
मी माझा व्यवसाय भिन्न असला तरी इतर वाचनही थोडेसे केले आहे. पण आता जिला संगणकीय भाषेत रँडम अ‍ॅक्सेस मेमरी सिस्टीम (पाहिजे ते, पाहिजे त्यावेळी स्मरणातून नेमकेपणाने काढून देणारी प्रणाली) म्हणतात ती दगा देऊ लागली आहे. पण त्यामुळे ती आपल्याला याआधी किति साथ देत होती याची जाणीव होऊ लागली आहे.
तेव्हा लेखिकेचे नाव न आठवणे ही आपण करीत असलेले विस्तृत वाचन लक्षात घेता फारच किरकोळ बाब आहे.